Skip to main content

Sampadkya in 17 June2013

मीडियागिरीचा हंगामा
लहान मुलांच्या लपाछपीत किंवा चोरशिपाई खेळात भिडू `सापडला' की त्याच्या पाठीत धपाटा घालतात, त्याची हुर्यो करतात; आणि मग त्याच्यावर `राज्य' येते. हे सगळे आळीपाळीने चालते. प्रत्येक भिडू, किंवा गट, किंवा संघ वेगळे काही करत नाही. एखाद्यावर कधीच राज्य येत नाही असे होत नाही. कौशल्य - कसब - चपळाई थोडी कमीजास्त असेल; पण राज्य कधीतरी येतेच; परंतु एखाद्यावर राज्य आले, किंवा धपाटा मारून त्याच्यावर उलटवले की त्याला रडकुंडीला आणण्याइतके चिडवायचे; - जसे काही आपण कधीच चुकणार नाही!

श्री नरेंद्र मोदी प्रकरणात आडवाणींसह इतर सर्वच पक्षांनी जे अकांडतांडव चालविले आहे ते पाहिल्यावर त्या बालिश खेळातल्या धपाटेगिरीची आठवण होते. श्री.नरेंद्र मोदी हे त्यांच्या पक्षाचे निवडणूक प्रमुख झाले, यावर त्यांना `संपविण्या'साठी  इतर गिधाडांनी किती दगड उगाळावेत! आडवानी तर त्यांच्या पक्षात सर्वज्येष्ठ नेता आहेत. त्यांनीही केलेला बालिशपणा, म्हातारपण आणि लहानपण सारखेच असते असे मानून सोडता येईल. परंतु शेजारघरच्या मुलाने परजातीच्या वधूशी लग्न ठरविले, म्हणून हा शेजार सोडून दूर राहायला जाण्यासारखे वर्तन नीतीशकुमार व कोण ते जदयू वाले करू लागले. श्री.मोदी हे त्यांच्या पक्षात निवडणूक प्रमुख झाले याबद्दल इतरांनी काय करू नये याचा वस्तुपाठ सध्या  सर्व पक्ष देत आहेत.
श्री.नरेंद्र मोदी हे पापी - अपराधी - खुनी वगैरे असल्याचा गहजब करणाऱ्यांनी भारतीय जनतेला काही कळतच नाही असे गृहीत धरले आहे. मोदींचा अपराध ठरविण्यास भारतीय न्यायालये सक्षम नाहीत काय? कदाचित न्यायालयीन मर्यादा असल्यामुळेही मोदींवरचे आरोप सिद्ध होत नसतील; परंतु म्हणून तो अधिकार तिस्ता सेटलवाड, नीतीशकुमार, सोनियाजी, मायावती, लालूजी अशांना कोणी दिला? मोदी इतके अपराधी असूनही गुजरात त्यांना तीनदा निवडून देते इतकी कृतघ्न-क्रूर आहे काय? इथे नरेंद्र मोदी दोषी की निर्दोषी, किंवा पदाला योग्य-अयोग्य हे ठरविण्याचा मुद्दाच नाही. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचे मूल्यांकन, विकासाचे चित्र, निधडे व्यक्तिमत्त्व वगैरे खरे-खोटे हे त्यांचा पक्ष ठरवेल. उद्या निवडणुकीत मतदार ठरवतील. जर जनता ही सार्वभौम आहे, तर निवडून येणाऱ्या नेत्याविषयी कोणत्या थराला जायचे याचे भान हवे.

आडवानींचे राजीनामा प्रकरण हे तर नाटक किंवा उतावीळपणा ठरला, परंतु तोही खेळ आजपर्यंत कितीतरी जणांनी केला. अगदी एकाही पक्षाचा अपवाद नाही. म.न.से. या आधीच फुटीर गटातूनसुद्धा कालपरवा काहीजण फुटले. काँगेस तर सुभाषबाबू-आंबेडकर यांच्यापासून फुटतच आहे. शरद पवार तर त्यात माहीर मानावेत, पण त्यांच्याही इवल्याशा राष्ट्नीय पक्षातून सदाशिवराव मंडलीक गेले. हिंदू भडक अतिरेकी हे जर भाजप प्रणित जातीयवादी असतील तर नक्षलवाद्यांचे पाप कोणत्या डाव्या हाताचे? नीतीशकुमारांचा पक्षच जनता दल (यू) म्हणजे `त्या' जनता पक्षाची जी शकले झाली त्यापैकी एक. अशा साऱ्या स्थितीत या सर्वांनी मोदी-आडवाणींना त्यांच्या राजीनाम्यावरून फुटीच्या भेगेवरच उभे करावे हे खरोखरीच अजब! पक्ष तर आडवानींनी सोडला नाही. ज्यांनी तो यापूर्वी सोडला, त्यांची (दुर्)दशा सांगण्यास शंकरसिंग वाघेला, कल्याणसिंग, उमा भारती वगैरे आहेत. चिदंबरम्, सुशीलकुमार यांनीही तळयात-मळयात करून झाले. तात्पर्य असे की आपली चिखलवस्त्रे न झाकता दुसऱ्यावरच्या शिंतोड्यास हसावे असे चालले आहे.

नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की न व्हावेत याचा निर्णय या वाचाळ नरवीरांनी करण्याचा नाही. ते झालेच तर आणि तरीही; त्यांना गुन्हेगार म्हणून मीडिया डोक्यावर घेणाऱ्यांनी, आजच्या लोकसभेत २७४ खासदारांवर गुन्हे दाखल आहेत याची तरी नोंद घ्यावी. हे सगळे धर्मनिरपेक्ष असल्यामुळे गुन्हेगार चालू शकतात असे आमची पवित्र घटना सांगत असेल? त्यांच्याबाबतीत सगळे धर्मनिरपेक्ष नेते स्वत: मनमोहनसिंग असल्याप्रमाणे शून्यमनस्क असतात. किंवा तुरुंगातील पक्क्या सिद्धहस्त गुन्हेगारांना राखी बांधायला जातात.

श्री.नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री बनणे अद्यापि फार दूर आहे. मुळात त्यांचा पक्ष, आघाडीसह सत्तेवर येण्याची शाश्वती नाही. पण राहुल गांधी अथवा सध्याच्या `स्वप्नाळू' नेत्यांपैकी कोण आला तर त्यास मोदींचा पर्याय म्हणून कसा स्वीकारावा असा पेच जनतेपुढे आहे. या सगळयाचा साकल्याने, गांभीर्याने, जबाबदारीने विचार करून या मंडळींनी मीडियागिरी करायला हवी. त्याऐवजी असल्या उथळ भिरमिट वावटळीने जनता हतबल होईल; मग कसली महासत्ता अन् कशाचा तरुण देश!

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन