Skip to main content

Sampadkiya in 13 may 2013

भिंतीवर टांगलेला धर्म

पोलिस आयुक्तानी एक फतवा काढून कोणत्याही पोलिस कार्यालयात - ंठाण्यावर - चौकीत देवाचे फोटो लावणे, पूजा-आरती करणे वा कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रम करण्यास बंदी केली आहे, असे वृत्त प्रकाशित झाले. आपले शासन-प्रशासन घटनेनुसार धर्मनिरपेक्ष असल्यामुळे आणि नैतिक दृष्ट्या ते तसेच हवे असल्यामुळे शासकीय जागेत त्या धर्मकार्याचे देव्हारे माजविणे निखालस चूक आहे. परंतु इतक्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी इतक्या सहज रोखता येणे शक्यच नाही, हेही स्पष्ट वास्तव आहे.

एक तर शासकीय कार्यालयाची व्याख्या फक्त पोलिस ठाण्यापुरती मर्यादित का ठेवली हाही प्रश्न आहे. कारण कित्येक जिल्हा परिषदा, विभागीय शासकीय संकुले, बस-स्थानक अशा जागी देवांचे फोटो नव्हेत, तर ऐटदार मंदिरे उभी आहेत. पोलिस ठाणीही अपवाद नाहीत. अशा स्थितीत त्या फतव्याचे पालन करायचे तर ती मंदिरे काढून टाकणे कसे शक्य आहे? त्याहीपुढे जाऊन पंढरीच्या मंदिरात होणाऱ्या शासकीय पूजेला येणारे मंत्री हे व्यक्तिगत हजर नसतात, तर लाल दिवा आणि पोलिसी बंदोबस्त मिरवत येतात. ईदच्या वेळी इफ्तार पार्टीत अख्खे शासन सहभागी होते, त्यावेळी प्रत्येकाची बिरुदे आणि अधिकारपदे अंगाखांद्यावर असतातच. यात चूक तरी काय? व्यक्ती धार्मिक असतेच, पण ती शासनकर्ती म्हणून निरपेक्ष - म्हणजे कोणत्याच धर्माशी निगडीत राहून वागणारी असता कामा नये. शासनाचेच नव्हे तर सामान्य नागरिकाचेही, उंबऱ्याबाहेरचे सर्व सामुदायिक व्यवहार-विचार-वर्तन हे धर्मनिरपेक्ष असलेच पाहिजे. केवळ धर्मच नव्हे, तर जात, लिंग, स्थान या सर्वच बाबतीत निरपेक्ष सार्वजनिक व्यवहार असले पाहिजेत.

परंतु धर्मनिरपेक्षता आणि निधर्मी यात फरक आहे. तो समजून घेतला तर असला पोलिसी खाक्या दाखविण्याचे कारण पडणार नाही. पोलिस ठाण्यावर देवाचा फोटो लावणे चूक; परंतु ठाणे अंमलदार आपल्या कपाटाच्या खणात त्याच्या देवाचा फोटो ठेवणार की नाही? कित्येक पोलिस वा अंमलदार कार्यालयाच्या पायऱ्या चढताना वाकून नमस्कार करत येतात... नंतर कसे काम करून पैसा खातात, हा भाग वेगळा! परंतु धर्माला श्रद्धेने मानणारा कर्मचारी जनतेशी अधर्माने वागतो. व्यक्तिश: तसे धर्मपालन करणारे विविध धर्माचे लोक अधर्म मात्र समान आचरतात.

बाहेरचे देश हे स्पष्ट धार्मिक आहेत. िख्र्तासी आणि मुस्लिम देशांची संख्या फारच मोठी म्हणजे जवळपास सर्व जगभरात आहे. शिवाय बौध्दधर्मी चीन-जपान इत्यादी पौर्वात्य देश, आणि एकमात्र हिंदू नेपाळ यांसारखा कोणता तरी धर्म त्या त्या देशात आहे. हिंदुस्थान हा मात्र विविध धर्मी देश असला तरी तो धड निरपेक्षही वागत नाही. `धर्माचा विचार वा वापर सार्वजनिक जीवनात करू नये 'असे म्हणणारा हा एकमेव देश, फक्त धर्माचाच वापर सार्वजनिक जीवनात करताना आढळतो. म्हणजे हा एकमेव धर्मनिरपेक्ष देश नव्हे, केवळ धर्मदांभिक एकमेव देश आहे असे म्हणावे लागेल.

ध्वनिप्रदूषण कायदा असला तरी इथे गणपतीच्या किंवा बुद्धजयंतीच्या डॉल्बीविरुद्ध तो कायदा राबवत नाहीत. पहाटे पाचपासून प्रत्येक गावात उठणारी अजानबांग कोणत्याही पोलिसाला किंवा कायद्याचा मान ठेवू इच्छिणाऱ्या धर्मीयास ऐकू येत नाही. मध्यंतरी दुचाकीवाल्यांस हेल्मेट सक्तीचे केले, आणि त्या कारखानदारांची खिसेभरती झाल्यावर तो नियम ढेपाळला. त्यात धार्मिक मुद्दा असा की, हेल्मेटमधून शिख धर्मीयांस सूट होती - का? तर ते फेटा बांधतात म्हणून! मग फेटा न बांधणाऱ्या शिख धर्मीयाचे काय? कोल्हापुरी फेटा का नाही चालणार? अशा प्रश्नांची कड लावण्यास कोणी किती लढायचे? त्यापेक्षा आपल्याला वाटलेच तर हेल्मेट अडकवावे, नहून पोलिसाला वाटले तर पन्नास रुपये देऊन पुढे गाडी दामटत राहावे.

देवाच्या फोटोंची आणि पूजेची असलीच गोची होणार हे उघड आहे. आयुक्तांचे ते पत्रक आणि व्यवहार यांचा आपल्या बहुधर्मी, भलत्या ठिकाणी भावनिक होणाऱ्या, मतलबी प्रशासकीय बाबतीत कोठेही ताळमेळ राहणार नाही. पत्रक काढून निरपेक्षता दाखविल्याचे साहेबाला समाधान; आणि पोलिसी क्षेत्रात बांधलेल्या देवळात उत्सव-महाप्रसाद करता येण्याचे जनतेला समाधान. नियम करणारे ते भले; आणि नियम पाळणारे आपण भले! कायद्यापुढे सगळे समानच असतात, पण समान नागरी कायदा मात्र होऊ शकत नाही. असले हे निरपेक्ष - धार्मिक - अधर्माचे शासन. इथे सामान्य माणूस जेवढे त्याच्या कर्तव्यधर्माने वागत राहील तितके ते धर्मराज्य होईल. अन्यथा पोलिस ठाण्याच्या भिंतीवरच्या फोटोतले देव कसला धर्म करणार!

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन