Skip to main content

Rani Laxmibai

झाशीची लक्ष्मी
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे नाव भारतीय इतिहासात कोरले गेले आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसंगरात त्यांना वीरगती मिळाली, हा स्फुलींग सर्वज्ञात आहे. परंतु त्याआधीचा त्यांच्या राज्यकारभाराचा दरारा कसा होता हे लक्षात आणून देणारे हे वर्णन.
वरसई (जि.रायगड) येथील विष्णुभट गोडसे यांनी त्या कालखंडात उत्तर भारतात केलेल्या प्रवासाचा वृत्तांत `माझा प्रवास' या पुस्तकाने प्रसिद्धी पावला. झाशीतील त्यांच्या वास्तव्यातून `हुजुरां'ची दिनचर्या समजते, ती वेधक वाटेल -
बाईसाहेबांचा नित्यक्रम येणेप्रमाणे होता. त्यांस शरीराचा षोक लहानपणापासून होता तो त्यांनी स्वतंत्रता मिळाल्यावर पूर्ण केला. पहाटेस उठून कसरतशाळेत जाऊन जोर, जोडी, मलखांब करावा. नंतर घोड्यावर बसून फिरावयास जावे व घोडा मंडळावर धरावा, कुंपणावरून उडवावा, खंदकाचे पार घालवावा, एकदम खाली बसवावा इत्यादी नाना प्रकारच्या घोड्याच्या कसरती कराव्यात. कधी कधी हत्तीवरही बसत. याप्रमाणे सात आठ वाजेपर्यंत मेहनत झाल्यावर नेहमी खुराक खात असत. नंतर तासभर कधी निजत असत. कधी तशाच स्नानास जात.
स्नान झाल्यावर स्वच्छ पांढरे चंदेरी पातळ वस्त्र परिधान करून आसनारूढ होऊन भस्म धारण करीत. प्रथम पतिमरणानंतर केस राखण्याबद्दल तीन कृच्छ्न्े प्रायश्चित्त आहे, त्याचे उदक सोडून नंतर रुप्याचे तुळशीवृंदावनात तुळशीची पूजा करीत असत, नंतर श्रीपार्थिवलिंग-पूजेस आरंभ होत असे. त्या समयी सरकारी गवई गात असत, पुराणिकांचे पुराणही त्यात सुरू असे व सरदार व आश्रित लोकांचे मुजरे होत असत. परंतु बाईसाहेबांचे लक्ष चोहोकडे सारखे असे. जर एखादे दिवशी दीडशे मुजरे करणारांपैकी कोणी आला नाही तर दुसरे दिवशी `काल आपण का आला नाही' ही चौकशी होत असे.
तीन वाजण्याचे सुमारास कचेरीत जात असत. त्यावेळेस कधी पुरुषवेष धारण करीत. पायात पायजमा, अंगात जांभळे आंबव्याची बंडी, डोकीस टोपी घालून वर पागोट्यासारखी बांधलेली बत्ती, कमरेस काच्या किंवा जरीचा दुपेटा व त्यास लटकवलेली तलवार, या प्रकारच्या पोषाखाने ती गौरवर्ण, उंची मूर्ती गौरीप्रमाणे दिसत असे. कधी बायकांचा पेहराव असे; परंतु पतिमरणानंतर नथ वगैरे अलंकार त्यांनी बिलकुल घातले नाहीत. फक्त हातात सोन्याच्या बांगड्या व गोठ, गळयात एक मोत्याचे पेंडें व अनामिकेत एक हिऱ्याची अंगठी याशिवाय दुसरे अलंकार आम्ही बाईसाहेबांचे अंगावर कधीच पाहिले नाहीत. केसांचा नेहमी बुचडा बांधलेला असे व नेसावयास पांढरा शालू व अंगात स्वच्छ पांढरी चोळी असे. याप्रमाणे कधी पुरुषवेषाने तर कधी स्त्रीवेषाने दरबारात येऊन, एक खोलीसारखी पडतपोशीची जागा होती व त्याच्या दरवाजास बाहेरून सोनेरी मेहरब होती. त्या दरवाजाचे आत गादी घालून सरपोस घातलेल्या जाग्यावर लोडाशी टेकून बसावे. दरवाजाचे बाहेर दोन मालदार रुप्याची काठी घेऊन हजर असत. समोर राजेश्री लक्ष्मणराव दिवाणजी कंबर बांधून हातात कागदांचे पुडके घेऊन उभा असे व पलीकडे हुजूरचे सात आठ कारकून बसलेले असत.
कचेरीत सर्व दिवाणी, फौजदारी, मुलकी कामे होत असत. बाईसाहेब बुद्धीच्या फार चपळ असल्यामुळे हकीकत ताबडतोब समजून भराभर हुकूम सांगत असत. कधी स्वत: लिहिता वाचता येत असल्यामुळे मजकूर जुळवून आपण हुकूम लिहीत असत. बाईसाहेब न्यायाचे कामात फार दक्ष व कडक होत्या. अपराध्यास कधी कधी स्वत: छडी घेऊन शिक्षा करीत. दर शुक्रवारी व मंगळवारी सर्व स्वारी तयार करवून मुलास बरोबर घेऊन संध्याकाळी महालक्ष्मीचे दर्शनास जाण्याचा नियम होता.
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...