Skip to main content

Thoughts of Shivajirao Bhosale


२९ जून : २ रा स्मृतिदिन
शिक्षण हे जीवनाचे संस्करण

      पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त)

आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाला स्वत:ची नीती नसल्यामुळे, राजकारणाला चारित्र्यापेक्षा, विद्वत्तेपेक्षा अधिक महत्त्व मिळाल्यामुळे रचनात्मक कार्यक्रमांना महत्त्व उरले नाही. सभ्यतेचे, सृजनतेचे कोणाला आकर्षण उरले नाही. ज्ञान आले पण चारित्र्य आले नाही, विज्ञान आले पण जनकल्याणाचा विचार आला नाही; राजकारण उदंड झाले पण त्याला चिंतनाची बैठक उरली नाही, उद्याने, उपहारगृहे, चित्रपटगृहे यांची दाटी झाली पण आनंदाला ओहोटी लागली. विवेकावाचून आनंद अल्पजीवी ठरतो हे माणसाला कळले नाही. व्यापार करायला पण व्यवहारात सचोटी उरली नाही; उपासना वाढली पण तपाचे नाव नाही. व्यक्तिगत लाभासाठी मूकपणे देवाच्या दारी धरणे धरणारे भक्त वाढले, मात्र पसायदान मागणारे ज्ञानदेव दिसेनासे झाले. नीतिमूल्यांना आधार उरला नाही. ध्येयवादाची पताका उन्मळून पडली.
`अशा या जगात आपण निर्धाराने राहावे. ते जग अव्यंग करण्याचा मनोमन प्रयत्न करावा आणि हे कार्य सिद्धीस जावे यासाठी प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक शतायुषी व्हावे' असे महात्माजी म्हणाले. मला वाटते की हीच आपली धारणा राहावी, श्रद्धा असावी. आज आपण एकात्मतेचे भान हरवून बसलो आहोत. एका विद्यापीठाचे विद्यार्थी दुसऱ्या विद्यापीठात गेले तर त्यांना हाकून, मारून, पिटाळून लावले जात आहे. भाषा, प्रांत, प्रदेश, जातपात आणि धर्म या विषयीचे वाढते अभिनिवेश पाहिले म्हणजे काळजी वाटते. शिक्षणसंस्कारामुळे वृत्तीची उदारता आणि व्यापकता वाढावयास हवी.
शिक्षण हे अखिल जीवनाचे संस्करण असते. त्यात बुद्धी, मन, भावना आणि शरीर या सर्व अंगांचे विकसन अपेक्षित असते. तत्त्व आणि व्यवहार या उभय पातळीवर व्यक्तीला सुखाने नांदता यावे आणि त्यासाठी आवश्यक ते कर्मकौशल्य आणि कर्मनैपुण्य प्राप्त व्हावे अशी अपेक्षा असते. शिकलेला माणूस ओळखायचा कसा? शिक्षणामुळे त्याच्या जीवनात घडते तरी काय? आम्ही चांगल्या वस्तू ओळखू शकतो, सुगंधी फुले आणि सुंदर चित्रे ओळखू शकतो, दिवस-रात्र यातील फरक जाणू शकतो, पण शिकलेला आणि न शिकलेला माणूस यांच्यातील फरक आमच्या ध्यानी येत नाही.  ज्याचे आचार, विचार आणि उच्चार इतरांपेक्षा भिन्न आहेत, ज्याचे बोलणे शुद्ध आहे, लिहिणे नेटके आहे आणि वागणे संयमित आहे तो शिकलेला मानावा. सुखात अपशब्द नाही, वर्तनात बेतालपणा नाही, विचारात शास्त्रीयता आहे, वृत्तीत आग्रह नाही अशा सुसंस्कृत व्यक्तीला सुविद्य मानावे. हा साधा निकष विचारात घेतला तर कितीतरी पदवीधर तसे कोते आणि रिते असतात हे मान्य करावे लागेल.
चौकामधल्या दंगली विद्यापीठात येऊ लागल्या आहेत, बाहेरचे राजकारण विद्यापीठात शिरू लागले आहे. ज्ञान संपादन हा भाग गौण झाला आहे. कुलगुरुंची बुद्धिमत्ता आणि विद्वत्ता दुर्दैवाने लहानलहान भांडणे सोडविण्यात आणि प्राध्यापकांची आणि कर्मचाऱ्यांंची समजूत घालण्यात आणि कधी न संपणाऱ्या पत्रव्यवहारात खर्ची पडते आहे. वर्गात विद्यार्थी असतीलच असे नाही; तास घेतले जातीलच असे नाही; एवढे ज्ञान पदरी पडलेच पाहिजे असा आग्रह नाही, शेवटी होतात त्या परीक्षा, मिळतात त्या पदव्या आणि राहून जाते ते ज्ञान आणि विज्ञान! विद्यार्थी मित्रांनो, जीवनाकडे थोडे गांभीर्याने पहा. थोडे विचारशील व्हा, चिंतनशील व्हा. तत्त्वांची बांधिलकी माना आणि जीवनाच्या वाटेवरून अभिमानाने, आनंदाने चालत रहा. उद्याचे जग तुमचे आहे.
एक काळ असा होता की गावे लहान होती पण माणसे मोठी होती. देहूसारख्या आडगावात न भंगणारा अभंग लिहिणारा तुकोबा दिसत होता. शिवनेरीच्या परिसरात आणि मावळच्या खोऱ्यात राजनीतीचे चिंतन करणारे छत्रपती होते. नेवाशाच्या मंदिरात ज्ञानियांचा राजा बालपणीच सर्वज्ञतेचा संसार मांडून बसला होता. चिंता करितो विश्वाची असे म्हणणारे रामदास पोरवयात लागलेले परमार्थाचे पिसे घेऊन देशभर संचार करीत होते. साबरमतीच्या तीरावर एका झोपडीत गांधी या नावाचा युगपुरुष राहात होता. पूर्वीच्या पुण्याच्या नारायण पेठेतील एका वाड्यात लोकमान्यांसारखा नरकेसरी दिसत होता. ज्योतिबा फुले, विष्णूशास्त्री चिपळूणकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठल रामजी, महर्षी कर्वे ही सगळी महान माणसं. आज माणसं मोठ्या गावात राहू लागली पण मोठेपणाला पारखी होत चालली. इमारतींची उंची वाढली पण माणसांची उंची घटत चालली. मानवी जीवनाच्या चित्रामधले रंग उडत चालले. त्याचे सौंदर्य लोप पावत चालले. माझ्या विद्यार्थी बंधुभगिनींनो, हा सगळा ऱ्हास तुम्ही फक्त पाहात राहणार का? हे जग सुंदर आणि संपन्न करणे ही तुमची जबाबदारी नाही का? मुंगीसारखा जीव अहोरात्र धावपळ करून सुरेख-संुदर वारुळ तयार करतो. चिमणीदेखील नीटनेटके घरटे उभे करते. तारे तळपत राहतात, फुले उमलत राहतात. निर्झर वाहत राहतात, पक्षी गात राहतात. अवघी सृष्टी सुंदर होण्यासाठी धडपडत असते, हे जीवनरहस्य जाणून, जीवनाची आनंदमयता ओळखून आपणही वृत्तीच्या प्रसन्नतेने पुुरुषार्थसमान करावे असे स्फुरण तुम्हाला व्हावे असा माझा आग्रह आहे.
कोणाच्या आशीर्वादाने आणि सदिच्छेने काही घडत नाही. पण आपल्या प्रयत्नाने सर्व काही घडू शकते. पण हे केव्हा घडते? या मंगल देशाचे भवितव्य आपल्या हाती आहे असे युवकांना वाटते तेव्हा. कर्म जेव्हा ज्ञानवान होते, ज्ञान जेव्हा नीतिमान होते, नीति जेव्हा गतिमान होते तेव्हा!
(संदर्भ - `एकता', पुणे)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन