Skip to main content

Lekh of Jayant Barve in 9/7/2012


सेंद्रिय शेतीचा राजमार्ग
- जयंत बर्वे, विटा(जि.सांगली)
प्रयोगशील शेतकरी, गोपालक आणि सेंद्रिय उत्पादनांचे निर्यातदार

अभिनेता आमीर खान याच्या मालिकेने सध्या चांगली हवा निर्माण केली आहे. आमीर खान प्रॉडक्शनच्या `सत्यमेव जयते' या स्टार चॅनलवरील २४ जूनच्या कार्यक्रमाने एक अत्यंत महत्त्वाचा विषय लोकांपुढे आणला आहे. त्याबद्दल प्रथमत: त्याचे अभिनंदन केले पाहिजे. आजच्या काळातील रासायनिक शेतीचे दुष्परिणाम अन्न, फळे व भाज्या या सर्व खाद्यपदार्थांतून मनुष्यजीवनावर कसे होत आहेत याची जाणीव त्या कार्यक्रमातून उच्च स्तरावरून होऊ शकेल.
गेली काही वर्षे पारंपरिक शेतीचे अभ्यासक आणि भारतीय कृषी संस्कृतीवर श्रद्धा असणारे संशोधक यांनी हा विषय वारंवार मांडला आहे, परंतु त्यांचा आवाज रासायनिक पद्धतीच्या आक्रमणापुढे पुरेसा ठरला नव्हता. आमीर खानच्या कार्यक्रमाने या विषयाची जाणीव समाजाला होईल अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमातून एका गंभीर विषयाला तोंड फोडून किमान हा विषय तरी लोकांच्या ध्यानी आला इतपत समाधान मानले पाहिजे. दुसऱ्याच दिवशी म्हणजे २५ जूनला `एबीपी माझा' या वाहिनीवरून एक चर्चा घडून आली. महाराष्ट्नतील सेंद्रिय शेतकरी, शेतकरी संघटनेचा प्रतिनिधी, शासनाचे शेती विषयातील तज्ज्ञ व एक उद्योजक हे त्यात सहभागी होते. परंतु ह्या चर्चेतून पुढे आलेले चित्र अगदीच अस्पष्ट वाटले. कारण चर्चेत भाग घेणाऱ्यांचे अनुभव,चिंतन आणि त्यांची मांडणी अगदीच वरवरची, स्पष्टच म्हणायचे तर उथळ वाटली. येत्या काळातील दुसरी हरितक्रांती नेमकी कशी असावी याबाबतीत त्या सहभागींपैकी सेंद्रिय शेतीविषयक तज्ज्ञ श्री.परचुरे वगळता इतर सर्वांची स्थिती तळयात मळयात अशीच होती.
रासायनिक शेतीमुळे सर्व जीवसृष्टी आणि पर्यावरण धोक्याच्या पातळीवर आहे हे वास्तव आहे. सर्व जीवांवर होणारे प्रदूषण अन्न, हवा, पाणी याच मार्गांनी होत असते. अन्नामधून होणारे प्रदूषण हे प्रामुख्याने प्रचलित शेती पद्धतीमुळे होते आणि हवा पाण्याचे प्रदूषण होण्यात प्रचलित रासायनिक शेती पद्धतीचा नि:संशय सहभाग असतो. आजच्या काळात किमान जाणकार लोक तरी ही गोष्ट स्पष्टपणे मान्य करू लागले आहेत.
१९६० ला पहिली हरितक्रांती जाहीर झाली त्यापूर्वी आपल्यास अन्न उत्पादनात गरजेच्या मानाने तूट येत होती.   नंतरच्या काळात नव्या शेती पद्धतींमुळे उत्पादन वाढले हे खरे आहे. ही वाढ गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ एवढ्या धान्यांची होती. परंतु तृणधान्ये, तेलबिया, डाळी यांचे उत्पादन घटत गेल्याचे दिसेल. सिंचन सुविधा वाढल्या आणि जास्तीची जमीन पाण्याखाली आली यामुळेही उत्पादनवाढ झाली. परंतु यापेक्षाही रासायनिक खतांचा सहभाग उत्पादनवाढीत होता. या खतांचा प्रभाव शेतकऱ्यांवर इतका मोठा होता की, पारंपरिक गावखत, शेणखत, सोनखत हे शब्दही दिसेनासे झाले. वास्तविक सर्व कृषी विद्यापीठातील संशोधनांनी कोणत्याही पीक लागवडीची सुरुवात म्हणून एकरी २० ते ४० गाडी शेणखत द्यावे असे स्पष्ट केलेले होते. पीक वाढीच्या काळात नत्र, स्फुरद, पालाश यांची मर्यादित मात्रा देणे योग्य झाले असते.शेणखताचा वापर कमी होत गेला आणि रासायनिक खतांकडे भारतीय शेती क्षेत्र पूर्णत: वळत गेले. गेल्या सुमारे पन्नास वर्षांत भारतभर शेतीचे नुकसान होत गेले. रासायनिक खतांची सुलभता आणि जाहिरात यांचाही परिणाम शेतकऱ्यांवर झाला. त्याबरोबरच रासायनिक खते शेतीला वापरणे अधिक सोपे, कमी कष्टाचे असते. उदा. गाड्याच्या गाड्या शेणखत किंवा गावखत शेतापर्यंत वाहून नेणे, पसरणे याऐवजी पिशवीतून, पोत्यातून कमी श्रमात ही कामे रासायनिक खताद्वारे होऊ लागली. त्यामुळे साहजिकच जमिनीचा कस गेला तरी चालेल पण उत्पादन तेवढेच वाढावे या इच्छेने शेतकरी या पद्धतीकडे झुकला. परंतु रासायनिक खतांमुळे तात्पुरती वाढ दिसली तरी नंतरच्या काळात जाणवत गेलेले तोटे हे तात्कालिक वाढीच्या फायद्यापेक्षा भयानक जास्त दिसू लागले.
सुरुवातीच्या काळात केवळ नत्र, स्फुरद, पालाश ही रासायनिक खते वापरात आली. त्यानंतर लोह, मंगळ, क्रॅल्शियम, मँगेनीज ही सूक्ष्मद्रव्ये सुरू झाली. अलिकडच्या काळात तर बोरॉन, झिंक सिलीकॉन, गंधक, मॉलिन्डेनियम, क्रॅल्शियम यासारखी दुय्यम अन्नद्रव्ये वापरण्यात येऊ लागली. या रसायनांच्या माऱ्यामुळे जमिनीत असमतोल झाला. किडी, बुरशी येऊ लागल्या. त्यावर उपाय म्हणून कीडबुरशीनाशके फवारणे आले. या सर्वांचा परिणाम म्हणजे अन्न,पाणी यांच्यात विषाचा प्रादुर्भाव झाला. आता तर भारतातील शेतजमिनी रासायनिक खतांना पूर्वीप्रमाणे प्रतिसाद देत नाहीत आणि कीटकनाशकांना कीड दाद देत नाही. अर्थातच त्यामुळे उत्पादकता घटत चालली आहे आणि जो कृषीमाल तयार होतो त्यामधून घातकता वाढत चालली आहे.
शेतकऱ्यांच्या व शासनाच्याही फार उशीरा का होईना पण आता लक्षात आले आहे. शिवाय रासायनिक खतांची प्रचंड महागाई आणि शेतकऱ्याची रोडावलेली क्षमता हेही विषय गंभीर होत आहेत. रासायनिक खतांमुळे होणाऱ्या असमतोलाचा परिणाम म्हणून कीडबुरशी वाढत गेल्या आणि त्यावरची औषधेही महाग होत चालली आहेत. या सर्वाचा भीषण परिणाम जीवमात्रांवर होणे अटळ आहे. शेतीतून मिळालेल्या फसव्या नफ्यापेक्षा जास्त पैसे, माणसाला रोगराईच्या नियंत्रणासाठी खर्च करावे लागत आहेत. आणि आता रासायनिक खते व औषधे वापरली नाहीत तर शेतीतून काही पिकणे बंदच होईल अशीही भीती आहे.
या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? आपल्या देशातील अभ्यासू शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा एक राजमार्ग गेली तीस-चाळीस वर्षे खपून तयार केला आहे. जैविक खते, जैविक कीडबुरशीनाशके, वनस्पतीजन्य कीडनियंत्रक  या गोष्टींचे तंत्रज्ञान आता सहज उपलब्ध आहे. प्रत्येक राज्यामध्ये सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संस्था आहेत. विचारवंत व शेतकरी यांचे अभ्यासगट आहेत. या सर्वांची ऑरगेनिक फार्मिंग असो. ऑफ इंडिया ही शिखरसंस्था आहे. या संस्थेमार्फत शेकडो अभ्यासवर्ग होत आहेत. या विषयावर अनेक पुस्तके, मासिके, लिखाण प्रसिद्ध होत आहे. प्रमाणीकरण केलेला सेंद्रिय शेतमाल ग्राहकापर्यंत पोचवण्याचे व्यवस्थापन होत आहे. उत्तम प्रतीची सेंद्रिय खते मिळू शकतात. शेणखत व पालापाचोळा यापासून प्रत्येकाच्या शेतावर तयार होणारे कंपोस्ट खत पाण्याची गरजही मर्यादित राखते. म्हणजेच कमी पाण्यातही पीक समाधानकारक येते हे लोकांना पटू लागले आहे. पण त्याचा वेग म्हणावा तितका नाही.
आता गरज आहे ती भूमीपुत्रांनी आणि अन्नदात्या शेतकऱ्यांनी रसायनविरहित, सुरक्षित अशा शेती उत्पादनासाठी निश्चय करण्याची! काही शेतकरी स्वत:च्या घरापुरता सेंद्रिय पद्धतीचा वापर करतात आणि बाजारात विकण्यासाठी रासायनिक शेती उत्पादने काढतात. हा दुजाभाव शेतकरी प्रवृत्तीचा नव्हे. देशवासियांना आरोग्यदायी अन्न पुरवण्याची जबाबदारी शेतकऱ्याचीच आहे हे सरकारलाही लवकर कळले तर बरे.
आमीर खानच्या कार्यक्रमातून या विषयाला विस्तृत प्रसिद्धी मिळाली ही गोष्ट चांगली झाली. त्याचा पाठपुरावा करून अल्पकाळातच संपूर्ण भारतीय कृषीक्षेत्र रसायनांच्या माऱ्यातून बाहेर पडेल व नूतनीकरण केलेल्या राजमार्गावर पुन्हा वाटचाल करेल असा मला विश्वास वाटू लागला आहे.
(श्री.बर्वे : सेलफोन ९४२२६१५८७८)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन