Skip to main content

Lekh in 2 July 2012


एक तरी `वारी' अनुभवावी...
- विनिता तेलंग
विठ्ठल नामाचा गजर, टाळ-मृदुंगाचा घोष अन् दिंड्या पताकांनी महाराष्ट्न्च जणू पंढरी झाला. आषाढी वारीसाठी ठिकठिकाणहून दिंड्या मार्गस्थ होत गेल्या. वर्तमानपत्रे, त्याहीपेक्षा वेगवेगळया टीव्ही चॅनल्सच्या चढाओढीमुळे वारी - पंढरपूर - विठ्ठलभक्ती याविषयी खूप वेगवेगळया गोष्टी घरबसल्या पहायला मिळतात. भारताबाहेरील लोकांना मुंबईच्या डबेवाल्यांसारखंच या पंढरीच्या वारीबद्दलही खूप कुतूहल, आश्चर्य वाटतं. कुणीही फतवा न काढता, काहीही आकर्षक योजना, फायदा नसताना, ठरलेल्या दिवशी, विशिष्ट नियम पाळून लाखो लोक एकत्र येतात, तेही आपल्या विठुरायाला फक्त पाहायला! परदेशातून अनेक लोक मुद्दाम या `सिस्टीम'चा अभ्यास करायलाही येतात, तर वर्षानुवर्षे वारी करून अस्सल वारकरी बनलेले काही परदेशी लोकही आहेत.
आपल्या, विशेषत: उच्चभ्रू, बुद्धिवादी वर्तुळात  वारीविषयी विषय काढून तर पहा...`वारी म्हणजे प्रचंड गर्दी, गोंधळ.. अस्वच्छता, अनारोग्याला निमंत्रण, गैरप्रकारांना वाव... आणि मुख्य म्हणजे व्यवस्थेवरचा ताण!' निसर्गाच्या वा मानवनिर्मित व्यवस्थांवरचा पहिला अधिकार आपलाच असल्यासारखे काहीजण बोलतात.
थोडं या सर्व रचनेच्या आत डोकावून पाहिलं तर खूप विलक्षण गोष्टी जाणवतात. पिढ्यान् पिढ्या घरात वारीची परंपरा असलेले लाखो लोक आहेत. काय असेल त्यांची प्रेरणा? इतक्या वर्षात राजवटी बदलल्या, राहणीमान बदलले, विज्ञानाने खूप सोयी उपलब्ध झाल्या, आर्थिक परिस्थिती बदलली, एवढंच काय नीतिमत्तेच्या कल्पनाही बदलल्या, पण वारी चालूच आहे. लोकांची श्रद्धास्थानं बदलली, डॉक्टरांप्रमाणेच आध्यात्मिक गुरूंची रेलचेल झाली, त्यांच्यातही स्पेशलायझेशन आलं. पण आपल्या या `कानडा विठ्ठलू'चं मार्केटिंग कोण करतं? त्याचा एवढा मोठा चाहता वर्ग असण्यासारखं तो या साध्यासुध्या भक्तांना काय बरं देतो? पुन्हा हे सगळं अवाढव्य चक्र व्यवस्थित शिस्तीत चालतं. दिंड्या, त्यांचे क्रम, मुक्कामांची ठिकाणं, कार्यक्रम, तिथल्या व्यवस्था.... सगळया गोष्टी ठरल्याप्रमाणं, सुरळीत, अव्याहत चालू आहेत. भल्या भल्या इव्हेंट मॅनेजर्सनी तोंडात बोट घालावं, इतक्या शिस्तीत हे सर्व महानाट्य चालू असतं. पाऊस पडो, दुष्काळ येवो, शेतीची-संसाराची कामं जमतील तशी मार्गी लावून, यावर्षी नाही तर पुढील वर्षी तरी `कृपा कर रे देवा..' म्हणून त्याच त्या भक्तिभावानं वारकरी येत राहतो. वारीला येणं म्हणजे स्वत:ला विसरणं. खायला काय मिळेल, झोपायचं कुठे, अंघोळीला पाणी मिळेल का... कुठलेच प्रश्न त्याच्या मनातही येत नाहीत. मुखात नाम, पायात चाल इतकंच त्याला कळतं. आजकाल जपानी `कायझेन' तंत्राचा खूप बोलबाला आहे. त्यासाठी एक सुंदर प्रतिशब्द वाचला `कार्यध्यान'. `कायझेन' म्हणजे आपल्या ध्येयाचा जराही विसर न पडता, सतत त्या भावनेने झपाटून काम करणे. एखाद्या गोष्टीत पूर्ण तल्लीन होऊ शकलो तरच काम उत्तम होतं. त्यावेळी फक्त तोच विचार. ही अशी काम करतानाची स्थिती ही ध्यानावस्थेचीच अनुभूती देते असं म्हणतात. पंढरपूरला विटेवर उभं असलेलं ते सावळं सुंदर ध्यान पाहाण्यासाठी वारकऱ्यांचं चालू असलेलं हे चलध्यान... चरैवेति... चालत रहा... दर्शन होईपर्यंत थांबायचं नाहीये.... हे असं आंतर्बाह्य भक्तीरसानं ओथंबलेलं वारकऱ्याचं ध्यानही विलक्षण सुंदरच वाटतं!
   अर्थात वारीवरूनच निर्माण झालेले हौशे-नवशे-गवशे असे प्रकारही येणाऱ्यांच्यात असतातच. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अपप्रवृत्ती, वरवर काही कर्मकांड करून झटपट फायदा हवा असण्याची वृत्ती, असलेल्या सोयी फुकट मिळतात म्हणून त्या वापरून बेजबाबदार वागणारी मंडळी, हेही यात आहेच. म्हणून वैतागून `वारीच नको' असंही म्हणून चालणार नाही.
वारी-लहानमोठ्या जात्रा-मेळे हे आपल्या प्रचंड मोठ्या समाजव्यवस्थेचे अदृश्य आधारस्तंभ आहेत. या ठिकाणी होणाऱ्या आर्थिक उलाढाली कल्पनेपेक्षाही प्रचंड आहेत. जागतिक मंदी, अमेरिकेचे धोरण, सरकारी धोरण, बदलणारी कर रचना, कशाचाही परिणाम या उलाढालींवर होत नसल्यामुळे, आपली अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्यात या कनवटीला नोटा लावून येणाऱ्या जनसमुदायाचा वाटा फार मोठा आहे हे विसरून चालणार नाही. सरकारच्या बरोबरीने अनेक संस्था वारी अधिक शिस्तपूर्ण, व्यवस्थित पार पडावी यासाठी झटतात. पुण्यातील आय.टी. क्षेत्रातील काही तरुणांनी वारीबद्दलची टीका झोंबल्यामुळे एक `आय.टी.दिंडी' सुरू केली. दरवर्षी समाजप्रबोधनाचा वारकऱ्यांच्या सेवेचा एक नवीन मार्ग ही मंडळी शोधतात. काहीजण पूर्ण वेळ तर काहीजण जमेल तेवढे अंतर या दिंडीत सहभागी होतात. उच्चशिक्षण घेतले व आयटी सारखी घसघशीत नोकरी हाती आली की आपला देश, तिथे नसलेल्या व्यवस्था, भ्रष्टाचार, जुनाट बुरसटलेला धर्म यावर टीका करण्याचे आद्य कर्तव्य सोडून ही तरुणाई आपल्या एका घोर परंपरेचा आदर करते आहे. त्यातले मर्म जाणून घेऊन त्याला नवीन रूप देते आहेे. वाटतं हेच ते तरुण ज्यांचे स्वप्न विवेकानंद पाहात होते, हीच विज्ञाननिष्ठा सावरकर सांगू पाहात होते.... काही संस्थांनी आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न समोर यावा यासाठी त्या पीडित कुटुंबातल्या मुलांची दिंडी गेल्या वर्षी काढली. कुणी `लेक वाचवा अभियान' घेऊन चाललय. प्रत्येकाच्या खांद्यावर आता पताका आहे, ती फक्त भगवी नव्हे, वेगवेगळया सामाजिक विषयांची. त्या विठ्ठलालाही आपल्या दीनदुबळया भक्तांच्या उद्धाराचा भार आपल्याबरोबर कुणी वाहू पाहतंय याचा आनंद होत असेल.
या सगळया सोहळयाला नुसतं काठावरून पाहण्यात खरं तर मजा नाही. पण त्याहूनही खरं म्हणजे इतके कष्ट सोसून हा अनुभव घेण्याची आपली हिम्मतही नाही. लाखोंचा व्यवहार करणारे, एरवी अत्यंत सुखासीन आयुष्य जगणारे मुद्दाम आपले पाय जमिनीवर असावेत यासाठी वारीला जातातही. पण तरीही सर्वांनाच हे जमेल असे नाहीच. एवढं निश्चित की, कुठंतरी आपला व्यवसाय प्रतिष्ठा, स्थान विसरून आपली `झूल' उतरवून झोकून देता यायला हवं. सोयी-गैरसोयीचा विचार न करता, आपल्या आवडीच्या विषयात, आवडत्या ठिकाणी भान विसरून रमता यायला पाहिजे. गाणं आवडत असलं तर तुम्हाला नुसतं `सवाई' म्हटलं तर कळेल, नसलं तरी मुद्दाम तो ब्रह्मानंदी बुडलेला श्रोतृसागर पाहायला एकदा सवाई गंधर्व महोत्सवाला भेट द्यावी. आता वेळेची सरकारी चौकट बसली म्हणून, अन्यथा रात्र-रात्रभर कडाक्याच्या थंडीत, खाली बसायला सतरंजीसुद्धा नसली तरी, कुठेही, कसेही, बसून, उभे राहून, समोर चाललेला स्वराभिषेक आणि त्यात चिंब भिजलेले रसिक... मोठं अपूर्व दृष्य असतं! सर्वांच्यातच अशी काही उर्मी असते. सकारात्मक काही करण्याची, एखादा अनुभव समरसून घेण्याची. आपण आपल्या वेळापत्रकी आयुष्यात तिला एकदम निरुपयोगी ठरवून टाकलंय. पण या व्यस्त आयुष्यातही मधून मधून अशी वेडेपणा करण्याची संधी डोकावत असते. ती केव्हातरी धाडस करून घेतली पाहिजे. पक्षी जीवनाचे विलक्षण कुतुहल असलेले किरण पुरंदरे, तरुणपणी मित्रांसोबत हॉटेलात जायच्या वयात गडकोट पालथे घालणारे निनाद बेडेकर यांनी असं वेडं होण्याची प्रेरणा ज्यांच्याकडून घेतली ते पक्षीतज्ज्ञ डॉ.सलीम अली, बाबासाहेब पुरंदरे, गो.नी.दांडेकर... गडचिरोलीच्या जंगलात जाऊन सेवाकार्य उभं करणारे डॉ.अभय बंग व त्यांच्या प्रकल्पावर दरवर्षी मोफत शस्त्रक्रिया, आरोग्य तपासणी शिबिरं घेण्यासाठी स्वत:हून जाणारे डॉक्टर हे सगळे त्यांच्या त्यांच्या दैवताचे वारकरीच! हे सगळेच या `नादा'ला लागले तेव्हा वेडेच ठरले होते, पण नंतर ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले उत्तुंग आदर्श बनले. कारण एकच, त्यांनी त्यांच्या मनातल्या ध्येयावर निष्ठा ठेवली आणि ते चालत राहिले. असे पुस्तकवेडे, नाट्यवेडे अशा विविध वेड्यांच्या असंख्य वाऱ्या आपल्या अवतीभवती चालूच आहेत. उस्फूर्तपणे वेगवेगळया अनुभवांशी भिडण्याची तयारी हवी. त्यातूनच कुणाला तरी एखादी नवी वाट सापडेलही. यातून नवे सुहृद जोडले जातात, निरपेक्ष नाती, निर्भेळ आनंद, विलक्षण उत्साह यांनी आपण समृद्ध होतो.
त्यामुळं आपापल्या वाटेवरची पण  एक तरी `वारी' एकदा तरी,अनुभवायलाच हवी!

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन