Skip to main content

sampadkiya in 2 July 2012


आग शमली, क्षोभ शमवा
मंत्रालयास आग लागली तो प्रकार दुर्दैवी आहेच. इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी एवढी भीषण आग लागणे हे अचंबित करणारे असले तरी आपल्या राष्ट्नीय व सार्वजनिक स्वभावाच्या दृष्टीने अशक्यही वाटत नाही. कारण तितकी बेफिकीरी व सामुदायिक गलथानपणा आपण अंगी बाणवलेले आहे. आपली आधुनिकता एका पायावर पळते आहे, आणि दुसऱ्या पायावर पिढीजात भोंगळपणा स्वस्थ आहे. त्यामुळे मुंबईत असो किंवा कोण्या ओसाड गावात असो, आधुनिकतेला जी एक शिस्त, काटेकोरपणा व सावधता असली पाहिजे ती कुठेही दिसत नाही. वाहनांची संख्या बेसुमार वाढली, पण तितकी संख्या सामावू शकणारे रस्ते मोठे करता येत नाहीत. गाड्या उभ्या करण्याला जागा  उपलब्ध नाहीत, आणि कुठेही गाडी उभी केली तर ती सुरक्षित राहील अशी शाश्वती लोकांच्या प्रवृत्तीत नाही. या प्रकारच्या गजबजाटाचे आत्यंतिक भिकार उदाहरण म्हणून मंत्रालयाचेच द्यावे अशी स्थिती होती.

हल्लीच्या कोणत्याही व्यवहारांची पद्धत अशी की, सत्तेचे विकेंद्रीकरण फक्त नावापुरतेच असते; आणि सर्व शासकीय कामांची टोलवाटोलवी किंवा दरनिश्चिती मंत्रालयातच होते. नर्सची बदली, वाळूचा ठेका, ५ वी च्या तुकडीला परवानगी असली गावपातळीची सूत्रे मंत्र्याहाती एकवटली आहेत. पहिलीच्या पोराला शाळेत प्रवेश देण्यासाठी चिठी देणारे क्रॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे राज्यभरांतून असली फालतू कामे घेऊन मंत्रालयात गर्दी-गलबला वाढविणारी रयत राज्यकर्त्यांना भूषणावह वाटते. वास्तविक ते प्रशासकीय नाकर्तेपणाचे निदर्शक आहे. या जत्रास्वरूपी मंत्रालयाचे व्यवस्थापन आटोक्याबाहेर जाणे त्यातून घडलेले आहे. आधुनिक दळणवळण सोयीचे झाले, प्रवास सोपा झाला त्यामुळे गावगन्ना पब्लिकला मुंबई जवळ आली. मोबाईल - कॉम्प्युटर वापरून मंत्र्याची भेट ठरविता येत नाही; त्यासाठी मात्र मंत्रालयात घुसून दिवसचे दिवस ताटकळत राहावेच लागते. हे अजब मिश्रण प्रचलित आहे.

याशिवाय मंत्रालयीन कामकाज तर काय वर्णावे? शासकीय योजनांविषयीच्या रंगी-बहुरंगी प्रचारपत्रकांचे गठ्ठे सगळया इमारतभर पडून असतात. ते जनतेला वाटण्यासाठी छापतात, पण वाटले जात नाहीत. पुढच्या काळात मंत्री, मुख्यमंत्री किंवा सरकारच बदलते. त्या पत्रकांचा संदर्भ बदलतो आणि ढिगारे तिथेच राहतात. सगळया वऱ्हांड्यातून, पॅसेजमधून जुन्या फायली, मोडकी टेबल खुर्च्या, बाकडी, खोकडी या प्रकारचे पसारे आणि त्याच प्रकारची माणसं विखुरलेली असतात. कामांचा व्याप, लोकांच्या आकांक्षा, सभोवतीची कार्पोरेट गती यांच्याशी अनुरूप अशी ही परिस्थिती नाही. त्यामुळे आगीसारख्या संकटास असे भक्ष्य सहजी सापडू शकते याचे भान आणि त्यानुसार कारवाईची कठोरता कुणी दाखवलीच नाही. घोंघावणारी गर्दी म्हणजे लोकप्रियता, आणि भोंगळपणा म्हणजे लोकाभिमुखता असल्या समीकरणांमुळे असे प्रसंग `अपघात' म्हणून सोडून देता येत नाहीत.

या बाबतीत आणखी एक वस्तुस्थिती अधिक भीषण वाटते. मंत्रालयास आग लागल्याची वार्ता किंवा दृश्य सामान्य जनतेशी आल्यावर सहजी उमटलेल्या प्रतिक्रिया फार गंभीर आहेत. आपापल्या परीने सामान्य माणूस सामान्य प्रतिक्रिया देत असतो. अधिकृत म्हणून नोंदलेले ते ठाशीव निवेदन नसते, परंतु त्याची खदखद त्यातून व्यक्त होते. ती वाईट आहे. घोटाळेबाज मंत्र्यांचे अशुभ व्यक्त करणारी आहे. कुणा भ्रष्ट उच्चपदस्थाने सर्व पुरावे नष्ट करण्यासाठीच हे केले असणार. यापुढची काही वर्षे जनतेची कामे टोलविण्यास किंवा मुद्दाम चुकविण्यास निमित्त झाले... वगैरे!

या सगळया सामान्य प्रतिक्रिया सरकारची कार्यपद्धती आणि त्याविषयी चीड व्यक्त करणाऱ्या आहेत. स्वत:च्या सरकारवर इतक्या टोकाचा अविश्वास व घृणा हे लक्षण चांगले नव्हे. मंत्रालयाची आग विझेल, काही पर्याय निघेल, राज्यशकट पुढे चालू राहील. पण या प्रकारच्या लोक- भावनांतून कोणतेही सरकार पर्याय काढू शकेल असे वाटत नाही. लोकांच्या मनांतील ती आग विझवण्यासाठी केवळ पाण्याचे फवारे पुरे ठरत नाहीत. तेवढी नोंद घेऊनच नवे मंत्रालय कार्यरत व्हावे आणि ही अग्नीपरीक्षा दिव्यत्त्वाची प्रचिती देणारी ठरावी अशी भावी काळाची अपेक्षा आहे.
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन