Skip to main content

Posts

Showing posts from January, 2013

Sampadkiya in 7 Jan.2013

तणावाच्या आधारे पुढे जाऊ पाहता पाहता पुन्हा एक नवीन वर्ष सुरू झाले, आणि त्यातलाही आठवडा संपला. पोराटोरांनी गरगटलेले रस्ते किंवा रतीब टाकावेत तसे कुणीतरी पाठविलेले `एसेमेस' वगळता वर्षस्वागताच्या उत्साहाची कारंजी यंदा जरा मंदच उडाली. िख्रास्मसपासूनच त्याची उभारी फसफसत यायची, तशी यावेळी जाणवली नाही. कोण्या दामिनीच्या मूक बळीसाठी तरुणाईने हाती घेतलेल्या मेणबत्त्या विझल्या, तरी त्या विषयी मनांतली खदखद शमलेली नाही असे दिसते. या तरुण संवेदनशीलतेचेही प्राप्त परिस्थितीत समाधान वाटू शकेल. पण याच उदासमनस्कांचे `मार्केट' मिळविण्यासाठी `त्या'च प्रकारच्या अत्याचारी बातम्यांचा ओघ वाढल्याचेही दिसते. त्या माध्यमांनी उसन्या उत्साहाने `चला मजेत जगूया', `तणावमुक्ती', `संकल्प-सिद्धी' असे विषय नव्या वर्षाचे म्हणून समोर फेकायला सुरुवात केली तरी त्यामुळे स्फुरण चढल्याचे कुठे जाणवत नाही. अशा मानसिकतेचे कारण म्हणून एका संशोधक-विचारवंताचे नवे प्रतिपादन काही वृत्तपत्रांनी चांगल्या रितीने प्रगट केले आहे, त्याची दखल घ्यायला हवी. हा विचार तसा आपल्याला नवा नाही, तो श्रीकृष्णांनी कधीच प्रग

Lekh on Mohan Ranade

वाढदिवसाच्या निमित्ताने आझाद गोमंतक दलाचे एक झुंझार सेनानी व असामान्य देशभक्त श्री.मोहन रानडे हे पूर्वाश्रमी मनोहर आपटे नावाचे एक शिक्षक होते. १९५० साली ते सांगलीहून गोव्यात आले आणि सावईस शिक्षक म्हणून राहू लागले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने एका नव्या  शाळेची स्थापना केली. या कार्यात कै.पद्माकर सावईकर व श्री.साठे यांचे त्यांना भरपूर सहकार्य मिळाले आणि रानडे गुरुजींच्या खऱ्या कर्तबगारीला सुरुवात झाली. या शिक्षकाच्या आश्रमशाळेत शंभरावर विद्यार्थी शिकून तयार झाले. या सर्वांनी आश्रमपद्धतीने शाळा बांधून काढली, भोवती बाग लावली. चारित्र्य, सेवा व विद्येच्या प्रभावी वातावरणात शिक्षक, विद्यार्थी व त्यांचे पालक वेडावून गेले. हे वेड फोफावू लागले. विद्यार्थी, शाळा, वाचनालय व खेडूतांच्या सेवेत गुरुजी वेडे झाले व त्यांनी इतरांना वेडे केले. त्यांचे कार्य सकाळी पाच ते रात्री एकदोन वाजेपर्यंत चाले. प्रात:काळी पाच वाजता उठून वाचन, मनन व विद्यार्थ्यांचा विशेष अभ्यास घेत. आठ ते बारा सहावी सातवीचे वर्ग, साडेबारा ते पाचपर्यंत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग आणि नंतर मुलांचे खेळ, व्यायाम इत्यादी कार्यक्र

Lekh in 31 Dec.2012

आठवी माळ किर्लोस्करवाडीला नेहमीप्रमाणे कामाकरिता गेलो होतो. पक्षांचा किलबिलाट, मोरांचे ओरडणे, फुलांचा सुगंध, सुखावह पहाटेचा गारवा अशा वातावरणात फिरण्याचा वेगळाच आनंद वाडीत मिळतो. तो आजही मिळाला. मंदिरात दर्शन घेणे हे पण सवयीचेच. लक्ष्मीच्या गाभाऱ्यात आज विशेष रोषणाई होती, नवरात्राची आठवी माळ. नाना प्रकारची फुले, समया, पणत्या, अगरबत्तीचा सुगंध अशा प्रसन्न वातावरणात लक्ष्मीचं दर्शन घेताना छान वाटत होतं. साडेआठ वाजता ऑफीसमध्ये गेलो. थोड्याच वेळात बाहेर जायचंय; कागदपत्रांची जुळवाजुळव चालू होती. तेवढ्यात आमचा सहकारी अमोल जोशीनं आठवण केली, `आज सकाळी आपल्याला सुधाकर पाटीलच्या घरी जायचं आहे ना?' `खरंच की! सांगून ठेवलंय म्हणजे जायलाच हवं.....बरीच वर्षं झाली. कसा असेल तो सुधाकर?.. अठरा वर्षांपूर्वीचा काळ डोळयापुढे आला. मी ऑफीसातल्या कामात मग्न होतो. माझ्या साहायकाचा फोन आला, `भेटायला कोणी आलं आहे.' दार उघडून एक गृहस्थ आत आले. डोळयावर काळा चष्मा आणि हातात पांढरी काठी, म्हणजे दृष्टी नाही हे लक्षात आलं. मध्यम वयाचा माणूस. ``सर, मी नॅबचं (नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंर्ड) काम करतो. जवळ

Lekh of VINITA TELANG in 31 Dec.2012

विकृतीवर उपाय करणार कोण? दिल्लीत घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळं सगळा देश हादरला, सुन्न झाला, धास्तावला व आक्रमकही झाला. घटना राजधानीत घडल्यामुळं व प्रसारमाध्यमांच्या अतिरेकी प्रसिद्धीमुळं त्याला अधिक महत्त्व प्राप्त झालं. त्या पाठोपाठ त्याच स्वरूपाच्या बातम्यांना प्रसारमाध्यमांनी अग्रस्थान दिले. स्त्रियांच्या सुरक्षेपासून शिक्षेच्या तरतुदीपर्यंत अनेक मुद्दे ऐरणीवर आले. राजकीय महिलांची संवेदनशीलता, तरुणाईची अस्वस्थता व पाठोपाठ राजकीय पक्षांचा संधीसाधूपणा याही गोष्टी दिसून आल्या. दुर्दैवी मुलीची प्रकृती व आंदोलनास मिळणारे वळण यावरून कदाचित फाशीसारख्या शिक्षेपर्यंत सरकारला यावेही लागेल, पण केवळ या उपायांमुळे अशा प्रकारचे गुन्हे पुन्हा घडायचे थांबण्याची शक्यता कमी. एखादी विक्षिप्त घटना घडल्यावर त्याचे तीव्र प्रतिसाद उठणे, प्रतिक्रियात्मक आंदोलने होणे हे स्वाभाविक आहे, आणि सोपेही! समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी वेगळी दृष्टी, वेगळे धाडस, संयम लागतो. त्यासाठी आपण प्रयत्नच करत नाही. समाजात अनेक विकृतींची वा बेदरकारपणाची अभिव्यक्ती अनेक दुर्दैवी घटनांतून दिसत असते. मुलीनं प्रतिसाद

Sampadkiya in 31Dec.2012

तुमचे आंदोलन होते,... दिवाळीच्या आधीपासून पश्चिम महाराष्ट्नत सुमारे आठ-दहा दिवस ऊस आंदोलन सुरू होते. त्यानंतर ते थंडावत गेले आणि मग व्यवहार-वाहतूक सुरळीत होत गेली. त्यानंतर वृत्तपत्रांतून उलट सुलट चर्चा, आणि आपापली बाजू मांडणारे लेख-मुलाखती सुरू झाल्या. कृषिमंत्र्यांपासून ऊस तोडणी मजुरांपर्यंत सगळयांनी परस्परांवर चिखलफेक केली, आपणच कसे सामान्य शेतकऱ्यांचे कैवारी आहोत हे ओरडून सांगण्याचे प्रयत्न झाले. त्यांच्या वादावादीशी आणि कैवाराशी ज्यांचा फारसा संबंध नाही त्या बहुसंख्य प्रजेला जो अकारण त्रास झाला, त्या कारणाने मोठे नुकसान पोचले त्याबद्दल कुणी ब्र काढला नाही. शेतकऱ्यांचा फायदा होऊ नये असे कुणीच म्हटले नाही. त्यांचे जे काही कल्याण करायचे  ते करावे; त्यासाठी परस्पर भांडावे. त्याकरिता कागदोपत्री, सभा-मेळावे, काठ्या-बंदुकी वगैरे कशाचा वापर करायचा हे कोण सांगणार? पण सामान्य जीवन विस्कळीतच नव्हे, तर कठीण करण्याचा अधिकार त्यांनी हाती कसा घेतला? कुणी अशा आंदोलनपीडितांबद्दल सहानुभूती व्यक्त करू नये? जी काही समजली-कानी आली त्यापैकी काही उदाहरणे लक्षात घेण्यासारखी आहेत. एसटी बसने घरी येण

Lekh in 10Dec.2012

विजयी वीर ड्युटी संपवून चाललो होतो. गाडी वळवली आणि समोरून महापुराचा लोंढा यावा असा मोटारसायकलींचा ताफा थेट अंगावरच आला. बैलगाड्यांच्या शर्यती पूर्वी पाहिल्या होत्या. बेभान होऊन जिवाच्या आकांताने बैल धावत असत. गाडीला गाडी धडकेल - एकमेकांत गाड्या अडकतील अशा नाना तऱ्हेच्या शंकांनी मन भयकंपित होई. धुळीच्या ढगाआड धावणाऱ्या गाड्या क्षणभर दिसून येत नसत. दुचाकींच्या या जबरदस्त रॅलीमुळे त्या बैलगाडी शर्यतीची मला आठवण झाली. शे-पन्नास मोटार सायकली टरटराट करत धावत होत्या. बहुतेक गाड्यांचे सायलेन्सर्स काढलेले, त्यामुळे कानठळया बसविणारा कर्कश आवाज. एका गाडीवर तीन तीन किंवा चारजण बसलेले - किंवा एकदोन उभे. गुलालाने चेहरे व सगळे अंग माखलेले. घसा फाटेपर्यंत `की जय - विजय असो', `आमच्याशिवाय हायच कोण?', `सगळयांना लावले पळवून'  अशा आक्रस्ताळी घोषणा! चौक किंवा तिट्ठा आले की मुठी भरभरून गुलाल उधळण्याची चुरस. मोटारसायकलवर उभे राहून किंचाळणारे शर्ट काढून उघडे. कोणाचाही चेहरा ओळखता येऊ नये असा, गुलाल, धूर, घाम यांनी बरबटलेले. ही टोळधाड जलद गतीने आली व तेवढ्याच वेगात पुढे निघून गेली. रस्त्या

Sampadkiya in 10 Dec.2012

हाताची घडी, तोंडावर बोट माणसाला एकमेकांशी बोलण्याची ऊर्मी जन्मजात असते. काही माणसे स्वत:शीच बोलतात ते बाजूला ठेवले तरी फुलां-फुलपाखरांशी, प्राण्यांशी किंवा निर्जीवांशीही माणसे बोलतात. दगडी देवाशी बोलतातच, पण फळीवरून पडलेल्या पातेल्याला, `हं, पडा पडा. तुम्हीसुद्धा सरळ वागू नका...!' असा राग काढणारी `मंडळी' घरोघरी असतात. रामप्रहरात भेटेल त्या माणसाकडे `अहाहाहा, काय थंडी पडलीय-' असे म्हणणाऱ्या माणसाला, `हो ना, यंदा थंडी जरा जास्तच आहे.' असे उत्तर ऐकल्याशिवाय राहावतच नाही. माणूसच काय, पण मुंग्यासुद्धा समोरून येणारीला `काय म्हणतेस?' असे विचारण्यासाठी थांबतात म्हणे! माणूस संवादप्रिय प्राणी असल्यामुळे प्रत्येक घटना-प्रसंगावर, विचार-आचारावर, चराचर व्यक्तिमत्त्वावर परस्पर भाष्य करणे उपजत, स्वभावगत आहेच परंतु मानवी समाजबंधनासाठी ते आवश्यकही आहे. संवाद हा लोकशाहीचा प्राण आहे. `संवाद' म्हणजे केवळ एकांगी, एकमार्गी, स्तुतीपर वटवट नाही. उलट प्रत्येक बाबतीत अनुकूल-प्रतिकूल मतप्रदर्शन होणे हाच तर अभिजात जिवंतपणाचा साक्षात्कारी अनुभव असतो. परमत-खंडन करण्यातही सुसंस्कृतपणा अस

sampadkiya in 3 Dec.2012

भारताचिया  महारथा सारे मिळूनी ओढूया...  खरोखरच आपला देश चालवणे हे एक महारथ ओढण्याचे काम आहे. विविध प्रांत- भाषा, विविध क्षमता- प्रश्न, विविध पक्ष-संघटना आणि विविध घोटाळयांनी गजबजलेला हा देश चालतो तरी कसा असा प्रश्न काहीवेळा पडतो. देश चालवणे ही मूलत: शासनाची, लोकप्रतिनिधींची जबाबदारी असली तरी खरोखरीच हा महारथ नीट चालायला हवा असेल तर शासनाचीही ताकद अपुरी पडू शकते. आणि मुळात ती पूर्णपणे वापरलीही जात नाही. अशावेळी विविध स्वयंसेवी संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरते. आपल्या देशात फार पूर्वीपासून, अगदी राजे-महाराजे असतानाच्या काळातही समाजातल्या ज्ञानी, समर्थ, संपन्न व्यक्ती समाजाच्या अनेक कामांसाठी व्यक्तिश: वा संस्था माध्यमांतून योगदान देत असत. समाजाने समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणे व नि:स्वार्थीपणे, निष्ठापूर्वक व्रतपालनाच्या भावनेतून समाजासाठी काम करणे ही आपली परंपरा आहे. सध्याच्या काळात यासाठी `एनजीओ' हा शब्द वापरला जाऊ लागला व शासनाचेही धोरण अशा एनजीआेंच्या बाबतीत पुष्कळ सकारात्मक झाले. अनेक योजनांच्या कार्यवाहीसाठी लहानमोठ्या एनजीओंची मदत शासनही घेऊ लागले व अनेक संस्था