Skip to main content

Lekh on Mohan Ranade


वाढदिवसाच्या निमित्ताने

आझाद गोमंतक दलाचे एक झुंझार सेनानी व असामान्य देशभक्त श्री.मोहन रानडे हे पूर्वाश्रमी मनोहर आपटे नावाचे एक शिक्षक होते. १९५० साली ते सांगलीहून गोव्यात आले आणि सावईस शिक्षक म्हणून राहू लागले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने एका नव्या  शाळेची स्थापना केली. या कार्यात कै.पद्माकर सावईकर व श्री.साठे यांचे त्यांना भरपूर सहकार्य मिळाले आणि रानडे गुरुजींच्या खऱ्या कर्तबगारीला सुरुवात झाली.
या शिक्षकाच्या आश्रमशाळेत शंभरावर विद्यार्थी शिकून तयार झाले. या सर्वांनी आश्रमपद्धतीने शाळा बांधून काढली, भोवती बाग लावली. चारित्र्य, सेवा व विद्येच्या प्रभावी वातावरणात शिक्षक, विद्यार्थी व त्यांचे पालक वेडावून गेले. हे वेड फोफावू लागले. विद्यार्थी, शाळा, वाचनालय व खेडूतांच्या सेवेत गुरुजी वेडे झाले व त्यांनी इतरांना वेडे केले.
त्यांचे कार्य सकाळी पाच ते रात्री एकदोन वाजेपर्यंत चाले. प्रात:काळी पाच वाजता उठून वाचन, मनन व विद्यार्थ्यांचा विशेष अभ्यास घेत. आठ ते बारा सहावी सातवीचे वर्ग, साडेबारा ते पाचपर्यंत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग आणि नंतर मुलांचे खेळ, व्यायाम इत्यादी कार्यक्रम. संध्याकाळी खांद्यावर घोंगडी, हाती वाचनीय पुस्तकांनी भरलेली थैली व एक लहानसा कंदील घेऊन शाळेबाहेर पडत व प्रौढांना शिकविण्यासाठी वाड्या-वाड्यावर ते जात. त्यांनी विद्यार्थ्यांत उत्साहाचे, शिस्तीचे व बंधुत्वाचे नाते निर्माण केले साधे खरचटले तरी ते विद्यार्थ्यांची आपल्या हातांनी मलमपट्टी बांधीत. इतकेच नव्हे तर गोरगरीब विद्यार्थ्यांचे मळके कपडे स्वच्छ करण्यासाठी साबण घेऊन ते स्वत: धुण्यास बसत.
यात एकाएकी खंड पडला. पोर्तुगीज सरकारची दृष्टी वळली. गुरुजी नाहीसे झाले, पण लवकरच मोहन रानडे नावाने परत आले. त्यांचे कार्य पूर्ववत चालू राहिले. `रानडे' स्वातंत्र्यसंग्रामात लढण्यास तयार झाले. हळूवार अंत:करणाचे रानडे गुरुजी हाती शस्त्र घेऊन इतरांसह पोर्तुगीज साम्राज्यशाहीच्या क्रूर व पाशवी सैनिकांशी लढू लागले. आपले सर्वस्व ओतू लागले.
***
त्याकाळी गोवा पोर्तुगीजांच्या अंमलाखाली होता. गोवा सोडून भारत कधीच स्वतंत्र झाला होता. गोवाही पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त व्हावा म्हणून काही देशभक्त प्रयत्न करत होते. पण हे काम सोपे नव्हते. काही धाडसी तरुणांनी बेतीची पोलीसचौकी लुटायचे ठरवले. कारण त्यांना पोर्तुगीजांना भीती दाखवायची होती. २६ ऑक्टोबर १९५५ सालची ती विजयादशमी होती. संध्याकाळचे पाच वाजले होते. त्यावेळी मांडवी नदीवर पूल नव्हता. लोक फेरी बोटीने जात येत असत. त्यामुळे पणजीला जाणाऱ्या आणि बेतीला येणाऱ्या लोकांची तिथे नेहमी गर्दी असायची. बेतीच्या फेरी धक्क्याजवळच एक पोलीस चौकी होती, पोर्तुगीज सरकारची लोकांना एवढी भीती वाटायची की येथे येऊन कोणी दगाफटका करील असे पोलीसांच्या मनातसुद्धा आले नव्हते. त्यामुळे सगळे अगदी बेसावध होते.
एवढ्यात एक टॅक्सी बिट्ठोणच्या बाजूने आली आणि पोलीस चौकीपासून थोड्या अंतरावर उभी राहिली. पाच-सहा तरुण त्यातून खाली उतरले आणि त्यांनी वेगाने पोलीस चौकीकडे धाव घेतली. त्यांच्या पुढाऱ्याने हवेत गोळीबार करून `हात वैर करात चोरांनो' असे त्या पोलीसांना खडसावून सांगितले. दोन-तीन पोलीस शरण आले. परंतु त्यांचा हवालदार गुर्मीत होता. त्याला बाजूला करून पुढारी सरळ पोलीसचौकीत घुसला. हवालदार त्याच्या पाठोपाठ गेला व आपल्याजवळील पिस्तुलाने त्याने पुढाऱ्यावर गोळया झाडल्या. तोही काही कमी नव्हता. त्याने लगेच मागे वळून हवालदारावर गोळयांचा वर्षाव करून त्याला ठार मारले.
एवढ्यात बाकीचे तरुणही चौकीत आले व त्यांनी चौकी काबीज केली. चौकीवरील बरीच हत्यारे त्यांनी घेतली व ते बाहेर पडले. आता तेथून चटकन निघून जाणे आवश्यक होते. पण चौकीपासून वीस-पंचवीस हात ते जातात तोच त्यांचा तो पुढारी खाली कोसळला. कारण तो अतिशय जखमी झाला होता. त्याचे साथीदार त्याला आपल्याबरोबर नेण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु त्याने आपल्या सोबत्यांना पळून जाण्यास सांगितले. कारण तेथे राहिल्यास पोलीस त्यांच्यावर परत हल्ला करण्याची शक्यता होती. त्याचे सोबती त्याला त्या अवस्थेत सोडून जाण्यास तयार होईनात. तेव्हा त्या पुढाऱ्याने रागाने त्यांना सांगितले, ``माझ्यापेक्षा लढा महत्त्वाचा आहे. पणजीहूून आणखी पोलीस येण्यापूर्वी मिळालेली हत्यारे घेऊन तुम्ही पसार व्हा व लढा पुढे चालवा. माझी काळजी करू नका.''
त्याचा हुकूम म्हणून बाकीचे सगळे मिळवलेल्या बंदुका घेऊन नाखुषीने बाजूच्या जंगलात पसार झाले. एवढ्यात पोर्तुगीज पोलिसांची कुमक आली आणि रक्ताच्या थारोळयात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या त्या पुढाऱ्याला त्यांनी अटक केली. त्याच्यावर पोर्तुगीज सरकारने खटला चालवला व त्याला २८ वर्षांची शिक्षा दिली. शिक्षा देणाऱ्या पोर्तुगीज न्यायाधीशांनी रानडे गुरुजींच्या देशाभिमानाबद्दल जे गौरवोद्गार काढले त्यावरून रानडे गुरुजींची थोरवी दिसून येते. तुरुंगात ते पोर्तुगीज भाषा शिकले. इंग्रजी वाढविले आणि आपल्या धीरोदात्त वागणुकीमुळे तुरुंगाधिकाऱ्यांच्या आदरास पात्र झाले.
आज पदवीधर झालेल तरुण, साक्षर झालेले प्रौढ, खांद्यास खांदा लावून लढणारे सहकारी त्यांची आठवण येताच डोळयांत पाणी आणतात. रानडे गुरुजींविषयी आदर व्यक्त करतात.

(वरील मजकूरापैकी काही भाग फेब्रुवारी १९६५ मध्ये प्रकाशित झालेल्या गोमंतक प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशन स्मरणिकेतील  आणि  उरलेला भाग गोव्याच्या शाळांमधील इयत्ता तिसरीचे क्रेमक पुस्तकातील आहे.

मोहन रानडे  आणि गोव्याचे मस्कारेन्हस लिस्बनच्या तुरुंगात खितपत पडले होते. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय दयानंद बांदोडकर तसेच कै.सुधीर फडके, कै.बापू साठे वगैरेनी खूप प्रयत्न करून त्यांची सुटका झाली. १९६७ मध्ये आगबोटीने मोहन रानडे मुंबईला पोचले. तिथून स्व.बांदोडकरांनी रानडेंना विमानाने दिल्लीला नेले. औपचारिक कागदपत्रे पूर्ण करून गोव्यात दाभोळी विमानतळावर आले. तिथून उघड्या जीपमधून मडगाव, बोरी, फोंडा मार्गे पणजीला नेले.
मी शिरोडा प्राथमिक शाळेचा कार्यकारी मुख्याध्यापक होतो. इतर शिक्षकांच्या मदतीने मोठ्या शाळकरी मुलांना, पालकांना घेऊन चालत तीन किलोमीटर बोरीच्या पुलावर आलो. स्वातंत्र्यसैनिक मोहन रानडे व मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचे स्वागत केले. कोडॅक बॉक्स क्रॅमेऱ्याने त्यांचा फोटोही मी काढला होता. मोठ्या चौकड्याचा शर्ट त्यांनी घातला होता. ते खूपच अशक्त दिसत होते. बोलताना ते थांबून थांबून बोलत होते. गोव्यात ठिकठिकाणाहून त्यांना थैल्या अर्पण केल्या. पण त्यांनी त्या गोव्याच्या विकासालाच अर्पण केल्या. रायबंदर हॉस्पिटलजवळच्या एका साध्या घरात काही दिवस राहिले. पुढे त्यांनी पुण्याला जाऊन वकिलीचे शिक्षण घेतले.
- राम आपटे,
सेवानिवृत्त शिक्षक, फोंडा-गोवा
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...