Skip to main content

Lekh in 10Dec.2012


विजयी वीर

ड्युटी संपवून चाललो होतो. गाडी वळवली आणि समोरून महापुराचा लोंढा यावा असा मोटारसायकलींचा ताफा थेट अंगावरच आला. बैलगाड्यांच्या शर्यती पूर्वी पाहिल्या होत्या. बेभान होऊन जिवाच्या आकांताने बैल धावत असत. गाडीला गाडी धडकेल - एकमेकांत गाड्या अडकतील अशा नाना तऱ्हेच्या शंकांनी मन भयकंपित होई. धुळीच्या ढगाआड धावणाऱ्या गाड्या क्षणभर दिसून येत नसत. दुचाकींच्या या जबरदस्त रॅलीमुळे त्या बैलगाडी शर्यतीची मला आठवण झाली.
शे-पन्नास मोटार सायकली टरटराट करत धावत होत्या. बहुतेक गाड्यांचे सायलेन्सर्स काढलेले, त्यामुळे कानठळया बसविणारा कर्कश आवाज. एका गाडीवर तीन तीन किंवा चारजण बसलेले - किंवा एकदोन उभे. गुलालाने चेहरे व सगळे अंग माखलेले. घसा फाटेपर्यंत `की जय - विजय असो', `आमच्याशिवाय हायच कोण?', `सगळयांना लावले पळवून'  अशा आक्रस्ताळी घोषणा! चौक किंवा तिट्ठा आले की मुठी भरभरून गुलाल उधळण्याची चुरस. मोटारसायकलवर उभे राहून किंचाळणारे शर्ट काढून उघडे. कोणाचाही चेहरा ओळखता येऊ नये असा, गुलाल, धूर, घाम यांनी बरबटलेले.
ही टोळधाड जलद गतीने आली व तेवढ्याच वेगात पुढे निघून गेली. रस्त्याने जाणारे येणारे हा लोंढा पाहून भांबावून घाबरून गेले. जीव मुठीत घेऊन रस्त्याच्या कडेला अंग चोरून उभे राहिलेले. जरासा घोटाळा झाला असता तर बेभान झालेल्या मोटरसायकलींखाली चिरडून जाण्याचे भय. एकच नव्हे, एका पाठोपाठ पाच-पन्नास गाड्या अंगावरून सटासट गेल्या असत्या. आपल्या गाडीखाली कोणी आले आहे याचा त्या उन्मत्त, बेभान तरुणाईला पत्ताही लागला नसता. सायलेन्सर काढल्याने एवढा आवाज होता की कोणाच्या किंकाळया ऐकू आल्या नसत्या.
अवघ्या दोन-तीन मिनिटांत प्रचंड वेगातील ताफा रस्त्यावरून पुढे गेला. वाटेवर गुलालाचा हलकासा थर पसरलेला दिसला. पादचाऱ्यांनी डावी-उजवीकडे भयग्रस्त नजरेने पाहात रस्त्याकडेची आपली वाहने, पावले वाटेवर आणली; कपाळावरील घाम टिपला. काळजाचा चुकलेला ठोका काहीसा पुन्हा पडू लागला. घशाला पडलेली कोरड ओलावली व व्याकूळ भयकंपित नजर स्थिरावली.
मी जवळच्या एका परिचिताला दीनपणी विचारलं,``ही कसली रॅली? काय भानगड आहे?''
``मलाही माहीत नाही. पण कुणीतरी जिंकले असेल! निवडणुकीचा दंगा...!''
``मग त्यासाठी एवढा हैदोस कशासाठी?''
``विजयाचा उन्माद असतो साहेब. पैशाचा उत्साह व मस्ती उतू जाते. शुद्धीत कोण असते?''
``कसली निवडणूक? लोकसभा, विधानसभा की जिल्हा परिषद?''
``अहो कुठली लोकसभा-विधानसभा? कुठली तरी ग्रामपंचायत असेल!''
``मग ग्रामपंचायतीला निवडून आले म्हणजे एवढा विश्वविक्रम? एवढे आक्रोशी प्रदर्शन कशासाठी?''
``तुम्हाला काय सांगायचे? मी ऐकले की काल रात्री मतदानापूर्वीचा भाव डबल झाला. गंमत म्हणजे दारिद्र्यरेषेखाली किंवा झोपडपट्टीतील लोकांनी दोन्ही पार्टीकडून हात मारला. मत कोणालाच दिले नाही म्हणतात.''
``कुठून आणले एवढे पैसे? आणि कशासाठी? निवडून आल्यावर एवढी पेरलेली रक्कम उगवत असेल का?''
``नक्कीच! त्याशिवाय कोण कशाला पैसे वाटतो? एरव्ही हे चोर लोक मंदिरासमोर बसलेल्या भिकाऱ्याच्या थाळीत पन्नास पैशाचे नाणेसुद्धा टाकणार नाहीत.''
``कोणा ग्रामपंचायतीची ही कथा तर मग मोठ्या निवडणुकीत काय होत असेल?''
``साहेब, तुम्ही जास्त विचार करू नका. डोके भणभणेल. आपला तो प्रांत नव्हे. भरधाव गाड्यांखाली आपण सापडलो नाही, वाचलो याचे समाधान माना आणि शांतपणे घरी जा.''
ती तसली आक्रस्ताळी मिरवणूक संपल्यावर गुलालाने माखलेल्या, परतीच्या वाटेवरच्या एका तरुणाला मी गाठले आणि विचारले, ``कसली मिरवणूक म्हणायची ही?''
``ग्रामपंचायत निवडणूक!''
``कोण जिंकले? किती मताने?''
``काय माहीत! कोणी का जिंकेना. आपल्याला त्याचे काय?''
``मग तू एवढा घसा फाटेपर्यंत घोषणा का देत होतास?''
``खरं सांगू साहेब, गाडीची टाकी पेट्नेलने फुल करून मिळते. धाब्यावर चापायला मिळते शिवाय खिशात चुरगाळलेल्या नोटा कोंबल्या जातात. कोण जिंकले, कोण हरले याचे आपल्याला देणेघेणे नाही. सगळे सारखेच. गाडी दामटायला मिळते, मजा येते. एक दिवस चैन; बस्स!''
माझे डोके खरेच भणभणू लागले. आपला हा विषय नव्हे हेच खरे!
-मोहन जी. आळतेकर
(सेल : ९४२११८४९९६)

Comments

  1. छान लेख आहे मोह्नजी आळतेकर धन्यवाद चांगल्या विषयाला वाचा फोडली

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन