Skip to main content

Lekh of VINITA TELANG in 31 Dec.2012


विकृतीवर उपाय करणार कोण?
दिल्लीत घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळं सगळा देश हादरला, सुन्न झाला, धास्तावला व आक्रमकही झाला. घटना राजधानीत घडल्यामुळं व प्रसारमाध्यमांच्या अतिरेकी प्रसिद्धीमुळं त्याला अधिक महत्त्व प्राप्त झालं. त्या पाठोपाठ त्याच स्वरूपाच्या बातम्यांना प्रसारमाध्यमांनी अग्रस्थान दिले. स्त्रियांच्या सुरक्षेपासून शिक्षेच्या तरतुदीपर्यंत अनेक मुद्दे ऐरणीवर आले. राजकीय महिलांची संवेदनशीलता, तरुणाईची अस्वस्थता व पाठोपाठ राजकीय पक्षांचा संधीसाधूपणा याही गोष्टी दिसून आल्या. दुर्दैवी मुलीची प्रकृती व आंदोलनास मिळणारे वळण यावरून कदाचित फाशीसारख्या शिक्षेपर्यंत सरकारला यावेही लागेल, पण केवळ या उपायांमुळे अशा प्रकारचे गुन्हे पुन्हा घडायचे थांबण्याची शक्यता कमी.
एखादी विक्षिप्त घटना घडल्यावर त्याचे तीव्र प्रतिसाद उठणे, प्रतिक्रियात्मक आंदोलने होणे हे स्वाभाविक आहे, आणि सोपेही! समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी वेगळी दृष्टी, वेगळे धाडस, संयम लागतो. त्यासाठी आपण प्रयत्नच करत नाही. समाजात अनेक विकृतींची वा बेदरकारपणाची अभिव्यक्ती अनेक दुर्दैवी घटनांतून दिसत असते. मुलीनं प्रतिसाद दिला नाही म्हणून अॅसिड टाकणे, बेदरकारपणे गाडी चालवून पादचाऱ्यांचे बळी घेणे, मिरवणुकीत गुलाल टाकला म्हणून भोसकणे, किंवा बापाचा-आईचा पैशासाठी खून करणे.... अशा कितीतरी घटना रोज घडत आहेत, वाढत आहेत. अमेरिकेत एका शाळेत अंदाधुंद गोळीबार करून तीस मुलांना मारून कोणी एक मोकळा झाला. शस्त्रे उपलब्ध असणं, संधी मिळणं, सुरक्षा नसणं ही वरवरची कारणं खरीच आहेत. पण या व्यक्तींच्या मानसिकतेचे काय? मुलांना लहानपणापासून नकार पचवता येणं, दुसऱ्याच्या मतांचा, स्वातंत्र्याचा, अस्तित्वाचा, प्रगतीचा, हक्कांचा आदर करता येणं याची शिकवण मिळत नाही. एका घटनेत आई-मुलाच्या भांडणाचं पर्यावसान मुलानं आईवर हल्ला करण्यात झालं. प्रकरण पोलीसात-कोर्टात गेलं. मुलाला शिक्षा झालीच, पण दारू पिऊन तर्र होऊन पोलीस स्टेशनला आलेल्या आईलाही कोर्टाने `योग्य आचरण ठेवून मुलांसमोर चांगल्या वागणुकीचे आदर्श ठेवणं हे आईचं कर्तव्य आहे' या शब्दात समज दिली. पण समज पुरेशी नाही.
अवतीभवती चांगल्या वागणुकीचे आदर्श याचा तर साफ तुटवडा जाणवतो. ज्या वयात मुलांची मनाची जडणघडण होणार त्या वयात त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होतं. संस्कार मनावर होणं दूरच. इवली टिवली मुलंही मुन्नी-शिलासारख्या गाण्यांवर नाचतात. टीव्हीवरचे कार्यक्रम, मनोरंजनाच्या नावाखाली होणारे उत्तान भडक दर्शन. यांतून एक मानसिक अस्थिरता, असमाधान, अतृप्तीची भावना वाढत असते. रोज मनाला प्रदूषित करणारा हा विषाणू कुठल्यातरी प्रसंगी असा भयंकर रूप धारण करतो. चंगळवाद म्हणजे नेमकं काय? तो चांगला की वाईट? गरज - हौस - हाव यांच्या सीमारेषा कुठल्या? आनंद - मजा - स्वैरपणा यांच्या सीमारेषा कुठल्या? त्या का ओलांडायच्या नाहीत?  राग, आनंद, कामेच्छा, निराशा, द्वेष या भावना कशा हाताळायच्या असतात? एखाद्या क्षणी यातल्या एखाद्या भावनेनं विकृत टोक गाठलं तर तो `क्षण' कसा परतवायचा? याचं शिक्षण आपण मुलांना देतो का?
दोन-पाच-पन्नासजणांच्या गर्दीतही त्या वेळच्या सामूहिक उन्मादाला बळी न पडणं यासाठी आपला विवेक शाबूत ठेवता येणं, ठामपणे नाही म्हणता येणं, प्रसंगी विरोध करता येणं यासाठी मनाचा खंबीरपणा हवा, धाडस हवं, स्वत:च्या विचारांवर विश्वास हवा व मुळात यासाठी विचारांची स्पष्टता हवी. आज वस्तूंचे-मनोरंजनाचे-चैनीचे-उपभोगाच्ि%ॅडूंज्ञ्ें-मण्ैंद्धंझ्र्र्ण्ीज्ञ्ें-र्ज्ञ्ेण्ुज्ञ्ें-र्उत्त्दैंगीज्ञ्ॅ जे प्रचंड मायाजाल उभे राहिले आहे त्यात भलेभले आपली विवेकबुद्धी हरवून बसतात तिथे तरुण वा अपरिपप् मुलांकडून कसली अपेक्षा करायची? सरकार आणि पोलिस यांना तर त्यांच्याच अंगरख्याचं ओझं झालं आहे आणि राजकीय इच्छाशक्ती केवळ त्यांचा हपापा बाळगते.

`आपल्याला मिळालं नाही ते मुलांना देणं' या विचित्र मानसिकतेतून अनेक चुकीचे संदेश पालकच मुलांना देतात. परवडतं म्हणून वा हट्ट करतात म्हणून वा प्रतिष्ठा म्हणून त्यांना कपडे, मोबाईल, पैसा, गाड्या पालकच पुरवतात. मग अचानक तो मुलगा कुणालातरी गाडीनं ठोकरतो, वा कुठंतरी सिगरेट पिताना दिसतो, `गंमत' म्हणून रेव्ह पार्टीला जातो, मुलगी स्कार्फ बांधून जात असल्याने बरेच दिवस कुणाबरोबर फिरते हे कळत नाही मग ती एकदम पळून जाते वा तिच्या पर्समध्ये गर्भनिरोधक सापडते अशा धक्कादायक स्फोटक घटना घडेपर्यंत पालकांना किंचितही कुणकूण नसते हे म्हणणे मूर्खपणाचे आहे. या आडनिड्या वयातल्या मुलांना हे विषय स्फोटक, संघर्षपूर्ण न होता समजुतीनं सांगायचे कसे हे पालकांना समजत नाही. `वेळ आल्यावर पाहू' म्हणून पुढे ढकललेले विषय अशा भयंकर रीतीनं पुढं आल्यावर मग उपाय कठोर  होतात. गाडी/मोबाईल काढून घे, मुलीचं घराबाहेर पडणं बंद कर अशा निरर्थक उपायांनी प्रश्न सुटत नाहीत, चिघळतात.
लहानपणापासून मुलांशी संवाद साधणं आवश्यक.त्यांना या विकृत आनंदापूर्वी त्यांना चांगलं संगीत, वाचन, पर्यटन अशा अभिरुचीसंपन्न दर्जेदार आनंदाची ओळख व्हायला हवी. या वयात अंगात रग, खुमखुमी असते. राग, अस्वस्थता त्यांना कुठेतरी व्यक्त करायची असते. त्यासाठी गिर्यारोहणासारखे साहसी प्रकार वा भरपूर अंगमेहनतीचे खेळ, व्यायाम, कला, नाट्य अशा माध्यमांतून त्यांच्या उर्जेला चांगली वाट मिळायला हवी. आपली मुलं-मुली काय पाहतात-ऐकतात-बोलतात याकडे लक्ष हवंच, पण त्यावर नुसती टीका न करता त्यात काय वाईट आहे व का, हे त्यांच्याशी नीट बोलता यायला हवं. अनेक सिनेमा नटनट्या अशा प्रकारानंतर प्रतिक्रिया देऊन आपली संवेदनशीलता दाखवू पाहतात. प्रत्यक्ष आयुष्यात ते कसे वागतात? ज्या विकृतीची बीजं ते बीभत्स नाचगाण्यातून समाजात पेरतात, त्याला ते स्वत: कधी बळी पडत नाहीत, ते त्यांच्या कोषात सुरक्षित असतात. बळी पडतो तो सामान्य, हेही मुलांना सांगायला हवं. कॉलेजवयीन मुली फाशीविषयी आता तावातावानं बोलत आहेत, त्यांना त्यांची मतं आहेत, त्या ती मांडतात हे चांगलंच आहे. पण त्यांना अजूनही त्यांची लाईफस्टाईल, आवडी, पेहेराव याचा वाटा मान्य नाही. `सेक्सी राधा', `हलकट जवानी' वगैरे तुम्हाला खटकत नाही का? यावर त्या निरुत्तर होतात.
पण त्यांच्या एका म्हणण्यात तथ्य आहे की, स्त्री हे प्रॉडक्ट असलेल्या मार्केटचे ते बनवणारे-विकणारे-विकत घेणारे वा एन्जॉय करणारे बहुतांश पुरुष आहेत. एकीकडे स्त्रीला वापरायचं आणि दुसरीकडे तिलाच तुम्ही कपडे नीट घाला, रात्री बाहेर जाऊ नका हे सांगायचं हा दुटप्पीपणा आहे. मुलीला लहानपणापासून जे सतत सांगितलं जातं ते काही प्रमाणात तरी मुलांना सांगितलं जातं का? हा त्यांचा प्रश्न आहे. समाज निरोगी राहायचा तर वागण्या-बोलण्याचे, इच्छा पुरवण्याचे वा त्याला मुरड घालण्याचे, संयमाचे, आदर दाखवण्याचे, शौर्य दाखवण्याचे, प्रतिकार करण्याचे सर्वच संस्कार मुलगा-मुलगी दोघांवरही व्हायला हवेत.
समाजाची काही जबाबदारी आहेच. रस्त्यावर वावरताना बाजूला काय घडतंय याची दखल न घेणं, उगाच कशाला लचांड म्हणून हस्तक्षेप न करणं यामुळे अत्याचार करणाऱ्यांचं फावतं. समाजाने जागृत असणं, अशा घटनांना विरोध करणं हे गरजेचं आहे, त्याहीपेक्षा अशा अत्याचाराला बळी पडणाऱ्या वा त्याविरुद्ध लढू पाहाणाऱ्या दुर्दैवी मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं अत्यंत गरजेचं आहे. सगळया वेळी मुली `तसल्याच' नसतात. रात्री  उशीरा येणारी स्त्री प्रत्येकवेळी मित्रासोबत पार्टी, पिक्चर करून येणारीच नसते. प्रवासातून, कार्यक्रमातून परतणारी, नोकरी, हॉस्पिटल ड्यूटी करून येणारी, शेकडो कारणांनी तिला आज एकटं फिरावं लागतं. ते सुरक्षितपणे करता येणं यासाठी केवळ पोलीस वा सरकार जबाबदार नाहीत. समाजालाही ती जबाबदारी स्वत:ची वाटायला हवी.
राजकीय पक्ष वा संघटना यांचा या प्रकरणातला (हे आता खूप `छान' पेटलंय हे पाहिल्यावर) हस्तक्षेप तर उबग, संताप आणणारा असतो. सुरक्षेचे उपाय शोधणं, त्याची अंमलबजावणी करणं, गुन्हेगाराला राजकीय वा प्रतिष्ठेच्या दडपणाखाली न येता शिक्षा होईल हे पाहणं, दूरदर्शन वाहिन्या, त्यांचे कार्यक्रम, जाहिराती यांवर नियंत्रण आणणं, दारू, डान्सबार, शस्त्रे यांची उपलब्धी, विक्री अशा गोष्टी रेव्हेन्यूकडे न पाहाता त्यावर कठोर नियंत्रण आणणं अशा अनेक महत्त्वाच्या व दूरगामी उपायांचा विचार, अंमलबजावणी त्यांच्याकडून अपेक्षित आहे. ही प्रगल्भता न दाखवता तापल्या तव्यावर पोळी भाजण्याची त्यांची धडपड पाहाताना तीव्र निराशा, संताप, उद्वेग दाटून येतो.
महिलांची असुरक्षितता, त्यांच्यावरील अत्याचार हे प्रश्न समाजातल्या सर्व स्तरांत व जगातील सर्वच देशांत आहेत. स्त्रियांनी वयाच्या ३० वर्षापूर्वी अरब देशात नोकरीला जाण्यासाठी नेपाळने बंदीच घातली आहे. आता तर सौदी अरेबियात `नो मॅन्स लॅन्ड'ची निर्मिती सुरू आहे, ज्या बेटावर फक्त महिलाच असतील व तिथे त्या सर्व प्रकारची करिअर करू शकतील. अशा प्रकारचे टोकाचे व एकांगी उपाय आपल्यासारख्या देशाला निश्चितच भूषणावह असणार नाहीत. आपले पुरोगामी विचार व संस्काराचा बळकट पाया या दोन्ही गोष्टींचा संगम साधता आला तर या विकृतींना आळा घालणे आपल्याला शक्य होईल.
मुंबईत काही दिवसांपूर्वी रझा अकादमीच्या कार्यक्रमाला हिंसक वळण लागले. त्यानंतर एका झोपडपट्टीच्या शाळेत शिक्षिका मुलांना आपत्ती व्यवस्थापन शिकवत असताना तिने या मोर्चाचे उदाहरण मुलांना दिले. मुलांनी एकदम `हाँ, हमे मालूम हैं, हम भी थे ना वहाँ..' असं सांगायला सुरुवात केल्यावर ती हादरली. तिने आपलं सांगणं थांबवून मुलांना प्रश्न विचारून बोलतं केलं. शालेय मुलांचा वापर त्या दंगलीत झाला व मुलांना ही तोडफोड, दगडफेक म्हणजेच दंगल आहे हेही माहिती नव्हतं. यावर त्या शाळेच्या प्रशासनानं फार सूज्ञ पावलं उचलली. त्यांनी मुलांच्या पालकांना बोलावून समज देणे वा मुलांना काढून टाकणे हे उपाय अवलंबले नाहीत. मुलांनी कधीतरी `टीचर हमारेभी घर आओ ना कभी...' असं म्हटलेल्याचा धागा पकडून त्या वस्तीत जायला सुरुवात केली आहे. त्यांचा प्रयत्न सुरू आहे मुलांना चांगल्या विचारांच्या जवळ आणून त्यांच्यातलं माणूसपण जपण्याचा.
अन्य सगळया उपायांबरोबरच अशी चांगल्या विचाराची पेरणी करणारेही पुढे यायला हवेत. चंगळवादाच्या, वासनांच्या थैमानाला असे यथाशक्ती छोटे छोटे बांध आपणच घालायला हवेत.नुसतं `चांगलं व्हावं' असा विचार मनात असून उपयोग नाही. वाईट विचार, शक्ती या त्यांच्या कृतीनं दहशत निर्माण करत असताना आपण नुसतं मनातल्या मनात खूप चांगलं असणं पुरेसं नाही. प्रदर्शनीय, उपभोग्य वस्तूसारखा वापर होणं स्त्रीला खटकायला हवं. तिनं अशा प्रत्येक प्रसंगी उग्र रूप धारण करायला हवं. स्त्रीच्या अब्रूचं रक्षण न होणं हा पुरुषांनाही आपल्या पुरुषार्थाचा अपमान वाटायला हवा. निर्लज्ज राजकारणी, ढिसाळ अन् भ्रष्ट पोलीस, संथ न्याय व्यवस्था, उदासीन नपुंसक बघे, आणि फक्त स्वत:च्या वासनेकडे पाहाणारे पिसाट अत्याचारी यांच्या दुष्कृत्यांना सगळा देशच बळी जातोय. अशा वेळी हे सज्जन, सुसंस्कृत `सामान्य' माणसा, आता तुलाच बदलायला हवे...!
-विनिता तेलंग (चलभाष : ९८९०९२८४११)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन