Skip to main content

Sampadkiya in 7 Jan.2013


तणावाच्या आधारे पुढे जाऊ
पाहता पाहता पुन्हा एक नवीन वर्ष सुरू झाले, आणि त्यातलाही आठवडा संपला. पोराटोरांनी गरगटलेले रस्ते किंवा रतीब टाकावेत तसे कुणीतरी पाठविलेले `एसेमेस' वगळता वर्षस्वागताच्या उत्साहाची कारंजी यंदा जरा मंदच उडाली. िख्रास्मसपासूनच त्याची उभारी फसफसत यायची, तशी यावेळी जाणवली नाही. कोण्या दामिनीच्या मूक बळीसाठी तरुणाईने हाती घेतलेल्या मेणबत्त्या विझल्या, तरी त्या विषयी मनांतली खदखद शमलेली नाही असे दिसते. या तरुण संवेदनशीलतेचेही प्राप्त परिस्थितीत समाधान वाटू शकेल. पण याच उदासमनस्कांचे `मार्केट' मिळविण्यासाठी `त्या'च प्रकारच्या अत्याचारी बातम्यांचा ओघ वाढल्याचेही दिसते. त्या माध्यमांनी उसन्या उत्साहाने `चला मजेत जगूया', `तणावमुक्ती', `संकल्प-सिद्धी' असे विषय नव्या वर्षाचे म्हणून समोर फेकायला सुरुवात केली तरी त्यामुळे स्फुरण चढल्याचे कुठे जाणवत नाही.

अशा मानसिकतेचे कारण म्हणून एका संशोधक-विचारवंताचे नवे प्रतिपादन काही वृत्तपत्रांनी चांगल्या रितीने प्रगट केले आहे, त्याची दखल घ्यायला हवी. हा विचार तसा आपल्याला नवा नाही, तो श्रीकृष्णांनी कधीच प्रगट केला होता. परंतु त्यास केवळ तत्त्वज्ञान, चिंतन, बोधस्वरूप असल्यामुळे ते पोथीनिष्ठेने वाचले गेले. पाश्चात्य प्रयोगशीलतेने त्यास सर्वेक्षण-निरीक्षण-आकडेवारी-निष्कर्ष अशा खटाटोपात बांधले असल्याने ते आजच्या काळास सुसंगत आहे. त्यांतून मानवाच्या विचार-प्रक्रियेचा काही धागा जुळवता येतो. आणि या अनंत विश्वाच्या ब्रह्मांडव्यापी काळगणनेपैकी एका मानवी वर्षारंभाचा उत्साह त्याद्वारे मोजण्याचा प्रयत्न करता येतो.

शॉन अॅकॉर याने जागतिक मंदीच्या संदर्भात केलेल्या संशोधनात जे उपाय हाती लागले ते पूर्णत: मानवी मनाशी संंबंधित आहेत. `लढत राहणे, लोकसंग्रह करणे व वृत्ती प्रसन्न ठेवणे' ही तीन महत्त्वाची तत्त्वे त्याने मांडली. हजारो व्यक्तींच्या मुलाखती, प्रबंधांचा अभ्यास, उद्योगांच्या कार्यपद्धती यांच्या मंथनातून त्याच्या हाती लागलेले नवनीत हे होते की, यशस्वितेची पूर्वअट `प्रसन्नात्मेंद्रिय मन:' ही आहे!

मानसशास्त्र असे सांगते की, मानवी शरीराच्या प्रतिक्षिप्त क्रिया वा मेंदूच्या विचारप्रक्रिया यांच्या मुळाशी `भय' आहे. भोवतीच्या घडामोडींतून शरीराला धोका असणाऱ्या गोष्टी निवडून त्यावर मेंदू प्रथम लक्ष केंद्रित करतो. समस्यांकडे प्रथम लक्ष देणे, त्याला सुरक्षिततेसाठी आवश्यक वाटते. पण हळूहळू मेंदूच्या या प्रवृत्तीमुळे आपल्याला सकारात्मक गोष्टींपेक्षा नकारात्मक गोष्टीच पाहायची सवय लागते. आपली भीतीची केंद्रे आधी उद्दीपित होतात. भयाच्या वातावरणात सृजनशील विचार, समाधान, कार्यक्षमता या भावना, आणि सद्वृत्ती निर्माण होत नाहीत. त्या होण्यासाठी, योग्य निर्णय वेळेतच घेण्यासाठी मन शांत, स्थिर, प्रसन्न असावे लागते; असे तो शॉन सांगतो.

एक मजेदार निरीक्षण त्याने नोंदवले की हल्ली ताणतणाव नियोजन, तणावांचे दुष्परिणाम वगैरे गोष्टी सतत बोलल्या जातात. त्यामुळे `आपल्यावर तणाव आहे की काय...' या कल्पनेचाच माणसाला खूप ताण येतो! त्यासाठीही त्याने रीतसर प्रयोग वगैरे केले आहेत. तणावाच्या दुष्परिणामांवर सतत विचार करण्यापेक्षा त्यांना आनंदाने, युक्तीने हाताळले तर तणाव दूर ठेवण्याचे मार्ग सापडतात व यश मिळवता येते. हे त्याने अनेक प्रकारे अभ्यासातून सिद्ध केले. हे साध्य करण्यासाठी काही सोपे मंत्र सांगितले `दररोज सकाळी तुम्हाला मदत करणाऱ्या घटकांची आठवण करा. सकाळी इतरांना आनंद देणारी एखादी कृती करा. किमान दहा मिनिटे छान व्यायाम करा. अस्वस्थ वाटेल तेव्हा दिवसातून केव्हाही तीन मिनिटे फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. मित्रमंडळींच्या सहवासात रहा. लोकसंग्रहातून उर्जा मिळवा.' उद्योजकांच्या एका गटावर याप्रमाणे प्रयोग करून त्याने हे सिद्ध केले की, याप्रमाणे वागल्याने त्या सर्वांची शारीरिक व मानसिक कार्यक्षमता कित्येक पट वाढली व ती दीर्घकाळ टिकूनही राहिली.

मेंदूला सकारात्मक विचारांची सवय लावता येते. त्याचे परिणाम उत्तम दिसतात हे त्याला दाखवायचे होते. काही अतिप्रचंड यशस्वी उच्चाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या पाच महत्त्वाच्या घटना/यशाचे प्रसंग आठवायला सांगितले. त्याला असे दिसले की या सर्व वेळी सर्वांनी खूप तणावपूर्ण परिस्थितीचा सामना केला होता.

काही मिळवायचे तर काही सोसावे लागतेच. मग आपण त्याचा एवढा बाऊ का करतो? संशोधनाने, आकडेवारीनिशी, त्यातही अमेरिकन शास्त्रज्ञांनी सांगितलेले तत्त्वज्ञान आपल्याला लगेच पटते! तंतुवाद्ये वा तबला, मृदंग ही तालवाद्ये यांना नीट, सुरात बोलायला लावायचे तर त्यांच्याही खंुट्या पिळाव्या लागतात. सतारीची तार, तबल्याचा पृष्ठभाग पुरेसा ताणलेला असावा लागतो. झाडांना भरपूर खतपाणी देऊन तृप्त केले तरी शेवटी त्यांनाही `ताण' द्यावा लागतो; शेतकरी त्यांचे पाणी पूर्ण तोडतो. ताण चांगला बसला तर झाड चांगले मोहरते, बहरून येते. माणसाचेही असेच आहे. अनेकदा प्रतिकूल परिस्थितीच माणसाकडून त्याच्या पूर्ण क्षमतेने काम करवून घेते. अनेक कलावंतांचे त्यांच्या पूर्वआयुष्यातील सोसणे हीच  त्यांची शक्ती बनली हे आपण जाणतोच.

`सोस रे तू सोस जीवा, सोसण्याचा सूर होतो' ही ओळ वाचली तर कानात जीवघेणा दर्दभरा आवाज गुंजायला लागतो. गायिकेच्या आयुष्यातले सोसणे, तिची वेदना त्या आवाजातून काळजाला भिडते. पण काही गायक-गायिकांची अतिशय आनंदी, अवखळ गीतंही तितक्याच प्रसन्नतेने आत भिडतात याचे कारण त्यांची प्रसन्न वृत्ती!

शरीराला सवयीच्या `कम्फर्ट झोन'मधून बाहेर आणण्यापुरता, मनाची संवेदनशीलता जिवंत राहाण्यापुरता, थोडासा `ताण'च नव्या वर्षाकडे मागावा काय? नाहीतरी हेच वातावरण, हीच दगदग आपल्यासोबत असणार आहे. त्यांचाच वापर करून, थोडी वृत्ती बदलून पाहावी, आपलेही व्यक्तिमत्त्व येत्या वर्षी झाडासारखे बहरून येते का!

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन