Skip to main content

Lekh in 31 Dec.2012


आठवी माळ
किर्लोस्करवाडीला नेहमीप्रमाणे कामाकरिता गेलो होतो. पक्षांचा किलबिलाट, मोरांचे ओरडणे, फुलांचा सुगंध, सुखावह पहाटेचा गारवा अशा वातावरणात फिरण्याचा वेगळाच आनंद वाडीत मिळतो. तो आजही मिळाला. मंदिरात दर्शन घेणे हे पण सवयीचेच. लक्ष्मीच्या गाभाऱ्यात आज विशेष रोषणाई होती, नवरात्राची आठवी माळ. नाना प्रकारची फुले, समया, पणत्या, अगरबत्तीचा सुगंध अशा प्रसन्न वातावरणात लक्ष्मीचं दर्शन घेताना छान वाटत होतं.
साडेआठ वाजता ऑफीसमध्ये गेलो. थोड्याच वेळात बाहेर जायचंय; कागदपत्रांची जुळवाजुळव चालू होती. तेवढ्यात आमचा सहकारी अमोल जोशीनं आठवण केली, `आज सकाळी आपल्याला सुधाकर पाटीलच्या घरी जायचं आहे ना?'
`खरंच की! सांगून ठेवलंय म्हणजे जायलाच हवं.....बरीच वर्षं झाली. कसा असेल तो सुधाकर?..

अठरा वर्षांपूर्वीचा काळ डोळयापुढे आला. मी ऑफीसातल्या कामात मग्न होतो. माझ्या साहायकाचा फोन आला, `भेटायला कोणी आलं आहे.' दार उघडून एक गृहस्थ आत आले. डोळयावर काळा चष्मा आणि हातात पांढरी काठी, म्हणजे दृष्टी नाही हे लक्षात आलं. मध्यम वयाचा माणूस. ``सर, मी नॅबचं (नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंर्ड) काम करतो. जवळच्या रामानंदनगरात एक आंधळा-मुका-बहिरा मुलगा आहे. त्याचं नाव सुधाकर पाटील. त्याला आम्ही नवीन पिठाची गिरणी घेऊन दिली आहे. त्या गिरणीचा नारळ आज आपल्या हस्ते फोडायचा आहे. तुमचा फक्त अर्धा तास घेईन. प्लीज नाही म्हणू नका.'' मला काही म्हणायला वावच नव्हता. चहा घेतला आणि गाडीची व्यवस्था करण्यास माझ्या साहायकास सांगितले. आंधळा, बहिरा, मुका मुलगा पिठाच्या गिरणीवर कसा काम करणार? असे प्रश्न मनात होते. ते तसेच ठेवून गिरणीचा शुभारंभ केला, आणि शुभेच्छा देऊन परत आलो. कामाच्या व्यापात हे सगळं काळाच्या पडद्याआड गेलं.

आज इतक्या वर्षांनी आपण त्या मुलाला भेटायला जाणार, या कल्पनेनं हुरहुर वाटत होती.
त्याच्या आईनं कौतुकानं आम्हा तीन-चार जणांचं स्वागत केलं. सुधाकरला हाताला धरून पुढ्यात आणलं. चाहूल घेत सुधाकरनं वाकून नमस्कार केला. सुधाकरचा पूर्वीचा चेहरा आठवला. ``त्याच्याकडे आतापर्यंत तीन चक्कीयंत्रे झाली. तो सराईतपणे मशीन चालू करतो. दळण चाचपडून टाकतो. पिठाचा कमीजास्त बारीकपणा `अॅडजेस्ट' करतो. झालेलं पीठ भरून पिशवीत किंवा डब्यात ओतून ठेवतो. व्यवस्थित पैसे घेतो... अशी सगळी कामं नीटनेटकी करतो. उधारी असेल तर दळण घेऊन गेलेली व्यक्ती उजवीकडे की डावीकडे गेली यावरून ती कोण असेल हे पण तो खुणेने सांगतो...'' सगळं सगळं त्याची आई तोंड भरून कौतुकानं आम्हाला सांगत होती. तिला अगदी भरून आलं होतं.
``साहेब, सुधाकर कसलीच अडचण जाणवून देत नाही. घरातील सगळी कामं तो करतो. त्याला मदत केलेली आवडत नाही. लाडू छान अगदी गोल एकसारखे वळून देतो. अहो, तो शिलाई मशीनवर बसून एकसारखी टीप मारतो, सुईमध्ये दोरा ओवून घेतो आपला आपण! त्याला दिवाळीसारखा सण आलेला कसं कळतं, माहीत नाही. पण ते दिवस आले की `लाडू करूया, करंज्या करूया' असं खुणावत पदर धरून माझ्या मागं लागतो.'' केवढं कौतुक त्या मातेला! आम्ही सगळे थक्क होऊन ऐकत होतो. स्पर्श आणि गंध एवढेच जगाचे ज्ञान त्याला! असा हा मुलगा हे सगळं करतो कसं? त्याला कधी इजा होत नसेल? मशीनची भीती वाटत नसेल? माझ्या मनात नुसतं काहूर माजलं होतं. समोर सुधाकर शांत बसला होता. बाहेरच्या गप्पांमध्ये चेहऱ्यावरचे हावभाव तो कसे बदलणार?
त्याच्या आईनं बोलता बोलता कॉफीचे कप आणले. आत त्यांच्या सुनेनं कॉफी केली होती. सुधाकरचा भाऊ प्रमोदपण शेजारी बसला होता. तो बराचसा आंधळा होता. तो टेलीफोन बूथ चालवतो. गोळया, बिस्किटे... अशा वस्तू विकतो. मोठा चलाख आहे. तो तर आमच्यासारखा वावरत होता. आमच्या गप्पात भाग घेत होता. ``प्रमोदचं लग्न झालंय. आमची सून छान आहे, प्रेमळ आहे, सर्वांचं मनापासून करते. प्रमोदला एक मुलगा आहे. तो हुशार आहे. त्याला चौथीला स्कॉलरशीप मिळाली होती'' माऊलीचं सांगणं चालू होतं. केवढं कौतुक! आनंद ओसंडून वाहात होता. प्रमोदही भावाची माहिती सांगत होता. दोघं जवळ जवळ बसले होते पण एकमेकांना नीट दिसत नव्हते!
सुधाकरच्या आईने आणखी एक धक्का दिला. ``मला एक मुलगी आहे साहेब. ती पण इथेच असते. तिची मुलगी एकदम गोड व हुशार आहे. दोघं नातवंडं आत्ता शाळेत गेली आहेत.'' नंतर कळलं, मुलीचं लग्न झालं, दोन तीन वर्षात एक मुलगी झाली. पण लवकरच तिचे यजमान वारले. सासरच्यांनी सुनेला सांभाळलं नाही. मुलीला घेऊन बिचारी आईकडे आली. इथेच राहते, प्रिंटींग प्रेसमध्ये नोकरी करते व कुटुंबाला हातभार लावते. नणंदा-भावजया गोडीने राहतात. सर्वांच्या कष्टावर हे कुटुंब छान आनंदात राहते आहे. घरात चटणी करण्याचंं मशीन आहे. शेवयाचं मशीन आहे. सगळे उद्योग सगळेच करतात, आनंदात राहतात. अठरा वर्षांपूर्वीचा मी नारळ फोडला तो फोटो सुधाकरच्या आईनं काढून दाखवला. नातवंडांचे फोटो दाखवले. केवढं कौतुक होतं सगळयाचं. `सुधाकर-प्रमोद यांचे वडील पूर्वी वाडीच्या कारखान्यात होते, त्यांना ऐकायला कमी येत असे. ते मधुमेहानं वारले. शांत होते' असा उल्लेख बाइंर्नी केला.

निरोप घेऊन आम्ही बाहेर पडलो. करीत असलेल्या कामांबद्दल मुलांचे फक्त कौतुक, लेक आणि सून दोघींबद्दल मोठं प्रेम, चार चांगल्या गोष्टी आणि प्रत्येकाने स्वतंत्र उद्योग सांभाळल्यामुळे वाटणारं समाधान...तास-दीड तासाच्या बोलण्यात त्या मातेने एवढंच व्यक्त केलं. एकही नकारार्थी शब्द नाही. `आमच्याच पदरी असं का?' ही तक्रार केली नाही. स्वत:ला काही कमी आहे याचा नुसता उल्लेखपण नाही. `माझंच मेलीचं नशीब खडतर' हा आततायी विचार तिनं आपल्या मनाला शिवू दिला नाही.

मला सकाळच्या लक्ष्मीच्या दर्शनाची आठवण झाली. खरं म्हणजे हीच खरी लक्ष्मी. नवरात्राची आठवी माळ मी नकळत याच मातेला घातली. मनोमन मोठ्या समाधानानं तिला नमस्कार केला. `धन्य तू जगदंबे, तुझ्याचसाठी प्रार्थना करण्याचं बळ मला दे' असं म्हणत त्या माऊलीचा निरोप घेतला.
***
- एम. डी. देशपांडे, पुणे (सेल नं. ९८८१४७६६६८)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन