Skip to main content

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो
खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्या उमेदीच्या भरात ते जाणवत तरी नाही. `यामागे तुमच्या प्रेरणा कोणत्या?' या मुलाखतछाप प्रश्नाला काही उत्तर नाही. `सहज म्हणून ते झालं' असेही नाही; त्यात अडचणी, घोळ, तापत्रय, नुकसान, वैताग हे सगळे होतेच. तरीही आपण काहीतरी चांगले करायला हवे या ईर्ष्येपोटी, चांगले म्हणून `हे' करत राहणे, इतकीच ही गोष्ट झाली.
तीन तपांची ही वाटचाल एक प्रकारे समाधान देऊ शकते, तथापि त्यास तपश्चर्येचे सामर्थ्य नाही हे मान्य करायला हवे. बारा वर्षांच्या कालावधीस तप म्हणायचे, तर तो काळ एका नियत हेतूसाठीच्या अनुष्ठानाचा असायला हवा. त्या अर्थाने पाहिले तर तीन तपांचे पुरश्चरण घडल्याचा दावाही करता येत नाही. उलट असा एकच एक मंत्र, एकच एक नाम उच्चारत राहण्याने कुणाला काही सामर्थ्य प्राप्त होत असेल तर असो; पण `आपले जग'ला तेही साधले नाही,- साधावेसे वाटले नाही. सभोवतीच्या सामाजिक वृक्षवल्लींचा नित्यनूतन पालव किंवा पानगळ आस्वादत चालत राहावे, यात फार मोठेपण नाही; पण इतर कुणी त्यास अगदीच अव्हेरावे असे नाही. अंकुराचा अस्फुट कोंभ जेवढ्या सहजतेने स्वीकारावा, त्याच सहजतेने शुष्ककाष्ठही अनुभवावे एवढे मात्र सांभाळले गेले. त्यामुळेच कदाचित, छत्तीस वर्षांची-एका आयुष्यात प्रदीर्घ म्हणावी तेवढी वाट सरली.
यानिमित्त प्रकाशित होणाऱ्या अंकासाठी अनेक चांगल्या प्रतिक्रिया व शुभचिंतने मिळाली. त्या सर्व शुभद भावनांचा स्वीकार करण्यात आनंद आहे. `आम्हाला लिहिते केले', `नवी दृष्टी दिली', `आमच्या कारकीर्दीचा प्रारंभ इथे झाला', `विधायकतेचा विश्वास दिला', `संघटनात्मक बळ दिले', `एकत्र आणले', `स्पष्ट मतप्रदर्शन मिळाले'.... अशा प्रकारचे कोणी कोणी काय काय म्हणते; तो त्यांचा मोठेपणा म्हणायचा. हे म्हणण्यात किंचिन्मात्र दांभिक विनय नसून वस्तुस्थिती आहे. भुईवरचे ओझे डोईवर उचलून देण्यासाठी कुणीही वाटसरू मदत करतो, प्रांजळपणे पुढची वाट सांगतो. तेवढ्यालाही थँक्स म्हणण्याचा रिवाज अलीकडच्या सभ्यतेत आहे; `आपले जग'ला ते सहज कर्तव्य वाटले. त्यात मोठेपणा कसला?
इतक्या सहजभावाचा अवलंब प्रारंभकाळापासून केला गेला आहे. १२ फेब्रुवारी १९७९ च्या पहिल्या अंकात नमूद केले आहे की, ``वृत्तपत्रे आणि त्यांची मते यांचे स्वातंत्र्य आपण उपभोगतो आहोत.... मतामतांच्या गलबल्यातून काही चांगले घडावे म्हणून केलेला हा प्रयत्न...'' तर आठ वर्षांनी ९ फेब्रुवारी १९८७ च्या संपादकीय मनोगतात म्हटले की, ``वृत्तपत्रांनी पुढारीपण मिरविणे किंवा समाजाला वळण लावतो म्हणणे हा जमाना संपला आहे.... वृत्तपत्री सामर्थ्याची भाषा दुबळी किंवा बरीचशी पोकळ झाली आहे.... कशासाठी तरी प्राण पणाला लावण्याचे दिवसही मागे पडले. मरून जाण्यानं प्रश्न मिटत नाही, त्याचप्रमाणे भिऊन लढाई टाळण्यानेही मिटत नाही. वृत्तपत्र बंद पडू नये; पण ते जगण्यासाठी बेतालही होऊ नये. `आपले जग'च्या यशापयशाचा निर्णय त्या निकषावर करावा. `प्रयत्न चांगला' इतपत दावा तरी निश्चित करू!'' हाच सहज दृष्टिकोण ३६ वर्षे सांभाळता आला, हेही स्वत:शी धन्य मानता येईल, पण ज्यांना त्यांतून काही मिळाले (असेल) त्यांच्यासाठी योजून काही करता आलेले नाही, हे वास्तव आहे.
यापुढचा काळही फार वेगळा नसेल. एक `कार्य' म्हणून ते करत राहावे हे तर खरेच. पण ते `जन्मजन्मांचे अंगीकृत' वगैरे म्हणता येत नाही. जमेल तेवढे, जमेल तसे करीत राहण्यात जोवर आनंद आहे तोवर ते चालेलच. उगीच छत्तीसाव्या वर्षातच शताब्दीची चर्चा कशाला? आपण सर्व ज्या सन्मार्गाचे प्रवासी आहोत, त्या सर्वांना चालत राहण्याचेच समाधान असणार. मुक्कामाला पोचलो तर सन्मार्गही संपतोच!
-वसंत आपटे (कार्यकारी संपादक)

मुलांना घोडा बनवाल की गाढव?
अन्न-वस्त्र-निवारा यानंतर शिक्षण ही माणसाची मूलभूत गरज असते. उपजत जिज्ञासेला उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नांस शिक्षण म्हणतात. परंतु `तयार उत्तरे' देण्याच्या प्रयत्नांत मुलांची जिज्ञासा संपते व केवळ पदव्या वाटणारी एक व्यवस्था निर्माण होते. शिक्षण या प्रक्रियेत बालक-पालक-शिक्षक हे तिन्ही घटक महत्त्वाचे असतात. मुलांचे शिक्षण आनंददायी होण्यासाठी प्रयत्न म्हणून सांगलीत गेल्या महिन्यात `लुल्ला चॅरिटेबल ट्न्स्ट'च्या वतीने एक प्रकल्प राबविण्यात आा. शिक्षणक्षेत्रातील काही अनुभवी मंडळींचे मार्गदर्शन झाले. त्याचे संकलन....
शिक्षण घेऊन एक पिढी गाढव बनली, आणि आता नवी पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे. परीक्षेत शंभर टक्के मार्क पाहिजेत, कराटे क्लासमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवायचा आहे. नंतर डान्स क्लास करायचा, भगवद्गीता स्पर्धेत जायचं आहे. तिथं फर्स्ट प्राईझ मिळालंच पहिजे!! मग चित्रकलेची परीक्षा असते. तिथून बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला.... संगीत विशारद बनायला! अल्बर्ट आईनस्टाईन बनवून देणारी मल्टीनॅशनल स्कूल आली, पण अल्बर्ट हा `आईनस्टाईन' बनण्यासाठी शाळेत गेला नव्हता. एक अमिताभ बनला तर हजारो अॅक्टींग स्कूल उभ्या राहिल्या. पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही स्कूलमध्ये गेला नव्हता. आता लवकरच मोदी तयार करणाऱ्या शाळा उभ्या राहतील आणि पालक लाखो रुपये फी भरून त्यात मुलांना पाठवतील. आज मुलाच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च एका वर्षाला होतो, तितके रुपये त्याच्या पालकांना संपूर्ण शिक्षण घेण्यासाठीसुद्धा लागले नव्हते. पण पालकांना वाटतं की, `आपल्याला त्यावेळी जमलं नाही तर पाल्यानं जमवावं.' म्हणून ते पळतात, मुलांना पळवतात. आता भांडवलदारांनी शाळा सुरू केल्या आहेत, मागणी तसा पुरवठा तत्वावर पालकांना आपल्या मुला-मुलीला रेसचा घोडा बनवायचं आहे. मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात झाली. दप्तराचं आणि अपेक्षांचं ओझं वाहणारी मुले म्हणजे चालती बोलती प्रेते बनत चालली आहेत. ती जरा शुद्धीवर आली की, `थहरीं ळी ीिंर्रीीश ेष १२?' असं विचारून त्यांचं बालपण चिरडून टाकतात.

श्री.मोदी यांनी मुलांना एक प्रश्न केला होता, `तुमच्यापैकी कितीजण घाम गळेपर्यंत खेळतात?' तेव्हा एकाही मुलाने हात वर केला नाही. कारण आता मुले ए.सी.मध्ये जन्म घेतात, ए.सी.मध्ये वाढतात. चिप्स खातात, सॉफ्ट डिं्न्क पितात आणि मोबाईलवर गेम खेळत बसतात. ऊन, पाऊस, वारा यांच्याशी संबंध येत नाही. पडणं, लागणं, खेळात हरणं माहीतच नाही. स्कूलबस आली नाही तर शाळेपर्यंत चालत जाण्याची ताकद मुलांमध्ये नाही. वय ६ वर्षे होत नाही तर डोळयाला चष्मा लागतो. हातापायांच्या एकतर काड्या होतात नाहीतर लठ्ठपणा वाढतो. शारीरिक कष्ट संपले ज्यामुळे मुले दुबळी होत जातात. भारत लवकरच डायबेटीसचे सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनणार आहे, असे आरोग्यशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सोबत इतरही विकार येत आहेत. यंत्रणा स्वत: काम करते. म्हणून ताज्या भाज्या, भाकरी खाणारी माणसे शंभर वर्षे जगली आणि हे माहीत झालेली माणसे साठ वर्षे जगतात.... तेही अनेक रोग सोसत, औषधे घेऊन!

खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन न केल्यामुळे मुलांना मानसिक कमतरता जाणवते. संघर्ष माहीत नसतो आणि टीम वर्क कळत नाही. मित्र फक्त व्हॉटस्अप, फेसबुकवर भेटतात. प्रत्यक्ष नाही! सुख-दु:खाची देवाणघेवाण नाही आणि मित्राचा-मैत्रिणीचा मानसिक आधार नाही. दिलखुलास हसणे आणि ओक्साबोक्शी रडणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. ह्या दोन्ही क्रिया मुलांना करता येत नाहीत. आपोआपच, जरा मनाविरुद्ध घडलं की लहान मुले-मुली त्रागा करतात. बरीच एकुलती एक मुले दुसऱ्याशी जमवून घेण्याची सवय नसल्यामुळे पुढे लग्न झाल्यावर वर्षभरात घटस्फोट घेतात. ज्या मुलांना बहीण नसते, चांगली मैत्रिण नसते, त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोण संकुचित बनतो. ह्या उणीवांचा शिक्षणात विचार केलेलाच नाही.

भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षणतज्ज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरू झाला. मोठे उद्योजक, पुढाऱ्यांनी शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली. एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जिवाच्या अॅडमिशनची तयारी सुरू होते. मूल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवायची तयारी सुरू होते. आता मुलाने बोलायला सुरुवात केली की थेट ए = चल२ म्हणायचं बाकी राहिलं आहे. अशी मुले सर्व फॉर्म्युला पटापट म्हणून दाखवतील पण स्वत:चा फॉर्म्युला कधीही शोधू शकणार नाहीत. गिटार शिकतील पण स्वत:ची संगीतरचना करू शकणार नाहीत.लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, मेरी कोम यांचं अनुकरण अचूक करतील. पण स्वत:ची ओळख निर्माण करणार नाहीत. कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं. जगायची कला, गीत-संगीतातील आनंद, निसर्गसंपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार, साहित्य याला बाजारू किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय, त्यात ते पारंगत होत आहेत. पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल पण ना स्वत: जगण्याचा आनंद लुटू शकतील, ना दुसऱ्याला जगण्याची मजा मिळू देतील.

अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये शाळेत ए.सी.लावत नाहीत. तिथे मुलांना घोकंपट्टीपेक्षा प्रॅक्टीकलवर भर देतात. `वृक्ष-वेली स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात, त्या प्रक्रियेला काय म्हणतात?'... असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात. त्या रोपांची-वेलींची जोपासना करायला लावतात. `निप्पोन टेक्नॉलॉजी'ने केलेल्या तपासणीत म्हटले आहे की, शाळेच्या आवारातील वेलींमुळे तापमान चार अंश कमी झालं आहे आणि मुलं पाना-फुलांसोबत भावनिक नातं जोडू लागली आहेत. जर्मनी मुलांना ट्नन्सफरन्स शिक्षण देते. तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेऊन दुसरीपर्यंत लेखन करू देत नाहीत. पाचवीपर्यंत प्रॅक्टीकल चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका, प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल ह्याची सतत तपासणी होते. दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्राचं प्रशिक्षण देतात. सगळे एकदम सायन्समध्ये भरत नाहीत. अनावश्यक विषय शिकवत नाहीत. चीन हा सायकलप्रेमी देश चार वर्षाच्या मुलांना सायकल चालवण्याचं शिक्षण देतो. त्यानंतर थेअरी कमी आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात. प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालविणार याचा विचार नेदरलॅन्डसारखा देशही करतो. एकाच विद्यार्थ्यावर सगळया विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषय आणि क्लासचा मारा सोसण्याचं काम केवळ भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते.

शिक्षण काय असतं?
टागोरांची `शांतिनिकेतन' शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई. एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्यासमोर पुस्तकात डोकं खुपसून बसले होते, आणि उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती. कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध घेत फिरत होता. तेवढ्यात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय?-गुरुदेव शांतपणे बसले होते, त्यांच्यापुढे फक्त चार मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले हसण्या-नाचण्यात रमली होती. पालक महाशय टागोरांना म्हणाले, ``या नाचणाऱ्या-बागडणाऱ्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का?''
टागोर म्हणाले, ``चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणाऱ्या मुलांची नाही, तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या या मुलांची! ही मुले खेळण्या-बागडण्याच्या वयात मोठ्या माणसांसारखी वागत आहेत. ती मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. खरं तर मलाही झाडावर चढावंसं वाटतं. पक्ष्यांशी बोलावंसं वाटतं. भरपूर खेळावंसं वाटतं. पण माझं शरीर आता साथ देत नाही.''
टागोर जगण्यासाठी शिकवत होते, आता शिकण्यासाठी जगावे लागते आहे.
जास्त ज्ञान, जास्त कला घेऊन मुले धावत असतात आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात!
.... मग एक रेस सुरू होते आणि जगायचं राहून जातं...!!
(इंटरनेट सेवा)

लुल्ला चॅरिटेबल ट्न्स्ट, सांगली शिक्षण संस्था, रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅली, सांगली आणि ज्ञानप्रबोधिनी, पुणे यांच्या सहयोगातून आयोजित केलेल्या `शिकू आनंदे' प्रकल्पाच्या समारोप दिवशी महाराष्ट्नतील तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. त्या व्याख्यानांचा सारांश....
विद्यार्थ्यांसाठी सत्र

आनंद फुलविता येतो 
- प्रकाश पाठक, धुळे
 `शिकू आनंदे' या कार्यक्रमाद्वारे शिकण्यातला आनंद शोधण्याचा प्रयत्न आहे. शाळेत आपण अनेक विषय शिकतो. ते गरजेचेही आहे; फक्त या प्रक्रियेत हरवलेला आनंद कसा शोधता येईल, तो शोधण्यासाठी विद्यार्थी म्हणून काय करायला हवे, काय करू शकतो याचा विचार हवा. शाळेत वेगवेगळया इयत्तांमध्ये इतिहासातल्या विविध घटना, जसे-गड आला पण सिंह गेला, शाहिस्तेखानाची फेजती, अफजलखानाचे युद्ध- इत्यादी शिकतो; बाजीप्रभू, तानाजी किंवा भूगोलाच्या तासाला कोलंबस वा वास्को डी गामा वगैरे शिकतो, पाठ करतो. गणिताची, विज्ञानाची सूत्रे शिकतो. म्हणजेच मी ती निव्वळ पाठ करतो, लक्षात ठेवतो. मी जेव्हा वर्गात एखादी गोष्ट शिकतो तेव्हा त्यामागचा आशय, भूमिका, त्यामागचे तत्त्व मला समजून घेता यायला हवे. तानाजीने गड सर केला हे समजलं, पण त्याची त्यामागची तळमळ कशी होती, त्याचे विचार काय होते हे जो समजून घेतो, तो विद्यार्थी! जो हे समजून घेऊ शकत नाही, त्याला त्या नेमक्या आकलनापर्यंत जो घेऊन जातो, तो खरा शिक्षक!!
विख्यात शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर त्यांचे शिक्षक श्री.भावे सर यांच्याबद्दलची आठवण सांगतात. एकदा भावे सरांनी, भिंगाच्या साहाय्याने सूर्यकिरण कागदावर पाडून कागद जाळणे हा प्रयोग वर्गात शिकवला. त्यानंतर मधली सुट्टी होती. नंतर त्यांना दूर झाडाखाली एक विद्यार्थी उदास बसलेला दिसला. सरांनी त्याला बोलावून घेतलं नाही; सर स्वत: त्याच्याजवळ गेले! तो विद्यार्थी (माशेलकर) विमनस्कपणे बसलेला पाहून सर म्हणाले, ``तुला प्रयोग समजला नाही का?'' त्याने-रघुनाथने-सगळा प्रयोग धडाधडा म्हणून दाखवला. सर म्हणाले,``मग तुला तो उमगला नाही का? कारण तुझ्या चेहऱ्यावर मला आनंद दिसत नाही. तुला घरी काही अडचण आहे का?'' त्याने अडचणी सांगितल्यावर ते म्हणाले, ``आता मी तुला हा प्रयोग उमगणं म्हणजे काय ते सांगतो. मनाची एकाग्रता, निश्चय, निर्धार म्हणजे सूर्यकिरण; परिस्थिती म्हणजे कागद; तुझ्या सर्व क्षमता, मनाचा निर्धार एकवटला तर परिस्थिती जळू शकते हे या प्रयोगातून समजून घे....'' अत्यंत गरिबीत, शिक्षण घेण्यासाठी धडपडणाऱ्या माशेलकरांना त्यांच्या भावे सरांनी प्रयोगामागचे हे तत्वज्ञान शिकवले. म्हणूनच जिद्दीने ध्येयापर्यंतचा प्रवास माशेलकर आनंदाने करू शकले.
जीवनातील तत्वज्ञान आपल्याला शिकायचे असते. निव्वळ प्रयोग वा सनावळया, प्रश्नोत्तरे पाठ करणे म्हणजे शिक्षण नाही. आम्ही लहानपणी आईकडे पेन्सिली मागत असू. माझी आई शिक्षिका होती. ती म्हणे, `आधीची पेन्सिल दाखव' मग म्हणे की, `अजून वापरता येईल. ती संपव मग नवी देईन.' प्रश्न पैशांचा नव्हता, वस्तूंचा वापर सुयोग्यपणे कसा करावा हे ती शिकवत होती. हा विचार पुढे अर्थनियोजन करण्यासाठी उपयोगी पडतो. दोन लाडू असले तरी ते वाटून मित्रांसोबत खायला ती सांगायची. असे संस्कार लहानपणी रुजवले तर मग मोठेपणी `हे माझं, मी कमावलेलं. माझ्या उपयोग-उपभोगासाठीच फक्त...' असे वाटत नाही.
जगप्रसिद्ध सर्जन डॉ.श्रीखंडे सांगतात की, लहानपणी वस्तूंच्या वापराचे, पैशाच्या विनियोगाचे,- एकूणच नीतिमत्ता कठोरपणे जपण्याचे जे संस्कार झाले, त्यामुळेच पुढील वैद्यकीय जीवनात कट प्रॅक्टीसचा विचारही कधी मनात आला नाही. कृतीचा तर प्रश्नच उद्भवत नाही. ज्या जगापर्यंत ते पोचू शकले नाहीत ते जग पालकांनी मुलांना आपल्या खांद्यावर उभं करून दाखवावं. फक्त त्यांना हेही सांगावं की, त्या तिथे पोचण्यासाठी जो वेळ लागणार आहे तो तू द्यायला हवास. अक्रोडाचं झाड आजोबांनी लावलं तर संभवत: नातू त्याची फळे खाऊ शकतो. फळाचं नातं प्रयत्नांशी असतं, हे तुम्ही समजून घ्यायला हवं.
क्रिकेटची मॅच पाहून आल्यानंतर एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांशी बोलत होते. ते म्हणाले, `त्या खेळाडूने किती सुरेख सिक्सर मारली.. बॉल किती उंच गेला... लोकांनी त्या चेंडूसाठी, त्या फटक्यासाठी किती जल्लोष केला! तुम्हालाही त्या चेंडूसारखे पटकन् वर जावं, तळपावं, सगळयांनी आपल्याकडं पाहावं असं वाटणं स्वाभाविक आहे. पण एक लक्षात घ्या की, त्या चेंडूला मारणाऱ्या बॅटच्या शक्तीपेक्षाही त्याला खाली खेचणाऱ्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची शक्ती जास्त आहे, म्हणूनच तो चेंडू पुढच्या क्षणी खाली येतो. तसे कुणाच्या तरी फटकाऱ्याने उंच जाण्याची आकांक्षा ठेवू नका. उंच जायचेच तर ध्रुवताऱ्यासारखे अढळ राहाल अशा प्रकारे जा. त्यासाठी वेळ लागतो, खूप कलह करावे लागतात, पण धडपड केली तर असं वर जाता येतं. यशाचा नेमका अर्थ आधी समजून घ्या. कारण यशालाही एक नशा असते, कैफ असतो. त्याचा अहंकार येतो. ज्ञानेश्वरमाऊली सांगतात की-
अहंकार न लगे अज्ञानियेचे पाठी ।
झोंबी ज्ञानियेचे कंठी ।
तो ज्ञानी माणसाच्या मागे लागतो. म्हणून मोठं होऊन नम्र राहणं कठीण, पण खूप महत्त्वाचं असतं.
गप्पा मारताना, बोलताना, संवाद करताना आपल्यात या चांगल्या गोष्टींची पेरणी होत राहील याची काळजी घ्या. नव्या पिढीला साधने खूप उपलब्ध आहेत, पण त्यांचा वापर योग्य होईल याची काळजी घ्यायला हवी. आपण साधनांच्या आधीन होऊ नये. मुलांचे आयुष्य सुखकेंद्री होणे म्हणजेच समाजाचे आयुष्य वैफल्यग्रस्त करण्यासारखे असते. सुविधा माणसाला गुलाम बनवते. सुविधा जरूर वापरा, पण आपण त्याचे गुलाम होत नाही याकडे लक्ष ठेवा. आज माणूस शेजारी बसलेला असेल तरी, तो अनरिचेबल असल्याचे काहीवेळा मोबाईल सांगतो. मानवी मनांचे संबंध बिघडवण्याची शक्ती तंत्रज्ञानात असते. त्याला ताब्यात ठेवा. सुविधा, नवे तंत्रज्ञान वापरून सोयी निर्माण करणे हे ध्येय जरूर ठेवा. पण त्या तंत्रज्ञानाच्या सुविधेच्या अभावी जगू शकत नाही असे होऊ देऊ नका.
पूर्वी शिक्षक कठोरपणे वागत, शिक्षा करत. पण ते आपल्या भल्यासाठी करत आहेत हा विश्वास मुलांच्या मनात होता, त्यामुळे त्या शिक्षाही मनापासून पाळल्या जात, त्याचा फायदाच होत असे. प्रतिकूलतेचे, त्यावर मात करण्याच्या धडपडीचेही संस्कार असतात व तेच आयुष्यात उपयोगी पडतात. शिक्षण हे फक्त मोठं होण्यासाठी नाही तर चांगलं होण्यासाठी आहे. खीं ळी सेेव ींे लश ळािेीरींपीं, र्लीीं ळीं ळी ोीश ळािेीरींपीं ींे लश सेेव. जे जे उत्तम आहे, उदात्त आहे, दिव्य आहे त्याचा ध्यास असायला हवा. सफलतेबरोबर सार्थकता हवी. मोठे व्हाच, पण मोठेपणाचा उपयोग चांगला केला तरच आनंदाची निर्मिती आहे; जीवनाची कृतार्थता आहे. अशा आनंदाच्या निर्मितीचे क्षण संस्कारातून निर्माण करता येतात. आनंद शिकता येत नाही, तो शिकवताही येत नाही. मनाच्या मशागतीतून तो फुलवता येतो. मनाची मशागत करणं हे खरं शिक्षण. स्वामी विवेकानंदांनी हेच सांगितलं आहे-एर्वीलरींळेप ळी ींहश िेलीशीी ेष र्लीश्रींर्ळींरींळेप ेष ाळपव. प्रतिकूलतेची काळजी करू नका, तक्रार करू नका. मी माझे मन सक्षम बनवेन, ही तुमच्या मनाची बांधणी तुम्ही करा. उद्याचा भारत सक्षम-समर्थ-उज्ज्वल करण्याचं काम तुमचं आहे. मूल्यसंस्कारांच्या आधारे तुम्ही ते कराल याची खात्री आहेच. यशवंत, गुणवंत, कीर्तीवंत तर तुम्ही व्हालच, पण हे काहीही झाला नाहीत, तरी चालेल पण `नीतिमंत' झाल्याशिवाय राहणार नाही' असा निश्चय मात्र जरूर करा.
***

शिकण्यासाठी त्रास आनंदाचा होतो
- विवेक पोंक्षे, पुणे

शाळेत शिकत असताना असं कुणी भाषण द्यायला लागलं वा त्यातून काहीतरी आदर्शवाद किंवा विचार सांगायला लागलं की मला वाटायचं, हे काहीतरी काल्पनिक सांगताहेत. विचार म्हणून हे सगळं ठीक आहे, प्रत्यक्षात असं काही नसतं. पुस्तकांविषयीही असं वाटतं की, हे काहीतरी रचलेलं आहे. हिलींग नाईफ हे एका मोठ्या डॉक्टरचं आत्मचरित्र. पहिल्या महायुद्धाचा काळ. रशियाच्या एका सरदार घराण्यात वाढलेला तेरा-चौदा वर्षांचा हा मुलगा (जॉर्ज साव्हा). युद्धकाळात सैनिक म्हणून भरती होण्याची सक्ती असे. याला युद्धात भाग घ्यावाच लागला. एका युद्धप्रसंगी दोन्ही बाजूंनी घनघोर लढाई सुरू होती. त्याचे सहज शेजारी लक्ष गेले तर तिथे त्याच्याच वयाचा त्याचा लहानपणीचा खेळगडी घायाळ होऊन पडलेला! पण युद्धभूमीवर त्याच्याकडे लक्ष देणं अशक्य होतं. रात्री त्या बंकरमधून बाहेर पडून तंबूत परतल्यानंतरही, त्याला तो घायाळ मित्र आठवत राहिला व आपण त्याला तसेच तळमळत सोडून आलो, या विचाराने अतिशय कासावीस होऊन तो एका सैनिकाला घेऊन परत त्या ठिकाणी केला. मित्राच्या हृदयाजवळ गोळी घुसलेली होती पण तो अद्यापि जिवंत होता. याच्या कमरेला सुरा होता. बरोबरीच्या सैनिकाला त्याने विचारले, ``आपण या सुऱ्याने त्याची गोळी काढली तर?'' सैनिक म्हणाला, ``मित्रा, आपण सैनिक आहोत. या सुऱ्याने एखादा जीव घेणं आपल्याला सहज शक्य आहे, पण सुरा वापरून एखादा जीव वाचवणं फार कठीण असतं...'' तरीही त्याने प्रयत्न केला पण तो मित्राला वाचवू शकला नाही. हे शल्य त्याच्या मनात खोलवर रुजलं. संधी मिळताच तो सैन्यातून बाहेर पडला. त्याने निश्चय केला की, या सुरीचा वापर मी जीव वाचवण्यासाठीच करेन. त्याने वैद्यकीय शिक्षण घेतले व तो पुढे नामांकित सर्जन झाला. त्या एका घटनेने त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. हे पुस्तक वाचल्यावरही मला असं वाटलं की हे काहीतरी कल्पनेनं रंगवलेलं आहे! पण एखाद्या घटनेने, लहानशा प्रसंगानेही आयुष्य बदलू शकते.
एका प्रसंगी मला शाळेचा शिपाई सांगत आला की, `सर, तुम्हाला भेटायला एक चिनी मुलगा आला आहे.' आत बोलावल्यावर लक्षात आले की, हा तरुण अरुणाचल प्रदेशातला आहे. येताच त्याने मला वाकून नमस्कार केला. मला आठवले की, तो अतिशय दुर्गम प्रदेशात राहायचा. तिथून त्याला शाळेत येणे अशक्यच होते म्हणून त्याला आम्ही वर्षाच्या प्रारंभी हेलिकॉप्टरमधून आणत असू. कधी बसही न बघितलेला मुलगा हेलिकॉप्टरमधून शाळेत यायचा. आठ-नऊ महिने शाळेत राहून घरी परतायचा. या शाळेत असताना आम्ही त्या मुलांना एकदा जिल्हाधिकारी कार्यालय दाखवायला नेले होते. त्याचा संदर्भ देऊन तो मला म्हणाला की, ``सर, हमने तय किया था कि मैं कलेक्टर बनँूगा । अब मैं आयएएस पास हो गया हूँ  और ये बताने के लिए आया हूँ... ।'' मी खरं म्हणजे त्या मुलांना फक्त जिल्हाधिकारी कार्यालय दाखवले, पण ते पाहून या मुलाने मनाशी हा संकल्प केला होता. हा प्रसंग घडल्यावर मला मनापासून पटले की, खरेच एखादा छोटासा प्रसंगही खूप मोठी प्रेरणा बनू शकतो. तुमच्याही मनात अशा काही प्रसंगी संकल्पाची बीजं पडत असतील, फक्त सगळयाच बिया उगवत नाहीत. काही वेळा, काही प्रसंग, त्यातलं बीज आपल्याला समजत नाही.
मुलं आपले काही वेगळे आनंद, कल्पना इतरांना, - शाळेतील शिक्षकांना, घरी आईवडिलांना किंवा नातेवाईकांना सांगायला जातात तेव्हा त्यांचं कुणीच ऐकत नाही. त्यांना प्रोत्साहन देत नाहीत. मग ते बीज तसंच पडून राहतं. असाच एक विद्यार्थी मला शाळेत भेटायला आला आणि म्हणाला, ``सर, मला तुम्हाला एक गंमत सांगायचीय.'' मी शिक्षकाच्या सावध भूमिकेतून त्याला विचारलं, ``शाळेतली की बाहेरची?'' तो म्हणाला, ``सर बाहेरची!'' मी म्हटलं, ``शाळा चुकवून बाहेर गेला होतास की काय?'' ``नाही सर! घरच्यांसोबत सिंहगड रोडला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथे मला खूप कंटाळा आला म्हणून मी बाहेर क्रॅनॉलवर जाऊन बसलो. तिथे सुगरण पक्षांची खूप घरटी होती. सगळी अर्धवट. तिथे मी पाहिलं की, माणसासारखे चक्क पक्षीही चोरी करतात! सर, ते पक्षी एकमेकांच्या घरट्यातल्या काड्या पळवून आपल्या घरट्याला वापरत होते. त्यांना हे कळत नाही का, की आपण दुसऱ्याच्या घरट्याची काडी चोरतो त्यावेळी आपल्याही घरट्याची काडी कुणी चोरू शकतं!'' मी त्याला म्हटलं, ``हे समजण्यासाठी तुला अजून खूप निरीक्षण करावं लागेल, तू करशील का?'' तो म्हणाला, ``आनंदाने करेन... पण शाळेचं काय?'' मी त्याला शाळेच्या वेळात तिथे जाऊन बसण्याची परवानगी दिली. तो पुन्हा दिवसभर बसला व त्याने, आपलं घरटं राखत ते पक्षी कशी चोरी करतात, हे मला येऊन सांगितलं. मी त्याला घरटं बांधण्याच्या पूर्ण प्रक्रियेचं निरीक्षण नोंदवायला सांगितलं व शाळेतून सूटही दिली. त्याने विज्ञान शिक्षकांची मदत घेऊन नीट निरीक्षणं व नोंदी केल्या. आज तो मुलगा `पक्षीवर्तनशास्त्रज्ञ' म्हणून उच्च संशोधन करतो आहे. आम्ही शिक्षक म्हणून काय केलं?-तर त्याच्या नैसर्गिक उत्सुकतेला खतपाणी घातलं. जिज्ञासा, उत्सुकता, निसर्गत: मुलांच्यात असते पण मुलं असं काही सांगू लागली तर कुणी त्यांना हा आनंद मिळवू देत नाही. अशा छोट्या छोट्या उत्सुकतेतूनच संशोधन जन्माला येतं.
आनंद म्हणजे फक्त मुलांसोबत नाच-गाणी म्हणणं नाही, हे आम्हालाच समजत नाही. खरं तर मुलांनाही फक्त सुट्टी, मज्जा यातच आनंद असतो असं नाही. एकदा रात्री एक वाजता मला एका विद्यार्थ्याचा फोन आला. मी जरा काळजीने चौकशी केली. तो उत्तरला, ``सर, तुम्ही आज शाळा सुटताना जे गणिती कोडं घातलं होतं ते मला सुटतं. आता हा आनंद कुणाला सांगू ते कळेना, म्हणून तुम्हालाच फोन केला!'' त्याच्या बोलण्यातून ओसंडणारा आनंद ऐकून मला वाटलं की अरे, मुलांना यातही आनंद वाटू शकतो! अनेकदा तुम्ही `काहीतरी' करत असता, पालकांना वाटतं तुमचा टाईमपास चाललाय, पण तुम्ही वस्तुत: शिकण्यातला आनंद स्वत: शोधत असता, घेत असता. राईट बंधूंचं चरित्रही  माझ्या वाचनात आलं. ते बारा-तेरा वर्षांचे असताना त्यांचे खेळ काय असायचे? तेव्हा सायकली नव्याने आल्या होत्या. ते भरपूर सायकल चालवत, सायकली खोलून पूर्ण सुट्या करत, पुन्हा जोडत. दिवसभरातला बराचसा वेळ अशी जोडतोड करण्यात घालवत. तासन्तास पतंग उडवत बसत. असे त्यांचे `धंदे' चालायचे. पुढे त्यांना पतंग व सायकल यांची सांगड घालता येईल का, या प्रश्नाने झपाटले व त्यातूनच प्रथम ग्लायडरचा व नंतर विमानाचा जन्म झाला. अशा उचापतींतून नवं काही जन्माला येत असतं आणि आम्ही नेमकं या उचापतींनाच बंदी घालतो! खरं म्हणजे अशी शाळा असावी जिथे उचापती करण्यालाच प्रोत्साहन असेल. जो सर्वात जास्त उचापती करेल, त्याला पहिला नंबर!
मी एकदा एका आदिवासी भागातल्या शाळेत गेलो होतो. शाळेत पाहुणे आले की, त्यांना ऑफीसमध्ये बसवून चहापाणी करायचे व शिस्तीत बसलेली, नीटनेटकी मुलं व शाळा दाखवायची असं असतं. इथे मी जाताच मला चौथी व पाचवीच्या मुलांचा गराडा पडला. मुलं मला हाताला धरून ओढत होती. ती मुलं मला एका सभागृहात घेऊन गेली. `सर, हे पहा आमचं म्युझियम' असं म्हणून त्यांनी मला त्यांचं संग्रहालय दाखवलं. तिथे त्या मुलांनी गोळा केलेले परिसरातले वेगवेगळे दगड, गोटे, मातीचे नमुने, पक्ष्यांची पिसे असे मांडलेले होते. आदिवासी जमातीत वापरले जाणारे जंगली धान्य, भाजीपाला, औषधी वनस्पती यांचे नमुने, त्यांची माहिती देणारे तक्ते तिथे होते. चालताबोलता सामाजिक इतिहास त्यांनी उभा केला होता. दहावीची परीक्षा होताच मुलं, आपण जमवलेलं साहित्य परत नेतात. पाचवीत नवी आलेली मुलं पुन्हा संग्रह करायला घेतात. त्यामुळे हे संग्रहालय सतत नवं असतं. हे शिकणं खरं आनंददायी असतं. पुस्तकाबाहेरचे प्रश्न शोधण्यात, त्यांची उत्तरं मिळवण्यात, ती मिळवताना होणाऱ्या त्रासातही आनंद असतो. आपलेच विक्रम आपण मोडण्यातही आनंद असतो.
एकदा शाळा सुटली. अंधार पडायची वेळ झाली तरी एक मुलगा मैदानावर थांबला होता. उंचउडीचा सराव करत होता. मी त्याला विचारलं, `तू एकटाच इतका वेळ का थांबला आहेस?' तो म्हणाला, ``सर, मी ठरवलंय आज ज्या उंचीवर मी बांबू लावलाय त्यावरून माझी उडी पलीकडे गेल्याशिवाय मी घरी जाणार नाही.'' प्रत्यक्षात जेव्हा त्याची उडी पलीकडे गेली, तेव्हाचा त्याचा विलक्षण आनंद हा खरा शिकण्यातला आनंद. हा आनंद एकदा चाखला की पुन्हा पुन्हा मिळवावासा वाटतो.
शिकतानाही वेगवेगळया प्रक्रिया कराव्या लागतात. पण त्यातही आनंद असतो. आई तुम्हाला तूप खाऊ घालते. पण दुधाचे दही-ताक-लोणी-तूप अशी मोठी प्रक्रिया आहे. तिचा आनंद आईला मिळतो. तुम्ही कधी ती प्रक्रिया पहा. अनेकदा खूप साध्या गोष्टीतही आनंद असतो. फक्त चटकदार पिझ्झा खाण्यातच नाही, तर आईच्या हातची गरम भाकरी खातानाही आनंद मिळतो हे कळेल. तेव्हा पुस्तक वाचण्यात, प्रयोग करण्यात, मैदानावरही आनंद असतो; इतकेच काय आपल्या क्षमता तपासणारी परीक्षाही आनंददायी असू शकते. मुलांना शिकण्यातला आनंद मिळण्यासाठी मुलांनी आपली जिज्ञासा व्यक्त करायला हवी व शिक्षकांनीही त्याला प्रोत्साहन द्यायला हवे.
***

पालकांसाठी सत्र..

आई-बाप होणं सोपं, पालक होणं कठीण
तुम्ही पालकांच्या संपर्कात सतत असता. तुमच्या मनात पालकांची प्रतिमा कशी आहे?

कांचनताई - जगातल्या इतर देशांमध्ये जी शिक्षण पद्धती राबवली जाते तीमध्ये काही विशिष्ट प्रकारची व्यक्ती घडवणे हे ध्येय असते. फ्रेंच माणूस म्हटला की काटकसरी, जर्मन म्हणजे शिस्त व मेहनत, इंग्रज हा समाजविघातक कामांपासून दूर राहणारा व व्यवहारी, तर अमेरिकन म्हणजे स्पर्धेत सदैव पुढे असणारा व अतिशय महत्वाकांक्षी असे साधारणत: दिसते. आपल्याकडे मात्र पालकांना आपलं मूल कसं व्हायला हवं, हेच माहिती नसतं! पालकांची भूमिका ही मालकाच्या भूमिकेसारखी असते. विद्यार्थी घडवायचा तर शिक्षक-पालक-संस्था-विद्यार्थी हे सगळे मिळून ते परिवर्तन घडवू शकतात. आपल्याकडे नदीपेक्षा संगमाला महत्त्व आहे ना! पालकांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे.

मुळात पालक कुणाला म्हणावं आणि मुलांच्या संदर्भात त्यांची नेमकी भूमिका, नेमके काम काय असावं?

श्री.पानसे- निसर्ग व माणसाची कल्पकता यातून चांगल्या गोष्टी घडतात. निसर्ग स्त्री-पुुरुषांना आई-बाप बनवतो व मुलाचे पालनपोषण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवतो; पण पालक होणं, मुलाला घडवणं ही स्वत: शिकण्याची गोष्ट आहे. साधारणत: मूल तीन वर्षांचे झाले की शाळेत पाठवातात, सहाव्या वर्षी त्याचे प्राथमिक शिक्षण सुरू होते. मूल जेव्हा शाळेत पहिले पाऊल टाकते तेव्हा आईवडिलांचे रूपांतर `पालकां'त होते. पालक होणं हे कठीण काम आहे. मुलांचं लालन-पालन-शिक्षण ही जबाबदारी मोठी. त्यासाठी प्रथम हे समजून घ्यावं की, मूल हे निसर्गत: एक पूर्ण माणूस आहे. सर्व अवयव, सर्व प्रेरणा असलेले. ते आपली `प्रतिकृती' नाही. मुलाची शारीरिक वाढ होतानाचे टप्पे आपल्याला समोर दिसतात; तशी बुद्धीची वाढही क्रमाक्रमाने होत जाणार, त्याचे टप्पेही समजावून घ्यायला हवेत. शारीरिक व बौद्धिक वाढीचा परस्पर संबंध असतोच. मुलाच्या शैक्षणिक वाढीबरोबर आपणही त्या त्या पातळीवरचं शिक्षण समजून घ्यावे. मुलाची फक्त मार्कांची प्रगती मोजू नये, तर त्याच्या कुठल्या टप्प्यावर कोणत्या क्षमता विकसित होत आहेत हे समजून घ्यावे. पालक हा आपोआप होत नाही, स्वत:त तो निर्माण करावा लागतो!

मुलांचा असा क्रमाक्रमाने विकास होत असताना बारा-तेराव्या वर्षापासून ते स्वावलंबनाकडे झुकू लागते. हे स्वावलंबित्व हळूहळू शारीरिक स्वावलंबनाकडून वैचारिक स्वावलंबनासाठी आग्रही होतं. अशा वेळी पालकांचा अहं (ईगो) दुखावतो. त्यावेळी त्यांनी काय करावे?

कांचनताई - मूल दोन-तीन वर्षाचं झालं की त्याला शाळेत ढकलून टाकणं, नंतर त्याच्यावर नानाविध वस्तूंचा मारा करणं; हे केलं की आयतं काम झालं, असं पालक समजतात. मुलांना प्रोजेक्ट तयार करून देणं, त्यांची दप्तरं वाहाणं, आणि मूल दहावीत गेलं की घरी सुतक पाळल्यासारखं गंभीर वातावरण ठेवणं आणि अगदी ते मूल टॉयलेटमध्ये गेलं तरी त्याला बाहेरून पुस्तक वाचून दाखवणं; हे सगळं कृपा करून बंद करा. आधी मुलाला स्वावलंबी बनवा. मूल शाळेपेक्षा जास्त घरी तुमच्याजवळ असतं, त्याचा उपयोग करून घ्या. त्याला समजून घ्या. आधी ते काय म्हणतंय, ते ऐकायला शिका.
एकदा एका छोट्या मुलाने आईचं चित्र काढलं, तिला कानच नव्हते! ते म्हणालं, `आई कान कुठे वापरते?' मुलाला काही उपजत प्रवृत्ती असते, त्या ओळखून त्याला दिशा द्यायचं काम पालकांनी करायचं, तेही मुलांना समजून घेऊन. मुलांना सर्व दृष्टींनी स्वावलंबी बनवा. त्याला अर्थार्जनही शिकवा. पाचवीतल्या मुलाला पुस्तकांएवढे पैसे कमावता यायला हवेत. सहावीत पुस्तकं व गणवेशाइतके, दहावीपर्यंत मूल पूर्णपणे स्वावलंबी व्हायला हवं. हल्ली मुलांवर वस्तूंचा मारा करण्याच्या फार चुकीच्या, घातक सवयी आहेत; अगदी ग्रामीण भागातही! खरे तर आपला कृषीप्रधान देश. शेतीची उन्नती झाली तर देशाची होणार; आणि ग्रामीण भागात मात्र शिकणाऱ्या मुलाला `मातीत हात घालू नको' असं शिकवलं जातंय! हे फार घातक आहे. मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांच्यातले बुद्धिमत्तेचे सर्व पैलू विकसित करायला हवेत. त्यासाठी त्यांना खूप लहानपणापासून नीट पाहायला, निरीक्षण करायला शिकवायला हवं. बुद्धिमत्तेचे पैलू म्हणजे भाषाप्रभुत्व, तर्कशुद्ध विचार, तर्कशास्त्रापलीकडची जाण, शारीरिक क्षमता, निसर्ग अभ्यासातून नवनिर्मिती करण्याची क्षमता, कलाकौशल्य, संपर्क कौशल्य, अवकाशाची-आजूबाजूच्या वस्तूंची जाण, संगीताची जाण, हे सर्व पैलू आपल्या मुलामध्ये उपजत आहेत का, हे आधी पाहावं. पालकांना जाणीव हवी. काही छोट्या, सोप्या गोष्टी बनवायला शिकवा. मुलांना खूप पाहू द्या, ऐकू द्या आणि बोलूही द्या. त्यांच्यात बोलण्याचे, संवाद साधण्याचे कौशल्य विकसित व्हायला हवं. पुढच्या आयुष्यासाठी ते फार गरजेचं आहे; पण मुलांना कुणी बोलूच देत नाही. घरी पालक बोलतात, शाळेत शिक्षक बोलतात; मुलं बोलतच नाहीत! आम्ही नुसते साच्यातले एकसारखे गणपती बनवतो आहोत. आम्ही ज्ञानेश्वर नाही, ज्ञानेश्वराचे रेडे तयार करतो आहोत. मुलांची डोकी म्हणजे संगणकाची युजर फें्रडली खोकी समजून, आम्ही त्यात माहिती कोंबत आहोत. मूल हे जिवंत, स्वतंत्र व्यक्ती आहे. त्याला त्याच्या मनाप्रमाणे जगण्याचं, विचार करण्याचं स्वातंत्र्य द्या.

स्वतंत्र, जिवंत मनाच्या या मुलांना दिशा देण्याच्या दृष्टीनं कोणती शाखा निवडावी हे शालेय वयात ठरवायला हवं का?

श्री.पानसे- प्रत्येक मुलातून निर्माण होणारा प्रौढ माणूस हा स्वतंत्र, वेगळया व्यक्तित्वाचा असणार. यासाठी नऊ-दहा वर्षांपासून मूल शाळेत काय प्रगती दाखवतं, याहीपेक्षा त्याला काय करावंसं वाटतं, ते स्वत:हून कुठल्या गोष्टी करतं, कशात रमतं-एकाग्र होतं-गुंतून जातं याचा शोध घ्यायला हवा. त्याचे कोणते गुण त्याला पुढे नेऊ शकतील हे त्यातून समजेल. हे काम शिक्षकांनी शाळेत करावं. मुलांमधले दोष नको, गुण शोधावेत. प्रत्येकाला उपजत कुठल्यातरी बुद्धिमत्तेचं वरदान असतं. कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता तीव्र आहे हे शोधणं म्हणजे मूल समजून घेणं. शिक्षक म्हणजे जो शिकवतो तो नव्हे; तर जो मुलांचा शोध घेतो तो शिक्षक. पालकांनी शिक्षकांच्या मदतीने आपलं मूल समजून घेतलं पाहिजे. मुलांनी शाळेत, घरी, क्लासमध्ये सतत फक्त अभ्यासच केला पाहिजे असे म्हणून मुलांवर फार मोठा आघात होतो. मूल आपल्या कलाने, गतीने वाढतच असते. त्याला आपण फक्त मदत करावी. आपल्याला त्यानं काय व्हावंसं वाटतं ते लादण्यापेक्षा त्याला काय व्हावं वाटतं, ते पाहावं. मूलत: असणारी आवडच नेहमी वर येते. म्हणून अनेक डॉक्टर, डॉक्टरकी न करता चित्रपट, नाट्य, लेखन अशा व्यवसायांत रमलेले दिसतात. मुळात आपल्याला `करिअर' कशाकशात करता येतं, याचीच फारशी माहिती नसते. आपल्या आजूबाजूला दिसणारे पाच-दहा यशस्वी (म्हणजे गाडी-बंगला असलेले!!) लोक पाहून आपण ठरवतो की मुलांनीही हेच करावं. एक संशोधन असं सांगतं की जगात ९९हजार व्यवसाय करण्याजोगे आहेत. आपल्याला माहितीच नाही. वास्तविक संगणक युगात आज आणखी शेकडो नव्या व्यवसायांची भर पडली आहे. तुम्ही ठरवलेल्या चौकटीत मुलांनी बसायचं आहे?- की मुलांची आवड,निवड, क्षमता याची जी चौकट बनते, त्यातील गोष्टीचं प्रशिक्षण त्याला द्यायला तयार आहोत? त्याचा पेशा आपण ठरवू नये. त्याची गुणवत्ता, कौशल्य यावर त्याचा पेशा तो ठरवेल. प्रत्येक पेशा आता मान, धन, संपन्नता देऊ शकतो. शिक्षण म्हणजे फक्त शाळा नव्हे. मुलांना तीन व्यवस्थांतून शिक्षण मिळू शकतं. आपलं घर हे पहिलं केंद्र. स्वैपाकघर ही सर्वात मोठी प्रयोगशाळा. मुलं तिथं मनापासून रमतात. आपण घरामध्ये अनेक गोष्टींचं प्रशिक्षण देऊ शकतो. मुलांना घेऊन बाहेर जाणं, शेजारी जाणं, बोलणं हे केलं नाही तर मूल समाजात मिसळू शकणार नाही. दुसरी व्यवस्था म्हणजे समाज. बाहेर अनेक कौशल्ये शिकण्याच्या संधी आहेत. त्याचा वापर करावा. कदाचित अजून काही वर्षांनी शाळा ही अपुरी व्यवस्था नाहीशीच होईल व या अन्य संस्थात्मक व्यवस्था त्याची जागा घेतील.

कुठल्या क्षेत्रात, व्यवसायात मुलाला गती आहे हे समजण्यासाठी त्याच्याशी संवाद हवा म्हणता; तो कसा साधावा?

कांचनताई- मुळात पालक मुलांसाठी पलिटी टाईम देतच नाहीत. माझी विनंती आहे, किमान पंधरा मिनिटे मुलांसाठी काढा. त्यावेळी लॅपटॉप, मोबाईल, वॉटस्अप हे काहीही नको. मुलांना जवळ घ्या. मुलांना शाळेनंतर घरात पुन्हा शाळा नको असते. त्याच्याशी बोला, त्याचं भावविश्व समजून घ्या. पूर्वीची सरस्वती अशी होती- खडकावर बसलेली = पर्यावरणाशी संबंध; नऊवारी नेसलेली = संस्कृतीशी संबंध; हातात वीणा व त्यातून येणारे ज्ञानरूपी झंकार,त्यातून स्वयंप्रेरित झालेला मोर म्हणजे विद्यार्थ्याचे प्रतीक. सध्या सरस्वतीही अशी नाही! ती शिक्षणसंस्थाचालकांच्या तिजोरीत, टीव्हीवर स्वार, जीन्स घातलेली व बँजो वाजवणारी; बाजूला स्टार्स नाचताहेत. राष्ट्नचं भविष्य जर मुलांच्या तोंडच्या गाण्यांवर ठरत असेल तर पालकांच्या तोंडात, घरात कुठली गाणी आहेत?
मुलांना कार्यप्रवण, स्वावलंबी बनवा. प्रथम घरात सफाई, बागकाम ही कामं करायला लावा. ते करताना तुम्ही त्यांना ज्या सूचना देता, त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया काय होतात ते पहा. काही सुधारणा हव्यात का ते पहा, ते करा. माळी जेव्हा झाडाची छाटणी करतो, तेव्हा ते झाड दुप्पट जोमाने बहरते. पण लाकूडतोड्या जेव्हा झाड तोडतो तेव्हा त्याचे पूर्ण खच्चीकरण करतो. लाकूडताड्या बनू नका, माळी बना. मूल चुकलं तरी त्यांना समजून घेऊन त्याला सुधारा. मुलांकडे खूप कल्पना असतात. आम्ही एकदा झोपडपट्टीत मुलांना मेणबत्त्या शिकवायला गेलो होतो. साच्यातून मेणबत्ती करायचं तंत्र, प्रमाण त्यांना शिकवलं व विचारलं की, `साचे नाही दिले तर तुम्ही काय काय वापरून मेणबत्त्या बनवाल? वाटी-पेले?' कचरा वेचणारी मुलं म्हणाली, `ताई, आम्ही अंड्याची टरफलं वापरू!' नंतर आम्ही तशा मेणबत्त्या करून पाहिल्या. आज त्या वेगळया आकाराच्या मेणबत्त्या मुलं विकतात व पाच-पाचशे रुपये मिळवतात. आम्ही मुलांना चांगला विळा वापरून गवत कापायला शिकवलं व तुम्ही शाळेच्या आवारातलं गवत कापायचं कंत्राट का घेत नाही? असं सुचवलं. त्या मुलांनी गवत कापायचं काम करून शाळेच्या ट्नीपसाठी पैसे गोळा केले. आपण मुलांना अति सुविधा देत आहोत. जास्त पाणी मुळं कुजवतं हे आपण लक्षात घेत नाही. मला मिळालं नाही म्हणून मुलांना द्यावं, हे करणं चुकीचं आहे. मुलांना स्वावलंबी बनू दे, त्यांना पैशाची किंमत कळू दे.

पिढीतल्या अंतराविषयी खूप बोललं जातं. खरंच जनरेशन गॅप हा संवादातला अडथळा आहे का? याविषयी संशोधन काय सांगतं?

श्री.पानसे - मूल जेवढं लहान, तेवढं नियंत्रणात राहातं. जसं ते वाढतं, वयाने, अनुभवाने, शिक्षणाने, तसं ते पालकांच्या नियंत्रणातून सुटू पाहातं. साधारणत: आठव्या-नवव्या वर्षापासून स्वत्व जागृत होतं. या वयात प्रचंड ऊर्जा असते. मुलं सतत काहीतरी करत असतात. काहीतरी जमवतात, गोळा करतात. मुलं गुलाम आहेत की त्यांना स्वत:चं विश्व बनवायची संधी-मुभा आहे? त्यांना घरात काही स्थान आहे की नाही? त्यांना स्वत:चा कोपरा, कपाट, कप्पा आहे का? कारण त्यांना आता असं वाटतं की, आपण एक स्वतंत्र आणि महत्त्वाची व्यक्ती आहोत. त्यांना असं वाटण्यातूनच त्यांच्यात पुढे आत्मविश्वास जागृत होणार असतो.
त्यामुळे सात-आठ-नऊ वर्षाचं मूलही आपल्यापासून सुटायला सुरुवात झालेली असते. दहा वर्षांपर्यंत म्हणजे तिसरी-चौथीपर्यंत सगळं छान असतं. पाचवी-सहावीपासून ती सैरभैर होतात, अस्थिर असतात. आता अभ्यास, खेळ, चित्रं काहीच का करत नाही? याला कारण आहे. जन्मलेल्या मुलाच्या मेंदूत अब्जावधी पेशी असतात. मोठ्या माणसात याच्या निम्म्यानेही दिसत नाहीत. याचं कारण न वापरलेल्या पेशी झडतात. अकराव्या-बाराव्या वर्षी आवडीनिवडी बदलतात. कारण हे वय पेशी झडण्याचं असतं. या काळात मुलं एकदम रागावतात, हट्ट करतात, गप्प राहतात. या काळात त्याला भावनिक आधाराची गरज असते. मूल काहीतरी वेडंवाकडं करतंय असं समजून पालक रागावतात व मुलात अंतर पडायला सुरुवात होते. पुढे तेरा ते सोळा या वयात मुलं मनाने पूर्णपणे स्वतंत्र झालेली असतात व त्यांना तुमच्या मदतीची कमीत कमी गरज असते. नेमके याच वयात शाळेचे दहावी व बारावीचे महत्त्वाचे टप्पे येतात व पालक मुलांवर संपूर्ण नियंत्रण ठेवू पाहतात, जे त्यांना आवडत नाही.
खरं तर हे साधं गणित आहे की, ज्यात त्यांना गती आहे, तिथे ते चटकन् एकाग्र होतात. एकाग्र होताहेत म्हणजे त्या कामात आनंद वाटतो आहे. पण शाळेचा अभ्यास हीच एकमेव महत्त्वाची गोष्ट आहे असं आपण समजतो. प्रत्यक्षात मूल खूप वेगवेगळया गोष्टीत एकाग्र होत असतं. मूल स्वतंत्र होतं, सुटं होतं तेव्हा त्याची विचारशक्ती स्वतंत्रपणे विकसित होत असते आणि कल्पनाशक्ती नव्याने निर्माण होत असते. त्या आधारे ती स्वतंत्रपणे काही वेगळं घडवू पाहात असतात. खरे तर शालेय शिक्षणाला अती महत्त्व देणं तर सोडाच, दुर्लक्षच करावं असं ते शिक्षण आहे. पुढील आयुष्याला त्याचा फारसा उपयोग नाही. शाळेत मुलांना हुशार नव्हे, चलाख बनवा. जो उत्तम मार्क मिळवतो तो हुशार, पण ज्याला विविध गोष्टी येतात, जो विविध आव्हानांना तोंड देऊ शकतो, तो चलाख. मुले अजून काही वर्षांनी जगाच्या बाजारात उतरणार. तिथे त्यांना नवनवीन आव्हानांना तोंड  देण्यासाठी ही शिक्षणाची पोतडी पुरी पडणार नाही. तिथे त्यांना स्वत:च्या कल्पना वापरून पुढे जावे लागेल. याच वयात पालकांचं दुर्लक्ष होतं आणि पालक सतत मुलांशी अभ्यासाविषयी बोलतात, उपदेश करत राहतात. अंतर पडतं याचं कारण मुलं स्वत:ला नैसर्गिक पद्धतीने, स्वत:च्या प्रेरणेने वाढवत असतात; तर त्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे वाढावं असं पालकांना वाटतं. हे अंतर पडू नये असं वाटत असेल तर पालकांनी मुलांसोबत वाढावं. त्या त्या वयातल्या त्याच्या मानसिक, बौद्धिक, सामाजिक गरजा समजावून घ्याव्या लागतील. नुसतं मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देत राहाल तर मुले कदाचित हुशार होतील, पण जगात मागे पडतील. आज सगळं जग चालवणारे जे लोक आहेत, ते कुणीही शाळेत हुशार नव्हते, असं संशोधन सांगतं. आपल्या देशात नोबेल पातळीचे शास्त्रज्ञ, ऑलिंपिक विजेचे खेळाडू होत नाहीत याचं कारण असे लोक आपल्यात नाहीत असं नाही. आपण ही सर्व बुद्धिमत्ता मारतो. आजपासून पंचवीस वर्षांनी आपण जगातला सर्वात तरुण देश असणार आहोत. आपलं सरासरी वय ३० असेल. तर त्यावेळी तरुण असणारी ही मुलं आत्ता शाळेत आहेत. ही केवढी मोठी संधी असणार आहे आणि त्याचं सोनं करू शकतील अशा मुलांना, आम्ही मात्र आत्ता शाळा आणि टेक्स्टबुकशी बांधून घालतो आहोत. क्रेमक पुस्तके ही सर्वात मोठी अशैक्षणिक व नुकसान करणारी गोष्ट आहे!

मुलांच्यात मानसिक बदल घडवण्याच्या दृष्टीने पालकांनी स्वत: नेमका काय बदल करायला हवा?

कांचनताई - पहिली गोष्ट म्हणजे आपली स्वत:ची मानसिकता बदला. मुलांवर संस्कार करायचे तर पालकांना कष्ट घ्यावे लागतात. मुलांच्यात कार्यसंस्कृती रुजवायची तर मुलांना चांगली चरित्रे ऐकवा.  युरोपमध्ये लोक सरासरी २०० पाने वाचतात. आपल्याकडे सरासरी ३० पाने वाचली जातात. त्यातही बहुतांशी वर्तमानपत्रे! डॉ.अब्दुल कलाम, माशेलकर, जयंत साळगावकर, बी.जी.शिर्के, सुशीलकुमार शिंदे अशी प्रेरक चरित्रे प्रथम पालकांनी वाचून मुलांना सांगावीत. घरी सामुदायिक वाचन सुरू करा. `एक होता कार्व्हर', `आमचा बाप अन् आम्ही', `कहाणी लंडनच्या आजीबाईची' हे वाचा. कुठल्याही गोष्टीची सक्ती करू नका. सक्तीने आसक्ती वाढते. हे सारे सामुदायिकरित्या व आनंदाने व्हायला हवे. मुलं ही मालमत्ता नाही, ती मुलं आहेत! सध्या `एम्' संस्कृती आहे - मनी, मोबाईल, मॉल, मॅकडोनल्ड! मुलांशी बोलतानादेखील आपण मोबाईल घेऊन बसणार!!

गाडगीळ - आता पालकांपेक्षा मुलंच मोबाईलवर जास्त असतात! मग काय करायचे?

कांचनताई - पण तुम्हीच तो त्यांना हातात दिलाय; नियंत्रणही तुम्ही ठेवायला हवं! मुळात इन्फर्मेशन, नॉलेज, इनसाईट, फोरसाईट, व्हीजन, विझडम् या ज्ञानाच्या पायऱ्या. मुलांना फक्त इन्फर्मेशन मिळते आहे. संशोधन असंही सांगतं की, फार्मल एज्युकेशन केवळ १५% उपयोगी असतं. इन्फॉर्मल एज्युकेशन ८५% उपयोगी असतं; जे पालकांनी द्यायचं असतं. आपण संकल्पना, वाक्प्रचार, सवयी, धारणा सगळं बदलायला हवं. व्यवसाय करण्याऱ्यांना प्रोत्साहन आपणच द्यायला हवं. इथून पुढे नोकऱ्या सहज असणार नाहीत. घरी उद्योगाचं वातावरण असेल तर मुलंही उद्योग उभारतील. नको त्या परदेशी गोष्टी आपण स्वीकारतो. पण तिथे समर जॉब करून मुलं शिक्षणासाठी पैसा कमावतात. भारतातही अशा संधी उपलब्ध आहेत. पण आपल्याकडे चुकीची मानसिकता, लाज यांमुळे आपण आपल्या मुलांना करू देत नाही. बाकीच्या परदेशी गोष्टींचं अनुकरण करायला मुलांना प्रोत्साहन देता, मग स्वावलंबन, अर्थार्जन, श्रमप्रतिष्ठा हे का शिकवत नाही? मुलांना शेती व शेतीपूरक व्यवसाय आपण शिकवू शकतो. नारळ-केळी-पपई-कडीलिंब व पेरु या पाच झाडांवर मिळणाऱ्या उत्पन्नातून मुलांचं अकरावीपर्यंतचं शिक्षण होऊ शकतं. त्यांनी स्वयंसिद्ध, उद्योगी व्हावं यासाठी प्रथम आयांनी उद्योगी बनावं.  ताठ मानेनं उभं राहण्यासाठी मुलांना उद्योगी बनवा. त्यासाठी योग्य वातावरण निर्माण व्हावे यासाठी प्रथम पालकांना दृष्टी द्यायला हवी. मुलांच्यातले गुण हेरणं, वातावरण, संधी, मुलाचा कल अभ्यास करावा. कल समजण्यासाठी केंद्रे असतात. त्याचा वापर करावा. व्यवसाय सुरू होणं, स्थिर होणं सोपं नाही. छोट्याकडून मोठ्याकडे जावं. प्रेरणा, प्रशिक्षण, वातावरण हे महत्त्वाचं आहे.

मुलांचं शिक्षण म्हणजे केवळ बौद्धिक शिक्षण आहे का?- की त्यासोबत त्यांच्या भावनांची कदर करायला हवी?
श्री.पानसे - आपण मुलाला बौद्धिकदृष्ट्या तयार करण्याच्या नादात अनेकदा त्याच्यावर भावनिक आघात करत असतो. आता हे सिद्ध झालंय की, कोणतंही बौद्धिक काम करताना भावनिक भागही तितकाच महत्त्वाचा असतो. कोणताही भावनिक अडथळा नसेल तर मूल चटकन आत्मसात करतं. भावनिक दृष्ट्या स्थिरता असणं ही शिक्षणासाठी मूलभूत महत्त्वाची अट. रागावून शाळेत आलेल्या मुलाचं लक्ष लागत नाही. भुकेल्या पोटी लक्ष लागत नाही. या भूमिकेतून माध्यान्ह भोजन योजना सुरू केली. अन्नाचा, कुटुंबातील प्रेमाचा, शिक्षकांच्या आस्थेचा, कशाचाही अभाव व त्यामुळे आलेली भावनिक अस्थिरता असेल तर मूल शिकू शकत नाही.
मुलांना भावना असतात व त्यांचा विचार करायचा असतो हेच दुर्दैवाने शिक्षणात आम्ही विसरून गेलो. आपण घरीही हे करत नाही. मुलांचे अनेक आजार भावनिक ताणातून निर्माण होतात. मुलांना लहान वयात अभ्यासाचा ताण दिल्याने, घरी आईवडील भांडल्याने, मुलाला जोरात रागावण्याने, शाळेत शिक्षा करण्याने मुलांवर फार मोठा आघात होतो. मुलांना मार लागत नाही, अपमान लागतो. संपूर्ण शिक्षणात मुलांचं आरोग्य बिघडवण्यासाठी परीक्षा, चाचण्या, शिस्त हे ताण देतात. मुलांना टाळया वाजवण्यासाठीही शिस्त लावणे, त्यांची उत्स्फूर्तता मारणे हा काय शहाणपणा आहे? स्पर्धांची खरंच बालवाडीपासून गरज आहे का? त्याही आघातच करतात. त्यामुळे सगळा रक्तप्रवाह भावनिक मेंदूकडे जातो व बौद्धिक मेंदूचे काम थांबते. मुलं ठीक, स्थिर, प्रसन्न आहेत ना, हे पाहात रहा. तणावपूर्ण वातावरणातून सुटका होण्यासाठी लर्निंग होम सारखे पर्याय वापरावेत.

कांचनताई - बुध्द्यांक (आय.क्यू.) वाढवता येत नाही पण भावनांक (ई.क्यू.) वाढवता येतो. तो वाढवणं पालकांच्या हातात आहे.

मुलं विशिष्ट वयात स्वत:च निर्णयक्षम होतात. अशा वेळी पालकांनी कसं वागावं?

कांचनताई - अशा वेळी त्यांचे मित्र बना, चर्चा करा. निवड त्याला करू दे. मुलांना अजून एक गोष्ट शिकवा, कुठलंही काम करायला लाजायचं नाही. स्वच्छता अभियान दिल्लीत होणं पुरेसं नाही. त्याला घाणीचा तिटकारा वाटूदे, स्वच्छ करायला लाज वाटू नये व पुढे, जो घाण करील त्याला थांबवण्याची हिंमतपण यायला हवी.

मूल मोठं झालं की पालकांची जबाबदारी संपते का?

श्री.पानसे- मुलांच्या विवाहानंतरही नातवंडांचं पालकत्व, हा अजून नवा शिक्षणप्रकार सुरू होतो! पण आपलं वातावरण असं हवं की, सर्वांनी एकत्रितरित्या काम करणं, सर्वांच्या मताचा विचार होणं हे ठरवून करावं लागतं. पिढ्यांमधलं अंतर कमी करायला हवं, ते करता येते. एकत्र कुटुंबात उपभोग, उत्पादन, संपत्ती, कामं सर्वांचीच वाटणी होत होती. कुणीही अडचणीला उभं राहात असे. शेअरिंग आपोआप येत होतं. आपण चारच सदस्य असलो तरी शेजारी, कुटंुब, नातेवाईक असा विस्तार मुलांना आवडतो. मुलांना `आपल्या पाठीशी कुणीतरी आहे' ही भावना बळ देते. कर्त्या मुलांनी वृद्ध आईवडिलांशी कसं वागावं हे, आईवडील आधी मुलांशी कसे वागलेले असतात यावर ठरतं. पण तरीही दोघांनीही पूर्वग्रह, अनुभव यावर अवलंबून न राहाता नव्याने नाती निर्माण केली पाहिजेत.
कांचनताई - अजून एक मुद्दा महत्त्वाचा आहे. समाजात चाललेली घुसळण, भ्रष्टाचार, नियमबाह्य वर्तन याचा परिणाम मुलांवर होतो. यासाठी नीतिमूल्ये पेरण्याची सुरुवात पालकांनी करायला हवी. अनेकदा पालक मुलांसमोर नियमबाह्य वर्तन करतात, नियम मोडून त्याचं समर्थन करतात. हे थांबायला हवं.

श्रोत्यांमधून प्रश्न- आम्ही आश्रमशाळेत शिकवतो. ती मुलं अजून मोकळेपणानं बोलत नाहीत, काय करावं?

श्री.पानसे - आदिवासी समाजाचा मूळ स्वभाव, राहणीमान पहा. जंगलातून छोट्या पायवाटेवरून चालताना एकामागे एक चालणं, त्यामुळे बोलणं होत नाही. जंगलात बोललं तर (लांब अंतरावर असल्याने) मोठ्याने बोललं जातं; किंवा अनेकदा आजूबाजूला फार काही वेगळं सतत घडत नसेल तर बोलण्यासारखं काही नसतंही. बोलायच्या संधी कमी असतील, तरी संवाद कमी असतो. भाषेचं शिक्षण देताना आपण वाचन, लेखन एवढंच शिकवतो. बोलायला शिकवत नाही. म्हणून मुलांना प्रथम हसतं, बोलतं करायला हवं. मुलं बोलती होण्यासाठी त्यांच्या अनुभवविश्वाविषयी बोला. समाजात मिसळण्याची संधी न मिळाल्याने ती अबोल होतात. त्यांना वेगवेगळया  ठिकाणी घेऊन जा, त्या गोष्टी समजून घेण्यासाठी त्यांना वेगळे अनुभव द्या.

श्रोत्यांमधून प्रश्न- मुलांवर काम करण्यातून संस्कार होतात पण कायद्याचा आधार घेऊन `मुलांना स्वच्छता, बागकाम यासारखी कामे सांगू नयेत' असे सांगतात, याचा मध्य कसा काढावा?

श्री.पानसे - मुलांना काम करून पैसे निर्माण करण्याला कायद्याने बंदी आहे. मुलांना रचनावादी पद्धतीने म्हणजेच काम करून शिकू द्या, असंही तोच कायदा सांगतो. करून शिकणं ही पद्धत आली पाहिजे हेच कायदा सांगतो. मुलांना अभ्यास सोडून काही करायला सांगू नये, हे पालकांनाच वाटतं. पण हे पालकांना पटवून द्यावे लागेल की स्वच्छता, स्वावलंबन हेसुद्धा शिकणंच आहे.
घरोघरी संवाद असणं, त्यात मोकळेपणा असणं व हे मुद्दाम घडवून आणणं महत्त्वाचं आहे. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पालकत्व कसेही असो, आपण एक ज्वलंत, जिवंत आणि बलशाली पाल्य घडवायचे स्वप्न पाहतो आहोत, याचे सतत भान ठेवावे.

शिक्षकांसाठी सत्र

शिक्षकाजवळ `आईपण' हवे
- सागर देशपांडे
मुलांच्या जडणघडणीत त्यांना प्रेरणा देण्याचं महत्त्वाचं काम शिक्षकाचं. आई ही आपली पहिली शिक्षक. त्यामुळे तिची म्हणजे एकूणच पालकांची जबाबदारी मोठी. पण ती तितकीच शिक्षकांचीसुद्धा आहे. पूर्वी मागच्या बाकावर बसलेल्या मुलाला समजलं- म्हणजेच त्याला प्रश्नाचं उत्तर देता आलं की, आपण जिंकलं असं वाटे. मागच्या बाकावरची म्हणजे ढ मुले असा त्यांच्याविषयीचा दृष्टिकोण होता, त्यांच्याकडून फार अपेक्षा नसत. आता त्यांना असे समजण्याची चूक करू नये. ती मुले कदाचित शाळेच्या अभ्यास व परीक्षापद्धतीत चमकू शकत नसतील, पण त्यांच्यात काहीतरी सुप्त गुणवत्ता नक्की असते, ती शिक्षकांनी शोधायला हवी.
प्रत्येकाचे काही क्षेत्र असते. आज महाराष्ट्नतही ७५० व्यवसायक्षेत्रे आहेत. आम्ही प्रेरणाही शेकडो वर्षांमागच्या देतोय व अवताराची वाट पाहतो. शिवाजी महाराजांची प्रेरणा सांगायची; आणि स्वप्ने मात्र फक्त मुलामुलींनी इंजिनियर- त्यातही आयटी त जावं, मग पुढे अमेरिकेत सेटल व्हावं व त्यांच्या निमित्ताने आमचंही राहाणं तिकडं व्हावं.... अशी पाहातो. समाजातली कुठलीही क्षेत्रे घ्या, सर्वांच्या मागे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे शिक्षणक्षेत्र जबाबदार आहे. चांगल्या आणि वाईट गोष्टींनाही आम्ही केलेले वा न केलेले संस्कारच जबाबदार आहेत. संस्कार करावे लागत नाहीत. मुले लिटमस पेपरसारखी सतत आपला व्यवहार पाहात, पारखत असतात. आपण बोलतो ते आणि वागतो ते, यातलं अंतर मुलांना दिसत असतं. त्यामुळे पहिली जबाबदारी पालकांवर, त्यातही आईवर अधिक चांगल्या आईने घडविलेली मुलं खूप उंचीवर पोचतात. दुर्दैवाने मुलांचा शिक्षणाशी संबंध आता टेक्स्टबुकपुरता उरलेला नाही. तो फक्त `२१ अपेक्षित'शी जोडलेला आहे. आयुष्यात पडणाऱ्या २१ अनपेक्षित प्रश्नांची उत्तरे शोधण्याची क्षमता आम्ही कुणीच त्याला दिलेली नाही.
अशिक्षित,अडाणी आईदेखील-निर्धार केला तर, मुलाला कठोर परिश्रम घेऊन अगदी प्रतिकूल परिस्थितीत, दारिद्र्यात किती उत्तम घडवू शकते याचं उदाहरण डॉ.रघुनाथ माशेलकरांकडे पाहून कळतं. भावे सरांसारखे शिक्षक असे विद्यार्थी घडवतात. आजही असे शिक्षक आहेत, असू शकतात. शिक्षकी पेशाने समर्पणभाव बाळगणे हे खूप महत्त्वाचे आहे. आई-शिक्षक-समाज मिळून उत्तम विद्यार्थी घडवू शकतात. अटलजींनी एका प्रसंगी डॉ.माशेलकरांना विचारले होते, `माशेलकरजी, आज असे भावे सर का दिसत नाहीत?' त्याचं उत्तरही पुढे त्यांनीच दिलं, `दिसत नाहीत कारण आज या व्यवसायाला, पेशाला प्रतिष्ठा उरलेली नाही.' आजच्या काळात क्लासकेंद्रित व्यवस्था झाली आहे. हे शिक्षणपद्धतीच्या दुरावस्थेचे थेट निदर्शक आहे. परस्पर मुलांचे अभ्यास होत असल्याने क्लासेसची व्यवस्था शिक्षकांनाही सोयीची वाटते का? मुले कशी का शिकेनात, डॉक्टर वा इंजिनियर व्हावीत, असे शिक्षकांनाही वाटते. आता `नाइलाजाने शिक्षकी करतो' असं म्हणू नका. आपण म्हणू ते प्रमाण मानणारा, सगळं ऐकणारा, सांगू तसं वागणारा एवढा मोठा तयार समूह आपल्याला मिळतो, हे आपलं भाग्य. मात्र आपण सांगू तसं त्यांनी वागावं, यासाठी प्रथम आपली जबाबदारी खूप.
एकीकडे इंग्रजी शिक्षणाची क्रेझ, भाषेबाबत नेमकं धोरण नाही, असा गोंधळ आहे. आपण आपल्यापुरते भाषेचे धोरण ठरवले पाहिजे. विचारसरणी अगर वादाच्या पलीकडे जाऊन भाषांचा विचार व्हावा. संस्कृत ही आपली आजी, मराठी ही आई, हिंदी व अन्य सर्व बोली-लोकभाषा आपल्या मावश्या आहेत. इंग्रजी ही फक्त पोटाची भाषा आहे हे नीट लक्षात ठेवूया. आज जगभरात इंग्रजी शिकवणे हा मोठा व्यवसाय आहे. ती भाषा शिकवणाऱ्यांना खूप मागणी आहे. त्यातही भारतीय शिक्षकांना खूप मागणी आहे. भारतातही खूप मोठ्या प्रमाणावर चांगल्या शिक्षकांची गरज आहे. मात्र मातृभाषा प्रथम उत्तम येणे आवश्यक असतेच.
शिक्षक हे मुलांचे सांस्कृतिक पालक हे शिक्षकांनी विसरू नये. आर्य चाणक्याने हे म्हटले होते की, देशाचा राजा जर देशाच्या सीमेचे रक्षण करू शकत नसेल तर ती जबाबदारी शिक्षकाची आहे. आजच्या काळात ही भूमिका जशीच्या तशी निभावणे अपेक्षित नसले तरी, शिक्षक असे विद्यार्थी घडवू शकतात, ही त्यांची जबाबदारी नक्की आहे. शिक्षकांच्या भूमिकेचे महत्व त्यावरून आपण लक्षात घेतले पाहिजे. शिक्षकांची भूमिका उत्तम होण्यासाठी काही क्षमता आपल्यात असणे गरजेचे वाटते. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या विषयावरची उत्तम पकड. हे अंगणवाडी ते विद्यापीठ सर्वत्र लागू आहे. उत्तम शिकवण्यासाठी सतत निरीक्षण, आपल्या क्षेत्राची अद्ययावत् माहिती, अभ्यासक्रमापलीकडचे ज्ञान असले पाहिजे.
खरे तर सर्वात लहान स्तरावर शिकवणे सर्वात अवघड. त्या पातळीवर खरे तर सर्वोच्च शैक्षणिक क्षमतेची माणसे असायला हवीत. तशी नसतील तर जे त्या पातळीवर शिकवतात. त्यांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता तितकी उच्च वाढवावी लागेल. आपण आपल्या क्षेत्रात काही संशोधन करून भर घालतो का? हे संशोधन फक्त पगारवाढीशी संलग्न, मर्यादित नसावे. आपली काही ठोस भर घालता यायला हवी.
आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थ्यांवर निरपेक्ष, निर्व्याज प्रेम करता यायला हवं. हे `आईपण' असेल तर बाकी गोष्टी एकवेळ कमी चालतील. शिक्षणाच्या धोरणातही सातत्य राहायला हवे. शासन बदलले की धोरण बदलते हे चुकीचे आहे. जर परदेशी विद्यापीठांना आम्ही इकडे परवानगी देणार असू तर त्याच्याशी स्पर्धा करू शकेल इतके उत्तम शिक्षण, गुणवत्ता, तंत्रज्ञान, क्षमता व कौशल्ये विकसन हे आम्हाला साध्य करावे लागेल. बदलती आव्हाने व वाढलेले वेतन यांमुळे शिक्षकांकडून समाजाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अशा वेळी अशैक्षणिक कामे दिली तरीही आम्ही उत्तम काम करतो आहोत. मग या जबाबदाऱ्या कमी केल्या तर सर्वोत्तम काम करू शकू अशी भूमिका शिक्षकांनी व शिक्षक संघटनांनीही ठेवायला हवी.
शिक्षणसंस्था, स्वयंसेवी संस्थांनी शिक्षकांसाठी निरंतर प्रशिक्षण व्यवस्था करायला हवी. त्यांना प्रोत्साहन, शिष्यवृत्त्या यांची योजना करायला हवी. शिक्षक व वाचनसंस्कृती यांचेही नाते दुरावत चाललेले दिसत आहे. ग्रंथालयांचा वापर अजून खूप वाढायला हवा आहे. चांगली पुस्तके निवडून मुलांपर्यंत नेण्याचे कामही शिक्षकांचे आहे. शिक्षक समाजाला आधारभूत ठरू शकतात. आईनस्टाईन आयुष्यभर स्वत:ला `फिेजक्सचा विद्यार्थी' म्हणवत असे. आपल्यालाही आपल्यातले विद्यार्थीपण टिकवता आले तर दुसऱ्यांची जीवने उजळवण्याचे सामर्थ्य आपल्याला नक्की मिळेल.

शिकविणे हा आनंददायी नाट्यप्रयोग
- विनय सहस्रबुद्धे
`शिकू आनंदे' हे जितकं महत्त्वाचं तितकं `शिकवू आनंदे' हेही फार महत्त्वाचं आहे. ज्ञानार्जनाच्या प्रक्रियेत ज्ञानदानही तितकेच महत्त्वाचे. ज्ञान देताना जर मनात सृजनशीलता, आनंद मिळवण्याची भावना नसेल, तर ती एकूण प्रक्रिया आनंददायी होणार नाही. शिकवता शिकवता आपणही शिकत असतो. एका जुन्या कादंबरीत वाक्य होते,
' जेव्हा शिक्षक काहीतरी वारंवार शिकवत असतो, तेव्हा विद्यार्थीही काही शिकवतात, शिक्षकही काही शिकतो, अशी ही दुहेरी वाहतूक आहे. यात केवळ एक देता एक घेता, एक सांगता एका ऐकता, अशी पद्धत एकंदरीतच ज्ञानार्जनाच्या प्रक्रियेला मंजूर नाही.
या प्रक्रियेत शिक्षकांविषयीचे काही मुद्दे महत्त्वाचे वाटतात. एक म्हणजे शिक्षक आपल्या भूमिकेकडे कसे पाहात आहेत? बरेचजण या व्यवसायात अपघाताने वा नाइलाजाने आलेले असतात. काहींना नंतर या व्यवसायात रस वाटू लागतो. पण सुरुवातीपासून ठरवून, रस घेऊन शिक्षकी पेशा स्वीकारणारे दुर्दैवाने फार थोडेजण आहेत. कारण शिक्षकी पेशा हे ओझं आहे, जबाबदारी आहे असं वाटतं. तसं पाहता, समाजात काही सांगू पाहणारे सर्वचजण-शिक्षक, कलाकार, तत्वज्ञ, पत्रकार, सामाजिक-राजकीय कार्यकर्ता, संशोधक असे कुणीही - या सर्वांकडून समाज एका वेगळया प्रकारची अपेक्षा बाळगतो. त्यांच्यासाठीची मोजपट्टी, दृष्टिकोण वेगळा असतो. शिक्षक हा जरी पगारी नोकर असतो, तरी त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण वेगळा असतो. पेशामुळे का होईना, जेव्हा कुणी `असे करा - असे वागू नका - हे योग्य ते अयोग्य...' असे सांगत असतो तेव्हा, समाज त्याच्याकडूनही तशा वर्तणुकीची अपेक्षा ठेवतो. त्याच्याकडून तसं घडलं नाही तर, या सांगणाऱ्या लोकांवर मग दांभिकतेचा शिक्का बसतो. म्हणून शिक्षकी पेशा निभावणं सोपं नाही. स्वखुशीने असा वा नाइलाजाने; शिक्षकी पेशा आपण स्वीकारलाच आहे तर तो निभावण्यावाचून पर्याय नाही. अशा वेळी तो मन:पूर्वक स्वीकारणं चांगलं.
आपण पिढ्या घडवतो, भवितव्य घडवतो, समाजाच्या विकासाची रूपरेषा ठरवतो आहोत. `गरीब बिचारे' शिक्षक या भूमिकेतून प्रथम बाहेर आले पाहिजे. सहानुभूती, पश्चात्ताप या भावनेतून आपल्या पेशाकडे न पाहता, अभिमानाने पाहायला हवं. शिक्षक स्वत:च जर या पेशाकडे सन्मानाने पाहणार नसतील तर समाजाकडून सन्मान मिळावा ही अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. म्हणून प्रथम स्वत:च्या पेशाला सन्मान द्या. आपण एका महान कार्यात प्रविष्ट झालेले लोक आहोत, ही खूणगाठ बांधली तर पुढचं काम बरंच सोपं होईल.
शिक्षकांनी आपली जबाबदारी पूर्णपणे स्वीकारली पाहिजे. शिक्षकी पेशाचा स्वीकार म्हणजे, रुक्ष कागदपत्रीय सरकारी किचकट कामांमधून वाट काढत, सृजनाचे मळे फुलते ठेवणं. दृष्टिकोण बदलला तर शिक्षक हे करू शकतील. वर्गात असलेली साठ-सत्तर-एेंशी मुलं, त्यांचा सांभाळ, विकास, प्रतिपाळ, सुख-द:ख, क्षेमकुशल ही आपली जबाबदारी आहे असं मानणं!-करणं पुढची गोष्ट!! `मानणं' ही देखील खूप अवघड गोष्ट आहे. ती करण्याला पर्याय नाही, कारण शिक्षकी पेशाकडून तशी समाजाची अपेक्षा आहे. आपली व्यवस्था, घड्याळी तास, शिक्षणेतर कामे खूप उद्वेगजनक आहेत हे मान्य केले तरीही, सकारात्मक दृष्टी ठेवून, याच शिक्षणप्रक्रियेत आपल्याला आनंद निर्माण करावा लागेल, तो वर्गातच निर्माण करावा लागेल; बाहेर सापडणार नाही. आपण प्रयोग केले, प्रयत्न केले तर अध्यापन आनंददायी होऊ शकते; फक्त ते चौकटीत बद्ध न करता नव्याचा ध्यास घ्यावा लागेल,-त्यासाठी सकारात्मकता आणि स्वामित्व. ही शाळा माझी आहे, हे प्रथम स्वीकारलं पाहिजे. कदाचित् वस्तुस्थिती विपरित असेल, प्रतिकूल असेल. पण या व्यवस्था, इथल्या व्यक्ती या अपरिहार्य आहेत. त्या आपल्या सृजनाच्या, आनंदाच्या प्रक्रियेत अडथळा बनणाऱ्या असतील, तरीही त्यांना स्वीकारून, त्यांचा हात धरूनच आपल्याला सृजनाची वाट शोधावी लागेल. शाळा, व्यवस्था, सोयी, सहकारी, वरिष्ठ या सर्वांचा स्वीकार `आपले' म्हणूनच करावा लागेल. जसा आपला देश, समाज आहे तसा स्वीकारावा असे आपण म्हणतो, तेच संस्थेबाबत. त्यामुळे नकारात्मकता न ठेवता हे प्रथम स्वीकारलं पाहिजे.
स्वामित्वभावासोबतच येईल तो आपल्या (अध्यापनाच्या) कामातला अस्सलपणा. मी खरंच `शिकवतोय' ना?- का मी फक्त पोर्शन पूर्ण करतोय? गठ्ठे तपासतोय? समस्या सोडवतोय की फक्त कुणाची तरी मर्जी सांभाळतोय? मी खरंच शिकवतोय का? हा प्रश्न आठवड्यातून एकदा तरी स्वत:ला विचारला पाहिजे. अध्यापनाच्या प्रक्रियेत ज्या सूक्ष्म छटांचा अंतर्भाव आहे, तो समजून घेता आला, तर ती प्रक्रिया परिपूर्ण होईल. शिक्षकाने अध्यापनाची पूर्वतयारी करताना, तो वर्गातल्या श्रोते-प्रेक्षकांसमोर सादर करायचा एक `प्रयोग' आहे असं समजावं. मुलांची संख्या गुणिले तासिकेचा कालावधी इतके मनुष्य तास त्यासाठी खर्ची पडतात. ते वाया जाऊन चालणार नाहीत. यातही अनेक अडचणी आहेत.
अभ्यासक्रमातल्या त्रुटी, मुलांमधला निरुत्साह, नावड, या सर्वांवर मात करण्यासाठी या प्रक्रियेकडे एक `नाट्यप्रयोग रंगवणे' असे पाहावे लागेल. तरच मुलांच्यात ज्ञान-रंजन निर्माण करता येईल. मुलांनाही हे समजावून द्यावे लागेल की, मी काहीतरी ज्ञान नावाचा पदार्थ तयार करून ताटात वाढणार नाही; तुम्हाला ते ग्रहण करता यावं यासाठी तुम्हीही सतर्क, तयार असावं लागेल. ही दुतर्फा प्रक्रिया आहे. मुलांनाही सहभागी करून घ्यावे लागेल. यासाठी अनेक `क्रिएटीव' मार्ग आहेत. पण मुळात ही प्रक्रिया जिवंत करायची असेल तर शिक्षकाची पूर्वतयारी ही त्याची गंगोत्री आहे. मुलांना गुंतवणं, रंगवणं यातही अडथळे आहेत. तरीही शिक्षकाची वितरणाची तयारी, त्यातले वैविध्य हे मूळ आहेच.
साधारणत: सोळा ते वीस वयोगटातील मुले म्हणतात,'थश ुरपीं ५ - ४ - ३ - २ - १'!-पाच आकडी पगार, चारचाकी गाडी, तीन बेडरुमचे घर, दोन मुले व एक बायको असे त्यांचे ध्येय सीमित, पण स्पष्ट आहे. त्यांना जिथे जायचेय तिथे तुम्ही नेणार आहात का? असा त्यांचा प्रश्न आहे. हा विचार चूक की बरोबर हा विषय वेगळा, पण त्यांत निदान स्पष्टता आहे. एका मुलाने म्हटले की, `मी तीन मजली घर बांधेन; जिथे मी-माझे पालक व बायकोचे पालक राहतील' इतकी त्यांना स्पष्टता आहे. त्यांच्या विचारांकडे संकुचित म्हणून हेटाळणी न करता सकारात्मक दृष्टीने पाहून त्यांच्याशी संवाद साधावा लागेल. या पिढीला आता भरीव काय व पोकळ काय हे कळते. केवळ ज्यात काही मुद्दा आहे, सत्व आहे, नेमकेपणा आहे, ते स्वीकारतात. त्यामुळे आमच्या विचारातही स्पष्टता आणावी लागेल. आता मुले गुणवत्तेचा आदर करतील, पण निव्वळ प्रथा म्हणून ऊठसूठ नमस्कार करणार नाहीत. त्यांना त्यांच्या गंतव्य स्थानाचे भान आहे. विचारात व कृतीत मेळ आहे आणि स्पष्टता आहे. त्यामुळे आम्ही आता त्यांना जे काही द्यायला जाऊ, ते सकस, गुणवत्तापूर्णच असलं पाहिजे. जे माप आम्ही त्यांच्या पदरात टाकतो आहोत, त्यात काही नाविन्य, आनंद, त्यांच्या कुतुहलाला-ज्ञानाला खतपाणी घालेल असं काही आहे का, याचा विचार करणं हा शिक्षकांच्या गृहपाठाचा नवा आकृतीबंध आहे. केवळ धड्याखालचे प्रश्न सोडवणे आता पुरेसे नाही. पुस्तकात नसलेले पण मुलांच्या मनात निर्माण होणारे प्रश्न समजून घेणं, त्यांनी ते विचारले नाहीत तरी कल्पनेनं ते जाणता येणं, व त्याच्या उत्तरापर्यंत जाण्याची धडपड करणं हे आवश्यक ठरतं.
अध्यापनाचे काम पूर्वीपेक्षा आता खूप कठीण असेल, तरी ते प्रयत्नाने आनंददायी करता येते. पालकांची भूमिका आता शिक्षकांना गृहीत धरावी लागेल. पालकांच्या दृष्टीने शाळा हे आऊटसोर्सिंग आहे. पालकांनी मुलं घडवण्याच्या प्रक्रियेतून अंग काढून घेऊन चालणार नाही. आम्ही इतके पैसे खर्चून मूल शाळेत घातलं, आता त्याला शाळेने घडवावं असे त्यांना वाटते. पण मूल शाळेपेक्षा घरी अधिक असते. शाळेत त्याला जी मूल्ये शिकवली जातात, त्याच्याशी साधर्म्य असलेले वातावरण घरी असेल तर तो शिकेल. जर वैधर्म्य असे तर तो गोंधळेल. आज वास्तवात असेच घडत आहे. शाळेत समरसता शिकवायची व घरी चर्चा जातीय अस्मितेची. शाळेत भ्रष्टाचाराला वाईट म्हटले जाते आणि घरी तशा मार्गाने पैसा येतो. या दुविधेला तो किशोर वयातला मुलगा तोंड देऊ शकत नाही. त्यामुळे केवळ शाळेवर मुलाची जडणघडण अवलंबून राहू शकत नाही हे शिक्षकांनी पालकांना समजावून द्यावे लागेल. मुलांचं घडणं ही शालेय व शालाबाह्य दोन्ही घटकांत मिळून घडणारी प्रक्रिया आहे.
मुलांनी करायचे प्रकल्प होम टीम व स्कूल टीम यांनी मिळून करायचे अशी कल्पना अमेरिकेतील एका शाळेत पाहिली. मूल ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, हे पालकांना शिक्षकांनी सांगावं लागेल. आजकाल शाळेत पालकसभा असतात. परंतु पालकांचा सहभाग तेथे केवळ तक्रारी सांगणे वा सूचना करणे असा असतो. बदलत्या रचना, कायदे यानुसारही पालकांचा सहभाग अधिक होऊ शकतो. त्यांना शाळेतील अभ्यास व अभ्यासेतर उपक्रम, शाळेचे व्यवस्थापन, संचालन यात सहभागाची, सहकार्याची संधी दिली पाहिजे. त्यासाठी ही शाळा, संस्था आपली आहे. त्यात आपलेही काही दायित्व आहे असे त्यांना वाटले पाहिजे. पालकांनीही अध्ययन-अध्यापनाच्या प्रक्रियेत रुची घेतली पाहिजे, वेळ दिला पाहिजे. शाळेने खरे तर पालकांसाठीही वर्ग घ्यायला हवेत. पालकांची मानसिकता किती सुदृढ, निरोगी आहे यावर पुष्कळ अवलंबून आहे.
पालकत्वही आता खूप ताणाचे आहे. पालक गोंधळलेले आहेत. त्यांना या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी शिक्षकांनी मदत करायला हवी. आणि इतके करूनही जिथे पालक कमी पडतील, ती उणीव शिक्षकांनी भरून काढायला हवी. आताची मुले लवकर मोठी होत आहेत. `प्राप्ते तु षोडशे वर्षे...' असे न म्हणता `प्राप्ते तु द्वादश वर्षे...' असे म्हणावे लागेल. बारा वर्षाच्या मुलाशीही आता मित्रत्वाने वागावे, इतकी ती लवकर जाणती होत आहेत. मुलांना अनेक विषयांत आपल्यापेक्षा अधिक गती आहे हे मान्य करावे लागेल. मुले आता विविध विषयांना-समस्यांना सामोरी जातात. वातावरणाचे बरेवाईट परिणाम त्यांच्यावर होतात व तीही गोंधळून जातात.
अशा वेळी त्याला मित्ररूपी मार्गदर्शकाची गरज आहे. ती भूमिका वास्तविक पालकांची आहे. पण जर पालक यात कमी पडत असतील तर ते काम शिक्षकांचे आहे. निदान काही निवडक क्षमतावान वा गरजू मुलांबाबतीत तरी शिक्षकांनी पालकाच्या या पातळीवर येऊन काम करावे लागेल. परिस्थिती नसलेल्या, मानसिक-भावनिक दृष्ट्या भुकेल्या मुलांची ती भूक भागवायला शिक्षकांनी पुढे यावे लागेल. या सगळयासाठी काही गोष्टी बदलाव्या लागतील.
प्रथम विद्यार्थी-शिक्षक-पालक-संस्था या घटकांत परस्पर सुसंवाद, आंतरक्रिया घडूून याव्या लागतील. या आंतरक्रिया जिवंत, प्रभावी व्हायला हव्या असतील तर शिक्षकांनी या प्रक्रियेसंबंधी त्यांच्या घरांत, समाजातही बोलतं राहायला हवं. सतत नवे प्रयोग करणं व ते बोलत राहणं याने आपला संवाद-सुसंवाद बनेल. दुर्दैवाने वातावरण खूप दूषित आहे. शिक्षक-शिक्षकांतही विसंवाद, ताण आहेत! आधुनिक काळ, तंत्र, विचार यांच्याशी जोडलेलं, अद्ययावत् राहणं, आपले विचार, ज्ञान सतत अद्यतम ठेवणं याची गरज आहे. तंत्र पुढे गेलं तरी अभ्यासक्रम तिथेच थिजल्यासारखे राहिले आहेत. पण ते आपण बदलू शकलो नाही तरी, आपण अद्ययावत् राहाणे व मुलांपर्यंत ताजे ज्ञान पोचवणे हे आपण केले पाहिजे. यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल.
आता चाकोरीबद्ध पद्धतीने शिक्षण कुणालाच नको आहे. आता सर्वांना नाविन्याची आस आहे. तेच ते अन् तेच ते... कुठल्याच बाबतीत आपल्याला नको वाटते. यात बदल आपणच करावे लागेल. ही नाविन्याची भूक प्रथम आपल्यात निर्माण व्हावी व इतरांतही निर्माण करता यावी. जिथे आहे, ती आम्हाला शमवता यावी. अनेकदा नाविन्याचा स्वीकार होत नाही असेही अनुभव येतील पण यावरही मार्ग आपणच शोधावा लागेल. आपण मुलांना करिअरचेही सर्व मार्ग समजावून देत नाही. विविध क्षेत्रे, कोर्सेस, व्यवसाय यांची माहिती मुलांना करून दिली पाहिजे. मुलांना विविध व्यवसायिकांशी बोलण्याची, ते व्यवसाय पाहाण्याची संधी दिली पाहिजे, जेणेकरून मुलांच्या भवितव्याच्या कल्पना केवळ स्वप्नाळू राहणार नाहीत. यासाठी `शिकवू आनंदे'ची प्रक्रिया गतिमान करावी.
***
इंग्रजीबद्दल गैरसमज
- मॅक्सिन बर्न्टसन्
प्रगत शिक्षणसंस्था नेहमीच मराठी माध्यमाचा आग्रह धरते. मराठीचा वापर व मराठीचा विकास याचा आग्रह धरला जायला हवा. पण संपूर्ण महाराष्ट्नचं चित्र पाहिलं तर मराठीची पीछेहाट होताना दिसते. अनेक मराठी शाळा बंद पडत आहेत. मी भारतात आल्यावर संशोधनाला सुरुवात केली, त्यापेक्षा आता मला मराठीचं प्रमाण खूप कमी झालेले दिसते. महाराष्ट्न्च नव्हे तर देशभरात, अन्य राज्यांतही इंग्रजीचा प्रभाव जास्त दिसतो. मातृभाषा मागे पडतात. महाराष्ट्न् शासन आत्मप्रौढीने सांगते की, `पहिलीपासून इंग्रजी करण्यात आम्ही अग्रेसर आहोत' पण शैक्षणिक स्थिती फारशी चांगली नाही. आज मराठी शाळेला मान्यता मिळणे, ती शाळा चालवणे खूप कठीण आहे. महाराष्ट्न् सरकारने मराठी शाळांना प्रोत्साहन दिलेले नाही. नेमके काय चुकते आहे, याचा विचार करायला हवा. जगभरातून येणारा दबाव आपण नाकारू शकत नाही. जगात वावरण्यासाठी इंग्रजी महत्त्वाची आहे पण त्यासाठी इंग्रजी माध्यमाची गरज नाही, हे कुणालाच पटत नाही.
इंग्रजी येण्यासाठी आम्ही आर्थिक आणि सांस्कृतिक त्याग करत आहोत, याचे भान आम्हाला नाही. शास्त्र आपणास सांगते की, ३ ते ५ वर्षांपर्यंत मुले दुसरी भाषा शिकू शकतात, म्हणून त्यांना लवकर इंग्रजी शिकवावे हे अर्धसत्य आहे. आपण इंग्रजी बोलण्याने आपल्याला प्रतिष्ठा मिळते हा आणखी एक गैरसमज. तथाकथित मान मिळवण्यासाठी आपली मातृभाषा सोडणे अत्यंत चुकीचे आहे. आज इंग्रजी माध्यमातून बाहेर पडणारी मुले भाषिक व सांस्कृतिकदृष्ट्या त्रिशंकूसारखी बनतात. इंग्रजी माध्यमात शिकताना पाठांतरावर जास्त भर देण्यात येतो. त्यामुळे ग्रहणशक्ती व आकलनशक्तीत ही मुले कमी पडतात. या मुलांना देशाचा इतिहास, संस्कृती या विषयात अज्ञान असते. ही मुले संवादात कमी पडतात. अर्थात् जुने ते सारे सोने असे न म्हणता चिकित्सक अभ्यासू वृत्ती जपली पाहिजे. संशोधक सांगतात की, प्रथम मातृभाषा उत्तम येणे व त्या भाषेत विचार करण्याची शक्ती विकसित होणे महत्त्वाचे. दुसरी भाषा नंतर उत्तम शिकता येते. फक्त मराठी-इंग्रजी असा वाद निर्माण न करता प्रेमाने मुलांना शिक्षण द्यावे, अशी अपेक्षा आहे.

शिक्षणातून जीवनमूल्यं पुरवावीत
- शंकर अभ्यंकर
खरं तर सगळं मानवी जीवनच आनंदे शिकू असं आहे. आपल्या धर्मपरंपरेत शिक्षणाला महत्त्वाचं स्थान आहे. मानवी जीवनाला घडवणारे जे सर्व व्यवसाय, विद्या, कला आहेत त्यात शिक्षण सर्वश्रेष्ठ आहे. बिघडण्यापूर्वी घडण्याचं काम शिक्षण करतं. वैद्यकीय व्यवसाय, वकिली वा संरक्षण, हे बिघडल्यानंतर घडवण्याचं काम करतात. शिक्षणाचं मानवी जीवनातलं योगदान अलौकिक आहे. आपली सर्वधर्मसमभाव ठेवणारी परंपरा `वसुधैव कुटुंबकम्' हे सांगते. हा माझा, तो दुसऱ्याचा हा भाव जनसामान्य बाळगतात. पण ज्यांचं काळीज सुपाएवढं आहे, हृदय आकाशासारखं व्यापक आहे, असे श्रेष्ठजन विश्वात्मक विचार करून म्हणतात, `वसुधैव कुटुंबकम्'-ही सगळी वसुंधरा म्हणजे एक घर! असं असेल तेव्हा त्या घराचा दिवाणखाना म्हणजे अमेरिका, त्याची सजावट म्हणजे स्वित्झर्लंड, त्या घराची उद्यमशीलता म्हणजे चीन व जपान, त्या घराचं दुकान म्हणजे युरोप, पण घरातलं देवघर म्हणजे आपला भारत.
`शिकू आनंदे'सारखे प्रकल्प विद्येचं, ज्ञानाचं, कलेचं पावित्र्य राखतात. तरच हे देवघर चांगलं राहू शकतं. शिक्षणाचा गरिमा, महत्त्व सर्वंकष आहे. या देशात शिक्षणाची पूजा बांधली जाते. भगवद्गीतेने सांगितलंय, `नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमहि विद्यते' ज्ञानाइतकं पवित्र दुसरं काही नाही. `विद्या नाम नरस्यरूपमधिकं प्रच्छन्न गुप्तंधनं, विद्या भोग करी यश: सुखकरी विद्या गुरुणां गुरु:..' अशी विद्येची थोरवी आपल्या पूर्वजांनी सांगितली आहे. `विद्या ददाति विनयं...' विद्या विनय देते, विनयामुळे तुम्हाला पात्रता, धन, सुख प्राप्त होते... अशी मालिका सांगितली आहे. विद्येचे दोन प्रकार सांगितले आहेत-एक अपरा विद्या व दुसरी परा विद्या. ज्यामुळे मनुष्य आत्मोन्नत होतो व अंतिम सत्याचा अनुभव घेतो त्याला पराविद्या म्हणतात. हे भौतिक आयुष्य संपन्नतेने जगावं,- म्हणजे केवळ धनसंपन्नता नव्हे, तर मी अंतरंगातून, मन-बुद्धी-चित्त-अहंकारातून उन्नत व्हावं आणि हे मानवी जीवन `काव्य शास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम्' असं अतिशय उत्तमपणे जगता यावं, हे ज्यामुळे शक्य होतं ती अपरा विद्या.
आपल्या परंपरेनं शिक्षणाचं सर्वोच्च ध्येय कोणतं, तेही सांगून ठेवलं आहे. `सा विद्या या विमुक्तये...' (ती विद्या जी मोक्षदायिनी) अनेक शैक्षणिक संस्थांचं हे ब्रीदवाक्य ठरलं. इतकी शिक्षणाची पूजा आपल्या राष्ट्ननं बांधलेली आहे. आता शैक्षणिकच नव्हे, राजकीय, सामाजिक सर्वच क्षेत्रे खूप बदलून गेली आहेत. आम्ही चार भावंडं एक कंदिल अभ्यासासाठी वापरत असू. महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी रोज दहा मैल चालत असू. पण त्याचं काही वाटत नसे. कारण महर्षि कर्वेचा आदर्श डोळयापुढे होता. कर्वे मॅटि्न्कच्या परीक्षेसाठी कोकणातून साताऱ्याचं १०० मैलाचं अंतर कुंभार्लीसारख्या खडतर, श्वापदांनी भरलेल्या घाटातून चालत पार करत व परत येत! अशी चरित्रं डोळयापुढे असल्यामुळे, शिक्षण हे कष्टसाध्यच असतं व त्यातून उत्तमातले उत्तम संस्कार स्वत:वर करून घ्यायचे असतात, अशी भावना आमच्या पिढीच्या मनात पक्की रुजलेली होती. आज मनाला कुठेतरी खंत वाटते की, स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षांत हा आलेख खूप खाली आला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून तळमळणारे प्राध्यापक आम्ही पाहिले. ज्या ओढीने विद्यार्थी येत ते आम्ही पाहिले, दूरदृष्टी असणारे प्राचार्य पाहिले; मग हा आलेख आता इतका खाली का?
उत्तर सोपं आहे. कुठल्याही देशाची शिक्षणप्रणाली, त्या राष्ट्नचं जे चिंतन आहे, तत्त्वज्ञान आहे त्यातून उगवून आली पाहिजे. आपण संपूर्ण जगाचा विचार केला तर दिसतं की, ग्रीक-रोमन हे खूप आदर्शवाद घेऊन चालत होते. पण आश्चर्य म्हणजे अॅरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस हे जे थोर तत्वज्ञ होते, त्या सर्वांना त्या काळची गुलामगिरी मान्य होती. पण तरीही ते आदर्शवाद घेऊन चालले व त्यांनी ग्रीक रोमन राष्ट्नंची निर्मिती केली. युरोपात निसर्गवाद आहे. सर्व साम्यवादी राष्ट्नंत प्रखर वास्तववाद आहे. अमेरिका ही उपयुक्ततावादावर आधारित आहे. भारताच्या संदर्भात आम्ही कोणताही विचार न करता या सर्व विचारांचे तुकडे घेतले, त्याची गोधडी केली व आमच्या विद्यार्थ्यांवर पांघरली. असा विद्यार्थी ना घरका ना घाटका!
प्राथमिक शाळांपासून विद्यापीठ स्तरापर्यंत हे जाणवतं. याचं कारण आम्ही आमच्या तत्त्वज्ञानावर आधारित अशी शिक्षणप्रणाली निर्माण करूच शकलो नाही. ज्यातून शिक्षणाचा वृक्ष बहरेल व त्याची फळे-फुले विद्यार्थ्यांना चाखायला मिळतील असे आमचे तत्वज्ञान कोणते याचा विचार राज्यकर्त्यांनी कधी केलाच नाही. आपल्या राष्ट्नचे जे मूळ आहे ते अध्यात्मवाद आहे. त्यामुळे संपूर्ण शिक्षणाची रचना या विचारावर आधारित हवी. तशी ती झाली तरच त्यातून जाणतेे नागरिक तयार होऊ शकतात. आज दुर्दैवाने आपली भव्यदिव्य परंपरा आपण फेकून दिली. जुन्यातलं चांगलं उचलून नव्याचा त्यासोबत समन्वय करा, ही आपली परंपरा. ज्ञान व विज्ञान याचा समन्वय करणारी ही परंपरा आहे. अध्यात्म आणि विज्ञान हे हातात हात घालून चालावं; अध्यात्माच्या पायावर ज्ञान विज्ञान व तंत्रज्ञानाची इमारत उभारावी हेच आमच्या पूर्वसूरींचं स्वप्न होतं. पण ज्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणक्रमाची रचना केली, ते याला परिचितच नव्हते. त्यामुळे भारतीय परंपरेतून इथे काहीही निर्माण झाले नाही. आपण निधर्मी झालो, आणि पुढे दोन पिढ्या अशा अश्रद्ध झाल्या की, जुनं-पारंपारिक ते सर्व टाकाऊ आणि परदेशांतून आलेलं सर्व चांगलं अशी सुरुवात झाली. वैदिक गणित इतकं संपन्न आहे पण त्याचा अभ्यास, संशोधन कधी झालंच नाही.
शिक्षणाची चार अंगे आहेत. अध्ययन, अध्यापन, विस्तार आणि संशोधन हे चार स्तंभ, - ज्यावर शिक्षणाचा डोलारा उभा असतो. आज संस्था विस्तार करतात पण तो फक्त संख्यात्मक;-गुणात्मक नाही. विद्यालये म्हणजे विद्या लयाला गेलेले ठिकाण, अशी अवस्था आहे. टिळकांनी लिहून ठेवलं, `आज आमची सर्व विद्यापीठे केवळ कारकुनी करणारे हमाल तयार करत आहेत.' दुर्दैवाने हे आजही खरे आहे. खरे तर विज्ञान तंत्रज्ञानाचा स्फोट होत आहे, पण त्याला अध्यात्माचा पाया देऊन शिक्षणक्रमाची रचना करायला हवी. महात्मा गांधी, रवींद्रनाथ, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद या सर्वांनी या प्रकारच्या शिक्षणपद्धतीचं सखोल चिंतन करून ते लिहूनही ठेवलं आहे पण आपण त्यांचे केवळ दिवस साजरे करतो आहोत. विचार वा आचार घेतच नाही. या देशात विद्येला असलेलं सर्वात उच्च स्थान व कला, ज्ञान, विज्ञान, विद्या या सर्वांना असलेला अध्यात्माचा पाया. हा आमचा शिक्षणपद्धतीचा केंद्रबिंदू असायला हवा.
स्वामी विवेकानंद म्हणत, `प्रत्येक राष्ट्नचा एक षड्ज असतो. (षडज् म्हणजे ज्यातून रे,ग,म,प,ध,नी हे सहा स्वर जन्मतात तो..) या राष्ट्नचा षडज् आहे धर्म व अध्यात्म'. पण ते आम्ही सर्वप्रथम हद्दपार केले! त्याचा परिणाम असा झाला की सगळे सद्गुण हळूहळू लयाला गेले. पूर्वी सगळं जगच मनुष्यकेंद्री होतं. आता ते अर्थकेंद्री झालं, हा मूलभूत बदल झाला. मानवकेंद्री संस्कृती, शिक्षणव्यवस्था हरवून ती धनकेंद्री बनली हा सर्वात मोठा पराभव आहे. सर्वप्रथम हा विचार करायला हवा. शिक्षणव्यवस्था नेमकी कशातून निर्माण होणार याचं सखोल चिंतन आम्ही केलं आहे का? आज विद्यापीठीय शिक्षण घेतलेले विद्यार्थीही किमान क्षमता, कौशल्ये यात मागे दिसतात. दुर्दैवानं शिक्षक अध्यापकांची अवस्थाही फार वाईट आहे. पूर्वीच्या शिक्षकांचा व्यासंग, ज्ञान लयाला गेलंय. विद्या ज्ञान यांचे प्रेम नसलेले केवळ पाट्या टाकणारे शिक्षक आज दिसतात.
एकीकडे विज्ञानाची झेप एवढी की प्रत्येक मुलाच्या हातात संगणक, कर्णपिशाच्च पण त्यासाठी जीवनाला काहीतरी ध्येय असावे लागते. ते ध्येय, पाथेय त्याला शिक्षणातून मिळणे अपेक्षित आहे. हे पाथेय म्हणजे सगळी मूलभूत मूल्ये बेसीक रुल्स, - फंडामेन्टल ह्युमन व्हॅल्यूज्. याचे चार प्रकार - शारीरिक, मानसिक, वैचारिक व आध्यात्मिक. हा प्रवास शिक्षणातून व्हायला हवा. प्राथमिक शिक्षणातून शारीरिक विकास, माध्यमिक शिक्षणातून मानसिक उन्नती, उच्च शिक्षणातून वैचारिक जडणघडण व विद्यापीठीय शिक्षणातून आध्यात्मिक मूूल्ये, विकासाचा असा प्रवास घडणे अपेक्षित आहे.
ही मूल्ये जर धारण केली तर विद्यार्थ्यांत आमूलाग्र बदल घडेल. पण ही मूल्ये संक्रेमत होऊ शकतील असा आमचा अभ्यासक्रमच नाही. अभ्यासक्रमातून राष्ट्नबद्दल प्रेम निर्माण व्हायला हवं. महाविद्यालयात गेल्या गेल्या आमचा विद्यार्थी फक्त परदेशी जाण्याची स्वप्नं पाहातो. कारण देश, संस्कृती, परंपरा याविषयी प्रेम निर्माण करण्याचं काम शिक्षणाने केलंच नाही. सर्व परंपरा टाकाऊ म्हणून फेकून दिल्या. मूळ इतिहास, वास्तव याचा अभ्यासही आम्ही करत नाही. फक्त ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून आम्ही परंपरांना तुच्छ लेखतो. आपण मूळ ग्रंथ वाचण्याची, अभ्यास करण्याची प्रेरणा द्यायला हवी. सगळी जीवनमूल्यंच आम्ही हरवून बसलो. पूर्वी क्लासला जाणं हे अप्रतिष्ठेचं लक्षण, `ढ' असल्याचं लक्षण वाटे. आज क्लासवर प्रतिष्ठा, हुशारी मोजली जाते. कालाय तस्मै नम: ।
विद्यार्थ्याचं त्रिविध व्यक्तिमत्त्व बनवावं व शारीरिक, बौद्धिक, मानसिक, आध्यात्मिक ही जीवनमूल्यं त्याला पुरवावीत, तर विद्यार्थी नराचा नारायण बनेल. माध्यम कुठलं यावरही रण सुरू असतं. मातृभाषेला अवकळा आली. असे का व्हावे? मराठी भाषा अतिशय समृद्ध आहे. पण संतवाङ्मयाचे भांडार आम्ही क्रेमक पुस्तकाच्या एका धड्यात बसवले. मुले मातृभाषेतूनच उत्तम विचार करतात. आपण फक्त अभिव्यक्त अन्य भाषेत होतो. मराठीचं महत्त्व कमी करून चालणार नाही. मराठी शाळा संपल्या तर मराठी केवळ बोलीभाषा राहील. इंग्रजी ही विश्वभाषा हे धादांत असत्य. रशिया, चीन, मंगोलिया, जपान इथं इंग्रजी भाषा नाही. ब्रिटन वगळता युरोपातही नाही. ते देश त्यांची भाषा बोलतात. इंग्रजी ही पोट भरायची भाषा आहे हे मान्य करा पण सक्ती करू नका. सर्व शिक्षणतज्ज्ञ इंग्रजीची सक्ती नको म्हणतात. मातृभाषेचे महत्त्व सांगतात.
टागोर, विवेकानंद यासारख्यांनी या राष्ट्नला समजून घेतलं व त्याला अनुकूल असा शिक्षणविचार मांडला. पण तो आम्ही समजूनच घेत नाही. शेवटी संस्कृती जगते कशावर? भाषा, पोशाख व सभ्याचार. पण हे सर्वच आम्ही आंग्लाळून टाकले. इंग्रजी म्हणजे सन्मान ही धारणा विकृत. आपण आपले सभ्याचार सोडू नयेत. नमस्कार ही सभ्य, शास्त्रशुद्ध पद्धत. आम्ही आमचे सर्वच विसरून गेलो आहोत. पसायदानही पाठ नसणारे प्राचार्य मी पाहिले, हे केवढे दुर्दैव! मराठी माध्यमात शिकूनही जगभरात पराक्रम गाजवता येतात. इंग्रजी भाषेतून शिक्षण म्हणजेच प्रगती, हा विकृत विचार काढून टाका.
आपल्याकडे नागरी विभाग व ग्रामीण विभाग यात महद्अंतर आहे. मग पाठ्यक्रम सारखा कसा? शिक्षण कशाला म्हणतात तेच आम्हाला कळत नाही. त्यातून सुजाण नागरिक घडत नाहीत. व्यावसायिक, पारंपारिक कौशल्ये, बारा बलुतेदारीबरोबर आम्ही संपवून टाकली. आता धड शिक्षणाचा उपयोग नाही, कौशल्येही गमावली अशी अवस्था झाली. विद्यार्थी प्रगल्भ, पक्व, प्रगत, प्रसन्न व्हावा, माणूस व्हावा असं शिक्षण हवं. शाळेत अपात्र ठरणारी माणसेही खूप मोठी झाली आहेत. मुलांच्यातली गुणवत्ता हेरून ती फुलवण्यासाठी विद्यार्थ्याला मदत करणं हे शिक्षकाचं काम; सर्वांना मेडिकल-इंजिनियरिंगला आंधळेपणानं ढकलणं हे नाही.
या संपूर्ण शिक्षणप्रक्रियेत महत्त्वाची गोष्ट आपण हरवून बसलो, ती म्हणजे चारित्र्य. चारित्र्यसंपन्नता हा शैक्षणिक संस्थेचा गाभा, तोच हरवला आहे. जीवनमूल्ये, आदर्श, काळाच्या-विज्ञानाच्या रेट्यात हरवून गेली. विज्ञान-तंत्रज्ञान तटस्थ आहे. आहारी आम्ही गेलो. मनुष्य शिक्षणप्रक्रियेतून सुबुद्ध-सुजाण घडला तर तो विज्ञानाचा विधायक वापर करेल. विज्ञानाला ज्ञानाचे डोळे व ज्ञानाला विज्ञानाचे पाय हवेत. ज्ञानाविना विज्ञान आंधळे व विज्ञान नसेल तर ज्ञान पांगळे ठरते. म्हणून हे दोन्ही एकत्र हवेत. हे घडेल तेव्हा भारत बुद्धीच्या क्षेत्रात सुजलाम् सुफलाम् होईल. परकीय चलन येतं, या नावाखाली कुटुंबव्यवस्थेचा नाश करून परकीय कंपन्यांची नवी गुलामगिरी आम्ही पत्करली. चंगळवादाच्या हव्यासापोटी आपल्या राष्ट्नचा मेरुदंड असलेली कुटुंबव्यवस्था आम्ही उध्वस्त केली. किती कुटुंबात एकत्र रामरक्षा, गीता म्हटली जाते? संस्कार व शिक्षण याबाबत तडजोड करू नये. जे जे उत्तम, उत्कट, भव्य, दिव्य ते ते सर्व प्रकटावे, हे खरं शिक्षण. गीता हा विज्ञाननिष्ठ  व तत्त्वज्ञानाने परिपूर्ण असलेला सर्वश्रेष्ठ ग्रंथ. तो शिक्षणाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. गीता केवळ धर्मग्रंथ नाही. गीतेत सर्वांच्या व्याख्या आहेत. कर्ता, कर्म, बुद्धी, सुख, ज्ञान, अज्ञान, तप म्हणजे काय, हे तर सांगितले आहेच! अन्न कुठले खावे, कुठले खाऊ नये हेदेखील सांगितले आहे. राष्ट्नीय चारित्र्य घडणं हा हेतू ठेवून सगळी पुनर्रचना आम्हाला करावी लागेल. सगळया राष्ट्नला एकत्र आणणं हे शिक्षणानं साध्य होवो. `शिकू आनंदे'ने पेरलेलं बीज फुलावं, फळावं, बहरावं. हा प्रकल्प शाश्वत होवो अशी प्रार्थना सरस्वतीचरणी करतो.
(मोबाईल) असतो. नानाविध चित्रफिती, दूरदर्शनचा रतीब अव्याहत सुरू असतो. मुलं तासन्तास टीव्हीपुढे का बसतात? त्याचं कारण आहे. संशोधन असं सांगतं की, आपण मिळवतो त्यापैकी ८३% ज्ञान आपण डोळयांमार्फत घेतो. उरलेलं ज्ञान उर्वरित ज्ञानेंद्रियांमार्फत. म्हणून कोणतंही दृश्यमाध्यम विद्यार्थ्यांना जास्त आकर्षित करतं. आज शाळेतील विषय नेमके कशासाठी, याचेच भान नाही. भाषा विषय मुळात साहित्याची गोडी लागावी, कालातीत अशा वाङ्मयाचा त्यांनी शोध व बोध घ्यावा, यासाठी आहेत. गणित व विज्ञान यातून तर्कविचार, कार्यकारणभाव निर्माण होतो. समाजशास्त्रातून शाश्वत जीवनमूल्ये दिली जातात. ही कल्पना असली, हे भान असलं तर, मी वर्गात का शिकवतोय हे आपोआप उलगडतं. पण दुर्दैवाने हे अनेकांना अज्ञात आहे. आपली माती, प्रकृती, संस्कृती यातून सगळी शिक्षणप्रक्रिया उगवली, उमलली पाहिजे. विद्यार्थी घडवणं हे आमचं मूलभूत ध्येय आहे.
विद्यार्थ्यांच्या विकासाची तीन अंगे आहेत. एक बौद्धिक, भावनिक व सर्जनशील. आज ही तीन अंगे फुलतील असा अभ्यासक्रम नाही, मानसिकताही नाही. आज सारं काही फक्त परीक्षेवर, पर्यायाने फक्त स्मरणशक्तीवर केंद्रित! हे हास्यास्पद आहे. भावनांचे शुद्धीकरण व त्यायोगे हृदयाचे विकसन यासाठी कोणतीही प्रक्रिया नाही. हे सर्व कलांमधून घडते. पण त्याचे शिक्षणच पुरेसे नाही. कला या विधायक असतात. त्यामुळेच हृदयाचे विकसन होते. त्यातून आत्मीयता, आदर, बंधुभाव विकसित होतो. एखाद्याला बौद्धिक शिक्षणात रस नसेल, त्याला कलांमध्ये रस असेल, पण त्याच्याकडे लक्ष द्यायला शिक्षकांना वेळ नसतो. अतिशय उदात्त अशी गुरुशिष्य परंपरा आपल्याकडे होती. त्यावेळी हृदयाचे विकसन होत होते. कला माणसाला विधायक बनवतात. तो विघातक कृत्य करूच शकत नाही.
आमची संतपरंपराही मोठी. ते लोक शिक्षकच होते पण त्यांचा लोकशिक्षणाचा पैलू आमच्या शिक्षणात येत नाही. संत तिरुवल्लुवर यांची एक खूप छान गोष्ट आहे. त्यांनी विणलेले कापड विकण्यासाठी ते एकदा बाजारात बसले. एकाला त्यांच्या अ-क्रोधाची परीक्षा पाहायची लहर आली. त्याने विचारले, `या कापडाची किंमत किती?' तरुवल्लुवरांनी किंमत सांगितली. त्या माणसाने कापडाचे दोन तुकडे केले आणि म्हणाला, `आता किती?' ते म्हणाले, `निम्मी'. तो माणूस ते कापड फाडत गेला व तिरुवल्लुवर न रागावता किंमत कमी कमी सांगत गेले. शेवटी तो वरमला. त्याने तिरुवल्लुवरांचे पाय धरले आणि म्हणाला, `मला क्षमा करा!' यावर ते म्हणाले, `क्षमा मागायची आहे का? मग ज्याने हे वस्त्र विणले त्या कोष्ट्याची, रंगवले त्या रंगाऱ्याची, धागे बनवणाऱ्या कामगारांची, कापूस वेचणाऱ्या बायकांची, तो कापूस पिकवणाऱ्या धरित्रीची, तिच्यात श्रम करणाऱ्या शेतकऱ्याची, पिकाला पाणी पाजणाऱ्या पावसाची, ते वाहून आणणाऱ्या ढगाची, तो ज्या वाफेपासून बनतो त्या समुद्राची, ती वाफ जो करतो त्या सूर्याची आणि सूर्य-चंद्र ज्याचे नेत्र आहेत त्या सर्वात्मक परमेश्वराची तू क्षमा मागायला हवीस!' एका छोट्या वस्तूतला विश्वात्म भाव त्यांनी त्याला दाखवून दिला. तो मुलांना सांगायला हवा! नाहीतर बाक, भिंती या वस्तू केवळ गिरगटण्यासाठी आहेत, असे मुलांना वाटते. आपली संस्कृतीच विश्वात्मक आहे, हा भाव मुलांच्यात रुजवायला हवा.
शिक्षकांचे चार प्रकार असतात. एक शिकवतो (ींशरलहशी) , दुसरा विवेचक (शुश्रिरळपी), तिसरा संदर्भासह विस्तार करून उलगडून दाखवतो (शश्ररलेीरींशी), चौथा प्रेरणा जागवतो (ळपीळिीशी). असे प्रेरणा जागरणाचे काम करायला हवे.
तिसरे अंग सर्जनशीलता. परमेश्वर कुणालाही रिकामे पाठवत नाही. खेळात रुची असणाऱ्यांना वर्गात कोंडणे अन्यायकारक. पण दुर्दैवाने आपल्याकडे सब घोडे बारा टक्के, अशी पद्धत. एका परीक्षेवर पूर्ण आयुष्य, भवितव्य अवलंबून! वस्तुत: शिक्षणक्रम हा लवचिक असावा. विद्यार्थ्याला एका परीक्षेमुळे अपात्र, नालायक ठरवू नये. त्याला लवचिक अभ्यासक्रम न्याय देऊ शकेल. अनेक मुले भावनिक कोंडमारा घेऊन जगतात. त्याचा निचरा करून देऊन त्याला तिन्ही अंगांच्या समन्वयातून उन्नतीकडे नेणं म्हणजे शिक्षण.
फक्त पैसा पाडणारी यंत्रं आम्हाला तयार करायची नाहीत. आज विज्ञानाच्या युगात चंगळवादाला अवास्तव महत्त्व आलं आहे. कुणालाही इतरांची चिंता वाटत नाही. समाजाची काळजी नाही. आत्मकेंद्री समाजाने राष्ट्नचे अपार नुकसान झाले आहे. मानवच उन्नतीकडे वाटचाल करू शकतो,


स्वा.सावरकरांच्या मृत्यूला ४९ वर्षे होऊन त्यांच्या पुण्यस्मरणाचे ५० वे वर्ष सुरू होत आहे. 
२६ फेब्रुवारीच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांचे कालसुसंगत विचार...
विज्ञानविषयक
स्वा.सावरकर अंदमानातून सुटल्यानंतर ते रत्नागिरीत आले. तिथे त्यांनी जातीनिर्मूलन, अस्पृश्यता निवारण अशा सामाजिक कार्याबरोबरच खूप लेखन केले. किर्लोस्कर मासिकात त्यांचे विज्ञानवादी निबंध प्रसिद्ध होत असत. `आत्महत्त्या आणि आत्मार्पण' हा त्यांचा शेवटचा निबंध १९६४ मध्ये प्रसिद्ध झाला आणि त्यांनी १९६६ मध्ये प्रायोपवेशन केले.
विज्ञानावर त्यांचा भर होता. हा देश आणि जनता मागासलेली राहिली, तिला विज्ञानाचे महत्त्व कळावे म्हणून त्यांनी जे निबंध लिहिले ते `विज्ञाननिष्ठ निबंध भाग १ व २' म्हणून प्रसिद्ध झाले. १९९१ मध्ये त्या पुस्तकाची सहावी आवृत्ती प्रसिद्ध झाली.
आपल्या धर्मभोळया `श्रुतिस्मृतिपुराणोक्त' ज्ञानावर विसंबणाऱ्या देशबांधवांच्या डोळयात अंजन घालून `सनातन धर्माच्या जोखडातून त्यांना विज्ञानाची कवाडे उघडी करून देण्यासाठी' हे निबंध लिहिले. त्यांच्या निबंधांवर त्याही काळी महाराष्ट्नत खूप वादविवाद झाले.
निबंधांची भाषा रुक्ष असली तरी त्यातील विचार पोटतिडकीचे, तर्काधिष्ठित आहेत. एकेका मुद्द्याचा सावरकरांनी किती प्रकारे, किती पर्यायांनी विचार केला ते वाचून स्तिमित व्हायला होते. एकेक विषय पिंजून ते लोकांपुढे ठेवत. त्यांची काही वाक्ये वैज्ञानिक सुभाषितेच ठरतील -
मनुष्य हा ह्या विश्वाच्या देवाच्या खिसगणतीतही नाही.
धार्मिक उपायांपेक्षा भौतिक साधनांवरच अधिक भर हवा.
जो जो देवांचे अधिष्ठान कमी होऊ लागेल, तो तो यशाचे माप पदरी भरभरून पडेल.
सृष्टीनियमांना `लॉ'हा शब्द लावतातच ना?- जसे `लॉ ऑफ ग्रॅव्हीटेशन'
सृष्टीचा धर्म, पाण्याचा धर्म, अग्नीचा धर्म... इथे धर्म म्हणजेच त्यांचे शास्त्रीय नियम, त्यांचे लॉ-म्हणजे कायदे.
या भूतांना, शक्तींना, माणसाळवणारे महामंत्र, शब्दनिष्ठ वेदान्त वा झेंद अवेस्तात, कुराणात वा पुराणात सापडणारे नसून प्रत्यक्षनिष्ठ विज्ञानातच सापडणारे आहेत.
सनातन विचारांची, आचारांची चिरफाड करताना सावरकरांनी कितीतरी प्रचलित विषयांना हात घातला. प्रेत जाळावे की पुरावे?, तिरडीच कशाला-शवपेटी का नको?, इतर प्राण्यांचे मांस चालते मग गोमांस का नको?, सर्व तेहतीस कोटि देव गाईच्या पोटी राहिले कसे?, ज्यावेळी अग्नी पेटविणे कठीण होते त्या काळी अग्नीहोत्र असणे ठीक होते; आता आगपेटी आली, मग अग्नीहोत्र कशाला?, यज्ञात बळी द्यायचा तो पुष्ट पशू की पिष्ट पशू?, यंत्र हे शाप की वरदान?...वगैरे.
- संकलन : चंद्रकांत वेलणकर, मालाड, मुंबई

महिलाविषयक
आपल्यात समजूत अशी की, मुलगा हवा-मुलगी नको. मुलीकडे माता फार थोडे लक्ष देतात, पण ही चूक आहे. मुलींची चांगली जोपासना केली पाहिजे. मुलगीच पुढच्या पिढीची जननी आहे. भावी पिढी तेजस्वी नि सामर्थ्यवान निपजावी आणि तिने देशाचे पारतंत्र्य घालवावे अशी इच्छा असेल तर मुलीच्या जोपासनेकडे योग्य लक्ष दिले पाहिजे. योग्य वय होईपर्यंत मुलीचा विवाह करू नये. मुलींची अशी समजूत असते की, अशक्तपणा म्हणजे नाजूकपणा, व तो एक कौतुकास्पद गुण आहे. पण ही त्यांची समजूत चूक आहे. सशक्तपणा हेच खरे सौंदर्य. ईश्वरनिर्मित सौंदर्य आपल्या हाती नाही, पण सशक्त सौंदर्य आपल्या हातचे आहे. (सन १९२४)

निसर्गरचनेप्रमाणे जे आपल्या वाट्याला आले आहे ते करणे स्त्रियांचे कर्तव्य आहे. स्त्रियांनी इतर ज्ञानाबरोबरच थोडेसे वैद्यक, शुश्रुषा आदि गोष्टी शिकल्या पाहिजेत. स्वत:चे आणि मुलांचे मानसशास्त्र यांचे ज्ञान त्यांना असले पाहिजे. हल्लीच्या मुलींना लग्नापूर्वी शिक्षणाचा ताण व नंतर संसाराचा ताण पडतो हे पाहून मला दु:ख होते. त्यातच नोकरी धरली तर विचारायला नको. तेव्हा एक काहीतरी करा... जीवनाकडे भव्यतेने पहा, त्याला वाहून घ्या. चांगली संतती निर्माण करून तिला उत्तम शिक्षण देऊन राष्ट्न् समर्थ आणि समृद्ध करण्याचे श्रेय घ्या. (सन १९५०)

ज्यायोगे मनुष्याच्या कल्याणार्थच विनियोग होईल, अशाच प्रमाणात नि प्रकाराने सौंदर्यास महत्त्व द्या, त्यास सत्कारणी लावा, हेच शील! हे शील म्हणजे जन्मभर पुरणारी नि मृत्यूनंतरही उरणारी संपदा आहे. जिला रूप नाही पण परोपकारी वत्सल नि विवेकी शील आहे ती स्त्री, जिला नुसते रूप आहे पण परोपकारी वत्सल नि प्रामाणिक शील नाही तिच्यापेक्षा अधिक गौरवार्ह समजली पाहिजे. परंतु लावण्यावतींनो, तुम्ही हे विसरता कामा नये की लावण्य ही तुमच्या हाती सोपविलेली निसर्गाची दैवी ठेव आहे.
जिच्या कौमार्यात लावण्याचा नेत्रानंददायी चंद्र आरोग्याच्या सकल कलाही प्रफुल्ल झालेला आहे, सच्छील यौवनात जिच्या उदरी देवदूतासारखी सुंदर नि सुलक्षणी बालके जन्मली आहेत, आणि त्यांना आपल्या त्या लावण्याचे नि शीलाचे ते वत्सल दूध पाजून संवर्धिताना, जी स्वत: प्रतिपदेच्या चंद्रकोरीसारखी क्षीण कलांनीच पूर्ण कलापेक्षाही प्रौढावस्थेत सुभग भासत आहे, त्या जननीला आमचे शतवार वंदन असो.
संकलन-मंजिरी मराठे, दादर, मुंबई २८

मूल्यविचार
पूज्य विनोबा हे असे विचारवंत होते की, त्यांचे विचार बदलत्या काळानुसार त्यांच्या अंगभूत प्रगल्भ आणि सूक्ष्म दृष्टीमुळे नव्याने अधिकाधिक कळत राहतात. विनोबांचे विचार मूलभूत असून त्याला कृतिप्रवणतेची जोड असे.
आपल्या आईच्या अत्यंत साध्या जगण्याच्या पद्धतीतून जीवनाचे सखोल तत्त्वज्ञान प्रगट होताना त्यांनी पाहिले; त्यातूनच त्यांना प्रेरणा मिळाली. तान्ह्या मुलाला, आजारी माणसाला जास्त दूध देण्याचा विवेक ती करत असे; कारण खऱ्या अर्थाने समानता आणि दुसऱ्याचे हित पाहायचे असेल तर अशी विषमता करावी लागते, अशी तिची धारणा होती. उपजत शहाणपण ते हेच. विनोबांचा सद्विचार हा अशा सहज सद्वर्तनावर आधारलेला आहे.
संकलन - सुधा आपटे, `राधाई' कोर्टामागे,
नृसिंह मंदिराजवळ, किल्लाभाग, मिरज ४१६४१०
 (फोन नं. द्वारा-कुलकर्णी: ९५६१२६६५४०)
दुसऱ्याच्या हृदयात प्रवेश करायचा असेल तर त्याच्या गुणांमार्फतच तो करावा लागतो. गुण हा दरवाजा, दोष या भिंती. भिंतीतून प्रवेश करायचा तर तुमचे डोके आपटेल; म्हणून गुणांच्या दरवाज्यातूनच करणे श्रेयस्कर.
सर्वोदय म्हणजे कोण्या एकाचा अस्त आणि दुसऱ्याचा उदय असे नाही, तर सर्वांचा उदय. लोकशाही म्हणजे बहुमताचा विजय नव्हे तर सर्वानुमते निर्णय घेणे म्हणजे लोकशाही. पाश्चात्यांची लोकशाही रचना म्हणजे जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त कल्याण. (ऋीशरींशीीं सेेव ेष सीशरींशीीं र्पीालशी.) ही कल्पना म्हणजे बहुमतापोटी अल्पमतावर अन्याय झाला तरी चालतो. पण भारतीय परंपरेत `सर्वभूतहित' ही कल्पना आहे. फक्त बहुमताने नव्हे तर सर्वानुमते निर्णय घेणे ही खरी लोकशाही.
विज्ञान आणि ब्रह्मविद्या, विचार आणि भावना यांमध्ये विरोध असायचे कारण नाही. दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. कुपोषण, स्वैराचार आणि वातावरणाचे प्रदूषण हे समाजाचे तीन दोष असून ते दूर करायचे तर आध्यात्मिक चिंतन आणि सामाजिक कर्मयोग हे एकच मानले पाहिजेत. रचनात्मक कामातून आत्मदर्शन साधले पाहिजे. ईश्वराचा साक्षात्कार तीन रूपात होतो. सामान्य जनतेच्या रूपात, विशाल प्रकृतीच्या रूपात आणि अंतर्यामीच्या रूपात. या परिपूर्ण आकलनामुळे त्यांच्या विचारांना सार्वकालिकता लाभली आहे.
मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष. हिंदू याची व्याख्या `हिंसेने जो दु:खी होतो तो हिंदू'. हिंदूधर्म हा मुळातच मानवधर्म आहे. म्हणून त्याचा कोणताही एक ग्रंथ नाही, पंथ नाही, संस्थापक नाही. हिंदू धर्माचे गाठोडे जसे कोणत्याही विशिष्ट ग्रंथाच्या रूमालात बांधलेले नाही तसे ते कोणा विशिष्ट व्यक्तीच्या खुंटीवरही टांगलेले नाही. (सहजस्फूर्त माणुसकी हे त्याचे मूळ स्वरूप आहे.) येथे युद्धे झाली नाहीत असे नाही किंवा येथे लोक मांसाहार करीत नव्हते असेही नाही! याचा अर्थ असा की हिंसा हा हिंदू मनुष्याचा स्थायीभाव नाही. हिंदू धर्माने आपल्या प्रसारासाठी हिंसेचा वापर कधीही केला नाही. हिंसा घडते ती एक प्रकारच्या अनिच्छेने, नाईलाजाने म्हणून. गीतेची शिकवण अशीच आहे की, आता नाईलाज आहे; हे दुष्ट भाऊबंद आता शस्त्र घेऊन समोर उभेच ठाकले आहेत आणि त्यांना मारण्यावाचून गत्यंतर नाही, म्हणून धनुष्य उचल!
तलवारीचा मुकाबला तलवारीने केला तर दोघेही जखमी होतील किंवा मरतील. तलवारीचा मुकाबला ढालीने होतो. ढाल एवढी मजबूत असते की तलवार त्यावर आपटल्यावर बोथट होऊन जाते, तिचे तुकडे होतात. ढाल पुढे करण्यात वीरवृत्ती आहे पण शत्रुत्व नाही. स्वत:चे रक्षण करण्याची इच्छा नक्कीच आहे, पण दुसऱ्याचा संहार करण्याची नाही. ढाल पुढे केल्यावर कोणाचीच हिंसा होत नाही. उलट हिंसक वृत्तीचाच पाडाव होतो. याचा अर्थ आत्मसंरक्षण तर केलेच पाहिजे, एवढेच नाही तर दुसऱ्याच्या हातातील तलवार काढून घेऊन त्याला दंडही दिला पाहिजे. एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करण्याऐवजी त्याने मारण्याआधीच त्याचा हात वरच घट्ट पकडावा, वेळप्रसंगी वरच्या वर पिरगाळावा. पण नंतर मात्र राग न धरता क्षमा करावी. हे करण्याचे सामर्थ्य अंगात बाणवावे, यालाच अहिंसा म्हणतात. वेदान्त हे चिंतन तर अहिंसा हे आचरण.
आध्यात्मिक साधना म्हणजे आपले मन शुद्ध करीत जायचे. ते करण्याचा व्यावहारिक मार्ग म्हणजे गुणदर्शन, गुणग्रहण आणि गुणस्तवन. परमात्मा गुणरूपाने दुनियेत प्रगट झाला आहे. प्रत्येकात काही ना काही गुण आहेत. त्या गुणांचा परमोत्कर्ष गाठणे म्हणजे परमात्म्याला स्पर्श करणे. ईश्वर ही जाणण्याची गोष्ट आहे. हिंदू धर्माची त्रिसूत्री म्हणजे - माझ्यात सर्व जीव अधिक परमेश्वर, सर्व जीवात मी आणि परमेश्वर, परमेश्वरात मी आणि सर्व जीव.
सुखाची इच्छा धरण्यात चूक नाही तर फक्त वैयक्तिक सुख आणि वैयक्तिक स्वार्थाची इच्छा हे आपल्या सर्व दु:खाचे मूळ कारण. मन शुद्ध करीत जाणे म्हणजे आध्यात्मिक साधना. ते करायचे म्हणजे दुसऱ्याचे केवळ गुण बघायचे, वर्णायचे आणि तेच अंगात बाणवायचे.
शिक्षणाचा उद्देश पदवी मिळवणे आणि नोकरी मिळवणे एवढाच नाही, तर माणसाला स्वावलंबी, स्वतंत्र बनवते ते खरे शिक्षण. स्वत:ची रोजीरोटी कमावण्याबरोबरच शरीरश्रम करून काही ना काही उद्योग यायला पाहिजे.
धर्माच्या नावाखाली असहिष्णुता वाढीस लागली आहे. हिंसाचाराचे उद्रेक होत आहेत. जागतिकीकरणाच्या नावाखाली विविधता आणि स्वावलंबन नष्ट होऊन दुर्बळ घटक व्यवस्थेचे बळी ठरत आहेत. पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. या समस्यांवरचे उपाय शोधणारी, समष्टीचा समग्रतेने विचार करणारी प्रणालीच अस्तित्वात नाही. अशा परिस्थितीत पूज्य विनोबांच्या सर्वोदय कल्पनेची, ग्रामस्वराज्याची, स्वावलंबी-स्वतंत्र समाजाची, आजच्या संदर्भात पुनर्मांडणी करण्याची गरज आहे.



जे.आर.डी.टाटा
गेल्या (डिसेंबर २०१४) अंकातील जे.आर.डी.लेखानिमित्त आपले आणि विश्वास दांडेकर या दोघांचे अभिनंदन. मला जे.आर.डीं.बद्दल नेहमीच प्रचंड कुतुहल, आत्यंतिक आदर वाटत आला आहे. `ध्यास-दिवाळी २०१०' मध्ये टाटांविषयी माझा लेख प्रसिद्ध झाला होता. आश्चर्य म्हणजे साधारण महिनाभराने श्री.रतन टाटा यांचे स्वाक्षरी आभारपत्र मला प्राप्त झाले. त्यांच्या पी.आर.डिपार्टमेंट तर्फे लेखाचा इंग्रजी अनुवाद त्यांना सांगितला गेला होता.टाटा समूहातील सर्व संस्था कार्यक्षमता, नैतिकता, पारदर्शकता तसेच समाजाप्रती जबाबदारी असा व्यापक दृष्टिकोण ठेवत असल्याने, त्यांनी समाजापुढे एक आदर्श उभा केला आहेे.
- सुनील परांजपे, ठाणे  फोन:(०२२)२५३४१००७
(त्या लेखातील काही अंश)
जे.आर.डीं.चा जन्म पॅरिसचा. तारीख २९ जुलै १९०४. श्री.रतनजी आणि त्यांची पत्नी सुझान ब्रिअेर यांच्या पोटी या विक्रमादित्याचा जन्म झाला. श्री.रतनजी हे जमशेदजी टाटांचे चुलतबंधू. जे.आर.डीं.चे शिक्षण फ्रान्स, जपान व इंग्लंडमध्ये झाले. त्यानंतर एक वर्ष फ्रेंच आर्मीमध्ये त्यांनी काम केले. नंतर केंब्रिज विद्यापीठातून इंजिनियरिंगचे शिक्षण घ्यायचे होते, परंतु वडिलांनी बोलावलं म्हणून ते भारतात परतले.
वयाच्या ३८व्या वर्षी जे.आर.डींना टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि हे पद त्यांनी तब्बल ५३ वर्षे भूषविले. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा अॅसेट्स ६२ कोटिवरून १०हजार कोटिंपर्यंत वाढले. सार्वजनिक संस्था व धार्मिक पारमार्थिक ट्न्स्ट या दोन्ही क्षेत्रातही टाटा समूह अग्रेसर राहिला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशन सायन्सेस, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स्, टाटा ब्लड बँक, मार्ग पब्लिकेशन्स, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स स्टडीज्, होमी भाभा फेलोशिप कौन्सिल, सर दोराबजी टाटा ट्न्स्ट व जेआरडी टाटा ट्न्स्ट इत्यादी संस्था देशभरात प्रतिष्ठित ठरल्या आहेत.
जे.आर.डीं.बद्दल काही किस्से सांगण्याजोगे आहेत.
अमेरिकेतील लॉकहिड एअरक्रॉफ्ट फॅक्टरीला जे.आर.डी.भेट देत होते. मध्येच त्यांना तहान लागली. त्यांनी समोर पाहिले तर दोन नळ होते. एक होता `ब्लॅक'साठी आणि दुसरा `व्हाईट'साठी. जे.आर.डी.`ब्लॅक'च्या नळापाशी गेले आणि पाणी पिऊ लागले. लॉकहिडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, `आपण `व्हाईट'चा नळ वापरा' परंतु त्यांनी नम्र नकार दिला. ते म्हणाले, `मी `नॉन-व्हाईट' आहे.' लॉकहिड कंपनीने तेव्हापासून फक्त एकच नळ ठेवला.
जे.आर.डी.स्वत: एकदा तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्याबरोबर एअर इंडियाने प्रवास करत होते.जे.आर.डी.टॉयलेटमध्ये गेले. बराच वेळ झाला तरी परतले नाहीत म्हणून इंदिराजी चिंता व्यक्त करू लागल्या. तेवढ्यात जे.आर.डी.परतले. इंदिराजींनी त्यांना विचारले, `तब्येत ठीक आहे ना?' ते म्हणाले, `तब्येत ठीक आहे, पण टॉयलेट खराब दिसले म्हणून मी आत टॉयलेट स्वच्छ करत होतो.'
जे.आर.डी. एकदा एकटेच एअर इंडिया विमानाने प्रवास करत होते. हवाई सुंदरी ट्नॅली घेऊन येत असताना त्यांच्या लक्षात आले की, ट्नॅली डुगडुगत आहे, परंतु हवाई सुंदरी तशीच पुढे चालली आहे. ते लगेच उठले व ट्नॅलीजवळ खाली बसून कुठे दोष आहे हे बघितले व दुरुस्त करून घेतली. ग्राहक सेवा उत्तमच असावी हाच त्यांचा उद्देश होता.
------------------------------------
८ डिसेंबरच्या अंकातील `अंदमान अभिवादन यात्रा' हा लेख वाचला. मी जानेवारी २००१ मध्ये अंदमानला गेलो होतो. स्वतंत्रपणे गेल्यामुळे व सेल्युलर जेलच्या पायथ्याशीच मुक्काम असल्याने मनात येईल तेव्हा जेल बघण्यासाठी जात होतो.
मला तिथे खटकलेली गोष्ट स्पष्टपणे लिहीत आहे. जेलच्या समोर पाच क्रांतिकारकांचे पुतळे पूर्वीपासून होते. हे सारे पुतळे कैद्याच्या दंडाबेडीच्या वेशातील आहेत. सावरकरांचा पुतळा मात्र त्यांच्या धोतर-कोट-टोपी या पोषाखात त्या शेजारीच उभा आहे. सावरकर कितीही मोठे असले तरी अंदमानात ते त्या पाच कैद्यांच्या बरोबरीचेच होते, त्यांच्यापेक्षा महान नव्हते. त्यांचा पुतळा उभारायचा, तर कैद्याच्याच पोषाखात उभारणे आवश्यक होते. अन्यथा `सावरकर स्मृती' नाव दिलेल्या महाराष्ट्न् मंडळासमोर त्यांच्या परिचित वेशात उभारणे चांगले झाले असते. आपल्या सावरकरभक्तीचे प्रदर्शन करण्याच्या नादात त्यांना खुजे करून टाकले आहे.
- विलास वि.फडके,  जांभुळगाव, पो.कान्हे, ता.मावळ

`आपले जग'ने काय दिले?
दिवस कसे भराभर जातात. `आपले जग'च्या शुभारंभाचा कार्यक्रम अगदी परवा परवा झाल्यासारखे वाटते. बघता बघता ३६ वर्षे झाली. ३६ वर्षांचा झळझळीत इतिहास आपल्यापुढे आहे. एक वैचारिक, समतोल नियतकालिक म्हणून `आपले जग'ने पाय रोवले आणि आज स्थिरावले आहे. `आपले जग'ने ३६ वर्षांत लोकप्रियता मिळविण्याचा सवंग मोह धरला नाही. महाराष्ट्न्भर आणि बाहेर हे पत्र नियमित पोचते. हल्ली तर इंटरनेटवर वाचले जाते. आजवर अडचणी आल्या नाहीत असे नसावे. कोणत्याही उपक्रमाला अडचणीचे उंबरे ओलांडावे लागतातच. पण निष्ठा, जिद्द, चिकाटी आणि डेडीकेशन एवढे की, ते कधीही अनियतकालिक झाले नाही. `आपले जग'चे बलस्थान कोणते?- माझ्या मते त्यातील अप्रतिम अग्रलेख. प्रासंगिक लेखांचे काय होते की, ती घटना घडून गेली की त्याचे मूल्य ओसरते. `आपले जग'च्या अग्रलेखांचे तसे झाले नाही. मी बालपणापासून `मराठा'मधील अत्रे, `महाराष्ट्न् टाईम्स'चे तळवळकर, `लोकसत्ता'चे ह.रा.महाजनी, कुमार केतकर, गिरीश कुबेर, `सोबत'चे ग.वा.बेहेरे यांचे अग्रलेख वाचत आलो आहे. `आपले जग'मधील अग्रलेख त्या तोलामोलाचे आहेत. एखादा लेख गंमत म्हणून `लोकसत्ता' किंवा तत्सम पत्रांत छापला, तर तो सहजतेने खपून जाईल.
व्यक्तिश: `आपले जग'चे माझ्यावर अनंत उपकार आहेत. मला सदैव त्याच्या ऋणातच राहावे लागेल. १९५९-६० साली मी लिहीत असे. पण त्यामध्ये खंड पडला, झरा आटला. `आपले जग'ने मला लिहिते केले. `सांजवेळा' हे सदर मी लिहू लागलो. माझे वेडेवाकडे बाळबोध ललित लेखन त्यानी स्वीकारले. त्यावर खुबीने संपादकीय संस्कार केले, जरूर तेथे संक्षेप किंवा विस्तार केला. माझ्या लेखनाची ओबडधोबड मारुती का गणपती अशी मूर्ती त्यांनी नयनरम्य केली; श्रेय मात्र मला मिळाले. माझे लेखन महाराष्ट्न्भर पोचले. कोणीतरी आळतेकर वाडीतून लिहितो हे कानोकानी झाले. एक नवल सांगायला हवे. परवा दिवाळीत डोंबिवलीला गेलो होतो. `दिवाळी पहाट'चा बहारदार कार्यक्रम होता, तेथे खूपच थोर मंडळी उपस्थित होती. मध्यंतरामध्ये जेव्हा परस्पर परिचयाचा प्रसंग आला, तेव्हा काही मान्यवरांनी मला सांगितले की, ``आळतेकरजी, व्यक्तिश: आपली ओळख नसली तरी एक लेखक म्हणून आम्ही तुम्हाला ओळखतो.'' ते कसे? उत्तर - `आपले जग आणि त्यातील लेखन' आता याचा अभिमान मी बाळगावा, की मोठेपण `आपले जग'ला द्यावे?
`आपले जग'च्या वाटचालीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अल्पस्वल्प मी सहभागी असतो, आणि त्याचा मला आनंद आहे. अभिमान आहे. त्या परिवाराचा घटक म्हणून संबोधून घेणे हे सोपे नाही. पण ती अवघड वाट मला सापडली आहे, हे खरे.
- मोहन जी.आळतेकर, कि.वाडी

`आपले जग' हे आमच्या पंचक्रोशीत पहिले आणि आजपर्यंतच्या ३५-३६ वर्षांत एकमेव वृत्तपत्र आहे. मी शाळेत शिकत असताना, कुंडलच्या नाना पाटील वसतिगृहात ते प्रथम पाहिलं. `आपले जग'च्या शिरोभागी अढळ चार ओळी असतात, त्या पुरेशा बोलक्या आहेत.
`आपले जग' हे नावच व्यापक अर्थाचं आहे. सर्वांना सामावून घेताना आवश्यक वेचकपणा, सद्यस्थितीला गरज तेवढे विचार देण्याचा त्याचा प्रयत्न असलेले जाणवते. या वृत्तपत्राने विविध व्यक्तींच्या कार्याची, विचारांची प्रेरणा माझ्यासारख्या अनेकांना दिली आहे. परिस्थितीला सामोरे जाताना जाणवले ते कवितांमधून प्रथम मांडण्याचे व्यासपीठ मला या वृत्तपत्राने दिले. चारजणांत कसे बोलावे, काय बोलावे हे मंत्र आम्हा सामान्य माणसांना याच वृत्तपत्रांतून मिळाले. व्यावसायिक व्यक्तींची जडणघडण कशी होते, व्यक्तीमध्ये विविध पैलू कसे असतात, ते कसे विकसित करावेत हे वाचनातून जाणवू आले. समाजामध्ये जे जे मारक, घातक प्रवाह आहेत याबाबत मनाची मशागत करण्याचा स्तुत्य प्रयत्न प्रत्येक अंकातून जाणवतो. व्यक्ती-समाज-देश यांची एकमेकांशी असलेली बांधिलकी समजत गेली. शैक्षणिक क्षेत्रात होणारे बदल, त्याचे समाजावर परिणाम या विविध बाजूंचा विचार मांडण्याची शैली मला नेहमीच आकर्षित करीत असते. सामाजिक परिवर्तनासाठी माझ्या कुवतीने प्रामाणिक प्रयत्न मला या वाचनातून करता आला. माझ्या विचारांची बैठक तयार होण्यास तसेच व्यक्तिमत्त्वास वैचारिक पैलू पाडण्यास या साप्ताहिकाने अनमोल वैचारिक खाद्य दिले आहे.
- धुमाळ विष्णू द., कुंडल (ता.पलूस)

अंकातील मजकूर वा अन्य विशेषांबद्दल
पसंती कळविणारे वाचक -
* डॉ.भा.वा.आठवले, देवगड * प्रमोद जी. कुलकर्णी, सांगली
* शरद एस. भिडे, सांगली * शुभांगी सहस्रबुद्धे, सातारा
* मालती दातार, बेळगुंदी * इतर खरोखरीच अनेक....

प्राचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान
- दीपक पाटणकर
मुंबईत नुकतेच `इंडियन सायन्स काँग्रेस'चे अधिवेशन झाले, 
त्या व्यासपीठावरून क्रॅप्टन आनंद बोडस यांनी 
प्राचीन विमानविद्येच्या संदर्भात आपला विषय मांडला. 
त्या सर्व वाङ्मयीन कथाकल्पना म्हणून 
त्यावर वाद उठवला गेला. 
अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने (नासा) 
या संदर्भात न्यायालयात दाद मागितली असली तरी 
क्रॅप्टन बोडस यांची विधाने सरसहा कुणीही
अशास्त्रीय वा अवैज्ञानिक ठरविण्याइतकी बाष्कळ नव्हेत.
वास्तविक त्यांच्या मांडणीच्या दिशेने 
स्वतंत्र संशोधन करण्याची तयारी ठेवायला हवी. 
डॉ.विजय भटकर, सच्चितानंद शेवडे अशा मान्यवरांची 
प्राचीन भारतीय विज्ञानासंदर्भातील मते दुर्लक्षिता येत नाहीत.
तथापि सामान्य पात्रतेच्या विज्ञानवादी चिकित्सकांचा 
संभ्रम होऊ नये अशीही काळजी घ्यायला हवी. 
म्हणून त्या संदर्भातील काही लेख प्रकाशित करीत आहोत.
प्राचीन काळी भारतवर्षात विमाने होती की नव्हती? भौतिकशास्त्रात भारताची नेमकी काय अवस्था होती? रसायनशास्त्रात भारताने खरंच प्रगती केली होती का? सुश्रुत हृदयाची शल्यक्रिया (ओपन हार्ट सर्जरी) करत असे, या गोष्टीत तथ्य किती? गणपतीला हत्तीचे मुख जोडले, म्हणजेच भारतात प्लॅस्टीक सर्जरी त्या काळापासून माहीत होती का? अनेक लोक दावे करतात त्यानुसार, महाभारतातील संजयाकडे टीव्ही होता का?....असे अनेक प्रश्न चर्चांमधून सतत विचारले जात असतात. याच्यावर गप्पा झडतात, सभाही भरतात, वादविवाद होतात. वाणी आणि लेखणीतून वादांची वादळे उभी राहतात, आणि नंतर मात्र ती अचानकच चहाच्या पेल्यातील वादळांप्रमाणे शमतातदेखील. नमूद करण्याची गोष्ट अशी की, या वादातील कोणताच पक्ष जिंकत नाही. समर्थक आणि विरोधक दोघेही बऱ्याच वेळेला नुसता वाद घालत असतात. दोन्ही बाजूंचे अधिकांश लोक, ना मुळातून काही वाचण्याचे कष्ट घेतात, ना पुरावे शोधण्याचे कष्ट घेतात! सध्या विमान उड्डाणाचा धुरळा उडविणाऱ्या या सगळया वादाचा केंद्रबिंदू असणारा, नेमका विषय तरी कोणता? या विषयाचे नामकरण नेमकेपणाने करायचे असेल तर, त्याला आपण आपल्यापुरते `प्राचीन भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान' असे म्हणू.
या विषयाच्या दोन बाजू आहेत असे मला वाटते. त्या मधूनमधून आपल्यासमोर येत असतात. एक बाजू समर्थकांची. त्यांचे म्हणणे असे असते की, प्राचीन काळात भारताने विज्ञान तंत्रज्ञान विषयात प्रगतीचा उच्चांक गाठला होता. भौतिक विद्यांचे असे कोणतेच क्षेत्र नव्हते की, ज्यात भारतीय लोक अग्रेसर नव्हते! हा आग्रह काही वेळेस दुराग्रह बनतो; आणि मग त्यांचे पर्यवसान भाबड्या श्रद्धेमध्ये होते. जर आपल्याला माहीत होते की, महाभारतावेळी टीव्हीचा शोध लागलेला होता, तर पाश्चात्यांच्या आधी आपणच तो जगापुढे का मांडला नाही? आपल्याकडे टीव्हीचा शोध भारतात पोहोचल्यानंतर, `आमच्याकडे महाभारत काळापासून टीव्ही होता', असा या मंडळींचा सूर लागतो. पण टीव्हीचा शोध पश्चिमात्यांस लागण्यापूर्वी या मंडळींना हे का सुचले नाही? या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांच्याजवळ मुळीच नसते. संजयाला टीव्हीप्रमाणे दिव्यदृष्टी व्यासांनी दिली, याविषयी प्रस्तुत लेखकाचे दुमत आहे, कारण त्यामुळे दिव्यदृष्टीच्या अलौकिक घटनेला खुजेपणा येतो. नेमकेपणाने सांगायचे तर, प्राचीन काळात आम्ही विज्ञान तंत्रज्ञानात केवढी भव्य दिव्य प्रगती केली होती, हे समर्थपणे सिद्ध करण्यासाठी आजच्या पाश्चात्य वैज्ञानिक साधनांचा आणि प्रगतीचाच मापदंड कशासाठी वापरावा? तसा बाहेरचा मापदंड वापरणे हा विरोधाभास नव्हे काय? जर आज टीव्हीचा शोध लागला नसता, तर आम्ही त्या दिव्यदृष्टीकडे कोणत्या दृष्टीतून पाहिले असते? बऱ्याच वेळेला विरोधकांच्या टीकेपेक्षाही अशी भाबडी श्रद्धाच प्राचीन भारतीय विद्वत्तेला गोत्यात आणते. महापुरुषांचा पराभव त्यांच्याच अनुयायांकडून होतो असे म्हणतात. तद्वत भारतीय संस्कृतीचे हे भाबडे भक्तच प्राचीन वैज्ञानिकतेला अडचणीत आणण्याचे काम, नकळत अधिक प्रामाणिकपणे करत असतात.
या विषयाची दुसरी बाजू अशी की, प्राचीन काळी भारतात आधुनिक विज्ञानातील कोणतेही अलौकिक कृत्य घडलेच नव्हते, असे मानणारा एक मोठा वर्ग आहे. जगाची जी काही भरभराट वैज्ञानिक क्षेत्रात झाली, ती केवळ ब्रिटीशांच्याच कृपेमुळे; अशी यांची ठाम धारणा असते. भारतीय संस्कृतीसंदर्भात कालगणना करत असताना, भारतीय संस्कृतीतील अधिकाधिक घटना कालदृष्ट्या अलीकडे ओढायच्या; आणि िख्र्तास्जन्माच्या मागेपुढे आणून ठेवायच्या. जसे `महाभारतात आमच्याकडे टीव्ही होता' हे म्हणणे तर्कहीन व धारिष्ट्याचे आहे, तितकेच भारतातील विमानविद्या, आयुुर्वेद, जहाजबांधणी, शेतीचे तंत्रज्ञान इत्यादी सर्व नाकारणे तर्कहीन होय. `यत् साहेबो%ब्रवीत् तद् भेषजम्' अशा विचारांवर पोसलेली आणि वाढलेली, मेकॉलेप्रणित शिक्षणव्यवस्थेतून जन्माला आलेली ही काळया इंग्रजांची सेना आहे. भारत नावाच्या वैभवशाली राष्ट्नचे अस्तित्व तर ठेवायचे आणि अस्मिता मात्र मारायची, असे यांचे धोरण आहे. भारतात विमाने होती याचे पुरावे मागायचे, आणि पुरावे दिले की म्हणायचे `आज त्या आधारे विमाने तयार करून दाखवा!'
योग्यायोग्य निर्णय लागण्याआधीच जितंमया थाटात दोन्ही बाजू वावरत असतात. या साऱ्या चर्वितचर्वणातून निष्कर्ष मात्र काहीच निघत नाही. कोणता मुद्दा स्वीकारायचा, यातील कोणाची बाजू बरोबर आणि कोणाची चुकीची, याविषयी जनसामान्यांमध्ये नेहमीच गोंधळ निर्माण होतो. मग यातील नेमके तथ्य आहे तरी काय? या दोन मार्गांखेरीज एखादा मध्यम मार्ग अचूक आहे का? विरोधी किंवा समर्थक, असा पवित्रा घेण्यापेक्षा संशोधकाच्या अथक अभ्यासाचा मध्यममार्ग पत्करता येईल का? विज्ञानाला वास्तविक तो जिज्ञासू व अभ्यासू मार्ग अपेक्षित असला पाहिजे. भले ती पायवाट असेल, चालून चालून ती पायवाट मळविता येईल. या विचाराने जेव्हा आपण रस्ता शोधायला लागतो, तेव्हा मनामध्ये असणारा पहिला प्रश्न हा की, `हा अभ्यास का करावयाचा? याचा आज उपयोग काय?'
याविषयी श्री.धर्मपाल यांनी मार्मिकपणे भाष्य केले आहे. ते असे की, ``व्यापाराच्या निमित्ताने ईस्ट इंडिया कंपनी भारतात येते आणि काही वर्षांनी चक्क भारतीयांवर राज्य करते, असे अपवादात्मकच! पण इतिहासात हे घडले, अन् इंग्रज दीडशे वर्षांहून अधिक काळ राज्यकर्ते होऊन राहिले. कोणत्याही समाजावर राज्य करावयाचे तर फोडा-झोडा ही नीती स्वीकारावी लागते. पण त्याशिवाय, पटवून द्या, गोंधळून टाका, भ्रष्टवा (लेर्पींळपलश, लेपर्षीीश, र्लेीीीिीं) या त्रिसूत्रीचाही वारंवार वापर करावा लागतो.'' ब्रिटीशांनी हे केले. ही नीती कशी वापरली गेली याचे विवेचन मूळ कागदपत्रांच्या आधारे धर्मपालांनी केले आहे. भारताला `जित' ठरविण्यासाठी ब्रिटीश पार्लमेंटमध्ये जी व्यूहरचना केली, त्याचा आराखडा या विवेचनात आहे. यासाठी जनतेला अडाणी, निरक्षर, मागास, रानटी वगैरे असंख्य विशेषणे वापरली. आपल्याच तर्कनिष्ठ विचारांचा डोंगर उभा केला. `िख्र्चाश्नीकरण आणि इंग्रजी शिक्षण' याचा कायदेशीर आग्रह धरला. `कायदेशीर मार्गे' भारतातून कोट्यवधी रुपयांची लूट केली. भारताला दरिद्री-कंगाल केले. भारतीय जनतेला विविध प्रकारे छळले, त्रास दिला, मरणप्राय त्रास दिला आणि तरीही....`आम्ही या देशाच्या उद्धाराचे ओझे अंगावर घेतले आहे' असा दावा तेथील विचारवंतांनी केला; भारत देश त्यांनी स्वत:च्या दावणीला बांधला.
`या घटनांच्या इतिहासाचा आज संदर्भ (ठशश्रर्शींशपलश) काय?' असा धर्मपालांचा प्रश्न आहे. त्याचे उत्तरही धर्मपाल देतात. आजही युरोपचा प्रभाव भारतातील राजकीय पक्षांवर, अभिजनांवर आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्व-तंत्र आणि स्व-मंत्र यांची निश्चिती करण्यात आपण अपयशी ठरलो. आम्हाला ब्रिटीश युरोपियन-अमेरिकन राजनीती यांचे आजही नेमके आकलन होत नाही.

पुरावे
प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास करायचा, हे एकदा निश्चित झाले तर तत्कालीन प्रगतीचे पुरावे देणे ओघानेच आले. पुरावे देत असताना एक गोष्ट मात्र ध्यानात घ्यावीच लागेल की, ब्रिटीशांनी आणि त्याच्याही आधी इतर परकीय आक्रमकांनी इथले ज्ञानभांडार नष्ट केले आहे. त्यामुळे आज आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या मर्यादित पुराव्यांमधूनच आपले निष्कर्ष काढावे लागतील. आश्चर्याची गोष्ट अशी की, इतक्या परकीय आक्रमाणांनंतर आणि १५० वर्षांच्या पारतंत्र्यानंतरदेखील आपल्याकडे शेकडो-हजारो पुरावे शिल्लक राहिलेले आहेत. परंतु या पुराव्यांकडे उघड्या डोळयांनी, चिकित्सक बुद्धीने बघणारे अभ्यासक मात्र फारसे नाहीतच. हजारो कागदपत्रे, शेकडो संस्कृत संहिता संशोधकांची वाट बघत दप्तरखान्यांमध्ये, ग्रंथालयांमध्ये आणि वैयक्तिक संग्रहांमध्ये धूळ खात पडून आहेत. महर्षि भारद्वाजाचे यंत्रसर्वस्व, भोजराजाचा समरांगण सूत्रधार, अगस्तीसंहिता, सुश्रुतसंहिता, चरकसंहिता, अष्टांगहृदय लीलावती, वराहमिहीराची बृहत्संहिता, श्री भागवत महापुराण इत्यादी ग्रंथांमधून विज्ञानविषयक ज्ञानगंगेचा जो महापूर वाहतो आहे, त्याच्याकडे म्हणावे तसे लक्ष दिले गेलेले नाही किंवा जाणीवपूर्वकच दुर्लक्ष केलेले आहे ही वस्तुस्थिती आहे.
पुराव्यांचे दोन प्रकार
आपल्या प्राचीन विज्ञानविषयींच्या पुराव्यांचे दोन प्रकार आहेत. उपलब्ध असणारे भारतीय वाङ्मय म्हणजे एतद्देशीय पुरावे पहिल्या प्रकारचे आहेत; आणि दुसऱ्या प्रकारचे पुरावे म्हणजे ब्रिटीशांचा पत्रव्यवहार. भारतामध्ये विज्ञान-तंत्रज्ञानाने, आणि एकूणच भौतिक प्रगतीने केवढा उच्चांक गाठला होता, यावर ब्रिटीश पत्रव्यवहारांतून मोठा प्रकाश पडतो. भारताची केलेली लूट, भारताची केलेली बदनामी, दडपून टाकलेले भारतीय ज्ञान, भारताची मागास आणि रानटी प्रतिमा निर्माण करण्याचे षड्यंत्र, या साऱ्यांवरती प्रकाश टाकायचा असेल तर तत्कालीन ब्रिटीश पत्रव्यवहारही अभ्यासावा लागेल. कारण भारतीय पुराव्यांपेक्षा ब्रिटीश पत्रव्यवहार हा अधिक `विश्वासार्ह' ना?
इ.स.१७८२ मध्ये झालेली नाकाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया याविषयीचा उल्लेख आहे तसा पुढे दिला आहे -
`जयपूर येथील डॉ.विजय दया (एम.डी.अॅनॅस्थेशिया) यांनी प्लॅस्टीक सर्जरीच्या एका प्रयोगाचे वर्णन केले आहे. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी सन १७९२ मध्ये टिपू सुलतान आणि मराठ्यांमध्ये एक युद्ध झाले. त्यामध्ये चार मराठा सैनिक आणि एक गाडीवान यांचे हात व नाक कापले गेले. एक वर्षानंतर कवासजी नावाच्या त्या गाडीवानावर व सैनिकांवर पुण्याच्या एका कुंभाराने शल्यक्रिया करून, नव्या नाकाचे आरोपण केले. तो कुंभार मातीची भांडी बनवीत असे; शिवाय त्याचबरोबर माणसाचे कापले गेलेले अवयव जोडण्याचे कामही कौशल्याने करीत असे. रोग्याच्या शरीरावरील कातडे काढून त्या साहाय्याने, कापल्या गेलेल्या अवयवांची आणि फाटलेल्या भागांची `दुरुस्ती' करण्यातही तो वाकबगार होता. माणसाच्या शरीराच्या अशा प्रकारे दुरुस्ती करण्याच्या पद्धतीला `प्लास्टीक सर्जरी' असे आपण अलीकडे म्हणतो. कवासजीने नवे नाक बसविण्यासाठी इ.स.१७९३ मध्ये केलेली शल्यक्रिया दोन इंग्रजी चिकित्सक - डॉ.थॉमस क्रुसो आणि डॉ.जेम्स फिंडले यांनी पाहिली होती. त्या इंग्रजी डॉक्टरांनी संपूर्ण प्रक्रियेेचे चित्रांकन केले आणि त्याचा अहवाल `मद्रास गॅझेट'मध्ये प्रकाशित केला. इंग्लंडमध्ये लंडन येथून प्रकाशित होणाऱ्या `जंटलमन' नावाच्या नियतकालिकामध्ये हा अहवाल १७९४ मध्ये छापला गेला. अहवालातील नोंद खालीलप्रमाणे आहे, -
`मऊ मेणाचे एक कृत्रिम नाक तयार करून, कापलेल्या नाकाच्या ठिकाणी बसविले जाते. त्या मेणाचाच थर (पापुद्रा) अधिक पसरवून, शल्यचिकित्सा केल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या कपाळावरही लावला जातो. मेणाच्या या थराच्या सर्व बाजूंवर खुणा करून, तो तेवढा भाग काढून टाकला जातो. नंतर शल्यचिकित्सक त्या खुणांच्या आकृतीनुसार कपाळावरची कातडी काढून टाकतो, कपाळाखाली, डोळयांच्या मध्यभागी मात्र कातडी जोडलेल्या अवस्थेत राहते. त्यामुळे आधीच्या मूळ नाकाच्या उरलेल्या भागाचे दोन भाग करून त्यांच्यामागे चीर दिली. मग कपाळावरची त्वचा खाली ओढून आणून या चिरांमध्ये बसवली जाते. टेरा जॅपोनिकाचा (पिवळा कात) पाण्याच्या माध्यमाने लगदा करून, तो एका कापडाच्या तुकड्यावर पसरला जातो. असे पाच-सहा तुकडे एकावर एक बसवून, शल्यक्रिया करण्याच्या ठिकाणी ते ठेवले जातात. चार दिवस अशा रीतीने त्या पट्ट्या ठेवतात. तिथे त्यावर, तुपात भिजविलेला कापडाचा तुकडा ठेवला जातो. वीस दिवसांनंतर डोळयांच्या मध्यभागीच्या त्वचेचा भाग काढून टाकून, त्या ठिकाणी नव्याने बसविलेल्या नाकाला नीट आकार दिला जातो. शल्यक्रियेच्या पहिल्या पाच दिवसांत रुग्णाला अंथरुणातच झोपून राहावे लागते. दहाव्या दिवशी नाकपुड्या पुरेशा उघड्या ठेवण्यासाठी, मऊ कापडाचे किंवा कापसाचे (लाटण्याच्या आकाराचे) लहान तुकडे त्यामध्ये घातले जातात. `जण्टलमन' या नियतकालिकातील या अहवालात पुढे म्हटले आहे की, `ही शल्यक्रिया नेहमी यशस्वी होते. नवे नाक एकदम पक्क्या रितीने जोडले जाते आणि अगदी पूर्ववत दिसते. कपाळावरील त्वचा काढल्याच्या खुणासुद्धा काही काळाने दिसेनाशा होतात.'
या वृत्ताने युरोपच्या वैद्यक चिकित्साजगतात खूप खळबळ उडवून दिली. युरोपातील देशांच्या शल्यचिकित्सकांनी या संपूर्ण तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास केला आणि लंडनच्या डॉ.जे.सी.कार्प्यु या तीस वर्षांच्या शल्यचिकित्सकाने उपरोक्त पद्धतीचे बारीकसारीक सर्व पैलू समजावून घेऊन, १८१४ मध्ये त्याच पद्धतीचा अवलंब करून एका रुग्णाच्या नाकाचे रोपणही केले. ही शल्यक्रिया पूर्णपणे यशस्वी ठरली. या यशस्वी शल्यक्रियेमुळे युरोपच्या चिकित्साक्षेत्रात क्रांतीच झाली. अशा प्रकारच्या शल्यक्रियेला `प्लास्टीक सर्जरी' असे नाव दिले गेले. डॉ.कार्प्यु यांच्यासह सर्व चिकित्सकांनी एका सुरात सांगितले की, `प्लास्टीक सर्जरी हे वैद्यकशास्त्राला भारताचे योगदान आहे.'
या वृत्तामध्ये कोणतीही अतिशयोक्ती नाही. कापले गेलेले अवयव जोडणे किंवा विच्छिन्न अवयवांची याच रीतीने दुरुस्ती करून ते पूर्ववत करणे ही शल्य-कला आपल्या पूर्वजांना ज्ञात होती. आचार्य सुश्रुत यांच्या प्रसिद्ध `सुश्रुतसंहिता' या ग्रंथामध्ये `प्लास्टीक सर्जरी'चे विस्तृत वर्णन केले आहे. मराठा गाडीवान कवास याचे नाक ज्या पद्धतीने बसविले गेले, त्या संपूर्ण प्रक्रियेचे तंतोतंत वर्णन `सुश्रुतसंहिते'मध्ये पूर्वीचेच दिलेले आहे. कवास याची शल्यक्रिया करणाऱ्या एका कुंभाराने अडीच हजार वर्षांपूर्वीच्या सुश्रुतसंहितेचे वाचन केले नसणारच. परंतु त्याच्या परिवारामध्ये ही कला निश्चितपणे परंपरागत कौशल्य पद्धतीने पुढे चालत आली असली पाहिजे.'

सुश्रुतसंहिता आणि शल्यक्रिया
`सुश्रुतसंहितेमध्ये नवीन नाक तयार करण्यासाठी त्या व्यक्तीच्या गालाचीही त्वचा शल्यक्रिया करून काढण्याच्या तंत्राचे वर्णन आहे. या तंत्राला आजच्या चिकित्साशास्त्रात `फेशियल फ्लॅप' पद्धती, असे म्हणतात. कापलेला कान जोडण्यासाठीसुद्धा `फेशियल फ्लॅप' पद्धतीचे वर्णन सुश्रुताने केले आहे. पिवळया काताशिवाय काही विशिष्ट तेले, मध आणि तूप यांचाही उपयोग सुश्रुताने सांगितला आहे. कापल्या गेलेल्या ओठांची शल्यक्रियासुद्धा याच प्रकारे केली जाते. प्रत्यक्षात सुश्रुताने आपल्या ग्रंथात तीनशे शल्यक्रियांचे वर्णन दिले आहे. त्यामध्ये ४२ शल्यतंत्रे आणि १२१ उपकरणांचा उल्लेख केला आहे.'
(श्री.सुरेशजी सोवनी यांच्या ग्रंथातील अवतरण)

अगस्त्यसंहितेतील वीजनिर्मितीची माहिती
श्री.रावसाहेब वझे यांच्यासंबंधी घटना येथे नमूद करण्याजोगी आहे.
संस्थाप्य मृण्मये पात्रे ताम्रपत्रं सुसंस्कृतम् ।
छादयेच्छिखिग्रीवेन चार्द्राभि: काष्ठ्यपांसुभि: ।
दस्तलोष्टोनिधातव्य: पारदाच्छादितस्तत: ।
संयोगाज्जायते तेजो मित्रावरुणसंज्ञितम् ।।
एक मातीचे पात्र घ्यावे (एरीींहशप िेीं), त्यामध्ये तांब्याची पट्टी ठेवावी, त्यात मोरचूद द्रावण घालावे. नंतर ओला लाकडी भुसा घालून पारा व जस्ताचे मिश्रण टाकावे. ते तारांनी जोडल्यावर `मित्रावरुण' नावाच्या शक्तीची निर्मिती होते. या आधारे संबंधित संशोधकांनी एक विद्युतघट बनविला आणि डिजिटल मल्टीमीटरद्वारे विद्युत्भाराचे मापन केले. त्यानुसार ओपन सर्किट व्होल्टेज (विद्युतभार) होता १.३८ व्होल्ट आणि शॉर्ट सर्किट विद्युतप्रवाह होता २३ मिलीअॅम्पीअर्स. याचे प्रात्यक्षिक याआधी ७ ऑगस्ट  १९९० रोजी नागपूरच्या विज्ञान संशोधक संस्थेमध्ये करण्यात आले होते. अशा प्रकारे विद्युत्घट तयार करण्यात आला. त्याच्या उपयोजनाचे काय? याविषयी अगस्ती म्हणतात -
अनेन जलभंगोस्ति प्राणोदानेषु वायुषु ।
एवं शतानां कुंभानां संयोगो कार्यकृत्स्मृत: ।।
शंभर (विद्युत्) घटांच्या शक्तीचा (ऊर्जेचा) पाण्यावर प्रयोग केला तर पाण्याचे रूप बदलून त्याचे प्राणवायू (ऑक्सिजन) आणि उदानवायूमध्ये (हायड्नेजन) परावर्तन होईल. उदानवायू प्रतिबंधक वस्त्रात बंदिस्त केल्यास त्याचा उपयोग विमानविद्येसाठी होतो.
(श्री.सुरेशजी सोवनी)
भारतातील विज्ञानाची अवकाशयात्रा - विमानविद्या
भारतात विमानविद्या होती की नव्हती? याविषयी बऱ्याच वेळेला वाद होतो, चर्चा झडते. १०२व्या सायन्स काँग्रेसच्या निमित्ताने तसाच वाद उफाळला आहे. सुदैवाने भारतीय विमान विद्येविषयी एक प्राचीन ग्रंथ उपलब्ध आहे. महर्षी भारद्वाज यांनी `यंत्रसर्वस्वम्' नावाचा एक ग्रंथ लिहिला होता, त्याचा एक भाग (अधिकरण) म्हणजे विमानशास्त्र होय. आज हा ग्रंथ पूर्ण स्वरूपात उपलब्ध नाही, पण तरीही या ग्रंथाच्या अभ्यासातून प्राचीन भारतीय विमानविद्येची कल्पना करता येते. या ग्रंथात विमानशास्त्राशी संबंधित अशा २५ पूर्वाचार्यांची नावे दिली आहेत. इतकेच नव्हे तर विमानचंद्रिका, व्योमयानतंत्र, यंत्रकल्प, यानबिंदू इत्यादी विमानशास्त्रविषयक ग्रंथांची माहितीसुद्धा दिली आहे.
विमानविद्येविषयी भारद्वाजांनी जे लिहिले आहे ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे. विशेेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे, क्रॅप्टन आनंद जयराम बोडस यांनी विमानविद्येविषयी मराठीत अप्रतिम ग्रंथ लिहून मोलाचे कार्य केले आहे. जिज्ञासूंनी मुळातून तो ग्रंथ पाहावा.

हे सर्व का नाकारले जाते?
असंख्य पुरावे उपलब्ध होण्याजोगे असूनदेखील कोणत्याही काळातील भारतीय प्रगती नाकारण्याचा खटाटोप का बरे केला जातो? आज तरी आमच्यावर इंग्रजांचे राज्य नाही, आम्ही स्वतंत्र आहोत ना! मग भारतीय विद्यांसाठी भारतातच विरोध का आणि कशासाठी? याचे कारण शोधायचे असेल तर, स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य विनोबा भावे सांगत होते त्याप्रमाणे, नवीन राष्ट्नीय वृत्तीची पिढी घडवण्याचे कार्य आम्ही आजवर हाती घेतलेच नाही. इंग्रजांची सारी निशाणे आम्ही मुळासकट उपटून फेकून दिली असती, तर किती बरे झाले असते! एक जुने घर जरी आपण विकत घेतले तरी किमान त्याची रंगरंगोटी करून, त्याचे जुने रूप आपण पालटून टाकतो. हाच न्याय जर स्वातंत्र्यानंतर आम्ही आपल्या समाजजीवनाला लावला असता; परकीय आक्रमकांच्या साऱ्या पाऊलखुणा नष्ट केल्या असत्या; तर भारतीय विद्यांना भारतातच विरोध होण्याची आजच्याप्रमाणे लाजीरवाणी वेळ आलीच नसती. भारतीयांची मानसिकता आहे तरी कशी, याचाही विचार या संदर्भात करणे आवश्यक आहे.
भारतीय मानसिकता
स्वामी विवेकानंदांकडे अमेरिकेत सर्वधर्मपरिषदेला जाण्याइतके पैसे नव्हते, त्यांना इथून साहाय्य करणारे अपवादच होते. परंतु अमेरिकेत त्यांना प्रसिद्धी मिळताच भारतात त्यांचे सर्वत्र कौतुक सुरू झाले. आजही परदेशात असणारी एखादी व्यक्ती तिच्या अंगभूत कर्तृत्वामुळे प्रसिद्धीला आली की, तिच्या भारतीय असण्याचे कौतुक आम्हास वाटू लागते. म्हणजेच आम्हाला गुणवत्तेच्या प्रमाणपत्रासाठी पाश्चात्य मापदंडाची गरज असते. जे जे परकीय आहे ते सर्व उत्तम, आणि जे जे एतद्देशीय आहे ते सर्व मागासलेले; अशी आमची समजूत आहे काय? श्रेष्ठतेची म्हणून काही मोजमापे आपल्याकडे आहेत का? ती `वैज्ञानिक' म्हणता येतील अशी आहेत का? याबाबत किमान अभ्यासाची तयारी हवीच. जगाला हल्ली केवळ `असून' भागत नाही; त्याचे `प्रेझेण्टेशन' लागते.
असे म्हणतात की, आज जगभरातील १८२ देशांमध्ये संस्कृत भाषेचा अभ्यास केला जातो. परंतु इथे भारतात संस्कृतची स्थिती काय आहे? भारतामध्ये संस्कृतला मृत भाषा म्हटले जाते. पं.नेहरूनी तो शब्दप्रयोग केला. `संस्कृत संगणकाची भाषा होणार' किंवा `जर्मनीमध्ये पहिला संस्कृत संगणक तयार केला जात आहे,' या आशयाच्या बातम्या ऐकून अचानक आम्हाला संस्कृत भाषेचे महत्त्व वाटू लागते. पण आम्हाला त्याआधी संस्कृत भाषा महत्त्वाची आहे, असे का वाटले नाही?-आणि परदेशातील संस्कृतबद्दलच्या त्या बातम्यांमागील सत्यासत्यता तपासून घेण्याचे कष्ट तरी आपण घेतले आहेत का? थोडक्यात जे अमेरिका-प्रवृत्त देशांकडून येते तेच चांगले, आणि भारतीय जे जे आहे ते मात्र वाईट, अशी आपली मानसिकता बनली आहे. आम्ही मुळातून काही वाचण्याचे, शोधण्याचे कष्ट घेत नाही, दिलेले पुरावे जुमानत नाही. यातून काय साधणार आहोत? प्राचीन भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयीचे पुरावे  मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध झाले पाहिजे, आणि त्याबरोबर राष्ट्नीय वृत्तीच्या संशोधकांनी ते मांडण्यासाठी या व्यासपीठांवर आलेही पाहिजे.
`आचार्य' `भट्ट' पदवीचे विद्वान इथे बा! होते
ज्यांच्याशी तव विद्वता लागेल न पासंगाते
ते गुलाम होण्याकरिता विद्वान जाहले नव्हते
ज्योति:शास्त्राला शिकशी
गणितांत हुषारहि ठरशी
उपयोग काय देशाशी?
म्हणवी तू `भास्कराचार्य',
दास्य हेच ना त्वद्ध्येय?
आजच्या युरोपाळलेल्या विद्वानांना व देशनिष्ठ तरुणांना हा प्रश्न जरुर विचारावा.
भारताची ज्ञान-विज्ञान परंपरा भव्यदिव्य आणि तेजस्वी होती; तिचा केवळ नामोनिर्देश करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. आजच्या तरुण संशोधकांनी आणि अभ्यासकांनी पुढे येऊन हे नवसंशोधनाचे कार्य हाती घेण्याची नितांत आवश्यकता आहे. विज्ञान हा असा प्रांत आहे की जेथे केवळ पुरावे देऊन चालत नाही, तर आपले म्हणणे प्रत्यक्ष सिद्धही करावे लागते. अशा वेळी वादात उतरणाऱ्या दोन्ही बाजूंनी, आपण भारतीय आहोत आणि हे ज्ञान-विज्ञान हा आपला वैभवशाली वारसा आहे, हे ध्यानात घेऊन त्याविषयी कार्य केले पाहिजे. विचारान्ती चर्चेअंती जो निष्कर्ष निघेल तो निघेल. परंतु त्यासाठी एकाच व्यासपीठावर यायला तरी हवे. कोणताही हट्ट आणि दुराग्रह न ठेवता तज्ज्ञांची चर्चा आवश्यक आहे. पुराणामध्ये देव आणि राक्षस यांनी मिळून समुद्रमंथन केले होते. त्यातून काय बाहेर पडणार आहे हे माहीत नसतानादेखील देव आणि राक्षस यांनी समुद्रमंथन केलेच. आपण निदान विचारमंथन तरी करू! पण एक मात्र नक्की समजून असावे की, बाहेर येणारे अमृत आणि विष दोन्हींचाही स्वीकार करावाच लागेल.
याविषयी फार तर इतकेच आशा-अपेक्षेने म्हणता येईल की, वरवरचा वाद घालण्यापेक्षा राष्ट्नीय वृत्तीने आपण संशोधन केले तर, आपल्या हाती आपली भरभराटीस आलेली वैभवशाली संस्कृती लागेल. त्याविषयी वाद करण्यापेक्षाही प्रत्यक्ष अभ्यास करणे अधिक सोयीस्कर आहे. आणि शेवटी `महाजनो येन गत: स पन्था:' हे सूत्र तर व्यासांनी महाभारतात सांगितलेले आहे.
इत्यलम् ।
- दीपक पाटणकर
आप्पाजी गोखले संकुल, मारुती चौक, सांगली
फोन : ९८५०९ ३४१७२


लुप्त होऊ शकते ती विद्याच नव्हे
आपले पूर्वज कसे होते यात आपले कर्तृत्व किंवा अकर्तृत्व काहीच नसते. तो अभिमानाचा किंवा शरमेचा विषय करणे चूकच. `आपले म्हणून चांगले' ही भूमिका सोडून, `चांगले म्हणून आपले' ही भूमिका घेतली तरच आपण सत्याकडे  वा श्रेयाकडे वाटचाल करू शकतो. वांशिक किंवा भौगोलिक वारसदारीपेक्षा `वृत्ती'मधील वारसदारी सांगून, त्यापासून आपण स्फूर्ती घेतली पाहिजे. जो सिद्धांत कोणीही पडताळून पाहू शकतो तोच वैज्ञानिक सिद्धांत होय. चोख पडताळणीतून तो सिद्धांत खोटाही पडू शकतो; कदाचित् अद्यापि तो खोटा पडलेला नसेल. `अॅरिस्टॉटलसुद्धा चुकू शकतो' हे म्हणण्याची हिम्मत दाखवणारा गॅलिलिओ  हा निखळ विज्ञानवादी परंपरेचा प्रतिनिधी होय. तो जर माझे स्फूर्तिस्थान असेल, तर तो कोणत्या भूमीत जन्मला व मी कोणत्या भूमीत, याने काहीही फरक पडत नाही. प्राचीन भारतात उच्च तंत्रज्ञान होते की नव्हते? या चर्चेत किंवा वादात आज आलेल्या प्रश्नाचा भावनिक बडेजाव व्यर्थ ठरतो. प्राचीन भारताबाबत अगदी आत्ताच्या काळातही निरनिराळे ज्ञान-दावे केले जातात. ते पारखून कसे घ्यावेत, याचे काही सामान्य निकष निश्चित करायलाच हवेत. नाहीतर वाद-मुद्दे यांच्या गदारोळात एकमेकांना न भिडणारे `स्क्यू' मांडले जातात, आणि गोल गोल फिरत राहतात. विज्ञानाच्या दृष्टीने एक निकष असा की, एखाद्या विषयातील साध्या सोप्या गोष्टी सापडण्याआधीच उच्च दर्जाची अत्याधुनिक (सोफेस्टिकेटेड) गोष्ट सापडणे शक्य नसते. दुसरा निकष असा की, ज्या तंत्राचे उपयोजन रुजते व रुळते ते लुप्त होऊच शकत नाही.

अचाट दाव्यांची पडताळणी करणे यातच विज्ञानवादी दृष्टिकोन असतो. पुष्पक हे खरोखरीचे विमान, धृतराष्ट्नला कथन करणारा संजय म्हणजेच दूरदर्शन, गांधारीच्या गर्भाचे शंभर तुकडे म्हणजे टेस्टट्यूब बेबी, गणपतीला हत्तीचे मुंडके बसविणे म्हणजे प्लास्टिक सर्जरी... अशी अनेक समीकरणे सध्या उफाळून वादात आली आहेत. स्वप्नरंजनातून एखादी कल्पना सुचणे-सापडणे म्हणजे ती वस्तू प्रत्यक्षात बनविता येणे नव्हे. ज्यूल व्हर्नच्या कादंबरीत जिचा उल्लेख आहे ती पाणबुडी पुढे काही काळानंतर वास्तवात आली. पण म्हणून असे कोणीही म्हणत नाही की, पाणबुडी बनवण्याचे तंत्र ज्यूल व्हर्नने शोधले! मिथकापुरतासुद्धा अर्थ नेमका राखला पाहिजे. उदाहरणार्थ मारुतीचे उड्डाण ही लांब उडी असणार, अर्थातच उडणे नव्हे! किती लांब? त्याचे वर्णन हा अतिशयोक्ती अलंकार झाला, पण हे उड्डाण दाखवताना आजचे फिल्मवाले तो उगाचच पोहल्यासारखे पाय हलवतोय असे दाखवतात. मिथकाचाही हा विपर्यास आहे.

अंतराळात विमानाचे वेगाने पुढे जाणे कसे घडते? तर त्याच्या तिरकस पंखांखाली हवेचा जास्त दाब निर्माण करून तो त्याला उचलतो-तोलतो. हेलिकॉप्टर चक्क वरून खाली झोत मारून स्वत:ला अंतराळी तोलून धरते. त्याचे तरंगणे हे त्याच्या पुढे जाण्याच्या गतीवर अवलंबून नसते. त्यामुळेच हेलिकॉप्टर सर्वाधिक इंधन खाते, प्रचंड ऊर्जा खर्ची पडते. ऊर्जास्रोत कोणता आणि गुरुत्वाकर्षणावर मात करणारा उलट दाब नेमका कसा निर्माण होतो, हे सांगितल्याशिवाय, कोणाला आपल्या वैज्ञानिक संकल्पनेतून `विमान' हा शब्द वापरण्याचा अधिकार मिळत नाही. बोलाचीच कढी ओरपायची तर `पारा आणि अभ्रक यांच्या संयोगाने तळपदे यांचे विमानही उडते' आणि `रसेश्वर दर्शनातील मोक्षही मिळतो' प्रत्यक्षात पारा आणि अभ्रक यांच्यात आंतरक्रियाच होत नाही! `न्यायमूर्ती रानडे तेव्हा उपस्थित होते' अशा दाव्यांनी, तळपद्यांचे विमान उडाले असे सिद्ध होत नाही. इथे कोणीही पारा आणि अभ्रक यांपासून ऊर्जा उत्पन्न करून दाखवावी म्हणजे माझा प्रश्न संपला, विमान ही फार पुढची गोष्ट झाली! ज्याला घोडे आवश्यकच नाहीत असा रथ पुराणातदेखील आढळतो काय? युधिष्ठिराचा जमिनीपासून दोन बोटे वर चालणारा रथ (हॉवरक्राफ्ट?) असला तरी, त्याला घोडे जुंपावे लागतातच. गेला बाजार पवनचक्की, शिडाची होडी, पतंग यांमधले वाहत्या हवेच्या ऊर्जेचे शास्त्र (एअरोडायनॅमिक्स) जर मांडले गेले असते, तर पुढे विमानाची बात!

जी सत्ये चिंतनगम्य असतात त्यांचे आकलन कदाचित कोणत्याही काळात होऊ शकेल. भूमितीची प्रमेये ही एकदाही निरीक्षण न घेता सिद्ध होतात. अशा सिद्धांतांना व्यवहाराची जोड लागत नाही. `पायथागोरसच्या अगोदर आम्ही!'- ही निदान सैद्धांतिक शक्यता तरी आहे. पण कॉम्प्रेसरचा मागमूस नसताना रेफ्रिजरेशन असूच शकत नाही. माठ म्हणजे बाष्पीभवनाने थंडावा. तिथे फक्त उष्णता अन्यत्र खर्ची पाडून ती घटविली जाते. जिभेवर श्वासांचा मारा करून कडक उन्हाळयात कुत्रासुद्धा ते करतो! पण कमी तापमानावरून जास्त तापमानाकडे उष्णता खेचणे (पंप करणे) हे कॉम्प्रसरविना अशक्य आहे. आपण शब्द कोणता वापरतो आणि त्यामागील वैज्ञानिक संकल्पना कोणती वापरतो, त्यात हळूच बदल करणे, ही केवळ तोंडचलाखी झाली. टेस्ट ट्यूब बेबी जन्माला येण्यासाठी बीजसंयोग जरी टेस्ट ट्यूबमध्ये झाला, तरी गर्भपोषण हे नाळेद्वारेच होते. गर्भाशय व नाळेविना गर्भाला ऑक्सिजन व सर्व जीवनद्रव्ये पुरवण्याचे तंत्र अजूनतरी सापडलेले नाही. `गांधारीच्या एम्ब्रियोचे शंभर तुकडे, तुपाने गच्च भरलेल्या डेऱ्यांंमध्ये सीलबंद करून वर्षभर ठेवले.' अशी महाभारतात स्पष्ट नोंद आहे. नुसत्या तुपातून त्यांना प्राणवायू इ. सर्व कसे मिळाले? आणि सत्त्वगुणांनी संपृक्त असे जे तूप, त्यातून तामसी, आसुरी असे कौरव कसे काय निपजले?- हा एक भारतीय प्रश्न आहेच.
कशालाही काहीही म्हणणे ही तर सहेतुक बेशिस्त! हे अशा `वैज्ञानिक'दाव्यांचे एक वैशिष्ट्य आहे. गणपतीचे मुंडके-रोपण म्हणजे आजच्या काळातील प्लास्टिक सर्जरी नव्हे. प्लास्टिक सर्जरी त्याच शरीराच्या त्याच टिश्यूने, फक्त बाह्यात्कारी केली जाते. अगदी आजच्या काळातही मुंडक्याच्या लंबमज्जेतील सर्व तंतू, तुटलेल्या मज्जारज्जूला, तसेच शिरेला शीर व धमनीला धमनी वगैरे जोडणे शक्य नाही. अवयवाचे रोपण करण्यासाठी सख्ख्या भावाचा अवयवही परका म्हणून, जुळतो असे नाही. (रिजेक्ट होऊ शकतो). एखाद्या पेशीच्या जीनोममध्ये किंचित बदल झाला तरी क्रॅन्सरची भीती असते, मग हत्तीचा जीनोम आणि माणसाचा जीनोम, म्हणजे काय होईल याची दावा करणाऱ्यांना कल्पना तरी आहे का? `आंघोळीला गेले आहे, आत येऊ नये,' एवढी पाटी लावण्याची किंवा दाराला कडी घालण्याची टेक्नॉलॉजी पार्वतीकडे नसेल काय? मग तीही नसताना मंुडके-रोपणाचे तंत्रज्ञान त्या काळात होते असे निदान पंतप्रधानांनी तरी म्हणू नये.

आयुर्वेदिक औषधे जी गुणकारी आहेत, त्यांच्यातील नेमका कोणता रेणू गुणकारी आहे हे सापडले, की ते औषध`शास्त्र' बनते. केवळ उष्ण-थंड, कफ-वात-पित्त अशा सबगोलंकारी संज्ञांनी सैद्धांतिक व्यूह बनत नसतो. अॅसिडीटीला `पित्त' म्हटले जाते, पण पित्त हे अल्कली (अल्कलाइन) असते. पोटातला `गॅस' आणि सांध्याच्या द्रवातील बुडबुडे हाही `गॅस'च. अशी साम्ये एकाच विकाराची (वात) मानण्याला `कार्यकारणभाव' म्हणणे कठीण आहे.

अशा चिकित्सेतून प्राचीन काळातील तथाकथित व काल्पनिक विज्ञानशोधांना उत्तरे मिळत नाहीत. परंतु त्याला कारण म्हणे आमच्यात डॉक्युमेंटेशनची पद्धतच नव्हती! मग ज्योतिषशास्त्राचे डॉक्युमेंटेशन इतके चोख कसे? मंत्रांसारखा परिणाम देणारी यंत्रे, असल्या आकृत्या काढता येतात, मग उपकरणांच्या आकृत्या का काढता आल्या नाहीत? ज्याचे उघड उघड उपयोजन (अॅप्लीकेशन) होते, त्याचे मौखिक का होईना पण डॉक्युमेंटेशन होतेच! शेतीतले, कारागिरीतले ज्ञान, त्या त्या क्षेत्रातील सर्वांपर्यंत पोहोचत होतेच. एखादी गोष्ट करता येणे आणि तिची रीत सांगता येणे, यात फार फरक असतो. आपण सगळेच सहजगत्या सुरगाठ बांधतो; कागदावर सुरगाठीची रीत लिहून पहा, म्हणजे सिद्धी आणि विद्या यातला फरक कळेल.सिद्धी ही नुसती सु-श्रुत असली तरी पुरते, विद्या मात्र सु-नोंदित आणि हस्तांतरणीयच असली पाहिजे.

सिद्धी प्राप्त होणे ही गोष्ट स्वरूपत:च वैयक्तिक असते. विद्या ही सार्वत्रिक असते. फक्त शुक्राचार्यांनाच जी प्राप्त असते, ती सिद्धी. म्हणूनच संजीवनी ही `विद्या' म्हणणे चूक आहे. वैयक्तिक, साक्षात्कारी आणि अपवादात्मक उपलब्धी म्हणजे विद्या नव्हे आणि विद्या देण्यात जो कृपण, आखडू असतो तो गुरूच नव्हे! आज पेटंट घेण्याची सक्ती आहे परंतु ते स्वत:जवळ पाडून ठेवणे, व इतरांना मिळू न देणे यावर बंदी आहे. मर्यादित कालावधीसाठी मानधन (रॉयल्टी) घेतल्यावर ते ज्ञान सर्व मानवजातीचे होते, हेच पेटंटचे खरे सार आहे. सार्वत्रिकीकरण हे आधुनिक विज्ञानाचे प्राणतत्त्व आहे. कृपणता, गुप्तता, ज्ञानाचा अनधिकार ही सगळी जिज्ञासेच्या द्रोहाची लक्षणे आहेत. `कोणालाच नाही मिळाले आणि माझ्याबरोबर सरणावर गेले' असे आधुनिक `पेटंट'लासुद्धा चालत नाही. `बिनवशिल्याच्या शिष्याला, कुळाबाहेरील वा जातीबाहेरील `परक्या'ला मिळू देणार नाही' ही खत्रूड वृत्ती म्हणजे गुरु महिमा; आणि पेटंट म्हणजे धंदेवाईकपणा, असे म्हणून आपण आपलेच नुकसान करून घेत आलो आहोत.

भारतातील तत्वचिंतन हे मोक्ष या पुरुषार्थासाठीच झाले. इतर तीन पुरुषार्थ तत्कालीन संकेतांवर आणि धुरीणांवर सोडले गेले. `नित्य तेच सत्, अनित्य ते असत्' या व्यावहारिक आग्रहापायी आपण सत्-असत् यांत फरक कसा पडत नाही हे सिद्ध करत राहिलो, व पश्चिमात्य संशोधक `फरक कसा पडतो' हे शोधत राहिले. वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था यांतील अन्यायाचा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवला तरी, अमूर्ताचे चिंतन आणि मूर्त स्वरूपाचे हस्तकौशल्य या दोहोत संबंध न उरण्यामुळे आपल्याकडच्या विज्ञानाला गर्भधारणेतच अडसर उत्पन्न झाला, हे निश्चित!
- राजीव साने,
फोन : (०२०) २५४३६५८३

विज्ञान-व्यासपीठ व्हावे, `काँग्रेस' नको
- वसंत आपटे
अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेमधील चर्चेच्या संदर्भात असे म्हटल्याचे ऐकले होते की, `बोलण्यासाठी बुद्धिमत्ता लागते; आणि ऐकण्यासाठी मात्र बुद्धिमत्ता आणि विवेक दोन्हींची गरज असते.' आपल्याकडे अनेक महत्त्वाच्या विषयांच्या संदर्भात जे अखंड वितंडवाद चालू असतात, ते पाहिल्यानंतर या विधानाची प्रचिती येते. मध्यंतरी श्रीलंका आणि भारत यांच्या मध्ये असलेल्या रामसेतूच्या कारणावरून वाद उफाळला होता. आजही तो रामसेतू कधीतरी पाण्याच्या वर डोके काढतो. त्याबाबतीत मुद्दा असा होता की, तिथे असलेला समुद्र बराचसा उथळ असल्यामुळे, तेथून जहाजे जाऊ शकतील असे समुद्रतळाचे उत्खनन केल्यास, श्रीलंकेच्या पलीकडून एडनकडे म्हणजे पुढे युरोपकडे जाणारी जहाजे भारताच्या किनारपट्टीलगतहून जाऊ शकतील. त्यांचा खूप मोठा वळसा आणि अर्थातच इंधन वाचेल आणि त्या बदल्यात भारताला टोल स्वरूपाचा कर मोठ्या प्रमाणावर मिळेल. इथे रामसेतूविषयक भावनांचा प्रश्न केला गेला. या प्रश्नामुळे विज्ञान आणि श्रद्धा यांचा संघर्ष सुरू राहिला. त्या संघर्षात भाग घेणाऱ्यांची पात्रता काय आणि त्या त्या क्षेत्रात त्यांचा अधिकार काय हा विचार महत्त्वाचा ठरतो. पण वादाचा धुरळा उडवून देण्यासाठी कुणीही काहीही बोलावे आणि एक बाजू पकडून मैदानात उतरावे अशी स्थिती आपल्याकडे होते.
जैतापूरच्या अणूप्रकल्पाची तीच गत आहे. अनिल काकोडकर असोत किंवा त्यांच्याइतक्या श्रेष्ठतेचे वैज्ञानिक असोत, त्यांनी कितीही तळमळून सांगितले तरी अणुभट्टी होण्यात अडथळे आणले जातात. त्या शास्त्रज्ञांपेक्षा स्थानिक गावकऱ्यांना उचकून देणाऱ्या तथाकथित नेत्यांची वैज्ञानिक समज जास्त मोठी ठरते, आणि प्रकल्प पूर्ण होण्याऐवजी वाद मोठा होतो. पूर्वी एन्रॉनच्या बाबतीत तेच घडले. इतकेच कशाला; मुंबईतील पेडर रोडच्या एका उड्डाणपुलाची गरज असतानाही लता मंगेशकर यांच्यासारख्या भारतरत्नाने हा उड्डाणपूल होणे कसे चुकीचे आहे यावर भाष्य केले होते. अर्थातच त्यांना स्थापत्य, वाहतूक किंवा तत्सम प्रश्नातले काही कळत होते अशातला भाग नव्हे; तर केवळ त्यांच्या प्रभुकुंज या निवासस्थानालगतून हा पूल जाणार होता, इतकेच त्याचे खरे कारण होते. प्राचीन भारतात विज्ञान किती प्रगत होते आणि त्या आधारे कोणत्या सुखसोयी इथे नांदत होत्या; तसेच त्याकाळी संशोधन किती प्रगल्भ झाले होते हा सदैव चर्चेचा विषय असतो. परंतु त्या संदर्भात काही विज्ञान, प्रतिभा, इतिहास, पुरातत्व इत्यादींचा अभ्यास करणाऱ्यांनी एकत्र जमून काहीतरी निर्णय होऊ शकला पाहिजे. त्याऐवजी कुणीतरी त्यांच्या आकलनाप्रमाणे जाहीर विधाने करत सुटण्यामुळे, ज्यांना या विषयात स्वारस्य असते अशा सामान्य जाणकारीच्या लोकांमध्ये संभ्रम होतो हे जास्त वाईट आहे. कुणी बोलावे, कुठे बोलावे, काय बोलावे याला सध्या धरबंध नाही. विद्वानांचा संवाद होण्याऐवजी तिरसटांची बडबड वाढते आहे.
कलकत्ता येथे एशियाटिक सोसायटीमध्ये १९१४ साली पहिली इंडियन सायन्स काँग्रेस भरली होती. आपल्या देशात विज्ञानाच्या संदर्भात कोणते आणि कसे संशोधन सुरू आहे हे त्या क्षेत्रातील बुद्धिवंतांना समजले पाहिजे, आणि तितक्याच जाणकार वैज्ञानिकांना त्यांचे प्रबंध त्या व्यासपीठावर मांडता आले पाहिजेत, अशा उदात्त हेतूने ते पहिले अधिवेशन भरले होते. त्यात देशभरातून १०५ वैज्ञानिक सहभागी झाले होते. अर्थात इतक्या उच्चस्तरीय विज्ञानाच्या बाबतीत पंडितांची संख्या बेताचीच असणार. शिक्षणाचा प्रसार आणि संधी उपलब्ध झाल्यामुळे आज शंभर वर्षांनंतर अशी संख्या खूपच वाढलेली आहे हे मान्य केले तरी, त्यावरही काही मर्यादा आहेतच. मुंबईमध्ये नुकतीच १०२वी सायन्स काँग्रेस भरली होती. त्यात उपस्थितांची नोंदणीकृत संख्या १५ हजार होती. याला विज्ञानाची जाण इतकी वाढली असे म्हणावे काय?
कोणे एके काळी ग्रंथकारांचे संमेलन म्हणून वाङ्मय क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या साहित्यिकांचे अधिवेशन भरले होते आणि त्यास तितकीच महत्त्वाची उपस्थिती होती. त्याचे रूपांतर हळूहळू साहित्यसंमेलनामध्ये झाले. त्यानंतर गेल्या पाच-दहा वर्षांत जी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली त्यांच्यावर नजर टाकल्यास काय दिसते? महाप्रचंड खर्चाचा जत्रास्वरूप असा तो हंगामा, साहित्याचे जाणकार अनुभवत असतील असे वाटत नाही. साहित्यसंमेलनाच्या मंडपालगत पुरणपोळया आणि हस्तकला यांची दुकाने लागलेली असतात.  आणि पुरणपोळया संपून गेल्या इतक्या रसिकांनी संमेलनात गर्दी केली होती, असे वृत्तांत प्रसिद्ध होत असतात. त्याचा चणाडाळ आणि गूळ या साहित्याशी संबंध असतो, वाङ्मयाशी नव्हे. पण या जत्रेला जसे साहित्यसंमेलन मानले जाते, तसेच या विज्ञान काँग्रेसला म्हणण्याची वेळ आली आहे. त्याचे स्वरूप बदलून खऱ्या वैज्ञानिकांचे ते संमेलन व्हावे. वर उल्लेखलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांच्या संदर्भात तिथे कसून चर्चा व्हावी आणि त्यातून निष्पन्न होणारे निष्कर्ष देशवासियांसाठी प्रकाशात यावेत हे उचित वाटते. त्याऐवजी सायन्स काँग्रेसमध्येही नोंदणीकृत उपस्थिती, प्रत्यक्ष वैज्ञानिक चर्चेच्या वेळी मुंबई पाहायला हिंडत असेल तर, प्राथमिक शिक्षकांचे अधिवेशन किंवा कवी संमेलन यापेक्षा वेगळे ते काय घडले?
मुंबईच्या विज्ञान संमेलनात `संस्कृतमधील प्राचीन विज्ञान' या विषयावरील परिसंवादात प्राचीन भारतीय हवाई उड्डाणाचे तंत्रज्ञान हा विषय समाविष्ट करण्यात येणार होता. त्यास नासामधील एका भारतीय संशोधकाने आक्षेप घेतला आणि तो विषय मांडलाच जाऊ नये म्हणून याचिका दाखल केली. त्या विरोधक याचिकेलाही सुमारे २०० वैज्ञानिकांचा पाठिंबा होता. तरीही हा विषय व्यासपीठावर मांडला गेला, हे योग्य घडले असे वाटते. कारण परिसंवादात जे विषय मांडले जावेत त्यांचा निर्णय घेण्यासाठी काही तज्ज्ञांची नियुक्ती असते आणि त्यासंबंधी बोलणारे तज्ज्ञ कोण आहेत ही त्या समितीची जबाबदारीही असते. इतर कोणीही त्याविषयी भाष्य करणे अनुचित आहे. वरील विषय वादातच व्यासपीठावर आला.
आजपर्यंत विमानउड्डाणाचा शोध राईट बंधूंनी लावला असे सर्वत्र सांगितले गेले आहे, परंतु सात हजार वर्षांपूर्वी कितीतरी प्रगत विमानतंत्रज्ञान भारतात होते, असा दावा क्रॅप्टन आनंद जयराम बोडस यांनी त्या व्यासपीठावरून केला. स्वत: बोडस हे विमानदलातले क्रॅप्टन आहेत. ज्यांची वैज्ञानिक दृष्टी निकोप आणि आधुनिक होती अशा कै.शंतनुराव किर्लोस्कर यांच्या विमानावरही त्यांनी पायलट म्हणून काम केले होते. शिवाय पायलट ट्न्ेिंनग  सेंटरचे ते निवृत्त प्राचार्य आहेत. एवढ्यावरून त्यांचे विमान उड्डाणातील कौशल्य निर्विवाद ठरते हे जसे खरे, तसे प्राचीन तंत्रज्ञान आणि आजचे विमान तंत्रज्ञान यांच्याविषयी त्यांचा अधिकार मानावा का, हा `पुराणविरोधक' वैज्ञानिकांतील वादाचा विषय म्हणता येईल. परंतु त्यांनी काही वेदकालीन संहिता, अतिप्राचीन हस्तलिखिते, भारद्वाज संहिता इत्यादींचा उल्लेख त्यासंदर्भात केला.
हा पुरावा आजच्या वैज्ञानिक दृष्टीने पुरेसा नाही असे कुणाला वाटत असले तरी, त्यामुळे हे दावे केवळ पोकळ पौराणिक भाकडकथा म्हणून, सायन्स काँग्रेसच्या व्यासपीठावर यायला नकोत, असे कुणी व का म्हणावे? दोन्ही बाजंूतील योग्य कोणती हे ठरविण्याचा अधिकार कोणाला पोचतो हे अधिक महत्त्वाचे आहे. कोणी पत्रकार, कोणी माध्यमसम्राट किंवा कोणी पुरोगामी म्हणविणारा विचारवंत हे अशा मांडणीच्या विरोधात असणार, कारण `असल्या' विषयांची खिल्ली उडवण्यात ही मंडळी पटाईत असतात. त्याउलट प्रत्येक आधुनिक शोध हा `आमच्याकडे पूर्वीच लागलेला होता' असे मानणारी काही बूर्झ्वा मंडळी दुसऱ्या बाजूने लढत असतात; त्यासाठी आजच्या कायद्याला आवश्यक असणारा कागदोपत्री ठाम पुरावा न देता केवळ तर्क, प्रतिभा, कल्पना यांच्या आधारावर काही प्रतिपादन करीत असतात. उत्तम विवेकी संवादातून या दोन्हीचा मेळ घालणे हे खरे म्हणजे बुद्धिमंतांचे खरे काम कर्तव्यच आहे.
याचा अर्थ असा नव्हे की, `दोन्ही बाजू बरोबर आहेत' म्हणून समन्वयाने किंवा समजूत काढण्याने, काहीतरी मधल्या अर्थाची विधाने करून ती मान्य करावीत! या दोन्हींच्या चर्चेतून नेमका सत्याचा शोध लावण्याची जबाबदारी अशा बुद्धिमंतांची आहे. अन्यथा दोन्ही बाजू सामान्य माणसाच्या दृष्टीने फोल आणि निरर्थक ठरतील. रामसेतूच्या बाबतीत त्यातील तज्ज्ञ व्यक्तींची मते झाकोळून राहिली; परंतु कुणीतरी रामभक्त किंवा कुणीतरी परदेशी देणग्यांवर पोसलेला सामाजिक कार्यकर्ता असल्या मंडळींचे जावईशोध लोकांना मुकाट्याने ऐकून घेत राहावे लागले. विज्ञानाचे खरे लक्षण हे पडताळणीतूनच दिसून येते. आपल्या विधानावर संशय घेणारा कोणीही सामान्य कुवतीचा माणूस जर, आस आणि तळमळ यांमधून काही शंका व्यक्त करत असेल तर ती त्याच्याच स्तरावर उतरून समजून दिली गेली पाहिजे. प्रत्येकाची बुद्धिमत्ता शास्त्रज्ञांइतकी मोठी नसेलही कदाचित, परंतु कोणा शास्त्रज्ञाने `ही गोष्ट तुमच्या आटोक्याबाहेर आहे म्हणून तुम्ही यावर बोलूच नका, किंवा मला तुमच्याशी बोलायचेच नाही' असे म्हणण्याचे कारण नाही. कारण विज्ञानाचा शोध कितीही क्लिष्ट आणि महान असला तरी तो सामान्य जनतेसाठी उपयोगी ठरलाच पाहिजे. त्यातील तंत्र, विज्ञान किंवा शास्त्र जरी कळले नाही तरी त्याचा उपयोग अनेक उदाहरणांतून सामान्य लोकांपुढे मांडता यायला हवा. पहिलीच्या पोराला शिकविण्यासाठी पीएच.डी.शिक्षकाचीच खरी गरज असते. त्यावेळी खऱ्या शिक्षकाला आपल्या पीएच.डी.ची अस्मिता बाजूला ठेवून पहिलीच्या मुलांना त्यांच्या बरोबरीने खाली उतरून शिकवावे लागते. ते कौशल्याचे असते. अन्यथा पहिली-दुसरीच्याच सामान्य कुवतीचा शिक्षक त्याच्या बौद्धिक वयाच्या मुलांनाही चांगले शिकवू शकत नाही हे चित्र सर्वत्र दिसते. पहिलीला कसे शिकवावे हे मात्र पीएच.डी.झालेल्याच काही विद्वानांनी एकत्र बसून ठरविले पाहिजे.
हीच गोष्ट सर्व शास्त्रांच्या बाबतीत लागू आहे. इलेक्ट्नॅनिक्सचे तंत्रज्ञान आणि मायक्रोचिप्स या गोष्टी सामान्य खेडूताला कळणार नाहीत म्हणून त्याबद्दलची तांत्रिक चर्चा त्याच्याकडून होणे अपेक्षित नाही. तरीही मोबाईल आणि कॉम्प्यूटरचा वापर खेडूत माणसे करू लागली आहेत. त्याही बाबतीत आता नसते सल्ले देणारी मंडळी कितपत `विज्ञानसंशोधक' आहेत याबद्दल शंकाच वाटते. झोपताना उशागती मोबाईल सेट ठेवू नये, जास्त वेळ मोबाईलवर बोलू नये, त्यामुळे रेडिएशनचा धोका असतो असे सांगितले जाते. मोबाईलच्या टॉवरमुळे पक्षी आणि प्राणी जीवनावर परिणाम होतो असेही म्हणतात. हे अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत असताना त्याला कोणता आधार आहे की नाही हे कोण ठरवणार? वास्तविक अशा सायन्स काँग्रेसमध्ये सामान्य लोकांच्या दृष्टीने तसे काही निष्कर्ष जाहीर केले गेले पाहिजेत.
सुमारे दहा वर्षांपूर्वी पाऊस कमी झाला त्याचे कारण पश्चिम घाटमाथ्यावरच्या पवनचक्क्या हे सांगितले गेले. त्याबाबतीत अनेक सामाजिक म्हणविणारे कार्यकर्ते उसळून उभे राहिले. त्यात वैज्ञानिकता किती आणि कोणती हे सामान्य जनतेला कळेनासे झाले. सायन्स काँग्रेससारख्या संस्था तिथे कमी पडल्या, परंतु पुढच्याच वर्षी धो धो पाऊस पडला आणि पवनचक्क्यांवरच्या विरोधावरही पाणी पडले. आता त्या पवनचक्कीवाल्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या आहेत, असे नवे प्रकरण पुढे आले आणि एकेकाळी पावसावर परिणाम करणाऱ्या पवनचक्क्या, म्हणून विरोध करणारी मंडळी `आम्ही त्याच वेळेला म्हणत होतो की पवनचक्क्या नकोत' असे म्हणू लागली आहेत. म्हणजे त्यांचा विरोध वेगळयाच काहीतरी कारणांनी पवनचक्क्यांना होता. त्याला पर्यावरणाचे आणि पावसाचे विज्ञान जोडले गेले.
साहित्यसंमेलनात पुस्तकांच्या खपाचे आकडे मोठमोठे येतात, पण त्यांचे विषय पाहिल्यास खऱ्या साहित्यप्रेमीच्या डोक्यात थोडासा प्रकाश पडतो. सौंदर्यसाधना, यश मिळवण्याच्या कला, पाककृती, पाचव्या मजल्यावरील खिडकीतील बगीचा या विषयांवरच्या पुस्तकांना आजकाल खूप मागणी आहे. त्याविषयीची पुस्तके खपविणे हे आजच्या मार्केटिंगची कला आहे. सामान्य वाचक बिचारा असल्या विषयांनाही भुलत असतो. तो ही पुस्तके विकत घेतो तर घेऊद्या, पण त्यावरून एक कोटि पुस्तके खपली याचे समाधान मानायचे असेल तर साहित्यसंमेलनात कोणी ग्रंथप्रेमी असतीलच तर त्यांनी काळजी करण्यासारखी स्थिती आहे. विज्ञान संमेलनाचेही तसेच आहे.
नुकत्याच झालेल्या सायन्स काँग्रेसमध्ये पंतप्रधानांना बोलावले गेले. प्रधानमंत्री मोदी यांची सामाजिक आणि वैचारिक बैठक सर्वज्ञात आहे. त्यामुळे त्यांनी प्राचीन भारतीय विज्ञानाचे दाखले द्यावेत यात आश्चर्य नाही. आजवर प्राचीन भारताविषयी संशोधनालाच नाकाराणारे सेक्युलर राजकारण करंटेच होते. राजकीय सत्ताबदलानंतर विदेशी पुरोगामित्त्वाचा अंगरखा उतरून सत्यशोधनाला चालना मिळावी. तथापि त्यात फुकाचा पुराणप्रिय अभिनिवेश कशाला? प्रश्न असा आहे की, प्रधानमंत्री वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध नसताना त्यांना सायन्स काँग्रेसच्या व्यासपीठावर बोलावले गेले, हे तरी कितपत योग्य? देशाची विज्ञानविषयक धोरणे प्रधानमंत्र्यांच्या हातात असतात हे खरे असले तरी, त्यांनी त्या निमित्ताने मंडपामध्ये उपस्थित राहणे वेगळे, आणि सायन्स काँग्रेसच्या प्रमुख पदावरून काही भाष्य करणे पूर्णत: वेगळे आहे. मंत्रीमंडळात तसा कोणी शास्त्रज्ञ असता तर त्याला बोलावणे एकवेळ इष्ट होते. साहित्यसंमेलनातसुद्धा पालकमंत्र्याला व्यासपीठावर बसविणे आणि त्याने तिथेही `जलसिंचन' करणे हे दरवर्षी वादाचे ठरतेच. यशवंतराव चव्हाण हे साहित्यिक म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी साहित्यिक म्हणून संमेलनात सहभागी होणे, आणि आज कुणीतरी मंत्री म्हणून साहित्यविषयक बोलणे यातला फरक, सामान्य कुवतीच्या साहित्यप्रेमीला कळून येऊ शकतो.
आजचे नेते हे जसे मतदारसंघातल्या बारशापासून संरक्षणविषयक परिषदांपर्यंत सर्वत्र बडबड करतात, तसे त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांनी करू नये. साहित्य हा विषय साहित्यिकांचा असला पाहिजे, ऐकणारे कुणीही असोत. तसेच विज्ञान हा विषय वैज्ञानिकांचा असला पाहिजे, ऐकणारे कुणीही असोत. ऐकणाऱ्यांची १५ हजार संख्या ही अतिरेकी वाटते. विज्ञानाची इतकी समज देशात आजच्या काळात असेल तर देश विज्ञानदृष्ट्या इतक्या मागे का पडतो हे कोडे आहे. या देशाला स्वच्छतेचे आणि पिण्याच्या पाण्याचे साधेसोपे नियमही कळत नसतील तर, विज्ञानाच्या मंडपात जमणारी गर्दी ही खरी की खोटी हे कळणे कठीण नाही. आजकाल मंडळी जशी सिद्धीविनायकाच्या किंवा कोण्या बाबा-बुवाच्या दर्शनाला गर्दी करतात तशीच ती साहित्यसंमेलन, औषधांचे प्रदर्शन किंवा विज्ञान संमेलन यातही गर्दी करू लागली आहेत. निवडणुकीच्या प्रचारसभेला होणारी गर्दी म्हणजे जसा जबाबदार मतदार नव्हे, तसेच या गर्दीच्या बाबतीत म्हणता येईल.
विज्ञानाच्या व्यासपीठावर कोणत्याही वैज्ञानिकाला आणि कोणत्याही विज्ञान विषयाला रोखता कामा नये. फार तर समोर बसणारे लोक कोण असावेत यावर बंधन घालायला हरकत नाही. वैज्ञानिक चर्चा आणि खुले अधिवेशन अशी सोय अशा ठिकाणी असतेच. वैज्ञानिक चर्चेवेळी कोणताही विषय कोणीही आपापल्या पद्धतीने मांडावा. त्यावर चर्चा व्हावी, योग्यायोग्य ठरवावे ही खरे तर योग्य रीत वाटते. चित्रकारांच्या संमेलनात किमानपक्षी चित्र काढता येणे किंवा चित्र समजणे इतपत तरी गरजेचे असते. इथे विज्ञानाच्या मंडपातही गर्दी होते आणि दुसरीकडे अंधश्रद्धेविरुद्ध कायदाही हतबल ठरतो. याचे कारण नेमके विज्ञान जाणून घेण्याची आणि ते नम्रपणे योग्य ठिकाणी मांडण्याची तळमळ किती आहे याचीच शंका वाटते.
पांडित्याला उध्दटपणाचा किंवा तिरकसपणाचा एक दोष चिकटलेला असतो. तो जितका कमी होईल तितके पाण्डित्य खुलते. कित्येक साहित्यिक  किंवा चित्रकार किंवा कलाकार आणि कित्येक वैज्ञानिकही याबाबतीत माहीर होते आणि आहेत. म्हणूनच या सर्वांच्या बाबतीत अधिक खुलेपणा वाढण्यासाठी अशी संमेलने भरवली गेली पाहिजेत. आपापल्या घरी भक्ती करीत बसणे सर्वांनाच शक्य असते, अशा वेळी `मीच सर्वात मोठा भक्त' अशी अस्मिताही भक्तांच्यात जागृत होते. ती कमी होण्यासाठी पूर्वजांनी वारीचे प्रयोग केले आहेत. तिथे सामान्य वारकऱ्यांच्यात मिसळणारे सोनोपंत दांडेकर असले की सामान्य भक्तांचीही उंची वाढते. तिथे जर दोन विद्वान प्रवचनकारांत झोंबी सुरू झाली तर भक्तांचा वारीवरचा आणि परमेश्वरावरचाही विश्वास उडतो. तोच न्याय सर्वत्र लागू आहे.
सायन्स काँग्रेसकडून आणि विद्वान वैज्ञानिकांकडून देशाची तशी अपेक्षा आहे. परदेशात काय चालते हे बघण्याचे कारण नाही. प्राचीन भारतात कोणते विज्ञान होते याची आजच्या सामान्य माणसाला फारशी काळजी नाही, पण आजच्या काळात जे विद्वान वैज्ञानिक आहेत त्यांच्यातील वादाची अधिक काळजी आहे. विज्ञानापेक्षा त्यांच्या अस्मिता आणि एकारलेपण यांची काळजी आहे. ती कमी होऊन वैज्ञानिकांनी विज्ञाननिष्ठ व्हावे आणि आपापल्या संशोधनाची आणि प्रतिभेची, संकल्पनांची परस्परांत पडताळणी करून सत्याच्या जवळ जाणारे काही निष्कर्ष सामान्य जनतेसमोर मांडले जावेत. या अधिवेशनाचे बोधवाक्य `शास्त्र आणि तंत्रज्ञान मानवी विकासासाठी' असे होते. मानवाचा विकास केवळ आधुनिक वैज्ञानिक शोधांनीच होतो असे नव्हे, तर माणसाला विज्ञान समजण्यातून तो होईल. ती समजण्याची कुवत प्रत्येकात वेगळी असल्यामुळे महत्त्वाचे विचार-कलह घडण्याची काही पद्धत असावी. संसदेत खुर्च्या फेकायच्या आणि गावातल्या शाळेत `संसदीय आणि अध्यक्षीय लोकशाही' यावर वाद घालायचा, तसे राज्यशास्त्र नसावे. त्याचप्रमाणे विज्ञानाने एकारलेपणा सोडून, जिज्ञासू तर्कनिष्ठ व लोकाभिमुख व्हावे. तिथे आधुनिक-पुराणमतवादी; भारतीय-पाश्चात्य वगैरे भेद असू नयेत. संशोधन व प्रत्ययकारिता हा विज्ञानाचा आधार आहे. प्रसारमाध्यमांचीही या बाबतीत फार महत्त्वाची भूमिका आहे. वाद पेटवण्यापेक्षा वादातून काही तत्त्वबोध निर्माण होत असेल तर तो लोकांसमोर मांडला जावा तरच समाज स्वस्थ होईल आणि देश मोठा होईल.    (ई-मेल : ररिश्रशक्षरस%हेींारळश्र.लेा)

शेतीसाठी नवी दिशा
- डॉ. राम नेने
कृषीप्रधान देशात शेती संकटात असणे हे चमत्कारिक आहे. आजपर्यंतची धोरणे व कालबाह्य समजुतींचे कायदे हेसुद्धा त्या स्थितीचे एक कारण आहे. तथापि आता चुका एकमेकावर ढकलण्यापेक्षा नवी धोरणे आखून त्या चुकांतून सुधारणा करायला हव्यात. पशुवैद्यक क्षेत्रात दीर्घकाळ अनेक ठिकाणी काम करून, ग्रामीण जीवन व शेतीचा डोळस अनुभव घेतलेल्या एका वयोवृद्ध अभ्यासकाचे हे उद्बोधक प्रतिपादन-


१९५५-५६ साली त्यावेळचे महसूलमंत्री भाऊसाहेब हिरे यांनी कूळ कायदा महाराष्ट्नत आणला. त्यामुळे कुळांच्या नावावर जमिनी झाल्या व मूळ मालक कंगाल झाले. तरी पण त्या मूळ मालकांनी काही ना काही व्यवसाय-नोकऱ्या सुरू केले. काही मालकांनी आपली मुले शिकवली, शहरांत पाठवली, किंवा पुढे विदेशातही. त्यांनी मार्ग काढला व ते सावरले. त्यांच्या मुलांना या महाराष्ट्नत कित्येक वर्षांत नोकरीचीसुद्धा शाश्वती नव्हती.
इकडे नवी कुळे शेती करू लागली. त्यांना त्यासाठी शेजारच्या मोठ्या जमीन मालकांकडून किंवा सावकारांकडून मदत घ्यावी लागली. त्यांनी त्यांच्याकडून शेतीकामासाठी बैलजोड्या घेतल्या. काही कुळांनी बियाणेसुद्धा या श्रीमंत शेतकऱ्यांकडून घेतले, व काही दिवस शेती केली. नंतर मालकांकडून मिळणारी मदत न घेता, बँकांचे कर्ज काढून शेती करण्यास सुरुवात केली. त्यात त्यांना यश आले नाही. त्यातच वारंवार दुष्काळ पडू लागला; कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ! त्यातच अलीकडच्या हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस, गारपीट यांची भर पडली. आपत्ती निवारण योजना उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत त्यांनी शेती केली. त्यातच त्यांची मुले मोठी झाली व वाटण्या झाल्या, जमिनीचे तुकडे झाले. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पार बिघडून गेली. शेजारील मोठ्या जमीन मालकांकडून मदत घेतली होती, त्यांनी दिलेल्या मदतीची परतफेड मागणी सुरू केली. बँकांनीसुद्धा कर्जाची परतफेड करण्यासाठी तगादा लावला.
अशा आर्थिक संकटात शेतकरी अडकला. मग शेजारील श्रीमंत शेतकऱ्यांनी त्यांची शेती हडपली. आजपर्यंत शेतकरी म्हणवणारी कुळे त्यांच्याच शेतात मजूर म्हणून काम करू लागली. त्यांचे पूर्वीचे मालक समजूतदार व समन्वयी होते; तर हे नवे धनको अरेराव होते. अशी परिस्थिती पश्चिम महाराष्ट्नच्या शेतकऱ्यांची तर आज आहेच, उर्वरित महाराष्ट्नत परिस्थिती यापेक्षा जास्त वाईट आहे, कारण पाऊस कमी. सरकारने मदत केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. दिलेली मदत अपुरी होती, तर काही ठिकाणी सरकारने दिलेली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही. शेतकरी कंगाल झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या.
मी १९६१ साली सरकारी कामासाठी विदर्भातील खेडयांत फिरत होतो. त्यावेळी पाटील व देशमुख यांच्या घरांमध्ये चाळीस चाळीस बैलजोड्या होत्या, मी स्वत: पाहिल्या आहेत. मालक झालेली कुळेही पन्नास वर्षांनंतर कंगाल झाली आहेत. पण हे पाटील-देशमुख  जमीनदार आजही तिथे आहेत, पण त्यांची मुले कुणी शाळामास्तर झाले, तर कुणी सरकारी नोकरीत गेले आहेत. अशा तऱ्हेने एके काळचे संपन्न जमीनदार आता नोकरदार झाले आहेत. कुळांचे व पूर्वीच्या जमीनदारांचे संबंध चांगले राहिले नाहीत. त्यांना बँकांकडे किंवा सावकारांकडे जावे लागते. १९५६ सालच्या कूळ कायद्याने महाराष्ट्नच्या शेतीची व कुळांची विल्हेवाट पुरोगामी समाजवादाच्या नावाखाली काँग्रेस सरकारने लावली.
ही वस्तुस्थिती सुधारण्यास आता काही करता येईल का? ह्या विचाराने मी चिंतित झालो. आज राज्य सरकारने मदत केली, तर उद्या केंद्र सरकारने आर्थिक मदत केली, असे चित्र वारंवार दिसणार का? हे आपणास परवडणार नाही. कारण पैसा राष्ट्नीय संपत्ती आहे. ती वारंवार फुकट देता येणारी नाही. म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकारांनी उगीच अनुदाने, माफी, मदत असे वाटप न करता काहीतरी उपाययोजना करून मार्ग काढला पाहिजे.
मला सुचणारे काही उपाय समोर ठेवतो आहे.
पहिला पर्याय म्हणजे कूळ कायदा प्रथम गुंडाळावा. १९५६ पूर्वीची स्थिती ७/१२च्या उताऱ्यावर ठेवावी. कुळांचे वंशज व मालकाचे वंशज एकत्र येऊन आपली जमीन कसण्यासाठी १ मालक व १ कूळ यांच्याकडे शेती द्यावी. जमीन जास्त असेल तर २ मालक व २ कुळे यांनी `आपली' जमीन कसावी. मालकांनी बियाणे, खते व शेतीची सामग्री पुरवावी. कुळांनी आपल्याकडून बैलांनी किंवा आधुनिक यंत्रांनी जमीन कसावी. कुळांनी शेतीची मशागत करून पीक काढावे व आलेले पीक वारसदारांनी समान घ्यावे. म्हणजेच मालकाच्या बाजूने शेती कसण्यास लागणारी पैशाची तरतूद कुळांना द्यावी, व कुळांनी मशागत करून शेती पिकवावी. येणारे पीक सर्वांनी वाटून घ्यावे. ज्या मालकांना हिस्सा नको असेल, त्यांनी तसे सांगावे आणि केवळ आर्थिक फायदा व्याजरूपाने घ्यावा. ज्यांना हा व्यवहार नको असेल त्यांनी तसे म्हणावे. अशा तऱ्हेने काही मालक गळतील तर काही कुळेही गळतील. मग राहिलेल्या मालकांनी व कुळांनी येणारे उत्पन्न वाटून घ्यावे. पूर्वीच्या जमीनमालकांकडे आपल्याच शेतीत गुंतविण्यास पैसे आहेत, असे साधारणत: दिसते. असे केल्याने सध्या एकटा शेतकरी; तो पैशांनी कमजोर आहे, तो भरडला जाणार नाही. त्यामुळे कर्ज व सावकारी पाश नाहीसे होऊन शेतकरी काही प्रमाणात सुखी होईल.
दुसरा पर्याय असा की, कृषी विद्यापीठे व शेती खाते यांच्या मदतीने जमिनींच्या नापीकीवर मात करता येईल. ह्यासाठी विद्यापीठाकडे असलेल्या कृषी विस्तार विभागावर कायमची जबाबदारी सोपवावी. कृषी विद्यापीठांना भरपूर अधिकार व मनुष्यबळ देऊन कृषी विस्तार विभागाकडून अल्पभूधारक मालकांना साहाय्य देता येईल. कूळ व मालक ह्या दोघांना आपापल्या कार्यक्षेत्रात अल्पभूधारक एकत्र आणून त्यांना पीक नियोजन (क्रॉपींग प्रोग्रॅम) देऊन अल्पभूधारकांची शेती पिकवता येईल. अल्पभूधारक कुळांनी किंवा मालकांनी आपल्या शेतात मजुरी करण्याची तयारी दाखवून, व कृषी विद्यापीठाने त्यांना रोजंदारी देऊन जमिनीत उत्पन्न घ्यावे. आलेले उत्पन्न विकून मजुरीचा खर्च वजा करून शिल्लक राहणारा फायदा कुळांना वाटून द्यावा.
शेतकऱ्यांस दररोज मजुरी मिळाली की त्याचे घर चालेल. बँकेकडे किंवा सावकाराकडे कर्ज मागण्यास न जाता, मिळालेल्या मजुरीवर घर चालवता येईल आणि वर्षअखेरच्या उत्पन्नाचा वाटा मिळेल. ह्या योजनेत शेतकरी आकर्षित करण्यासाठी एकरी एक हजार रुपये कृषी विद्यापीठाने जमीन मालकास फाळा (खंड) म्हणून द्यावे. महाराष्ट्न् सरकारच्या शेती खात्याने कृषी अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा ह्या कामासाठी उपलब्ध करून द्याव्यात. एका कृषी अधिकाऱ्याने १०० एकर जमिनीची हमी घ्यावी. ह्यामध्ये फायदा झाला तर फार चांगले; नाहीतरी शेतकऱ्यांना दुष्काळ व नापिकीसाठी दरवर्षी पॅकेज देतच असतो. हे एक पॅकेजच आहे असे समजावे. पण यात शेतकऱ्याचे कष्ट, कृषी विभागाचे मार्गदर्शन व जबाबदारी असे प्रयत्न होतील. शेती फायद्यात नसेल तरी कष्टाची मजुरी मिळेल.
तिसरा पर्याय सुचतो तो म्हणजे सहकारी तत्वावर जमिनी कसणे. कृषी विद्यापीठाकडे व शेती खात्यात असलेले विस्तार अधिकारी यांनी सहकारी तत्वावर १०० अल्पभूधारक एकत्र आणून, त्यांच्याकडून त्यांच्याच जमिनीत विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली सहकारी तत्वावर शेती करावी. ह्या सहकारी सोसायटीत प्रत्येक शेतमालकाच्या घरातील एक व्यक्ती शेतमजूर म्हणून काम करेल. शेती केल्यास फायदा होईल. सहकार खात्याने शेतीस लागणारी सर्व आयुधे पुरवावीत. शेती अधिकाऱ्यांनी सर्व जमिनीमध्ये पिकांची लागवण आपल्या देखरेखीखाली करावी. त्यांच्या सल्ल्याने पीक घ्यावे, म्हणजे फायदा होऊन ह्या शेतीत जनावरांना चाराही उपलब्ध होईल. ह्या शंभर भूधारकांनी २५ गाई, २५ म्हशी, ५० बकऱ्या व ५० देशी कोंबड्या पाळून आणखी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करावे. त्याकरिता हा चारा सवलतीत द्यावा. गाई, म्हशी व शेळया घेण्यास बँकेकडून कर्ज मिळावे. ह्या सर्व जनावरांची देखभाल जमीन मालकांनीच करावी. तो त्यांचा वैयक्तिक व्यवसाय ठरेल, किंवा ते पशुपालन सहकारी होईल. त्यांना तशी मजुरी सोसायटीने द्यावी.
देशी ५० कोंबड्यांचे युनीट प्रत्येक अल्पभूधारकाने घेतले तर त्यांची औषधे व लसीकरणाची जबाबदारी गटविकास अधिकारी यांचेकडे असलेल्या, पशुधन विस्तार अधिकाऱ्यांनी पाहावी. ५० देशी कोंबड्या पाळून दर महिना ५०० रुपये अल्पभूधारक मिळवू शकतो. ह्या कामास घरातील महिला मदत करतील. सर्व योजना राबवून अल्पभूधारकांनी कष्ट करून पैसे मिळवावेत.
चौथा पर्याय वेगळा महत्त्वाकांक्षी ठरेल. तो म्हणजे `कृषी प्रतिष्ठान' (अॅग्रो फाऊंडेशन)ची स्थापना. ह्या देशात जी धनाढ्य मंडळी आहेत त्यांना सरकारने शेती धंद्यात आकर्षित करावे व प्रत्येकास १ हजार एकर जमिनीत शेती करण्यास प्रोत्साहन द्यावे. त्याच्याकडील तांत्रिक अधिकाऱ्यांनी ह्या १ हजार एकरात उत्पादन कार्यक्रम (क्रॉपींग प्रोग्रॅम) तयार करून तो ह्या जमिनीतच चालवून उत्पन्न घ्यावे. अल्पभूधारकांनी ह्या शेतात घरटी १ याप्रमाणे मजूर म्हणून काम करावे. अॅग्रो फाऊंडेशनने मजुरी द्यावी शिवाय वर्षास एकरी २ हजार रुपये फाळा म्हणून द्यावा. असे केल्यास अल्पभूधारक यांच्याकडे मजुरीचे पैसे गेल्यामुळे शेतकरी सुखावेल. शेतकऱ्यांनी आपली जमीन कराराद्वारे अॅग्रो फाऊंडेशनला (खंडाने) द्यावी. स्वत:च्या शेतीत काम करताना उद्योग क्षेत्राप्रमाणे नियम पाळावेच लागतील. ही सर्व मदत देऊन जे शेतकरी त्याचा फायदा घेत नसतील, किंवा नुसते रडगाणे गातील, त्यांना पुढची मदत शेतीच्या नावाखाली देऊ नये.
एक गोष्ट नक्की की, शेतीसाठी पाणी पाहिजे. ते पाणी उपलब्ध होण्यासाठी गाव तिथे तळी निर्माण करून विहीरींना पाणी मिळेल हे प्रथम पाहावे लागेल. जिराईत शेतजमिनींमध्ये जो पाण्याचा ओहोळ पावसाळयात वाहतो, त्या ओहोळाचा प्रवाह जिथे दुसऱ्या शेतात जातो तिथे, जमिनीखाली ८ ते ९ फूट खोल अशा २० हजार लिटर पाणी मावेल अशा सिमेंटच्या टाक्या पुराव्यात; त्याचे पाणी पाऊस जेव्हा ताण देतो तेव्हा पंपाने उचलून, ठिबकसिंचनाने शेतीस पाजावे.
जर साखर कारखाना जवळ असेल तर, साखर कारखान्यांनी ऊस लावणीसाठी अल्पभूधारकांची जमीन घेऊन त्यांना फाळा म्हणून भरघोस पैसे द्यावेत व अल्पभूधारकास शुगर फॅक्टरीत नोकरी द्यावी. याचप्रमाणे दुधाची मोठी डेअरी जर जवळ असेल तर त्यांनी अल्पभूधारकाची जमीन घेऊन चाऱ्याचे उत्पन्न घ्यावे व अल्पभूधारकांना डेअरीमध्ये काम द्यावे. त्यांना रोजगार द्यावा, जमिनीचा फाळा द्यावा.
ह्या सर्व बाबी मी सरकारसमोर व सर्व जाणत्यांसमोर ठेवत आहे. ह्या योजना सरकारने राबवाव्यात. अधिक धान्य, अधिक दूध उत्पादन घ्यावे. महाराष्ट्नतील शेतकरी संकटात आहे किंवा ते आत्महत्त्या करतात त्या बातम्या परदेशात जातात, व देशाची प्रतिष्ठा कमी होते. सरकारने ह्या पाच वर्षांच्या काळात या प्रकारे कामास गती द्यावी.
- डॉ.राम नेने,
३०/२०५, उन्नतनगर २, गोरेगाव(प.), मुंबई ६२
फोन (०२०) २८७३२९९०


Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन