Skip to main content

26jan2015

वेदशास्त्र संस्कृत पाठशाळा, भटवाडी-सावंतवाडी (जि.सिंधुदुर्ग)
अठराव्या शतकाच्या अखेरी (१८५४) इंग्रज शासनाने सार्वत्रिक शिक्षणाचा कायदा पास केला. व्ह.फा. किंवा मुलकी परीक्षा पास झाला की बव्हंशी तरुणांना नोकरीची हमी असे. गावात ब्राह्मणेतरांकडे दक्षिणा किरकोळ मिळे. अर्ध्या पैशाचे नाणे, पै चे नाणेही होते. बारीक सारीक कामाला याहून अधिक दक्षिणा नसे. खेड्यापाड्यातला पुरोहितवर्ग गरीबच राहिला. कोणाची बायको म्हणे, `बाजारात, नवे हरभरे आले हात...' यजमान लगेच टिणके `हवेत कशाला हरभरै? आमचें कुळीथ हात तेच बरें!'
खेड्यापाड्यांतून अशीही काही घराणी होती, त्या घराण्यांतून वेदपठण तर होत असे, शिवाय शास्त्र, वैद्यक, व्याकरण, ज्योतिष आणि सुंदर हस्ताक्षरात पोथ्या लिहिण्याचे काम अशी सरस्वतीची आराधना होत असे. वालावल गावात उपाध्यांचे घराणे, पुराणिकांचे, भागवतांचे, बिबवण्यात धुपकरांचे, माणगावात साधले, कोनकर, टेंब्ये अशी बरीच घराणी विद्वत्ता सांभाळून होती. त्यातलेच एक सावंतवाडीतील अळवणी यांचे घराणे. सावंतवाडी नगरीत प्राथमिक आणि माध्यमिक शाळा निघाल्या. अधिपती श्रीमंत श्रीराम सावंत भोसले यांनी आपला मनोदय जाहीर केला होता, `माझ्या राज्यात गाव तिथे शाळा आणि गाडी तिथे रस्ता असेल.' त्यामुळेच नगरातील शे-शंभर ब्राह्मणांच्या घरांतील नव्या मुलांचा ओढा नव्या शिक्षणाकडे होता.
भटवाडीतील अळवण्यांचे घराणे ओटवण्याचे असावे. काही विद्वान ब्राह्मणांना वेदाध्ययनवंचित स्थितीची खंत वाटे. एका वैद्याच्या घराण्यासाठी बहुधा तिसऱ्या खेमसावंतांनी तीनशे वर्षांपूर्वी विठ्ठल रखुमाईचे मंदिर बांधून दिले होते, आणि नित्य पूजा-अर्चा या अळवणी घराण्याकडे होती. त्या घराण्यात ज्योतिषशास्त्राचा मोठा व्यासंग होता. पंचांग तयार करण्याइतपत पात्रता होती. त्यातलेच विठ्ठल विष्णूभट्ट अळवणी हे एक. विठोबाअण्णांनी चांगले तरतरीत चार मुलगे जवळ करून ओटवणे गावात गुरुकुल वसवले. आणखी काही पुरोहित त्यांच्या मागे लागले, विनवू लागले, `आमच्या मुलास तुमच्याकडे ठेवून घ्यास. ते माधुकरी मागून जेवतील. तुमच्या आंगार भार पडाचा नाही.' विठोबाअण्णांना विचार पडला. वेदशाळा सावंतवाडीत नेली तर? सावंतवाडीत खासकीलवाडा, माठेवाडा, सबनिसवाडा आणि भटवाडी मिळून शंभरेक घरे होती. माधुकरीला कमी पडणार नाही. त्याकाळी वैश्वदेव घरोघरी होत असे. त्यातलाच एक भाग बटूला अन्नदान करणे हा होता. सावंतवाडीत मुलांना पठण करायला विठ्ठल व दत्तमंदिर होते, छात्रांची सोय तेथे होत असे. वेदपाठशाळा चालू झाली. पंचवीस-तीस छात्रही जमले.
डॉ.मोरेश्वर गोपाळ देशमुख हे सुधारणावादी कै.गोपाळ हरी देशमुख यांचे चिरंजीव. त्यांचे मूळ घर रत्नागिरीजवळ पावस येथील. परंतु डॉक्टरसाहेब मुंबईतल्या मोठ्या हॉस्पीटलचे प्रमुख म्हणून काम करीत. ते तेव्हाच्या मुंबई इलाख्यातील एम.डी. ही वैद्यकीय शाखेतील उच्च पदवी घेतलेले पहिले डॉक्टर होते. सावंतवाडीजवळचे तळवडे गावचे खांडेकर म्हणून एक गृहस्थ मुंबईच्या जनरल पोस्टात वरच्या हुद्द्यावर काम करीत. कर्मधर्मसंयोगाने डॉ.देशमुख हे खांडेकरांसमवेत तळवडे येथे आले व त्यांना काही प्रचिती आल्यावर तिथेच राहू लागले. याच सुमारास सावंतवाडीत वेदपाठशाळा सुरू झाली ही वार्ता डॉ.देशमुखांना कळली. डॉक्टर तळवड्यातून सावंतवाडीला येऊन जात. त्यांनी या वेदपाठशाळेकडे लक्ष दिले आणि चांगल्या निष्ठावान चार लोकांना एकत्र करून संस्थेची उभारणी केली. `वेदशास्त्र पाठशाळा व कुमारद्रव्य निधी' या नावाने या संस्थेची नोंदणी १९०४ साली झाली होती. साधारण एप्रिल-मे चा तो सुमार होता.
या संस्थेच्या स्थापनेसाठी पुढे आलेले पुरुष पुढीलप्रमाणे होते - विठ्ठल विष्णुभट्ट अळवणी (विठोबा अण्णा), डॉ.मोरेश्वर गोपाळ देशमुख, दत्तात्रेय बळवंत चिटणीस (हे मुंबईत सॉलिसिटर होते, त्यांचे सावंतवाडीत वाड्यासारखे मोठे घर आहे) वैद्यभूषण गणेश व्यंकटेश सातवळेकर (हे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार होते आणि त्यांचा औषधे तयार करण्याचा कारखाना होता.) अशी ही संस्था नोंदणीकृत झाली. त्यावेळी सगळेच लोक जिवाभावाने या संस्थेला सांभाळीत. वालावलीचे वेदमूर्ती गंगारामशास्त्री कशाळीकर हे घनपाठी वैदिक, मुलांना शिकवू लागले. हे शाळेचे पहिले मोठे गुरुजी. त्यांच्या मागे त्यांचेच चिरंजीव शंकरशास्त्री कशाळीकर हे शिकवू लागले. ते संस्कृत व्याकरणाचार्य होते. त्यांचा वेद, दर्शनशास्त्रे तसेच उपनिषदे या सर्वांवर तेवढाच अधिकार होता. त्यांच्या काळात या वेदपाठशाळेची चांगली भरभराट झाली. साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण केळकर, ग.वि.केतकर, वेदमहर्षी पं.श्रीपाद दामोदर सातवळेकर, पां.ना.मिसाळ अशा मोठ्या माणसांनी दिलेले शेरे आजदेखील तिथे वाचायला मिळतात. १९०४ ते १९४८ या कालावधीत सरासरी तीस ते पस्तीस छात्रांची नोंद असे. काही छात्र महिन्याला तीन रुपये भरून शाळेचे जेवण घेत. त्या काळात श्री.ना.कशाळीकर (गुजरात), संस्कृताध्यापक पित्रे, काका उमर्ये, श्रीधर भिकाजी जोशी असे नामवंत छात्र या ठिकाणी शिकून गेलेले आहेत.
१९४८ च्या दरम्यान शंकरशास्त्र्यांचे आकस्मिक निधन झाले. अवस्था बिकट झाली. तरी वेदमूर्ती रामचंद्रशास्त्री शं.सप्ते यांनी शाळा सावरायचा प्रयत्न केला. परंतु गावोगावी माध्यमिक शाळा उभ्या राहू लागल्या आणि ब्राह्मणांचा वेदशाळेकडचा ओढा एकदम आटला. डॉ.देशमुख यांनी जमीन खरेदी करून वेदपाठशाळेची स्वतंत्र इमारत बांधली होती. इमारत विकण्याची कुजबूज सुरू झाली. परंतु काही लोकांनी वेदशाळेच्या प्रेमाने पुन्हा उचल खाल्ली. त्यात नरहरी गणेश सातवळेकर, विष्णू सखाराम नाखरे, द.म.पेंढारकर, प्रोफेसर आंबिये अशा जाणत्या लोकांनी वेदशास्त्र पाठशाळेचे पुनरुज्जीवन केले. नवे संचालक मंडळ तयार झाले. सभा होऊ लागल्या.सप्ते गुरुजी शिकवीत. हरिहर आठलेकर यांना संस्थेचे सभासद करवून घेऊन गुरुपदी बसविले. यांनी वीस वर्षे गुरुपदी काम केले. त्यानंतर वेदमूर्ती भागवत, भालचंद्र जोशी, वे.शा.सं.माधव ओगले, बा.प्र.पेंडसे यांनीही काम केले आणि शाळा सुरू ठेवली. पुढे या पाठशाळेला वेदमूर्ती गणेश्वर सांब दीक्षित हे गोकर्ण येथील विद्वान आचार्य लाभले आणि या शाळेची कीर्ती दूरवर पोहोचली. याच सुमारास संचालक मंडळाने नूतन इमारतीचा संकल्प केला आणि आज डोळयात भरणारी भव्य इमारत उभी राहिली.
या शाळेला जगद्गुरू शंकराचार्य करवीर पीठ, अमेरिकन पंडिता हेमा पाटणकर, जर्मन पंडित प्राध्यापक देवदत्त (जन्माने आणि वर्णाने जर्मन) जे वेदपठण करू शकत होते, असे बरेच विद्वान भेट देऊन गेले आहेत. या पाठशाळेत पुण्याच्या वेदशास्त्रोत्तेजक संस्थेचे परीक्षा केंद्र आहे. वेदांच्या मौखिक आणि संस्कृतच्या लेखी परीक्षा होतात. ही वेदशास्त्र संस्कृत पाठशाळा एकशे दहा वर्षे उभी आहे.
नूतन वास्तू दुमजली असून तिचे क्षेत्रफळ ६४०० चौ.फूट आहे. त्यामध्ये कार्यालय, ग्रंथालय, पाहुण्यांसाठी निवासाची सोय, तसेच ४० छात्रांची निवास-भोजनासह व्यवस्था आहे. पत्ता - वेदशास्त्र संस्कृत पाठशाळा, भटवाडी-सावंतवाडी (जि.सिंधुदुर्ग)
-  हरिहर आठलेकर
(`कुशाग्रसिंधू'तून संक्षेप)



`संस्था' होतात, संघटन होत नाही
`संघटन हवे, एकत्रीकरण हवे' असे सर्वांना वाटत असते, वाचेने सगळेच तसे म्हणत असतात. कोणत्याही एका निकषावर एकत्रित येण्यासाठी सर्वत्र प्रयत्न चालू असतात. व्यवसाय, भाषा, प्रदेश, धर्म, ज्ञाती, राजकीय हितसंबंध, समस्या वगैरे कोणत्याही निकषावर संघटन होण्यात गैर काहीच नाही. यांपैकी कोणत्याही सूत्राने ज्यांना एकत्र बांधू पाहावे, त्यातलेच पुष्कळजण त्या संघटनप्रयत्नांस खो घालू पाहात असतात; तो विरोध करण्यापुरतेही ते एकत्रित येत नसतात.

तरीही एकेका कारणाने सर्वंकष घटकाचे केंद्रीय संघटन होणे अनिवार्य ठरते; पण तसेही घडत नाही. जगातील कामगारांनो एक व्हा' असा नारा देत, एकाच कारखान्यात `दोन युनियन नांदत असतात, आणि परस्परांत तंडत असतात. ग्राहक कल्याण या एकाच हेतूने ठिकठिकाणी अनेक संघटना `अखिल भारतीय' असतात. त्या सर्वांचा महासंघ म्हणून देशस्तरावर एकत्रित यावा; तर तेही होत नाही. एका गावात किंवा गल्लीतही चार-सहा गणपती मंडळे असतात, तशा जागोजागी संघटनांची म्हणून वेगळीच पिके उगवत असतात. पण तिथेही गणपतीचा उद्देश मात्र `सामाजिक एकता व बंधुभाव' असल्याचे सांगण्यात येते. ज्ञातिसंघटनांतसुद्धा `संघटन' साध्य होत नाही ही मौज आहे.

प्रत्येक व्यक्तीचे दैनंदिन व्यवहारात `बरे चाललेले असते', पण त्यातही त्यांच्या लेखी पुष्कळ समस्या असतातच; त्याप्रमाणे त्या एकूण ज्ञातीची परिस्थिती ठीक असली तरी त्यांच्यात कौटुंबिक समस्याही असतात आणि एकत्रित करण्याजोगेही खूप काही असते. त्यासाठी सर्वांची शक्ती एकवटल्याशिवाय चालत नाही. अशा अनेक कुटुंबांची शक्ती स्थानिक पातळीवर एकत्र यावी, तितकीच त्याची परस्पर गुंफलेली साखळी व्हावी. आपल्या `संघटनां'ची संख्या भरपूर वाढते आहे, हेच वास्तविक विस्कळीतपणाचे लक्षण आहे. एखाद्या राजकीय पक्षाच्या जशा प्रत्येक नेत्यागणिक एकेक (दु)फळया असतात, तशा ज्ञातिसंघटनांतही होतात.
प्रत्येक फळी आपापल्या ठिकाणी स्वत:चे बळ वाढवू पाहते, पण सर्वंकष मध्यवर्ती संघटना ज्या त्या निकषावर एकच एक अशी उभी राहात नाही, याचे वैषम्य वाटते. स्थानिक बळ, सदस्य संख्या, पैसा, स्थावर मालमत्ता, हाताशी एखादे `मुखपत्र', यांच्या आधारे सगळयाच शाखांवर या तालेवार संस्था राज्य करू पाहतात. साहित्य, शिक्षण, माध्यमे, कला-क्रीडा, विज्ञान, पर्यटन अशी कोणतीही क्षेत्रे त्या प्रवृत्तीला अपवाद नाहीत. ज्ञातीसंस्थांतही तोच प्रकार दिसतो. पुणे-ठाणे-मुंबई वगैरे ठिकाणी तिथल्या स्वाभाविक अनुकूलतेमुळे एक संस्थात्मक शक्तिकेंद्र निर्माण होते, तसे छोट्या शहरांत किंवा निमशहरी गावात होऊ शकत नाही. पण या दोहोंनी एकत्रित आल्याशिवाय त्यांचा हेतू आणि प्रभाव संघटनदृष्ट्या सफलच होणार नाही. हे समजून न घेता `आम्ही-आमचे' यांचा विचार इरेला पडतो आणि एकत्व साधतच नाही.

मोठ्या शहरांतील संस्था मोठ्या भासतात, कारण त्यांचे आकडे मोठे दिसतात. एखाद्या ज्ञातीची संख्या ज्या शहरात एक लाख असेल तिथे सभा-संमेलनात शंभर लोक येतात. पण तालुक्याच्या गावात दहापैकी सहा एकत्र येतात. त्या सहांऐवजी शंभरांची संख्या फार मोठी दिसत असली तरी एकत्र येऊ पाहणाऱ्यांचे गणिती प्रमाण शहरांत एक दशांश टक्के व गावात साठ टक्के इतके भिन्न होते. मग `मोठी' संघटना कोणती म्हणावी? शहरी नोकरदारांच्या संस्था जशा आपल्या उपजत स्वाभाविक मोठेपणाच्या भांडवलावर आणखी आणखी लाभ मिळवू पाहतात, तसेच कोणत्याही बाबतीत - ज्ञाती किंवा व्यवसाय यांच्या बाबतीतही, होत असते. मुंबईतल्या पत्रकारसंघाला मोठी पुढारी माणसे सहज `लाभतात', तसे तालुक्यातल्या संघाचे होत नाही. मुद्दा असा की, एकाच निकषावर उभे राहणे इष्ट असणाऱ्या संस्था-संघटना `लहान'-`मोठ्या' होत होत आमचे-तुमचे करू लागतात.

यांतून संघटन वाढत नाही. निकष एकच असला तरी परिस्थिती वेगळी असते, समस्या वेगळया असतात, त्यामुळे एकाच निकषावर आधारलेल्या अनेक `संस्था' होतात, त्या असंघटित असतात. भारत हे `संघराज्य' असले तरी, आणि प्रत्येक राज्याचा हेतू व नागरिकत्व समसमान असले तरी त्रिपुरा व महाराष्ट्न् या राज्यांत लहानमोठेपणा असतो, इतकेच नव्हे तर गुजरात मोठा की महाराष्ट्न् मोठा, यावर अहमहमिका असते. या भावनेतून `संघराज्य' कसे होईल? संघटितपणा अपेक्षित असेल तर मोठ्यांचे मोठेपण लहानांच्या कारणी यायला हवे, आणि केंद्रीय संरचनेला अनेक लहानांची शक्ती लाभायला हवी. शहरी मोठी संस्था आपल्यास `केंद्रीय' मानते, त्यांचे संघटनदृष्ट्या वृथा मोठेपण लहानांस सोसवत नाही. यांतून छोटे-मोठेपणा वाढतो. एकेका शहरात समान हेतूंनी अधिक संस्था उभारतात. `त्यांचे-आमचे' सुरू होऊन, एकत्रीकरण-संघटन हे दूर राहते.

यासाठी अगदी प्राथमिक, मूलभूत गरज असते ती संवादाची. हा संवाद पत्रांतून, पत्रकांतून किंवा फोनवर होऊ शकत नाही. पत्रे-फोन ही प्राथमिकता, पाठपुरावा वगैरेसाठी साधनभूत असते. संवाद प्रत्यक्षात व्हावा लागतो. दोन देशांचे प्रमुख एकमेकांस भेटतात, ते काही त्यांना पत्र किंवा फोन वापरता येत नाही म्हणून नव्हे! समक्ष भेटीगाठींतून अनौपचारिक चर्चा होते, `दृष्टी'ला बऱ्याच गोष्टी कळतात. कोणत्याही कुशल संघटनकार्याला प्रवास अटळ असतो आणि `माणसांशी प्रत्यक्ष संवाद' हेच त्याचे इंगित असते.

`या संघटनेने आम्हाला काय दिले?' किंवा `या संघटनेचा आपल्याला काय उपयोग?' असे प्रश्न आपल्यातले कित्येकजण विचारत असतात, त्यावेळी उभय बाजू एकमेकांस `लहान-मोठी संस्था' समजत असतात. त्या प्रश्नांचा खरा आशय `त्या संघटनेला आम्ही काय दिले?' किंवा `या संघटनेला आमचा काय उपयोग करून देता येईल?'- असा असला पाहिजे. त्यासाठी हे संघटन `आपले' आहे असा भाव निर्माण करणे ही प्राथमिकता प्रत्येक नेत्याची हवी. स्वत:चे स्थान व पायाखालची संस्था केंद्रीय संघटनेत विलय पावण्याचीही मानसिक तयारी हवी. ती नसेल तोपर्यंत `सर्वांनी एकत्र यावे-संघटित व्हावे'- याचा खरा अर्थ `सर्वांनी आमच्या प्रभावाखाली काम करावे' असाच राहील. समविचारी पक्ष तिसरी आघाडी करू पाहतात, त्यातलाच तो प्रकार ठरतो!
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन