Skip to main content

Sampadkiya in 27may2013

मूल्ये रुजविणारी पथ्ये

`पाकीटमार' या नावाचा एक सिनेमा पूर्वी होता, त्यात देवआनंदची प्रमुख भूमिका होती. उगवत्या तारुण्यात त्याला वाईट वळण लागले आणि लोकांच्या गर्दीतून खिशातील पाकिटे लंपास करण्याचे कौशल्य लवकरच मिळाले. पुढच्या दीडदोन तासात त्याच्या त्या पाकीटमारीचा खेळ, त्यातून आलेला हरामीचा पैसा, एकट्या विधवा आईला फसवून स्वत:स मोठी नोकरी असल्याची बतावणी, आणि एका भोली-भाली टिंगाणीसह बागेतील लपंडाव. शेवटच्या भागात त्या आईला याचे प्रताप समजतात, ती उन्मळून पडते आणि मरते. तिच्या चितेकडे पाहून या उंडार तरुणाला पश्चात्ताप होतो आणि डाव्याउजव्या खिशातून बदाबदा पाकिटे काढत तो ती सगळी मारलेली पाकिटे त्या चितेवर फेकून चांगले वागण्याची मनोमन शपथ घेतो. वाईटाचा त्याग करून चांगल्याचा संदेश त्या सिनेमातून मिळेल असा हेतू निर्मात्यांचा होता का, ते ठाऊक नाही. परंतु एका शिक्षकांनी तसा चांगला संस्कार मुलांवर घडेल या अपेेेक्षेने तो पाहण्याची शिफारस मुलांना केली. नंतरच्या महिनापंधरा दिवसांत पोरांनी आपल्या वर्गातील मुलांच्या वस्तू त्यांच्या नकळत लांबवण्याचा सराव केला, आणि बोलता बोलता पैज लागून एका नसराण्याने त्या मास्तरांच्या खिशातले पाकीट मारून दाखवले. त्या सिनेमाचा शेवट कुणी लक्षातच घेतला नव्हता.

आजच्या टीव्ही, क्रिकेट, नाचगाण्यांच्या स्पर्धा अशा सगळयांचे मूळ संस्कार काय असावेत हे तोंडदेखले बडबडताना कुणीही थोर दांभीक माणूस सांगेल. लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम म्हणून टीव्ही, खिलाडू वृत्ती जोपासण्यासाठी क्रिकेट, कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्यसंगीताच्या स्पर्धा.... हे सर्व सांगायला छानच आहे. या प्रकारांचा प्रारंभ कदाचित त्या उद्देशांनी कधीकाळी झालाही असेल, तथापि आज `राजा हरिश्चंद्र' सिनेमा कोणत्याही कारणाने कोण पाहील? तरुण पोरांच्या भाषेत `भक्त प्रल्हाद' हे सांकेतिक नाव `ब्ल्यू फिल्म' करिता वापरले जाते हे ऐकून, खांबातून प्रकट झालेला तो नरसिंह आपलेच पोट फाडेल तर बरे, असे प्रल्हादाला वाटेल.

ही परिस्थिती कुणी लादलेली किंवा कुणाच्या माथी मारलेली नाही, तर याच समाजाने ती उरावर ओढवून घेतली आहे. विवाहसंबंधांतून येणारी हृद्य आपुलकीची कुटुंबव्यवस्था टिकवायची असेल तर त्यासाठी पुष्कळ पथ्ये, विधिनिषेध, नीतिबंधने व आचरणशुचिता सांभाळावी लागते. त्याकडे दुर्लक्ष करून अथवा आपल्यापुरता अपवाद करून `समाज' आदर्श होऊ शकत नाही. जे अनुचित आहे त्याला कधी, कसे, किती सांभाळून घ्यायचे, आणि स्वत: त्यात किती वाहात जायचे याचे भान, निदान स्वत:ला शहाण्या मानणाऱ्या तथाकथित उच्चभ्रू वर्गाने ठेवलेच पाहिजे.

एके काळी ना सी फडक्यांच्या कादंबऱ्यांवर वाचक लुब्ध होते, त्यातील नाविन्य (नॉव्हेल) कालमानानुसार ठीक होते; परंतु स्वत:च्या बायकामुलांना सोडून त्यांनी आपल्या एका शिष्येबरोबर पाट लावला याचेही कौतुक त्या काळी जास्तच झाले. आज कोल्हापूरमध्ये सृजनआनंद घेणाऱ्या वयोवृद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ.लीला पाटील या त्यांच्या कन्या, त्यांनी जी अनाथस्थिती भोगली त्याचा विसर पडून उच्चभ्रू समाजाने त्या काळी अनुचिताचाही सत्कार करीत `माझं जीवन : एक कादंबरी' मोठ्या जिव्हाळयाने वाचली. मीनाकुमारीच्या व्यसनीपणाचे तसेच कौतुक झाले. सुनील दत्त, हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा, जया बच्चन अश नट-नट्यांचे कोणते राजकीय कर्तृत्त्व किंवा तत्वज्ञान होते म्हणून आपण त्यांना निवडून दिले? उत्तर मुंबईतून आधीच्या रेल्वेमंत्री राम नाईक यांना पाडून कोण गोविंदा निवडून आला, या घटनेकडे केवळ मौज-गंमत म्हणून पाहणाऱ्यांनी आजची क्रिकेट - कोळसा - ब्रेकडान्स संस्कृती आणलेली आहे. संजय दत्त याला ज्यासाठी शिक्षा झाली, ते कारण तर केवढे भयावह आहे; सरळसरळ देशद्रोह आहे. आणि तरीही त्याच्या तुरुंगलीलांचे रसाळ वर्णन समाजाला रिझवत असेल तर त्याला रोखण्याचे काम करण्याची गरज आहे. त्याच क्षेत्रातील नाना पाटेकर यांनी म्हटले की, माझ्याकडून संजय दत्तला जी शिक्षा करणे शक्य आहे ती मी करेन, ती म्हणजे मी त्याच्यासोबत कोणतेही काम करणार नाही आणि त्याचा कोणताही सिनेमा पाहणार नाही.

एवढे केले तर ही जमात कंगाल बनेल. हे तर कुणीही सामान्य व्यक्ती करू शकते. पण त्यावेळी मात्र `त्याच्या अभिनयासाठी आम्ही चित्रपट पाहतो' किंवा त्याच्या बोलिंगसाठी आम्ही क्रिकेट पाहतो' अशी कच खाणार असू तर या लोकांना शिक्षा करणारे हत्त्यार त्यांच्याच मानवंदनेसाठी वापरण्यासारखे आहे. आपल्या मुलामुलीला मॉडेल बनवू पाहणाऱ्यांनी स्वत:पुढे कोणता मॉडेल समाज ठेवला आहे ते पाहायला नको?

आयपीएल वर बंदी घालण्यासाठी कोर्टबाजी करण्यात आणखी एक खेळ होतो. कोर्टाने बंदी तरी कशाकशावर घालायची! रस्त्यावर विधी करण्यापासून उजनी धरणात तो करण्यापर्यंत; झाड तोडण्यापासून दारू पिण्यापर्यंत, आणि हुंडा मागण्यापासून ते वाघ मारण्यापर्यंत? अशी बंदी करणारे सरकार काय सामर्थ्याचे आहे ते दिसतेच आहे.

पण हे सर्व कळणाऱ्या व्यक्ती स्वत:वर कसलीही बंदी घालणारच नसतील तर त्याच व्यक्तींचा बनणारा समाज मुक्त-स्वैर-बेताल होणार हे स्वाभाविकच आहे. पाकिटमार सिनेमातून आईच्या उन्मळून पडण्याचा पश्चात्ताप न पाहता पाकिटे चोरण्याचे कौशल्य जे शिकत आहेत त्यांच्यासाठी त्या सिनेमासारखी अनंत माध्यमे व साधने आज हात जोडून सेवेसाठी उभी आहेत. समाज म्हणून त्यातच समाधान मानावे काय, ही टोचणी असेल तर आशेला बरीच जागा आहे!

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...