Skip to main content

Sampadkiya in 24 June 2013

या गावात काय आहे!

आधी गावात-शहरात गर्दी करायची; आणि तिथे फार गजबजाट वाटतो, असे म्हणून थोड्या दूरवर जाऊन छानपैकी वसाहत करायची हा माणसाचा स्थायीभाव आहे, तो पृथ्वीतलावर सर्वकाळी सारखाच आहे. पोटापाण्यासाठी किंवा सद्यस्थितीच्या कटकटी टाळण्यासाठी स्थलांतर करायचे; त्या नव्या जागेवर प्रतिष्ठा मिरवायची! पण काही काळानंतर तिथल्यापेक्षा तिकडे दुसरीकडे जास्त काहीतरी मिळेल असे वाटू लागते; किंवा आहोत तिथेही कटकटी वाढत जातात. मग आपले बिऱ्हाड-बाजले उचलून दुसरीकडे तीन दगड मांडून माणूस नव्या जागेत प्रपंच थाटतो. तिथे राहण्याची नवी प्रतिष्ठा मिरवू लागतो.

मथुरेत जरासंधाला श्रीकृष्णाने भीमाकरवी ठार मारले, पण एकतर मथुरेत कटकटी वाढल्या होत्या आणि विदेशी व्यापारधंद्यासाठी बंदर हवे झाले होते म्हणून त्याने द्वारका वसवली. न्यूयॉर्क ही अमेरिकेतल्या उच्चभ्रू श्रीमंत लोकांची नवी वसती होती. तिथे हळूहळू इतकी गजबज झाली की, आता न्यूयॉर्कमध्ये राहणे म्हणजे आपल्याकडील मार्केट यार्डात राहण्यासारखे मानतात; तिथे दिवसभर रहदारी आणि रात्री उंदीर घुशी असतात असे म्हणतात. पूर्वी पुण्यातल्या कसब्यात राहात असेल तर तो मूळचा पुणेकर, आणि सदाशिव-नारायण-शनवारातला उपरा ठरत असे. कालांतराने त्या पेठत्रयीतील अर्क म्हणजेच पुणेरीपणा ठरू लागला; कसबा, भवानी या पेठा म्हणजे जरा `ह्या'! आणि पुढे डेक्कन जिमखाना-प्रभात रोड म्हणजे भलतीच प्रतिष्ठा! पण `गावात' राहणारा अगदीच `पुण्यनगरी' प्रतिगामी! हाच प्रकार नाशिकला कॉलेज रोड, सांगलीचे विश्रामबाग, कोल्हापुरात ताराबाई पार्क, रत्नागिरीत शिवाजीनगर, नगरला सावेडी, मुंबईत पार्ले अशा सर्व `जगात' दिसत असतो.
तात्पर्य असे की, सध्या आहोत तिथे माणसाला फार दिवस कड निभत नाही. शे दोनशे वर्षांपूर्वी चांगले वाडे-हुडे, पिण्याच्या पाण्याचे आड, उंच दगडी जोत्यांची पेठ असलेली नांदती गावे आज पाहावत नाहीत. कारण ज्यांच्या भक्कम आधारावर ती गावे उभी होती ती माणसे तिथून हलली. ते जागते वाडे ढासळत गेले आणि शाबूत असेल तर पुढच्या मुख्य दरवाजांना कुलुपे लागली.

जुन्या राहत्या गावातली मालमत्ता विकून नव्या शहरात घर विकत घेण्याचीही हौस माणसाला आहेच आहे. आजच्या शहरांभोवतीचे डोंगर, नद्या, समुद्र हटवून तिथे राहायला जाण्याची एक लाट सध्या आहे. अशा शहरांचा जुनाट भाग त्यासाठी कुणी निवडत नाही, कारण तिथे फार गिजबिज वाटते, तिथे घराला घर लागल्यापेक्षा घरात घर घुसलेले असते. नवीन येणारा माणूस शांत-निवांत-प्रशस्त जागा शोधत येतो. नवी वसाहत तयार होते. तिथे राहणे हे आधुनिकतेचे, संपन्नतेचे, फुका प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागते. तिथेही गर्दी वाढते, मग त्यास जुळे शहर वसवावे लागते. गाव अपुरे पडले की दऱ्याखोऱ्यात, वनात वसती वाढवतात. लवासा, लोणावळा, पन्हाळा सुरू होते.

आता पृथ्वी कमी पडू लागली आहे. लिंबोणीच्या झाडामागे दडून झोपणारा चंद्र आवाक्यात आल्यावर तिथे जमीन-पाणी असल्याची चाहूल लागली, तसे तिथे प्लॉटस् विक्रीला निघाले. ते घेणारे, बुक करणारे भेटू लागले. पृथ्वीवर फार प्रदूषण, गर्दी, धावपळ... त्यापेक्षा चंद्रावर निवांत राहू, असा एक विचार. आणि उद्या तिथे लोक वाढत गेले तर तो प्लॉट विकता येईल असाही हिशेब. आज तरी तिथे जागा `विकत' घेण्याचा प्रश्न नाही. अंतराळयानाचे तिकीट काढण्याएवढे पैसे द्यायचे, आणि इच्छेला येईल तेवढी हद्द खुंट्या-कुंपण मारून `आपली' म्हणायची, पुढचा दुसरा कुणी यायच्या आत! यासाठी माणसे इथल्या प्रापटर््या विकून पैसे उभे करत आहेत.

एव्हाना कदाचित चंद्रावरचे प्लॉटस् संपले असावेत. कारण आता मंगळावरच्या वसाहतीसाठी नावनोंदणी सुरू झाल्याची बातमी असून ७८ हजार लोकांनी नोंद केलीसुद्धा. त्यातील १२५ जण निवडण्यात येतील आणि पहिल्या वसाहतीसाठी फक्त ४ जणांनी जायचे आहे. त्यासाठी फक्त ६ अब्ज डॉलर्स भरायचे. एकदा सात महिन्यांचा प्रवास  करून तिकडे जाऊन उतरलो की `गावाकडे' परत फिरकायचे नाही. तिथे गुरुत्त्वाकर्षण इथल्यापेक्षा कमी, तिथे शरीराला सवय झाल्यावर पुन्हा पृथ्वीवर निभणार नाही. लंडनला काही काळ राहिल्यावर सांगोला-आटपाडी सोसत नाहीच.

या चौघांना तिथे काम काय असणार? प्रत्यक्ष घर बांधायचे, ग्रीन हाऊसमध्ये पीक घ्यायचे, सजीव सृष्टीबद्दल अंदाज घेत इथे पृथ्वीवर त्याची जाहिरातबाजी करणे, हा तर मोठाच उद्योग. त्यासाठी `इंटर प्लॅनिटरी मीडिया ग्रुप' या नावाची कंपनी स्थापन झाली आहे. अवकाश पर्यटन हा नवा धंदा सुरू होईल. त्याला गिऱ्हाईक गटविणारे `अंतराळ केसरी' तयारच होऊन बसलेत. आपण नुसते पैसे भरले की सेकंड इनिंग, बिझनेस टूर, फेअर लेडी, अष्टग्रह दर्शन सगळे मिळेल; ते मिळवावे लागेल.

कारण इथे पृथ्वीवर सगळी बजबजपुरी मातली आहे. दुष्काळ, खड्डे, वीजटंचाई, महागाई, अस्वच्छता, कार्बन, आडवानी, लालू, जयललिता... जीव उबगला असेल! हे कोण, कधी सुधारणार? त्यापेक्षा आपण मंगळावर जाऊन राहण्यात काही चूक नाही. आज चार पैेसे जातील, पण निवांत-रम्य-छान राहता येईल; शिवाय तिथून पृथ्वीच्या लोकांकडे पाहून नाक खाजवत `आम्ही मंगळावर राहतो' हे म्हणण्यात प्रतिष्ठेची केवढी शान आहे. नाहीतरी आता आपल्या गावात उरलेच काय?

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...