Skip to main content

life in Canada

मॉन्ट्नीयल कार-नामा
स्वच्छता, टापटीप, पोशाख, खाद्यपदार्थ, संस्कृती सगळयाच बाबतीत मॉन्टि्न्यलवर फ्रान्सचा आणि नवीन पिढीवर अमेरिकेचा प्रभाव आहे. क्युबेकमध्ये इंग्रज आणि फ्रेंचांचं सांस्कृतिक वरचष्म्यासाठी बरेच दिवस शीतयुद्ध सुरू होतं. अजूनही कुठे-कुठे छोट्या मोठ्या लढाया होत असतात, पण तेवढ्यापुरत्याच!
एकूणच समाजावर आणि समाजजीवनावर `मिडिया'चा भलताच प्रभाव इथंही आहे. त्यामुळं मिडियाची अक्षरश: `बुवाबाजी' चालू असते.`अमूक एक ठिकाणी बॉम्बहल्ल्याची शक्यता' अशी बातमी कुठंतरी छापून येते. मग महिनाभर त्यावर चर्चा, रिपोर्टस्, हल्लेखोर कुठून-कसे येऊ शकतील याची कल्पनाचित्रं यांनी टीव्ही आणि पेपर्स भरून जातात. टीव्हीवर तज्ज्ञांच्या मुलाखती होतात. शेवटी एखाद्या कंपनीला तिथे हजारो सीसी टीव्ही आणि क्रॅमेरे बसवण्याचं कंत्राट मिळतं. सगळं हळूहळू थंड होतं. मग थोड्या दिवसांनी `हल्ल्याची शक्यता ही क्रॅमेरे बसविणाऱ्या कंपनीने उठवलेली अफवा होती' अशी बातमी दुसरा पेपर छापतो.
एखाद्या मॉलनं खूप मोठ्या प्रमाणावर टोमॅटो घेतले तर पेपर-टीव्हीमधून ७२ रोगांवर टोमॅटो कसे गुणकारी आहेत त्यावर लेख किंवा डॉक्टर्सच्या `विशेष मुलाखती' येतात. अमेरिकेतल्या कुठल्याशा विद्यापीठात नुकत्याच झालेल्या संशोधनाचे दाखले दिले जातात. तर प्रतिस्पर्धी कंपन्या टोमॅटो हे विषसमान असल्याच्या जाहिराती करतात. स्वाईन फ्ल्यूवरून तर तिथे आपल्यापेक्षाही जास्त गदारोळ चालला होता. पेपर आणि टीव्हीच्या दंग्यामुळं एरवी `रांग' हा शब्दही ज्यांना माहिती नसावा असे हे लोक तास-तासभर रांगा लावून सुया टोचून घेत होते. खरं काय नि खोटं काय ते पेपरवाले व परमेश्वरच जाणे.
आपल्याकडेही थोड्याफार प्रमाणावर ही मिडियाची बुवाबाजी चालते, पण `तो पेपर काय ढेकळं सांगतो - मी सांगतो ते ऐक' असं म्हणणारी ज्येष्ठ, अनुभवी पिढी आपल्याकडे आहे, इथे तेही नाही!

मॉन्टि्न्यलपासून जवळ माऊंट ट्नम्ब्लांट नावाचं एक स्किइंग रेसॉर्ट आहे. त्या परिसरातील स्किइंगचा तो सगळयात उंच डोंगर आहे. एरव्ही नोव्हेंबरपासून बर्फ पडून स्काई सीझन सुरू होतो. पण यंदा बर्फानं दडी मारली होती.
ती जागा उंचावर आहे. तिथं थोडं तरी बर्फ बघायला मिळेल, असं काही मित्रांनी सांगितल्यावर मी तिकडं जायचा बेत आखला. ऐन सीझनचे दिवस असल्यामुळं हॉटेल्सची भाडी ऐकून भर थंडीतही घाम फुटत होता. त्यामुळं रात्री मुक्कामी परत येणं गरजेचं होतं. तिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फारशी सोयीची नाही. एकतर बरीच महाग आणि हिवाळयात बऱ्याच सेवा बंद असतात. त्यामुळे भाड्याची गाडी घेऊन ड्नयव्हिंग करण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. तिथे गाड्या उजवीकडून चालवतात आणि स्टेअरिंग डावीकडे असते. शिवाय पुण्यात गाडी चालवण्याचा सराव असल्यामुळं आपल्याला `नियमानुसार गाडी चालवायला जमणार का' अशी थोडी धास्ती होतीच! पण इलाज नव्हता. गाडी चालवताना तुम्ही नेमके कुठल्या रस्त्यावर, कुठं आहात, पुढं कसं जायचंय, कुठं वळायचं, वन वे कुठे आहेत वगैरे तपशील देणारी जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) यंत्रणा इथे सर्रास प्रचलित आहे. पण ही सुविधा माझ्या गाडीला नव्हती. आणि मोठी गाडी भाड्यानं घ्यायला लागणारी `सुविधा' माझ्या खिशात नव्हती! त्यामुळं गुगल मॅपच्या साईटवरून हॉटेलपासून रेसॉर्टपर्यंत असा तपशीलवार नकाशा काढून घेतला. आता माझा आत्मविश्वास बराच वाढला आणि मी गाडी बुक केली.
सगळं  सामान वागवत नेण्यापेक्षा गाडी ताब्यात घेऊन दहा मिनिटांत हॉटेलवर येऊन सामान भरून निघू असा बेत करून थंडीत कुडकुडत मी बाहेर पडलो. कारचा ताबा घेतला खरा पण ती `सिंपल इकोनॉमिक कार' आपल्या मानाने चांगलीच हाय-टेक होती. ऑटोगिअर कार म्हणजे आपल्याकडच्या कायनेटिकसारखी, अॅक्सिलरेटर दाबला की सुरू-अशी माझी कल्पना होती. पण प्रत्यक्षात गाडीमध्ये गियर्स होते आणि त्यावर काही बाही खुणा होत्या. थोडं गोंधळून मी तिथल्या रिसेप्शनिस्टला विचारल्यावर तिने एका सफाईवाल्या काकांना माझ्याबरोबर पाठवलं. `इथल्या सफाईवाल्याकडेही गाडी आहे आणि त्याला वेगवेगळया मॉडेल्समधलं सगळं समजतं' याचं मी मनोमन आश्चर्य करत असतानाच `भारतातल्या मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या माणसाला साध्या ऑटो गिअर कारमधलंही समजत नाही' याचं तितकंच आश्चर्य मला त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसलं. अगदी ब्रेक्स, हेडलाईट, वायपर्सपासून सगळं विचारून मी त्याचा तो समज आणखीनच दृढ करून दिला. काका गमतीशीर होते. मी चुकून वायपरचाच स्प्रे उडवल्यावर `अरे अरे, भिजवलंस की मला' करून एकदम ओरडले. मी अपराधीपणे खाली उतरल्यावर, `काही नाही रे, मी जरा तुझं टेन्शन कमी केलं' म्हणत डोळे मिचकावले आणि अंगठे उंचावून मला शुभेच्छा दिल्या.
मी कार घेऊन हॉटेलकडे निघालो खरा, पण नेमक्या त्या दिवशी एका धार्मिक मिरवणुकीच्या निमित्तानं माझा नेहमीचा रस्ता पोलिसांनी बंद केला होता. मॉन्टि्न्यलमध्ये पुण्याला लाजवतील असे वन-वे आहेत. त्यामुळं हाकेच्या अंतरावर समोर दिसणाऱ्या हॉटेलकडे मला जाता येईना. पोलिसांनी पर्यायी रस्ता दिला, पण आजूबाजूच्या काही खाणाखुणा माहिती नसल्यामुळं, मला काही तो रस्ता सुधरेना. बरं डावीकडे जायचं आहे हे समजून होतं, पण अर्र... अर्र... म्हणेपर्यंत एक रस्ता चुकायचा. पुढच्या वेळी सावधपणे जावं तर तो नेमका वन-वे. मग तसंच पुढं... मग यू टर्न.  पुन्हा उजवीकडे वळताना परत तेच. मला हॉटेलची गल्ली काही मिळेना. त्यातून उजवीकडून गाडी चालवायची म्हणून थोडा अधिक गोंधळ! अर्धा एक तास हॉटेलला प्रदक्षिणा मारल्यानंतर शेवटी मी पोलिसाला शरण गेलो. शंभर सश्यांची भीती माझ्या ठायी एकवटली असावी. पण झालं उलटंच! झालेल्या गैरसमजाबद्दल पोलिसानं दिलगिरी व्यक्त करून मला माझ्या नेहमीच्या रस्त्यावर सोडलं. `अजूनी मिरवणूक यायला थोडा वेळ आहे तोवर पटकन् जा..' असं म्हणून शिट्टी मारून इतर पोलिसांना इशारे करून त्यानं माझ्या गाडीला वाट काढून दिली.
आपल्या छोट्याशा कृतीतून आपल्या देशाबद्दलचं मत बनतं हे इथल्या लोकांना ठाऊक आहे. तसं शिक्षणच असतं. त्यामुळं आपण परदेशी नागरिक आहोत म्हटल्यावर वेळ आल्यास थोडेसे नियम शिथिल करूनही, आपल्याला सर्वतोपरी मदत केली जाते. आपल्याकडच्या नोकरशाहीच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर असे प्रसंग कायमचे लक्षात राहतात.
***
हुश्श करून मी हॉटेलमधून सामान भरलं खरं, पण माझ्या आत्मविश्वासाच्या फुग्याला टाचणी लागली होती. महिनाभर राहात असलेल्या ठिकाणी ही अवस्था तर दीड-दोनशे किलोमीटर्सचं अंतर कसं जाऊन येणार? अशी शंकेची पाल चुकचुकायला लागली. - आणि माझी शंका एकशे एक टक्के खरी ठरली. गावातून हायवेला लागण्यासाठी सहा-सात किमी. अंतर होतं. म्हणजे जास्तीत जास्त पंधरा मिनिटं. पण तास झाला तरी मला हायवे काही दिसेना. नकाशातली एकही खूण मला रस्त्यावर सापडेना. बरं आपल्याकडे कसं, हायवे आलेला लगेच समजतो. इथं सगळेच रस्ते रुंद आखीव-रेखीव त्यामुळं साधा रस्ता आणि हायवेतला फरक बघून कळत नाही. स्थानिक भूगोल गोलच होता. म्हणजे पुण्याहून कोल्हापूरला जायचं तर आधी सातारा किंवा कराडच्या पाट्या असतात हे आपल्याला माहिती असतं. पण इथे `माऊंट ट्नम्ब्लांट' असा स्पष्ट बोर्ड नसला की माझी बोंब! हमरस्त्यावर पादचारी किंवा दुकानं नाहीत. त्यामुळं `कुणाला तरी विचारतो' हे शक्यच नाही. थोडी वस्ती दिसली की जवळच्या एक्झिटनं बाहेर पडायचं. त्यातही रस्त्याचं क्रॉसिंग नाही. प्रत्येक ठिकाणी फ्लायओव्हर्स. त्यामुळं बरेचदा उजवीकडे फुटणारा रस्ता लांब वळण घेऊन भुयारातून डावीकडे बाहेर निघतो. तिथं वस्ती असली तर बरं! मग तिथे पार्किंग शोधून गाडी लावायची आणि येणाऱ्या-जाणाऱ्याची वाट बघत उभं राहायचं! - त्यानंतर कधी मी पुण्याच्या रहदारीला नावं ठेवणार नाही. थोडा त्रास होतो, पण हे काय? ह्यापेक्षा आपण कितीतरी बरं!
उलट सुलट असा बराच फिरलो. असंच एका पंपावर मी नकाशाची चार-पाच पानं घेऊन कुणाकुणाला विचारून खुणा करून घेत होतो. एका आजोबांनी न राहावून `कुठे जायचंय?' म्हणून विचारलं. मी `मॉऊंट ट्नॅम्बला' सांगितल्यावर `आता कसं व्हायचं ह्याचं' अशी मान हलवत त्यांनी माझे नकाशे बाजूला ठेवून एक नवा नकाशा काढून दिला. `अजूनी बरंच अंतर जायचंय तुला' असं म्हणून त्यांनी ओठ दाबले तरी `ह्याच्या अंगात काही पाणी दिसत नाही' असं न उच्चारलेलं वाक्यही मला स्पष्ट ऐकू आलं.
अर्थातच त्यांच्या नकाशाचा उपयोगही झाला नाही. खरंच अजूनी बरंच अंतर होतं आणि संध्याकाळी चारला तर अंधार पडतो. भर दिवसा ही अवस्था मग अंधारात काय होणार? मला चांगलाच पश्चात्ताप व्हायला लागला. एव्हाना मॉन्टि्न्यल मागे पडलं होतं आणि कुठे चाललोय याचा पत्ता लागत नव्हता. मी दिङ्मूढ झालो होतो. `पुढे जाऊ की परतू मागे' अशा द्वंद्वात असताना `घे श्रीदत्ता सांभाळुनि मज' असा धावा केला. रस्त्याकडे एक गोडावूनसारखी मोठी इमारत दिसली. शेवटचा प्रयत्न म्हणून तिथं आत शिरलो. तीन-चार ठिकाणी शोधल्यानंतर एका ऑफीसमध्ये दोघंजण डबा खाताना दिसले. नाईलाजानं त्यांना उठवून मी माझी अडचण सांगितली. `अरेच्चा, तुझा हायवे तर बराच मागे पडला' माझे नकाशे पाहात एकजण म्हणाला, `बरं असं कर. १५ हायवे घे. तसंही जाता येतं.' एवढे नकाशे घेऊन मी चुकलो होतो. त्यामुळे आता पूर्ण नवीन रस्त्यावर जायला मी काचकूच करू लागलो. `तुझ्याकडे एवढे नकाशे आहेत तर मग नक्की अडचण काय होती?' तो अचंब्यानं म्हणाला, `कारण सगळया पाट्या तर व्यवस्थित आहेत.' मग त्यानं अगदी तपशीलवार असा पुढचा चार-पाच किलोमीटर्सचा नकाशा काढला. कुठे कोणती पाटी लागेल, त्यावर काय लिहिलं असेल, तो कसा वाचायचा- सगळं समजावून सांगितलं.
`साधारण पंधरा-वीस मिनिटांत तू तुझ्या मूळ रस्त्याला लागायला हवंस - तसं नाही झालं तर मग आपला परत फिर.' असं म्हणून त्यानं शुभेच्छा दिल्या. देवाचं नाव घेऊन मी पुन्हा गाडीला स्टार्टर मारला. त्या माणसानं सांगितले होते तसेच दोन-तीन बोर्ड लागले आणि ते पाहता पाहता मला पुढच्या रस्त्यावर एकदम साक्षात्कार झाल्याप्रमाणे त्या पाट्यांवरच्या खाणाखुणा लक्षात आल्या. पुढच्या दोन-तीन पाट्यांवर मी त्या पडताळून पाहिल्या आणि एकदम कोडं सुटलं. आता ठरवलं तरी चुकणं शक्य नाही.... एखाद्या अक्षरशत्रू माणसाची अवस्था काय होत असावी याचा मी अनुभव घेतला होता. पण एकदा हायवे, साधा रस्ता, वळण अशा खुणा लक्षात आल्यानंतर मग पुढचं एकदम सोपं होतं. रुंद रिकामे रस्ते, शिस्तबद्ध वाहतूक, कुठं हॉर्नची पाँग-पाँग नाही की एकमेकाला कट मारून पुढं जाणं नाही... वेगाचा काटा कधी दीडशेला टेकला कळलंच नाही. आता आजूबाजूच्या निसर्गाची मजा पाहात मी मजेत ड्नयव्हिंग करू लागलो.
- चारुदत्त आपटे, टोरांटो

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन