Skip to main content

Lekh on Buddha

गेल्या २५ मे रोजी बुद्ध पौर्णिमा झाली. त्यानिमित्ताने गौतमांनी समाजसंघटन करण्यासाठी आपल्या चिंतनातून शास्त्र बनवले. त्याविषयी काही अभ्यासचर्चेतून, नव्या धर्मसंघटनेच्या संदर्भात जी कार्यपद्धती मांडली, ती आजच्या काळातील स्वयंसेवी संघटनांस उपयुक्त ठरेल.

भगवान बुद्ध व संघटनशास्त्र

- विनिता तेलंग (मोबा.९८९०९२८४११)

स्वत:च्या कठोर तपाचरणातून विश्वातील सत्य जाणून घेतलेले व ज्ञानावर आधारित `धम्म' - म्हणजेच सदाचरणाचे नियम - सांगणारे भगवान गौतम बुद्ध हे पहिले संघ (संघटना) संस्थापक होते. त्या काळातही अनेक विचारधारांचे वेगवेगळे संघ होते, पण बुद्धांचा संघ कालौघात गडप न होता टिकून राहिला. संघ म्हणजे एकविचाराने आचरण करणाऱ्यांचा समुदाय. बुद्धांचे संघजीवन विशिष्ट नियमांनी नियंत्रित होते. परिस्थितीनुसार नियम बदलत होते. बुद्धांच्या संघात ते असतानाही खूप उत्क्रांती झाली. स्वत:ला झालेल्या अंतिम सत्याच्या दर्शनानंतर बुद्धांनी प्रथम सारनाथ येथे त्यांच्या पहिल्या पाच सहकारी भिक्षूंना सांगितलेले ज्ञान म्हणजे `धम्मचक्र प्रवर्तन'. बुद्धांचे अनुयायी वाढत वाढत संघ नंतर लाखोंच्या घरात पोचला. बुद्ध असतानाही ते एक व्यक्ती म्हणून केंद्रस्थानी न राहता, बुद्ध म्हणजेच संघ - संघ म्हणजेच बुद्ध अशी, वृक्ष व छायेप्रमाणे असलेली व्यक्ती व कार्य यांची एकरूपता हा एक चमत्कार मानला जातो. बुद्धांनी संघ बांधताना दिलेल्या शिकवणीत आजच्या काळातही उचित संघटनशास्त्राची सूत्रे आढळतात.
बुद्धांनी त्यांच्या अनुयायांना त्रिशरण दिले. त्यापैकी पहिले चरण `बुद्धं शरणं गच्छामि ।' म्हणजे मी बुद्धाला शरण जात आहे. `बुद्ध' म्हणजे परमज्ञानी व ज्याने दान, शील, नैष्कर्म्य, प्रज्ञा, वीर्य, शांति, सत्य, अधिष्ठान, मैत्री व उपेक्षा या दहा गोष्टींत गुणांची परमोच्च पातळी गाठली आहे. बुद्धांचे आचरण तसे होते. आपण अशा सर्वोच्च गुणांना शरण जाणे, मनुष्यसमूहाला बुद्धांप्रमाणेच एकत्र जोडणे. दुसरा चरण `धम्मं शरणं गच्छामि'. तत्त्वज्ञान व नीतीतत्वे यांनी युक्त असलेला बुद्धांचा धम्म, सर्वात जास्त भर आचरणावर देतो. प्राण्यांची हिंसा करू नये, चोरी करू नये, व्याभिचार करू नये, असत्य भाषण करू नये व मादक पदार्थांचे सेवन करू नये या पंचशीलाचा त्यांनी केवळ प्रसार केला नाही, त्यांचे स्वत:चे जीवन या कसोट्यांवर आणले. त्यांच्या जीवनात अनेक सत्वपरीक्षांना सामोरे जावे लागूनही त्या सर्व परीक्षांमधून त्यांचे चारित्र्य सुवर्णाप्रमाणे दीप्तिमान झाले. तिसरा चरण `संघं शरणं गच्छामि' मी संघास-संघटनेस शरण आहे. संघटना मोठी, मी नाही. संघटना कायम असेल मी असणार नाही.
स्वत: बुद्धांनी त्यांचा संघ स्वकेंद्रित/व्यक्तीकेंद्रित न ठेवता पूर्ण संघभावनेने चालवला. वाद सोडवणे, निर्णय घेणे, नियमात बदल करणे यासाठी भिक्षू संघांना एकत्र करून चर्चा होई. सर्वांना आपले मत मोकळेपणाने मांडण्याची मुभा होती. त्यांनी संघात लोकशाहीवादावर व सामूहिक जबाबदारीचे भान विकसित करण्यावर भर दिला. संघाला बाधक ठरणारे नियम वा व्यक्ती सर्वानुमते व कठोरपणे बाजूला केल्या जात. चर्चांपेक्षा समजून घेण्यावर व अहंकारामुळे तट पडू नयेत यावर भर होता. संघाचे कामकाज योग्य पद्धतीने चालण्यासाठी अधिकारश्रेणी पद्धत होती. कामांची योग्य विभागणी व प्रत्येक कामाला योग्य माणूस जोडणे यातून बुद्धांनी जणू व्यवस्थापन शास्त्राची पायाभरणी केली. भिक्षूंसाठी बाह्य आचरणाचे नियम अत्यंत कडक होते. भिक्षूंनी आळशी असू नये असा दंडक होताच, पण अती उत्साहीदेखील असू नये, याची सुंदर कारणमीमांसा ते देतात. बुद्धांनी सांगितले की, अती उत्साहाने माणसाचे चित्त विचलित होते, विवेकशक्तीला मर्यादा येतात, व नको ती गोष्ट हातून घडण्याचा संभव असतो. उत्साहाला विवेकाची जोड नसेल तर उत्साह नंतर मावळतो. वीणेच्या, सतारीच्या तारेप्रमाणे व्यक्तीने योग्य तेवढाच ताण घ्यावा म्हणजेच आपल्या शक्तीचा मध्यबिंदू शोधावा व एका जागी लक्ष केंद्रित करावे. (एकाच वेळी गल्ली ते दिल्ली अनेक संस्था संघटनांच्या नामावलीत झळकण्याची हौस असणाऱ्या समाजधुरंधरांना ही उत्तम शिकवण आहे.)
समाजात नवीन कार्य सुरू करण्यासंबंधी त्यांनी सांगितले होते, ``समाजात नवे विचार रुजवणे खूप कठीण असते. लोक गतानुगतिक असतात, परंपरेने चालत आलेले विचार सोडण्याची त्यांची तयारी नसते. नवे विचार मांडणाऱ्याला टीका, टिंगल, उपहास, विरोध याला सामोरे जावेच लागते. आपल्या विचारांवर दृढ राहून, न थकता, मार्गावर चालत राहावेच लागते. शिवाय ज्यांच्यासाठी आपण काम करतो त्यांच्याविषयी (त्यांनीच विरोध केला तरी) मनात राग धरून चालत नाही.
संघटनेत दोष निर्माण होण्याची शक्यता कुठल्या कारणांमुळे निर्माण होईल हेही त्यांनी सांगून ठेवले होते. विस्ताराची हाव, संघटनेपासून काही लाभ मिळतील अशी धडपड व पांडित्याच्या प्रदर्शनाची हाव या तीन गोष्टी संघटनेला बाधक ठरतात, असे ते म्हणत. भिक्षूंची टोळी करून समाजाला भुरळ पाडून जागोजागी सत्कार घेत फिरणाऱ्यांना त्यांनी `महाचोर' संबोधले आहे; तर अंगी नसलेली योग्यता, सामर्थ्य जो खोटेच सांगतो अशाला सर्वात मोठा महाचोर समजावा असे सांगितले. आज आजूबाजूला अशा महाचोरांचीच चलती दिसते, यातील फोलपणा दुर्दैवाने अजूनही लक्षात येत नाही. साधूने बहुजनहितार्थ बहुजनसुखार्थ सतत परिभ्रमण करायला हवे असा त्यांचा आग्रह होता. संघात जसा जाति-धर्म भेदाला थारा नव्हता तसा चमत्कारांनाही नव्हता. बुद्धांच्या आयुष्यात (चरित्रात) अनेक चमत्कार वर्णिलेले आहेत तथापि त्यांनी हेतुपुरस्सर कोणत्या - अगदी संघाच्याही लाभाकरिता त्यांचे प्रदर्शन वा वापर केला नाही. अन्य भिक्षूंनीही चमत्कार दाखवलेले त्यांना आवडत नसत. त्यांचा उपदेश अनाग्रही होता. `विचार करा, समजून घ्या व पटले तरच स्वीकारा' ही त्यांची वृत्ती होती.
त्यांनी त्यांच्या अखेरच्या काळात संघ एक राहण्यासाठी सांगितलेले नियम आज संघटना आणि लोकतंत्रही एकत्र व मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहेत. म्हणूनच बुद्धांच्या संघटनशास्त्राचा अभ्यास होण्याची गरज आहे. संघाची हानी होऊ नये यासाठी त्यांनी अभ्युन्नतीचे सात नियम घालून दिले. गणराज्याच्या प्रमुखांसाठी केलेला हा उपदेश म्हणजे प्रजासत्ताक राष्ट्नचा धर्म कसा असावा याचे मार्गदर्शन आहे.
१) वारंवार एकत्रित जमा (गणराज्याचे प्रतिनिधी जर वरचेवर एकत्र येऊन विचारविनिमय करतील तर ते सुरक्षेच्या योजना त्वरित व बिनचूकपणे करू शकतात.)
२) समग्र एकत्र व्हा. एकमताने निर्णय व एकमताने कृती राज्याला अजेय बनवते.देशाच्या हिताच्या रक्षणासाठी सर्वसहमतीसाठी सर्वांनी पुढे यायला हवे.
३) परंपरागत नियम व कायदे यांचे उल्लंघन होऊ नये. नियमबाह्य करवसुली नसावी. करप्रणाली, न्यायप्रणाली न्यायाच्या तत्वांवर चालली तर प्रजेला राज्य आपले वाटेल व असंतोष वाढणार नाही. (सध्याच्या महाराष्ट्नला तंतोतंत लागू होते की नाही?)
४) जोपर्यंत प्रतिनिधी ज्येष्ठांचा, वयोवृद्धांचा मान ठेवतील तोवर ते अजेय राहतील. निवृत्त, वयोवृद्धांच्या अनुभवाच्या ज्ञानाचा फायदा घेतला पाहिजे.
५) जोपर्यंत प्रतिनिधी वैयक्तिक तृष्णांच्या आहारी जात नाहीत व राज्यातील विवाहित, अविवाहित स्त्रियांचा सन्मान करतील तोपर्यंत लोक निश्चिंतपणे त्यांच्या छत्राखाली राहतील.
६) विविध संप्रदाय, त्यांची पूजास्थाने, चैत्य मंदिरे यांना सन्मान द्यावा.
७) देशातील साधुसंत, अरहंत यांना सुखशांतीने राहू दिले, त्यांचा योग्य आदर राखला तर त्यांचे अनुयायीही शांतपणे, सदाचाराने राहतात. लोक धर्मोपदेशाला मुकले तर ते सदाचारविहीन होतात व राज्याची सुखशांती नष्ट होते!
बुद्ध समजून घेताना वर्तमानकालीन धार्मिक, राजकीय वा जातीय संदर्भ न लावता मूळ तत्त्वज्ञानाचा वेध घ्यायला हवा.
बुद्धांनी सांगितलेला मानवधर्म सदाचारी, शीलवान, सत्यवादी, अहिंसावादी, करुणायुक्त, द्वेषमुक्त, प्रेमाचा संदेश देणारा सनातन धर्म होता. तो याच मातीतला. येथील सनातन मानवतावादी मूल्यांचे पुनरुज्जीवन करणारा, जीवनमूल्ये उंचावणारा धर्म होता. क्षमाशीलता, दुसऱ्याच्या मताविषयी आदर, बुद्धिप्रामाण्यवादाची ओढ इत्यादी, या भरतखंडात प्रकर्षाने दिसणाऱ्या वैशिष्ट्यांचा त्यांच्या तत्त्वज्ञानात समावेश आहे. त्यामुळेच -
बुद्धं शरणं गच्छामि - मी सर्व चांगल्या तत्त्वांना शरण जाईन, सर्व माणसांना जोडेन
धम्मं शरणं गच्छामि - मी जोडलेल्या माणसांत बंधुत्वाची, मानवतेची जोपासना करेन
संघं शरणं गच्छामि - या उच्च जीवनमूल्यांचे रक्षण करण्याच्या ध्येयाला अनुसरून मानवाचे जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करेन.
हा संदेश समजून घेतला पाहिजे.
बुद्धांची संघकल्पना हा अभ्यासाचा व आचरणाचा विषय व्हावा. संघटनेची रचना, अधिकार, जबाबदारीचे वाटप, लक्ष्य प्राप्तीचे मार्ग, त्यासाठीची प्रेरके, नेतृत्त्वगुण जोपासना याबरोबरच उत्तम संघटनेसाठी आवश्यक असतो तो, व्यक्तीचा `मनोव्यापार'. हे मनोव्यापार समजून घेता आले पाहिजेत, त्यावर नियंत्रण प्राप्त केले जाऊ शकते. ती विद्याही बुद्धांनी सांगितली. व्यक्तीच्या सुप्त सामर्थ्याला जागे करणारी `विपश्यना' ही बुद्धांची जगाला आणखी एक देणगी.
जाता जाता त्यांनी सर्व अनुयायांना, `आता मी नसेन, तेव्हा मी दिलेल्या ज्ञानाच्या आधारे तुम्हीच मार्ग शोधा. `अत्त दीप भव (स्वयं दीप व्हा)' हा अनमोल संदेश दिला. शीलवान, प्रज्ञावान माणूस व समाज घडवण्याची बुद्धांची धडपड प्रत्यक्षात साकारली तर `भवतु सब्ब मंगलम्' असा दिवस निश्चितच येईल.
(सर्व संदर्भ : कथा गौतम बुद्धांची
 लेखक श्री.रमेश पतंगे)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन