Skip to main content

Sampadkiya in 25 June 2012


खंडणीखर्चास मान्यता
आपल्या मिळकतीवर कर भरावा लागतो. मिळकत होण्यासाठी करावा लागणारा खर्च मान्य करून निव्वळ नफा करपात्र असतो. खर्चाच्या बाजूला प्रवास, पाहुणचार, जाहिरात, बुडीत किंवा वसूलीसाठी नाइलाजाने होणारा खर्च.... वगैरे रक्कमा वजावट मिळतात. पण हल्लीच्या काळात व्यवसाय करताना काही खर्च असे असू शकतात की ते कायदेशीर नसतात, पण करावेच लागतात. लाच द्यावी लागते हे वास्तव आहे परंतु ती देणाराही दोषी मानला गेल्यामुळे तो खर्च संमत होत नाही.

नागरिकांचे संरक्षण हीसुद्धा शासनाची जबाबदारी आहे तरीही ती शासनाला पार पाडता येत नाही, म्हणून खाजगी सुरक्षा-दळे तैनात करावी लागतात. हा सुरक्षेचा खर्च शासकीय करनिर्धारण अधिकारी मान्यच करतात. म्हणजे एका अर्थी शासन नागरिकांचे संरक्षण करण्यात आपली असमर्थताच स्पष्ट स्वीकारते.

यापुढचा टप्पा  अपहरणाचा आहे. मध्य प्रदेशातील एक बिडी उत्पादक, तेंदूची पाने खरेदीसाठी गेले असता त्यांना एका टोळीने पळवून नेले व सुटकेसाठी खंडणी मागितली. २२ दिवस भीतीग्रस्त वाटाघाटी केल्यावर ५.५ लाख रुपये खंडणी देऊन त्यांनी सुटका करून घेतली. आयकर पत्रके भरताना त्यांना `सर्वसाधारण खर्च' (संड्नी एक्सपेन्स) म्हणून ती रक्कम हिशेबात लिहिली आणि तो खर्च वजावट मागितला. अर्थातच प्रारंभी आयकर अधिकाऱ्याने हा खर्च `व्यावसायिक नाही' म्हणून अमान्य केला. पण नंतर कमिशनरनी, पुढे ट्नयब्यूनल ने व त्यानंतर उच्च न्यायालयानेही `खंडणी खर्च' मान्य केला. उच्च न्यायालयाने म्हटले की, अपहरण करणे हा गुन्हा आहे परंतु पळवून नेलेल्या व्यक्तीला खंडणीची रक्कम देऊन सोडविणे हा गुन्हा होत असल्याचे कायद्यात कुठेही म्हटलेले नाही. म्हणून व्यवसायिकाने स्वत:चा जीव वाचविण्यासाठी दिलेली खंडणी वजावटीस पात्र आहे.

हा निर्णय त्या करदात्याच्या ५.५ लाख रुपयांपुरता मर्यादित नाही. शासन हतबल असल्यामुळे नागरिकांनी स्वत:चा बचाव करायचा मार्ग स्वत: शोधायला हरकत नाही असा आशय न्यायालयाने मान्य केला आहे. अतिरेकी किंवा गुंड-मवाल्यांच्या तावडीत सापडल्यावर सुटका करण्याची क्षमता व पात्रताच शासन हरवून बसले आहे. गुंडगिरीस अटकाव करण्याचे सर्वतोपरी सर्वांगी प्रयत्न शासनाने करायला हवेत. आणि त्यातून एखाद्या अपघाताने गुंडगिरीतून नुकसान झाले तर तो प्रारब्धाचा भोग म्हणता आले असते. पण सध्या गुन्हेगारीच शासन-प्रशासन चालवीत असल्याची शंका दृढ होत चालली आहे. त्यामुळे बेकायदेशीर वागणाऱ्यांना, कायदा मोडून धुडगूस घालणाऱ्यांना अभय मिळते. त्यास अटकाव होऊच शकत नसेल तर अशा आर्थिक भरपाईने भीषण संदेश मिळू शकतो.

सध्या शासनाकडून नागरिकांच्या जीविताबद्दल आर्थिक भरपाई देण्याची एक नवी गैरप्रथा जन्माला आली आहे. शुद्ध पाणी लोकांना पुरविण्याऐवजी साथीला बळी पडणाऱ्यांसाठी लाखभर रुपये समारंभपूर्वक वाटले की कल्याणकारी राज्याचा डांगोरा पिटता येतो. गँगबहादरांवर वचक न ठेवता अपहरण झाल्यास त्याला वजावट (सेट ऑफ) देणे सहज परवडते. त्यातही पुन्हा या तुटपुंजा आर्थिक भरपाईच्या घासावर काही डोमकावळेही नजर ठेवून असतात.

आताच्या ताज्या निर्णयामुळे स्वत:च्या जीवितरक्षणासाठी करावाच लागलेला खर्च तरी न्यायालयाने मान्य केला ही थोडी समाधानाची, पण वास्तविक ती शरमेची बाब वाटते. गणपतीच्या वर्गणीपासून नेत्यांच्या गाडीअर्पणापर्यंत मागेल ती खंडणी व्यवसायिकांना द्यावी लागते. याशिवाय जकात, पोलिस, महसूल, करविभाग अशा कित्येक ठिकाणी व्यवसायिकांस पैसे वाटावे लागतात. ही खुशी वास्तवात खुशीची असते काय? ती तर जगण्यासाठीच दिलेली खंडणी असते. लुटणारी टोळी अधिकृत की अनधिकृत असा एक फरक ठरविला गेला असावा. त्यामुळे अधिकृत टोळीने वसूल केेलेली खंडणी करमाफ ठरली. आता खंडणीची बिले-पावत्या ठेवाव्यात आणि ती सादर करून पाहाव्यात. खंडणीच्या अधिकृत यादीवरचे बहाद्दर ठरवूनही द्यावे लागतील. आर्थिक भरपाई घेण्यासाठी हासुद्धा सव्य-अपसव्य करावा लागला तर?

आजच्या जगात लाच देणे हा अजूनी जरी गुन्हा ठरत असला तरी कित्येकदा ती जगण्यासाठी दिलेली खंडणीच असते. कधीतरी तोही खंडणीखर्च मान्य करून अधिकृतपणे वजावट मिळण्याचा न्याय करावा लागेल, अशी शक्यता फार दूर वाटत नाही. गुंड-पुंडांच्या राज्यात पापभीरू सामान्य नागरिकांनी तसल्या आशेवर आशाळभूत राहावे का?
(संदर्भ : २४३ सीटीआर भाग ३, पान १०)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन