Skip to main content

Lekh on Education by Atul Gavade


शिक्षणचालकांची बांधिलकी
- अतुल गावडे
पावसाळा आला आणि शाळा सुरू झाल्या. कोपऱ्या-कोपऱ्यावर शाळेत प्रवेश घेण्यासाठी आवाहन करणारे डिजिटल बोर्ड लागले. त्यातील मोहक चित्रे पाहिली की ती किती उथळ आहेत हे लक्षात येतेच. शिक्षणसंस्थांचा सध्या सुकाळ झाला आहे त्याचे कारण शिक्षणप्रसार हे नाही. कशासाठी स्थापन होते ही शिक्षणसंस्था किंवा शाळा?
तुमची दूरदृष्टी (व्हिजन) काय आहे, उद्दिष्टे (ऑब्जेक्टिव्हज्) काय आहेत आणि ती साध्य करण्याकरिता तुमच्याकडे काय कार्यपद्धती (मिशन) आहे असे प्रश्न जर आपण या संस्थांना विचारले तर?  उदात्त हेतूने, द्रष्टेपणाने या क्षेत्रात उतरले असणाऱ्यांची संख्याही आहेच. जे संस्थाचालक उदात्त हेतूने या क्षेत्रात उतरले आहेत त्यांच्या सद्बुद्धीचा मान राखून शिक्षणक्षेत्राचा  विचार व्हावा .

कोणतीही शिक्षणसंस्था चालवताना आपल्याला कोणत्या प्रकारचे विद्यार्थी घडवायचे आहेत याविषयी निश्चित कल्पना संस्थेतील कर्त्या माणसांना असली पाहिजे. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी साधनसामग्री, वातावरण, सोयी-सुविधा निर्माण केल्या पाहिजेत आणि त्यासाठी कार्यपद्धती ठरवणे ही पहिली बांधीलकी आहे.
एका विद्यापीठात `गुणवत्ता सुधारणा' या विषयावर एक परिसंवाद होता. परिसंवादाच्या वेळी पाहुणे, व श्रोते यांच्याकरिता चहापानाची सोय वेगवेगळया ठिकाणी करण्यात आली होती आणि ही व्यवस्था सोयीचा विचार करून नव्हे तर प्रामुख्याने दर्जाचा (स्टेटस्) विचार करून केली आहे हे स्पष्ट जाणवत होते. हेच लोक समाजातील विषमता दूर करण्याविषयी बोलत होते. बोलतानाची भाषा वेगळी होती आणि प्रत्यक्षातले त्यांचे वागणे वेगळेच काही सांगत होते. सामाजिक, आर्थिक विषमता दूर करणे हा भारतीय शिक्षणप्रणालीचा मुख्य उद्देश मानला जातो, तो साध्य होईल याची खात्री या अनुभवातून वाटत नाही. शिक्षणसंस्थांत अगदी सजगपणे असे वागणे टाळले गेले पाहिजे.
सामाजिक आणि आर्थिक विषमता वाढू नये यासाठी संस्थाचालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करत राहिले पाहिजे. त्यासाठी प्रवेशाच्या वेळी लोकांना नाकदुऱ्या काढायला न लावता, पारदर्शी प्रवेशप्रक्रिया राबवली पाहिजे. पाल्याला आपल्या शाळेत प्रवेश घेणे पालकांना सहजसाध्य व्हावे यासाठी स्वत: संस्थाचालकांनी समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांकडून मदत गोळा करून त्यातून शैक्षणिक सोयी शाळेत उपलब्ध करून द्याव्यात. त्यामुळे अल्पशा फीमध्ये विद्यार्थ्यांना निदान प्रवेश मिळू शकेल. प्रवेशप्रक्रियेसाठी आलेल्या पालकांशी नीट बोलणारा कर्मचारी मुख्याध्यापक वा संस्थाप्रतिनिधी असणे ही अपेक्षा फार नाही. वास्तविक ती बांधिलकी आहे.
प्रशस्त इमारत, संगणककक्ष, दृकश्राव्य कक्ष... यांवर सध्या सर्व संस्थाचालक भर देताना दिसतात. परंतु या गोष्टींना `संस्थेची सौंदर्यप्रसाधने' इतकेच काय ते महत्त्व प्रत्यक्षात उरले आहे. कारण मुले मैदानावर न खेळता संगणकावरचे खेळ खेळतात. माहिती व तंत्रज्ञान या विषयाचा अभ्यास काय आहे, दृकश्राव्य कक्षात काय दाखवावे याची नेमकी जाणीव संस्थेतील कर्त्या मंडळींना आणि शिक्षकांनाही असली पाहिजे. त्याशिवाय योजना कशी करणार? या सर्वांचा योग्य वापर करून शिकवणाऱ्या शिक्षकांची कमतरता असते. जे शिक्षक असतात, ते अल्प-अत्यल्प पगारावरही खूश होणारे असावेत अशा भावनेने त्यांची नेमणूक केलेली असते हे जाणवते आणि अनुदानित शाळांतून शिक्षक म्हणून नियुक्ती केली जाते, ती जास्त पैसे देणाऱ्याची हे सर्वत्र बोलले जाते, ऐकण्यात येते. त्याबद्दल संशय वाटावा अशी स्थिती नाही. हे सर्वसाधारण चित्र बदलणे संस्थाचालकांच्या हाती आहे.
अगदी चांगल्या पात्रतेचा शिक्षक, उत्तम पगार देऊ करून आणि त्याच्याकडून पैसे न घेता भरलेला असला तरी वेळोवेळी सरकारी प्रशिक्षणाव्यतिरिक्त त्याच्या शिक्षणप्रशिक्षणाचा कार्यक्रम संस्थेने राबवला पाहिजे. शिक्षक कितीही चांगला असला आणि त्याचा हेतू चांगला असला तरी नवीन बदल काय येताहेत याचे ज्ञान त्याला भरपूर संपर्काशिवाय होत नाही. मुंबईचे होमी भाभा विज्ञानशिक्षण केंद्र, बेंगलोर येथील भारतीय विज्ञान शिक्षण संस्था, टाटा मूलभूत संशोधन केंद्र अशा देशी आणि प्रसंगी विदेशी संस्थांमधील शास्त्रज्ञांशी आपल्या संस्थेतील शिक्षकांचा संवाद घडवून आणायला हवा. त्याच्या मार्गदर्शनाने कार्यशाळा आयोजित करायला हव्यात. शिक्षकांना त्याचा निश्चितपणे उपयोग होतो.
शिक्षकांना जसे स्वातंत्र्य हवे तसेच योग्य काम न करणाऱ्या शिक्षकांना काढून टाकणे हीसुद्धा संस्थाचालकांची सामाजिक बांधिलकीच आहे. चांगले काम न करणारा शिक्षक किती विद्यार्थ्यांचे भवितव्य, किती प्रमाणात बिघडवतो याचे काही गणित उपलब्ध नाही. परंतु ते बिघडवतो हे निश्चित!
कला म्हणजे चित्रकला असा पालकांचा समज असतो. वास्तविक चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, गायन, वादन या सहा ललितकलांचा समावेश कला या विषयात अंतर्भूत आहे. सर्व कलांचे शिक्षण मिळायला हवे हे महाराष्ट्न् राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने प्रकाशित केलेल्या कला विषयांच्या पुस्तकांवरून लक्षात येईल. सर्व कलांच्या तासिकांचे वाटप वेळापत्रकात असायला हवे.
संस्कार किंवा सांस्कृतिक कार्यक्रम या नावाखाली बऱ्याचदा काही शाळांत नृत्यशिक्षकाची किंवा गायन शिक्षकाची नेमणूक केलेली असते. या शिक्षकांकडून मुलांचे वय, बालमानसशास्त्र, मुलांना अवगत असणारी भाषा व तिच्यानुसार त्यांची समज, अभ्यासक्रम यांपैकी काहीही विचारत न घेता, स्वार्थापोटी किंवा प्रभाव पाडण्यासाठी काही कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात मुलांकडून नको त्या प्रकारची गीते आणि नको त्या प्रकारची नृत्ये बसवून घेतली जातात.
शाळा म्हटले की विद्यार्थी केंद्रस्थानी असला पाहिजे. त्यामुळे त्याच्या भावभावनांचाच विचार प्रामुख्याने केला गेला पाहिजे. त्याच्या कौशल्याला दाद मिळाला पाहिजे. परंतु ते होत नाही. साधे उदाहरण सांगतो. एका नामांकित जिल्हा परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या नृत्य व एकांकिका स्पर्धेत जिल्हास्तरावर क्रमांक मिळवणाऱ्या मुलांना साधे प्रशस्तिपत्रही दिले जात नाही. प्रशस्तिपत्र ही अपेक्षा तर सगळया अवाढव्य भपकाऱ्यात किती क्षुल्लक आहे; परंतु ती पूर्ण केली जात नाही. प्रशस्तिपत्र आपल्यासाठी क्षुल्लक असले तरी आपल्याला मान्यता मिळाल्याचा जो आनंद त्या पाल्याच्या मनात निर्माण होईल तो नवीन काही शिकण्याच्या, त्यात प्रावीण्य मिळवण्याच्या त्याच्या प्रेरणा बळकट करणारा असेल. संस्थाचालकांनीही याबाबत गांधारीची भूमिका घेता कामा नये. ते आग्रही राहिले तर स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या संस्थांना देखाव्यापुरते काही करण्यापेक्षा मूलभूत काही करण्यासाठी उद्युक्त व्हावेच लागेल.
स्नेहसंमेलनाला अवाजवी महत्त्व दिले जाते. त्यासाठी वारेमाप खर्च केला जातो. त्याच्या सरावाकरिता दैनंदिन शालेय वेळापत्रकात तडजोडी केल्या जातात आणि सादर  काय होते? - तर नको त्या संगीतावर किंवा गाण्यावर मुलांची नृत्ये! यात त्या मुलांना आनंद किती मिळतो, त्यांचा कल काय आहे... यांपैकी काही विचारात घेतले जाते का? शिक्षक किंवा संस्थाचालक सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडण्याच्या आविर्भावात असतात. एखादा माकडवाल्याचा खेळ आपण बघतो. माकडाला मुक्त उड्या मारण्यात आनंद असतो, तो त्याचा स्थायीभाव असतो. डोक्यावर डिचकी घेऊन नाचण्यात माकडाला रस नसतो. पण त्याचा विचार माकडवाला कशाला करेल? मुलांना नृत्यापेक्षा स्वच्छंद बागडण्यात आनंद असला तर त्याला नाचवायचे कशासाठी याचा विचार झाला पाहिजे. माकडवाल्याला पैसे मिळतात. माकडाचे काय? त्याला त्या पैशांचाही काही उपयोग नसतो आणि मालकाने पुढे टाकलेल्या तुकड्यापेक्षा झाडाच्या पानाचीच गरज जास्त असते. मुलांच्या बाबतीत त्यांचा आनंद कशात आहे हे आपण ओळखायला हवे. आपल्या किंवा पालकांच्या आनंदासाठी त्यांना नाचविण्यामुळे काय साध्य होते? -  सांस्कृतिक उपक्रम पार पाडल्याची नोंद. अधिक सूक्ष्मपणे याकडे पाहायला हवे. याचा अर्थ स्पर्धाच नकोत, स्नेहसंमेलनेच नको असा नाही. परंतु त्यात स्वाभाविकपणाला प्राधान्य मिळायला हवे, जुलूम-जबरदस्तीला नव्हे.
जास्त वजनाचे दप्तर मुलांच्या स्नायूवर, छातीवर आणि पाठीच्या कण्यावर वाईट परिणाम करू शकते. शाळेत स्वच्छ, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली तर मुलांच्या पाठीवरील पाण्याच्या (१ लीटरची बाटली) बाटलीचे साधारणत: १ किलो वजन कमी होईल. बहुतांश शाळांमधून अपेक्षित वजनापेक्षा दुप्पट वजनाचे दप्तर मुलांना वाहावे लागते. आरोग्याची काळजी कुणी वाहायची?
भावी काळात कचऱ्याचे निर्मूलन, प्रदूषण ,ग्लोबल वॉर्मिंग या पर्यावरणविषयक समस्या व त्यांचे निराकरण करण्याकरिता उपाय यांचा अंमलबजावणी कार्यक्रम अग्रक्रमाने राबवावा लागणार आहे. त्यामुळे या गोष्टींचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे ही चांगली गोष्ट झाली. पण विद्यार्थ्यांच्या गाठी अनुभव पडतो तो काय असतो? एक अगदी साधी गोष्ट सांगतो. पुस्तकांना आणि वह्यांना आकर्षक मुखपृष्ठांची आवरणे (कव्हर्स) असतात. या वह्या-पुस्तकांना आणखी एक कव्हर लावण्याची (प्रेमाची) सक्ती का केली जाते? त्यामुळे एक तर मूळचे आकर्षक चित्र लपते. इतके सुंदर चित्र लपवायचे कशासाठी? मुलांच्या सौंदर्यदृष्टीवर काळा चष्मा चढवल्यासारखे हे होते. हां, वहीवर चित्र कसले असावे याबद्दल काही मार्गदर्शक तत्त्वे पालकांना सांगू शकता. दुसरे म्हणजे कव्हरसाठी खाकी कागदाचा विनाकारण वापर वाढतो, जो कमी करण्याची गरज आहे. याखेरीज प्लॅस्टिकची किंवा लॅमिनेशन असलेली कव्हर्स पुस्तकांवर चढवली जातात. ती पुढे प्रदूषणाला कारणीभूत होतात. कागदाचा वापर वाढणे म्हणजे झाडांची तोड वाढणे हे साधे समीकरण आहे. म्हणजे झाडे जगवा-वाचवा या शिकवणुकीवर कव्हरच्या आग्रहाने कुऱ्हाडच चालवली जाते असे मला वाटते.
`स्व'ची जाणीव, समानानुभूती, समस्या निराकरण, निर्णयक्षमता, प्रभावी संप्रेषण, चिकित्सक विचारप्रक्रिया, भावनांचे समायोजन, व्यक्तीव्यक्तीमधील परस्पर संबंध, ताणतणावांचे नियोजन इत्यादी दहा जीवनकौशल्यांचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार अभ्यासक्रमात आहे. यामुळे जास्तीत जास्त कार्यक्षमतेने व यशस्वीपणे जीवन जगता येईल. हे सर्व आपल्या शाळांमधून प्रकर्षाने होते का? शिक्षणाची उद्दिष्टे काय याची तपासणी संस्थाचालकांनी करणे क्रमप्राप्त आहे.
शिक्षण शाळेमध्येच संपत नाही. ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे योग्य पद्धतीने कसे शिकावे हे शिकवणे (लर्निंग टू लर्न) ही संस्थाचालकांची प्रामाणिक भूमिका असली पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन