Skip to main content

Aathvanche Sathav


आठवांचे  साठव.....
- वसंत आपटे

जन्मशताब्दीच्या निमित्ताने
या अंकानं ३३ वर्षे पूर्ण केली. या काळात काय साधलं याचं हिशेबवह्यांत मिळणारं उत्तर उत्साहवर्धक नाही, पण स्मरणीय संपर्काचे जे अनमोल संचित तयार झाले त्याचा मात्र स्वत:लाही हेवा वाटावा. अशा भेटीगाठींत कै.यशवंतरावांकडे जाण्याचा योग साधला तो १९७९ च्या १२ जानेवारीचा प्रसंग -

`उद्या-परवा दिल्लीला जातोय' असे म्हटल्यावर रामानंदनगर कॉलेजचे प्राचार्य विलासराव घाटे यांनी विद्यापीठ अनुदान मंडळातील त्यांच्या कॉलेजचे एक छोटे काम माझ्याकडे दिले. दिल्लीत त्या कार्यालयात जाऊन मी त्यांच्याकडून `हां हो जायेगा, भेज देंगे' एवढं आश्वासन घेऊन बाहेर पडलो, तरी वेगळी एक कल्पना डोक्यात चमकून गेली.
कॉलेजच्या मातृस्थानी असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.यशवंतराव चव्हाण होते. म्हणून त्यांच्या कानावर हे प्रकरण घालावे असे वाटले. त्यावेळी चव्हाणसाहेब भारताच्या आठव्या अर्थ आयोगाचे अध्यक्ष. दिल्लीतील एक महानुभाव. मी हे काम घेऊन त्यांच्याकडे जाणे म्हणजे काहीच्या बाही कल्पना! पण मला त्या कामापेक्षा साहेबांच्या घरात शिरण्याचा `चानस' अनुभवायचा होता. घरी फोन लावला. वेणुताई होत्या. `सांगलीहून आलोय' म्हटल्यावर पटकन् वेळच मिळाली. संध्याकाळी सात वाजेपर्यंत साहेब मुंबईहून परत येतील, त्यानंतर घरीच येण्याची सूचना मिळाली. हाताशी वेळ होता म्हटल्यावर दिल्लीच्या राजस मार्गावर चक्क पायपिटी सुरू केली.
रस्त्यावर तुरळक रहदारी होती. रेसकोर्स रोडच्या कोपऱ्यावरचा बंगला सापडला. गेटातून आत शिरलो. पाठोपाठच काळीशार गाडी मला ओलांडून पुढे गेली. साहेबच आले असावेत. मी बंगल्याशी ऑफिसात डोकावलो. तिथे सामसूम. दरवाजात चाहूल दिल्यावर एक नोकर (असावा) आला. मी तपशील दिल्यावर त्याने आत नेऊन बसविले.
पाच-सात मिनिटांनी समोर एक व्यक्ती `नमस्कार आपटे. कधी आलात दिल्लीत?' असे म्हणत आली आणि माझ्या शेजारच्या एका ऐसपैस कोचावर बसली. हेच ते भारताचे थोर नेते, महाराष्ट्नचे शिल्पकार... वगैरे असलेले यशवंतराव...!
माझा विश्वास बसेना. तलावात पडलेल्या कुऱ्हाडीसाठी व्याकूळ झालेल्या लाकूडतोड्याच्या समोर एकदम परमेश्वर उभा राहून `काय हवंय तुला?' असे म्हटल्यावर त्याचे जे झाले असणार त्याचा अनुभव मला आला. गुढघ्याच्या वरती आखडलेले पंचासारखे वस्त्र आणि एक पैरणीसारखी बंडी अंगात अशा माजघरी वेषात माझ्यासमोर साक्षात यशवंतराव चव्हाण बसले होते.
या पुढचा पाऊस तास मी त्यांच्या सोबत होतो. त्यांचे ग्रंथालय पाहिले. `कृष्णाकाठ' या त्यांच्या आत्मवृत्ताची कच्ची मुद्रणप्रत पाहिली. सांगलीकडची हालहवाल झाली. माझे चुलते दत्त आपटे यांच्यासमवेतच्या गप्पांचा त्यांनी आठव दिला. `आपले जग'ची विचारपूस केली. जे कारण काढून घुसलो होतो त्या कॉलेजच्या कामाचं बोललो. पुढं एक-दीड महिन्यावर रत्नाप्पा कुंभार यांचा वाढदिवस होता. `त्यांच्याबद्दल काही सांगा' म्हटल्यावर साहेब खूप आतून हळवं बोलले. पण पुढे म्हणाले, ``आमच्या राजकाणातील वाटा आज वेगळया झाल्यात. त्यामुळं यातलं काही लिहू नका. उगीच कोण काय अर्थ काढेल सांगवत नाही, अशी विचित्र स्थिती आलीय.''
चहा आला. साहेब दिवसभराच्या कामातून किती शिणले होते माहीत नाही. पण प्राप्त राजकीय स्थितीनं बरेच दुखावले असावेत. माझा तो विषय नव्हे. त्या विमनस्कतेमुळेही असेल कदाचित, पण माझ्यासारखा एक `गावाकल्डा' सामान्य माणूस भेटल्यामुळे त्यांनाही उपजत हलकेपणा वाटला असावा. मला त्यांच्या त्या स्थितीने सुवर्णयोग साधून दिला.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन