Skip to main content

aathvanche saathav in 25 June 2012


आठवांचे  साठव.....
तिघांचे जाणे
मला आठवते तेव्हापासून ज्यांना पाहात आलो, अशा तीन व्यक्ती गेल्या आठदहा दिवसात काळाआड गेल्या. त्यांनी आपापल्या परीनं सुखी संसार केला, आणि त्यासाठी मन:पूर्वक प्रामाणिक खस्ता खाल्ल्या. त्यामुळं गावात ती भली माणसं म्हणून ओळखली गेली, त्यांच्या जाण्याची हळहळ ठेवून गेली. ८५-९० च्या वयातील त्यांंचं जाणं तसं धक्कादायक किंवा अकाली नव्हे, पण स्थिरचित्तानं आपली खेळी करून चांगला `स्कोअर' उभारणारा खेळाडू आऊट झाल्यावर एक रुखरुख वाटायची ती वाटतेच.
सदाशिव कृष्ण कुलकर्णी हे जवळच्या पलूस गावचे जमीनदार घरातले होते. त्या काळच्या अजस्त्र कुटुंबाची निर्वाह चिंता आणि परिस्थिती यांच्या विचारातून पांगापांग झाली. किर्लोस्करवाडीच्या कारखान्यात नोकरी पत्करून ते वाडीजवळ राहायला आले, त्यांच्या तिशीपासून ते `एस.के.तात्या' म्हणूनच ओळखले जाऊ लागले. आमच्या मळयात त्यांचे बिऱ्हाड राहिले, प्रपंच-पाणी-नोकरी एवढ्या व्यापात अडकलेले ते दिसत. नाटक हा त्यावेळी पुष्कळांचा छंद होता. तात्यांनी ऐतिहासिक नाटकात कामे केली. सरदार बाजी घोरपडे यांच्या तरवारधारी वेशातला त्यांचा फोटो आमच्या घरी होता, अजूनही कुठंतरी असेल.
गोविंद विष्णू जोशी हे वाढत्या वसाहतीत वैद्यकीचा जम बसविण्यासाठी साठ वर्षांपूर्वी आले. भाऊ परांजपे यांच्या बालमैत्रीमुळे ते इचलकरंजीहून इथे आले. सुरुवातीला काही दिवस परांजप्यांच्या घरीच राहिले, नंतर सगळे बिऱ्हाड आणले. आम्हाला तोपर्यंत शौचालयाची गरज वाटली नव्हती, कारण सभोवती सगळी शेती होती. पण त्या सुमारास आम्ही संडास बांधला, आणि डॉक्टर जोशींची आई `त्यासाठी' आमच्याकडं दररोज येऊ लागल्या. डॉक्टर मुख्यत: सर्वांच्या लक्षात राहतील ते त्यांच्या आत्यंतिक नियमित दिनचर्येसाठी! पहाटे सूर्यनमस्कार, मग विहिरीची आंघोळ, ताजा सात्विक आहार, कामावर श्रद्धा, ठराविक विश्रांती. आठवड्याची सुटी ते सांगलीत घालवायचे. काही बड्या शल्यक्रिया पाहून यायचे. त्यांच्यावरच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या, पैपाव्हण्यांचा राबता यांचे भान ठेवत त्यांनी आखीव आयुष्य भोगले. डॉक्टर म्हणून लोकांचा विश्वास मिळवला, पण त्यातही कुठे अस्थानी कणव दाखविली नाही. तत्वकठोर बंधने स्वत:वर घालूनच प्रदीर्घ कारकीर्द केली. हल्ली त्यांनी स्वीकारलेली अलिप्त निवृत्ती कदाचित त्या बंधनाचाच एक भाग असेल.
गजानन नागेश खिरेे हे साठच्या दशकातच या परिसरात आले. लिप्टन या चहा कंपनीचा विक्रीप्रतिनिधी म्हणून ते खेडोपाडी फिरत. टांग्याच्या मागे सुपलीत एक भला मोठा खोका बांधून पुढे जगू टांगेवाल्याजवळ बसून ते फिरताना दिसायचे. आम्ही पोरं त्यांना `लिप्टन खिरे' म्हणून ओळखत असू. तसेच एक `ब्रुक बाँड जोशी' त्यावेळी होते. खिरे इथे आले, घर-स्थावर करून राहिले पण त्यांचा संसार सगळया महाराष्ट्नत असे. ७६-७७ च्या सुमारास मिरज येथे रा.स्व.संघाचे शिबीर होते. ते संपवून खिरेकाका परत येताना भेटले. खाकी चड्डी - काळी टोपी - हातात लाठी या वेशात पाहिल्यावर मग आम्हाला ते संघाचे असल्याचे कळले. त्यांची संपर्ककला, सहज मदत करण्याची वृत्ती आणि साधेपणा ही लक्षणे स्वयंसेवकाचीच होती, त्याचा उगम त्यावेळी समजला. जवळपासच्या कोणत्याही विधायक घडामोडीत खिरेकाकांचा सहभाग असायचा. ब्राह्मण सभा, पतसंस्था, अर्बन बँक, ज्येष्ठ नागरिक, ग्रामपंचायत, प्रवासी संघ अशा सगळया संस्थांत ते दिसत. शिवाय सांगली व महाराष्ट्न् स्तरावरच्या काही संस्थासंघटनांत ते पदाधिकारी होते. त्यांचा प्रवास रेल्वे-बस आणि हातात एक थैला असा चालायचा. भारदस्त ऐट त्यांनी कधी दाखवली नाही. त्यांच्या जाण्याआधी चारसहा दिवस ते पुष्कळांना भेटून बोलून गेले होते.

म्हटलं तर ही साधी माणसं. उत्तुंग मोठेपण मोजण्याचे कारण नाही. पण एका निश्चित प्रणालीवर श्रद्धा ठेवून दीर्घकाळ चालत राहण्यातून त्यांनी एक ज्येष्ठत्त्व मिळवलेले होते. माणसाची वसती मोठी होत जाते. या स्थानीच्या शेतारानाचे गाव झाले, त्याला वाढत्या वयात काही विधायकतेचा संस्कार लाभला असेल तर तो अशा वैशिष्ट्यपूर्ण सामान्यजनांनी न कळत केलेला असतो.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...