Skip to main content

Aathvanche Sathav



आठवांचे  साठव.....
- वसंत आपटे


अग्नीपरीक्षा
परवाच्या २५ मार्चला ५५ वर्षं झाली. मला तर ती आठवण झालीच, पण माझ्या आधीच्या दोघी बहिणींनाही हटकून तो प्रसंग आठवलाच असणार!
आमच्या आपटे मळयातील एकांडं घर. घरात बेतास बात सामान, पण धान्यधुन्य भरलेलं. तावणाऱ्या उन्हाची रखरखीत दुपारची वेळ. वडील कामासाठी कऱ्हाडजवळ ओगलेवाडीस गेले होते. घरापुढल्या कडब्याच्या मांडवात माचावर आई लवंडली होती. या दोघी बहिणी काहीतरी अभ्यास-गृहपाठ करत होत्या. मी आठ-नऊ वर्षांचा होतो. दिनकर गं.केळकर (अज्ञातवासी) यांची कविता - `मोहरा इरेला पडला' ही चिमाजीआप्पाच्या आवेशात मोठमोठ्याने म्हणत होतो.
एकदम घरामागल्या बाजूनी धुराचा लोळ उठला आणि कोपऱ्याशी जाळही दिसला. `अरे अरे, काय पेटलं-' असं ओरडत आम्ही बाहेर त्या बाजूला पळालो. आईनं बाहेरच्या मोरीत भरून ठेवलेलं पाणी बादलीतून पळवत आणलं. तोवर जाळ मोठा झाला होता. तिनं ती बादली एकाच वेळी जाळावर फेकली. तसा भप्कन तो जाळ आणखीच भडकला. एव्हाना त्याची व्याप्ती वाढली. ऐन उन्हाळयाचे दिवस. घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या उकीरड्याच्या सभोवती पालापाचोळा साठलेला, गवत वाळलेलं, पेंड्या विखुरलेल्या... सगळं अग्नीचं खाद्य! जाळ सरसरत घरालगत आला, गोठ्याला भिडला आणि पश्चिमेच्या खिडकीतून ज्वाळा जिभा चाटत आत घुसल्या. पाहता पाहता घर आगीनं वेढलं. आम्ही तीन भावंडं आणि आई हतबुद्ध होऊन गेलो. जनावरं बाहेरच्या दावणीला होती, त्यांना झळ लागून ती दाव्यांना हिसके देऊ लागली.
आम्ही बहीणभावंडं शब्दश: ठो ठो बोंबलत दूर कुंपणापर्यंत पळालो. जवळपास वसती नव्हती, पण चार फर्लांगावरच्या तुरळक घरांतून माणसं धावत आली. शिवा कुऱ्हाडे हा तरूण कुंपणतारांवरून उडी घेत आला. त्याच्या हाती मोठा कोयता होता. जनावरांना मोकळे करता येईना कारण हिसके मारून त्यांनी खुंट्याचे तिढे जास्तच करकचले होते. शिवाने कोयत्याने दोर कापले. जनावरं उधळत दूर पळाली, दिसेनाशी झाली.
एव्हाना सभोवतालवरून माणसं धावाधाव करत आली. काठ्या, झापा यांनी झपाटत जाळ विझवू लागली. काहीजण आत घुसले, तडाक्यातून चीजवस्तू वाचविण्यासाठी धडपडू लागले. अन्नधान्याचे डबे, फडताळं, अवजारं, बरण्या दूर टाकू लागले. साधारण मैलभर अंतरावरती स्वामी रामानंद विद्यालय आहे. तिथून आग दिसल्यावर शाळेचे तीन-चार वर्ग सोडून देऊन मुलांना इकडे पिटाळण्यात आलं. त्या काळात दहावी-अकरावीतली खेड्यातली मुलं चांगली मिसरूड फुटलेली धट्टीकट्टी असत. त्यांनी घरामागच्या विहिरीत पार तळाशी असलेलं पाणी उचलण्यासाठी कच्च्या पायऱ्यांवरून माळ लावली आणि बादल्या-कळशा-डबे-किटल्या... जे हाती मिळालं ते भरून वरती चढवत पाण्याची अखंड फेक अग्नीवर चालू ठेवली. या सगळया प्रयत्नांमुळं अर्ध्या तासात आग संपली; पुढचा आणखी थोडा काळ धुसफुसत राहिली.
आत गेलेले दोघेचौघेजण सुखरूप बाहेर आले, त्यात आनंदराव पाटील (बांबवडेकर) टेलर इतके काळे झालेले होते की ओळखू येत नव्हते. एकानं कुणीतरी एक कापडी पुरचुंडी, काहीतरी महत्त्वाचा किंमती ऐवज असावा म्हणून प्रामाणिकपणे आईच्या हाती आणून दिली. आमच्या घरी `ऐवज' तो काय असणार? सगळी पांगापांग झाल्यावर आम्ही ती पुरचुंडी उघडली... त्यात खूप ज्वालाग्राही असा एक `सोरा' नावाचा रासायनिक पदार्थ होता. बहुधा विहिरीच्या खोदकामासाठी कधीकाळी आणलेल्यापैकी तो शिल्लक राहिला की काय कुणास ठाऊक! पण एवढ्या अग्नीवेढ्यातून तोच पदार्थ कसा काय वाचला हे आश्चर्य!
हे सगळं शांत झालं त्यावेळी घराभोवती झळा लागलेली झाडं, दरवाजे-खिडक्यांचे कोळसे, कणगी-पिपातील धान्य करपलेलं असं दृश्य होतं. अंगावरच्या कपड्यांखेरीज सगळी चिरगुट-कापडं खाक झाली. बाहेर पडलेली भांडी-काही वस्तू एके जागी करतोवर दिवस संपत आला; आणि दूर पळून गेलेली जनावरं एकाच कळपानं आपसूक येऊन मूकपणी आपल्या जागी उभी राहिली.
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन