Skip to main content

sampadkiya in 5 nov.2012


धार्मिकतेची रूढी
देवळात जाताना घंटा वाजवणे, अधिक मासात जावयाला वाण देणे, देवीची ओटी भरणे वगैरे धार्मिक रूढी अथवा परंपरा मानल्या जातात. वास्तविक त्या धार्मिक नसून शुद्ध सामाजिक असतात. समाज एकरस, एकजीव अशी धारणा निर्माण करणारी, व ती धारणा तोलून धरणारी जीवनपद्धती म्हणजे धर्म. धर्माला मानवतेची तत्वे आधारभूत असतात, पण आचरण मात्र सामाजिक, सामुदायिक असते. अर्थातच समाज ही संकल्पना स्थल-काल सापेक्ष असते. त्यामुळे त्यातील आचरणही स्थल-कालावरच अवलंबून असते.

मानवी समाजाचे ध्रुवीकरण काही हेतूंनी किंवा भावभावनांनी गरजेपोटी होत जाते, गरज संपली की विस्कळीतपणा येतो. परंतु नव्या गरजांपोटी नवे ध्रुवीकरण होते. ध्रुवीकरणासाठी समानतेचा कोणताही धागा पुरतो. एका घरात, एका ज्ञातीत, एका गावात जन्मलेली माणसे त्यांच्यातील स्वाभाविक समानतेमुळे एकत्रित राहू इच्छितात. पूर्वीच्या व्यवहारांची गती, स्थलांतराची कारणे फारशी प्रभावी नव्हती. त्या काळाला वेग नव्हता असे म्हटले जाते. तो वेग हळूहळू वाढत गेला. त्यामुळे एकत्र येण्याची आणि विखुरण्याची गतीही वाढली. कधीकाळी एका गावात राहणारी किंवा एका सोसायटीत राहणारी माणसे विखरून पडल्यानंतर, कालांतराने तेच कारण घेऊन एकत्र येऊ पाहतात. पुण्यात राहून `आम्ही सांगलीकर' म्हणतात. `माजी धरमपेठ मंडळ' म्हणतात. असे एकत्र आल्यावर, त्या कोण्या स्थळकाळाच्या अंगवळणी पडलेले आचरण त्यांना आनंद व समाधान देते. `आम्ही सांगलीकर' अशा वेळी दहीभाकरी-भरले वांगे करतील, आणि धरमपेठवाले भज्याभात नैवेद्यही करतील. हल्ली परदेशस्थ मुले तिकडे गणेशोत्सव करतात; ती मुले इथे घरच्या गणपतीची आरती करत होती का, ही शंकाच.

यात सामुदायिकतेचा, समानतेचा, सामाजिकतेचा एका साक्षात्कार असतो. तो होत राहावा म्हणून रूढ करण्यात येतो, त्याची रूढी बनते. नंतर कधी कुठे सांगलीकर जमले की दहीभाकरी-वांगे 'करायचे असते' अशी रूढी `धार्मिक' बनते; कारण ती समुदायाच्या एकत्त्व भावनेशी निगडित असते.

हिंदू धर्म हा मानवी जीवनाला प्राधान्य देत उत्क्रान्त झालेला व्यवहारविचार आहे. त्यात `असे करावे' किंवा `असे करू नये' हे निक्षून सांगणारा कोणताही ग्रंथ किंवा उद्गाता नाही. ज्या स्थळी, ज्या काळी कोणा मानवप्राण्याचा किंवा समूहाचा विचार वा आचार योग्य ठरला तो त्या त्या वेळी कुणी शब्दबद्ध-ग्रंथबद्ध केलाही असेल. परंतु तो `शास्त्रार्थ' ठरविण्याचा प्रयत्न फारसा यशस्वी झाला नाही, होऊ शकत नाही. जेव्हा `शास्त्र असे सांगते' असा उच्चार होतो, ती कुणीतरी कुठेतरी अनुभव किंवा त्याच्यापुरते अध्ययन-चिंतन यांच्या आधारे केलेली नोंद असते. आपल्याकडे काही देवदेवतांची स्तोत्रे असतात, त्यांच्या शेवटी `पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम्' या आशयांचे फल सांगितलेले असते, ते `धर्मशास्त्र' मानले जात नाही. ती `त्याची श्रद्धा' म्हणून सोडून दिली जाते.

ज्ञातीनुसार रूढी बदलणे हे सहजस्वाभाविक आहे. नवरात्रातील कुळाचार हे त्या रंजकतेने जाणून घ्यावेत. खेड्यांतून घट बसतात, त्यावेळी सव्वा वीत लांब रुंद - म्हणजे आजच्या भाषेत एक चौरस फूट - काळी माती देवघरात पसरून त्यात ओळीने धान्य पेरतात, नऊ दिवस त्यावर पूजेचे पाणी शिंपतात, नवव्या दिवशी त्याची उगवण नीट पाहतात. म्हणजे ही बियाणाची उगवण तपासणी (जर्मिनेशन टेस्टिंग) असते. ती तेथील लोकांची गरज होती. त्या खेड्यातून आयटी पार्कमध्ये राहायला गेलेला कोणी तरूण `घरचा कुळाचार' म्हणून ते पाळत राहिला तर तो श्रद्धेचा भाग आहे, रूढीचा आहे, त्यात धर्म कुठे येतो? `धर्म' म्हणून बंधन घातले तर ते पुष्कळ अंशी पाळले जाते, कारण माणसाला `धर्मा'वर श्रद्धा ठेवणे आवडते, मानवते. मराठा समाजातील लग्नात वधूवरांच्या मागे लिंबू खोचलेली तलवार धरून उभारतात, तर ब्राह्मण समाजात तिथे लामणदिवा धरतात. ही रूढी सहजस्पष्ट वृत्तीदर्शक आहे. ती कुणी सांगितली नाही. कालानुरूप रूढ झाली.

हे आचरण मानसशास्त्र, आरोग्यशास्त्र, आहारशास्त्र, सौंदर्यशास्त्र इत्यादि विज्ञानशाखांशी निगडित असे बसविले गेले आणि त्यास धर्माच्या चौकटीत ठेवले. त्यामुळे ते `का? कशाला?' असल्या प्रश्नांच्या अतीत राहिले. जर शास्त्र असेल तर ते चौकसपणाला संयत उत्तर देणारेच असले पाहिजे. पुष्कळदा आधीची पिढी चौकस जिज्ञासेला गप्प करून `का, ते विचारू नये. पूर्वजांनी धर्मात सांगितले ते करावे' असे म्हणते. `का, कसे' हे प्रश्न ब्रह्मजिज्ञासेला पूरक आहेत. समजून घेण्याची कुवत असेल त्याप्रमाणे त्यांची उत्तरे द्यायलाच हवीत. प्रत्येक कृतीमधील विज्ञान, शास्त्र, धर्म, नीती, हित, श्रद्धा या सगळयांचे संतुलन महत्त्वाचे असते. ते लक्षात घेऊन आपल्या आचरणातील इष्ट-अनिष्टता तपासावी लागते. कुणी देव भेटावा म्हणून क्षेत्रयात्रा करेल, तर कुणी `तीर्थी धोंडा-पाणी, देव रोकडा सज्जनी' असे म्हणून स्थानिक माणसांवर प्रीती करेल. या दोन्ही रूढी आहेत; त्यामागचा अर्थ स्पष्ट आहे; पटेल ती अनुसरावी. त्यांचा अर्थ स्वत: शोधावा, संगती लावावी. विचारायला गेले तर अनेक अर्थांचे फाटे `शास्त्रार्थ' म्हणून आपल्या वस्त्रात अडकतील. त्यांमध्ये `एकं सत्, विप्रा: बहुधा: वदन्ति' हे निश्चित.

सारंाश असा की, रूढी रूढ का झाली, यामागची कारणे अनेकांगी सांगितली जातील. ती प्रेयस (प्लेझरेबल) की श्रेयस (प्रीफरेबल) आहेत हे लक्षात घेऊनच ती टिकतात. मूलतत्त्वांचा आधार स्थिर असतो. जिज्ञासा, विज्ञानशास्त्रीय संशोधन आणि व्यवहार यांमुळे वरच्या भिंती बदलतात. त्या रूढींच्या भिंती जीर्ण होऊन कधीतरी पडून जाणे हे कालसंगतच असते. त्यांना श्रद्धेचे बांबू-वासे लावून किती तारून धरावे हे त्या भिंतींचा भक्कमपणा व तोलणाऱ्यांची इच्छाशक्ती यांवर अवलंबून असते. देवळात जाताना घंटानाद करण्याने देव जागा होण्यापेक्षा आपण जागृत होऊन कशाचे दर्शन अनुभवायचे हे आपापले ठरते. एखादे तारुण्य ज्या `दर्शना'साठी आले असेल, `त्याचे' लक्ष वेधण्याचाही हेतू असू शकेल. आपल्यास पटेल तो शास्त्रार्थ! परंतु सामाजिक एकत्त्वाच्या हिताचे कर्तव्य, तोच धर्म मानला तर `धार्मिक रूढी-परंपरा' हा शब्द वदतोव्याघात वाटतो. `शास्त्रात् रूढिर्बलीयसि' असे घडते, पण ते घडू नये असा प्रयत्न सातत्याने करणे हीच धर्मरूढी आहे.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन