Skip to main content

about book of Shripad Mate


परशुरामचरित्र व पंचमानव हिंदू समाज

हे १९३७ सालचे पुस्तक मी नुकतेच वाचले. त्या काळानुसार १८४ पृष्ठांच्या पुस्तकाची किंमत दीड रुपाया आहे. 
लेखक - श्रीपाद महादेव माटे, प्रकाशक - वि.ग.ताम्हणकर, १२ बुधवार पेठ, पुणे

कै. माट्यांचे हे पुस्तक त्यांच्या इतर पुस्तकांप्रमाणे प्रसिद्धी पावले नाही व त्यातील तर्कशुद्ध विचारांकडे  इतिहास संशोधकांचे, समाजधुरिणांचे व समाज सुधारकांचे जावे तितके लक्ष गेले नाही. माझ्या दृष्टीने त्याचे कारण म्हणजे या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर `परशुरामचरित्र' असे छापले आहे. पुस्तकाच्या प्रास्ताविकात माटे म्हणतात की, `हे परशुरामचरित्र  असले तरी पुस्तकाचे सबंध नाव `परशुरामचरित्र व पंचमानव हिंदूसमाज' असे आहे. त्या पूर्ण नावाकडे लोकांचे दुर्लक्ष झाले असावे असे मला वाटते.
श्री.माटे यांनी हे चरित्र लिहिताना महादेवाचा अभ्यास केला होता; अनेक वर्षांच्या चिंतनातून त्यांची सांगड हिंदू समाजाच्या जडणघडणीत कशी झाली हे त्यांनी दाखविण्याचा कसोशीने प्रयत्न केला व `पंचमानव हिंदूसमाज' ही संकल्पना या पुस्तकात मांडली. श्री.माटे परशुरामाचा काळ ६ ते ७ हजार वर्षांपूूर्वीचा मानतात. त्यासाठी तर्कसंगत उदाहरणे देतात. त्या काळी उत्क्रांत होणाऱ्या मानव समूहाचे नवे शस्त्र जे `परशू' ते परशुरामाने विकसित केले. ब्राह्मण व क्षत्रिय या जमातीत द्वेष होता, संघर्ष होता. मारामाऱ्या होत, गोधन, स्त्रीधन यांचे अपहरण होई व त्याचे पारिपत्य करताना परशुरामाने आपल्या नव्या शस्त्राने, परशूने अनेक क्षत्रिय कुळे नष्ट केली.
पुढे सुमारे दोन हजार वर्षात धनुर्धारी `राम' उदय पावला. त्याचे शस्त्र परशू नव्हते तर विकसित धनुष्यबाण होते. दुरून बाण मारून शत्रूला ठार मारण्याचे ते यशस्वी शस्त्र, अस्त्र होते. त्याच्या साहाय्याने रामाने राक्षसांचा, दुष्ट शक्तींचा नाश केला. कालांतराने शेती करून ब्राह्मण व क्षत्रिय समाज स्थिर होऊ लागला, धर्माबद्दल विचार करू लागला; त्यांच्यात एकोपा होऊ लागला.... असे बरेच विचार माटे मांडतात. परशुरामाच्या `चिरंजीव' या संकल्पनेचा त्यांनी ऊहापोह केला आहे. ते म्हणतात, परशुराम, वसिष्ठ, व्यास ही पुढे कुलनामे झाली. त्या व्यक्ती निरनिराळया काळी वेगळया असाव्यात. मूळ व्यक्तींचे अंत कसे झाले त्याचा इतिहास उपलब्ध नाही म्हणून ते `चिरंजीव' झाले व तसे संकेत समाजाने स्वीकारले.
ब्राह्मण क्षत्रियांच्या मनोमीलनाने हिंदू समाजाचा उदय झाला. मग हे पंचमानव कोण? तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र व अवर्ण किंवा अंत्यज/अतीशूद्र. एवढ्या प्रतिपादनानंतर या पंचमानव जमातींच्या मूळ पुरुषाकडे माटे वळतात. ब्राह्मण समाजाचा मूळ पुरुष परशुराम मानतात. क्षत्रियांच्या मूळ पुरुषाचे प्रतिनिधित्त्व प्रभू रामचंद्रांकडे जाते. तेव्हासुद्धा वर्णव्यवस्था होती. आर्य-अनार्य किंवा बहिस्थ व अत्रस्थ हा वाद होता. म्हणून अत्रस्थानी (इथे राहणाऱ्या मूळ रानटी जमातींनी) बहिस्थांवर (बाहेरून आलेल्यांवर) केलेले आघात आपण सहन करणार नाही व ते मोडून काढू, त्यांना कडक शासन करू हे रामाने दाखवून दिले. श्रीकृष्ण क्षत्रियच होता व त्याने चतुर्वर्ण्याचे कार्याकार्य व्यवस्थित मांडण्याचे लोकोत्तर कार्य केले. श्रीकृष्णाला वैश्यांचा मूळ पुरुष मानला. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य समाज हे बहिस्थच होत. हे त्रिवर्ण एकत्र आले तरी ते वेगवेगळे राहात. कारण `संकरोनरकायैवं' मानत. वर्णावर्णात संकर झाला तर तो समाजाला नरकात नेईल ही धारणा होती. नंतर बळी व महादेव या थोर व्यक्तींच्या भोवती जमा होणारे, शूद्र व अतीशूद्र या नावांनी हिंदू समाजात अंतर्भूत झाले.
बळीच्या अनुयायांची संस्कृती जमीन कसण्यापलीकडे फारशी गेलेली नव्हती. वामनाने त्रिपादभूमी बळीकडे मागितली व बळीला पाताळात ढकलले. पूर्वी बाली बेटांपर्यंत दक्षिण हिंदुस्थानापासून पूर्वेकडे सलग भूमी होती. त्याबाबतचे पुरावे आहेत. हा समुद्र आजही उथळ आहे. आजही शेतकऱ्याला आपण बळीराजा म्हणून मान देतो. मनुस्मृतीतील दोन श्लोकांत शूद्रांच्या पूर्वजाचे नाव `सुकालिन/सुकाली' असे दिले आहे. एखाद्याला `तू शूद्र आहेस' अशी शिवी द्यायची असेल तर त्याला `सुकळीच्या' असे संबोधले जाते. काही समाजाच्या तोंडी हे संबोधन आजही आहे.
फार प्राचीन काळी पृथ्वीवर लिंगपूजा होती. महादेवाची पूजा म्हणजेच लिंगपूजा होय. इथल्या अनार्यांच्या लिंगपूजेला, भगांकित लिंगपूजेला, शिवाच्या, महादेवाच्या, शंकराच्या पिंडीला त्रिवर्णांनी मान्यता दिली. या सर्व अभिसरणात समाजात विष्णूभक्ती ही वरून खाली झिरपत गेली, तर शिवभक्ती ही खालून वर पसरत गेली. हरिवंशात एक स्तोत्र आहे त्यात विष्णू आणि शिव हे एकच आहेत, असे सांगितले आहे.
माटे यांनी `पंचमानव हिंदू समाज' ही संकल्पना मांडताना सर्वांना आपल्या धर्माप्रमाणे वागण्यास मोकळीक हवी व सर्वांना समान संधी मिळावयास हवी असे प्रतिपादन केले. या संबंधात त्यांची पुढील तीन पुस्तके `अस्पृष्टांचा प्रश्न', `विज्ञानबोधाचा प्रस्तावना खंड' व `परशुरामचरित्र' जरूर अभ्यासावे असे सांगितले आहे.
`विज्ञानबोधाचा प्रस्तावना खंड'सुप्रसिद्ध लेखक श्री.वि.ग.कानिटकरांच्या `गाजलेल्या प्रस्तावना' या पुस्तकात उपलब्ध आहे.
- चंद्रकांत वेलणकर, मालाड, मुंबई (मोबा.९८७००३२९९१)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...