Skip to main content

sampadkiya in 26 Nov.2012


श्रद्धा आणि कर्तव्य
शिवसेनेचे संस्थापक आणि प्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेस जमलेला अलोट गर्दीचा सागर अलीकडच्या काळातील एक अप्रूप म्हणावे लागेल. त्या आधाराने शिवसेनेची लोकप्रियता अजमावता येईल का हा चर्चाविषय आहे. परंतु त्याच्या पश्चात निर्माण होणाऱ्या प्रश्नांना उत्तरे शोधण्याचे उत्तरदायित्त्व सर्व संबंधितांना घ्यावेच लागेल. शिवसेनाप्रमुखांना शासकीय इतमामात निरोप द्यावा हा महाराष्ट्न् सरकारचा निर्णय त्यांच्याविषयीच्या सद्भावनांपोटी घेतला गेला असेलही, पण त्याविषयी काही स्पष्ट नियम कायद्याच्या राज्यात असणार; असलेच पाहिजेत. ते काय आहेत, याबद्दलची विचारणा उत्तर प्रदेशातून माहितीच्या अधिकाराखाली केली गेली आहे. कुणाच्या तरी मर्जीखातर किंवा लोकानुनय सांभाळण्यासाठी असा निर्णय घेतला जाऊ शकत नाही. ते नियमबाह्य असूनही `खास बाब' म्हणून सन्मानाने जरी घडले असेल तरी यापुढील काळात `खास बाब' हाच नियम होण्याचा धोका असतो.

पद्मपुरस्कार किंवा भारतरत्न हा सन्मान कुणाकुणाला द्यावा यासाठी अशा प्रकारच्या मागण्या होत असतात. स्वातंत्र्यसैनिक म्हणून सन्मानपेन्शन देण्याच्या घटना स्वातंत्र्यप्राप्तीपर्वात जन्मलेल्या व्यक्तींना देण्याची `खास बाब' घडू शकते. पण `शासकीय इतमाम' कुणाला द्यावा हा प्रश्न विचारला गेला आहे हे खरे.

कै.ठाकरे यांच्या स्मारकाचे स्थान हा एक नवीन मुद्दा येऊ पाहात आहे. तिथेही कै.ठाकरे यांची कर्मभूमी... वगैरे भावनिक मते निर्णायक होऊ शकणार नाहीत. तशी ती एकदा झाली तर पुन्हा तशी `खास बाब' कितीजणांसाठी लागू करायची असा प्रश्न उभा राहू शकतो. प्रत्येक संघटनेला आपापला नेता परमोच्च स्थानी असतो. तेवढ्यापुरते ते वास्तव कोणीही मान्य केले तरी प्रश्न उभारणार नाहीत, पण दुसऱ्या संघटनेचा नेता खाली ढकलण्याची अहमहमिका सुरू होते. आणि प्रश्न जटिल बनतात.

त्यातही पुन्हा नेत्यांच्या मोठेपणापेक्षा व नेतृत्त्वगुणांपेक्षा त्या संघटनेशी असणारा विरोध ऐरणीवर येतो. एकमेकांच्या सत्तास्पर्धेतून लोकभावना कोण सांभाळतो किंवा भडकावतो यावरती तो परस्परविरोध शमतो किंवा वाढतो. एकूणातच तात्विक वा नैतिक इष्ट-अनिष्टतेपेक्षा निव्वळ राजकारणावर अवलंबून होणारे निर्णय वादग्रस्तच ठरतात; ठरणारच. कदाचित तसे वाद तेवत ठेवणे हाच कित्येकांचा हेतू असू शकतो.

संसदेचे कामकाज बंद पाडण्याला तर हल्ली कोणतेही कारण चालते, किंबहुना कारणही लागत नाही. कुणाला श्रद्धांजली वाहायची याविषयी हट्ट कसा काय होऊ शकतो? कोणा ज्येष्ठाला वंदन करावे हा संस्कारांचा भाग असतो. त्यात ज्येष्ठांचे ज्येष्ठत्त्व आणि कनिष्ठांचे नम्रत्व हा महत्त्वाचा भाग आहे. तो `आतून' असेल-नसेल त्याप्रमाणे आपापली वर्तणूक-कृती ठरवावी. आवश्यक वाटले तर दांभिक नाटकही करावे लागत असेल. पण जुलमाचा रामराम करण्याचा आग्रह विरोधी पक्षनेत्याची कोणती शान वाढवू शकेल? त्यांची निष्ठा दिवंगतापेक्षा संसदीय कामकाजावर असायला हवी. ते रोखून धरण्यासाठी गोंधळ घालण्याने दिवंगतांना शांती मिळते असा तर समज नसेल ना?

या सर्व बाबतीत सभ्यता, सद्भावना आणि समन्वय यांना गाडून टाकल्याचे दिसून येते. शेतकरी आंदोलनांनी चौकात टायर पेटवून सारे व्यवहार रोखले. त्यात शेतकरी किंवा कारखानदार नसलेल्यांचे किती नुकसान झाले त्यावर कुणी बोलत नाही. उलट हे आंदोलन खऱ्या शेतकऱ्यांचेच असेल तर त्यांना विरोध करण्याचे पाप आपल्या माथी नको असाच विचार करून सर्व पक्षोपक्षांनी ऊसदरवाढीच्या मागणीत आपापली मोळी टाकली. उसाला दर जास्त मिळाला तर इतर समाजाला वाईट वाटण्याचे कारणच नाही. परंतु त्यासाठी एसटी मंडळाचे व उद्योगविश्वाचे, सामान्य नागरिकांच्या दिवाळीचे नुकसान कोणती संघटना भरून देणार?

वत:च्या हितसंबंधांसाठी इतर साऱ्या यंत्रणांस अहिताकडे नेणाऱ्या निष्ठा व कृती वारंवार तपासून पाहायला हव्यात. अन्यथा त्यानिमित्तचे वाद वाढवत नेऊन भांडत राहणारे अनुयायी त्याच त्या वर्तुळात फिरत राहतील. बाकीच्या जगास त्यांच्याभोवती टाळया पिटण्याऐवजी वेगळया वाटेने पुढे निघून जाता येईल.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...