Skip to main content

sampadkiya in 16 Dec.2012


अन्नसेवन : यज्ञकर्म की मस्ती?
अन्न ही माणसाची मूलभूत गरज आहे. तीही न भागविता येणारी कित्येक माणसे आहेत, पण त्याचवेळी अन्नाची नासाडी  करणारीही आपल्यासारखी कित्येक माणसे आहेत. लोकांना जेवू-खाऊ घालण्यात एक आनंद असतो; एकत्र जेवण्यातही आनंद असतो; आणि आग्रह करण्यात वा करून घेण्यातही आनंद असतो. अशा आनंदासाठी अन्नाचे चार घास वापरात आले तरी काही हरकत नाही. अगदी गरजेपुरतेच खावे हे तर वैज्ञानिकदृष्ट्या खरेच आहे परंतु परस्पर भावनांसही आयुष्यात स्थान असते. आपल्याकडे कोणी आले तर त्याचा पाहुणचार करण्यासाठी चहा देणे ही एक रीत आहे; गरज नक्कीच नाही. म्हणजे असा केवळ भावनिक चहाच्या कपाचा विचार केला तरी दररोज दर माणशी एक कप चहा `ज्यादा' होतो. त्या हिशेबाने देशात १०० कोटि कप म्हणजे पाचशे कोटि रुपयांचा चहा अनावश्यक होतो. पण तो `वाया' गेला असे मानले जात नाही कारण तसा चहा देण्या-घेण्यातला आनंद हीसुद्धा एक गरज आहेच.

प्रश्न आहे तो चक्क वाया जाणाऱ्या म्हणजे फेकून देणाऱ्या अन्नाचा. लग्न-मुंज हे पूर्वी पिचत होणारे भव्य समारंभ. त्यातही अगदी निकटच्या अंतरावरून येण्याचे घडत असे. दळणवळण कमी. फारतर पंचक्रोशीतून शेपाचशे माणसे या मोठ्या निमित्ताने जमत. समारंभ तीन-चार दिवस चालला तरी स्थानिक पदार्थ व उपलब्धता यांच्या मर्यादा असत. लाडूसारखे पपन्न पंधरावीस दिवस खात राहायचे; त्यात `टिकाऊ'पणाचा विचार होता. आताच्या काळात साखरपुडाही दणक्यात होतो. लग्नाचा, पोराचा, घराचा वाढदिवस पूर्वीच्या लग्नांपेक्षा भव्य असतो. शिवाय स्वागत-निरोप-यश-यांच्या पाटर््या, मंगळागौरी-मेळावे... काय नि काय!! यांसाठी पपन्नांच्या किती तऱ्हा. बंगाली मिठाई, चायनीज्, साऊथ, चाट, सूप, सॅलड... नाना भानगडी. यातलं काही उरलं सुरलं तर घरची चार कच्चीबच्ची खातील असे नाहीच. कारण उरलं किती कळत नाही; कुठल्याही घरी आता चार कच्चीबच्ची नाहीत आणि असली तरी दुसऱ्या दिवशी यातल्या कशाला हात लावायची नाहीत.

जेवढी निमंत्रणे दिली जातात, त्यापैकी अगदी अपवादच वगळला तर कोणीही येण्याबद्दल होकार-नकार कळवत नाहीत. `यायचे खूप मनात होते, पण ऐनवेळी काहीतरी घडले, त्यामुळे येता आलं नाही' - ही नंतर ठोकण्याची थाप आता सर्वांच्या अंगवळणी पडली आहे. पण ती आवरती घेऊन यजमानाला जर लगेच हो-नाही कळवून टाकलं तर उपस्थितांची संख्या नक्की होऊन अन्न नासाडी (आणि इतरही व्यवस्थांचा खर्च) मोठ्या प्रमाणात वाचेल. अगदी घरापर्यंत लग्नाची अक्षत आली तरी आपण त्या निमंत्रणास तोंडदेखले `हो हो हो' म्हणतो त्याऐवजी जर निश्चिती दिली तर फार उपयुक्त होईल. या साध्या व्यवहारास भावनिक जिव्हाळयाचा ओलावाही द्यायलाच हवा. पण नंतर जी सबब सांगायचीच, ती वेळेवरच सांगितली तर?

हल्ली पाश्चात्यांची बुफे पद्धत आपण स्वीकारली, पण त्याचे धेडगुजरी रूपांतर केले. एकमेकांशी बोलत, क्षेमकुशल घेत, चवीचवीनं सावकाश आस्वाद घेण्यासाठी एखादे पेय (शांतंपापं) आणि मोजकेच पदार्थ तिकडच्या बुफे प्रकारात असावेत; म्हणजे नासाडीला फारसा वाव नसतो. परंतु इथे सगळा उलटा मामला! पुरणपोळीपासून खर्डा-थालीपीठपर्यंत बुफेतही पन्नास पदार्थ. जेवणाऱ्यांची झुंबड. संपलेला पदार्थ पुन्हा घ्यायला जावे तर तिथे ही%% गर्दी, एकाच वेळी थाळाभर जिन्नस डाव्या तळहाती सांभाळण्याची कसरत करत भर्रकन आटपले की बाकी राहणारे किती अन्न मोजायचे? बुफे पद्धतीत आग्रह नसल्यामुळे जेवणाचा दर वास्तविक कमी हवा; तर तो जास्त लावला जातो कारण नासाडी जास्त होते. ताट नव्हे तर `ताटली' स्वच्छ करण्याचे पथ्य पाळले तर `बुफे'चा खर्च निम्म्यावर येईल. यामध्ये खर्चाचा विचार नसून अन्न नासाडीचा आहे.
मोठ्या जेवणावळी घालून बडेजाव मिरविण्याची हौस काही यजमानांस असते. प्रेमाने-आपुलकीने यावे, त्यांना छान जेवू घालावे हे गैर नाही. परंतु लग्नात `आली लग्नघटी' म्हणेपर्यंत मुठीत घामटलेल्या अक्षता फेकत ताटावरती तुटून पडण्यात कसला जिव्हाळा? आमंत्रितांची संख्या, वेळ, सोय यांचा मेळ घालता आला तर अन्नाचे नियोजन करता येईल.

ही झाली समारंभ-कार्यांची कथा. घरातही दोन-तीन-चार माणसांतून नासाडीचे प्रमाण खूप आहे. लोणची, शिळे अन्न, फळे यांचा अंदाज ऐनवेळी कमीजास्त होणारी संख्या करूच देत नाही. तीन माणसांच्या कुटुंबात एकजण जेवला नाही तर भाजी-आमटी उरून बसते. सकाळचे कांदेपोहे उरले तर दिवसभर फ्रीजमध्ये ठेवून संध्याकाळी फेकायचे ही घरोघरीची पद्धत. दूध उतू जाणे, लोण्याला वास येणे, भाजी करपणे, चटणीला बुरी येणे, फळे काळी पडणे... अशा असंख्य तऱ्हा. सर्वेक्षणातील एक अंदाज असे सांगतो की, भारतात रोज ५ लाख किलो अन्न वाया जाते, नासाडी होते. त्यावर २० लाख लोकांचे एकवेळचे पोट भरेल. ही नासाडी आपण सामान्य लोक सामान्य जीवनात (जेवणात) करतो. सरकारी कारभारात होणारी सांड-लवंड, नास-खराबा, उंदीर-घुशी, भीज-कूज यांचे आकडे वाचायला मिळतात. त्यावेळी `सरकारी कारभार' म्हणायची पद्धत. त्यांना कोणत्या तोंडानं शिव्या-शाप द्यायचे? आपल्या ताकतीच्या प्रमाणानं आपण जास्तच नासाडी करतो.

भारताला कृषीचे महत्त्व केवढे आहे. त्यात गरीबीचा बभ्रा जास्त. एकेक कण मोलाचा. अशा स्थितीत इतके अन्न वाया जाणे शोभत नाही. त्यात बळीराजाचा, भूमातेचा अपमान आहे. पूर्वीच्या बायका म्हणायच्या, अन्नाशी मस्ती केली तर ते श्रापतं! खाऊन माजावं, टाकून माजू नये! - या सगळयाचा मतितार्थ एकच - `अन्न हे पूर्णब्रह्म'. ब्रह्माची उपासना पूर्णभावे करावी, त्याचा अव्हेर करू नये.
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन