Skip to main content

sampadkiya in 10Sept.21012


वास्तवाशी फारकत
कवी म्हणजे चंद्रताऱ्यात झुरणारे वा हस्तिदंती मनोऱ्यात बसून प्रेमाची गाणी गाणारे, अशी सर्वमान्य कल्पना असण्याचा एक काळ होता. वास्तवाच्या धगधगत्या निखाऱ्यांना आपल्या आेंजळीत घेऊन सर्वसामान्यांपर्यंत ती दाहकता पोचवण्याचे कामही त्या काळातील कवींनी केले. त्यातील अग्रणी नाव कुसुमाग्रजांचे. ते समाजापासून कधीच लांब राहिले नाहीत. अनेक लोकचळवळीत त्यांनी प्रत्यक्ष सहभाग दिला.

७०-७१ सालच्या दुष्काळावेळी कुसुमाग्रजांनी दुष्काळाने होरपळलेली ग्रामीण जनता प्रत्यक्ष पाहिली. अन्न, पाणी, चारा, रोजगार या अभावी त्रासलेले लोक पाहून ते अस्वस्थ झाले. आटलेल्या विहिरी, कोरडे नाले आणि सरकारी मदतीसाठी आवश्यक वशिल्याविना तळमळणारी गावे त्याही वेळी होती. लोकांना मदतीबरोबरच धीर अन् दिलासा हवा होता, तेवढा तरी देऊ म्हणून ते स्वत:हूनच बाहेर पडले. त्या प्रवासाचे वर्णन ते करतात - `क्षितिजापर्यंत रिकामी आणि जळालेली जमीन दिसली. वाटेत एक नदी लागली. आसवे गाळण्याइतकेही पाणी तिच्यात शिल्लक नव्हते. माणसांजवळ जगण्याची जिद्द होती पण संकटसमयी आपल्याला वाऱ्यावर सोडले आहे ही खंत होती. त्या जनतेचे पोरकेपण मी अनुभवतो आहे.' परतल्यावर वर्तमानपत्रातून त्यांनी परखडपणे लिहिले, `सर्वत्र लोक जिद्दीने लढत आहेत. ही आपत्ती युद्धासारखीच, पण त्याहीपेक्षा मोठी आहे. यात लढणाऱ्यांकडे आम्ही (शहरी) लोकांनी याचक म्हणून पाहू नये. या काळात जे जेवणावळी उठवतील, रोेषणाई करतील, लाचलुचपत वा चुकारपणा करतील, त्यांना समाजानेच देशद्रोही म्हणून बहिष्कृत करावे.'

यावर्षीचा दुष्काळही गंभीर आहे. भयंकर गोष्ट ही की त्यावेळी जमिनीच्या पोटात कुठेतरी पाणी होते, पण ते काढणाऱ्या यंत्रणा नव्हत्या. आपण एवढी प्रगती केली की, चाळण होण्याइतकी भोके जमिनीत पाडून तिच्या पोटातला ओलाव्याचा कणन्कण शोधून संपवला. `दुष्काळधारकांना मोबाईलग्रस्त' करण्याची भन्नाट कल्याणकारी योजना आज आपल्याकडे आहे. भले अन्नपाण्याला मोताद असू पण आपापल्या भागातल्या समस्या वा आत्महत्त्यांचे आकडे सांगण्याची `कनेक्टिव्हिटी' तरी हातात असेल! `महागाई वाढली म्हणजे शेतकऱ्यांना बरंच की!' अशी वक्तव्ये करणारे बालीश राज्यकर्ते `ब्रेड मिळत नसेल तर केक खा' किंवा `धान नहीं हैं तो केले या पपीते खाओ' असं म्हणणाऱ्या सरंजामशाही वृत्तीला मागे टाकत आहेत. घोटाळयांची शून्ये मोजून सामान्य जनता थकली पण नेत्यांना मात्र आपला तालुका दुष्काळाशी कसा जोडता येईल याचे डोहाळे लागलेत.

ज्या भागात हरितपट्टे गिळंकृत करणाऱ्या यंत्रणा आहेत तो शेतकरी जमिनी विकून मोकळा होईल. ज्याला कुणी भक्कम पाठीराखा आहे तो मदत वा नुकसानभरपाईचे पॅकेज मिळवेल. काही `प्रगत' शेतकरी बुद्धिमान पुढाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आफ्रिकेत जाऊन शेती करतील, पण ज्याला यातले काहीच शक्य नाही त्या छोट्या शेतकऱ्यासाठी कुठला सशक्त पर्याय  कुणी दिला आहे? कर्जमाफी-बियाणे-खते-पाणीपुरवठा सर्वत्र ब्रह्मघोटाळे! या अडचणीच्या वेळी `लढ' म्हणण्यापुरता तरी त्याच्या पाठीवर कुणाचा हात आहे? `सरकार मदत करेना व समाज मरू देईना' अशी त्याची अवस्था झाली आहे. कुसुमाग्रजांच्या निकषांवरून पाहिले तर देशद्रोह करणाऱ्यांच्या यादीत आपलाही नंबर वरती लागेल. कारण दुष्काळ म्हणजे `आता किती तास लोडशेडिंग होणार? पाणी एकदा तरी  येणार की नाही? बादल्या भरून ठेवायच्या म्हणजे शॉवर वा `फ्लश'ची पंचाईत! आता कसलं धबधबे पाहायला जाणार... स्थलांतरितांचे लोंढे व्यवस्थांवरचा ताण वाढवणार' अशा काळज्यांनी दुष्काळ हटेल काय? दुष्काळाच्या फोटोंमुळे वृत्तपत्र रुक्ष वाटते, आणि पॅकेज येणार म्हटल्यावर त्यात कोण किती खाईल यावर चर्चा केली की संपली दुष्काळाची जाणीव! टीव्हीवरच्या वाहिन्यांसाठी ऑलिंपिक, क्रिकेट, मोर्चे, घोटाळे, फिल्मी प्रदर्शन यापैकी काहीच `ब्रेकिंग' नसेल तर क्रॅमेरे दुष्काळाकडे वळतात.
असा एक काळ होता, युद्धामुळे आलेल्या अन्नसंकटाला तोंड देण्यासाठी आपले संवेदनशील पंतप्रधान स्वत: उपवास करत होते व त्यांना पाठिंबा व प्रतिसाद म्हणून स्वत:हून उपवास करणारी भाबडी जनताही या देशात होती. आता फक्त सरकारकडे बोट दाखवून जनतेचेही चालणार नाही. आपल्या जीवनशैलीचा निसर्गावर होणाऱ्या परिणामांचा गांभीर्याने विचार करावा लागेल. बुद्धी आहे, अभ्यास करण्याची क्षमता आहे, त्याचा वापर प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरिता कोणी करत नाही. परदेशातही सर्वच गोष्टी सरकार करते असे नाही. तिथे लोक स्वयंस्फूर्तीने एकत्र येतात, समस्यांवर विचारपूर्वक, नियोजनपूर्वक मार्ग शोधतात व शिस्तबद्ध सहभाग देऊन त्या योजना पूर्णही करतात. अस्ट्न्ेिलॉयासारख्या देशात सरकारने नद्यांच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी नागरिकांनाही सहभागी करून घेतले आहे. शास्त्रीय संशोधन कसे करावे याचे रीतसर प्रशिक्षण लोकांना दिले जाते. आपल्याकडेही राजस्थानमधील `जोहड'चे पुनरुज्जीवन करून पुन्हा नद्या वाहत्या करण्याचा चमत्कार करणारे राजेंद्रसिंहांसारखे भगीरथ आहेत. आपापल्या भागातील नैसर्गिक आपत्तीचा अभ्यास करणे, उपाय सुचवणे, जनजागृती करणे व सरकारवर योजनांच्या कार्यवाहीसाठी दबाव आणणे हे कोण करेल? ही जबाबदारी आपली वाटत नाही कारण वाढीव दराने का होईना, धान्य मिळते आहे, पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी धरणातील साठे राखीव आहेत. आपण कोषात सुरक्षित आहोत आणि तसे पिढ्यान पिढ्या राहू. संकटातला आपला वाटा आता आपल्यालाही समजून घ्यावा लागेल.

कुसुमाग्रजांच्या कवितेतला `उभा दारी । कर लावूनी कपाळा । दीन शेतकरी । दाबून उमाळा ।' गेली चाळीस-पन्नास वर्षे तसाच उभा आहे. त्याला यातून बाहेर काढण्यासाठी, निदान आपल्या पुढच्या पिढ्यांना दाणापाणी मिळावे या स्वार्थासाठी  तरी त्या शेतकऱ्याची हाक आता आपल्या भावनेला नव्हे, बुद्धीला भिडायला हवी आहे. साहित्यिकांच्या अखिल भारतीय किंवा विश्व संमेलनावर दुष्काळाची छाया दिसायला हवी आहे पण तिथे तर जाणीवांचा दुष्काळ आणि अनुदानांचे कवित्त्व इतकेच दिसते आहे.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन