Skip to main content

lekh in 15 Oct.2012


झाडाचेही प्राक्तन असते?

नेहमीच्या वेळेला निघाले. रस्त्याबाजूला एक एक शेत `प्लॉट'मध्ये रूपांतरित होताना पाहून मी हळहळते. पण आज एकदम दचकलेच. रस्त्याकडेच्या प्लॉटवरचं एक झाड दर्शनी बाजूला मध्येच येतं म्हणून त्याला जिवंत जाळलं जात होतं. लांबून वाटलं काही पालाबिला पेटवलाय. जवळ आल्यावर पाहिलं तर सगळे उन्हाळे मुकाट पोटात ठेवून निबर झालेल्या खोडाला, टोकाशी पोपटी तेजस्वी लसलसती पालवी फुटलेली, ती पालवी अजून वाऱ्यावर हलत होती, पक्षांना बोलवत होती, आभाळाला निरखत होती.... तिच्या त्या उन्मुक्त, फुललेल्या जीवनेच्छेचा आधार मात्र पायातळी जळत होता. ही कुठली रीत? राहावेना, - थांबून तिथल्या माणसाला विचारलं. तो उत्तरला, ``बांधकामात आडवं येतंया न्हवं का - म्हून काडतोय''
     ``अहो पण मग सरळ तोडून का टाकलं नाही?'' माझा भाबडा प्रश्न. ``अवं, याची मुळं लई घट असतेत. कितीबी तोडा, मूळ हाय तवर फुटतयाच बगा. येकदा का मुळातनंच जळालं का पुन्यांदा न्हाई डोकं वर काढत..'' त्यानं सहजपणे त्यामागचं `तत्त्वज्ञान' ऐकवलं.
मी मुकाट्यानं पुढे चालू पडले. कुणी अॅसीड टाकतं; कुणी जाळतं; कुणी काही! नव्या स्वप्नांना जागा हवी असली तर जुन्या सगळयाची राखरांगोळी व्हावीच लागणार... तरीही वाटत होतं काहीतरी चुकतंय - त्याला तोडायला हवं होतं...
दचकलेच!.. म्हणजे फक्त हत्त्येचा मार्ग वेगळा, दुसरं काय? पण निदान तो मार्ग झाडांच्या सवयीचा. शिवाय समाजमान्य... आणि कदाचित् त्यालाही थोडा समाधान देणारा मार्ग; - की माझी फांदी कुठंतरी रुजेल - माझ्या काष्ठावर कुणाचा निदान भात तरी शिजेल.....

दिवसभराच्या कामाच्या रगाड्यात त्याला विसरले. घरी येताना सवयीने मावशीकडे डोकावले. आज तिनं हसून चहा विचारला नाही वा        आठवणीनं ठेवलेलं चाफ्याचं फूलही दिलं नाही. गप्प होती पण धुमसत होती. बोलण्याचा रागरंग दिसेना.
दोन-तीन दिवसांनी कळलं, तिचा मुलगा तिला काहीतरी फार फार जिव्हारी लागेलसं बोलला होता. मावशी म्हणाली, ``वाटलं होतं इतरांपेक्षा कितीतरी सुखी आहोत आपण. निदान घरी राहातोय. आश्रमात नाही. पण हे असं ऐकणं... आईपणावरच घाला बसला गं माझ्या... बाकी कुठलेही आरोप सहन होतील पण `तू जगातली सर्वात वाईट आई आहेस' हे ऐकण्यापेक्षा मरणं बरं वाटतं गं!'' मी तावातावाने तिला म्हटलं, ``मग जा खरंच कुठंतरी आश्रमात. हे असलं सोसत कशाला गं राहाता? हल्ली किती चांगले आश्रम आहेत....'' ती विचित्र हसली, ``माया असते गं... कुठेतरी आशा असते... कधीतरी पालवी फुटेल या आशेवर जगतात आमच्यासारखी वठली खोडं...''
मला तिच्याजागी ते मुळातून पेटलेलं झाडच दिसायला लागलं. वाटलं ही मुलं तरी असं काहीतरी बोलून त्यांना जिवंत जाळण्यापेक्षा नातं तोडून का टाकत नाहीत? की त्यांच्या मनात जागाच तोकडी असते? नवी नाती रोवायला जागा नाही म्हणून जुनी काढावी लागतात हे मान्य. पण त्यांची तरी पानं -फुलं-फळं-फांद्या काहीतरी उपयोगी असतं ना, ते तरी सांभाळा! माणसाला असं दु:ख भोगावं लागलं की आपण म्हणतो `भोग आहेत पूर्वजन्मीचे', `प्राक्तन आहे' - त्या झाडाचेही प्राक्तन असेल असं जिवंत जळून जाण्याचं. आता तिथे कुणी बंगला बांधेल, नव्याने हौसेने काही झाडेही लावेल.
माती मनात हसत असेल गूढपणे. तिला ठाऊक आहे भूत भविष्य सगळंच. तिनं पाहिलंय-काहीही उपयोग नसणाऱ्या शोभेच्या झाडांची अगदी निवडुंगाचीसुद्धा माणूस काळजी घेतो कौतुकानं.... पण वड-पिंपळ-औदुंबर-चिंच अशा जुन्या खोडांच्या नशीबी लोकांसाठी सगळं करूनही कुऱ्हाड ठरलेली. आजोबांनी लावलेली आंब्याची झाडं नातू तोडून मोकळा होतो - जागेच्या अधिक फायदेशीर गुंतवणुकीसाठी. पण त्या वृक्षाची एक कोयातरी जपून ठेवावी वाटत नाही त्याला. वाडवडिलांची मूल्येही आज जशीच्या तशी वापरता येणार नाहीत कदाचित,पण त्यातला भाव, मर्म, तत्व ते तर जपता येईल ना? जपायला हवं ना? तसं वाटलं तर मग अशा जिवंतपणी हत्या नाही करणार. नव्या व्यवस्था, नवी मूल्ये अपरिहार्य आहेतच पण हे विसरतो आहोत आम्ही की छाटायचा, असतो तो फाफटपसारा-गुंता! - मुळं नाही. निदान त्यांना काढून टाकण्यापूर्वी एकदा पहा तरी, ती मुळं कुठं कुठं लांबवर पसरली होती. नव्याने जन्मणाऱ्या पालवीसाठी कुठून कुठून जीवनरस आणत होती - उंच उंच अजून उंच म्हणून आभाळाला भिडू पाहणाऱ्या शेंड्यानं, वादळाच्या सपाट्यात आडवं होऊ नये म्हणून स्वत: किती खोल जाऊन घट्ट उभी होती.
आपण आपल्याला असं सोटमूळ फुटूच दिलं नाही. फार खोलात शिरायला घाबरलो-टाळलं-वरवर पसरून काहीबाही गोळा केलं - वसंतऋतूत पालवलो-त्यात खरं आमचं कर्तृत्व फार नव्हतं हे कळलं, ग्रीष्माच्या झळा सोसताना किंवा वादळात उखडलो गेलो तेव्हाच! कितव्या पिढीची कुऱ्हाड चालणार हे माहीत नसताना पिढ्यान् पिढ्या फळं देत राहाणारे ते महावृक्ष आणि पहिल्या बहरातच सर्व अनुभव घेण्याचा अट्टाहास करून पानगळीपूर्वीच रितेपण अनुभवणारे आमचे झाडोरे - हेच असतं का प्राक्तन?
जाताना पुन्हा थबकले त्या राखेच्या ढिगाशी. ते झाड बोलायला लागलं माझ्याशी, ``खंतावू नकोस इतकी. अजानवृक्षाचं प्राक्तन नाहीये माझं हे जाणून होतो मीही. पण पूर्ण वाढायचं होतं मला. माझ्या खुरट्या सावलीखाली कुणी मेंढरू विसावलं असतं - निदान माझ्या काटक्या रस्त्याकडेच्या अन्नपूर्णेच्या चुलीत गेल्या असत्या - माझ्यावर कविता होतील अशा भ्रमात नव्हतो मी, पण निदान जाळण्यापूर्वी माझ्या शेंड्यावर डोलणारं ते तेजाचं बालरूप कुणी भाबडेपणानं वहीत जपून ठेवलं असतं. बस् एवढ्यावर सुखावलो असतो मी. पण जाऊ दे! तू खरंच नको हळहळूस... मी एकटा नाही, समूह पेटलेत - झाडांचे - माणसांचे..! मला समाधान एवढंच की एकाकी उभा होतो - त्यामुळे एकट्यानेच जळलो - जंगलात राहून सर्वांसकट दुसऱ्याला जाळणाऱ्या वणव्याचं कारण तरी नाही ठरलो!''
-विनिता तेलंग (९८९०९२८४११)
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन