Skip to main content

Samp. in 29 Oct.2012


सकारात्मक, स्वावलंबी दृष्टिकोनाची गरज
नुकताच जागतिक अंध दिवस झाला. अंध लोकांविषयी डोळसांची दृष्टी जागृत करणं हा हेतू. परंतु कोणतीही समस्या खूप चांगली समजायची असेल तर त्या समस्येचा स्वत: अनुभव घेणं आवश्यक ठरत असावं. या अंध-दिवसाचा कार्यक्रम पाहून मला पूर्वीचं ते `अनुभूती शिबीर' आठवलं. आयुष्यात एखादे व्यंग सोबत घेऊन जगणाऱ्यांची वेदना समजून घेता येते का, यासाठी ते शिबीर होते. सर्व आखणी बाकीच्या शिबिराप्रमाणेच होती पण या शिबीराच्या सत्रात बोलायचे नाही. एका सत्रात एकच हात वापरायचा, एकदा एका पायानेच चालायचे असे प्रयोग होते. वाचताना हे खूप वरवरचे, दिखाऊ वा उथळ वाटू शकेल पण सहभागी मंडळी बऱ्यापैकी संवेदनशील होती व तात्कालिक अपंगत्वाच्या अनुभवाबद्दल भरभरून बोलत होती.

रात्रीचे सत्र. सर्वांच्या डोळयाला पट्ट्या, सर्व दिवेही विझवलेले. अंधत्त्वाचे सत्र हे जेवणाचे होते. खूप गोंधळ झाले. प्रत्येक अनुभवानंतर `बाकी काही चालेल पण हे अधूपण अवघड...' अशा प्रतिक्रिया येत. अंधत्व सर्वानुमते जास्त असुरक्षित वाटायला लावणारे होते. नंतर पट्ट्या सोडल्या. दिवसभरातल्या जाणीव जागृतीबद्दल बोलूनही झालं. अंधारातच बसून जे काही ऐकलं, त्यानं सर्वांनाच नवी दृष्टी मिळाली.`आपण हे सगळं कशासाठी केलं? देवानं सर्वांनाच पंचेद्रियांव्यतिरिक्त एक सहावं इंद्रिय दिलेलं आहे. ज्या व्यक्ती अंध आहेत त्यांचं हे सहावं इंद्रिय विशेषकरून कामाला लागतं. ती शक्ती सर्वांकडे असते, पण पंचेद्रियांच्या अतीवापरात इतके गर्क असतो की त्या सहाव्या इंद्रियाला जागृत व्हायला वेळच नाही. डोळे मिटल्यावर अंधारात ते सहावे इंद्रिय जागे होते. त्या `आतल्या आवाजाची' सोबत मिळवण्याकरिताच बहुधा आपण खूप आनंदाच्या, दु:खाच्या, भीतीच्या, तृप्तीच्या प्रसंगी डोेळे मिटून घेतो. एखाद्या दिवशी अशीच ठरवून एकेका इंद्रियाला विश्रांती द्यावी म्हणजे सहावे इंद्रिय कामाला लागण्याची प्रक्रिया सुरू होईल. आणि मग अंधाराचे वेगळेच रूप दिसायला लागेल. दिवसाच्या शेवटी निसर्ग अंधाराच्या एका कुंचल्याने सगळी सृष्टी एकसारखी करून ठेवतो. अंधाराच्या दुलईखाली कुठे प्रेमिक, तर कुठे बाबाच्या वाटेकडे डोळे लावलेले पोर, कुठे एखाद्या दुष्कृत्याची तयारी, कुठे ध्यानस्थ बसलेले कोणी...! अंधार तोच असतो, मन:स्थितीनुसार वेगळा भासतो. पण कधीतरी निसर्गाशी एकरूप होण्याची अनुभूती घेण्यासाठी मुद्दाम अंधारात बसावं. प्रथम घाबरायला होतं, पण नाइलाजाने का होईना एका जागी बसून राहातो. हळूहळू त्याला शरण जातो. मग तो अंधार, आपलं मन सगळं मिळून एकच अस्तित्व बनतं. स्वत:ला विसरून जर अंधाराशी तद्रूप होऊ शकलो तर खरेच तो अंधार श्रीकृष्णाच्या विराट रूपासारखा भासू लागतो. आपल्याला सगळं `दिसतं' या भ्रमातून बाहेर काढतो. `स्वत:भोवती घेता गिरक्या अंधपणा की आला....' या गाण्याच्या ओळीचेही वेगळे अर्थ मला दिसू लागले.

मी - माझं - माझ्यासाठी - माझ्यामुळे असं गरगरत राहिलो तर बाकी काही दिसणारच नाही.... हेही अंधत्त्वच की! या शिबिरामुळे आपल्यातलीच अशी कितीतरी व्यंग, पंगुत्त्व दिसायला लागली. केवळ हात पाय धड म्हणून आपण स्वत:ला अपंगांपासून वेगळं समजतो याचा विषाद वाटला.कोणी अंध असेल तर त्याला लहानपणापासून किती संघर्ष करावा लागतो. पालक-शाळा-साधने यांची भक्कम साथ सुदैवाने मिळाली तर ती अंध व्यक्ती आयुष्यात इतरांसारखी उभी राहते पण जिथे इतके सगळे योग नाहीत, त्यांच्या आयुष्यातला अंधार सरतच नाही. कारण आपल्याकडे अंधांना, अपंगांना सहजपणे - इतरांसारखे सर्व व्यवहार करता येतील अशी कुठे रचनाच नाही. मानसिकताही अशी की, आधी त्या व्यक्तीबद्दल अतिरेकी सहानुभूतीने त्याला दुबळे करायचे. सर्व सोयी, रचना, यंत्रणा, नियम, व्यवहार हे सारे, माणसे धडधाकट गृहीत धरून केलेले. मग अंध-अपंग असोत वा सामाजिक दुर्बल घटक असोत; अनुदान-देणग्या-राखीव जागा-सहानुभूती-हळहळ याच मार्गानी आम्ही जातो.

आता हळूहळू अशा विशेष मुलांना नॉर्मल मुलांसोबतच शिक्षण द्यावे यासाठी प्रयत्न - निदान वैचारिक पातळीवर - सुरू झालेत. कोणत्याही सहानुभूतीशिवाय, अभिनिवेश न बाळगता त्यांना साधारण लोकांसारखे आयुष्य जगता यायला हवे. अपंगत्वावर मात केलेल्या लोकांची चरित्रे वाचली वा अशा कुणाशी बोलले की ते प्रकर्षाने जाणवते. त्यांना सहानुभूती मुळीच नको असते. एखादा अवयव कमी काम देत असला तरी या व्यक्ती मनाने जास्तच खंबीर, उत्साही असतात. अपंगत्वाचा बाऊही केलेला त्यांना आवडत नाही, व प्रदर्शनही! कौतुक, दया, मदत, कळवळा, थोडक्या गोष्टीत समाधान, सवलत या गोष्टी प्रत्येक वेळी चांगल्याच किंवा उपयुक्त असतात असे नाही. या गोष्टींच्या अतिरेकामुळे अगदी धडधाकट माणसांचीसुद्धा जिद्द, ईर्षा, प्रगती खुंटते.

सहानुभूती वा सोयी सवलती असाव्यात पण तो आयुष्याचा पाया असू शकत नाही. गुणवत्तेचा आग्रह, टीका, परिपूर्णतेचा ध्यास, कलह या गोष्टींसह जे पुढे गेले तेच काही भव्य दिव्य करू शकले, समाजासाठीही त्यांनीच काम केले. हे सर्वांनाच लागू पडते. स्वत:ला धडधाकट म्हणवणाऱ्यांनासुद्धा! गंमत आहे पहा... जीवनाकडे पाहाण्याची योग्य दृष्टी नसणे, समजूत नसणे, शांतपणा-नियोजन-परिपप्ता यांचा अभाव, तसेच हव्यासी थिल्लरपणा असणे यातल्या कुठल्याच अवगुणांना मात्र आपण `अपंगत्व' समजत नाही. त्यामुळे अनेक दुर्गुण अंगात असलेली मंडळी निवांत, सहज जगत असतात. त्यांना नोकऱ्या लागतात, त्यांची लग्ने होतात, यथेच्छ उपभोग मिळतात. विकलांगांना मात्र अक्षरश: प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो.

ही परिस्थिती बदलायची तर समाज म्हणून एक परिपप्, सकारात्मक दृष्टी आपल्याला घडवावी लागेल. दोन्ही कृत्रिम पायांनी लंडन ऑलिंपिकमध्ये धावलेल्या ऑस्कर पिक्टोरिअसचं चरित्र वाचलं आणि आपल्या केवळ सहानुभूतीचा जरा गंभीरपणे फेरविचार करायला हवा असं जाणवलं. साहसाची आवड, वीजीगिषु वृत्ती, प्रचंड कष्ट, अत्यंत सकारात्मक विचार यासाठी शरीर नव्हे, तर मन धडधाकट असावं लागतं. ते तसं घडवण्याची संधी प्रत्येक मनुष्याला मिळायला हवी. जातीउपजातींचे पांगुळगाडे घेऊन आरक्षणांची भीक मागत फिरणाऱ्या, पैशाच्या लोभापायी अंध डोळेझाक करणाऱ्या, वरवर धडधाकट दिसणाऱ्या पण मनाने दुबळया, लाचार समाजाला गरज आहे एका सकारात्मक, स्वावलंबी दृष्टिकोनाची!

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन