Skip to main content

sampdkiya in 13 Aug.2012



क्रांती की परिवर्तन?
श्री. अण्णा हजारे राजकारणात प्रवेश करणार असे काहींना वाटतच होते आणि उरलेल्यांना त्यांनी राजकारणात यावे असे वाटत होते. राजकारण प्रवेशची अण्णा हजारेंची घोषणा एकंदरीत सर्वांच्याच अपेक्षेप्रमाणे झाली आहे. आणि त्याचे परिणामही त्या सर्वांच्या अपेक्षेनेच होण्याचा संभव वाटतो. राजकारणात जाण्यामुळे आण्णांचा मामा होणार असे दोन्ही गटांना वाटत असावे; परंतु एका बाजूला त्याची चिंता आहे आणि दुसऱ्या बाजूस त्याचा धूर्त आनंद आहे. त्या दोन्ही गटांचा अपेक्षाभंग होऊन राजकारणाला व त्यायोगे सर्वंकष राष्ट्न्कारणाला नवी दिशा त्यांनी दिली तर ती हवी आहे. तथापि ती शक्यता फारच अंधूक आहे. असे असले तरी श्री.अण्णा हजारे आणि आजूबाजूची `टीम' यांच्या तळमळीबद्दल शंका न घेता त्यांना शुभेच्छा देणे आवश्यक आहे.

जी मंडळी आज राजकारणात आहेत ती पक्की स्वार्थी राजकारणी बनलेली बनेल मंडळी आहेत. हजारे त्यांच्या विरोधात उतरणार असले तरी प्रस्थापित सर्वच विरोधकांतून अलिप्त राहणे अशक्य वाटते; आणि उजवे-डावे-पुरोगामी-प्रतिगामी वगैरे लेबलांचे जे पक्ष आज आहेत त्यांच्यातील कुणाशीही घरोबा केला तरी लोकांना ती प्रतारणा वाटणार आहे. राजकारणाच्या क्षेत्रात आज इतकी दलदल माजली आहे की त्यात उतरणाऱ्या माणसाची कृतिशीलता मंदावते आणि त्याने काही धडपड करायची तर त्याला पार बरबटून घ्यावे लागते. अशा स्थितीत `चांगल्या माणसांनी राजकारणात यावे' असा एक साळसूद विचार कुठेतरी व्यक्त होतो, त्यात प्रांजळता असेलच असे नव्हे.

घनदाट अरण्यातल्या आदिम टोळीच्या ताब्यात कुणीतरी नागर संस्कारांचा मनुष्य सापडतो. त्याला मारून टाकण्याऐवजी काही काळ `पाळतात'. एके रात्री दिवट्या-मशालींच्या उजेडात ती टोळी नाच करू लागते. या नागर सभ्यतेला तो भीषण नाच असह्य होतो. त्याची खजिलवाणी स्थिती बघून टोळीवाले त्याच्यापुढे `व्हा व्हा ह्या ह्या' करून जीभ लोंबवत नाचतात, चिडवतात. एका क्षणी तो त्यांना प्रत्युत्तर म्हणून तसेच आवाज काढत त्यांच्या अंगावर धावतो. त्यामुळे फेर धरून नाचणारी भीषणता फार आनंदित होते कारण हा भला माणूस आपल्यातला झाला असे त्यांना वाटते. याउलट अविवेकी संतापाच्या भरात त्या माणसाचे रानटी भेसूरणे सहज समजाच्या लोकांची सहानुभूती मिळवते. जेव्हा कधी असे दृष्य कोणा चित्रपटाने घेतले तेव्हा त्यांच्यासमोर अण्णा हजारेंच्या राजकारणी प्रवेशाबद्दल व्यक्त होत असलेल्या प्रतिक्रिया नसाव्यात. पण सद्यस्थितीमुळे कोणत्याही नाटकसिनेमात तशा आशयाचे दृष्य पाहणाऱ्या प्रेक्षकांना त्याची आठवण होईल.

राजकारण सुधारले पाहिजे यात शंका नाही, त्यासाठी संघर्ष अटळ आहे पण त्यासाठी हाती असणारी पाच पंचवीस लोकांची कुमक गर्दीस मेळवण्याचा प्रकार होऊ नये. अण्णा हजारे आंदोलनाच्या वेगाने लोकशाहीत परिवर्तन होण्याची शक्यता पटत नाही. हिटलरशाहीने किंवा स्टॅलिनशाहीने देशाला खूप वेगात पळवले हे खरे असले तरी त्या वेगाने जे पायी चिरडले गेले त्याचा विचार आपल्या इथे परवडणारा नव्हे. आजच्या ऑलिंपिकमधून चीन पदकांची पोतडी भरत सुटला आहे पण त्यासाठी त्या खेळाडूंना वेठबिगारी भोगावी लागते असे वृत्तांत आहेत. तसे काही भारतात घडू शकत नाही. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांचा अनुभव, कौशल्य आणि कुवत यांचे मूल्यांकन भारतीय सामाजिक भूमिकेशी ताडून पाहणे उचित होईल. त्यावरून अराजकीय सामान्यजनांच्या गटास अण्णा हजारेंच्या राजकारणप्रवेशाची चिंता का वाटते तेही स्पष्ट होईल. अण्णांच्या उपोषण-रॅलीत सामील झालेले तात्पुरते मेणबत्ती-बहाद्दर हा काही देशविकासाचा पर्याय ठरू शकणार नाही हेही समजून घेणे योग्य होईल. लोकशाहीत लोकशाही पद्धतीनेच बदल घडवावा लागतो. त्यासाठी लोकांची प्रवृत्ती (अॅटीट्यूड) बदलावी लागते, त्यास प्रदीर्घ काळातील प्रयत्नांचे सातत्य आवश्यक असते. मेणबत्ती मोर्चा किंवा अण्णा आंदोलनाचे जंतरमंतर हा केवळ एक प्रारंभ आहे. त्याची वाटचाल होण्यातच काही पावले राजकारणात फसली तरी शासकीय प्रकल्प भूमीपूजनाच्या दगडी पाटीवरच थांबतो तसे घडेल. बाकी हा नवा पक्ष, त्याची घटना, धोरणे, पैसा, कार्यपद्धत वगैरे चर्चा आजच करण्याचे कारण नाही. परिवर्तनाची आशा उद्यापरवाच फलदायी ठरेल अशी भाबडी घाई करण्यासारखेच ते होईल.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन