Skip to main content

Lekh in 20 Aug.2012


श्रावणमासी... संकल्प मानसी!
 - विनिता तेलंग, सांगली

चतुर्मास हेे व्रतवैकल्ये-सणवारांचे दिवस. पूर्वी पावसाची संततधार असल्याने फिरस्त्या साधू-बैराग्यांनीही या काळात एका स्थानी राहून साधना करावी असा संकेत होता. दिवस बदलले, निसर्ग बदलला, जीवनव्यवहार बदलले आणि हळूहळू `शास्त्रा'वर `सोयशास्त्र', `सवडशास्त्र' मात करू लागले. सेकंड सॅटर्डेला मंगळागौरी होऊ लागल्या आणि बाप्पांचे आगमन-विसर्जनही सुट्टीनुसार होऊ लागले. जुन्या मंडळींना सगळे साग्रसंगीत व्हावे असे वाटते तर आताच्या नव्या पिढीला मुळात हे कशासाठी, हेच माहिती नसल्याने ते सगळे अवडंबर वाटते. मधली पिढी त्यातल्या त्यात मध्यममार्ग काढू पाहते.
हा मध्यममार्ग म्हणजे काय? गुरुजी व यजमान दोघेही खूप `बिझी' म्हणून पूजा शॉर्टकटमध्ये `उरकणे'? कितीतरी व्रते, परंपरा, पूजा निव्वळ चालू ठेवल्याचे समाधान म्हणून कशातरी उरकल्या जातात; मग ते पाहून नव्या पिढीला त्यातून काही घ्यावंसं वाटत नाही. कधीतरी `हे आपण कसे शास्त्रशुद्ध करतो' हे ठसविण्यासाठी बारीकसारीक शास्त्रे काटेकोरपणे पाळली जातात, ती नव्या लोकांना जाचक वाटतात!
या सगळया व्रतांच्या मागच्या हेतूला जाणून घेता आलं तर आताच्या परिस्थितीनुसार ही व्रते-सणवार थोडे `मोल्ड' करता येतील. काय साध्य करायचे हे माहिती करून घेतले की तो भाव, ती वृत्ती, ते गुण तपासून पाहता येतील. संयम, निश्चय, शांतता, स्थिरता, समाधान, विचारांची शुद्धता असे मनाच्या जोपासनेसाठी आवश्यक गुण आणि आहार विहार यातून शरीराची शुद्धता साध्य होईल. या निमित्ताने समाजात मिसळणे, सर्वांनी मिळून मिसळून सणवार, कुळाचार साजरे करणे यातून कामांचे नियोजन, सर्वांना सांभाळून घेणे, ठरलेल्या क्रमाने, वेळेला सर्व गोष्टी `साग्रसंगीत' करणे म्हणजे `इव्हेंट मॅनेजमेंट'चे ट्न्ेिंनग होते.
गोकुळाष्टमीची धूम सगळीकडे जोरात झाली. श्रीकृष्णाचे सगळे जीवन आजही आदर्श आहे. पण आम्ही त्याचा `देव' केला आणि दहीहंडी, रासक्रीडा किंवा थेट भगवद्गीता यातच त्याला बंदिस्त ठेवला. लहानपणापासून कृष्णाच्या वागण्यात सामाजिकता दिसून येते. `गोपाळकाला' ही कल्पना खरेतर किती हृद्य आहे! आपापली गुरे घेऊन यमुनेवर गेलेले गोपाळ दुपारी आपापली शिदोरी खायला एकत्र बसत. सर्वांच्या शिदोऱ्या छान छान थोड्याच असणार? कृष्णापुढे आपली शिदोरी सोडायचीही काहींना लाज वाटे. ते ओळखूनच सुरू केला `गोपाळकाला'. जे काही असेल ते सर्वांनी मधे ठेवायचं - एकत्र करायचं. तुझं-माझं न म्हणता हसत खेळत मिटक्या मारत जेवायचं! त्याचा डबा `भारी', माझा `साधा' हे मनावरचं दडपण गेलं. या प्रतीचा आनंद आमच्या मुलांना आम्ही देतो का? `सर्व प्रकारच्या मित्रांमध्ये तू मिसळलं पाहिजेस, त्यांच्या खाण्याच्या पद्धती, पदार्थ यांचाही आदर केला पाहिजेस' असं आम्ही सांगतो का? शाळा निवडतानाच आम्ही `क्लास' पाहून निवडतो. समाजाच्या सर्व स्तरातील मुलं एकत्र नाहीत. घरी खेळायला जातानाही आपल्या `स्तरा'चे मित्र करणार, मग मूळ `समाज' पाहणार कधी? `श्रेष्ठत्व हे गुणांवर असते, पैशांवर, वस्तूंवर नाही' हे त्यांच्या मनात ठसवायला नको का? `उगीच कुणाला काही देत बसू नकोस, तुझा डबा तूच खा' किंवा `अॅपगार्डचं पाणी देते मी तुला, मूर्खासारखं कुणाला तरी देऊ नकोस तुझं पाणी..' यामागची आईची काळजी समजू शकते, पण अशीच काळजी मूल आत्मकेंद्री होतंय का यासाठीही आईला वाटायला हवी.
आताच्या समाजाचे सगळे वेळापत्रक, राहणीमान, प्रश्नही वेगळे आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरिता ही व्रतवैकल्ये आपल्याला वापरता येतील का? कधीतरी आपला व मुलाचा वेळ काढून सगळया बाळगोपाळांना घरी एकत्र आणणं (बर्थडेसाठी हॉटेलमध्ये नव्हे) अशा गोष्टीने खूप काही साधता येतं. अट फक्त एवढीच की टीव्ही, मोबाईल, व्हिडीओ गेम वगैरेला बंदी. मुलांना स्वातंत्र्य दिलं तर, आहे त्या साधनांतून वेळ घालवण्यासाठी मुलं खूप कल्पनाशक्ती वापरतात. मुलांमधील `क्रिएटिविटी' वर आणण्यासाठी त्यांना खूपसा मोकळा वेळ, थोडंसं स्वातंत्र्य आणि आधुनिक साधनांचा अभाव एवढं आपण द्यायला हवं. सतत टीव्हीवरच्या विकृत, चमकदार जगात रमलेल्या मुलांना ठरवूून एक दिवस टीव्ही न पाहता कुशीत घेऊन गोष्टी सांगा, वाचून दाखवा. तुमच्या लहानपणीच्या गमती सांगा - त्यांना बोलतं करा. हे `व्रत' म्हणून करायला हवं.
पुष्य नक्षत्रावर सोनाराच्या दुकानांत झुंबड उडवणारे आम्ही, गावात ग्रंथप्रदर्शन आलं तर मुलांना घेऊन निवांतपणे पाहायला जातो का? पूजेसाठी भाराभर पत्री ओरबाडून वा विकत आणून घालतो, पण त्या वनस्पतींचे उपयोग माहिती करून घेणं, ती माहिती संकलित करून इतरांना वाटणं, निदान सर्दी-खोकल्यासाठी अॅन्टीबायोटिक्सचा मारा करावा लागणार नाही इतपत घरगुती औषधांची माहिती करून घेणं आणि ती वापरणं, अशीही `वाणं' `संकल्प' करता येतील!
`उपवास' या संकल्पनेला आपण पुरेसं हास्यास्पद केलंच आहे. चित्तशुद्धी आणि पचनसंस्थेला विश्राम या दोन्ही गोष्टी साधतील हे महत्त्वाचं मानून आपल्या सोयीचा दिवस व सोयीचा `मेनू' खुशाल निवडावा. पुढे जाऊन `यंत्राहारी' मानवाने एक दिवस यंत्रे वापरणार नाही, एक दिवस (निदान फोनवर) बोलणार नाही, एक दिवस तरी टीव्ही पाहणार नाही असे खूप संकल्प करता येतील, करायला हवेत. एक दिवस मांडी घालून जेवायला एकत्र बसणे, भोजनमंत्र म्हणून सुरुवात करणे, पानात वाढलेले सगळे खाणे, टीव्हीपुढे बसून न खाणे असे एखादे मासिक व्रत मुलांनाही देऊन पहा.... त्यात थोडी गंमत, थोडं चॅलेंज निर्माण करता आलं तर मुलंही चढाओढीनं करतील!
वयाने मोठे किंवा लहान असूनही सतत विविध गोळयांची आचमने घ्यावी लागतात अशांनी डॉ.अभय बंग यांच्या `साक्षात्कारी हृदयरोग' किंवा डॉ.अरविंद बावडेकर यांच्या `क्रॅन्सर माझा सांगाती' यांसारख्या पुस्तकांच्या पारायणाचे `सप्ताह' करावेत. अर्थात त्यातल्या किमान काही गोष्टी प्रयत्नपूर्वक आचरणात आणण्याचा संकल्पही सिद्धीस न्यावा. निदान चतुर्मासात सिग्नलला वाहन बंद करेन, उगीच हॉर्न वाजविणार नाही, उगीचच फोन करणार नाही, यादी करून कामे लक्षात ठेवण्याची सवय लावेन, गॉसिपला उत्तेजन देणार नाही... अशी आपापल्या सोयी, गरजे व कल्पनेनुसार छोट्या छोट्या संकल्पांची भरपूर यादी करता येईल व आवाक्यातले संकल्प करून ते पाळले तर भरपूर समाधान व आत्मविश्वासही मिळेल!
पूर्वीच्या कथांमध्ये `खलुभर दुधाने गाभारा भरणे' किंवा `चुकून शंकराचे नाव घेतले गेले व तो प्रसन्न झाला' यामागे देखील खूप अर्थ आहे. त्या अर्थासहित या कहाण्या नव्याने वाचायला हव्यात. मनाचा सच्चेपणा, मुलाबाळांना पोटभर घालून मग देवाला नेण्यातलं `रॅशनल थिंकींग' चुकून झालं तरी `सत्कृत्या'तलं फळ चांगलंच मिळतं या मूल्यावरचा विश्वास, त्याग, मदत या गोष्टी `नकळत' झाल्या तरी ती मूल्यं उदात्तच आहेत हेच ठसवायचं असेल! असं प्रत्येकाला खूप काही `सापडू' शकेल!
दैववादाकडून प्रयत्नवादाकडे जाणं, वरवरच्या, दिखाऊ धार्मिक कुलांपेक्षा आचरणातील शुद्धतेला, वागण्याच्या पद्धतीला, त्यातून दिसणाऱ्या मानवतेला महत्त्व असणं, चांगली मूल्यं, चांगले विचार, चांगल्या सवयी प्रत्यक्ष आचरणातून प्रदर्शित होणं यासाठी श्रद्धेचा आधार घ्यायला हवा. माणसाच्या उत्क्रांतीतील आता वैचारिक, भावनिक, सामाजिक उत्क्रांतीच्या या टप्प्यावर आपण चांगल्या प्रथांचं पुनरुज्जीवन नीट विचारपूर्वक करायला हवं. त्यातील कर्मकांडाचं वा शॉर्टकटसचं, दिखाऊपणाचं तणकट काढून.
अधिक महिना आला आहे. श्रीकृष्णाने पांडवांना वनवासाच्या काळात सांगितलेली कथा. दर तीन वर्षांनी येणारा हा महिना. खरं तर सूर्यचंद्राच्या गती - निसर्गाचं चक्र व मानवी बुद्धीने केलेली कालगणनेची रचना यात पडणारं अंतर `सावरून' घेणारा हा महिना. पण त्यात `सूर्यसंक्रांत' नसल्याने त्याला `मल'मास म्हटले गेले व म्हणून सर्वांनी त्याला अमंगल, अशुभ ठरवले. तो निंदा व तिरस्काराचा विषय झाला. त्यात कुणी शुभकार्ये, सत्कृत्ये करीनात. तो बिचारा दु:खी होऊन गेला. श्रीकृष्ण म्हणाले, ``तसे असेल तर आजपासून मी तुला माझे म्हणतो. गुणांनी परिपूर्ण असल्याने मला `पुरुषोत्तम' म्हणतात ते नाव मी तुला देतो. हा महिनाही जगतास वंद्य होवो. या मासात व्रतनियमांचे पालन करणारा मोक्षसुखास प्राप्त करेल. याचा तिरस्कार, निंदा करणारे नरकवास भोगतील'' - पहा बरं `याचा' म्हणजे जे पतित, तिरस्करणीय, अमंगल समजतो त्या सर्वांचा आदर सत्कार करणे, हेच महापुण्य असे भगवान सांगतात! प्रत्यक्ष व्रते काय सांगितली आहेत ते  `अधिक मास माहात्म्य'. त्यात असा स्पष्ट उल्लेख आहे की स्वार्थी, आत्मकेंद्रित माणसाला यथाशक्य त्यागाची वृत्ती जोपासता यावी, यासाठी हे व्रत! त्यातही एकदाच जेवणे, फक्त फळे खाणे, एकच धान्य खाणे, मीठ न खाणे, एक एक पदार्थ वर्ज्य करणे, चटईवर झोपणे, मौन पाळणे, प्रवास न करणे, रोज काहीतरी बाजूला काढणे, उत्तेजक पदार्थ-कृती वर्ज्य करणे, परनिंदा क्रोध टाळणे अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या दिसतात. यथाशक्ती अशी एखादी कृती निश्चयाने पाळून आपले मानसिक बल `अधिक' करावे. भुकेलेल्या, दीनदुबळया, आजारी वा असाहाय्य लोकांना दान करावे असा स्पष्ट निर्देश आहे. आपला प्रिय जावई वा पुरोहित या व्याख्येत बसत असला तर त्याला खुशाल अनारसे भेट द्या, अन्यथा जरा गंभीरपणे या दानधर्माचा, जेवणावळींचा फेरविचार करता येईल का?
परमेश्वराची साधना अवश्य, निष्ठापूर्वक करावी. आपली एखादी वाईट गोष्ट सोडावी, एखादी चांगली सवय निश्चयपूर्वक लावून घ्यावी, पाठांतर, वाचन, चिंतन करावे. जीवनव्यवहार सुधारणे हे ध्येय ठेवावे व सर्व कर्मे त्याला अर्पून आपण पुन्हा निर्लेप मनाने कार्यप्रवण व्हावे, दान देताना भान ठेवावे असा अर्थ व्रतवैकल्यांचा असतो. अधिक मासासह चतुर्मासात तो खरा अर्थ समजून घेण्याचे व्रत करूया.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन