Skip to main content

Lekh on Aeroplanes


विमानगाथा

क्रॅप्टन आनंद जयराम बोडस यांनी तीस वर्षे व्यवसायिक वैमानिक म्हणून नोकरी केली. परदेशी विमानसेवा, खाजगी विमानसेवा, शासकीय विमानसेवा, संरक्षणदल विमानसेवा आणि वैमानिक प्रशिक्षण संस्था अशा विविध विभागांत वैमानिक आणि विमानउड्डाण प्रशिक्षक म्हणून ते कार्यरत राहिले.विमान व्यवसाय सल्लागार म्हणूनही कार्य करतात. या कार्याच्या बरोबरीनेच समर्थ रामदास स्वामींच्या साहित्याचा अभ्यास, सनातन धर्मातील विज्ञानाचा अभ्यास सातत्याने सुरू आहे.
`विमानगाथा' या नागरी विमान व्यवसायाविषयीच्या परिपूर्ण व भारतीय भाषांतील एकमेव ग्रंथास महाराष्ट्न् शासनाने २०००-२००१ या वर्षासाठी उत्कृष्ट वाङ्मयासाठीचा `सी.डी.देशमुख पुरस्कार' देऊन गौरविले. त्या पुस्तकातील काही अंश...

उन्हापावसाच्या त्रासापासून आपला बचाव करण्यासाठी आपण छत्रीचा वापर करतो. लोकांना परवडेल अशा किंमतीला मिळणारी मजबूत बांधणीची, थोड्या आकर्षक स्वरूपाची छत्री लोकप्रिय होते. परंतु जर कोणी चांदीचा दांडा असलेली, सोन्याची मूठ असलेली, मखमली कापडावर खऱ्या जरीचे भरतकाम असलेली छत्री निर्माण केली, तर अशी छत्री स्वत:च्या पैशाने विकत घेणाऱ्यांची संख्या फार नसते. आर्थिक नुकसान सहन करून जरीच्या छत्रीचा कारखाना व विक्रीव्यवसाय बंद करावा लागतो.
जरीच्या छत्री व्यवसायासारखी स्थिती भारतातीलच नाही, तर सर्व जगातील नागरी विमान वाहतूक व्यवसायाची झाली आहे. विमान वाहतूक संस्था या शासकीय वा खासगी मालकीच्या आहेत. या विमान वाहतूक संस्थांच्या सुरुवातीपासूनच त्यांची आखणी करताना, विमान वाहतूक व विमान याविषयीच्या उल्लेखित प्राथमिक संकल्पना, अपेक्षा विसरल्या गेल्या. या लोकाभिमुख - `सर्व लोकोपयोगार्थ' संकल्पनेकडे काणाडोळा करून फक्त धनवान, श्रीमंत व उच्च पदस्थांसाठीच विमान वाहतुकीची आखणी केली गेली. भारतातच नाही तर सर्व जगातील लोकसंख्येत श्रीमंत व धनिक मंडळी दहा टक्क्यांहूनही कमी आहेत, हे अर्थशास्त्रीय सत्य विसरले गेले. मध्यम, उच्च मध्यम म्हणजेच - अर्ध श्रीमंतवर्ग हा समाजात मोठा असतो याकडे काणाडोळा करून नागरी विमान वाहतूक व्यवसायाची आखणी झाली. या प्रकारची आखणी करणाऱ्यांचा समाजाच्या मोठ्या संख्येच्या वर्गाशी संपर्क नव्हता. त्या वर्गाच्या गरजा, त्यांची वैयक्तिक व्ययशक्ती व त्यांचे सामूहिक संख्याबळ याकडे आपल्याच मस्तीत राहून दुर्लक्ष करण्यात आले. हवेतून मार्गक्रमण करणाऱ्या प्रवासी वाहतुकीसाठीच्या `वाहनाचा' उडता राजवाडा अथवा उडते पंचतारांकित हॉटेल करण्याचे अव्यवहारी काम करण्यात आले. हवेतून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनाची म्हणजे विमानाची सुरक्षिततेची गुणवत्ता, त्यातील परिचालनतंत्र, मार्गक्रमण पद्धतीतील अचूकता, या सर्वांवरील संशोधन, आधुनिकता, देखभाल याविषयीचा खर्च अत्यावश्यकच असतो. तसेच प्रवाशांना व विमानकर्मींना त्रासदायक होणार नाही व त्यांच्या प्राथमिक-शारीरिक गरजा भागवू शकेल अशी व्यवस्था असलेला प्रवासी कक्ष हीसुद्धा एक आवश्यक बाब असते. परंतु उडत्या प्रवासी वाहनाला उडता राजमहाल करण्याच्या खुळचट प्रयत्नात अत्यावश्यक व आवश्यक खर्चाहून अधिक खर्च `प्रवासी सुविधा' या गोंडस नावाखाली होऊ लागला.
विमानातील प्रवासी कक्षात कार्यकर्तव्य करणाऱ्या महिला-पुरुष कर्मचारीवर्गाचे गणवेश ख्यातकीर्त वस्त्रप्रावरण तज्ज्ञाकडून तयार करून घेण्यात येऊ लागले. त्या गणवेशाचे कापड व त्याचे डिझाईन कोणत्याही बाजारात पहिली दोन वा तीन वर्षे येतच नसे. अर्थात, अशी व्यवस्था करायला एअरलाइनला कापड निर्मात्यांना कितीतरी पटीने जास्त किंमत मोजावी लागे. आपल्या भारतात एकोणीसशे पासष्ट ते पंचाहत्तरच्या सुमारास फारसच प्रसिद्ध असलेल्या `साडी' निर्माण करणाऱ्या गिरणीतून आपल्या शासकीय मालकीच्या हवाई वाहतूक संस्थेतील `एअर होस्टेस' पदावरील महिलांसाठी खास रंगसंगतीच्या साड्या बनवून घेतल्या जात. त्या प्रकारच्या साड्या बाजारात पुढील तीन वर्षे येऊ नयेत या अटीसाठी  साडींची किंमत पाचपट जास्त दिली जात होती. मुंबई ते पुणे पंधरा ते वीस मिनिटे, मुंबई ते वडोदरा-अहमदाबाद फार तर एक तास, मुंबई ते दिल्ली एक तास पन्नास मिनिटे अशा विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना आवश्यक आहे की किंवा दैनंदिन व्यवहारात तेवढ्या लहान कालावधीत कोणी व्यक्ती खरोखरच तोंड चाळवते का? याचा विचार न करता हवाई प्रवाशांना शाकाहारी व मांसाहारी अल्पोपहार वा भोजन दिले जाते. त्या अगोदर फळांचा रस, शीतपेय नंतर चहा-कॉफी यांचा भडिमार केला जातो. विमानात दिल्या जाणाऱ्या अल्पोपाहार वा भोजनाचा पुरवठा `फ्लाइट किचन' नावाने विशेष व्यवस्थापन करते. एका अल्पोपाहाराला अंदाजे दोनशे रुपये, भोजनासाठी अंदाजे चारशे रुपये एअरलाइन्सकडून फ्लाइट किचनला दिले जातात. एअरलाइनचे व्यवस्थापन व फ्लाइट किचनचे व्यवस्थापन यातील साटेलोटे, हिशोब हा वेगळाच संशोधन विषय आहे. आंतरराष्ट्नीय विमान प्रवासात प्रवाशांना फार वेळपर्यंत प्रवास करावा लागतो. त्यावेळी अल्पोपाहार वा भोजन दिले जाणे समजण्यासारखे आहे. परंतु ही भोजन व्यवस्था किमान आवश्यक अशी करण्याऐवजी भारतीय, चायनीज, कॉन्टिनेन्टल अशा पद्धतीची म्हणजे `हवाई डोहाळेजेवण' पद्धतीची असते. आवडी-निवडीप्रमाणे महागडे मद्य, फळांचे रस, आईस्क्रीम, केक्स, नाना प्रकारचे चीझ व चॉकलेटचे प्रकार याचा पुरवठाही त्या उडत्या पंचतारांकित हॉटेलात केला जातो. वर्णन केलेले सर्व पदार्थ विमानात ठेवण्यासाठी खास जागेची सोय करावी लागते. त्या पदार्थांना, त्यांच्या भांड्यांना वजन असते. याचाच अर्थ त्यासाठी प्रवासी आसनांची संख्या कमी करावी लागते.
हवाई प्रवाशांना आवडीनिवडीप्रमाणे संगीत ऐकण्याची सोय असते. प्रत्येक प्रवाशाला वेगळा दूरदर्शन संच देऊन अनेक वाहिन्या बघण्याची सोय असते. या सर्व व्यवस्थेला अफाट खर्च येतो. ही व्यवस्था विमानात बरी जागा व्यापते. मोठ्या विमानात जेथे तीन आसने राहू शकतील एवढ्या जागेत प्रथम श्रेणीच्या आठ-नऊ प्रवाशांना पत्ते खेळता येतील वा थोडा व्यायाम करता येईल, त्यांच्या शरीराला `मॉलिश' करून घेता येईल, अशा सोयी असलेला भाग असतो. `एअर इंडिया'च्या विमानात हा प्रकार करण्यात आला होता. पुढे तो बंद करण्यात आला. आता परत एकदा केरळीय आयुर्वेदिक पंचकर्म उपचार विमानात उपलब्ध करण्याचे कारस्थान शिजत आहे. या सर्व `प्रवासी सुविधा' म्हणजे श्रीमंती चोचले व लाड पुरवण्यामुळे विमान प्रवासाचे भाडे प्रचंड प्रमाणात वाढते-वाढले जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या  वेतन मागण्या वाढतात, त्या पूर्णही होतात. याचा अंतिम परिणाम म्हणजे विमानप्रवास म्हणजे समाजातील श्रीमंत म्हणजे फक्त पाच ते आठ टक्के लोकांची मक्तेदारी होते. `सर्व लोकोपयोगार्थ' या संकल्पनेचा व `हवाई वाहन' या संकल्पनेचा बोजवारा उडालेला असतो. या सर्व अनावश्यक सोयीसुविधांना इंग्रजीत `फ्रिल' म्हणजे नाजूक जरतारी नक्षीकाम असे म्हणतात. विमान म्हणजे `उडता राजवाडा' झाल्यामुळे जवळजवळ सर्व एअरलाइन्स तोट्यात आहेत. साध्या छत्रीची `जरीची छत्री' झाल्यामुळे मोठा गोंधळ झाला आहे.
या सर्वांवर उपाय म्हणजे `नॉन फ्रिल' एअर लाइन. सर्व अनावश्यक चोचल्यांना काट देऊन `विमान' वाहन म्हणून उडवायचे आणि प्रवासी वाहतूक करायची. त्यामुळे चारशेचे तिकीट एकशे एेंशीमध्ये विकता येते. एकोणीसशे सत्तरच्या दशकात ही `नॉन फ्रिल' एअरलाइन्सची संकल्पना `स्कायट्न्ेन' नावाने इंग्लंडमध्ये कार्यरत झाली. त्याचा जनक होता `फ्रेडी लेकर' नावाचा वैमानिक. बोइंग ७०७, बोइंग ७४७ सारख्या विमानांचा मोठा ताफा बाळगून फ्रेडी लेकरने `स्कायट्न्ेन' यशस्वी केली.
भारतातही १९७८ सुमारास `नॉन फ्रिल' प्रकारातील जिल्ह्याजिल्ह्यांना जोडू शकणारी `वायुदूत' नावाची हवाई सेवा असावी, असा आराखडा केंद्र शासनाने मंजूर केला होता. दुर्दैवाने केंद्र शासनातील दिल्लीश्वरांच्या सग्यासोयऱ्यांनी त्या नॉन फ्रिल एअरलाइनची जरीची छत्री करून टाकली. `वायुदूत'चे वायुभूत झाले. चार वर्षांपूर्वी ती संस्था बंद करण्यात आली.
`नॉन फ्रिल' एअरलाइन प्रकाराने ब्रिटनमध्ये परत जोर धरला आहे. `गो जेट' आणि `इझी फ्लाय' या दोन हवाई वाहतूक संस्था नॉन फ्रिल तत्त्वाने चालू झाल्या आहेत. जनताप्रिय होण्यासाठी प्रवास शुल्क  अगदी कमी असल्याने त्यांचे नफ्याचे प्रमाण अतिअल्प असले तरी नफा होतो आहे. याच्या विरुद्धचे चित्र म्हणजे `स्विस एअर' नावाची अति प्रख्यात, भयंकर महागडी जरीची छत्री आपल्या कर्मचारी वर्गाचे पगार न देता, जागांची भाडी बुडवून एका रात्रीत `बंद' झाली. मुंबई विमानतळावर `स्विस एअर'चे कर्मचारी आपल्या कंपनीचे विमान चार तास उशिरा येत असल्याविषयी चर्चा करत असताना कंपनी बंद झाल्याची जरतारी बातमी आली. असाच प्रकार आपल्या `एअर इंडिया' विषयी आहे. त्यांचा फाटक्या कपड्यांतील `महाराजा' आपल्याला कोणीतरी विकत घेईल या प्रतीक्षेत उभा आहे. तो नफ्यात असल्याचे खोटे हिशेब प्रसिद्ध करूनही ती जरीची छत्री विकली जात नाही. हिंदुस्थानात नॉन फ्रिल एअरलाइनच यशस्वी होईल. कारण आपल्याकडे उच्च मध्यम व मध्यमवर्ग संख्येने मोठा आहे. हा वर्ग बुद्धिजीवी आहे. तो जरीची छत्री विकत घेत नाही. त्याला हवी असते मजबूत, सरळ दांड्याची साधी छत्री. कडक खळ घातलेली धोतरे नेसून पंचतारांकित हॉटेलात बसून गरीबीची चर्चा करणाऱ्या दिल्लीश्वरांना `नॉन फ्रिल' एअरलाइन पचणार नाही. त्यांना जरीची छत्रीच आवडते.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन