Skip to main content

sampadkiya in 27 Aug.2012


झळा अंगाला भिडणार
दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. धान्य व शेतीउत्पन्नावर परिणाम होणार हे तर उघडच आहे पण त्याचे आनुषंगिक परिणाम म्हणून पाणी, वीज यांची टंचाई आणि महागाई-चोरीमारी, बेरोजगारी असेही प्रश्न उभे राहणार आहेत. काही राजकीय नेतेमंडळींच्या वल्गना आणि दुष्काळातसुद्धा हातमारीची कंत्राटे हीसुद्धा पीडित जनतेला मनस्ताप देणारी समस्या ठरणार आहे. दुष्काळाचे संकट केवळ आपल्यावर असल्याचे कुणीच मानू नये. जिथे पावसाचे प्रमाण त्यातल्या त्यात ठीक होते, तिथेही आजची पीकस्थिती गंभीर आहे. पंजाबसारख्या गव्हाच्या राज्यात ३० टक्के पाऊस झाला आहे आणि अमेरिकेतही दुष्काळाने कृषि उत्पन्न घटले असल्याच्या बातम्या आहेत.

या सगळया जागतिक स्थितीचे खापर आता निसर्गावर फोडले जाईल. आषाढी एकादशीला शासकीय पूजा करून मुख्यमंत्र्यांनी देवाकडे चांगल्या पावसाची मागणी केल्याचे पेपरवाल्यांस सांगितले. या धर्मनिरपेक्ष राज्यात सश्रद्ध मुख्यमंत्र्यांची ही मागणी म्हणजे त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केलेली दुष्काळी पॅकेजची मागणी नव्हे; त्यामुळे त्यास पांडुरंगाने प्रतिसाद दिला नाही. दिल्लीत एकदा अनुदान-मागणीसाठी जाऊन आले की, विमानाची शिडी उतरताना गुदगुली हसत हाताची बोटे उंचावत `व्ही' दाखविण्याइतके निदान कर्ज-पॅकेज मिळते. पण अधिकृत मागणी नोंदवूनही विठ्ठलाने तिला वाटाण्याच्या अक्षता दाखविल्यामुळे आता सरकारला तरी दोष कसा देणार? विरोधी पक्षांना मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी दुष्काळाच्या प्रश्नावरून करण्याची रोजगार हमी तरी मिळाली; आणि विधानसभेत हजर न राहता मस्टर कारकुनाला सांभाळून वाढीव दराने मजुरी ओढण्याची रीत दुष्काळात तर माफच असते!

संकटावर मात करण्यासाठी एकदिलाच्या नियोजनाऐवजी जागतिक तापमान आणि आधुनिक जीवनशैली यांना भोंगळपणी जबाबदार धरले जाईल. आधुनिकता थांबविणे हे आता कुणाच्या देवाला शक्य नाही. आधुनिकतेने फेकलेला कचरा आणि धूर असमतोल करतो हे तर गेली कित्येक वर्षे ऐकिवात आहे पण ते रोखण्यासाठी काही करता येईल अशी शक्यता जवळजवळ नाही. या वास्तवाची जाणीव झालीच तर पुढची पिढी चारदोन टक्के बदलली तर सांगवत नाही; परंतु आजच्या दुष्काळनिवारणाचा उपाय म्हणून रासायनिक खतांना किंवा ट्न्ॅक्टरना सबसिडी देऊन, एवढ्या पुरोगामी निर्णयांच्या आभारासाठी मोठमोठी पोस्टर झळकू शकतील. दुष्काळाचे कारण मानलेली आधुनिकता रडगाण्यापुरती वापरून तीच रेटत राहणारी जीवनशैली दुष्काळ कसा पार करणार, हा काळजीचा विषय आहे.

पूर असो किंवा दुर्भिक्ष्य, त्यांतून ओरबाडण्याची कला अलीकडच्या भ्रष्टाचाराला अवगत झाली आहे; कोणत्याही घटनेचा `इव्हेंट' करण्याचे तंत्र मार्केटिंगला जमू लागले आहे; त्याचप्रमाणे राजकीय निर्णयशक्तीला स्वार्थी धर्मविचारही चिकटविण्याचे निर्ढावलेपण बोकाळले आहे. या तिन्हींस आवर घालण्याची खरी गरज आहे, तो मात्र कोणीच घालू शकत नाही. दुष्काळी कामांतून उघड भ्रष्टाचार चालेल तशी दुष्काळाच्या निमित्ताने पर्यावरण-रक्षणाचाही इव्हेंट करणारी बाजारू दुकाने वाढतील, आणि दुष्काळातील दरोडे-दंगली करणारे कोणत्या जातीधर्माचे होते त्याभोवती राजकारण फिरेल. नैसर्गिक दुष्काळाच्या भीतीपेक्षा अशा मानवी अमानुषतेचे चटके सामान्यजनांस जास्त भेदक असतात. निसर्ग बरसला तर थोडा निदान थंडस्पर्श मिळतो. यंदा मात्र सारी आग अंगाचे पळके काढेल अशा भीतीने आतापासूनच दातांनी ओठ आवळून धरावे लागतील.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...