Skip to main content

Lekh in 13 Aug.2012


आपल्या `पॅकेज' मध्ये ....
गोष्टीतल्या राजकन्येला सात गाद्यांखाली चुकून राहिलेला इवलासा वाळूचा कणही खुपत असायचा, तसं अविस्मरणीय सिक्कीम टूर करून आल्यावर ते वाक्य मला खुपत होतं. टूर कंपनीतर्फे न जाता केवळ प्रवास-निवास यांची आरक्षणे व तिथे फिरण्याची व्यवस्था असे आमचे `पॅकेज' होते. पण गाडी एसी नाही, कम्फर्टेबल नाही, रोज नाश्त्यात ब्रेड-जॅमच का, चहा एकदाच का, अमका पॉइंर्ट दाखवणार होतात त्याचं काय झालं..... या सर्व प्रश्नांना आमच्या टूर कंडक्टरचं एकच उत्तर ठरलेलं - ``आपके पॅकेजमें इतनाही है सर!'' या उत्तराचा सुरुवातीला संताप आला. मग सवय झाली, आणि नंतर नंतर तो एक विनोदच झाला. नंतर नंतर चिल्ली पिल्लीपण `टूर अंकल'ला छळायला लागली, `अंकल, टॉयलेट जाना कितनी बार अलाऊड है? फ्री है या चार्जेबल?''
घरी परतलो. गंगटोकच्या हवेची आठवण काढून उसासे टाकत चहा पीत असताना भाचीचा फोन आला, ``मामी%% मला जॉब लागला. झीफी कंपनी! २.५चं पॅकेज! आणि आत्ता कलकत्ता पोस्टिंग, मग बंगलोर किंवा मुंबई!''
तिची एक्सप्रेस थांबवून मी म्हटलं, `अगं पण तुझं ते परवा मीची कंपनीचं ठरलं होतं ना?''
``अगं हो ना, पण यांचं टोटल पॅकेज एकदम सॉलिड आहे आणि ही आयटी कंपनी आहे ना, म्हणजे मला पुढे मुख्य..''
माझ्या अकाली वृद्ध व चिंतातूर झालेल्या मनाला `मग पुढे...' चा सगळा प्रवास दिसायला लागला. आयटी कंपनीतलं पॅकेज म्हणजे मस्त पगार, पुढं लग्न - जोडीदारही मॅचिंग हवा म्हणून आयटीतलाच - मग कधी ही कलकत्ता - हा पुणे, किंवा तो दिल्ली - ही बंगलोर... पण मग पुढे मुलं वगैरे... काय - कसं होणार बाई हिचं?
`या आयटीच्या नोकऱ्या म्हणजे सोन्याचा सूळच की!' तशी माझी मुलगी म्हणाली, ``अगं आई... कूल... हल्ली मुली सगळं मॅनेज करतात. सगळं तयार मिळतं. बसल्या जागी एका क्लिकसरशी खूपशी कामं होतात. घरी कामाला बायका ठेवता येतात. इतक्या सपोर्ट सिस्टीम आहेत...'' वगैरे. पुढे थांबून (बहुधा माझा चेहरा पाहून) म्हणाली, ``हां, आता फॅमिली लाईफ मिळत नाही, त्यासाठी म्हणत असशील तर इटस् पार्ट ऑफ द पॅकेज! भरपूर पैसा मिळवायचा, त्यांची किंमत असते ती!''
हेही `पार्ट ऑफ पॅकेज' मला खुपलंच. परवा एकीच्या मुलीचं लग्न ठरण्यावरून विषय निघाला तशी एकजण म्हणाली, ``तुला गं कसली काळजी? तुझी मुलगी देखणी, भक्कम नोकरी, पुन्हा एकुलती एक आणि स्वभावानेही चांगली. ती म्हणजे `टोटल पॅकेज' आहे. तिच्यासाठी रांग लागेल बघ!'' बापरे, असंही पॅकेज असतं का! `पॅकेज' सगळया क्षेत्रातच मला दिसायला लागलं! क्लासचं ५वी ते १२ वी विथ सीईटी पॅकेज, मंगल कार्यालयाचं साखरपुडा ते बारसं पॅकेज. हल्ली सुटं - हवं तितकंच असं काही नसतंच का?
आपल्या आयुष्यातही कुठलीच गोष्ट फक्त आपल्याला हवी तशी - तेवढीच मिळत नाही. प्रत्येक गोष्ट येते ती आपलं पूर्ण `पॅकेज' घेऊनच. उच्चशिक्षित मुलांबद्दल अभिमानानं बोलू लागावं तोच त्यांच्या `करिअर'चं पूर्ण पॅकेज समोर उलगडायला लागतं. हेवा करण्याजोग्या नोकऱ्या, पाठोपाठ देखण्या उच्चशिक्षित सुना, पाठोपाठ परदेशी पोस्टींग, मग तिथलं नागरिकत्व. याच दरम्यान त्याच्या वा तिच्या आईवडिलांनी बाळंतपणासाठी स्वखुशीनं वा पिचत नाईलाजानं तिथं जाणं - राहणं. नंतर नातवंडांचं ई-दर्शन व कदाचित शेवटी `अथश्री'किंवा `इतिश्री'मध्ये आईवडिलांनी `आनंदानं'  राहणं! हा या पॅकेजचा अटळ शेवट. चांगलं-वाईट, चूक-बरोबर याचा सवालच येत नाही. पॅकेज म्हणजे संपूर्ण पॅकेजच स्वीकारावं लागतं!
पावसाळा नावाचं निसर्गाचं पॅकेजही असंच आहे. आधी दुष्काळाचे चटके - मग `जनजीवन विस्कळीत'वाला पाऊस - मग जरा `ऋतू हिरवा - ऋतू बरवा' गुणगुणायला लागावं तोच पुराच्या बातम्या - मग आपत्ती व्यवस्थापन कसे नाही यावर चर्चा - उशीरा जाग आलीच शासनाला तर कोरड्या दुष्काळासाठी (फक्त) जाहीर केलेलं पॅकेज. शेवटी `नको नको रे पावसा%%' असं विनवलं तरी जाता जाता द्राक्षे-आंब्याचे नुकसान वा स्वाईन फ्ल्यूची साथ असं एखादं `सरप्राईज बोनस' या पॅकेजमधून निघतंच...!
एकूण काय `हम बेचारे - पॅकेज के मारे' हेच खरं. सिक्कीममध्ये फिरताना आम्ही सतत `हिमालय की गोदमें' राहणाऱ्यांचा हेवा करत होतो. पण तेव्हाही तिथल्या स्वर्गीय वातावरणासोबत येणाऱ्या लॅन्डस्लाईडस्, संपर्क तुटणं, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, मुलांना शाळेसाठी लांबच लांब अंतर चालत जावं लागणं, या `हिमालय पॅकेज'मधल्या गोष्टींच्या विचारानेही धडकी भरत होती.
आपणही मुलं, गाड्या, पगार, घर अशा गोष्टींवरून आपल्या आयुष्याचं पॅकेज दुसऱ्याशी तोलून पाहू नये. कारण त्यांचं पॅकेज दुरून कितीही आकर्षक वाटत असलं तरी त्यातही काही खडतर गोेष्टी असतात, ज्या आपल्याला दुरून दिसत नाहीत. आपण कुठल्या घरात जन्माला यावं इथपासून ते पुढं कदाचित प्रयत्नांच्या - योग्यतेच्या प्रमाणात यश न मिळणं, अशा अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात. आपल्या वाट्याला आलेल्या पॅकेजमधल्या गोष्टीही खरं तर खूप चांगल्या असतात. कधी दोन पावलं मागं जाऊन, थोडं खाली उतरून, लांबून पाहिलं तर आपल्या आयुष्याचं पॅकेजही आपल्याला संुदर वाटू लागतं.
छोट्याशा, साध्याशा गृहिणीपणाच्या `पॅकेज'नं कातावलेल्या माझ्या आयुष्यातल्या अनेक छोट्या पण आनंद देणाऱ्या क्षणांनी समृद्ध झालेलं `पॅकेज' मला आता आपलं, हवंसं वाटू लागलं.. आणि मग पाडगावकरांच्या स्टाईलनं मी गुणगुणू लागले -
लहान असलं - सिंपल असलं तरी
आपलं पॅकेज हे आपलंच असतं...
`इतकंच' आहे म्हणायचं,
की `इतकं%%%' आहे म्हणायचं...
तुम्हीच ठरवा तुमचं पॅकेज
दडवायचं, की मिरवायचं!
- विनिता तेलंग, सांगली

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन