Skip to main content

8 Sept.2014

अचानक प्रगटणारी
राजापूरची गंगा
भारतातील सात पवित्र नद्यांपैकी गंगेला पहिला मान जातो. भगिरथ राजाने गंगेला हिमालयातून भूतलावर आणले म्हणून तिला `भागीरथी' म्हणूनही ओळखतात. राजा भगिरथाच्या अथक तपश्चर्येतून गंगा भूतलावर आली परंतु तिचा प्रवाह अतिप्रचंड वेगवान असल्याने भगवान शंकराने आपल्या मस्तकी जटेमध्ये तिचा स्त्रोत सामावून घेतला. सप्तधारा मार्गाने ती पृथ्वीतलावर अवतरली.
गंगेचा उगम टेहरी गढवालमध्ये समुद्रसपाटीपासून १३,८०० हात उंच गंगोत्रीजवळ एका हिमनगामध्ये झाला. पौराणिक उल्लेखात त्याला `गोमुखी' म्हणतात. यामुन पर्वतापासून नंदादेवीपर्यंत गंगेचे प्रसवन्नक्षेत्र आहे. मंदरगिरी, यामुन, बंदरपूछ, द्रोणागिरी, घौलगंगा, विष्णुप्रयाग, नंदप्रभाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, गंगोत्री, ऋषीकेश, मिरत, रोहिलखंड, पुरुकबाद, अवध, प्रयाग, मिर्झापुर, वाराणशी, बलिया, पश्चिम बंगाल, अलमोडा, राणीखेत, नैनीताल, मध्यप्रदेश, अंतर्वेदी वगैरे भौगोलिक परिसर या प्रवाहाकाठी आहे. वाटेत शोणनदी, गंडकी, कोशी गाग्रा, पद्मा, ब्रह्मपुत्रा तिला येऊन मिळतात व तिचे पात्र महाप्रवण होते. पुढे या विशाल पात्रात मेघना नदी येऊन बंगालच्या उपसागरात ती आत्मार्पण करते. गंगा नदी उगमापासून ते आत्मसमर्पणापर्यंत १५५० मैलांचा भाग समाविष्ट आहे. हुगळी, मारला, रायमंगल, मालंच व हरिघाट ही तिची समुद्राला मिळणारी इतर मुखकमले आहेत.
अशी ही गंगा रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात उन्हाळे गावी १७ व्या शतकापासून अवतरते, असे ऐतिहासिक उल्लेख आढळतात. दोन नद्यांच्या संुदर संगमावर रत्नागिरीच्या पूर्वेला वसलेले हे राजापूर गाव. रस्त्याजवळ उन्हवरे हे गाव, त्याला `उन्हाळे' असेही संबोधतात. या परिसरात गंगामाईचे एक कुंड, परिसरात विविध वृक्षवल्ली आणि लहान-मोठ्या आकाराची इतर १३ कुंडे आहेत. गंगा आली की कुंडे पाण्याचे भरलेली असतात. मूळ काशीकुंड व इतर सूर्यकुंड, चंद्रकुंड, पृथ्वीकुंड वगैरे नावांनी  आहेत. प्रत्येक कंुडातील पाण्याची पातळी भिन्न व तापमानही भिन्न असल्याने ही भूगर्भातील विशिष्ट तापमानाची वैज्ञानिक प्रक्रिया असावी असे वाटते. या पाण्याच्या पृथ:करणावरून हे पाणी गंधकमिश्रित असते. गंगा या कुंडातून येण्यापूर्वी भाताचा कोंडा कंुडातून बाहेर पडतो.
तशी ही गंगा येणे आणि तिने जाणे याबाबत काही निश्चित अंदाज देता येत नाहीत. सरासरी दर तीन वर्षांनी गंगा राजापुरात अवतरते. पावसाचे पाणी जमिनीत जाते, साठते व ते जास्त झाले की भूगर्भातून वर येते असे दिसते. हे पाणी इतक्या वेगात खाली जाते की, गंगा आली म्हणेपर्यंत अनेक वेळा लुप्तही होते. निसर्गाची ही `देणगी' आहे. एकदम अवचित घरी येणाऱ्या महिलेस `आज कशी इकडं राजापूरची गंगा आली' असे आपल्याकडे म्हणतात.
गंगेचे आगमन मात्र ऐतिहासिक आहे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात १६६१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी गंगा क्षेत्रावर भेट दिली. त्यावेळी राजपुरोहित म्हणून रानडे कुटुंबियांना मान दिला गेला. पुढे १६६४ मध्ये गागा भट्ट येऊन गेले. त्यावेळी तेथील स्थानिक वैचारिक मतभेद मिटविण्यासाठी गागाभट्टांनी सामंजस्य केल्याचे इतिहास सांगतो. १७८९ मध्ये कविवर्य मोरोपंत हे त्यांच्या वयाच्या ६० व्या वर्षी राजापुरात गंगेच्या स्नानार्थ आले होते. पुढे १८व्या शतकाच्या प्रारंभी इंग्रज व फ्रेंच अधिकाऱ्यांनी गंगाक्षेत्रावर भेटी दिल्याचे उल्लेख सापडतात. १९१८ मध्ये गंगा आली पण ती गोमुखातून वाहू शकली नाही. पुढे अठरा वर्षे गंगा आलीच नाही. १९३६ च्या जुलै महिन्यात गंगा आली. ती फक्त बारा दिवसच राहिली. १९३८ मध्ये २४ दिवस, १९४२ मध्ये ४५ दिवस आणि तिथून पुढे दर चार वर्षांनी तिचे आगमन होत गेले. १९६० च्या मार्चमध्ये, १९६३ च्या जानेवारीमध्ये व १९६५ च्या ६ मार्चला तिचे आगमन झाले. त्यानंतर पुढे १९७७ पर्यंत परत बारा वर्षांच्या एका तपानंतर तिचे आगमन झाले होते.
१९१८ नंतर जास्तीत जास्त ६६ दिवस, १९०५ मध्ये कमीत कमी १२ दिवस ती राहिली आहे. १९८५ साली ती सव्वा वर्षांनी प्रकट झाली. २००१ साली गुजरात भूकंपानंतर तिचे आगमन झाले होते. १०-२-११ ते ५-६-११ पर्यंतच्या तिच्या प्रकटीकरणानंतर दि.११-४-२०१२ ला गंगा पुन्हा प्रकट झाली. गंगा तशी लहरी आहे. ती आल्याची वार्ता समजताच परिसरात गंगापुत्र व इतर अनेकांची गर्दी जमून यात्रा सुरू होते.
या गंगा स्थानकाभोवती जुनाट चिरेबंदी दरवाजा आहे. तटबंदी, फरसबंदी पायऱ्या आहेत. अद्यापि या गंगा किनारी गंगेची एखादी मूर्ती बनवावी व मंदिराच्या रिकाम्या जागेत एका छायाचित्राची पूजा होते, त्याऐवजी गंगेच्या मूर्तीची स्थापना व्हावी, असे वयोवृद्ध पुजारी रानडे, सप्रे, घाटे या गंगापुत्रांना वाटते. गंगेच्या उगमाबाबत, पाण्यातील गंधक मिश्रित वासाबद्दल, विविध तापमानाबाबत विज्ञानप्रेमींनी गंगेचा शोध घेऊन उलगडा करण्याची आवश्यकता आहे.
- नंदकुमार मराठे,
जीवबानाना जाधव अपार्ट, बाबु जमालच्या मागे,
कोल्हापूर (मोबा. : ९९७५४२९४९४)

उदयो  स्तु
नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात महाराष्ट्न् राज्यात आणि इतर तीन राज्यांमध्ये नवे सरकार यायला हवे. त्यामुळे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकांचा तपशील जाहीर होईल अशी अपेक्षा होती. कदाचित गणेशोत्सवामुळे आचारसंहितेवरच बंधने पडतील असे वाटल्यामुळे हा निर्णय लांबला असावा. नवरात्र चालू होण्यापूर्वी तरी निदान निवडणुका जाहीर होतीलच म्हणजे नवरात्रात तरी देवीला अनाचार भोगायला लागणार नाहीत.

मधल्या काळात प्रथेनुसार इकडून तिकडे बरीच मंडळी उड्या मारू लागली आहेत. आजपर्यंत केेेलेल्या कर्माची नोंद घालत आघाडी सरकार डुरकावण्या फोडत आहे, तर `आता आम्हीच' अशा आवेशात युतीच्या मंडळींत फाटाफूट चालू आहे. सारांश असा की कोणतीच युती किंवा कोणतीच आघाडी एकसंध नाही त्यामुळे जनतेच्या वाटणीला अशा एकसंध कारभाराचा एकसंध परिणाम दिसून न येता,व्यक्तिगत रागालोभाचे हिशोब निवडणुकीच्या काळात उचंबळून येणार एवढाच त्याचा अर्थ.

दहीहंडी आणि गणेशोत्सव ही कोणत्या धर्मातील धटिंगणशाही आहे, याचा भारतातल्या सर्वच धार्मिक लोकांना उलगडा होईनासा झाला आहे. राजकारणाचा प्रभाव प्रत्येक क्षेत्रावर असतोच, हे जरी खरे असले तरी शिक्षण-उद्योग आणि असले उत्सव यातही आता राजकारण कालवू लागले आहे, ही शब्दश: उबग आणणारी गोष्ट झाली. वैयक्तिक कुणाच्या तरी जावळ-बारशाला मंत्र्यांच्या लाल दिव्यांच्या गाड्या गल्लीबोळात आणि वाडीवस्तीवर बंदोबस्त मिरवत फिरत असतात. त्यामुळे जावळ-बारशांमध्येसुद्धा राजकारण कालवण्याइतका कोडगेपणा अंगी बाणू लागला आहे, मग शाळा-कॉलेजातील मुकी बिचारी पोरे आणि मास्तुरे ही तर त्यांची हक्काची प्यादी! गेल्या दोनतीन महिन्यांत ज्या ज्या सार्वजनिक कामांचे फलक रस्त्यारस्त्यांतून लागले आहेत त्यातली किती कामे,- पूर्णतेला राहू द्यात-पण सुरुवातीच्या तरी टप्प्यावर आहेत याची आकडेवारी जाहीर व्हायला हवी. जितका त्या बोर्डाचा खर्च झाला असेल तेवढाच खर्च त्या योजनेवर आतापर्यंत पडला. पुढे तो रस्ता अगर पूल आचारसंहितेच्या नावाखाली रखडत राहील हे सांगायला कोणत्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची, ओव्हरसियरची किंवा कंत्राटदारांचीही गरज नाही. आपण ते गृहीतच धरले आहे. जे सरकार निवडून येईल ती मंडळी रस्ते-पुलावरचा बाकीचा खर्च गिळायला तयार असतील.

निवडणुकांनी इतके जनजीवन व्यापले असेल तर राजकीय सुधारणा कोणत्या तोंडाने मागायच्या असा प्रश्न आहे. आघाडीचे सरकार पडले तरी त्याचे श्रेय युतीवाल्यांना देण्याजोगे नाही. फार तर आघाडीवाल्यांची रडकथा आणि उद्दामपणा यांना ते श्रेय द्यावे लागेल. सध्याच्या सरकारवरचा कमालीचा असंतोष विरोधी पक्षीयांच्या फायद्याचा ठरला, एवढ्यावर त्यांनी मिशीला तूप लावून फिरण्यासारखी स्थिती नाही. कित्येक मतदारसंघात आजच्या विरोधी पक्षीयांना त्यांच्या विचाराचे आणि आचाराचे उमेदवारही मिळणार नाहीत. बुडत्या बोटीतून उड्या मारणारे उंदीर नवा आसरा शोधत आहेत. त्यामुळे अशीही एक शंका डोकावते की, भाळावर दुसऱ्या पक्षाचे कुंकू लावून जुनीच मंडळी नव्या पालखीत बसतील. म्हणजे जनतेच्या बोकांडी यांचाच सासुरवास येणार. ते टाळायचे असेल तर असल्या स्वार्थी उपटसुंभांना त्यांची निवडून येण्याची भले कितीही ताकद असली तरी तिकीट देता कामा नये, किंवा लोकांनीही त्यांची निवड करू नये. नव्या घरोब्याशी त्यांना काही काळ नांदू द्यावे. त्या घरातल्या चालीरिती त्यांना समजू द्याव्यात आणि किती प्रयत्नांनी नव्या घराचा मोठेपणा हे लोक वाढवतात त्याचा अंदाज घेतल्यानंतर मगच त्यांच्या उमेदवारीचा कधीकाळी विचार व्हावा. पक्षांतर करणे हे निवडणुकीच्या काळात पाप नाही. पण केवळ व्यक्तिगत आणि तत्कालिक स्वार्थासाठी ही मंडळी पक्षांतर करतात. त्यांचे नस्ते लाड पक्षाबद्दलची प्रतिमा निखालसपणे डागाळत असते.

अर्थात `कसेही करून सत्ता' ही तर राजकीय पक्षांची अटळ गोष्ट आहे. तेवढ्यापुरता आधार या लोकांचा मिळू शकेल. परंतु पुन्हा त्यांच्या हाती सरकारी जामदारखान्याच्या किल्ल्या सोपविल्या तर तिजोरीची वाट लागणार हे गृहीतक लोकांच्या पचनी पडत नाही. लोक शहाणे झाले आहेत असे अजूनी लोकशाहीच्या दृष्टिकोणातून म्हणता येत नाही. मूकपणे ते नाराजी व्यक्त करतात परंतु त्यांना चांगले काय याचा पर्याय नीट शोधता येत नाही. हे वाईट आहे म्हणून नकोत, इतकेच त्यांचे मत आत्तापर्यंत व्यक्त होत आले आहे. अशा नकारात्मक लोकशाहीने निवडून दिलेले सरकार आघाडीचे असो की युतीचे असो, ते कितपत कार्यक्षम ठरेल याची शंकाच आहे. जे सरकार येईल तेही लोकहिताच्या कोणत्या सद्भावना घेऊन येणार आहे हेही सांगता येत नाही. मूँह में राम, बगल में छुरी हे धोरण दोनही बाजूंचे आहे. एखादा कोणी राजकीय अवतार प्रगट झाला तर तेवढ्यावर आशा करावी अशी स्थिती आहे. महाराष्ट्नत तरी तीही परिस्थिती नाही. त्यामुळे निवडणुका जितक्या लांबतील तितकी दोनही बाजूंना दबावाची अधांतरी स्थिती जाणवत राहील. परंतु कारभार मात्र ठप्प झालेला असेल. नाहीतरी गेल्या पाच वर्षांत वेगळा अनुभव आलेला नाहीच. कारभार ठप्पच आहे, पण सत्ताधाऱ्यांनी बेमुर्वत वागणूक लादली आहे तेवढी तरी आचारसंहितेच्या नावाखाली टळेल.

निवडणुक आयोगाने निवडणुका न जाहीर करता केवळ आचारसंहिता लावावी म्हणजे तरी दोन्ही बाजूंना काही ताळतंत्र राहील, असाही एक विचार येऊन जातो. गणपती उत्सव आचारसंहितेतून सुटला त्याचा किती त्रास झाला हे जनता जाणते. त्यांच्यामागे जे कोणी राजकीय पुढारी असतील त्यांचे विसर्जन करण्याची एक चांगली संधी समोर आहे. त्यांचा आकार कितीही भव्य दिव्य असो, विसर्जनानंतर कदाचित पाण्यात पूर्ण न बुडता त्यांचे विद्रूपीकरण होत राहील, त्यासही हरकत नाही. पण जनतेने निदान नवरात्रात तरी दुर्गावतार धारण केला पाहिजे आणि शक्य झाल्यास निवडणुकीत या राजकीय घातक नरकाचा नाश केला पाहिजे. दसरा, सीमोल्लंघन आणि दिवाळी हा सर्व काळ अनिष्टाचा नाश करण्यासाठी निसर्गाने योजिला आहे. आपल्यासमोर मतदानरूपाने ती संधी आहे.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन