Skip to main content

24 Nov.2014

अमेरिकेतील सुखान्त
अत्यवस्थ झालेल्या माझ्या जवळच्या नातलगाची शेवटची भेट व्हावी म्हणून तातडीने अमेरिकेला गेलो. न्यूयॉर्क येथे पोहोचल्यावर हॉस्पिस (हॉस्पीटल नव्हे) गाठले. ज्या रुग्णांना कुठल्याही औषधोपचारांनी बरे करणे शक्य नसते आणि रुग्णाचा अंतकाळ जवळ आलेला असतो अशांना `हॉस्पिस'मध्ये ठेवतात. अटळ असणारा मृत्यू सर्वार्थाने शांत व्हावा, वेदना न होता यावा यासाठी वेदनामुक्तीच्या उपचाराची सर्व व्यवस्था हॉस्पिसमध्ये असते. अमेरिकेतील हॉस्पिसमध्ये रुग्ण जास्तीत जास्त किती काळ जगण्याची शक्यता आहे, याची स्पष्ट कल्पना रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांना देण्यात येते. स्वच्छ आणि टापटीप असणाऱ्या या हॉस्पिसमध्ये भेटायला जाणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांवर वेळेचे बंधन नसते. रात्री-अपरात्री केव्हाही, कितीही नातेवाईक हॉस्पिसमध्ये जाऊन मरणासन्न रुग्णाला भेटू शकतात. रुग्णाच्या नातेवाईकांची आस्थेने विचारपूस होते. त्यांना कॉफी, केक इत्यादी पदार्थ मिळण्याची आणि विश्रांती घेण्याची स्वतंत्र व्यवस्था असते. हात निर्जंतुक करण्यासाठी ठिकठिकाणी सॅनिटायझर्स ठेवलेले असतात. हॉस्पिसमधील कर्मचारी आणि नर्सेस अत्यंत अदबीने वागतात. रुग्ण मरणासन्न अवस्थेत असल्याने त्याच्या मनाने खचलेल्या नातेवाईकांची काळजी सातत्याने जाणीवपूर्वक घेतली जाते.
आम्ही सकाळी ११च्या सुमारास हॉस्पिसमध्ये पोहोचलो आणि दुपारी आमची ती नातलग निवर्तली. हॉस्पिसमधल्या शांत आणि आरामदायी वातावरणात हळूहळू श्वास मंद होत तिला मृत्यू आला. योग्य प्रमाणात वेदनाशामके दिल्यामुळे मृत्यू येताना तिच्या चेहऱ्यावर अथवा शरीरावर कुठलीही वेदना अथवा घुसमट जाणवली नाही. हॉस्पिसमधील डॉक्टर जवळच होते. त्यांनी व्यवस्थित तपासले आणि `सॉरी' म्हणून मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
पूर्वकल्पना दिलेली असल्यामुळे अंत्यविधी (फ्यूनरल)ची व्यवस्था आधीच करून ठेवली होती. न्यूयॉर्कमधील `फ्यूनरल होम' या संस्थेस अंत्ययात्रेचे कॉन्ट्न्ॅक्ट दिले होते. दु:खाचा आवेग ओसरल्यावर फ्यूनरल होमच्या व्यवस्थापकास फोन केला गेला. काही मिनिटांच्या आत सुटाबुटातील एक तरूण आणि त्याचा साहाय्यक शववाहिका घेऊन आले. त्याने डेथ सर्टीफिकेट ताब्यात घेतले. मृतदेहाचा ताबा घेतला. चेन असलेल्या कापडी बॅगेत मृतदेह काळजीपूर्वक ठेवून तो शववाहिका घेऊन गेला. जाताना त्याने हळुवारपणे सर्व नातेवाईकांचे सांत्वन केले आणि अत्यंत खुबीने पुढील कार्यक्रमाची माहिती दिली.
शास्त्रशुद्ध पद्धतीने मृतदेह स्वच्छ करण्यात आला. काही रासायनिक द्रव्ये शरीरात सोडली गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी काही जवळचे नातलग फ्यूनरल होममध्ये गेले. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी मृतदेहाला चक्क मेकअप केला. मखमली पेटीत पहुडलेला तो मृतदेह एखाद्या बाहुलीसारखा दिसत होता. सुंदर मखमली पेटीत मृतदेह ठेवला होता. ज्या हॉलमध्ये मृतदेह ठेवला होता तो हॉल चांगल्या आसन व्यवस्थेने सजवला होता. फ्यूनरल होमचे सर्व कर्मचारी सुटाबुटात होते. इमारतीच्या समोर सुमारे २०० गाड्या उभ्या राहतील अशी पार्किंगची सोय होती. प्रवेशद्वारावरील दोन तरुणी अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे अदबीने स्वागत करीत होत्या. अमेरिकेतील भारतीय मंडळीसुद्धा सुटाबुटात आली होती. येताना अत्यंत शोभिवंत असे फुलांचे मोठे गुच्छ मृतदेहाशेजारी ठेवण्यासाठी आणत होते. शवपेटीच्या मागे अमेरिकेचा राष्ट्न्ध्वज होता. मंद आवाजात श्रीमद्भगवद्गीतेच्या १५व्या अध्यायाची सीडी लावलेली होती. वातावरणात खिन्नता होती पण कुठल्याही प्रकारची भयाणता, भीती, दडपण जाणवत नव्हते.
तिसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता क्रिमेशन होते. स्थानिक ब्राह्मणांनी फ्यूनरल होममधील हॉलमध्ये काही धार्मिक विधी केले. मंत्रघोषात शवपेटी बंद करण्यात आली. त्यावेळी सर्व भारतीय आणि अमेरिकन मंडळींनी हात जोडून नमस्कार केला. शवपेटी एका लांब रूंद शववाहिकेत ठेवण्यात आली. शववाहिका मार्गस्थ होण्यापूर्वी शववाहिकेबरोबर असलेल्या गाड्यांचा जो ताफा होता, त्या ताफ्यातील प्रत्येक चालकाच्या हातात क्रिमॅटॉरिअम-पर्यंत जाण्याचा मार्ग आणि नकाशा दिला गेला. शववाहिका मुख्य रस्त्याला लागण्यापूर्वी विशिष्ट प्रकारचे दिवे लावून गाड्यांचा ताफा मार्गस्थ झाला.
सुमारे ३५ मैलांवर असलेल्या क्रिमॅटॉरिअममध्ये सर्वजण पोहोचले. पुन्हा मंत्रपठण होऊन विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार पार पडले. फ्यूनरल होमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार होण्यासाठी साहाय्य केले. मंत्रपठण होत असताना मान खाली ठेवून आणि अदब दाखवून आपल्या धार्मिक भावनांचा आदर राखला जात होता.
विद्युतदाहिनी असलेली इमारत भव्य नक्षीकाम केलेली होती. एखाद्या चर्चसारखी तिची रचना होती. सभोवती सुंदर फुलांची बाग होती, कारंजी होती. हल्ली पुष्कळ अमेरिकन लोकही पुरण्याऐवजी विद्युतदाहिनीमध्ये दहन करण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. दहन झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी अस्थी देण्यात आल्या. व्यवस्थितपणे एका खोक्यात प्लॅस्टिकच्या झिपलॉक असलेल्या पिशवीत पॅक करून अस्थी देण्यात आल्या. या अस्थीबरोबर डेथ सर्टीफिकेट आणि क्रीमेशन सर्टिफिकेट एका फाईलमध्ये देण्यात आले. ही सर्व कामे फ्यूनरल होमच्या कर्मचाऱ्यांनी केली होती. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना कुठलीही तसदी नव्हती. या सर्टिफिकेटबरोबर फ्यूनरल होमतर्फे सांत्वनाचे पत्र होते आणि एका भल्या मोठ्या पुड्यात केक्स, बिस्किटे, कुकीज वगैरे पदार्थ दिले होते.
- चिंतामणी कारखानीस
संकलक व प्रेषक : अरुण पु.आपटे (बदलापूर)फोन : ०२५१-२६९२६४३
(`लोकसत्ता'मध्ये पूर्वप्रकाशित)

पुन्हा (पुन्हा)मेलन
प्रतिवर्षीप्रमाणे आपटे कुलाचे संमेलन डिसेंबर महिन्यात आहे. प्रतिवर्षाप्रमाणेच त्यावर अनुकूल-प्रतिकूल प्रतिक्रिया ऐकू येत आहेत. `दरवर्षी संमेलन झालेच पाहिजे' अशी एक बाजू असते, आणि `दरवर्षी संमेलन घेऊन उपयोग काय, पुढे काय?' अशी दुसरी बाजू असते. या दोन्हींलाही सोपे आणि एकमेव उत्तर असे की, संमेलन दरवर्षी झालेच पाहिजे, ज्यांना त्यातून उपयोग होतो असे वाटते ते जमतात. एका कीर्तनकारांनी आपल्या पूर्वजांची एक गोष्ट सांगितली होती. माकडे चार पायावर चालतात. त्यांना एका शहाण्या माकडाने सल्ला दिला की, आपण दोन पायावर चालूया म्हणजे पुढचे दोन हात आपल्याला आणखी कामाला उपयोगी पडतील. आपण तसा प्रयत्न करू. पण बुजुर्ग माकडांनी त्याला विरोध केला आणि `हे शक्य नाही' असा निष्कर्ष जाहीर केला. काहींनी दोन पायावर चालण्याचा प्रयोग सुरू केला. ज्यांना ते जमू लागले त्यांची माणसे झाली! कुठल्याही संघटनेच्या बाबतीत हाच अनुभव असतो हे लक्षात घेऊन अशा कुलसंमेलनात सहभागी व्हायलाच हवे आणि योग्य त्या दुरुस्त्या आणि सुधारणा करत इच्छित ते साध्य केले पाहिजे, असा निष्कर्ष काढता येईल.

येत्या संमेलनात आपल्या कुलवृत्तांताची शताब्दी आहे. पाच-सहा पिढ्यांपूर्वीचे कोणी गोविंद विनायक यांनी आपटे कुलाची जंत्री संकलित करून प्रसिद्ध करण्यासाठी काय कष्ट घेतले असतील याची आपण कल्पना करू शकतो. त्यांनी त्या अनुभवावर आणखी काही कुलांचेही ग्रंथ सिद्ध केले. आज दळणवळणाची साधने आणि संपर्काची माध्यमे इतकी वाढली आहेत तरीही कुलवृत्तांत अद्ययावत् करणे या गोेष्टीसाठी दमछाक होते ही विचार करण्याची गोेष्ट आहे. त्याचे कारणच उघड आहे की, त्या कोण्या काळी अशा कार्यांवर आपल्या पूर्वजांची निष्ठा होती, आज असे कार्य आपण जाताजाता करू पाहतो. ते नीट जमले नाही तर त्यावर टीका करतो. परंतु झडझडून त्यामागे लागणे आपल्या `कार्यबाहुल्ल्यामुळे' जमत नाही असे आपण दडपून सांगतो. ही मर्यादा मान्य करूनही जे काही प्रयत्न चालले आहेत त्यात सहभागी झाले पाहिजे, त्यास सहकार्य केले पाहिजे, किमानपक्षी त्यावर टीका करण्याचे किंवा आपटे स्वभावानुसार एखादी तिरकस रेघ ओढण्याचे टाळले पाहिजे.

एकत्र येऊन करायचे काय?-याचे उत्तर एकत्र आल्याशिवाय समजणार नाही. मानवी समाजाचे ध्रुवीकरण काही हेतूंनी किंवा भावभावनांच्या गरजेपोटी होत असते. ती गरज संपली की विस्कळीतपणा येतो. आपल्या कुटुंबांना कधी कठीण काळ होता त्यावेळी, एकत्र आले पाहिजे अशी ओढ होती. कदाचित आता सगळयांनाच एका सुखवस्तूपणाचे मांद्य आले असावे. त्यामुळे अशी ओढ कमी झाली असेल. परंतु गरजा बदलल्या तरी त्या संपत नसतात. त्यामुळे नव्या गरजांपोटी नवे ध्रुवीकरण झालेच पाहिजे. ध्रुवीकरणासाठी समानतेचा कोणताही धागा पुरतो. एके काळी यच्चयावत् आपटे कुटुंबांचे दारिद्र्य हीच समान स्थिती असेल, आजच्या काळात दूरवर गेलेल्या मुलांच्या आईवडिलांची स्थिती ही एकत्र येण्यासाठी गरज होऊ शकते. एका घरात, एका ज्ञातीत, एका गावात जन्मलेली माणसे कुठल्याही स्वाभाविक समानतेमुळे एकत्र आली पाहिजेत, एकत्र राहिली पाहिजेत. पूर्वीच्या व्यवहारांची गती, स्थलांतराची कारणे तितकीशी प्रभावी नव्हती. त्या काळाला वेग नव्हता असे म्हटले जाते. त्यामुळे एकत्र येण्याची आणि विखुरण्याची गतीही मंद होती. आज विखुरण्याची गती फार वाढली आहे. त्या मानाने एकत्र येण्याला माणसे उत्सुक नसल्यासारखी वागतात. कधीतरी एका गावात राहणारी किंवा एका सोसायटीत राहणारी माणसे विखरून गेल्यानंतर कालांतराने तेवढेच एक कारण घेऊन एकत्र येऊ पाहतात. पुण्यात राहून `आम्ही सांगलीकर' म्हणतात, किंवा `माजी धरमपेठ मंडळ' म्हणतात. त्या कोण्या स्थळकाळाच्या अंगवळणी पडलेले आचरण पुन्हा अनुभवताना आनंद व समाधान मिळतच असते. आपटे किंवा कोणाही चित्पावनांच्या संमेलनात कोकणातल्या फणसाची भाजी किंवा सोलकढी केली की माणसे हरखतात. पुण्यात जमणाऱ्या सांगलीकरांना दही-भाकरी आणि भरले वांगे आनंद देत असते. दिल्लीत जमणाऱ्या नागपूरकरांना भज्याभात खाल्ला की एकमेकाबद्दल जवळीक वाटू लागते. हल्ली परदेशस्थ मुले तिकडे गणेशोत्सव करतात. तीच मुले इथे घरच्या गणपतीची आरती करत नव्हती हे स्पष्ट आहे.

या सर्वांमध्ये सामुदायिकतेचा, समानतेचा एक कौटुंबिक साक्षात्कार असतो. तो होत राहिला तर माणसाची मानसिक भूक भागते. अशा एकत्रीकरणाला आपल्या धर्मात प्राधान्य आहे. ज्ञातीनुसार रूढी बदलते, ती पिढीनुसारही बदलते. ती बदलली पाहिजे, परंतु तितक्याच आवेगाने ती टिकवून ठेवण्याची ओढही असते. घरचा कुळाचार म्हणून हल्ली पाळला जात नाही. अशा संमेलनांतून तो पाळला तर अनेकांची कौटुंबिक श्रद्धा दुणावते हे नाकबूल करण्यात अर्थ नाही. वास्तविक अशा रूढींमध्ये खरा धर्म नाही, पण त्यावर श्रद्धा ठेवणे कुटुंबातल्या लोकांना आवडते.

हे सर्व आचरण मानसशास्त्र, आरोग्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र, पर्यावरण आणि प्रादेशिक वातावरण या सगळयाशी निगडित असते. ते `का? कशाला?' असल्या प्रश्नांच्या अतीत राहिले पाहिजे. या सर्वातील अर्थ शोधण्यासाठी परस्पर चर्चा झालीच पाहिजे आणि ती करण्यासाठी एकत्र आलेच पाहिजे. आपल्या एकत्त्वाचा सामाजिक आविष्कार दिसला पाहिजे. `प्रथम मी समर्थ होईन, त्यानंतर माझे कुटुंब, त्यानंतर माझा गोतावळा आणि या क्रमाने सगळा समाजच नव्हे तर सारा अवनीतल समर्थ आणि प्रतिष्ठित बनवीन' या आशयाचा `कृण्वतो विश्वमार्यम्'  हा संकल्प करण्यासाठी एकत्रित यावेच लागते. म्हणजे त्या संकल्पाची पूर्ती करण्याचा काही आराखडा ठरविता येतो.

रूढींच्या भिंती जीर्ण होऊन कधीतरी पडून जाणे कालसंगत असते. त्यांना भावनांचे बांबू वासे लावून किती तारून धरावे हे तोलणाऱ्यांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते. एकत्रित येऊन कौटुंबिकतेची साद घालण्यामुळे आपले कुलदैवत जागृत होणार नसले तरी आपण जागृत होऊ, हाही फायदा कमी नव्हे. म्हणूनच उद्याच्या आणि इथून पुढच्या सर्व संमेलनांत आणि कुटुंब संघटन कार्यात सहभागी होण्याचे आवाहन.

कुटुंबव्यवस्थेतील बदल

अजून पंधरा वर्षांनी आपली कुटुंबव्यवस्था कशी असेल? पंधरा वर्षे मागे वळून पाहिले तर त्या कुटुंबव्यवस्थेत आज कितीसा फरक पडला? २००० सालाअगोदर वाय.टू.के.चा काय गोंधळ माजला होता! गोंधळ घातला अमेरिकन लोकांनी पण तो प्रश्न धसाला लावून बँकांचे काम सुरळीत चालू करून दिले भारतीयांनी! प्रश्न निर्माण होतात, तशी त्यांची उत्तरेही मिळतात.
वृद्धाश्रमात राहणाऱ्या व्यक्ती कुटुंबवत्सलच असतात. म्हातारपणी त्यांना खुशाल वृद्धाश्रमांत नेऊन टाकतात. २०२० सालापर्यंत अशा कुटुंबांमध्ये वाढ झालेली दिसणार आहे. या आश्रमांना `आनंदधाम', `आनंदवन' अशी गोंडस नावे दिली. शहरातील लोकांची प्रमुख अडचण म्हणजे अपुरी जागा! लेकीचे मूल असो वा लेकाचे, नातवंड वाढवताना आजी-आजोबांना अपरिमित आनंद असतो. परंतु मूल शाळेत जाऊ लागले की आजीआजोबांची अडचण व्हायला लागते. इच्छा असो वा नसो, वृद्धाश्रमाची वाट धरावीच लागते. ही गोष्ट चांगली नाही, पण काळाची गरज झाली आहे.
वृद्धाश्रम तर वृद्धाश्रम; पण तिथे तरी आपलेपणा, विचारांची देवाणघेवाण पाहिजे. हे आश्रम निसर्गरम्य ठिकाणी हवेत. ते आश्रमच वाटले पाहिजेत, त्यांची हॉटेल्स व्हायला नकोत. मी कुठल्या वृद्धाश्रमाला भेट दिलेली नाही. वयाची ६८ वर्षे पार पडली. मनाची बैठक तयार करायला पाहिजे. `नटसम्राट' नाटकातले वाक्य मनात ठसले आहे-`माणसाने समोरचे ताट द्यावे पण बसायचा पाट देऊ नये.'
२०२० साली वृद्धाश्रमाला त्यावेळी तरुण पिढी भेट द्यायला आली तर कुतुहलाने बघतील आणि विचंारतील की, `वृद्ध व्यक्ती कोण? आम्ही की हे लोक?' त्यांना समोर दिसेल कुणी क्रिकेट खेळतंय, बॅडमिंटन खेळंतय, गाण्याचा रियाज करतंय, लिहितंय, कोणी शिकवतंय. सात्विक आनंदाने फुलणारा चेहरा पाहायला मिळेल. समलिंगी व्यक्ती एकत्र राहणे, लग्न न करता एकत्र राहणे, घटस्फोटित स्त्री-पुरुष एकत्र राहण्याला कुटुंब म्हणणे मूर्खपणाचे आहे. या गोष्टी वाढल्या तर स्वास्थ्य हरपेल व पर्यायाने देशाचे भवितव्य धोक्यात येईल. ह्या गोष्टी कालबाह्य होण्यासाठी उपाययोजना करायला हवी.
२००४ची छोटी मुले आज घडवायची आहेत. व्यक्तिमत्त्व विकासाच्या भलत्याच कल्पना उराशी बाळगू नयेत. पुरुषाने संसाराचा भार बायकोच्या बरोबरीने उचलला पाहिजे. एकमेकांबद्दलचा विश्वास, प्रेम घट्ट हवे. असे झाले तर एकांडी राहण्याची वृत्ती कमी होत जाईल.
आपल्या देशाला अध्यात्माची बैठक आहे. साधुसंतांची शिकवण आहे, आदर्श इतिहास आहे. प्रेमळ कुटुंब आपल्याला दिसायला हवे आहे. नवरा-बायकोने एकमेकांच्या विश्वासाला जीवापाड जपले पाहिजे. भरल्या घरालाच कुटुंब म्हणावे. २०२० सालानंतर तरी `घरात हसरे तारे असता, मी पाहू कशाला नभाकडे' हे सूर घराघरांतून यावेत.
- रेखा आपटे,(फोन:०२२-२६१४५६००)
५,सुवर्णकुंज, महंत रोड, मुंबई ५७


आठवांचे साठव...!
बापुडवाणा दिवस
१९६८ मध्ये मी मोटरसायकल चालवायला शिकलो, तेव्हापासून ४६ वर्षांत मी बहुधा सर्व प्रकारची वाहनं चालविली. आज रस्त्यांवर महाकाय कंटेनर्स दिसतात, ते तेवढे चालवायचे राहून गेलेत. या प्रवासात अपघातही कित्येकदा झाले. काही अपघात तर असे होते की, तिथे नंतरची अवस्था पाहिल्यावर मी वाचलो कसा हे आश्चर्य वाटावं. पण एक गोष्ट खात्रीनं सांगतो की, त्यापैकी एकाही अपघाताला माझी किंचित्मात्र चूक नव्हती. प्रत्येक वेळी एक शिकवण मिळवता येते, असं मी त्यामधून समजतो. अपघात घडू नये ही काळजी घ्यायची, पण कधी काही गमवावं लागूनही सगळं स्थिरस्थावर झाल्यावर, त्यातून कायकाय `मिळालं' हे पाहता येतं. मी हातीपायी धड वाचलो म्हणून हे म्हणतोय; ज्यांनी भयंकर काही सोसलं असेल त्यांची वेदना मी समजू शकतो.
१९८० साली मी कोल्हापूरहून इचलकरंजीला जात होतो. आमची मेटॅडोर व्हॅन होती, त्यात `किर्लोस्कर'ची काही कास्टिंग्ज व लोखंडी बार होते. इचलकरंजीला ते मशिनिंगसाठी द्यायचे होते. कोल्हापूर-सांगली राज्यरस्ता सोडून इचलकरंजीकडे वळल्यावर मोकळे ओसाड रान पुष्कळ होते. इचलकरंजीच्या अलीकडं पंधरावीस किलोमीटरवरती गाडीच्या पुढच्या चाकाचा बॉलजॉइंट तुटला. गाडी चालवायला भगवान जाधव हा ड्नयव्हर होता. त्याचीही चूक नव्हती. गाडीच्या उजव्या बाजूचं चाक जोडातून सटकलं आणि ती बाजू रस्त्यावर खरडत गेली. रस्त्याकडेच्या खड्ड्याच्या  काठाला जाऊन गाडी थांबली. उजवी पुढची बाजू थोडी खड्ड्यात डोकावत उभी, आणि गाडीचा मागचा पसारा रस्त्याच्या कडेवर तोल सांभाळत होता. बेतानं गाडीतून खाली उतरलो, हातपायाचे कापरे कमी झाल्यावर पुढचा विचार सुरू झाला. वेळ कलत्या दुपारची, ३५ वर्षांपूर्वी त्या रस्त्याला बेताची वर्दळ होती. गाडी अशी तोल सावरत दोलायमान उभी होती की, जरा धक्का लागला तर पुढे पडली असती.
एका गाडीला थांबवून ड्नयव्हर पुढची जुळणी पाहायला कोल्हापूरला गेला. मी गाडीजवळ थांबलो. गाडीत किंमती सामान होतं. संध्याकाळ झाली. आभाळ भरून आलं. विजा चमकू लागल्या. जवळपास वस्ती-निवारा नाही. हलके चार थेंब पडलेही परंतु आभाळ पांगलं. त्या अर्ध्या तासात गाडीच्या खाली सरकून मी बसता-लोळता असा थांबलो होतो, कारण कललेल्या गाडीत बसणं धोक्याचं होतं. तिन्हीसांज उलटल्यावर ड्नयव्हर मोकळाच परत आला. कोल्हापुरात पाऊस मोठा, कुणी मिस्त्री येणार कसा? सकाळी नक्की येतो असा वायदा एकानं केला. चार भजी घेऊन भगवानच माझ्या सोबतीला परत आला. दोघांनी रात्र तिथंच काढली. रस्त्यानं जाणारे येणारे कुणीतरी आपसात बडबडत. `कुठं खड्ड्यात मरायला गेलंय. प्याली असतील!' अडचणीतल्या माणसाची बाजू, कारणं, उपाय यांचा आपणही कधी विचार न करता त्याला नावं ठेवत असल्याचं माझं मला जाणवून खजिल होतो.
दुसऱ्या सकाळी ड्नयव्हर भगवान कोल्हापूरला पुन्हा गेला. गाडीच्या क्रॅनमध्ये पाणी होतं, तेवढ्यावर `सकाळ' भागवली. ऊन टळटळीत झालं. भूक कोमेजली होती. पंचगंगा साखर कारखान्याच्या दिशेनं आठदहा बैलगाड्या ऊस भरून चालल्या होत्या. पुढं होऊन एका गाडीवानाकडं कधी नव्हे तो ऊसही मागितला.... आणि तो बाबा चक्क `नाही' म्हणाला. मागच्या एकदोघांना मागितला, त्यातला एकानं चाबूक उगारला आणि एकानं हुड्त केलं. माझी मनस्थिती आधी केविलवाणी झाली, आणि मग निग्रही झाली. `एक दिवसाच्या उपासानं मरत नाहीस!' दुपारी दीड-दोनला भगवान आला. त्याच्यासोबत दोन मिस्त्री, हत्यारं, सामान आलं. खास कोल्हापुरी तंत्रज्ञान वापरून या लोकांनी दीडदोन तासात गाडी सरळ केली. त्यांचे पैसे देताना आमचे खिसे पार रिकामे-उलटे झाले. दहावीस कमीच पडले ते त्यांनी आम्हाला माफ केले.
संध्याकाळी इचलकरंजीला साहित्य पोचवून, त्याच ठिकाणी थोडे पैसे उसने मागून घेतले. काम करून रात्री घरी परतलो, तेव्हा माझा अवतार (इतरांनी) बघण्यासारखाच होता. परंतु सुखाच्या निवाऱ्यात परत आल्यावर मग मी या साऱ्याचं वर्णन घरच्यांपुढं करून दाबात म्हणालो, ``तरीपण मजा आला!''
- वसंत आपटेे, `वाल्मिकी' किर्लोस्करवाडी ४१६३०८ (मोबा.९५६१३९०८९०)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन