Skip to main content

29 Dec.2014

शिकू आनंदे २०१४

लुल्ला चॅरिटेबल ट्न्स्टचा `शिकू आनंदे' हा कार्यक्रम २ ते १३ डिसेंबर या कालात राबविला गेला. त्याचा सांगता समारंभ १४ डिसेंबर २०१४ रोजी उत्साहात पार पडला. १४ तारखेला सकाळी ११ वाजता सुरू झालेला कार्यक्रम संध्याकाळी संपला. `शिकू आनंदे'ची टीम शंभरपेक्षा जास्त शाळांमध्ये हा विषय पोचवण्यासाठी आधीचे १३ दिवस दररोज शाळाशाळांमध्ये जाऊन कार्यक्रम घेत होती. खरं तर तो त्याही आधी काही महिने सुरू झाला होता जेव्हा ज्ञानप्रबोधिनीच्या श्री.पोंक्षे सरांशी चर्चा होऊन आनंददायी शिक्षण हा विषय लुल्ला चॅरिटेबल ट्न्स्टने या वर्षीसाठी निवडला. मग त्याची संकल्पना मनात स्पष्ट होणं, या विषयातली शिक्षक, पालक, विद्यार्थी प्रत्येकाची भूमिका नक्की होणं, त्याचा सविस्तर अभ्यासक्रम म्हणता येईल अशी टिपणं तयार होणं, १०७ शाळांमध्ये वक्ते म्हणून काम करू शकतील अशी मंडळी शोधणं, त्यांची प्रशिक्षणं, त्यासाठी साहित्य, शाळांची निश्चिती, वेळापत्रक, प्रवासाची रचना अशी शेकडो कामं तयारीच्या दिवसात मार्गी लागली. १४ तारखेचा समापनाचा कार्यक्रम सर्वांसाठी एकत्रित पण तीन वेगळया सत्रांमध्ये योजिला होता. त्यासाठी त्या त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींची योजना झाली होती. विषयांची रचना व प्रशिक्षणे यात ज्ञानप्रबोधिनीचा मोठा सहभाग होता तर टी.ई.ए.सी.एच. या कार्यक्रमाद्वारे संपूर्ण आशिया साक्षर करण्याचे ध्येय ठेवलेल्या रोटरी क्लबनेही शंभर शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा देण्यासाठी सहकार्य करण्याचे मान्य केले होते.
१४ डिसेंबरच्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला सांगलीतील `अंतर्नाद' संस्थेने `मस्ती की पाठशाला' हा `आनंदी शिक्षण' या संकल्पनेला धरून आखलेला नाट्य,नृत्य व संगीताचा कार्यक्रम सादर केला. मराठीतील उगवती अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकर या कार्यक्रमाला उपस्थित होती. तिने तिची काही लोकप्रिय गीतेही सादर केली. सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी तिची मुलाखत घेतली. आपल्या आवडीचे क्षेत्र तिनं कसं निवडलं, आणि पालकांनी कशी साथ दिली हे स्पष्ट करणारे अनुभव तिने सांगितले.
१४ डिसेंबरला पहिले सत्र होते विद्यार्थ्यांसाठी. कार्यक्रमाचे उद्घाटन औपचारिक गांभीर्याने न करता, मुलांना आवडेल असे करावे, या कल्पनेतून `शिकू आनंदे' हा संदेश लिहिलेले फुगे मुलांच्या आनंदाचे व स्वप्नांचे प्रतीक म्हणून सभागृहात सोडले. मुलांनी केलेल्या जल्लोषात, पहिल्या सत्राचे वक्ते श्री.विवेक पोंेक्षे व श्री.प्रकाश पाठक यांनी उगवत्या पिढीशी उत्तम संवाद साधला. ज्ञानप्रबोधिनीने केलेल्या ध्वनीफितीच्या साहाय्याने या उपक्रमातील एक शिलेदार श्री.विनीत परांजपे यांनी `यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची....' हे गीतही मुलांकडून समूहस्वरात गाऊन घेतले.
श्री.प्रकाश पाठक यांनी, वर्गात शिकताना आपण केवळ विषय शिकत नसून त्यामागचे तत्व शिकले पाहिजे, यावर भर दिला. सहभागिता, नम्रता, चिकाटी ही मूल्ये स्वत:त रुजवून घेण्याचा हाच काळ आहे, प्रतिकूलतेबद्दल तक्रार न करता स्वत:ला सक्षम करण्यावर भर द्या असे त्यांनी सांगितले.  उद्याचा भारत सक्षम बनवणे ही तुमची जबाबदारी आहे. यासाठी यशवंत, गुणवंत, कीर्तीवंत व्हायचा निश्चय कराच, पण नीतीमंत होईनच हा आग्रह प्रथम धरा असेही ते म्हणाले.
दुसरे वक्ते श्री.विवेक पोंक्षे यांना मुलांशी संवाद साधण्याचा दीर्घ अनुभव असल्याने त्यांनी मुलांचीच छोटी छोटी उदाहरणे देऊन त्यातून मुलांसमोर विषय उलगडला. विविध शाळांतून केल्या जाणाऱ्या प्रयोगात मुले प्रत्यक्ष कृती करत करत कशी शिकतात याचीही माहिती त्यांनी दिली. शिक्षणप्रक्रिया आनंदी बनवणे मुलांच्याही हातात कसे आहे याची त्यांनी जाणीव करून दिली. पुस्तकांच्या पलीकडे जाऊन मिळवलेले शिक्षण, अनुभवातून घेतलेले शिक्षण हे खरे आहे. आनंदाच्या नवनव्या जागा शोधायला शिका. कष्ट करण्यातला आनंद, ध्येय निश्चित करण्यातला व ते साध्य करण्यातला आनंद, आपणच एखादा विक्रम करून तो मोडण्यातला आनंद मुलांनी घ्यावा असे ते म्हणाले. शिक्षण घेऊन मिळणाऱ्या उपाधीपेक्षा, त्या प्रक्रियेत खरा आनंद दडलेला आहे तो मुलांनी घ्यावा. तो शोधता आला तर पुस्तक वाचताना, व्यायाम करताना, प्रयोग करताना एवढेच काय परीक्षा देतानाही तुम्ही आनंदाचा अनुभव घेऊ शकाल असे विवेक पोंक्षे यांनी सांगितले.
दुसरे सत्र पालकांसाठी होते. जगातल्या जीवघेण्या स्पर्धेत आपल्या मुलांना ढकलणारे, व त्यांच्यावर काही विशिष्ट अभ्यासक्रमाची सक्ती करणारे पालक व कला, क्रीडा यात प्रावीण्य मिळवून वेगळा मार्ग शोधू पाहणारी मुले यांच्यातला संघर्ष दाखवणारा एक छोटा नाट्यप्रवेश, तरंग बहुउद्देशीय संस्थेचे श्री.मयूर अभ्यंकर व सौ.उर्मिला कुलकर्णी यांनी सादर केला. संपूर्ण कार्यक्रमासाठी भावे नाट्य मंदिरात विद्यार्थ्यांना आवडेल अशी सजावटही त्या दोघांनी केली होती.
पालकांसाठीचे सत्र श्री.सुधीर गाडगीळ मुलाखतीद्वारे चालवणार होते. 'ग्राममंगल'चे श्री.रमेश पानसे व `स्वयंसिद्धा'च्या श्रीमती कांचन परुळेकर यांची त्यांनी मुलाखत घेतली.श्रीमती परुळेकर म्हणाल्या, `मुळात पालक खूप गोंधळलेले असतात. आपलं मूल नेमकं कसं व्हायला हवं हेच त्यांना स्पष्ट होत नाही. आपण मुलांचे पालक आहोत; मालक नाही हे आधी लक्षात घ्यावं. शाळेत घालणे व वस्तूंचा मारा करणे याने मुलांसंबंधीची जबाबदारी संपत नाही. मुलांशी शांतपणे बोलायला वेळ द्या, मुलांचे ऐका, त्यांना बोलते करा, खेळ व अन्य गोष्टींमध्ये मुक्तपणे रमण्याचे स्वातंत्र्य त्यांना द्या. मुख्य म्हणजे मुलांवर संस्कार होण्यासाठी प्रथम स्वत:चे आचरण बदला. मुलांमध्ये उद्योजकता रुजवण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी आयांनी प्रथम छोटे-मोठे उद्योग करायला शिकावे.' असे त्यांनी आवर्जून सांगितले.
श्री.रमेश पानसे यांनीही पालकत्त्वासंबंधी व शिक्षणव्यवस्थेसंबंधी आपली परखड मते व अनुभव मोकळेपणाने मांडले, `पालक होणे ही प्रक्रिया मुलांच्या शिक्षणाबरोबर सुरू होते, त्याचा अभ्यास आईवडिलांनी करण्याची गरज आहे. मुलांच्या शारीरिक, शैक्षणिक वाढीतले टप्पे व त्यातील सुसूत्रता लक्षात घेऊन मुलांच्यात क्षमता विकसन हे लक्ष्य असावे. प्रत्येक मुलाला स्वतंत्र बुद्धिमत्ता मिळालेली आहे. ती शोधून तिच्या विकासासाठी मदतरूप होणे एवढेच पालकांनी करावे. शाळा, घर, ट्यूशन, होमवर्क या चक्रामुळे मुले सतत अभ्यासाच्या ओझ्याखाली राहतात. त्याचा त्यांच्या मनावर ताण येतो. मुलांनी ठराविकच शिक्षण घ्यावे असा अट्टाहास न धरता त्याला वेगवेगळया संधी दाखवून द्या. शाळा ही व्यवस्था अपूर्ण आहे. आपली शिक्षणपद्धती खूपच बंदिस्त आहे. त्यामुळे घर, समाजातील वावर, बाहेरील कलाकौशल्ये शिकवणाऱ्या संस्था यांचा वापर करून मुलाला समाजात वावरण्यासाठी तयार करावे लागेल.  मुलांचे घरातील स्थान महत्त्वाचे, सन्मानाचे हवे. यानेच त्याच्यात आत्मविश्वास येतो. मुलांना अभ्यासात हुशार बनवण्यापेक्षा जगात वावरण्यायोग्य चलाख करण्यावर भर द्यावा.' असे त्यांनी सांगितले.
या सत्रात उपस्थित पालकांपैकी काहींनी आपले प्रश्न विचारले. रविवार दुपारी १ ते ३ ची वेळ असूनही श्रोत्यांची संख्या इतकी मोठी होती की, आतील आसने खचाखच भरून नाट्यगृहाबाहेरील खुर्च्यांवर पालक उपस्थित होते. अनेक शिक्षकही या सत्रात सहभागी झाले होते.

दुपारी ३ ते ५ या सत्रात पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री.विनय सहस्रबुद्धे व डॉ.सागर देशपांडे उपस्थित होते. विनय सहस्रबुद्धे यांनी शिक्षकाची आजची स्थिती व त्यांच्यासमोरील अडचणी यांचा ऊहापोह केला. शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया (इंटरॅक्शन) महत्त्वाची आहे. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांप्रती संवेदनशील, स्वागतशील असायला हवे असे त्यांनी सांगितले. पालकांची भूमिका निभावण्यात पालक कमी पडत असतील तर प्रसंगी शिक्षकांनी ती भूमिका करायला हवी. शिक्षकांनी सजग, सक्रिय, ज्ञानाने आधुनिक व अद्ययावत् राहायला हवे. त्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. शिक्षकांनी सतत नावीन्याच्या शोधात राहावे. संशोधक वृत्ती जोपासावी. मुलांनी शिक्षणामुळे केवळ स्वप्नाळू बनू नये तर व्यवहारी बनावे. यासाठी प्रयोग केले पाहिजेत. शिक्षण ही आनंदनिधानाची प्रक्रिया समजावी.ती परिस्थिती स्वीकारून त्यातूनच मार्ग काढावा लागेल असे त्यांनी सांगितले.
श्री.सागर देशपांडे यांनी, शिक्षकांनी मुलांना केवळ शिक्षण नाही तर मुलांच्या मनात प्रेरणा देण्याने काम करावे असे सांगितले. आई ही पहिली शिक्षक म्हणून तिची भूमिका सर्वात महत्त्वाची, परंतु शिक्षकही एक प्रकारे मुलांचे सांस्कृतिक पालकच असतात हे लक्षात ठेवावे. जुन्या समर्पित शिक्षकांचे आदर्श पुनर्प्रस्थापित करण्याची गरज आहे. एकीकडे बेकार शिक्षकांची प्रचंड संख्या, दुसरीकडे चांगल्या शिक्षकांचा तुटवडा यातील दरी भरून काढण्याचे काम शिक्षकांचेच. विचारसरणी व भाषावादाच्या पलीकडे जाऊन भाषांचे महत्त्व आपण ओळखावे व आपल्यापुरते धोरण ठरवून ते राबवावे. शिक्षकांसाठी महत्त्वाचे मुद्दे सांगताना विषयावरची पकड, सतत निरीक्षण, आपल्या क्षेत्राची अद्ययावत् माहिती, अभ्यासक्रमापलीकडचे ज्ञान देण्याची क्षमता, आपल्या क्षेत्रात संशोधन वा प्रयोगाद्वारे काही भर घालणे याची गरज असल्याचे सांगून विद्यार्थ्यांवर निर्व्याज प्रेम करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे असे प्रतिपादन सागर देशपांडे यांनी केले. समाजातील बदलती परिस्थिती, आव्हाने यामुळे शिक्षकांकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या आहेत व शिक्षकांनी त्याला सकारात्मक दृष्टीकोणाने सामोरे जाण्याची गरज आहे असेही त्यांनी सांगितले.

या उद्बोधक सत्रांनंतर अल्प विश्रांती देऊन समापन सोहळा सुरू झाला. फलटण येथे शिक्षणविषयक मूलभूत काम करणाऱ्या मॅक्झिन बर्न्टसन आणि विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर व्यासपीठावर उपस्थित होते. नाट्यमंदिराचे सभागृह श्रोत्यांनी ओसंडून वाहात होते. श्री.वसंत आपटे यांनी प्रास्तविक व पाहुण्यांचा परिचय करून दिल्यानंतर काही प्रायोगिक शिक्षणकार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. त्यात श्री.विजय जाधव, विश्वास लापलकर आणि विनोदिनी कलगी यांचा समावेश होता. त्याचबरोबर मॅक्झिनमावशी, रमेश पानसे, श्रीमती पटवर्धन यांचाही खास गौरव करण्यात आला. नांदणीची शाळा व सांगलीतील मालू हायस्कूल यांना प्रोजेक्टरसाठी आर्थिक मदत देण्यात आली. रोटरीने चालू वर्षी शिक्षणविषयक मूलभूत सुविधांकरिता काम करण्याचे ठरविले आहे. रोटरी क्लबला रु.१५.२५ लाखाची देणगी लुल्ला ट्न्स्टच्या वतीने देण्यात आली. या भागातील काही शाळांना शिक्षणविषयक सुविधा रोटरी क्लबकडून देण्यात येतील अशी अपेक्षा आहे.
या अर्घ्यदान सोहळयानंतर मॅक्झिनमावशींनी मनोगत व्यक्त केले. शिक्षण या विषयाचे महत्त्व असल्यामुळे गेली कित्येक वर्षे त्या पश्चिम महाराष्ट्नत समरसून काम करीत आहेत. फलटण येथे तेरा वर्षांच्या वास्तव्यातून त्यांनी खूप अनुभव घेतला आणि त्यावर आपले चिंतन बेतले आहे. मराठी भाषा परिषद या संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्ष असल्यामुळे भाषेचे महत्त्व त्यांनी श्रोत्यांपुढे उलगडून दाखवले. सरकार आणि समाज यांचीही कर्तव्ये स्पष्ट केली. मातृभाषेतून शिक्षण याचा त्यांनी आपल्या अस्खलित मराठी भाषणात  जोरदार पुरस्कार केला. किशोर लुल्ला यांनी आभारप्रदर्शन करताना आपले मनोगत व्यक्त केले आणि लुल्ला ट्न्स्टची भूमिकाही विषद केली. `अशा प्रकारच्या अर्घ्यदानातून लुल्ला कुटुंबियांना अहंगंड निर्माण होऊ नये याची जबाबदारी तुम्हा सर्व मायबापांनी घ्यावी' असे त्यांनी नम्रपणे आवाहन केले. आभार प्रदर्शनानंतर गुरुदेव शंकर अभ्यंकर यांनी आपले चिंतन प्रगट केले.
एकलव्याच्या कथेतील तथाकथित अन्याय कसा गैरसमजुतीतून पसरविला गेला याचे विश्लेषण करून त्यांनी आपले ग्रंथ आणि इतिहास साकल्याने वाचन करावा असे नमूद केले. केवळ कुणीतरी काहीतरी पसरवतो आणि आपण आपली चुकीची मते उराशी बाळगून बसतो, असे होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. भाषा-इतिहास-तत्त्वज्ञान हे विषय भारतीय शिक्षणातून बाजूला जाता कामा नयेत; त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केलेच पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले. कर्णपिशाच्च होऊन बसलेल्या मोबाईलचा प्रभाव कमी करून तो उपयुक्ततेकडे न्यायला हवा. त्यासाठी पालक-शिक्षक आणि संस्थांनी उगवत्या पिढीला दिशा दिली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
`शिकू आनंदे' प्रकल्पाच्या निमित्ताने सांगली परिसरातील शैक्षणिक विश्वात विचारांच्या आदानप्रदानाची एक नवी चळवळ सुरू होईल आणि पुढील काळात आनंदाने शिक्षण घेण्यासाठी आणि देण्यासाठी आनंददायीच वातावरण तयार होईल अशी उमेद उपस्थितांमधून व्यक्त होत होती. या सर्व मोहिमेचा पाठपुरावा करण्यासाठी एक-दोन महिन्यातच प्रत्यक्ष कृती सुरू होईल.   ***  
(संकलन : विनिता तेलंग)

पुरस्कारांची शोभा
घरोघरीच्या दिवाणखान्यात काचेच्या कपाटांतून पदकांची रेलचेल डोकावत असते. बालवाडीच्या पोराला बेडूकउड्या मारण्यात मिळालेल्या पदकापासून पदरखर्चाने कुठल्यातरी प्रशिक्षणवर्गात किंवा सहलीत मिळालेल्या प्रशस्तीपत्रापर्यंत सगळया स्तुतीगौरवाचे ते प्रदर्शन, तद्दन `शो-केस' ठरते. गल्लीबोळातील `उल्लेखनीय' कामगिरीबद्दल मिळणाऱ्या मानपत्रांना आता मान मिळेनासा झाला आहे. नगरभूषण आणि जीवनगौरव किती निपजावेत यालाही मर्यादा नाही. एकूणातच पुरस्कार, सन्मान, सत्कार आणि कौतुक यांचा उद्देश, पद्धती आणि परिणाम यांचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे. वास्तविक असा सत्कार-पुरस्कार करणारा करतो, आणि घेणारा घेतो; त्यात तिऱ्हाइताच्या पोटात मुरडा व्हावा असे नाही. तरीही त्याचा समाजमनावर काय आणि किती परिणाम होतो ते पाहायला हरकत नाही. गणपतीमंडळाची मिरवणूक ही जशी काही सामाजिक व्यवस्थेचा भाग असल्याने विचारात घेतली जाते; किंवा लग्नातल्या जेवणावळी व फटाकेबाजी जसे सामाजिक डोकेदुखी बनतात त्याचप्रमाणे हे सत्कार-पुरस्कार आपल्या सामाजिक मन:स्थितीचा `शो' बनतो. म्हणून त्यातील तारतम्य पाहायला हवे. एक गोष्ट खरीच आहे की, ज्याने एखादी कृती चांगली म्हणून केलेली असते ती त्याच्यापुरतीच चांगली असते. तसेच ज्याला एखादा पुरस्कार मिळतो तो त्याच्यापुरता गौरवशालीच असतो. अशा बाबतीत संबंधितांखेरीज इतर साऱ्यांचे मत काय असते यावर त्याचे खरे मूल्य ठरते.

हल्ली काही लग्नसमारंभात अक्षता उधळणी थांबली आहे. याला पर्यावरण, पावित्र्य, नासाडी वगैरे पैलू जोडले जातात. त्यामागचा विचार ठीक म्हणण्याइतपत आहेच, तरीही त्या एका अतिसामान्य विचार-कृतीचा किती गौरव व्हावा असा प्रश्न येतो. लग्नात अक्षतारूपातील एक किलो तांदूळ वाचवला, म्हणून त्यास जीवनगौरव पुरस्कार दिल्याचे अजून तरी ऐकण्यात नाही, पण सध्याच्या प्रथा-परंपरा लक्षात घेतल्यावर तोही दिवस फार दूर नसावा! लग्नात एक किलो अक्षता वाचवल्या हे ठीकच आहे, पण अशा उच्चभ्रू लग्नांसाठी एखादे वऱ्हाड रेल्वे-एसटी बस यांचा वापर करते काय? अनेक पल्लेदार गाड्या उभ्या करण्याला सोयीस्कर म्हणून गावाबाहेरचे बहुउद्देशी ऐश कार्यालय घ्यावे लागते. इतक्या गाड्यांतून खर्च, प्रदूषण, इंधन वगैरे समस्या येत असल्याचे सांगतात, त्या तुलनेत एक किलो तांदूळ तो काय! पण निदान तेवढे तरी साधले, या समजुतींतून त्या विचाराला `ठीक' म्हणावे इतपत ठीक!

हल्ली तर लग्नसमारंभात, गावोगावीच्या साहित्य(?) संमेलनात किंवा ज्येष्ठांच्या मेळाव्यात अनेकांना आमंत्रण देऊन बोलावण्यात येत असते; आणि उपस्थित प्रत्येकाला ध्वनिवर्धकातून स्वागतघोषणा ऐकवत हार-सत्काराला सामोरे जावे लागते. यात ज्यांना आनंद-गौरव-सन्मान वाटत असेल तो वाटो बापडा, पण या सन्मान-प्रदर्शनाला इतरांच्या लेखी महत्त्व काहीही नसते. पुष्कळदा इतरेजनांस त्याचा उबगही येतो.

गावगन्ना `भूषणे', किंवा दिल्ली भागातल्या कोण्या येरू संस्थेचे समाजश्री, उद्योगश्री पुरस्कार यांचे मूल्य कमी झाले आहे. याला आपला सामुदायिक उतावीळ आत्मगौरव कारणीभूत आहे. ग्राम्य भाषेत त्याला टिऱ्या बडवणे म्हणतात. कोणे एके काळी भूषणावह पुरस्कारांची शान होती. सामुदायिक गौरवचिन्ह देऊन दिग्विजयी कर्तबगारीचा सन्मान करण्यांतून त्या व्यक्तीचे प्रेरक कर्तृत्व इतरांसमोर येण्याची भावना होती. हल्लीच्या फुकापासरी पुरस्कारांतून यातले काय साध्य होते? कोल्ह्याने सिंहाची बरोबरी करण्यासाठी चिखलात लोळून तो चिखल अंगावर वाळवावा, आणि स्वत:ला मोठे मानावे असा तो प्रकार वाटतो. अशा मोठेपणावर क्षुल्लक आघात झाला तरी त्या चिखलाचा ढेपसा पडतो हे समजून घ्यायला हवे.

`हा पुरस्कार देऊन त्या पदाचा व पदकाचा सन्मान झाला...' असे म्हणण्याची एक दांभिक रीत आहे. तसे म्हणणाऱ्यांना व इतरांना हेही ठाऊक असते की, पुरस्कार देणारा तो स्वत:चा सन्मान मानत आहे. कित्येकांना असे पुरस्कार वाटत राहण्याची हौस असते आणि त्यातून स्वत:कडे मोठेपणाचा संचय होईल अशीही त्यांची भावना असते. त्या उद्देशाने दिलेले पुरस्कार समाजाला किती उंचावर नेतील हे स्पष्ट आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर भारताच्या प्रजासत्ताकाचे म्हणून दिले जाणारे पद्म पुरस्कार लक्षात घेण्यासारखे आहेत. या सन्मानदर्शक पदव्या आपल्या नावामागे लावल्या जाऊ नयेत असा स्पष्ट संकेत असतो. परंतु डॉक्टर, प्राध्यापक, अॅडव्होकेट यांच्याप्रमाणेच हल्ली इंजिनियर आणि चार्टर्ड अकौंटंटही आपली पदवी आपल्या नावामागे मिरवत असतात. तसेच हे नवनिर्मित पद्मश्रीही त्या पदवीचे प्रदर्शन करू लागले आहेत. त्यामुळेच त्या पुरस्काराला काय स्वरूप येते ते उघड होते. एम.जी.रामचंद्रन् यांना भारतरत्न मिळाल्यानंतर प्रजासत्ताकातील प्रजेची काय भावना झाली हे आजही आपण जाणतो. अगदी अलीकडे सचिन तेंडुलकर किंवा काही काळापूर्वी लता मंगेशकर यांना भारतरत्न देण्यात आली. २५ डिसेंबरला ९० वा वाढदिवस साधून अटलबिहारी वाजपेयी यांना दिलेला भारतरत्न पुरस्कार त्या तुलनेत तोलला गेला तर ते पारडे कधीच खाली बसेल इतके त्याचे वजन आहे. त्यांना हा सर्वोच्च पुरस्कार देण्याने प्रत्येक भारतीयाला आनंद झालेला जाणवतो. तसे इतर पुरस्कारांच्या बाबतीत होत नाही. राजकीय सोयीसाठी अनेक पुरस्कार दिले जातात. तो सन्मान नसून तडजोड आहे हेही स्पष्ट होते. कित्येकांना मरणोत्तर सन्मान देण्याची मागणी होत असते. वाजपेयी यांच्याबरोबरच पंडित मदनमोहन मालवीय यांनाही भारतरत्न दिली गेली आहे. तोही अशा सोयीचाच भाग आहे. तसेच पाहू गेल्यास लोकमान्य टिळक किंवा शिवाजी महाराज यांना तरी भारतरत्न देण्यास काय हरकत आहे? परंतु यात कोणताही शहाणपणा नाही. एखाद्या लढाईत परमपराक्रम गाजविणाऱ्या वीराला मरणोत्तर असा सन्मान देणे हे वेगळे असते. परंतु मालवीय किंवा अन्य ललामभूत अशा व्यक्तिमत्त्वांना मरणोत्तर पुरस्कार देण्याची पद्धत निखालस वादग्रस्तच आहे. एकूणच या सन्मान पुरस्कार देणाऱ्यांना त्यांच्याच हेतूंचा आणि कर्तबगारीचा विचार करून `पुरस्कार सम्राट' असा पुरस्कार देऊन एकदाचे बाजूला करावे अशी अटीतटीची वेळ आली आहे.
***

`मार्क' म्हणजे गुणवत्ता नाही!
एका नामांकित शाळेच्या स्कॉलर वर्गातील मुलांना विचारले की, सर्वजण त्यांना काय म्हणतात? मुले म्हणाली, ``स्कॉलर''. मी विचारले, ``का?'' त्यावर मुले म्हणाली, ``कारण आम्हाला चांगले मार्क मिळतात.'' मी समीकरण मांडले, अ = ब  आणि ब = क, त्याअर्थी अ = क; म्हणजेच मी = स्कॉलर आणि स्कॉलर = मार्क. याचा अर्थ मी = मार्क.
जेव्हा आपण आपली किंमत मार्कांवरून करायला लागतो, तेव्हा जरा कमी मार्क मिळाले की, `आपली किंमत कमी झाली' असे वाटते. सर्व बोर्डानी मार्क वाटायला सुरुवात केल्यापासून तर हे समीकरण पालक व मुले यांच्या डोक्यात गच्च बसायला लागले आहे. हे धोकादायक आहे. माझी भाची शाळेतही जात नसताना तिने काढलेल्या एका चित्राला मी `वा!' म्हटले. ती लगेच म्हणाली, ``मार्क दे!'' मी चित्राच्या बाजूला लिहिले, ``छान!'' ती म्हणाली, ``मार्क दे, शंभरपैकी.'' अडूनच बसली. शाळेत जायच्या आधीपासूनच हे डोक्यात शिरत आहे. हे आजूबाजूच्या वातावरणात आहे. कधी पालकांना विचारले की, `तुमच्या मुलाने काय व्हावे असे तुम्हाला वाटते?' तेव्हा हमखास उत्तर येते की, `तो चांगला नागरिक बनावा, चांगला माणूस बनावा.' चांगला नागरिक, चांगला माणूस, चांगला डॉक्टर व चांगला व्यवसायिक, आपण जेव्हा काहीतरी चांगले करतो तेव्हा बनतो. नुसत्या मार्कांनी नाही बनत.
एका नववीतील मुलीला चाचणी परीक्षेत गणितात वीसपैकी चौदा मार्क मिळाले म्हणून ती पार खचून गेली. तिचे पहिले वाक्य होते की, `आय एम युझलेस' या मुलीला दहावीनंतर क्रीडा पत्रकार बनायचे आहे. त्यासाठी ती कला शाखेला जाणार आहे. मी विचारले की, ``आर्ट्स्ला गणित असते का?'' ती म्हणाली, ``नाही.'' ``याचा अर्थ तू दहावीनंतर गणिताला टाटा करणार, मग तू गणितासाठी एवढी निराश का?'' हे ऐकल्यावर तिलाही हसू आले. `गुणी मुलगी', `भावंडात हुशार मुलगी', `सर्वांची आवडती', `९०% मिळायला हवेत हं' या इतरांच्या मनातील प्रतिमेला जपण्याचे तिला दडपण आले होते. ही प्रतिमा आपण जपू शकलो नाही तर आपण युझलेस...! मुलांमध्ये खूप क्षमता असते, परंतु मार्कांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्या क्षमतांना किंमत दिली जात नाही.
मुलांना कमी मार्क मिळतात तेव्हा आपण नकळत हिंसक होतो. मुलांच्या आत्मविश्वासावर घाला घालतो. मार्कांवरून मुलांची किंमत किंवा लायकी ठरवू नका. आपण जन्माला आलो ही एकच गोष्ट आपण जगायला लायक आहोत यासाठी पुरेशी आहे. जगताना काय करायचे याचा विचार करण्यासाठी मुलांना आत्मविश्वास द्या!
***

मी आणि माझे भवितव्य
उगवत्या वयाच्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना भावी आयुष्याबद्दल एकीकडे काळजी, दुसरीकडे उत्सुकता आणि तिसरीकडे उमेद असते. प्रत्येकाला आपल्या मुलाने किंवा मुलीने उत्तम करिअर करावे असे वाटत असते. प्रचलित समजुतीप्रमाणे चांगले करिअर म्हणजे चांगला पैसा मिळविणारी नोकरी. चांगला पैसा मिळवताना फारसे कष्ट पडू नयेत अशीही अपेक्षा करिअर निवडताना होत असते. त्याचबरोबर त्यातून प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळावी अशीही एक सुप्त मनीषा असते. या सर्व घटकांमध्ये उत्तम नागरिकत्त्व आणि सच्छील, जागरूक असे पुढच्या काळातील पालकत्व याला मात्र तितके महत्त्वाचे स्थान असत नाही. परंतु कुमार्गाने पैसा कमवावा असे मात्र कोणत्याही मुलाला किंवा त्याच्या पालकाला मनातून वाटत नसते. मुलगा किंवा मुलगी मोठी होणे म्हणजे प्रथमवर्ग अधिकारी किंवा पुढे जाऊन कलेक्टर वगैरे व्हावे असेही कदाचित वाटत असेल. परंतु असा उच्च अधिकारी होऊन त्याने पैसा खाल्ला तर चांगले, असे मात्र कोणालाही वाटत नसते. या दृष्टीने स्वत:ला काय आवडते, काय करणे शक्य आहे याचा विचार प्रत्येक घरातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीही केला पाहिजे. ती चाचणी घेऊन शिक्षकांनी तशी दिशा दिली पाहिजे.
अशा सर्व अंगांनी चर्चा महाराष्ट्न् ज्ञान महामंडळ (महाराष्ट्न् नॉलेज कॉर्पोरेशन लि.-एमकेसीएल) येथे झाली. लुल्ला ट्न्स्टच्या मोहिमेकरिता ज्या अनेक भेटीगाठी घेतल्या गेल्या, त्यात एमकेसीएलचे श्री.विवेक सावंत यांच्याशीही चर्चा झाली. त्यावेळी करिअरसंबंधात त्यांनी जी भूमिका मांडली ती अशी -
मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने तीन गोष्टींचा विचार केला पाहिजे- १) काय करायला आवडते (आवड) २) काय करू शकतो (क्षमता) ३) काय केले पाहिजे (कर्तव्य) या तिन्हींची साखळी तयार झाली तर या तिन्ही घटकांपैकी, ज्यातून जास्तीत जास्त साध्य होईल ते क्षेत्र आपले भवितव्य म्हणून निवडले पाहिजे.
आवड आणि क्षमता एकत्रित केल्यास तो छंद म्हणून जोपासता येईल, पण तिथे कर्तव्य वेगळेच राहील. आवड आणि कर्तव्य एकत्र केल्यास ते स्वप्न म्हणून उराशी बाळगता येईल, पण तिथे क्षमता पुरी पडणे शक्य होणार नाही आणि क्षमता आणि कर्तव्य एकत्र केल्यास तो व्यवसाय किंवा नोकरी होईल, पण त्यात आवड असणार नाही. या तिन्हीचा मेळ एकत्रित घातल्यास जो केंद्रबिंदू म्हणून आचरता येईल ते आपले भवितव्य (करिअर) म्हणून निवडले पाहिजे. ही आकृती नजरेसमोर ठेवून त्यात आपल्या स्वत:च्या निरीक्षणाने आणि अंतर्मुखतेने अनेक क्षेत्रांचा विचार करता येईल आणि त्यांचे एकत्रीकरण करून आपले भवितव्य ठरविता येईल. 

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन