Skip to main content

22 Dec.2014

अ नु ग्र ह
तालुक्याला तासाभराचे काम होते. बसमधून उतरलो. तहसील कचेरीतून एक सही-शिक्का घ्यायचा आणि मिळेल त्या एसटी-बसने परतायचे असे नियोजन होते. बसस्टँडच्या बाहेर आलो, तो निदान शंभरभर भाविकांचा समूह घोळका करून उभा होता. कोणाच्या हाती पुष्पगुच्छ होते, कोणाच्या हाती फुलांच्या माळा. सगळयांच्या चेहऱ्यावर लीन भक्तीभाव-आतुरता, विनम्रता. कानावर होते की आज कोणातरी साधु महाराजांचे आगमन होणार. गर्दीतून माझ्या दिशेने शिवराम मुळीक झेपावला. कमरेत किंचित वाकून त्याने अभिवादन केले. त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता. माझा हात हाती घेत शिवराम उत्स्फूर्तपणे म्हणाला, ``या या साहेब! बघा कसे नेमक्या वेळेत, देवासारखे आलात. तुम्ही हो-नाही करत होतात, पण बघा बरं, गुरुरायांनी तुम्हाला नेमके कसे भाग पाडले? अहो त्यांची करणी अगाध आहे. तुम्ही कितीही टाळले तरी गुरुरायाचा आदेशच तो....''
शिवराम काय बोलतो आहे याचा मला काहीही अर्थबोध होईना. ओझरतं आठवलं की काही दिवसांपूर्वी तो म्हणाला होता, ``दादा, सोमवारचा दिवस राखून ठेवा. गुरुरायाचे आगमन होणार आहे. आपल्याला दर्शनाला जायचं आहे.'' नुसत्या गुरुरायाच्या आठवणीने त्याने बोलता बोलता डोळे मिटले. हात जोडले. दोन्ही गालावर हळुवार चापट्या मारून घेतल्या. ``गड्या शिवरामा, कोण गुरुराय? कुठे येणार आणि कशाला?'' माझ्या नास्तिकतेला म्हणा, अज्ञानाला म्हणा कीव करावी अशा सुरात शिवराम म्हणाला, ``असं काय करताय द्येवा? साक्षात् महान अवतारी-साक्षात्कारी. गुरुमाऊलीचे आपल्या भागात आगमन होत आहे. हा साक्षात् मणीकांचन योग आहे. सुवर्णसंधी आहे. गुरुपुष्यामृत योग आहे. तेव्हा गुरुरायाच्या दर्शनाचे सोने लुटायची संधी कोण सोडील? अहो, आपल्या गावातून पाच ट्न्क भरून भक्तगण दर्शनाला जाणार आहेत आणि तुमी विचारताय कोण गुरुराय?''
मला असल्या गुरु-महाराजांमध्ये काडीचा रस नव्हता, अजूनही नाही. पण दुसऱ्या कुणाच्या भावना किंवा श्रद्धा दुखवायची पण इच्छा नाही. शिवराम एवढे ओथंबून बोलत होता की त्याला `नाही जमणार' असे सांगणे जिवावर आले होते. सुटका करून घेण्यासाठी मी म्हटलं, ``बरं शिवराम, बघू या. जमलं तर येईन.'' ``जमलं तर नाही, जमवाच! असा योग युगायुगांतून एकदाच येतो. ही संधी गमावली तर आयुष्यभर तुम्हाला टोचणी लागेल.'' शिवराम हल्ली भलत्याच भाषेत बोलतो. वारंवार प्रवचने, व्याख्याने ऐकून त्याच्या बोलण्यात कृत्रिम शब्द येतात. मला ते हल्ली सवयीचे झाले होते.
``कुठल्या विषयावर तुमचे गुरुराज प्रबोधन करतात?''
``प्रबोधन? छे! छे! प्रबोधन प्रवचन करायला ते काय कीर्तनकार आहेत का? ते तर साक्षात् परमेश्वराचा अंश! ते फक्त दर्शन देतात. आपले भाग्य असेल तर हात उंचावून आशीर्वाद देतात. बस्स!''
``अजिबात बोलत नाहीत? मौन व्रत आहे का?''
``बोलतात की! पण सांकेतिक भाषेत. येरागबाळयाला त्यांच्या बोलण्याचा अर्थ लागणे शक्य नाही. फार अवघड विषय आहे राजे हो.''
``बरं बघू या.''
``तुमची जागा धरून ठेवतो. याच! येताना फुले आणि पेढ्याचा पुडा घ्या आठवणीने!''
``...........''
नंतर विसरूनच गेलो. पण आज नेमक्या वेळेला शिवरामच्या तावडीत सापडलो. काही क्षणात महाराजांचे आगमन होणार या नुसत्या कल्पनेने शिवरामचा गळा दाटून आला होता. दोन भुवयांमध्ये अष्टगंध लावलेले भक्तगण जमू लागले. कोणाच्या हाती हारतुरे, पायावर ओतण्यासाठी पंचामृताचे गडू! नजरेत अस्वस्थ अधीरता. रस्त्यावर पाणी शिंपडलेले. जागोजागी विविध मंडळांच्या स्वागत कमानी. त्यावर गुरुराजांची स्मित करून आशीर्वाद देत असलेली छबी. झांज-ढोल-ताशा गळयांत अडकवून सज्ज असणारी तरुण मंडळे. सुवासिनी काखेत घडे व निरांजन- पात्र घेऊन स्वागताला. जय्यत तयारी.
`या मंडळींचे चाललेय, चालू दे तिकडं! पण मला कशाला यानं अडकवून ठेवलंय? एवढ्या वेळात तहसीलदारांची सही घेऊन मी परतीच्या बसमध्ये बसलो असतो.'  आता कुठे जातोय? जाम अडकून गेलो. धीर देण्यासाठी शिवराम माझ्या कानाशी लागे, ``येतीलच! कुठल्याही क्षणी येतील. अहो वाटेत हजारजण दर्शनाला थांबवतात, ओवाळतात. नाही म्हटले तरी चार-दोन मिनिटे जातातच की! थोडा वेळ होणारच ना?''
``खरं आहे शिवरामा...'' स्वत:शी बोलावे तसे मी पुटपुटलो. `नाही तरी सभास्थानी येणारी महनीय व्यक्ती वेळेवर कधी तरी अवतरते का? वाट पाहून पाहून प्रेक्षकांनी विटून जावे, पिंढऱ्या दुखाव्यात, जांभया देऊन त्याचाही कंटाळा यावा, मग हे प्रमुख पाहुणे उगवणार. आजचे प्रमुख पाहुणे म्हणजे तर साक्षात् भगवान!'
दूर अंतरावर हालचाल दिसली. गलबला वाढला. `आले, आले' कुणीतरी किंचाळले. `गुरुराज महाराज की जय' सर्व भक्तगण सावधान पवित्र्यात वाटेकडे पाहू लागले. रस्त्यावर फटाके औट फुटले. अवघा परिसर दणदणून गेला.
हळूहळू गुरुराज माऊलींना घेऊन येणारी उघडी जीप आली. भगवी वस्त्रे, काळी लांब दाढी, कपाळावर विभूती-बुक्का-कुंकू-गुलाल त्यावर अक्षदा चिकटलेल्या. आशीर्वादासाठी तळहात आरसा धरावा तसा प्रेक्षकांकडं धरून महाराज गाडीतून  उतरले. गंगाजल महाराजांच्या पायावर ओतले. हळदीकुंकवानी पावलावर स्वस्तिक रेखाटले. पेटत्या निरांजनाने गुरुमाऊलीला ओवाळले. प्रेक्षकांनी गुलाबफुलांच्या पाकळया महाराजांवर उधळल्या.
शिवराम एवढा प्रफुल्लित झाला की त्याला अत्यानंदाने भोवळ येते काय असे वाटले. माझा तळहात त्याने घट्ट पकडून ठेवला होता. गुरुराजाचे दर्शन घडताच अजाणतेपणे त्याने पकड आणखी घट्ट केली. सगळेच भक्तगण `अजी मी ब्रह्म पाहिले'च्या मन:स्थितीत!
सगळा कल्लोळ माजला होता. महाराजांच्या वाटेवर शुभ्र वस्त्राच्या पायघड्या अंथरल्या. महाराज मदमस्त व्यासपीठावर आले. पायऱ्या चढताना भक्तगणानी नारळ वाढविले आणि भकले गर्दीत विस्कटली. गुलाबाच्या पाकळया पायाने चुरगाळत महाराज व्यासपीठावर पोचले. लोड तक्क्याला रुबाबात टेकून बसले. त्या क्षणी गुरवाने  शिंग फुंकले. आरोळी थांबता थांबेना. झाडाच्या सावलीतून उन्हाचा एक किरण नेमका महाराजांच्या अंगावर पडला. एका भक्ताने समयसूचकता दाखवीत त्यांच्या डोक्यावर छत्री उघडून धरली. कुणीतरी भक्ताने चांदीच्या पेल्यातून आणलेलं केशरी दूध महाराजांना प्यायला दिलं. पेला रिकामा करून स्वच्छ रुमालाने त्यानी तोंड पुसले आणि मागच्या लोडाला रेलून बसले.
इशारा करताच दर्शनाला भक्तांच्या रांगा लागल्या. प्रत्येकाच्या हाती पुष्पहार, फुले. आपला नंबर आला की पुढे यावे. गळयाजवळ हार आला की गुरुदेव तेथेच थांबवीत व तो हार मागच्या मोकळया जागेत फेकला जाई. चौरंगावर महाराजांनी पाऊल टेकविले होते. भक्तगण पावलावर डोके टेकवीत आणि सद्गदित होत. गुरुराजांची साक्षात् सगुण साकार मूर्ती हृदयात साठवीत. तोवर पाठीमागील भक्त ढोसून `लवकर पुढे व्हा' असे सुचवी.
शिवरामच्या शेजारीच माझा नंबर! फुलाचा एक हार शिवरामने माझ्याही हाती दिला, म्हणाला, ``भक्तीभावाने हार घाला. तुमचे पंचकल्याण होते की नाही पहा.''डोळे मिटून गुरुमहाराज निर्विकार शांत बसून होते. माझा नंबर आला तेव्हाच नेमकी महाराजांना जांभई आली. त्यांनी डोळे उघडले आणि त्यांच्या गळयात अडकवायचा हार त्यांनी आपल्या हाती ओढून घेतला आणि चक्क माझ्या गळयात घातला. अवघे भक्तगण दिग्मूढ झाले! `गुरुराजांचा जयजयकार असो' अशा घोषणा झाल्या. अघटित घडले. भक्ताच्या गळयात साक्षात् भगवानाने हार घातला! धन्य! धन्य!!
माझी अवस्था फारच अवघडल्यासारखी झाली. शिवरामच्या डोळयातून अश्रुधारा पाझरू लागल्या. `साक्षात् भगवान गुरुरायांनी तुमच्या गळयात पुष्पहार  घातला. तुमच्या दहा जन्माचे सार्थक झाले.' काही भाबडे भक्तगण मी अनुग्रहीत समजून माझ्याच पायावर नाक घासू लागले. मला आणखी अवघडल्यासारखे झाले. मी भांबावून गेलो. केविलवाणे होऊन शिवरामला म्हटले, ``गड्या शिवरामा, मला आता परवानगी दे. मी निघालो.''
``छे छे! शहाणे का खुळे? आता गुरुराजांची महापूजा होईल, आरती होईल. प्रसाद ग्रहण करून मगच जायचे.''
``नको बाबा, एकदा का आरती सुरू झाली की संपता संपत नाही.''
  ``अहो दादा, त्यातच आनंद असतो. जीव कसा शांत शांत होतो.''
मी मनात म्हटलं, `कसला शांत! गर्दी, गोंधळ, गोंगाट, चेंगराचेंगरी, घामट वास, उबग आणणारी अस्थानी भक्ती यातून मी कधी बाहेर पडतो असे झालेय.'
कशीबशी सुटका करून घेऊन घरच्या वाटेला लागलो. दारात पोचण्यापूर्वी गावभर बभ्रा झाला होता की दादांना महाराजांचा अनुग्रह झाला. त्यांच्या कृपाप्रसादाने माझे आयुष्य फळफळणार. आता माझ्या दर्शनाला भक्तांच्या रांगा लागतील का, या भीतीनं मी व्याकूळ झालो आहे. बरं, त्याबद्दल उघड काही वाईट म्हणायची चोरी!
- मोहन जी. आळतेकर, सुयोग कॉलनी, किर्लोस्करवाडी
मोबा.९४२११८४९९६

सत्यं वद, धर्मं चर 
धर्म हे मानवी जीवनव्यवहाराचे अविभाज्य अंग आहे. धर्माशिवाय माणूस जगत नाही. धर्माची आपापल्या परीने कोणतीही सोयीची व्याख्या मान्य करावी, किंवा आपल्या बुद्धीने स्वतंत्र करावी. त्यांतून धार्मिक गोंधळ निर्माण होईल व तेही मनुष्यत्वाचेच एक लक्षण असेल. कारण माणसाला धर्म असतो, त्याचप्रमाणे धार्मिक गोंधळ, धर्माभिमान, धर्मवाद ही धर्मांगे माणसाकडे असतात. दुसऱ्या धर्माबद्दल गैरसमज, शत्रुत्व अगर सहिष्णुता-प्रेम बाळगण्याचा दंभ कित्येकांना असतो. त्या उपयोगासाठी तरी धर्माची गरज असते. माणूस पूर्णत: धर्मसमभावी असण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. निधर्मीपणा तर अशक्यच. निधर्मी असल्याचे सांगणे हे अधर्माचे वाटते.

असे असूनही धर्माच्या नावाने अकारण बुद्धिभेद सतत चालू असतो. देवाधर्माच्या गोष्टी मानवाच्या ऐतिहासिक संस्कृतीने दिलेल्या नाहीत. रामायण-महाभारतात पंचमहाभूतांस देवतारूप मानून त्याची अर्चना-प्रार्थना केल्याचे दिसते. त्याचप्रमाणे हिंदू-मुस्लिम-िख्र्तासी असला काही कुठे उल्लेखही नाही, तरीही `धर्माला ग्लानी येते', `हा धर्म नव्हे', `अधर्माने वागू नकोस' असे मात्र वारंवार म्हटले आहे. आजचे धार्मिकपण हे त्या पुरातन परंपरांनी दिलेले नव्हे; तर ते अलीकडे आपापल्या सोयी-समजुतींनी उभे केलेेले आहे. ते उभे करण्याचे कारणच हे असावे की, माणसाला धर्मकारण काढून भांडायला हवे असते. परस्परांचे बळी घेणे हे जीवितकार्य मानणारी धार्मिकता ही माणसांची जगण्याची प्रेरणा असावी काय?

आग्रा व जवळपासच्या भागात `घरवापसी' नावाच्या मोहिमेत धर्मान्तर घडविल्याचा विषय सध्या गाजतो आहे. जे लोक काही काळापूर्वी हिंदू धर्मातून अन्य धर्मांत-विशेषत: मुस्लिम धर्मात-गेले, किंवा ढकलले, त्यांना पुन्हा मूळ हिंदू धर्मात यायचे असेल तर सामुदायिक धर्मान्तर करून हिंदू करून घेण्याची ती मोहीम आहे. त्याविरुद्ध अर्थातच वादावादी सुरू झाली आहे. जे लोक सर्व धर्म सारखेच मानतात, किंवा स्वत:ला निधर्मी समजतात, किंवा धर्म मानतच नाहीत त्यांनी तर वास्तविक या मोहिमेला विरोध करण्याचे काही कारणच नाही. कोण कुठल्या धर्मात आहे, किंवा कोणी कुठला धर्म बदलला याच्याशी त्यांना कर्तव्यच नसेल; कारण ते तर धर्माला स्थानच देत नाहीत. परंतु तेच तर असल्या `जातीयवादी धर्मयुद्धात' आघाडीवर दिसतात.
दुसरे असे की, जेव्हा कधी काळी इथल्या मूळच्या लोकांस - त्यांना सोयीसाठी हिंदू म्हणू - अन्य धर्मांत घातले गेले असेल तो तरी अन्याय म्हणायचा की नाही? त्या काळी ज्यांना लालूच दाखवून वा सक्तीने धर्मान्तर करावे लागले असेल, त्यांना आज त्या पद्धतीने पुन्हा धर्मान्तरित करणे निखालस चूक व अन्याय्य आहे. पण जे राजीखुशीने किंवा अगदी `धर्मबाह्य' अशा सामुदायिक समारंभाने धर्म बदलत असतील तर त्यात सामाजिक पाप कोणते आहे याचा उलगडा होत नाही. शिवाय त्या काळी जरी त्या कोण्या परधर्माची तत्वे मनापासून पटली म्हणून कोणी अत्यंत धार्मिकतेने धर्मबदल केला असेल, तरी त्याच्या पुढच्या पिढ्यांनी आज धर्मतत्वांच्याच प्रभावाने पुन्हा धर्मान्तर करणे आक्षेपार्ह कसे ठरते, हेही अजब आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हजारो ज्ञातीबांधवांसह जाहीर समारंभाने धर्मांतर केले, त्याबद्दल कधी कोणी टीकाप्रवाद उच्चारत नाही, उच्चारूही नये! बाबासाहेबांना त्यावेळी असे वाटले होते की, प्राप्त हिंदू धर्मात त्यांना व त्यांच्या ज्ञातीबांधवांना सामाजिक न्याय व प्रतिष्ठा नाही, ती बौद्ध धर्मात मिळू शकेल! त्यांच्या अपेक्षेप्रमाणे घडले की नाही हा वेगळया वादचर्चेचा विषय. पण समजा त्या काळात बौद्ध झालेली काही कुटुंबे पुन्हा हिंदू धर्म स्वीकारणार असतील तर तो धार्मिक अत्याचार म्हणावा काय? वास्तवात ही कुटुंबे बौद्ध झाली म्हणून त्यांची मानसिक किंवा सामाजिक स्थिती फारशी बदललेली नाही, आणि उद्या ती समजा पुन्हा धर्मांतर करून हिंदू झाली तरी तेवढ्याने यांची ती स्थिती बदलण्याची फारशी शक्यता नाही. कारण मुळात तो प्रश्न आर्थिक व सामाजिक विकासाचा आहे. त्याला धर्माचा आधार देऊन सामाजिकताच जोपासायची असते. तीच दूर राहात असेल तर धर्म कुठला यावर समाजाचे स्वास्थ्य ठरत नाही.

आगऱ्याच्या धर्मांतरावर बऱ्याच लोकांनी टीका केली आहे. तो त्यांच्या राजकीय किंवा सामाजिक दांभिकतेचा व स्वार्थाचा विषय आहे. त्याला उत्तर म्हणून संसदेत वेंकय्या नायडू यांनी म्हटले आहे की, `धर्मांतर बंदीचाच कायदा सरकार करू इच्छिते' या त्यांच्या म्हणण्यासही विरोध होतो. यातून स्पष्ट पक्षपात दिसतो. कोणी हिंदू होत असेल तर त्याला विरोध आणि हिंदूंतून कोणी धर्मांतर करून अन्य धर्मात जात असेल तर त्याचे स्वागत हे कसे चालेल? धर्मांतर बंदीच आली तर आहे ही धार्मिक चौकट कायम राहील असे मुळीच नाही. त्याला पुन्हा स्थलांतर, लोकसंख्यावाढ, घात-अपघात, आर्थिक बदल इत्यादी अनेक घटक कारणीभूत ठरतील. भारतात कोणे एके काळी जे लोक होते त्यांना हिंदू म्हटले जाते. ते लोक इथे हिंदू म्हणून जन्माला आले नाहीत. परंतु भारताच्या समावेशकतेने अन्य धर्मीयांचे इथे स्थलांतर झाले किंवा धर्मांतर झाले आणि भारत अनेकधर्मीय झाला. भारताच्या राज्यघटनेने आणि एकूण या भूमीच्या सामाजिक मानसिकतेने माणसाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. मुळातच धर्म म्हणजे कर्तव्य किंवा धर्म म्हणजे आचरणपद्धती ही भूमिका मान्य असेल तर त्याला ठराविक धर्माच्या नावाखाली साचेबद्ध करण्याचे कारणच नाही. परंतु इथल्या कोणा हिंदूला मुसलमान म्हणून चालत नाही तसेच मुस्लिम किंवा िख्र्चाश्नावर हिंदुत्त्व लादून चालणार नाही. परंतु स्वखुशीने किंवा भले लालूच दाखवूनसुद्धा धर्मांतर घडविण्याची पद्धत पूर्वापार आहेच, ती तशीच चालू राहण्यामुळे काही धार्मिक उलथापालथ घडेल अशी शक्यता वाटत नाही. धार्मिक स्वातंत्र्य याचा अर्थ आचरणस्वातंत्र्य आणि कर्तव्याची सक्ती असा घेतला जायला हवा. त्याऐवजी कर्तव्य बाजूलाच राहते, आचरणाचा बभ्रा केला जातो आणि कृती मात्र कोणाकडूनच काही घडत नाही किंबहुना घडलीच तर ती भांडाभांडीचीच घडते.

मुळात निधर्मी असण्यापेक्षा अधर्मी असणे पाप आहे. खरा सर्वधर्मसमभाव असेल तर तो हिंदुत्वाच्या विरोधी कसा असू शकतो याचा बोध होत नाही. एखादी कृती अमुक धर्मीयांनी केली की त्याचे समर्थन आणि दुसऱ्या धर्मीयांनी केली की त्याला विरोध हा धर्म नव्हे तर शुद्ध आचरटपणा आहे. त्याचप्रमाणे आपल्या धर्मात कोणी आला की त्याला `शुद्ध'करून घेतला ही संकल्पनाही निखालस गैर आहे. दुसऱ्या धर्मात होता त्यावेळी तो अशुद्ध होता असा काही एक प्रकार नाही. प्रत्येक धर्म शुद्धतेने आचरला तर तो शुद्ध मानवधर्मच असतो.

या पार्श्वभूमीवर आगऱ्याच्या धर्मांतराचे प्रकरण किती चघळावे आणि किती टोकाला न्यावे हा खऱ्या धार्मिक लोकांचा विषय होतो. स्वत:चा धर्म अभिमानास्पद वाटत असेल तर इतर कोणालाही समजून घेणे आवश्यक ठरते. स्वत:च्या धर्माने अकारण अस्मिता जागृत केली तर त्यातून परस्पर संघर्ष वाढतात आणि दोन्हीही बाजू अधार्मिक ठरतात. तात्पर्य असे की, धर्मांतराच्या निमित्ताने जो संघर्ष उसळतो आहे तोच अधार्मिक आहे आणि तो करणारी माणसे अमानुष आहेत असे म्हणावे लागते. त्याला प्रसिद्धी, राजकारण, पैसा, झुंडशाही अशा अनेक मार्गांनी बळ देणे हाही अधार्मिकतेचा भाग आहे. तो विषय अशा अधार्मिक लोकांवर सोपवून आपले धर्माचरण कर्तव्याकडे वळवावे हाच खरा धर्म ठरेल.
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन