Skip to main content

1Sept.2014

सोशल नेटवर्किंग
माणूस जन्मजात समाजप्रिय प्राणी आहे. सामाजिकता ही त्याची स्वाभाविक गरज आहे. एखादा माणूसघाणा असला तरीही उर्वरित समाजाच्या सोबतीने तो त्याच समाजात वास्तव्य करत असतो, त्याच्याही नकळत! आदिमानवही टोळया करून राहायचा. यातून सामाजिकता जपण्याबरोबरच त्याला संरक्षणाची हमीही मिळे. पुढे माणूस प्रगत झाला तसा विवाहसमारंभ, सण-उत्सव अशा मोजक्या प्रसंगी सामाजिक अभिसरण घडून येऊ लागले. आज त्याची जागा सोशल नेटवर्किंगने घेतली आहे.
अनेक परस्पर-आंतरक्रिया घडणारी सामाजिक संरचना म्हणजे सोशल नेटवर्किंग होय. आज आपल्या आयुष्यात याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. याद्वारे लोक आपल्या मित्रपरिवाराशी त्याचप्रमाणे अन्य समूहांच्या सदस्यांशीही संपर्क साधू शकतात. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे सगळे हल्ली या विषयाशी परिचित झाले आहेत. आपल्यातील सृजनाला लाखो प्रेक्षक मिळवून देणारा मंच म्हणूनही याकडे पाहता येईल. अत्यंत माहितीप्रचुर, करमणूकप्रधान आणि सजग करणारी अशी ही सामाजिक घटना आहे. आपल्या सभोवताली, एवढेच काय जगभरात चालणाऱ्या घडामोडी यातून क्षणार्धात आपल्यासमोर येतात. त्यातून आपले दृष्टिकोण प्रगल्भ होतात. सोशल नेटवर्किंग आज आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग बनले आहे.
पूर्वी भौगोलिक अंतरामुळे आणि आर्थिक कारणांमुळे माणसांचे परस्परसंबंध फारच मर्यादित होते. परंतु संगणकाने आणि सेलफोनने हे अंतर चुटकीसरशी मिटवून टाकले आहे. ऑर्कुट, लिंक्डइन्, मायस्पेस, फेसबुक, स्काईप, व्हॉटसअॅप अशा अनेक सोशल नेटवर्किंग साईटस्नी जगभरातील जनता एकमेकांशी जोडली गेली आहे. या माध्यमाद्वारे आपल्या उत्पादनांची आणि सेवांची माहिती जनसामान्यांसमोर आणता येते. यातून आपल्याला अभिव्यक्ती साधता येते. एकमेकांपासून दूर, अगदी निरनिराळया देशांमध्ये राहणारे कुटुंबीय आणि प्रियजनही परस्पर संपर्कात राहू शकतात. भौगोलिक अंतराची समस्या यातून बऱ्याच अंशी उणावते. नोकरी शोधणाऱ्यांसाठी तर याद्वारे अक्षरश: संधींचे भांडार खुले होते. दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारी यांच्याविरुद्ध जनमत तयार करता येते. त्याचा रेटा वाढवता येतो. मृत व्यक्तींची स्मृती चिरंतन करायला यासारखे उपयुक्त दुसरे साधन नाही. लोक आपल्या समस्या सोशल नेटवर्किंगद्वारे समाजासमोर मांडू शकतात आणि समाधानकारक उत्तरे मिळवू शकतात. हल्ली निवडणुकीचे प्रचार माध्यम म्हणून सर्वच राजकीय पक्ष याचा सर्रास वापर करू लागले आहेत.
जुने मित्रमैत्रिणी भेटून हृदयंगम आठवणींना उजाळा मिळतो तो इथेच! टाचणीपासून हत्तीपर्यंत तुम्हाला काहीही खरेदी-विक्री करायची असेल तर सोशल नेटवर्किंगचा बंदा तुमच्यासमोर हात जोडून उभा आहे. यावरून विद्यार्थी व्हिडिओ व्याख्यानांना आणि शिकवणीवर्गांना हजेरी लावू शकतो. मनाचा अगदी नाजूक कोपरा असणारा जीवनसाथी निवडण्यासाठीही याचा वापर होतो. आपला ब्लॉग सुरू करून आपल्याला भावणाऱ्या विषयांवर इतरांशी उघड चर्चा करता येते ती इथेच. सोशल नेटवर्किंग लोकांना पसंत पडण्यामागची मेख काय असावी? - वापरायला सोपी आणि अतिशय अल्पखर्चिक प्रणाली हे यामागचे प्रमुख कारण होय.
पण लोक सोशल नेटवर्किंगमध्येच जास्त रमतात आणि त्यांचा इतर कार्यांमधला सहभाग हळूहळू कमी होऊ लागतो. विशेषत: तरुणाईच्या बाबतीत हे प्रकर्षाने घडताना दिसते. काहीजण सोशल नेटवर्किंगला अनभिज्ञ असतील तर त्यांच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड, अपराधभाव जागृत होऊ शकतो. हे साधन वापरणारे आणि न वापरणारे अशी एक दरी त्यामुळे निर्माण होते. ही एक प्रकारे सामाजिक असमानताच! याद्वारे आपले जीवन जणू काही चव्हाट्यावर आणले जाते. अपवादात्मक स्थितीत शासन अस्थिर करण्यासाठी आणि दहशतवाद, गुन्हेगारीला खतपाणी घालण्यासाठीही याचा वापर होऊ शकतो. लोकांना भुरळ पाडणाऱ्या गुंतवणुकीच्या योजना सादर करून त्याद्वारे लोकांना जाळयात ओढले जाऊ शकते. प्रत्येक शस्त्राप्रमाणे हेही दुधारी आहे. याचा वापर तारतम्यानेच व्हायला हवा. अन्यथा वास्तव जगापासून फारकत घेऊन नुसतेच आभासी जगात रमण्यात काय मतलब?
- हिंदुस्थान समाचार वृत्तसेवा
अनुवाद : ज्योती आफळे (मोबा.९९२३७ ४४४५५)


ज्याचा त्याचा देव
भारतीय समाजात उत्सवप्रियता आहे हे तर त्याचे वैशिष्ट्यच आहे आणि त्यात काही चूक मानण्याचे कारण नाही. साधारणत: निसर्गप्रकृती व ऋतुमान पाहिले तर ते माणसाच्या उत्सवप्रेमाला अनुकूल आहे, ही भारतभूमीची देणगी आहे. त्यामुळे पंचमहाभूते आणि मानवी सहजवृत्ती यांचा सहजस्वीकार करून इथल्या चराचर सृष्टीला देवत्त्व देणारे धर्म, विधी, आचार, परंपरा यांची रेलचेल भारतात पूर्वकालापासून आहे. समाजाला उचित वळण देऊ पाहणाऱ्या बुद्धिमंत धुरीणांनी त्यांचा उपयोग करून घेतला, आणि नव्या प्रथा व कालानुरूप नवे विचार त्याच माध्यमांतून मांडले. कोणे एके काळी त्यामागील उद्देश त्याच काळाला अनुरूप असला तरी, बदलत्या आवश्यकतेनुसार उत्सवसणांचे स्वरूप बदलत ठेवायला हवे. तसे परिवर्तन करण्यासाठी समाजाला दिशा देणारे नेतृत्त्व नसल्यामुळे बदलांची ती प्रक्रियाच थांबली. आपोआपच नसत्या नेतृत्त्वाने, उत्तम हेतू व सर्वमंगल उत्सवांवर कब्जा केला आणि अल्प काळातच तिथे विद्रूप वहिवाट प्रस्थापित केली. दहीहंडी, गणपती, दुर्गा, दिवाळी... इतकेच नव्हे तर निवडणुका, रथयात्रा, इफ्तार पाटर््या, वारी, वह्या वाटप, वृक्षारोपण.... वाट्टेल त्या गोष्टीचा इव्हेंट करण्याला सध्या उधाण आले आहे. त्या सगळयांतून साधते काय; याचा विचार करण्याला कुणाला सवडच नसावी.

पर्यावरण आणि प्रदूषण यांसाठी रस्त्यावर येणारे तेच ते कार्यकर्र्ते गणपतीच्या वेळी वेगळया उन्मादात रस्त्यावर येतात. शुभ्र पोशाखात फेटेधारी बायकांचे एकत्र ढोलवादन हा प्रकार कोणत्या रागदारीचा अभिजात मंगलध्वनी असतो ते त्यांना माहीत! खेडोपाड्यातील ढमढमाटी संगीत रोखण्यास पोलीस-न्याय-कायदा हे सगळे पूर्णत: असमर्थ आहेत. पुण्यासारख्या शहराला जर पुरोगामी, आधुनिक, वैज्ञानिक, बुद्धिसंपदेचा टेंभा असेल, तर त्याच शहरात अजूनही राक्षसवध किंवा कालियामर्दनाचे देखावे सारे रस्ते अडवतात; हे बुद्धी आणि कर्मदारिद्र्य कोणते? शहरांचे आधुनिक उद्योगीकरण आणि विस्तार हा प्रामुख्याने दळणवळणाच्या सुविधा व शिस्त यांवर निर्भर आहे. त्या उद्योगशीलतेस; कामावर, शाळा-कॉलेजांस जाणाऱ्या नागरिकांना किती अडथळे होतात; हे कुणाच्या लक्षात येत नसेल असे नाही! पण त्या उत्सवी भक्तीच्या गोंगाटमय गोंधळाची वहिवाट इतकी प्रभावी बनली आहे की तिथे स्वस्थपणी योग्यायोग्यतेचा कोणी विचारही करू शकत नाही.

ज्या काळात, ज्या कारणासाठी, ज्या पद्धतीने गणपतीला घरातून - सार्वजनिक नव्हे, सामुदायिक जागेत आणले गेले ते कारण, ते उद्देश आणि तो काळही कालबाह्य झाल्यामुळे सार्वजनिक गणपती पुन्हा मूळ जागी नेण्याचा काही  प्रयोग करायला हवा. गणेशोत्सवासारख्या उत्सवातून जे काही फायदे म्हणून सांगितले जातात त्यात; कलागुणांना वाव, नेतृत्त्वास संधी, एकत्र येण्यासाठी निमित्त इत्यादींचे उल्लेख होतात. एकतर त्यांसाठी आता खूप स्थळे-प्रसंग आहेत; आणि इतपत हेतू साध्य करताना सार्वजनिक स्वास्थ्याला मोजावी लागणारी किंमत फार जास्त आहे. त्यामुळे वेगळया समाजहिताच्याच व्यवहार्यतेतून त्याचे मोल लक्षात घेतले पाहिजे.
अर्थात एक गोष्ट स्पष्ट आहे की, तशा उत्सवांत-रमण्यात-अनिष्टतेतही आनंद मानणारा मोठा वर्ग आहे, त्यास त्याच्या विश्वात रमत राहण्याचा हक्क आहे. रंगपंचमीला कुणा सखीच्या शुभ्र वस्त्रांवर गुलाबपाणी शिंपण्यात कुणाला मधुरानंद वाटेलही; पण रासायनिक काजळीत गलिच्छ गोंगाट करत रस्त्याने उंडारण्यातही काहींचा आनंद असतो. लावणी व ब्रेकडान्सचे `खास महिलांसाठी' होणारे हाऊसफुल्ल खेळ, हे तर सामान्यभान आणणारे आजचे समाजलक्षण आहे. त्यास बंदी किंवा नियंत्रण आणण्याची कल्पनाही चूकच आहे. ज्याला त्याला स्वत:च्याच विश्वात रमण्यात आनंद असतो. रात्रभर कुठेतरी वारुणीचे पेले रिचवून दुपारपर्यंत अंथरुणात लोळणारे असतात, त्याचप्रमाणे सूर्योदयास सूर्यनमस्कार घालून अभ्यासाला बसणारे प्रौढ असतात. आपण कोणत्या सत्संगात राहायचे ते आपापले ठरवायचे, इतकेच म्हणता येईल,खऱ्या बुद्धिदात्याचे दर्शन होण्यासाठी वेगळे स्थान शोधावे लागेल.

कोण्या देवापुढे रक्तमांसाचा चिखल करण्यातही त्या भक्ताला आनंदच असतो. सभ्य घरच्या प्रतिष्ठित विद्यासंपन्न मानल्या गेलेल्या घरांतील स्त्री-पुरुषांनी ताळ सोडल्याचे जसे पाहायला मिळते, तसेच त्यांचे देवही ढळले असतील तर काळाचाच तो महिमा म्हणायचा! `देव दानवां नरे निर्मिले' हे खरे आहे, त्यामुळे आजच्या मनुष्यसमाजातील `सार्वजनिक' बुद्धिदेवतेस डॉल्बी-ढोल प्रिय व्हावेत हे ओघानेच येते. उद्याच्या `नरकासुरा'ला `नरकेश्वर' हा पुरस्कार देण्याची वेळ फार दूर नसावी! ज्यांना दीपांची ओढ असेल त्यांनी अंधाराचे भय  मानायचे नाही.
***

बुद्धी आणि अभिरुची
एखादा समाज सुसंस्कृत आहे की नाही याचे मोजमाप काय? कोणत्या तराजूने सुसंस्कृतपणा मोजणार? दोन प्रकारच्या समाजांची तुलना करायची झाल्यास कोणत्या कसोट्या लावणार? आजकाल प्रत्येक माणूस टीकाप्रवीण झालाय. नुसती टीका करणे यासारखी सोपी गोष्ट दुसरी कोणतीही नसते. परंतु परिस्थिती सुधारण्यासाठी अथक परिश्रमांची गरज असते. आज काही अपवाद सोडले तर निरपेक्ष, सेवावृत्तीने काम करणाऱ्यांची संख्या फारच कमी झाली आहे. आपली संांस्कृतिक पातळी वरच्या दर्जावर न्यायची झाल्यास त्यासाठी कोणते प्रयत्न करण्याची गरज आहे? आज सहज नजर टाकली तरी समाजप्रबोधनासाठी कोणी प्रयत्न करतोय असे आढळत नाही. सर्व समाज एकप्रकारे पैशाच्या मागे लागलेला दिसतोय, अर्थात याला अपवाद आहे परंतु फारच कमी.
माझ्या मते कोणत्याही समाजाचे मोजमाप करण्याच्या दोन कसोट्या आहेत. १) त्या समाजात बुद्धिमान, प्रतिभावान, समाजहिताची काळजी घेणारे किती प्रमाणात आहेत. २) सर्वसामान्य लोकांची अभिरुची.
आजकाल तर सर्वसामान्य सोडा, पण सुशिक्षित लोकांची अभिरुचीही बदललेली आढळते. कालिदास, ज्ञानेश्वर, तुकाराम किंवा सर्व संतमंडळी, किंवा आधुनिक काळातील केशवसुत, राम गणेश गडकरी, पु.ल.देशपांडे या प्रतिभावंतांच्या कलाकृती त्यांच्या प्रयत्नांपेक्षा त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या प्रतिभेमुळेच निर्माण झालेल्या दिसतील. ही प्रतिभावंतांची यादी आपण कितीही वाढवू शकतो. त्यांच्या प्रतिभेला प्रयत्नांची जोड मिळाली. त्यांच्या निसर्गदत्त गुणांना प्रयत्नांची जोड मिळाली आहे. परंतु मोठा वाटा त्यांच्या प्रतिभेचा असतो. अशा व्यक्तींची संख्या समाजात वाढली पाहिजे.
या मोजमापाला दुसरी बाजू आहे, ती म्हणजे सामान्यजनांची अभिरुची. सर्वसामान्य लोकांना काय आवडते? त्यांना कोणती पुस्तके, कोणते चित्रपट आवडतात? ते कोणत्या मालिका बघण्यात आनंद मानतात? त्यासाठी किती वेळ देतात? आज सर्वसामान्य लोकांची अभिरुची अतिशय हीन पातळीवर येऊन पोचलीय. उच्च दर्जाची नाटके, चित्रपट पाहण्यासाठी वेळ काढणारी माणसे फारच कमी. उदाहरणार्थ `वासुदेव बळवंत', `स्वातंत्र्यवीर सावरकर' यावरील चित्रपट मोठी झीज सोसून तयार केले, पण ते पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग मिळेनासा झाला. आज गल्लाभरू चित्रपटांची चलती आहे. दुसरा एक गंभीर विषय म्हणजे हल्लीचे बरेच चित्रपट, त्यातील भाषा, दृश्ये यामध्ये बीभत्सता आली आहे. बीभत्सतेच्या बाबतीत तर टीव्हीवरील जाहिरातींनीही कळस गाठला आहे. आवश्यक नसताना प्रत्येक जाहिरातीत स्त्रीचे उत्तान दर्शन पाहिजे असा जणू नियमच आहे. हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे.
परंतु प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते; या न्यायाने बिघडलेली अभिरुची ताळयावर आणणे शक्य आहे. ही गोष्ट सहजसाध्य नाही तर प्रयत्नसाध्य आहे. अनुभव, सहवास, परत परत केले जाणारे संस्कार यामुळे उच्च अभिरुचीचे वळण लागू शकते. याबाबतीत माध्यमिक शाळेतील शिक्षक, पालक खूप काही करू शकतील. ज्याप्रमाणे प्रतिभा ही निसर्गदत्त गोष्ट आहे त्याचप्रमाणे उच्च अभिरुचीचे वळण लावणे प्रयत्नसाध्य गोष्ट आहे. गरज आहे ती आपल्या इच्छाशक्तीची. आपण कंटाळा न करता ही गोष्ट करणे अत्यावश्यक आहे. एक प्रकारचे आव्हान आहे. आज करमणूकीच्या साधनांचा दुरुपयोग होत आहे. तो होऊ नये यासाठी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. समाजहितैषी स्त्रियांनी मोर्चे वगैरे काढून निषेध नोंदवला पाहिजे. बलात्कार झाल्यावर निषेधमोर्चा काढण्याऐवजी बीभत्स दृश्ये दाखवली जाणार नाहीत यासाठी शासनावर दबाव आणला पाहिजे. बलात्काराचे कारण अशा प्रकारची दृश्ये हेसुद्धा असू शकते. लहान मुलांच्या हातात अभिरुचीसंपन्न वाङ्मय कसे पडेल यासाठी पालकांनी दक्षता घेतली पाहिजे. `थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे एक व्यक्ती, मूल निवडून त्याला संस्कारसंपन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा प्रयत्न सामुदायिक पातळीवर झाला पाहिजे. हे आपण करू शकलो तर समाज बिघडला आहे हे म्हणण्याची वेळ आपणावर येणार नाही. उशीर कशाला? उद्यापासूनच कामाला लागू या.
- मधुकर पांडुरंग खरे, (मोबा.९४०३७२५४४८)
९७७, `रमानंद' सत्तीकर बोळ, गावभाग, सांगली ४१६४१६

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन