Skip to main content

18 August 2014

देशाची फाळणी स्वीकारून आपण १९४७ साली स्वातंत्र्य घेतले. त्यापाठोपाठच पाकिस्तानातल्या अत्याचारांत भाजून अनेक कुटुंबे विभक्त भारतात आश्रयाला आली. त्यापैकी सिंधूकाठचा सिंधी समाज बराचसा मुंबई व महाराष्ट्नत आला. त्यावेळी विस्थापितांच्या छावण्यात राहिलेले हे लोक अनंत उद्योग करत इकडे स्थिरावले. त्यांनी कधी कुणाकडे हात पसरला नाही, याचना केली नाही. चिकाटीने श्रीमंतीही  कमावली. फाळणीच्या आठवणी आता पुसायला हव्यात, तसेच या सिंधु समाजाकडून काही शिकावे.
देशाच्या फाळणीतून जीवनाच्या जुळणीकडे
सुमारे १५०० वर्षांपासूनच्या या समाजाच्या इतिहासावर ओझरती नजर टाकली तर असे म्हणता येईल की, आजच्या जमान्यात जगभरचा सिंधी समाज जेवढा सुखी आहे तेवढा या गतकाळात कधीच नव्हता. सिंध भूमीत राजा दाहिरसिंगाचा पराभव इ.स.७१२ मध्ये महंमद बिन कासीम या आक्रमकाने केला आणि त्यानंतर इथल्या यवन राज्यकर्त्यांना १८४३ मध्ये इंग्रजांनी पराभूत केले. तोवर म्हणजे सुमारे हजार-बाराशे वर्षे सुखस्वास्थ्याची झोप या भूमीला मिळू शकली नाही. या राजवटीत सिंधी लोकांच्या अंगी सुप्त राहिलेली शक्ती इंग्रजी राजवटीत बहरून येऊ शकली आणि जीवनाच्या अनेक क्षेत्रांत त्यांनी अंगभूत पराक्रम प्रगट केला; पण ती इंग्रजांची गुलामीच होती.
हा समाज सांप्रत हिंदुस्थानात प्राय: पश्चिमी राज्यांत स्थायिक झाला आहे. इथल्या लोकांनी त्यांना प्रेम दिले आणि आदराने जवळ घेतले. त्यामुळे सिंधी लोक इथे आता मिळून मिसळून जात आहेत. स्वातंत्र्याच्या प्रारंभकाळीच त्यांना ज्या बिकट परिस्थितीशी झगडावे लागले, त्यातून आपल्या सुप्त सामर्थ्यानिशी ते आपल्या पायावर उभे राहले. एकाऐवजी जागोजागी शंभर सिंधभूमी त्यांनी निर्माण केल्या. आपल्या कर्तृत्त्वाने, हुशारीने आणि परमार्थबुद्धीने शाळा-कॉलेजे व रुग्णालये काढली. हे सारे त्यांनी इथल्या समाजासाठी केले.
प्राचीन काळी भारताचे प्रवेशद्वार म्हणून सिंधचे नाव झळकते. सिंधू या शब्दाचा अर्थ समुद्र असा आहे. त्या प्रदेशांतून वाहणाऱ्या या नदीचा विस्तार पाहून या प्रदेशास `सिंध' नाव दिले असावे. अरबी लोकांनी सिंधचे `हिंद' केले. आज आपल्या देशास `हिंद' असे संबोधण्यात येते.
सिंधमधील लारकाणा शहरापासून पंचवीस मैलांवर सिंधूच्या खोऱ्यात `मोअन जो दरो' येथे सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले. `मोअन जो दरो' येथे निळया रंगाच्या बांगड्या, चाकू, नांगराचे फाळ, पाषाणाच्या उत्तम अंगठ्या, गहू, जव, सोन्या-चांदीचे अलंकार वगैरे वस्तू सापडल्या. गहू-जवासारख्या धान्याचा उपयोग ते लोक करीत. येथील लोक शेती उत्तम करीत असावेत. कापसापासून सूत काढणे व त्याचे कपडे विणणे त्यांना माहीत असावे. शालीचा उपयोग कपड्यासारखा करीत. घरात तांब्याची भांडी वापरीत. एकंदरीत येथील लोकांचे राहणीमान उच्च दर्जाचे होते. तसेच विशेष गोष्ट म्हणजे या ठिकाणी ढाल-तलवार अथवा धनुष्यबाण वगैरेसारखी हत्यारे सापडली नाहीत किंवा शहराभोवती तटबंदीही आढळली नाही. यावरून त्यांना लढाई करण्याचा शौक नव्हता असे वाटते. त्रिनेत्र, पशुपति, शंकर, शक्तिदेवता दुर्गा, लिंग, वृक्ष, सर्प यांची ते पूजा करीत. एकंदरीत हे लोक शांतताप्रिय आणि सुसंस्कृत वृत्तीचे होते.
महाराष्ट्नीयांस छत्रपती शिवाजी महाराज, रजपुतांस महाराणा प्रताप आणि पंजाबी लोकांस गुरू गोविंदसिंग यांच्याबद्दल जसा अभिमान वाटतो; तसा सिंधी समाजाला `उडेरोलाल' यांच्याबद्दल अभिमान आहे. उडेरोलालचा जन्म म्हणजे साक्षात परमेश्वराचाच अवतार अशी भावना सिंधींच्या अगदी हाडी-मांसी भिनली. त्या काळापासून सिंधी लोक उडेरोलालची भक्तिभावाचे पूजा करतात. उडेरोलालचा पर्जन्योत्सव `चालीहो' आणि नववर्ष `चेटी चंड' या नावाने प्रतिवर्षी साजरा करण्याची सिंधींमध्ये प्रथा आहे.
पुढे व्यापाराच्या निमित्ताने इंग्रजांचे हिंदुस्थानात आगमन झाले. कावेबाजपणाने व चलाखीने इंग्रजांनी हळूहळू साऱ्या सिंधचा कब्जा मिळविला. लेफ्टनंट बर्टन या इंग्रजाने आपल्या `सिंध' नामक पुस्तकात सिंधबद्दल गौरवोद्गार काढताना लिहिले आहे, `सिंधमधील हिंदू रहिवासी अत्यंत बुद्धिमान आणि चलाख आहेत. हिशेब वगैरेसारख्या व्यवहारात ते अत्यंत हुशार आहेत. लहान लहान अमीर या `काफीरां'शिवाय (हिंदूंशिवाय) आपले व्यवहार सांभाळू शकले नाहीत. (अमीरांच्या काळात) सिंधचा जर विकास झाला असेल तो केवळ हिंदूंमुळेच. त्यांच्यात हरेक प्रकारचे कर्तृत्व आहे.'
धार्मिक बाबतीत हिंदूंवर असलेली बंधने इंग्रजांनी काही प्रमाणात काढून टाकली आणि शैक्षणिक वगैरे क्षेत्रात हिंदूंना आपल्याशी सहकार्य देण्यास प्रोत्साहन दिले. यामुळे भारताच्या स्वातंत्र्यकाळापर्यंत सिंधमध्ये उघडलेली ९८% खाजगी विद्यालये हिंदूंनीच स्थापिलेली होती. तसेच कापसाचे मोठे कारखाने, तेलाच्या गिरण्या, रेशमी कापडाच्या गिरण्या, सिगरेट, सिमेंट, बिस्किटे वगैरेंचे कारखाने यांसारख्या औद्योगिक क्षेत्रांतही स्वाभाविकत: हिंदूंचेच वर्चस्व होते.
इ.स.१८८० च्या सुमारास सिंधमध्ये राजकारणात शिरण्याचा प्रयत्न विशेषत: कोणी करीत नसे. परंतु पुढे मात्र काही तरुण मंडळी मुंबई येथून उच्चशिक्षण घेऊन सिंधमध्ये परतली असल्याने त्यांच्या विचारात बरेचसे नाविन्य आले. सिंधला हिंदुस्थानात प्रतिष्ठेचे स्थान मिळवून देण्याची त्यांची तळमळ होती. त्यांनी १८८२ साली `सिंध सभा' नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेत कार्य करणाऱ्या प्रमुख मंडळींत दिवान कौडोमल, चंदनमल खिलनानी, नागेंद्रनाथ गुप्ता, दिवान टहलराम, वजीराणी, प्रा.बी.जी.पातशाह, सेठ हरचंदराय वगैरे मंडळी होती.
सिंधमध्ये १९१६ पर्यंत कधी गुप्तपणे तर कधी जाहीररीत्या इंग्रजांविरुद्धच्या सभा भरविल्या जात आणि त्यांचे नेतृत्त्व लोकराम शर्मा, डॉ.चोइथराम गिदवानी, आचार्य जीवतराम कृपलानी वगैरेंसारख्या पुढाऱ्यांकडे असे. महाराज लोकराम शर्मा आपल्या `सिंध भास्कर' वृत्तपत्रात इंग्रजांविरुद्ध सडेतोड लिखाण करीत. सक्करमधील एक तरुण हेमू कालानी याने १९४२ च्या चळवळीच्या काळात आपल्या काही साथीदारांसह रेल्वे रूळ उखडून रेल्वे उडविण्याचा प्रयत्न केला. यात २१ जानेवारी १९४३ या दिवशी हेमू कालानी या शूरास फासावर चढविण्यात आले. राजा दाहिरसेन, झूलेलाल, दिवाण गिदूमल, शेठ नाऊमल, शेठ मिशिनदास, भगत कंवरराम, हेमू कलाणी, नेणूराम, जेठी सिपाई मलाणी, भाई प्रताप ही सिंधी समाजातील काही कर्तृत्ववान ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे! याखेरीज अनेक संत, साधू, महात्मे सिंधी समाजात जन्माला आले.
सिंधू नदी ही कैलास, गारटंगचु व लँगचु या तीन हिमनगांपासून झिरपणाऱ्या झऱ्यांनी बनते. ही नदी तिबेट, काश्मीर संस्थान, वायव्य सरहद्द प्रांत, पंजाब व सिंध या पाच प्रदेशांतून वाहात जाऊन बहुविध मुखांनी अरबी समुद्राला जाऊन मिळते. हिच्या सुमारे सतराशे-अठराशे मैल लांबीच्या प्रवाहातील शेवटचा पाचशे मैलांच्यावर लांबीचा प्रवाह सिंध प्रांतामधून गेला आहे. दहा हजार फूट उंचीच्या खिंडीतून बाहेर पडून ती काश्मीर संस्थानच्या गिलगिट परगण्यात प्रवेश करते. अटक शहराच्या जरा वर सिंधूनदीला काबूल नदी येऊन मिळते. अटकनजीक सिंधू समुद्रसपाटीपासून साडेनऊशे फूट उंचीच्या भूमिभागावर वाहात येते. पंजाब प्रांताच्या दक्षिण भागामध्ये पंजाबातल्या संगत पाच नद्यांनी बनलेला पंचनद सिंधूला येऊन मिळतो. मग किशमोर गावानजीक सिंधू नदी सिंध प्रांतात शिरते, ती समुद्राला मिळेपर्यंत सिंध प्रांतातून वाहाते.
सिंध प्रांतास जन्म व नाव देणारी महानदी सिंधू हिला सिंधी लोक दर्या म्हणतात. सिंध प्रांताचे जिल्हे आहेत - कराची, दादू, लाडकाणा, अप्परसिंध फ्रांटीयर, सक्कर, नबाबशाह, हैदराबाद, थर आणि पारकर.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी हिंदुस्तानची फाळणी होऊन भारत स्वतंत्र झाला. हजारो वर्षे हिंदुस्थानात असलेला सिंध पाकिस्तानात गेला. राजकीय उलथापालथीपायी लाखो हिंदूंना सिंध सोडावा लागला. विसाव्या शतकातील क्रूर आणि पाशवी अत्याचारांपुढे हिंदूंचे बळ अपुरे पडले. गंगा-यमुनेइतकी ती पवित्र सिंधू; ऋषीमुनींची, साधुसंतांची आणि महान आत्म्यांची ती सिंधुभूमी त्यांना कधीच विसरता येणार नाही. एक उच्च संस्कृती, महान परंपरा आणि उत्तम समाज यांनी वसलेला सिंध डबडबलेल्या अश्रूपूर्ण नेत्रांनी सोडावा लागला. आपल्या कोणा जिवश्च-कंठश्च प्रियजनास मुकावे लागावे असे ऊर फोडणारे दु:ख घेऊन एका कपड्यानिशी सिंध सोडला. पिढ्यान् पिढ्या शेजारीपाजारी राहात असलेल्यांनी आपली पुन्हा भेट होईल की नाही या शंकेने भरलेल्या अंत:करणाने परस्परांस बिलगून आणि ओक्साबोक्सी रडून निरोप घेतला. काहींनी आपल्या पिढीजात घरांच्या दोन विटा स्मृतीदाखल घेतल्या. मातृभूमीच्या या विटांना पावित्र्य देणारे श्रद्धाळू सद्गदित झाले.
`इनमें भी कोई भलो हूंदो'(यातही काही भले असेल) म्हणत सर्वांनी ईश्वरावर श्रद्धा ठेवली. भारत सरकार नेईल त्या ठिकाणी जाऊन राहायचे. जे देतील ते खायचे, जे सांगतील ते करायचे; हाच सर्वांचा कार्यक्रम. जिकडे जावे तिकडे एकच उपाधी-निर्वासित! - अगदी भारतातही पुनर्वसनाची पुरेशी व्यवस्था नव्हती. या ठिकाणाहून त्या ठिकाणी, या कँपातून त्या कँपात. भारताच्या कानाकोपऱ्यात सिंधी पसरले. स्वस्थ बसण्याइतका आळस, ऐदीपणा आणि लाचारी त्यांच्या मनाला शिवत नव्हती. ज्याला जे जमेल ते ते त्याने करायचे ठरवले.
सिंधी-हिंदू आणि सिंधी-मुस्लीम असे दोन समाज त्या प्रांतात होते. त्यापैकी इकडे निघून आलेले सर्वजण हिंदू आहेत. मूळच्या सिंध प्रांतात बौद्ध आणि जैन यांचाही प्रसार झालेला होता. सिंधमधून स्थलांतर करताना या लोकांनी त्यांची मालमत्ता, जमीनजुमला तिथेच सोडला पण स्वत:बरोबर त्यांचे शिक्षण, व्यवहारज्ञान आणि अक्कलहुशारी आणली. शांतपणे जीवन जगण्याची कला त्यांना उपजतच आहे. जगाच्या पाठीवर कुठेही ते बिनधास्त राहू शकतात.
पाकिस्तानची निर्मिती अनैसर्गिक असल्याने ती फार काळ टिकून राहणार नाही; वेळ येताच सिंधमध्ये परतता येईल अशा विचाराने फाळणीनंतर सिंधी निर्वासितांनी जोधपूर आणि अजमेर या शहरांत राहण्याची मोठी धडपड केली. मुंबई शहर मोठे आणि खर्चिक. ते दूर अंतरावर असल्यामुळे सुरुवातीला फार कमी सिंधी लोकांनी मुंबईचा विचार केला असेल. पण सिंधमध्ये परत जाण्याची आशा काही काळाने मावळत गेली आणि अन्यत्र सोयिस्कर जागा शोधणे भाग पडले. कांडला बंदर येथे सरकारने सिंधू रीसेटलमेंट कॉर्पोरेशनला जागा दिली होती. तिथे गांधीधाम नगर उभारणीचे काम सुरू झाले. पण या निर्मितीला काही वर्षे लागणे स्वाभाविक होते. सिंधी निर्वासित दारिद्र्याशी झगडता झगडता मुंबईची दिशा पकडू लागले. मुंबईच्या दिशेने लोंढे सुरू झाल्यावर मग त्यांची काही सोय लावणे सरकारला क्रमप्राप्त होते. कल्याण क्रॅम्प येथे दुसऱ्या महायुद्धातील युद्धकैद्यांसाठी बांधलेल्या बराकी होत्या. उल्हास नदीकाठच्या या रिकाम्या बराकी सिंधी निर्वासितांना राहण्यासाठी देण्यात आल्या. बराकींच्या या मोठ्या समूहाला `उल्हासनगर' असे नाव देण्यात आले. सिंधी निर्वासितांना या ठिकाणी शहरातील महागाईची झळ पोचत नव्हती आणि मुंबईसारखे मोठे शहर उद्योगधंद्यासाठी जवळ होते. या अनुकूल परिस्थितीचा अचूक फायदा सिंधी लोकांची उचलला. मुंबई हे शहर भारतातील समस्त सिंधी माणसांचे प्रमुख  केंद्र बनले. इतर शहरांत सिंधी कुटुंबे गटागटाने राहतात.
सिंधी समाज जगाच्या पाठीवर सर्वत्र विखुरला आहे. महाराष्ट्नत विशेषत: मुंबई, कल्याण, उल्हासनगर, पुणे, पिंपरी, गांधीनगर, कोल्हापूर वगैरे ठिकाणी तो अधिक प्रमाणात आहे. समाजातील प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक ठिकाणी सिंधी लोक स्वत:चे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत.
सिंधी लोक सूर्यवंशी मानले जातात. राम आणि कृष्ण यांना ते पूर्वज मानतात. त्यांच्याकडे नदीची पूजा केली जाते. `आवो', `पलउ छंडो' `बहराणो' हे त्यांच्याकडील काही विधी व संस्कारपद्धती आहेत. त्यांच्यात `चेटीचंडू' आणि `चालिहो' असे उत्सव साजरे केले जातात आणि `पूरनमसी आणि उमास' यांचे स्मरण केले जाते. ते गोमातेचे पूजन करतात. स्वत:ला गुरू नानकांचे अनुयायी मानतात. `गुरूग्रंथसाहेब' हा त्यांचा धर्मग्रंथ आहे परंतु रामायण, गीता आणि भागवत हे ग्रंथ ते विसरूच शकत नाहीत.
लग्नसमयी नवऱ्या मुलाचा यज्ञोपवीत-जानवे घालण्याचा संस्कार झालेला असणे आवश्यक आहे. वास्तविक लहान वयातच ब्राह्मणाकडून विधीपूर्वक जानवे घालण्याचा संस्कार करवून घ्यावा लागतो. तसे जर झाले नसेल तर लग्नाच्या आदल्या दिवशी हा संस्कार करवून घ्यावा लागतो. जानव्याला सिंधीमध्ये `जण्या' म्हणतात. या संस्काराच्या वेळी मुलास किंवा युवकास निरनिराळे मंत्र आणि सूचना देऊन हिंदू धर्माचे पालन करणे, गाईची पूजा करणे, आईवडिलांची सेवा करणे, झाडाखाली किंवा उंदराच्या बिळात लघवी न करणे, पापकर्मे न करणे. तसेच मनात काही भय निर्माण झाल्यास प्रार्थनेसाठी `$ नमो भगवते वासुदेवाय' किंवा `हरी $ नम:शिवाय' असे कानमंत्र देतात आणि त्याचा वेळप्रसंगी जप करण्यास सांगतात.
सिंधी लोकांत बालविवाहाची पद्धत नाही. तसेच विधवाविवाह व पुनर्विवाह यास विरोध नसतो. त्यांच्यामध्ये जातिभेद पाळला जात नाही. ही या समाजाची अभिमानास्पद रचना म्हणता येईल. महार, मांग, भंगी आदि उत्तरेकडे अस्पृश्य समजण्यात येणारे जातिवर्ग सिंधी समाजात आढळणार नाहीत. समाजरचनेच्या दृष्टीने सिंधींचे चार वर्ग पडतात. ते म्हणजे गोठाणा (खेडूत), भाईबंद (व्यापार-व्यवसायी), कामोरा-आमिल (सुशिक्षित सरकारी नोकरी वगैरे करणारे), सिंधवर्की (परदेशात व्यवसाय करणारे) असे होत. महाराष्ट्नतील सिंधी समाजातही वर्गवारी आहे. त्यांच्यात परस्पर रोटी-बेटी व्यवहार होत नाहीत. लग्नाआधी जन्मटिपण-पत्रिका इत्यादी पाहतात.
कष्ट,धार्मिकता आणि करुणा यांवर सिंधी समाजाचा विश्वास असतो. हा समाज जिथे स्थिरावतो तिथे त्यांची अशी संस्था उभी राहिलेली असते. शाळा, कॉलेजे, इस्पितळे, मंदिरे, धर्मशाळा आज सिंधी समाजाने उभ्या केलेल्या अनेक ठिकाणी दिसतील. भारताच्या विकासात आणि संपन्नतेमध्ये सिंधी लोकांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे याचाही सिंधी लोकांना खूप अभिमान वाटतो.
***

मानवाचे अविकासी उत्सव
``मांगल्य सारे पडले धुळीत
चोहीकडे नर्तन हिंस्रतेच े''
पाठ्यपुस्तकातील या कवितेतील वर्णन, तत्कालीन फाळणी-प्रसंगात सापडलेल्या एका दुर्भागी मातेने आपल्या दुरावणाऱ्या लेकरासमोर केले होते. त्या वेळची स्थिती फारच विदारक असणार, याची आताच्या पिढ्यांना कल्पनाही करता येणार नाही; पण सध्याच्या सामुदायिक उत्सवांचे जे काही चालले आहे त्याबद्दल काही बोलायचे असेल तरी याच ओळी तशाच लागू पडतील. दहीहंडी असो, गणपती असो, की स्वातंत्र्यदिन असो; प्रत्येकवेळी त्या कार्यक्रमांत कायदा-व्यवस्थेचा प्रश्न गंभीर व्हावा इतकी बेताल वर्तणूक सुरू झाली आहे. सणांचे उत्सव, उत्सवांची जत्रा, जत्रेचे उरूस, उरसाची दंगल आणि दंगलींतून हाणामाऱ्या.... हे आपले सार्वजनिक जीवन असेल तर या  स्वतंत्र समाजाला भवितव्य काय?

दहीहंडी हा धार्मिक आचार म्हणून श्रद्धावंतांचा सोहळा असेल तर तो गोपालकृष्णाच्या मंदिरात व्हावा, फारतर फार म्हणजे प्राथमिक किंवा पूर्वप्राथमिक शाळांतून साजिरा व्हावा. माजघरातल्या शिंकाळयांइतक्या उंचीची हंडी असावी, त्यात लोणी-खवा यांसह त्या बालकांसाठी खाऊ असावा. याला धार्मिक रूढी मानता येते. सध्याच्या थरारक  हंडीतून पैसे पाडायचे असतील तर तो साहसी खेळ नक्कीच आहे पण मग तो खेळण्याची जागा रस्ते आणि चौक ही नव्हे. पाण्याचे फवारे आणि नाचऱ्या पोरी हे भलतेच साहस कशासाठी? साहसी खेळ असेल तर त्यास काही नियम हवेत, स्पर्धा हवी, प्रेक्षकही हवेत. पण त्यात गांभीर्य हवे, एकतानता हवी, अभ्यासातून येणारी पात्रता हवी. आंतरराष्ट्नीय दर्जाने तो खेळ खेळायला हरकत नाही. परदेशांत असे थरारक खेळ जंगल-पर्वतांतूनही चालतात. बर्फावरच्या घसरगुंड्या (स्कीइंग) सगळया पश्चिम देशांत चालतात. परंतु तिथे परवानग्या, उत्तम साधने व पश्चात् काळजी असते. मुख्य म्हणजे त्यास कुणी धार्मिक श्रद्धा परंपरा असल्या भंकस सबबी जोडत नाहीत आणि कुणी पुढाऱ्याने त्या जोडू पाहिल्या तर त्यालाच त्या बर्फकड्यावरून ढकलतील.

येत्या गणेशोत्सवाची तशीच काळजी आहे. पुण्यासारख्या सभ्य म्हणवणाऱ्या शहरात ढोलपथकांची टूम बोकाळली आहे. या वाद्यांस मंजूळता आणि मांगल्य आहे असे पुणेकरांच्या दांभिकतेनेही म्हणता येत नाही. ही ढोलनृत्ये गावच्या जत्रेत माळावरती करायची असतात, दाट वस्तीत नव्हेत. जिथे शाळा-रुग्णालये-आयटीसारखे उद्योगव्यवसाय आणि आबालवृद्धांची सुखरूप वसती आहे, तिथे हा दणदणाट कशासाठी? गणपती हे पुणेकरांच्या बुद्धीवैभवाचे दैवत, असे या ढोलनाचांतून समजावे काय? लोकमान्यांच्या प्रेरणेचा हा विपर्यास आहे. लोक एकत्र यावेत, आनंद साजरा करावा यापेक्षा इतरांस उपद्रव द्यावा ही उत्सवांची कुठली रीत?

स्वातंत्र्यदिनाचे वैराग्य हे अधिक गंभीर आहे. स्वतंत्र, लोकशाही देशाचे नागरिक ध्वजवंदनासाठी जात नाहीत हे अजब आहे. शाळा किंवा सरकारी हपिसांत सक्तीच केली म्हणून तिथे बापुडवाणा उत्सव होतो. जेथे दोन-पाच कर्मचारी असतात अशा जागी हा सोपस्कार उरकला जातो, त्यामानाने पोराटोरांच्या शाळेत चार पुढारी व त्याचे आठ चमचे एवढे तरी जमतात. पण ते तरी त्या बालकांना राष्ट्न्प्रेम कशाचे समजावणार? पोरं पुढं घावली म्हणून त्यांना आपल्या पक्षांतराचे शिक्षण कुठे मिळते हेच राष्ट्नीय धोरण ते समजतात. परंतु जे चार बुके शिकलेत, ज्यांना देश कळतो, समाज कळतो, स्वातंत्र्य किंवा प्रजासत्ताक कळते अशा बायाबापयांनी ध्वजवंदनासाठी तासभर देण्याइतकेही राष्ट्नीयत्त्वाचे दर्शन घडवू नये?

उद्या गरबा आणि नवरात्रांत मध्यानरात्री रस्त्यावर नाचायला आपल्या अंगी देवी संचारते. रंगपंचमी, दिवाळीची फटाकेबाजी, लग्नकार्यातले डॉल्बी.... अशा अनेक उत्सवांतून आपल्या कोणत्याही रसिकतेचे, परंपरेचे, धार्मिकतेचे, एकत्त्वाचे दर्शन होत नाही; परंतु उथळ उल्लूगिरीचे प्रदर्शन मात्र इतरांस सोसावे लागते. यात मानवी सद्भावनांचा सुतराम संबंध नाही. कोणी गब्बर राजकारण्याने वा मंत्र्याने दहीहंडी उत्सवांतील धार्मिक परंपरेचे महत्त्व सांगावे यासारखा विनोद नाही. त्यांच्यापेक्षा उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना या देशाच्या धार्मिक आणि सामाजिक परंपरांची जाण निश्चितच जास्त असणार. कुणी न्यायालयाच्या निर्णयांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाईल, तिथे तात्पुरता दिलासा मिळेल, किंवा कायमची बंधनेही येतील, किंवा हातात झुंडसत्ता असल्याने कायदाही हवा तसा करेल पण ही निखालस अधार्मिक परंपरा आहे हे समजून असावे. झुंडांनी धर्माचाच असला उत्सव मांडावा, नागरिकांनी गरबा खेळावा आणि तरूण पोरींनी फेटा बांधून ढोल बदडावेत यात ज्यांना धर्म, संस्कृती, परंपरा, सामाजिकता, परस्परहित वगैरे मूल्ये दिसत असतील त्यांना ती लखलाभ असोत! यात `मानवी विकासा'चे  चिन्ह जगाला दिसत नाही.
संयुक्त राष्ट्नंच्या मानवाधिकार आयोगाने मानवी विकासाचे मूल्यांकन करण्यासाठी तीन प्रमुख निकष निश्चित केले आहेत. आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य, शैक्षणिक विकासाचा स्तर आणि एकंदर राहणीमान या शीर्षा (हेड्स) अंतर्गत प्रदूषण, दळणवळण, परस्परसंबंध, नावीन्याचा शोध, सामाजिक सुरक्षितता अशा अनेक मानवसुलभ व्यवहारांचे मूल्यांकन होते. वाहतूक-कोंडी, अस्वच्छता, रोगप्रसार, इतरांबाबत बेमुर्वतखोरी, असुरक्षितता व भय इत्यादींची दखल घेतली जाते. सार्वत्रिक विफलता व अनाचार असूनही, आहे त्यात समाधान मानणाऱ्या संतवृत्तीला त्यात गुण नाहीत कारण ती `मानवी' वृत्ती नव्हे असे ते म्हणत असतील. २०१४ चा `मानव विकास अहवाल' हा २०१३ च्या परीक्षणावर आधारित असतो, तो नुकताच जाहीर झाला आहे. व्यापक सर्वेक्षण आणि अभ्यासांच्या आधारे तयार होणारा हा अहवाल १८७ देशांचे गुणानुक्रम सांगतो. त्यातील नॉर्वेचा निर्देशांक ९४.४%, तो सर्वोच्च आहे. तिथे रस्त्यात गाडीचा हॉर्न वाजवला तर त्याचे कारण सिद्ध करावे लागते. त्या तुलनेत भारताचा क्रमांक १३५ वा आहे. चीन, श्रीलंका  आपल्या आधीच्या क्रमांकावर आहेत. पण दु:खात सुख मानून पुन्हा ढोल बडवायचे असतील तर पाकिस्तान-बांगलादेश हे आपल्या मागे असून नायजर, निकाराग्वा, कांगो, झांबिया हे कुठलेसे अपरिचित देश ढोक नंबरात आहेत. अहवालातील विश्लेषण असे वाचनात आले की, हे मानवसमूह नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तीचे सहजी भक्ष्य बनतात; आणि त्यांतून ते काही शिकू इच्छित नाहीत व ते अधिकच अगतिक बनतात. `कमालीच्या हीन व असुरक्षित आघातांनी ग्रस्त असे काही मानवी समूह आहेत.' भारत त्यापैकी एक-१३५ वा क्रमांक-असावा?

या वास्तवांकडे दुर्लक्ष करून सभ्यता व न्याय यांना डाफरणारे उत्सवसम्राट व त्यांच्या ढोलतालांवर नाचणारे आपण लोक कधी बाहेर पडणार आहोत? यात मानवकेंद्रित मूल्यांना कुठे स्थान असणार? `ज्यांना एवढी शांतताच हवी असेल त्यांनी इथं गावात कशाला राहावं' असाही त्यांचा सवाल येईल. त्यामुळे हे असले अहवाल, मूल्यांची जाण किंवा उत्सवांतील गैर बाबींविषयी विरुद्ध मत ऐकू जाईल किंवा ऐकले जाईल हा संभव कमी. गणपती किंवा दुर्गेलासुद्धा डॉल्बी-फटाक्यांसह खच्चून ओरडले तर करुणा येत नाही, तिथे तिच्या या भक्तगणात  हा आकांत जुमानणारे कोण असणार?
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन