Skip to main content

4Nov.2014

न र्म दे ह र !
आम्ही उभयतांनी नुकतीच नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण केली. साधारणपणे ३२०० किमी. अंतर चालण्यास १२५ दिवस लागले. केवळ नर्मदा मैय्याच्या कृपेमुळेच ही परिक्रमा कोणतीही अडचण न येता व त्रास न होता आनंदाने पूर्ण झाली. म्हणतात ना, `मूकं करोति वाचालं पङ्गुं लंघयते गिरिम् ।
      यत्कृपा तमहं वन्दे परमानन्द माधवम् ।'
नर्मदा मैय्या उजव्या हाताला ठेवून तिच्या तीरावरून पूर्ण प्रदक्षिणा घालणे म्हणजे परिक्रमा. साधारणपणे मध्यप्रदेशमधील आेंकारेश्वर तीर्थक्षेत्रातील गोमुख घाटावर परिक्रमेचा संकल्प करून, अंकलेश्वर मार्गे कठपोरला समुद्र पार करणे, मीठीतलाईपासून उत्तर तटावरून गरुडेश्वरमार्गे अमरकंटकला जल अर्पण करणे व ज्या कुंडातून मैय्या उगम पावली आहे त्या कुंडातील जल घेऊन परत दक्षिण तटावरून होशंगाबादमार्गे आेंकारेश्वर गोमुख घाटावर परिक्रमा पूर्ण होते. मग मैय्या ओलांडून आेंकारेश्वरला $ आकाराच्या डोंगराची म्हणजे `मधांताची' परिक्रमा करावी. घरी परतल्यावर आप्तेष्टांसमवेत मैय्या पूजन करून कन्या पूजन व महाप्रसाद करतात.
परिक्रमेचे संकेत :
चतुर्मासामध्ये परिक्रमा चालू ठेवता येत नाही.
परिक्रमेमध्ये पुरुषांनी व स्त्रियांनी पांढरा वेश परिधान करावा.
परिक्रमा काळात शृंगार न करता, दाढी-केस न कापता संन्यस्त वृत्तीने राहावे. आपले साहित्य आपल्या पाठीवर घेऊन मैय्याच्या सान्निध्याने आनंद व संतोष मानून चालावयाचे असते.
सूर्यास्तानंतर चालू नये. मैय्यामध्ये पोहू नये. तीरावर बसून स्नान करावे, साबणाचा वापर टाळावा.
कॉटवर झोपू नये.
समोरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना `नर्मदे हर' पुकारून अभिवादन करावे व इतरांनी केलेल्या अभिवादनाला `नर्मदे हर' म्हणून प्रतिसाद द्यावा.
शक्यतो स्नान, पूजन करून चालावयास सुरुवात करावी. उलटे मागे फिरू नये.
परिक्रमा मार्गावर अनेक आश्रम, मंदिरे आहेत. तिथे राहण्याची, जेवणाची व्यवस्था (विनामूल्य) होते. गावामध्ये शाळेत किंवा मंदिरात राहावे लागते. स्थानिक भक्त लोक सर्व व्यवस्था, सेवा भक्तीपूर्वक करतात. ज्या ठिकाणी मनुष्यबळ कमी आहे अशा ठिकाणी शिधा (सदावर्त), भांडी व सुविधा मिळतात. आपले आपण अन्न शिजवून भोजन करावे लागते. पण त्यातसुद्धा एक वेगळाच अनुभव असतो.
आपल्याजवळील साहित्याचे वजन ५ किलोपेक्षा जास्त नसावे. परिक्रमेपूर्वी नर्मदा पुराण तसेच जगन्नाथ कुंटे, नर्मदा प्रसाद, भारती ठाकूर, श्रीराम महाराज बडवाह इ. परिक्रमावासियांची पुस्तके वाचावीत. इंटरनेटवर अधिक माहिती उपलब्ध आहे.
परिक्रमा करताना हे करावे - गरज कमी करा, निर्भय व्हा, विकार कमी करा. सहनशीलता वाढवा, सहकाऱ्यांचे ऐका. सुसंगती-संतसंगती-सत्संग यांचा लाभ घ्या. श्रद्धा व सबूरी वाढवा, जे समोर येईल, जी व्यवस्था उपलब्ध असेल तिचा विनातक्रार स्वीकार करा. जे समोर येईल, जी व्यवस्था उपलब्ध असेल तिचा विनातक्रार स्वीकार करा. शरीराचे व मनाचे तप म्हणजेच तपश्चर्या करा. आसक्ती कमी करा. आश्रमात/मंदिरात भोजनासाठी व मुक्कामासाठी राहाल तेव्हा शिक्का/सील घ्या.  प्रातर्विधी बाहेर करावयाचे असल्याने पहाटे लवकर उठावे व आदले दिवशी रात्रीच व्यवस्थेची व पुढील मार्गाची चौकशी करून ठेवावी. स्थानिक लोकांच्याकडे मार्गाची चौकशी करा.
परिक्रमा करताना हे टाळावे - १) राजकारण/विवादित सामाजिक मुद्द्यांवर चर्चा २) दुराग्रह ३) अन्न व व्यवस्थेला नावे ठेवणे, अन्न टाकणे ४) कोणावरही टीका टिप्पणी, वाद  ५) कोणीही चहासाठी, जेवणासाठी बोलावले तर त्याला डावलू नये. शक्य नसेल तर सन्मानपूर्वक नकार द्यावा. ६)मोठा ग्रुप करू नये, गैरसोयीचे होते.
परिक्रमेचे लाभ : संकल्पामुळे ताकद येते, विकार कमी होतात, तपश्चर्येमुळे वैराग्य येते, उन्नतीकडे वाटचाल होते. वजन कमी होऊन शरीर निरोगी बनते. आपल्या योगक्षेम भगवंत चालवतो ही श्रद्धा दृढ होते. परिक्रमेमध्ये भेटलेली अनेक माणसे प्रेमाने नातेवाईकांप्रमाणे जवळची होतात. घेताना कमीपणा नाही व देताना मोठेपणा नाही. दोन्हीमध्ये सारखाच आनंद आहे याची जाणीव होते. लोकांकडून एवढ्या सेवा घेतल्यावर पुढील आयुष्यात सेवा देण्याची वृत्ती निर्माण होते.
श्री गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, डोंगरे महाराज यांच्या वास्तव्याने आद्य शंकराचार्य, वासुदेवानंद सरस्वती (टेम्बे स्वामी), रंगावधूत स्वामी, आद्य परिक्रमावासी गौरीशंकर, धुनीवाले बाबा, सियाराम महाराज इ. परिक्रमावासी तपस्वींच्या तपश्चर्येमुळे निर्माण झालेली एक वेगळीच ऊर्जा परिक्रमा करताना प्राप्त होते. मैय्येने या सर्वांना प्रत्यक्ष दर्शन दिले आहे. अजूनही मैय्या परिक्रमावासीयांच्या सर्व इच्छा पूर्ण करते व दर्शन देते. अडचणीच्या वेळी कोणत्या ना कोणत्या रूपाने उभी राहून मदत करते याचा अनुभव परिक्रमेमध्ये येतोच येतो. आपली जेवणाखाण्याची, राहण्याची सर्व व्यवस्था मैय्या इतकी करत असते की आपल्या नियोजनाप्रमाणे काही न होता तिच्या इच्छेप्रमाणे सर्व काही घडते याचा साक्षात्कार परिक्रमेमध्ये होतो. साध्या सुध्या खायच्या इच्छेपासून ते दर्शनाच्या व सिद्धीच्या प्राप्तीपर्यंत सर्व इच्छा परिक्रमेमध्ये पूर्ण होतात.
आम्हा उभयताना ज्या गोष्टी खाण्याची इच्छा निर्माण झाली त्या मैय्याने त्वरित पूर्ण करून दिल्या. एकदा सौ.ना लिंबू पाण्याची इच्छा झाली. सात-आठ दुकानात  लिंबू मिळाला नाही पण पाच-दहा मिनिटांत एक लहान मुलगी धावत आली आणि लिंबू देऊन गेली. काही अनुभव थक्क करणारे आहेत.
नर्मदा परिक्रमेविषयी कुणाला उत्सुकता असेल तर संपर्क साधावा :
शंभो रामचंद्र गाडगीळ (९८८१२९१५०१),
सौ.अपर्णा गाडगीळ (९४०४३६८५३६),
किर्लोस्करवाडी (जि.सांगली)

पर्यावरणी अंत्यविधी
वृक्षवल्ली आम्हा सोयरी-वनचरे, हे वाचून-ऐकून आपण लहानाचे मोठे झालो. मध्यंतरी एक बातमी वाचली, दरवर्षी अंत्यसंस्कारासाठी ९० लाख झाडे तोडली जातात. एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ८ मण लाकडांसाठी  २ झाडे तोडली जातात. आपण उभ्या आयुष्यात एखादं झाडही लावत नाही, जगवत नाही, मग इहलोकीची यात्रा संपवताना झाडे तोडून हानीला आपण कारणीभूत का व्हावे?
यावर उपाय काय? परवा कराड नगरपालिकेने शहरातील स्वयंसेवी संस्थांची एक बैठक बोलावली होती. त्या चर्चेतून प्रश्नांची उत्तरे मिळाली. मोठ्या शहरांमध्ये दहनासाठी विद्युत दाहिनी, डिझेल दाहिनीचा वापर केला जातो. शहरांमधील डेथ-रेशो (मरण गुणोत्तर) जास्त असल्यामुळे त्याची देखभाल व खर्च परवडतो. पण त्यामधूनही पर्यावरणाची थोडीफार हानी होतेच. सगळयात चांगला मार्ग म्हणजे शेणी किंवा गोवऱ्या वापरणे. शेणीमध्ये दहन करण्यासाठी पाया तयार होण्यासाठी अडीच मण लाकूड पुरते. स्मशानभूमीमध्ये फायर ब्रिक्सचा बेस तयार केला तर ही लाकडेसुद्धा लागत नाहीत. साधारण ४०० शेण्यांमध्ये दहन होते. त्याची किंमत जास्तीत जास्त ८००रुपयांपर्यंत जाते. फक्त २०० ग्रॅम कापरामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते. ८ मण लाकडाची किंमत २४००रु. होते. शिवाय मीठ, रॉकेल हे इतर साहित्य. शेणाचा उष्मांक लाकडापेक्षा जास्त असल्याने शेणी लगेच पेट घेतात. लाकूड पद्धतीमध्ये खालून वर दहन होते तर शेणी पद्धतीमध्ये वरून खाली दहन होते. यामुळे स्मशान शेडच्या पत्र्यांची हानी कमी होते. शेणींमध्ये हळूहळू दहन होत असलेने दहनाची प्रक्रिया व्यवस्थित होते. लाकडाच्या तुलनेत शेणींची राख ४ पोत्यांऐवजी २ पोतीच होते. हीच राख रक्षाकुंडामध्ये साठवल्यास शेतामध्ये पसरण्यास उपयोग होतो.
शेणी पद्धतीने दहन करण्यामधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे शेणी आणि त्याची उपलब्धता. जनावरांचे शेण आणि कडबा पाचोळा यापासून शेण्या बनवल्या जातात. शेतकरी शेणी बनवत नाही तर कंपोस्टखत तयार करतो. शेतमजूर महिलांकडे कच्च्या मालाची उपलब्धता नसल्याने त्या खत करू शकत नाहीत, त्या शेणी करण्यास प्राधान्य देतात. पावसाळयात जळणासाठी मुख्यत्वे शेण्यांचा वापर केला जातो. शेतमजुरी करणाऱ्या महिलांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बचतगटांची स्थापना केली आहे. बचतगटांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. दोन म्हशी व दोन गाईचा गोठा बांधून दिला जातो. यामुळे शेणाची उपलब्धता असते. त्यांना प्रतिशेणीला एक रुपया दर देऊन शेणी विकत घेता येते. पावसाळयाचा काळ सोडल्यास शेण्या सदैव उपलब्ध असतात. कराडच्या वाळिंबे दांपत्याने शांतीभाई शहा व नितीन शहा यांच्या सहकार्याने एका महिन्यात ४०हजार शेण्या गोळा केल्या. कोल्हापूरमध्ये या शेणी उद्योगाला व्यावसायिक स्वरूप दिलेले असल्याने मुख्य विक्रेत्याकडे मोठ्या प्रमाणात शेणी आणून दिल्या जातात. साताऱ्यामध्ये बचतगटातील महिला साचा बनवून मशीनद्वारे शेण्या बनवतात. यामुळे साताऱ्यात १००% शेणींद्वारे अंत्यसंस्कार केले जातात. या उद्योगामुळे पर्यावरणाची हानी टळण्याबरोबरच ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळणार आहे.
अंत्यसंस्कारासाठी कोल्हापूर-सातारा या गावांचा आदर्श सर्वांनी घ्यावा. शेणी पद्धतीचा अवलंब केल्यास `मरावे परि पर्यावरणपूरक उरावे' याचे समाधान मिळेल.(आयुर्वेदामध्ये स्वर्ण भस्म करताना १द१फूटाचा खड्डा काढून त्यामध्ये शेण्या घालतात व नंतर ते पेटवून भस्म करतात. म्हणजे पूर्वीपासून ही पद्धत आहे, असे समजले.)
(याविषयी काही चूक, गफलत, सूचना असल्यास बदल सुचवावेत.)
- विवेक ढापरे,
२८६, शुक्रवार पेठ, कराड
मोबा. ७५८८२२११४४

अनोखे सलून
एखाद्या नवीन प्रदेशात गेल्यावर तिकडील प्रसिद्ध व प्रेक्षणीय स्थळे लक्ष वेधून घेतात. त्यासोबत काही लहान गोष्टीही आपल्या मनावर ठसा उमटवतात. चार वर्षांपूर्वी आम्ही उभयता क्रॅनडाला गेलो असता याचा प्रत्यय आला.
मी ज्यांच्याकडे उतरलो होतो, त्या लिमयेंसोबत सलूनमध्ये गेलो. एका मध्यम प्रतीच्या इमारतीत `बी अॅन्ड बीज' नावाचे अद्ययावत् सलूनमध्ये एक पुरुष व एक स्त्री कारागीर केशकर्तनात व्यग्र होते. पुढची खोली प्रशस्त होती. त्यामागे दुसरी मोठी खोली दिसली. आम्ही सलूनमध्ये पोहोचताच सुहास्य मुद्रेने स्वागत झाले. मला कटिंग करायचे नसल्याने इकडे तिकडे न्याहाळत राहिलो. तेव्हा रेग्युलर कटकरता १७ क्रॅनेडियन डॉलर (त्यावेळी १ क्रॅनेडियन डॉलर = ४० रु. दर होता) सिनीअर सिटीझन्सकरता १३ डॉलर दर असल्याचे वाचले. मागील खोलीत डोकावून पाहिले तेव्हा सोफ्यावर चारपाचजण पुस्तके/मासिके वाचत बसलेले दिसले. भिंतीलगत पुस्तकांनी भरलेली कपाटे होती. असे वाटले की, त्या बाजूला लायब्ररी असावी. पुरुष कारागिराने `आतमध्ये निवांतपणे बसून वाचन करू शकता' असे सुचवले. आत जाऊन पाहतो ती चारी बाजूला उत्तमोत्तम पुस्तके व्यवस्थित लावून ठेवलेली दिसली. सलूनला जोडून हा लायब्ररी व्यवसाय असावा असे वाटले. पण तसे नव्हते. एक छानसे पुस्तक चाळत बसलो. श्री.लिमये यांचे केस कटिंग होताच बाहेरच्या खोलीत आलो. कॉफी घेऊन झाल्यावर लेडी कारागीर त्यांना म्हणाली, `मी परवा एक छानसे पुस्तक विकत घेतले आहे. ते तुला बहुतेक आवडेल. पुढच्या वेळेला येण्याअगोदर सेलवर आठवण कर म्हणजे मी ते घेऊन येईन.' तेव्हा कळले की बहुतेक गिऱ्हाईके महिन्या-दोन महिन्यानी केशकर्तनालयात येतात तेव्हा नेलेली पुस्तके आणतात व जाताना हवी असणारी पुस्तके नेतात. या संबंधात कुठलेही चार्जेस नाहीत. केशकर्तनाचे वेळी दोन्ही कारागीर व गिऱ्हाईके नव्या-जुन्या पुस्तकांविषयी व तत्सम वाचनीय साहित्याबद्दल गप्पागोष्टी करतात. एकमेकांची आवडनिवड व जिव्हाळा जपण्याच्या भावनेतून साहित्यसंदर्भात त्यांच्या गप्पा रंगतात असे समजले. अशा प्रकारचे केशकर्तनालय-कम-साहित्यदालन असणारे अनोखे सलून अन्यत्र कुठे असेल असे वाटत नाही.
- सिद्धराज माधव केळकर ६, पद्मदर्शन सोसायटी, पुणे-०९
फोन (०२०) २४२२८६१४

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन