Skip to main content

1Dec.2014

`मानव संसाधन'या विस्तृत कल्पनेच्या अंतर्गत शिक्षण हा विषय अंतर्भूत आहे. 
सांगली शिक्षण संस्थेच्या शताब्दी-उत्सवाच्या निमित्ताने, 
पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू श्री.शं.ना. नवलगुंदकर यांनी व्यक्त केलेले विचार...
शिक्षण म्हणजे संस्कार
अमेरिकेतील एका विद्यापीठाच्या आवारात मी उभा होतो. मला त्या विद्यापीठाच्या कार्यालयात जायचे होते, पण रस्ता सापडत नव्हता. तिथे उभ्या असलेल्या एका अमेरिकन महिलेला मी विचारले, ``कार्यालय कोठे आहे?'' त्या बाईने दिलेले उत्तर मला विचार करायला लावणारे होते. त्या बाई म्हणाल्या, ``मला कार्यालय कुठे आहे हे माहीत आहे, पण आत्ता मी कोठे आहे हे माहीत नाही!'' माणसाला जीवनाच्या वाटचालीसाठी दोन बिंदू माहीत असावे लागतात; आपल्याला कोठे पोहोचायचे आहे आणि आपण सध्या कोठे आहोत. एक उद्दिष्टबिंदू आहे, तर दुसरा आरंभबिंदू आहे. एर्वीलरींळेप हा शब्द मूलत: एर्वी आणि ज्ञीरींळे या दोन शब्दांपासून बनला आहे. एर्वी या शब्दातून, आपण कोठे आहोत याची, तर ज्ञीरींळे या शब्दापासून आपले उद्दिष्ट कोणते आहे याची अभिव्यक्ती होते. मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. बुद्धी, मन आणि शरीर हे व्यक्तिमत्त्वाचे तीन घटक आहेत. मनुष्याची बुद्धी कुशाग्र, मन उदात्त आणि शरीर सुदृढ हवे, ते होण्यासाठी शिक्षण आवश्यक असते.
शिक्षण हा संस्कार आहे. तो संस्कार पदार्थमात्रावरही होतो. त्यातून पदार्थाचे गुणात्त्मक परिवर्तन होते. उदा.निसर्गातून मिळालेल्या कापसावर संस्कार करून त्याचे सूत काढता येते. सुतावर संस्कार करून त्याचे कापड बनते, तर कापडावर संस्कार करून त्याचे कपडे बनवितात; त्यातून आपले वैभव वाढते. पदार्थमात्रावरील संस्कारांच्या मुळाशी आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. त्याच्या मुळाशी आहे वैज्ञानिक दृष्टी किंवा शास्त्रीय वृत्ती. या वृत्तीच्या विकासामुळे आपण कोणत्याही गोष्टीचे कारण आणि त्याचे परिणाम यांच्यातील संगती प्रस्थापित करू शकतो. त्यातून संशोधन-प्रक्रिया होऊ शकते; त्याचप्रमाणे समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनालाही मदत होते. उदाहरणार्थ माणूस कामाला निघाला व त्याच्या वाटेत मांजर आडवे गेले तर नियोजित काम होत नाही अशी एक समजूत आहे. वास्तविक मांजर आडवे जाणे आणि काम होणे, किंवा न होणे यांचा परस्पर काहीच संबंध नाही. शिक्षण या संस्कारातून जर तशी शास्त्रीय वृत्ती विकसित झाली तर समाजातील तर्कदुष्ट रूढी, प्रथा, परंपरा व समजुती नष्ट होण्याला मदत होईल.
पदार्थमात्रावरील संस्कारांतून जो भौतिक विकास होतो त्याला सभ्यतेचा(सिव्हिलायझेशन) विकास म्हटले जाते. सभ्यतेच्या विकासामुळे समाजजीवनच बदलून गेले आहेे. माणसाच्या असाधारण बुद्धीमुळे निरनिराळया क्षेत्रात अनेक शोध लागले, व मनुष्याच्या जीवनात परिवर्तन झाले आहे; परंतु प्रश्न आहे तो मनुष्यांतील मनुष्यत्वाचा. मानवी जीवनात बुद्धीच्या तुलनेने, उत्कट भावना व सुदृढ शरीरयष्टी या व्यक्तिमत्त्वाच्या महत्त्वाच्या दोन घटकांना दुय्यम स्थान मिळालेले दिसते. शिक्षण हा संस्कार असल्यामुळे पदार्थमात्रावरील संस्कारांबरोबरच मन आणि शरीर यांच्यावरील संस्कारांना तितकेच महत्त्व दिले पाहिजे. मनावरील संस्कारांतून मूल्यात्मक संस्कृतीचा विकास होतो. संस्कृतीला मनुष्याच्या जीवनात सभ्यतेइतकेच महत्त्वाचे स्थान आहे. सभ्यता म्हणजे आपण काय करतो ते; तर संस्कृती म्हणजे आपण काय आहोत ते!
ब्रिटिशांच्या राजवटीत, सभ्यतेला व पश्चिमेकडील जीवनपद्धतीला भारतात विशेष महत्त्व दिले गेले. लॉर्ड मेकॉले याचे स्वप्न असे होते की, भारतीय समाज हा रक्ताने भारतीय व संस्कृतीने पश्चिमी असेल. जडवाद, व्यक्तिवाद आणि उपयुक्ततावाद असे तीन विचार पश्चिमी देशात विकसित झाले. जडवादानुसार भौतिक सुख हे जड वस्तूतून मिळते, तेच खरे सुख असते. परिणामत: मनुष्याच्या जीवनात वस्तूंना खूप महत्त्व प्राप्त झाले, त्या तुलनेने जीवनातील मनुष्यत्वाचे स्थान दुय्यम ठरले. व्यक्तीवादानुसार असे मानले गेले की, व्यक्तीला आपले हित समजते. प्रत्येक व्यक्तीने आपले हित साध्य केले की समाजाचे हित आपोआपच साधले जाईल. म्हणून समाजाने व्यक्तीच्या हितसंबंधात हस्तक्षेप करू नये, म्हणजेच समाजहितापेक्षा व्यक्तीहिताला प्राधान्य दिले गेले. उपयुक्ततावादानुसार वस्तूचा जोपर्यंत उपयोग आहे तोपर्यंत ती वस्तू जवळ ठेवावी. उपयोग संपला की ती वस्तू टाकून द्यावी. हा `यूज अॅन्ड थ्रो' दृष्टिकोण टोकाला गेला. मग माणसालाही जडवस्तूसारखे मानले गेले. जोपर्यंत माणसाचा उपयोग होतो तोपर्यंत त्याला सांभाळावे, त्याचा उपयोग संपला की त्यालाही टाकून द्यावे. या समजुतीला व्यक्तीचे आईवडीलही अपवाद नाहीत. पश्चिमेच्या समाजातील अनेक कुटुंबांमध्ये अशी स्थिती आली आहे. त्याउलट भारतीय संस्कृतीने विकसित केलेली जीवनमूल्ये ताडून पाहावीत, म्हणजे त्यांचे वेगळेपण लक्षात येईल. आपल्याकडे चेतनाला तर चेतन मानले जातेच, पण जडातही आपल्याला चैतन्य दिसते. उदाहरणार्थ आपण घर बांधताना भूमीपूजन करतो. भूमी ही वास्तविक जड आहे. परंतु तिला चैतन्यमय मानून आपण तिची पूजा करतो. मंदिरातील मूर्ती दगडाची, धातूची किंवा अन्य जडवस्तूची असते, पण आपण त्या अचेतनालाही देव मानतो. त्याचप्रमाणे आपण  आईवडील यांना आणि शिक्षकालाही देवासमान मानतो, गुरूपौर्णिमा साजरी करतो. आपल्याकडे आलेल्या पाहुण्याला आपण कपभर चहा देतो. चहा आपण देत असलो तरी त्यामागे आपली समाजाबद्दलची कृतज्ञतेची भावना अशी असते की, या चहाच्या कपामागे शेतकरी, कामगार, व्यापारी इत्यादी हजारोंचे हात आहेत. अन्य व्यक्तींच्या सुखदु:खात आपण भावनेने समाविष्ट होतो. एका संस्कृत कवीने हे स्पष्ट करण्यासाठी उदाहरण दिले आहे. चुलीवर दूध तापवले जात असता कालांतराने ते उतू जाते. ते का उतू गेले, असा प्रश्न विचारून कवी त्याचे उत्तर देतो की, दुधातील पाणी जळाले याचे दुधाला दु:ख झाले म्हणून त्याला कढ येऊन ते उतू गेले. उतू जाणाऱ्या दुधात चार थेंब पाण्याचा शिंतोडा दिला तरी ते खाली बसते. ते खाली का बसले, असा पुन्हा प्रश्न करून कवी त्याचे उत्तर देतो की, गेलेले पाणी परत मिळाले याचा दुधाला आनंद होतो म्हणून ते शांत होऊन खाली बसते. दूध आणि पाणी यांचा जसा संंबंध आहे तसा माणूस आणि समाज यांचा संंबंध आहे.
भारताच्या मूल्यात्मक संस्कृतीचा असाच प्रत्यय स्वामी विवेकानंदांच्या संदर्भातील एका उदाहरणातून येऊ शकेल. शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेत स्वामीजींचे भाषण झाले. त्या भाषणाची सुरुवात, `अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो' या शब्दांनी त्यांनी करताच टाळयांचा प्रचंड गजर झाला, ही तर वास्तव घटना आहे. सर्व पुरुष हे बंधूसमान आणि सर्व स्त्रिया भगिनीसमान आहेत ही व्यापक कल्पना तेथील श्रोत्यांना नवीन होती; त्यामुळे त्यांनी टाळया वाजवून प्रतिसाद दिला. आपल्याकडे कोणत्याही वक्त्याकडून `बंधू-भगिनींनो' अशी सुरुवात होतेच, त्याचे आपल्याकडे महत्त्व वाटत नाही. त्यामुळे पहिल्याच संबोधनाला कोणी टाळया वाजवत नाही. या आणि अशा प्रकारच्या व्यापक आणि उदात्त विचारातून व्यक्तिगत आणि सार्वजनिक चारित्र्याची अभिव्यक्ती होते. माणसातील माणूसपण जागृत होते.
मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाचा तिसरा घटक आहे समृद्ध शरीर. `शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्' असे सुप्रसिद्ध सुभाषित आहे. धर्म म्हणजे कर्तव्य होय. कर्तव्ये चार प्रकारची असतात - स्वसापेक्ष, परसापेक्ष, भौतिक आणि आध्यात्मिक. आपले स्वत:विषयीचे कर्तव्य, आपले दुसऱ्याविषयीचे कर्तव्य, आपले जडवस्तूबद्दलचे कर्तव्य, आणि आपले ईश्वराविषयीचे कर्तव्य असे हे प्रकार आहेत. या कर्तव्यांची परिपूर्ती करण्यासाठी प्रसन्न मन आणि सुदृढ शरीर आवश्यक असते. विविध मार्गांनी शरीरसौष्ठव प्राप्त करता येते. आपल्या धर्मसंस्कृतीने सामर्थ्यालाही देवत्त्व दिले आहे. हनुमान हे त्याचे एक प्रतिक आहे.
शिक्षणाचा प्रवास मुख्यत: ज्ञानाच्या दिशेने असला पाहिजे. विविध परीक्षा हे ज्ञानप्राप्तीच्या पडताळणीचे महत्त्वाचे साधन आहे, ते साध्य नव्हे. कोणत्याही परीक्षेत मिळालेले गुण हा व्यक्तीच्या गुणवत्तामापनाचा एक महत्त्वाचा घटक आहे असे मानले पाहिजे. परीक्षेची तयारी करणे ही कष्टाची, पण तशी तांत्रिक स्वरूपाची गोष्ट आहे. त्याकरिता खाजगी वर्ग, मार्गदर्शक पुस्तके इ. उपलब्ध असतात. त्यांचाच केवळ उपयोग करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या दृष्टीने शाळेतील शिक्षक, क्रेमक पुस्तके व संदर्भग्रंथ यांचे महत्त्व कमीच असते. त्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींना परीक्षेत गुण मिळतात, पण त्यांच्यातील गुणवत्तेचा पूर्णत: विकास होतोच असे नाही. गुणवत्तेच्या बाबतीत परीक्षेत मिळणाऱ्या गुणांबरोबरच जीवनमूल्यांचाही अंतर्भाव केला पाहिजे. विद्यार्थी-विद्यार्थिनींची गुणवत्ता हा पालकांच्या व शाळेच्या संस्कारात्मक उंचीचा एक मापदंड आहे.
थोर व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाच्या प्रभावामुळे शिक्षणाला योग्य ते वळण मिळू शकते. स्वातंत्र्यपूर्व काळात लो.टिळकांनी ज्या चतु:सूत्रीचा पुरस्कार केला त्यातील महत्त्वाचे असे एक सूत्र म्हणजे राष्ट्नीय शिक्षण. आपण सर्व एक आहोत ही एकात्मतेची भावना, आपण अन्य समाजांहून भिन्न आहोत ही पृथगात्मकतेची भावना, राष्ट्नीय स्वातंत्र्यावर निरपेक्ष निष्ठा, आणि समाजाचा सर्वांगीण उत्कर्ष या उंचीच्या तत्त्वांची `राष्ट्नीय' या संकल्पनेतून अभिव्यक्ती होते. लोकमान्यांनी संस्कारात्मक शिक्षणाला त्या संदर्भात महत्त्व दिले आहे.
या सर्वांत शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षक-शिक्षिकांची भूमिका महत्त्वाची आहे. आपण शिक्षण क्षेत्रात आलो याचा त्यांना अभिमान वाटला पाहिजे. नोकरीच्या अन्य संधी हुकल्या म्हणून मी या क्षेत्रात आहे, अशी स्थिती असता कामा नये. त्यांनी अखंड वाचन, चिंतन आणि संशोधन केले पाहिजे. आपण प्राप्त केलेले ज्ञान विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये संक्रेमत करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे असले पाहिजे. शाळेतल्या मुला-मुलींवर अपत्यवत प्रेम केले पाहिजे. मनाने आईसारखे प्रेमळ आणि वडिलांसारखे बाह्यदर्शनी कठोर असे असले पाहिजे. त्यातून शिस्तीचे वातावरण निर्माण होण्याला मदत होते. मुलांसमोर स्वत:चा आदर्श त्यांनी निर्माण केला पाहिजे. आपल्या हाताखालून उत्तीर्ण होऊन गेलेले कितीतरी विद्यार्थी-विद्यार्थिनी समाजातील विविध क्षेत्रांत उंची गाठू शकले याचा होणारा आनंद अपूर्व असतो. असे उंच गेलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी, गुणवंत शिक्षक-शिक्षिकांविषयीचा नितांत आदरभाव सातत्याने बाळगतात आणि तो व्यक्तही करतात.
आजची उमलती पिढी बुद्धिमान आहे. त्यांच्यात परिस्थितीजन्य बुद्धिमत्ता विकसित झालेली दिसते. काहीजणांना मात्र भविष्यकाळात आपले काय होईल याची काळजी वाटत असते. त्यातून एक प्रकारची पोकळी त्यांच्या मनात निर्माण होते. ती पोकळी भरून काढण्यासाठी सांगली शिक्षण संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत. विद्यार्थी-विद्यार्थिनींचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व विकसित होण्याच्या दृष्टीने ते सर्व उपक्रम महत्त्वपूर्ण आहेत. नियोजित अभ्यासात तर विद्यार्थ्यांनी लक्ष दिलेच पाहिजे, पण कोणत्या ना कोणत्या तरी उपक्रमात सहभागी व्हायला हवे अशी संस्थांकडूनही अपेक्षा असते. आताचे युग स्पर्धायुक्त आहे. त्याच्या सरावासाठी क्रीडास्पर्धा, वक्तृत्वस्पर्धा यांत त्यांनी सहभागी व्हावेे. कार्यक्षम प्रशासन, आर्थिक सुस्थिती, शैक्षणिक सुविधांची उपलब्धता इ. गोष्टी महत्त्वाच्या आहेत; त्याचबरोबर भारताच्या सनातन संस्कृतीने विकसित केलेली जीवनमूल्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बुद्धिमान युवाशक्तीत कशी रुजवता येतील याचाही विचार करणे महत्त्वाचे आहे.



पुरोगामी बुवाबाजी
मानव संसाधन खात्याच्या केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी कोणा ज्योतिषाकडे भविष्य विचारायला गेल्या, यावरून सर्वत्र वाद-चर्चा सुरू आहे. ही गोंधळटीका ऐकल्यावर त्यांना `हात दाखवून अवलक्षण' झाल्याचा प्रत्यय आला असणार. या निमित्ताने झालेल्या वादात स्वत: ईरानीबाइंर्नी त्यांचा तो व्यक्तिगत विषय असल्याचे म्हटले असले तरी, त्यांच्या विरोधात सतत ठोकाठोकी करणारे तथाकथित पुरोगामी विज्ञानवादी मात्र, ते वर्तन म्हणजे शिक्षणमंत्री या पदाला न शोभणारे दुर्वर्तन असल्याचे रटत रेकत राहिले आहेत. इंदिरा गांधींच्या आगेमागे दिल्लीत चंद्रास्वामी नावाच्या मांत्रिकाचे प्रस्थ माजले होते. गृहमंत्री शंकरराव चव्हाण सत्यसाइंर्च्या भजनी लागले होते. मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी वर्षा बंगल्यावर अशा बंभोलेनाथांस पाचारण करून पाद्यपूजा केली होती. स्मृतीबाईसह या सर्वांची कृती एकाच डब्यात टाकण्याजोगी आहे. परंतु स्मृतीबाइंर्ना किंवा एकूण भारतीय जनता पक्षाच्या सरकारला विरोध, म्हणून त्यांच्या खाजगी-सार्वजनिक, खऱ्या-खोट्या, वास्तव-काल्पनिक वगैरे प्रत्येक गोष्टीला भंपक विरोध करण्याचा दांभिक चहाटळपणा सुरू असतो. त्यातही पुन्हा राहुल गांधीनी अजमेरच्या चिस्ती दर्ग्याला हिरवी चादर चढवली की ते धर्मनिरपेक्ष ठरवायचे; आणि मोदीनी पशुपतिनाथाचे दर्शन घेतले की त्यांना जातीयवादी म्हणायचे. या प्रकारचा आचरट वाद घालत राहण्यातून भारत महान संपन्न होणार अशी समजूत असेल तर ते कुरवाळत बसोत. पण विकासाभिमुख देशाला हे आचरट पुरोगामित्त्व शोभादायक नाही.

ज्योतिष हे वैज्ञानिक शास्त्र आहे की नाही या वादात जाण्याचे कारण नाही. देव आहे का, अतींद्रिय शक्ती आहे का, पुनर्जन्म आहे का हे विषय रिकाम्या विद्वानांच्या तोंडसुखासाठी चिरंतन चालू असतात. अणुऊर्जा हवी का, इच्छामरण असावे का, नदीजोड प्रकल्प असावा का, हे हल्लीचे तसलेच विषय. त्याच्या दोन्ही बाजू असतात, त्या दोन्ही समर्थ आणि समर्थनीय असतात. ज्याची जशी श्रद्धा असेल त्याने ती कवटाळून बसावे. दुसऱ्यावर दोषारोप करून त्यास मूर्ख-गाढव ठरविण्याचा उद्योग करू नये.

पण इथेही एका कुठल्या विचारावर `श्रद्धा' म्हटले की, दांभिक पुरोगामी अतिरेक्यांचे फावणार. दिवाळीचा पाडवा किंवा नववर्षारंभ, ईद वगैरे सणांना राज्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्याची, या निधर्मी देशातही एक रीत आहे. वैज्ञानिक पुरोगाम्यांस सगळे दिवस सारखेच असले पाहिजेत. त्यात शुभ-अशुभ काही नसते. मग राष्ट्न्पतींनी लोकांना सणाच्या शुभेच्छा देण्यातून काय साधते? ते `धार्मिक' `अंधश्रद्ध' नव्हे काय? मंत्र्याने शपथ घेणे हे कुठले विज्ञान? शपथ घेऊनही डँबिसपणा करता येतो हे तर दिसतेच ना! पण तो विधी म्हणजे एक मानसिक दबाव निर्माण करण्याचा मानसशास्त्रीय संस्कार आहे. माणसाला मन असते हेसुद्धा वैज्ञानिक सत्य दाखवता येत नाही, पण `मानसशास्त्र', `मनोविज्ञान' आहे हे तर मान्य होते.

देवाला किंवा देवस्वरूप आईबाप-गुरू यांना नमन केल्यामुळे मन शांत होते. त्याचप्रमाणे कुणी पाठीवर हात ठेवून फक्त `लढ' म्हटले तर माणसाला यशाचा मार्ग चालणारे बळ येते, यात अशास्त्रीय काय आहे? हे बळ देणारा कुणी ज्योतिषीही असला, कुणी बाबा-माता असेल तर त्याला दूषणे देता येत नाहीत. रुग्णाईत माणसाला इस्पितळातून केवळ घरी नेले तरी त्याची प्रकृती सुधारते हे खोेटे नाही. त्याप्रमाणे कुणाला घरच्या कालव्यातून देवाचिये द्वारी गेल्यावर तेणे मुक्ती चारी साधियेल्या असे वाटत असेल तर त्याला लगेच अंधश्रद्ध-हिंदुत्त्ववादी-जातीयवादी-अवैज्ञािइंढिंॅद्धध्ॅढ-ीींर्ंध्ुडॅर्डॅििीध्ु-झ्र्ीर्डुर्द्गिीध्ु-र्इिेझ्र्ॅर्र्टीीं म्हणून हेटाळणारे पुरोगामित्त्व लोकद्रोही ठरते.
इतकेच असे तर आपापल्या पुरोगामी पंथाच्या शिरोमणीचा स्मृतिदिन म्हणून मेणबत्ती यात्रा काढणे अंधश्रद्धच ठरते की! कुणी कशावर विश्वास ठेवावा, श्रद्धा ठेवावी हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. `जिहाद' म्हटले की कुणाचा संताप होत असेल तर `बलीदान' म्हणून तो शांत होऊ शकेल. दिग्विजयसिंहांची सोनियावरची श्रद्धा अंध म्हणावी की डोळस? त्यांच्यासारख्यांना सोनियाजींकडे जाऊन आल्यावर मनोबळ वाढत असेल तर, कुणी गंगेत बुडी मारण्याने, कुणी कुलदैवताला जाण्याने, कुणी ज्योतिषाकडे जाण्याने, काय बिघडणार आहे? पण संस्कृतचा पुरस्कार केला तरी ज्यांना त्यात भगवेकरण दिसते, त्यांची कीवच करायची! भगव्याच्या अस्मितेवर ज्यांची धार्मिक वा राजकीय पुंडगिरी चालते त्यांच्या भगव्या ध्वजावरची श्रद्धाही तपासायला नको; त्यासाठी केवळ जागोजागी दिसणाऱ्या ध्वजपताकांचा कळकटपणा पाहावा! अनेक मंदिरे, पुतळे, चौक किंवा इमले यांवर भगवे ध्वज फडकत-लहरत नसतात, तर लोंबत असतात.

त्या बाबतीत काही कृती करण्याऐवजी भगव्याच्या अस्मितेचे कढ आणणे सोपे असते, त्याचप्रमाणे आपले पुरोगामित्व आणि विज्ञाननिष्ठा भकत राहणे सोपे. खरा वैज्ञानिकसुद्धा, प्रचलित भाषेत अंधश्रद्ध असू शकतो. तुकाराम-रामदास विज्ञानदृष्टीचे श्रद्धाळू होते, म्हणून तर तुकाराम म्हणतात,
आहे ऐसा देव, वदवावी वाणी
नाही ऐसा मनी अनुभवावा ।

कुणी ज्योतिष पाहतो, तो केवळ थोतांडी परंपरावादी; आणि जो देवमूर्ती फेकून देतो तो पुरोगामी, इतकी सोपी सरळ विभागणी होऊ शकत नाही. त्यात अनेक विचार-वास्तवांचे पदर असतात. ज्यांना एकमेकांच्या उखाळया पाखाळया काढण्यातच मानसिक समाधान असेल त्यांच्या जीवननिष्ठेला प्रणाम असो!



सांगली शिक्षण संस्था (सिटी हायस्कूल) आपली शंभर वर्षे पूर्ण करून दुसऱ्या शताब्दीत प्रवेश करीत आहे. एवढ्या प्रदीर्घ अनुभवांच्या आधारे, शालीय शिक्षणाविषयी नजिक काळातील स्थितीचा वेध घेणारे चिंतन संस्थेच्या वतीने मांडण्यात आले. त्या लेखाचा हा सारांश, संस्थेच्या `इतिहास' ग्रंथातून...
आज शिक्षणक्षेत्रात शाळांचे व्यवस्थापन दोन स्तरावर होत आहे. काही शाळा संपूर्णपणे सरकारीच आहेत, तर काही शाळा खाजगी संस्थांनी सरकारी नियमानुसार चालविलेल्या आहेत. सध्याचे,-विशेषत: शिक्षणाधिकार कायदा अस्तित्वात आल्यानंतरचे, - आवळत चाललेले नियमांचे जाळे पाहता खाजगी शाळा नावालाच खाजगी राहिल्या आहेत!विद्यार्थी-प्रवेशापासून शिक्षक नेमणुकीपर्यंतचे जवळजवळ सर्व अधिकार आज सरकारकडे आहेत. दररोज नव्यानव्याने येणाऱ्या नियमांनी संस्था जेरीस आल्या आहेत. आज शाळेत येणारी मुले ही शिकण्यासाठी येत नसून केवळ जेवण्यासाठी आणि स्वच्छतागृहात जाण्यासाठी येतात असे मानले जात असावे. आपल्या गुणवत्तेसाठी शंभर वर्षे प्रसिद्ध असणाऱ्या शाळांनासुद्धा, `पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत, अन्न शिजवण्याची भोजनगृहांची स्वतंत्र व्यवस्था नाही' असल्या कारणास्तव मान्यता रद्द करण्याची जरब दिली जात आहे. एकंदरीत खाजगी संस्थांना आपल्या शाळा चालविणे अशक्य व्हावे अशी परिस्थिती निर्माण होत आहे. एक शक्यता अशी दिसते की, याचा शेवट सर्वच शाळांच्या सरकारीकरणात होऊ शकतो. ही टोकाची परिस्थिती असेल, पण ती येणे अशक्य नाही. तसे झाल्यास शाळा सरकारजमा होतील पण शिक्षणसंस्था जिवंत राहतील. अशा परिस्थितीत संस्थेला शिक्षणाचा स्वतंत्र विचार करावा लागेल.
दुसरी एक शक्यता वाटते की, शिक्षण क्षेत्रातील आजची ही परिस्थिती आणि शासनाचा हा हस्तक्षेप पराकोटीला गेल्यास त्याला समाजाचा आणि संस्थांचा विरोध वाढू लागेल आणि शिक्षणव्यवस्था शासनापासून पूर्णत: स्वतंत्र व्हावी अशी मागणी जोर धरू लागेल. त्या परिस्थितीत शिक्षण-व्यवस्थेमधून शासन बाहेर पडेल, आणि सर्व शाळांचे खाजगीकरण होईल. ही परिस्थिती देखील दुसऱ्या टोकाचीच आहे, पण ते घडणेही अशक्य नाही. अशी वेळ आली तर संस्थेची जबाबदारी वाढेल.
वरील दोन्ही टोकांच्या शक्यता आहेतच, परंतु त्या दोन्हींमध्ये तिसरी एक शक्यता म्हणजे सरकारी आणि खाजगी अशी समांतर व्यवस्था असणे. ही व्यवस्था आजच्या व्यवस्थेला जवळची आहे. परंतु त्यामध्ये खाजगी शाळांमधील शासकीय हस्तक्षेप कमी होणे आणि शिक्षणसंस्थांना बऱ्याच प्रमाणावर स्वतंत्रता मिळणे अपेक्षित आहे. यामध्ये शैक्षणिक कार्यक्रमांची आखणी, त्यानुसार शिक्षकांची नियुक्ती, आणि शुल्क आकारणी याबद्दलचे स्वातंत्र्य अपेक्षित आहे. सरकारी शाळा मोफत शिक्षण देतील आणि त्या देखील चांगल्या चालवणे ही सरकारची जबाबदारी असेल. खाजगी संस्थांना तर शाळा चांगल्याच चालवाव्या लागतील.
या व्यवस्थेपेक्षा वेगळी एक समांतर व्यवस्था सध्या अस्तित्वात आहे, ती म्हणजे खाजगी क्लासेस. अखिल भारतीय पातळीवर मध्यंतरी केलेल्या एका पाहणीनुसार भारताच्या शहरी आणि ग्रामीण भागातील ६०% हून अधिक विद्यार्थी खाजगी क्लासला जातात, आणि हे प्रमाण वाढते आहे. याचाच स्पष्ट अर्थ असा की, सध्याची शाळेतील शिक्षणपद्धती अपयशी ठरते आहे. शिक्षणावर शासनाचा, आणि खाजगी क्लाससाठी पालकांचा असा दुहेरी खर्च सध्या होत आहे. ही परिस्थिती विस्तारत गेल्यास शाळेत जाण्याची सक्ती भविष्यामध्ये संपुष्टातच येऊ शकते. विद्यार्थ्याने शाळेत शिकायचे की क्लासमध्ये, ही त्याची निवड असेल. काही विषय शाळेत, काही क्लासमध्ये असेही होईल. शासन फक्त विविध स्तरांवरील परीक्षांचे आयोजन करेल, आणि विद्यार्थ्याचे शिक्षण पूर्ण झाले किंवा नाही तेवढे ठरवेल. असे घडणार असेल तर केवळ क्लासला नावे ठेवून चालणार नाही. विद्यार्थी तिथे का जातात हे अभ्यासून शाळांना बदलावे लागेल. विद्यार्थ्याला शाळेपर्यंत आणण्यासाठी आटापिटा करावा लागेल. अर्थातच शाळांचे स्वरूप आणि गुणवत्ता सुधारावीच लागेल.
आणखी एक टोकाची शक्यता सध्या बोलली जाते; ती म्हणजे `शिक्षकविरहित शाळा'. सर्वच शिक्षण संगणकाच्या माध्यमातून दिले जाईल, मुले घरात बसून शिकतील, वगैरे वगैरे! परंतु हे सर्वथैव अशक्य वाटते. बालक व किशोरवयातील शालीय शिक्षणात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील व्यक्तिगत नाते भविष्यातही तसेच राहील, हे निश्चित! तशीच आणखीही एक शक्यता म्हणजे, पूर्वीसारखे `गुरूकुल' अस्तित्वात येईल. तो प्राचीन काल पार मागे पडला. परिस्थिती, गरजा, सुविधा, अपेक्षा या सर्वांचा विचार करता तसे गुरूकुलही संपूर्णपणे अशक्य आहे.
या सर्व शक्यतांकडे पाहिल्यास लक्षात येईल की, या सर्वांच्या मुळाशी शासकीय धोरण आहे. कोणताही मूलभूत विचार न करता; भारतीय समाजाचा विचार न करता, पाश्चात्य राष्ट्नंकडे पाहून आखलेल्या अशा योजना, शिक्षणेतर बाबींना दिले गेलेले अनावश्यक महत्त्व, कोणता विषय कसा शिकवायचा यात शासनाने केलेली लुडबूड या सर्वांमुळे प्रश्न निर्माण होत आहेत. याचा अर्थ असा नव्हेे की, शासनाचा आणि शिक्षणाचा संबंधच नसावा! काय शिकवावे हे धोरण शासनाने ठरवावे, परंतु कसे शिकवावे याचे स्वातंत्र्य शिक्षकाला असले पाहिजे. उदाहरणार्थ `विद्यार्थ्यांना बेरीज शिकवा' हे शासनाने सांगावे; परंतु त्यातला हातचा कसा लिहावा हे शासनाने सांगू नये. त्यामुळे गोंधळ टळतील. दर चार-पाच वर्षांनी विद्यार्थ्यांची मूल्यांकन पद्धती बदलून काय साधणार? उलट मूल्यांकनाच्या पद्धतीत सातत्य असेल तर विविध काळातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे आकलन व्यवस्थित होईल. `विद्यार्थ्यांना ताण नको म्हणून परीक्षाच नकोत, - परीक्षा सोप्या करा' असले निर्णय, `अपयशाने विद्यार्थी खचतील म्हणून गुण न देता श्रेणी द्या', `मनावर परिणाम होईल म्हणून गुणवत्ता यादी रद्द करा' अशा गोष्टी भावी पिढीवर अनुचित परिणाम करणाऱ्या आहेत. भविष्यात मुलांना हरघडी परीक्षेला, स्पर्धेला तोंड द्यावे लागणार हे निश्चितच आहे; - तर मग मनाची तशी जडणघडण शालेय वयातच व्हायला हवी. शाळेच्या वयात अपयशाची सवय झालीच नाही तर पुढच्या आयुष्यात येणाऱ्या अपयशाला सामोरे कसे जाणार? गुणवत्तेचे कौतुक होणारच नसेल तर गुणवत्तावाढीसाठी ईर्ष्या कशी निर्माण होणार? या बाबतीतले शासनाचे सर्व निर्णय चुकीचे आहेत हे दिसत असूनसुद्धा आज शिक्षणसंस्था किंवा समाज काही करू शकत नाही. मूठभर तथाकथित शिक्षणतज्ज्ञांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या विकृत तर्करचनेतून घेतलेले हे घातक निर्णय बदलायला हवेत. म्हणून शिक्षण व्यवस्थेतला शासनाचा हस्तक्षेप कमी व्हायला हवा. भविष्यकाळात तो कमी झाला तर संस्थांचे काम अधिक चांगले होईल.
वय वर्षे ५ ते १५ या कालावधीत कुठलाच विद्यार्थी विद्वान होणार नाही; पण विद्वान होण्याचा त्याचा मार्ग खुला होऊ शकेल, त्या दृष्टीने शिक्षणाची रचना असली पाहिजे. विचारासाठी-संपर्कासाठी आवश्यक असलेली भाषा, आणि तर्कशुद्धतेसाठी सर्वांच्या मुळाशी असलेले गणित या दोन गोष्टी शाळेच्या वयात चांगल्या शिकवल्या गेल्या पाहिजेत. त्याव्यतिरिक्त इतर विद्याशाखांची ओळख त्या वयातच झाली पाहिजे. बुद्धिमान विद्यार्थ्याला पुढे नवे संशोधन करता येईल, सरासरी बुद्धीच्या विद्यार्थ्याला उपजीविकेचे साधन मिळवता येईल, आणि सुमार बुद्धीच्या विद्यार्थ्याला त्याच्या आयुष्यात कोणी फसवणार नाही अशी त्यांची तयारी करून घेणे हे शालीय शिक्षणाचे उद्दिष्ट असले पाहिजे. त्यासाठी भारतातील शिक्षणप्रक्रियेत हजारो वर्षे वापरला गेलेला, आणि काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेला पाठांतराचा मार्ग वगळून चालणार नाही. बुद्धीच्या आणि मेंदूतील स्मरणशक्तीच्या सुसूत्र वापराची पाठांतर ही एक पद्धत आहे. संगणकाच्या स्मरणाला मर्यादा आहेत पण मानवी मेंदूची साठवणक्षमता अमर्याद आहे. लहान वयात जेव्हा तर्कशक्ती विकसित झालेली नसते, आणि मेंदू टिपकागदासारखा असतो त्या वयात विद्यार्थ्यांना भविष्यासाठी उपयोगी पडणारी पाठांतराची शिदोरी पुरेपूर दिली पाहिजे. त्याच्या बळावरच बुद्धिमान विद्यार्थी नवे मार्ग शोधू शकेल, सरासरी बुद्धीचा विद्यार्थी सुखाने उपजीविका करू शकेल आणि सुमार बुद्धीचा विद्यार्थी त्याचे काम व्यवस्थित करू शकेल. आजच्या संगणक युगात हे म्हणणे कदाचित हास्यास्पद वाटेल परंतु संगणक हे बाह्यसाधन आहे. जर सर्व काही त्यातच असेल तर संगणक नसताना माणूस काही करूच शकणार नाही. मानवी मेंदू सदैव माणसाबरोबर आहे. त्यात आवश्यक ती माहिती व्यवस्थित रचली असेल तर त्या बळावर माणूस काहीही करू शकतो. असा विद्यार्थी तयार करणे हे शिक्षणसंस्थेचे उद्दिष्ट असेल.
हे सर्व घडायचे असेल तर तसे शिक्षक घडवावे लागतील. केवळ पाठ्यपुस्तक शिकवणे नव्हे, तर विषय शिकवणे हे ध्येय त्यांना द्यावे लागेल. विद्यार्थ्याची आकलनशक्ती लक्षात घेऊन त्याला कसे शिकवता येईल हे शिक्षकांना शिकवावे लागेल. असे शिक्षक घडवणे हे संस्थेचे भविष्यातील उद्दिष्ट असेल.
शिक्षणव्यवस्थेचा केंद्रबिंदू म्हणजे विद्यार्थी. तो वैज्ञानिक व्हावा, संशोधक व्हावा, साहित्यिक व्हावा, चित्रकार व्हावा, संगीतकार व्हावा ही अपेक्षा असतेच. शिवाय आर्थिकदृष्ट्या तो सुसंपन्न व्हावा ही पालकांची अपेक्षा असते, तर तो सुसंस्कृत व्हावा ही समाजाची अपेक्षा. आणि या सर्व अपेक्षा पूर्ण व्हाव्यात ही संस्थेची अपेक्षा! तेजस्वी अध्ययनाची कास धरून `$ तेजस्वी नावधीतमस्तु' हा मंत्र जपत सांगली शिक्षण संस्थेतील गुरू आणि शिष्य भविष्य घडवत राहतील हे निश्चित.
पहिल्या शताब्दीतून दुसऱ्या शताब्दीत प्रवेश करताना सांगली शिक्षण संस्थेच्या डोळयापुढे आहे, तो वयाच्या तिसऱ्या वर्षी आईच्या कडेवरून शाळेत येणारा, येताना रडणारा प्रत्येक विद्यार्थी आणि पाणावलेल्या डोळयांनी त्याच्याकडे पाहणारी त्याची आई. या संस्थेच्या शाळांमधून ही मुले वाढतील, शिकतील, हसतील, रडतील, खेळतील, भांडतील, धडपडतील, दंगा करतील, शिक्षकांचे कौतुक-त्यांचा रागही झेलतील! या मुलांमधून बुद्धिमान, सुजाण, सुसंस्कृत माणूस निर्माण करणे आणि त्यासाठी जे लागेल ते उभे करणे हाच आमचा भविष्यासाठी संकल्प!


परवाच्या ३१ ऑक्टोबरला सरदार पटेलांचा जन्मदिवस होता. यंदा तो `जरा जास्त' गाजला. १४ नोव्हेंबरला नेहरू जयंती. ती काँग्रेसने उगीचच आपल्यावर ओढून घेतली. महनीय नेते फार मोठे असतात. त्यांची आपण-किंवा टीव्हीतल्या जाकिटवाल्या बायांनी तुलना मांडू नये.
साध्या साध्या घटनांतून त्या माणसांचं खूप मोठेपण दिसतं.
मोठी माणसे मोठीच असतात
सन १९६१ चा डिसेंबर महिना. आमच्या स्नातकोत्तर `समाजशास्त्र' विभागाच्या काही विद्यार्थी-विद्यार्थिनींची सहल आग्रा, दिल्ली, लखनौ अशी निघाली. सोबत असलेल्या प्राध्यापक मंडळींपैकी एकाचे नातेवाईक दिल्लीला केंद्र शासनात अधिकारी होते. त्यांनी आम्हा सर्वांना ब्रेकफास्टसाठी घरी बोलावले. इंदूरपासून दिल्लीला आलात आणि नेहरूंना न भेटता जाणार, याचे त्यांना आश्चर्य वाटले. `मिलना चाहते है क्या? कोशिश की जा सकती है ।' आश्चर्यचकित होण्याची वेळ आमची होती. फक्त २४ तास आधी विचार ठरून अशी भेट शक्य आहे? आम्ही तर पोरेटोरेच. आमच्या प्राध्यापकवर्गालाही हा विचार सहलीची आखणी करताना सुचला नव्हता.
सायंकाळी त्यांनी सांगितले,`कल सुबह ठीक आठ बजे, तीन मूर्ती पर.' तीन मूर्ती हे नेहरू राहात असलेल्या निवासस्थानाचे नाव. ब्रिटिश राजवटीत हे सरसेनापतींचे निवासस्थळ असे.
मात्र आम्ही आनंदात असताना त्या अधिकाऱ्याने आम्हाला सावध केले की भेट ठरवून दर्शनासाठी आलेली माणसे नेहरूंना आवडत नाहीत, तेव्हा तुमच्या अर्धा तासाच्या भेटीमध्ये त्यांना विचारण्यासाठी काही प्रश्न तयार करून जा. आंतरराष्ट्नीय पातळीवरच्या पत्रकारांना लीलया सामोऱ्या जाणाऱ्या त्या नेत्याला आमचे प्रश्न फार प्राथमिक पातळीवरचे वाटतील अशी आमची शंका. ते म्हणाले, `प्राथमिक सोडा, मूर्खासारखे वाटतील असे गृहीत धरा, पण विचारा.' रात्री आमची `वॉर कौन्सिल'एकत्र बसून प्रश्न तयार केले गेले.
सकाळी साडेसातला `तीन मूर्ती'च्या गेटजवळ गेलो. तिथे फार मोठा बंदोबस्त नव्हता. एक रक्षक पुढे आला. आम्ही कारण सांगितले. `ठीक आहे, सात वाजून पन्नास मिनिटांनी तुम्हाला आम्ही आत नेऊ.' बसण्यासाठी गालिचा घातलेला. नेहरूंसाठी एक खुर्ची. बरोबर आठ वाजता नेहरू आले. खडीताजीम-प्रसन्न हसण्याने स्वागत. प्रश्नोत्तरांना सुुरुवात. पंचवार्षिक योजना, गोवामुक्तीनंतरचे आंतरराष्ट्नीय पडसाद, आत्मचरित्राचा पुढचा भाग लिहिणार का... असे सर्व प्रश्न. माझा नंबर आला. संभाषण इंग्रजीतून.
``सर, आज जी घटना अंमलात आणली आहे, ती एखाद्या विधिनिषेध नसलेल्या व्यक्तीच्या हाती असीम सत्ता केंद्रित करेल. आपण सत्तास्थानी आहात तोपर्यंत हुकूमशाही अवतरण्याची भीती नाही. पण नंतरचा भरवसा कुणी द्यावा? अशी घटना का केली? हुकूमशाहीचा प्रयत्न घटनेच्या माध्यमातून झाला, तर उत्तर काय?''
क्षण-अर्धाक्षण त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिले. सहज आवाजात उलट प्रश्न आला, ``यंग मॅन, ज्या देशातले नागरिक आपल्या स्वातंत्र्यअधिकारांविषयी सगळयात जास्त जागरूक आहेत, असे जगातले राष्ट्न् तुझ्या मते कुठले?''
``सर, अमेरिका.''
``तुला युनायटेड स्टेट्स् म्हणायचे आहे का? ते राष्ट्न् व अमेरिका (खंड) हे एकच नव्हेत.''
``सॉरी सर, मला युनायटेड स्टेट्स्च म्हणायचे होते.''
``मला एक सांग, तू त्यांची घटना वाचली आहेस का?''
``वाचली आहे सर, पण अभ्यासली आहे असे मात्र मी म्हणू शकत नाही.''
``त्यांनी घटनादुरुस्ती किती वेळा केली आहे?''
``सर, मला आठवतंय त्याप्रमाणे बहुधा अठरा वेळा. पण पहिल्या दहा दुरुस्त्या त्यांच्या घटना समितीनेच केल्या होत्या, तेव्हा खऱ्या अर्थाने पाहिले तर आठच.''
``बरोबर आहे. याचा अर्थ थोडेफार किरकोळ बदल सोडले, तर देशाचा मूलभूत कायदा -लॉ ऑफ द लँड-जवळपास तोच आहे. अमेरिकेचे त्या काळातले प्रसिद्ध अध्यक्ष अब्राहम लिंकन व आजचे अध्यक्ष जॉन केनेडी यांच्या हाती असलेली सत्ता, त्यांचा सत्ताप्रभाव यात जास्त पॉवरफुल कोण?''
``अर्थातच जॉन केनेडी.''
``मग असा प्रश्न येतो की, देशाचा मूलभूत कायदा जर दोन्ही अध्यक्षांच्या कारकीर्दीत जवळपास एकच असताना आज जॉन केनेडींची सत्ता अनेक पटींनी जास्त का?''
``सर मला सांगता येणार नाही.''
``यातच तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे. संदेशवहन व दळणवळण यांची साधने जितकी द्रुतगतीची होतील, त्या प्रमाणात सत्तेचे केंद्रीकरण होऊ लागते. हे घडवावे लागत नाही, त्या प्रक्रियेत आपोआप होते. म्हणून लोकशाही राज्यव्यवस्थेत विकेंद्रीकरणावरही लक्ष सतत द्यावे लागते. या प्रक्रियेचा `घटना' या गोष्टीशी सरळ संबंध जोडता येत नाही. आता दुसरा प्रश्न-हुकुमशाही. ती येणार नाही, यासाठी मी तुझ्यासारख्या असंख्य तरुणांवर विश्वासून आहे.''
असे शिक्षक महाविद्यालयीन जीवनात मिळते तर?
आणखी एक-दोन प्रश्न. त्यांनी मनगटावरच्या घड्याळाकडे पाहिले. आठ वाजून अठ्ठावीस मिनिटे. त्यांना नेण्यासाठी  पांढरी अँबँसिडर गाडी आवाज न करता पोर्चमध्ये आली. नेहरू उठून उभे राहिले. मुलाखत संपली. एवढा वेळ शांतपणे बसलेला आमचा सहाध्यायी मित्र दिलीप किबे म्हणाला, ``सर, एक शेवटचा प्रश्न?''
पुन्हा घड्याळाकडे पाहात ते म्हणाले, ``ओके, पण लहानसा असेल तरच.''
``अगदी लहान सर. उत्तर केवळ `हो' किंवा `नाही' एवढेच आहे. मी तुम्हाला सभेत बोलताना, लोकसभेत प्रेक्षक गॅलरीतून पाहिले आहे अनेकदा; पण इतक्या जवळून पहिल्यांदाच. म्हणून माझा प्रस्ताववजा प्रश्न आहे, मी जर मुलगी असतो, तर मी आज इथेच तुम्हाला विवाहासाठी गळ घातली असती, तुम्ही होकार दिला असता का?''
नेहरू तिथे आहेत, हे विसरून हास्यस्फोट झाला-ज्यात त्यांचा हास्य खळखळाट सर्वात मोठा. काहीही न बोलता ते आमच्यामधून गाडीकडे जाऊ लागले. कुणाला टपली, कुणाला पाठीवर थाप, कुणाचे नाक ओढ, कुणाचा कान - असे करत दिलीप किबे उभा होता तिथे आले. हळूच वाकत दिलीपच्या दोन्ही गालांवर हलकेच ओठ टेकवले - गाडीत बसून गेलेसुद्धा!
(विश्वास दांडेकर यांच्या
`माणसं माणसांसारखीच वागतात' या पुस्तकातून साभार)

गीताधर्म हा विश्वधर्म
गीतेविषयी तरुण पिढीच्या आशंका
गीतेच्या संदर्भात तरुण पिढीच्या मनात काही  मूलभूत आशंका आहेत. त्यांचे निराकरण इथे करणे युक्त ठरेल.
आशंका पहिली
श्रीमद्भगवद्गीतेत सातशे श्लोक आहेत. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली, त्यावेळी कुरुक्षेत्रावरील सैन्य शांत कसे राहिले?
उत्तर - कुरुक्षेत्रावरील युद्धासाठी सुमारे पन्नास लक्ष योद्धे उपस्थित होते. त्यामुळे फारच थोड्यांना कृष्णार्जुन दिसत होते. कुरुक्षेत्रावरील धर्मयुद्धाचे काही निश्चित नियम होते. त्यामुळे सरसेनापतीची (भीष्मांची) आज्ञा मिळेतोपर्यंत कोणीही योद्धा शस्त्राचा उपयोग करत नसे. आजही वरिष्ठ अधिकाऱ्याची आज्ञा मिळेतोपर्यंत कोणीही सैनिक गोळी झाडत नाही. संध्याकाळी भीष्मांनी शंख फुंकला की युद्धविराम होत असे. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली (कालावधी सुमारे दीड ते दोन तास) आणि अर्जुनाने श्रद्धेने जागरूकपणे श्रवण केली, पाहिली. त्यावेळी सर्व सैन्य (अठरा अक्षौहिणी) आपल्या जागीच उभे होते. शिवाय त्या प्रचंड सैन्यात कोणीही आतंकवादी नव्हता. (आतंकवादी भ्याडपणे कसाही हल्ला करून खून पाडतो.)

आशंका दुसरी - `अहिंसा परमो धर्म:' ही हिंदू धर्माची महान शिकवण आहे. भगवान श्रीकृष्णांनी मात्र अर्जुनाला `युद्ध कर' असे सांगितले म्हणजे अर्जुनाला हिंसाच करायला सांगितले. गीता हिंसा करायला शिकवते का?
उत्तर - नाही! धर्मशास्त्राप्रमाणे युद्धाचे दोन प्रकार असतात - १) वृत्तिफलक आणि २)धर्मफलक. जे युद्ध राज्यलाभासाठी, भूमीसाठी, संपत्तीसाठी व परस्त्रीच्या अभिलाषेसाठी केले जाते, त्याला वृत्तिफलक युद्ध म्हणतात आणि जे युद्ध न्यायासाठी, सत्यासाठी, धर्मासाठी केले जाते (राज्य इत्यादीची प्राप्ती त्याच्या अनुषंगाने आपोआपच होते) त्याला धर्मफलक युद्ध म्हणतात. हिंसा होते ती वृत्तिफलक युद्धात! कारण अशा युद्धात व्यक्ती वा राष्ट्नची आसुरी महत्त्वाकांक्षा असते. याउलट धर्मफलक युद्धात दुष्टांना मारावे लागते ते धर्म, सज्जन, जीवनमूल्ये (यात अहिंसा आलीच) यांचे रक्षण करण्यासाठीच! कौरवांचे युद्ध वृत्तिफलक होते. याउलट पांडवांचे धर्मफलक होते. अॅलेक्झांडर, सीझर, नेपोलियन, हिटलर, सर्व युरोपियन्स, अधम ब्रिटिश, पठाण, मोगल, तुर्क, मुसलमान या सर्वांची युद्धे वृत्तिफलक होती. स्त्रिया, सत्ता, भूमी आणि संपत्तीच्या आत्यंतिक अभिलाषेपोटी होती. या पार्श्वभूमीवर पांडवांनी केलेले युद्ध वा शिवाजी महाराजांनी केलेले युद्ध आणि निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य धर्मफलक होते. त्यामागील हेतू इतका उदात्त होता की, त्यांच्या तुलनेत कोणीही बसू शकणार नाही.
चीनने १९६२ मध्ये आणि पाकिस्तानने १९४८-४९, १९६५, १९७१ आणि कारगिल (१९९९) अशी चार वेळा भारतावर आक्रमणे केली. अशा आक्रमकांविरुद्ध लढावेच लागले. त्यावेळी होणारी हिंसा ही हिंसा नसतेच. राष्ट्नचे संरक्षण, धर्म (धर्म तोच की जो विश्वकल्याण इच्छितो) नीती-सदाचाराचे रक्षण, जीवनमूल्यांचे रक्षण, सज्जनांचे परित्राण, दुष्टांचे हनन यासाठी केलेली युद्धे न्याय्यच असतात! कौरव आततायिन होते. त्यांना मारले ते योग्यच झाले. मानवाने सौजन्याने वागावे हे योग्यच आहे, पण आपली पत्नी, आई, बहीण यांची कोणी आगळीक काढली तर समोरच्या उन्मत्तावर प्रहारच करावा लागतो आणि ते न्याय्यच असते.

आशंका तिसरी - अर्जुन क्षत्रिय योद्धा होता. त्याला `युद्ध कर' इतके सांगितले असते तरी पुरले असते. ७०० श्लोकांचे तत्त्वज्ञान सांगण्याची आवश्यकता होती का?
उत्तर - होय! अवश्य होती! `केवळ राज्यप्राप्तीसाठी मी गुरुजनांना, पितामहांना, आप्तेष्टांना का मारावे?' असा अर्जुनाचा प्रश्न होता. `राज्यप्राप्तीसाठी नव्हे तर धर्मरक्षणासाठी, सुजनांच्या परित्राणासाठी, दुर्जनांच्या वधासाठी, जीवनमूल्यांच्या सुरक्षिततेसाठी अर्जुनाला युद्ध करावेच लागेल आणि त्यात नातीगोती आड येत नाहीत.' याचा बोध भगवान श्रीकृष्णांनी केला. आपण व्यवहारात करतो ते कर्म योग्य की अयोग्य असा संभ्रम आपल्याही मनात अनेकवेळा येतो. हॅम्लेटच्या मनात हेच द्वंद्व होते. पण सन्मार्ग दाखविणारा सद्गुरू न मिळाल्याने त्याचा विनाश झाला. अर्जुनाचे तेच झाले असते. भगवान श्रीकृष्णांनी त्याला सन्मार्ग दाखवून कृतार्थ केले. कर्म म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, कर्म श्रेयस्कर का आहे, कर्माचा गाभा अनासक्ती आणि त्याग यांचा कसा आहे, कर्माला ज्ञानाचे डोळे दिले तर कर्म अर्थपूर्ण कसे होते, कर्माला भक्तीचे अंत:करण लाभल्यास त्याला परिपूर्णता कशी येते, आपल्या कर्माचे स्वरूप विश्वकल्याणाचे कसे असावे, त्यासाठी आत्मसंयम कसा करावा, कोणती गुणवत्ता धारण करावी - असे तर्कशुद्ध प्रबोधन भगवान श्रीकृष्णांनी केले.

या गीतारूपी ब्रह्मविद्येचा प्रभाव सर्व जगतात आहे. गीतेचे सर्वप्रथम इंग्रजी भाषांतर सर चार्लस विल्किन्स यांनी केले आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ते प्रकाशित केले. यानंतर सर एडविन अॅर्नोल्ड यांनी 'ढहश ीेपस लशश्रशीींळरश्र' या नावाने गीतेचे भाषांतर केले. इमर्सन, वॉल्ट व्हिटमन, थोरो, कार्लाईल इत्यादी विचारवंतांनाही गीतेने भारून टाकले होते. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भारताची लूट करण्यासाठीच आहे, याची पूर्ण जाणीव असलेल्या वॉरन हेस्टिंग्जने, विल्किन्स यांनी इंग्रजी भाषांतर केलेल्या गीतेच्या प्रस्तावनेत लिहिले आहे - ' ब्रिटिश व युरोपियन्स हे चोर-लुटारू आहेत, त्यांचे वर्चस्व संपून विनाश झाला तरी भारतातील हिंदू तत्त्वज्ञांनी आत्मानुभूतीने निर्मिलेले स्थलातीत, कालातीत, मानवतावादी सर्वश्रेेष्ठ तत्त्वज्ञान अजरामर राहील याची कबुलीच वॉरन हेस्टिंग्जने दिली आहे.
आदि शंकराचार्य गीतेवरील भाष्याच्या उपोद्घातात म्हणतात,
द्विविधो हि  वेदोक्तो धर्म: प्रवृत्तिलक्षण:
निवृत्ति-लक्षणश्च, जगत: स्थितिकारणम् ।
जगताच्या स्थितीला कारणीभूत जो वेदोक्तधर्म तो दोन प्रकारचा आहे. प्रवृत्तिरूप आणि निवृत्तिरूप. प्राण्यांच्या अभ्युदयाला व मोक्षाला जो साक्षात् कारण, तो धर्म होय. तात्पर्य, गीताधर्म हा विश्वमानवाच्या कल्याणार्थच निर्माण झाला आहे. अलौकिक प्रज्ञावंत आदि शंकराचार्यांपासून रमण महर्षी-रामकृष्ण परमहंसांपर्यंत सर्वांनी गीतेला शिरोधार्य केले आहे. रामकृष्ण परमहंस म्हणत असत की, धर्मशास्त्रीय आणि तत्त्वज्ञानपर सर्व ग्रंथांचे सार एका गीतेत आहे.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन