Skip to main content

Shraddha - Nahi anokha Shraddhadin


काही  वर्षांपूर्वी एक आगळावेगळा कार्यक्रम वाचनात आला होता. `चतुरंग' या संस्थेतर्फे `श्रद्धादिनाचा' कार्यक्रम घेण्यात आला. भारतीय पंचागानुसार भाद्रपद कृ.१ ते भाद्रपद अमावास्येपर्यंतचा पंधरवडा हा `पितृ पंधरवडा' म्हणून पाळला जातो. आपल्या कुटुंबातील, घराण्यातील मृत व्यक्तींचे श्राद्ध करण्याची प्रथा हिंदू धर्मात आहे. मृत व्यक्तीला सद्गती लाभावी व त्यांच्या वारसदारांनी त्यांचे स्मरण करून या निमित्ताने काही धार्मिक कृत्ये, दानधर्म करावा असे अपेक्षित आहे. बदलत्या काळानुसार माणसाच्या वेळेला खूपच मर्यादा आल्या. समाजाच्या धार्मिक विषयातल्या संकल्पनाही बदलत गेल्या व हळूहळू श्राद्ध -पक्ष हे विधी कालबाह्य ठरत गेले. काळानुसार त्यातला कर्मठपणा तर गेलाच, हळूहळू त्यात सुटसुटीतपणा आणला गेला.
`चतुरंग'ने काय केले, तर यातील मूळ कल्पना `आपल्या कुटुंबाच्या उभारणीत ज्यांचे योगदान आहे त्यांचे स्मरण व त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करणे' अशी आहे, असे म्हणून त्याच कल्पनेचा थोडा विस्तार केला व समाजाच्या, देशाच्या जडणघडणीसाठी ज्यांनी काही भरीव योगदान दिले आहे अशा काही व्यक्तित्त्वांचे स्मरण करण्याचे ठरवले. त्यांचे श्राद्ध नव्हे, तर त्यांच्या विषयीचा आपला श्रद्धाभाव प्रगट करण्यासाठी या पितृ पंधरवड्यातील एक दिवस `श्रद्धादिन'चा कार्यक्रम घडवून आणला. महाराष्ट्नतील थोर समाजसुधारक, क्रांतिकारक, लेखक, कवी, वैज्ञानिक, उद्योजक अशा कितीतरी थोर व्यक्तिमत्त्वांचा आजचा हा संपन्न महाराष्ट्न् घडविण्यात वाटा आहे. त्यांच्या योगदानामुळे आजची संपन्नता, सुसंस्कृत वातावरण आपण अनुभवतो आहोत. अशा ज्ञात अज्ञात व्यक्तिमत्त्वांपैकी काही ठराविक महान विभूतींचे स्मरण, त्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी होतेही, पण अशा अनेक अनाम, अप्रसिद्ध व्यक्ती असतात की ज्यांचे त्या त्या विषयातले - क्षेत्रातले योगदान महत्त्वाचे असूनही दुर्लक्षित असते. आपली आजची स्थिती, आपले कर्तृत्त्व हे केवळ आपले एकट्याचे नाही, तर त्यामागे अनेक पिढ्यांची मानवी प्रयत्नांची, तपश्चर्येची, परिश्रमांची, संघर्षाची मोठी परंपरा आहे. या भक्कम पायावरच आपण आपल्या कर्तृत्त्वाचे इमले बांधत आहोत याची जाणीव या निमित्ताने व्हावी हा हेतू. ही कल्पनाच फार सुंदर, कृतज्ञ वाटते.
पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे श्राद्ध करणे हा प्रत्येक कुुटुंबाच्या रीतीरिवाजाचा भाग असेलच असे नाही. काही ठिकाणी अजूनही या गोष्टींचे पालन होते. पण जिथे काहीच केले जात नाही, तिथे हा अभिनव `श्रद्धा दिन' अवश्य करायला हवा. आपल्या पूर्वजांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांचे स्मरण करणे, त्यांच्या गुणावगुणांचा, कर्तृत्त्वाचा, कष्टांचा परिचय पुढच्या पिढीला व्हायला हवाच. कुटुंबात वारसा हक्काने मिळणाऱ्या - न मिळणाऱ्या - मिळू शकणाऱ्या सांपत्तिक वारसा, मालमत्तेवरचा हक्क याविषयी आपण भलतेच जागरूक असतो. पण कौटुंबिक वारसा हा गुणात्मकही असतो. त्याविषयी खरं तर जास्त अभिमान असायला हवा. त्यात वृद्धी कशी होईल, आपल्याकडून या घराण्याच्या नावलौकिकात भर कशी पडेल असा प्रयत्न असायला हवा. आपल्या कुटुंबातील चांगल्या परंपरा, उत्तम गुणांचा वारसा, आपल्या पूर्वजांनी मिळविलेली कीर्ती या गोष्टी पुढील पिढीला बळ देतात, आधार-अभिमान देतात व जबाबदारीची जाणीवही देतात.
पूर्वी तर एकेक गाव, शाळा, किंवा अमुक मास्तरांचे विद्यार्थी अशा समुदायांची काही गुणवैशिष्ट्ये असत. `अरे मास्तरांचा विद्यार्थी ना तू? अन् अक्षर इतकं खराब?'- असे शिक्षक आपापल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयांसोबतच स्वत:च्या वागण्यातून स्वच्छता, शिस्त, हस्ताक्षर, उच्चार अशा अनेक चांगल्या सवयी लावत असत. सांगलीतील जुनी माणसे सांगतात की `सांगलीकर' म्हणजे पोहणे, बुद्धीबळ आणि चांगले अक्षर या गोष्टी मुलांमध्ये असणारच असे गृहीत धरले जाई. अशी अनेक घरे होती ज्या घरांमध्ये गरीब मुले वाराने जेवायला येत असत. अशाच एका कुटुंबातल्या लोकांनी आताच्या काळातही हे कौटुंबिक `व्रत' जपले आहे. आता `वार लावून जेवणे' ही संकल्पना राहिली नाही, पण या कुटुंबातील लोक आपल्या कुटुंबाच्या नावाने ट्न्स्ट करून गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करतात. खरा कुळधर्म कुळाचार हा असा सुरू रहायला हवा. यासाठी प्रथम आपली `मुळे' काय आहेत हे आताच्या पिढीला माहिती तरी व्हायला हवं!
जरा शोध घेतला, पूर्वी लहानपणी पाहिलेले-ऐकलेेले रीतीरिवाज आठवले, तर त्यात काळानुरूप बदल करून नव्याने करता येण्यासारख्या खूप गोष्टी सापडतील. आम्ही आमच्या कुटुंबात एका वर्षी हा श्रद्धादिनाचा प्रयोग केला. आमच्या पिढीपासून दोन पिढ्या मागे जाऊन कुटुंबातील दिवंगत व्यक्तींची जमेल तेवढी माहिती, साहित्य संग्रहित केले. आजी-आजोबांचे फक्त फोटोच मिळणार असे वाटत असताना `टेपरेकॉर्डर' ही वस्तू प्रथम आणली तेव्हा आग्रहाने आजीच्या आवाजात रेकॉर्ड केलेली स्तोत्रे, आरती मिळाली. त्यांच्या पुढच्या पिढीतल्यांचे तर पुष्कळच काही मिळाले. फोटो, व्हिडिओ क्लिप्स, त्यांच्यापैकी कुणाकुणाची रेकॉर्ड केलेली गाणी, कविता, लेख, पत्रे, बक्षिसे असा खूप खजिना जमा झाला. काळानुसार  क्रम लावून त्यांचे संकलन केले. आता असलेल्या वयस्कर व्यक्तींच्या मुद्दाम मुलाखती घेऊन त्या रेकॉर्ड केल्या. त्यांनी गेलेल्यांविषयी खूप आठवणी सांगितल्या. लांब असणाऱ्यांच्या फोनवरून मुलाखती घेतल्या आणि या सर्वाला सुसूत्र निवेदनात गुंफून कौटुंबिक मेळाव्यात आम्ही हा दृकश्राव्य कार्यक्रम सादर केला. त्यावेळी एका विलक्षण भावनिक बंधात एकत्र येण्याची अनुभूती जमलेल्या सर्वांनी घेतलीच शिवाय त्या कार्यक्रमाची सीडी हा आमच्या कुटुंबाचा एक अमूल्य दस्तावेज बनला.
संस्था पातळीवरही असे प्रयोग होतात. विशेषत: प्रसिद्ध गायक, कलाकार, संगीतकार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कित्येक चांगले कार्यक्रम सादर होताना आपण पाहतो. पण अशा अनेक `बिनमहत्त्वाच्या' व्यक्ती असतात. त्यांनी फार काही चमकदार केलेले नसते. आठवणीत ठेवावे असे काही त्यांच्या हातून घडलेलेही नसते पण त्यांनी त्यांच्या संसाराच्या गाड्याला चोखपणे पुढे नेलेले असते. विपरीत परिस्थितीत किंवा अगदी चांगल्या परिस्थितीतसुद्धा आपला बाणा, आपली तत्त्वे, संस्कार त्यांनी जपलेले असतात व पुढील पिढीत संक्रेमत केलेले असतात. हातून काम न होणारी पण सगळया कुटुंबालाच नव्हे आसपासच्या गोतावळयालाही एकत्र बांधून ठेवणारी एखादी आजी, स्वत:ला काही पाश नसल्याने कुुटुंबात कुणाच्याही नडीसाठी धावून जाणारे कुणी आत्या-मामा-काका मंडळी, नवरा अकाली गेला असता खंबीरपणे उभे राहून मुलांना उत्तम शिक्षण देणारी एखादी आई किंवा पत्नीमागे मुलीला `माहेर' देण्यासाठी धडपडणारा एकाकी बाप, मुलीच्या-सुनेच्या करिअरसाठी प्रौढ वयातही नाचानाच करणाऱ्या `तरुण' आज्ज्या किंवा परदेशी राहणाऱ्या मुला-सुनेला अपराधी वाटू नये, काळजी वाटू नये म्हणून स्वत:हून वृद्धाश्रमाचा समजुतीने वापर करणारे, आनंदाने नेटवरून नातवंडाच्या दर्शनात समाधान मानणारे हल्लीचे आजी-आजोबा.... असं कुणीतरी आपल्या कुटुंबात असतंच. ज्यांचं योगदान त्या त्या वेळी फारसं महत्त्वाचं वाटत नाही, पण त्यांनी नकळत कौटुंबिक व पर्यायाने सामाजिक वातावरण शांत, सुसंस्कृत, निरोगी ठेवायला हातभार लावलेला असतो. अगदी पुढे जाऊन विचार केला, तर अजून २५-३० वर्षांनी ``माझ्या मुलीचे रिक्षाकाका, पाळणाघरातल्या आजी आणि माझ्या स्वयंपाकीण काकू हे तीघं म्हणजे माझ्या करिअरचे तीन महत्त्वाचे आधार होते बघ! त्यांच्यामुळे मी निर्धास्तपणे काम करून सगळा तोल सांभाळू शकले'' असे सांगणाऱ्या आया भेटतील. असेही काही सामाजिक घटक असणार आहेत ज्यांच्याविषयी आपण कृतज्ञ रहायला हवं. अशा निव्वळ पैशापलिकडे जाऊन तयार होणाऱ्या एकमेकांच्या विश्वासांच्या नात्यांवरच सगळं चक्र सुरळीत सुरू राहणार!
करूया; कधीतरी असाही एखादा `श्रद्धादिन' करूया. अशा `अनाम वीरां'ना प्रणाम करूया!
- सौ.विनिता तेलंग, सांगली

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन