Skip to main content

Lekh on Gangadhar Divakar Gharpure in 14 NOV.2011


`गं. दि.'- हाच रामबाण उपाय

कोणत्याही निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्या, व मतपत्रिकेवर दिसणाऱ्या सर्वच्या सर्व उमेदवारांना नाकारण्याचा एक पर्याय मतदारांना द्यावा; त्यामुळे नव्या अधिक पात्र उमेदवारांस संधी मिळू शकेल अशी एक मागणी सध्या चर्चेत आहे. त्याचप्रमाणे अकार्यक्षम वा नापसंत प्रतिनिधीला परत बोलावण्याचा अधिकार (राईट टू रिकॉल) लोकांना असावा असेही म्हटले जाते. निवडणूक आयोगाने या मागण्यांना विरोध करून, अधिक पात्र उमेदवार देणे व त्यांना निवडून संधी देणे ही नागरिकांचीच जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले आहे. मतपत्रिकेवरचे सर्व उमेदवार नाकारणे किंवा प्रतिनिधीला परत बोलावणे यांमुळे पुन्हा (पुन्हा) निवडणुका घ्याव्या लागण्याचा धोका असून त्यातून लोकशाहीचे गांभीर्य कमी होईल असेही म्हटले आहे.
अपात्र किंवा काही वेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी व तशाच कार्यपद्धतीच्या लोकांनी आपली लोकशाही यंत्रणा व समाजव्यवस्था कुरतडून टाकली आहे हे तर खरेच आहे पण त्याचे मूळ कारण `चांगले लोक' आत्मकेंद्री बनून सामुदायिक क्षेत्रांकडे फिरकणेच बंद झाले आहे. सध्याची शिक्षणव्यवस्था भीषण आहे, पण आपल्या आधीच्या दोन पिढ्यांनी राष्ट्नीय शाळा काढल्या, आयुष्याचे मिशन म्हणून त्या चालविल्या, शिक्षकी पेशात पैसा नव्हता तरीही कर्तव्य म्हणून तो पेशा स्वीकारला; तसे करण्यास आज कोणी तयार असत नाही. मग शिक्षणक्षेत्र फार बिघडले म्हणण्यात काय अर्थ? कुणी तरी झोकून द्यावे, उत्तम शाळांतून उत्तम संस्कार व उत्तम शिक्षण मिळावे आणि ते आपल्या मुलांना सहज उपलब्ध व्हावे.... असे होत नसते. शाळेतल्या पालकसभेला आपल्यातील कितीजण जातात आणि त्यात अभ्यासपूर्ण भाग घेतात याचे उत्तर दिले की समस्येचे मूळ कुणाच्याही लक्षात येते. तीच गोष्ट कोणत्याही क्षेत्राची; आणि निवडणुकीचीही!!
`लोकां'ना खरी पारख नक्की असते. प्रचार, पैसा, आमिषे, दांडगाई, पक्ष, घराणे वगैरे घटक केवळ बाऊ करून मांडण्यासाठीच असतात अशी काही उदाहरणे आजही दिसतात. आण्णा हजारे यांचे गाव राळेगणसिद्धी येथे झालेला ग्रामविकास आपण ऐकून असतो, आण्णांच्या नेतृत्त्वाचा प्रभाव ऐकून असतो. तसे हिवरेबाजारचे पोपटराव पवार हे एक सरपंच, तसे माधवनगरचे गोविंदराव परांजपे. ही मंडळी अत्यंत सामान्य स्थितीची. ना पैसा, ना दांडगाई पण झपाटलेली. त्यांना मतदारांनी अक्षरश: उचलून धरले. आहे त्याच प्रणाली, आहे तोच अनुभव, तोच संघर्ष असूनही त्यांनी उत्तम काम करून दाखविले. असाच एक `भयंकर' माणूस कल्याण (जि.ठाणे) येथे लोकप्रतिनिधी होता, त्याची ही कथा!

गंंगाधर दिवाकर घारपुरे यांना घरी दादा व गावात गं.दि. म्हणत. राजकारण, समाजसेवा, ज्योतिष, काव्यलेखन वगैरे निरनिराळया क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटवला.  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांना वाटचाल करावी लागली. गरिबीमुळे पाचवीमध्ये (हल्लीची नववी) शिक्षणाला रामराम करून अर्थार्जनाकडे वळावे लागले. इंग्रज सरकारची नोकरी करावयाची नाही असा त्यांचा निश्चय होता. शिक्षण अर्धवट झाल्यामुळे एका खाजगी कंपनीत नोकरी करावी लागली. तेथे जास्त पगार मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे आयुष्यभर त्यांना आर्थिक टंचाईला तोंड द्यावे लागले. परिस्थितीवर मात करून त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले. त्यांनी नोकरी सांभाळून स्काऊट शिक्षण घेऊन अनेक वर्षे आपल्याच शाळेत स्काऊट शिक्षकाचे काम आर्थिक स्थिती चांगली नसताना विनावेतन केले. विद्यार्थ्यांत व्यायामाची आवड निर्माण व्हावी म्हणून `नमस्कार मंडळ' सुरू करून सेक्रेटरीपद सांभाळले. नमस्कार मंडळाची दुमजली व्यायामशाळा व मोठे क्रीडांगण तयार केले. दरवर्षी लक्ष सूर्यनमस्काराचे अनुष्ठान करत. सार्वजनिक गणेशोत्सवात त्यांचा सक्रीय सहभाग असे. या गणेशोत्सवांचा पन्नास वर्षांचा इतिहास त्यांनी पुस्तक रूपाने प्रसिद्ध केला.
समाजसेवेचा एक भाग म्हणून ते नगरपालिकेच्या निवडणुकीस उभे राहिले. त्यांचा लोकसंग्रह व मित्रपरिवार मोठा होता. त्या मित्रांच्या मदतीने ते एकही पैसा खर्च न करता निवडणुकीच्या दिवशी मुंबईला नोकरीवर जाऊन निवडून येत. प्रसिद्ध लेखक श्री.दि.बा.मोकाशी यांनी आपल्या पुस्तकांत त्यांच्या जगावेगळया वैशिष्ट्याबद्दल माहिती दिली आहे -
`असं ऐकतो की हल्ली प्रत्येक उमेदवारास महानगरपालिकेच्या निवडणुकीचा खर्च साधारण वीस एक हजार रुपये येतो.(काही वर्षांपूर्वीचे पुस्तक आहे) हा आकडा ऐकल्यावर कलियुगात सत्ययुगाची आठवण देणारी एक पूर्वीची निवडणूक आठवली. मुंबईजवळ कल्याण म्हणून एक गाव आहे. तेथे घारपुरे नावाचे एक गृहस्थ गरीबीत दिवस काढीत रहात होते. त्यांना मुंबईत नोकरी होती. कल्याणहून रोज ते मुंबईस जात. हे गृहस्थ भयंकर तत्त्वाचे होते. मी भयंकर म्हटलं याचं कारण त्यांची जाज्ज्वल्य तत्त्वनिष्ठा लोकांना भयंकर वाटायची. दरवर्षी ते म्युनिसिपल निवडणुकीसाठी उभे रहात व दरवर्षी भयंकर बहुमताने निवडून येत. मला वाटते ते असे सहा वेळा निवडून आले. निवडणुकीला उभे राहण्याची त्यांची तऱ्हा न्यारी होती. त्यांच्या वॉर्डात जेवढे मतदार होते तेवढी पोस्टकार्डे ते विकत घेत. ही पोस्टकार्डे विकत घेण्यास त्यांचे मित्र एक एक रुपया काढून पैसे देत. त्यावेळेस पंचवीस रुपयांची कार्डे भरपूर होत. ही कार्डे लिहिण्यास मित्रांची मुले येत. निवडणुकीचा हा एवढाच त्यांचा खर्च. कार्डावर खालील चार ओळी असत-
सप्रेम नमस्कार,
तुम्ही मला निवडून दिल्यास मी सत्ताधारी पार्टीस मिळणार नाही असे वचन देतो. सतत विरोधी पार्टीच्या बाकावर बसून सत्तेवरची पार्टी योग्य कारभार करते आहे की नाही इकडे मी लक्ष ठेवीन.
माझ्याजवळ पैसा नाही त्यामुळे तुम्हास मतदान केंद्रावर नेण्यास मला टांगा धाडता येणार नाही. तसेच मला स्वत:लाही तुम्हास `मत द्या' असे सांगता येणार नाही. कारण मला मुंबईस नोकरीला जावे लागते. तसेच पैशाअभावी आणखी पत्रही तुम्हाला धाडता येणार नाही. मतदानाच्या दिवशीही गावात रहावयाचे नाही हा माझा परिपाठ आहे. मी मुंबईस नोकरीवर जाईन. कारण मी माझे काम चोख केले तरच तुमची कामे मी चोख करीन असा विश्वास तुम्हाला येईल. तुमचे मत मला मिळेल असे मी धरून चालतो.
आपला नम्र

१४ वर्षे नगरसेवक असताना पालिकेत त्यांनी स्थायी समितीसह निरनिराळया समित्यांचे अध्यक्षपद भूषविले होते. ते कार्यकारी अध्यक्ष असताना त्यांच्यावर विरोधकांनी अविश्वास ठराव मांडला. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा ठराव चर्चेस मांडल्यानंतर ठराव मांडणाऱ्या सभासदाने `श्री.घारपुरे यांच्या विरोधात बोलण्यासारखे काही नाही' असे म्हणून ठराव मागे घेतला. ही बातमी त्यावेळच्या सर्व वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली होती. अतिशय प्रामाणिक असल्याने १४ वर्षे नगरसेवक राहून त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीत काही बदल झाला नाही.
कोणाकडेही मृत्यू झाल्यास ते मदतीला धावून जात व सर्व प्रकारची मदत करत. त्यांच्या असे लक्षात आले की पतीच्या शवाबरोबर मणीमंगळसूत्र चितेवर ठेवले जाते. अंत्यविधीच्या मंत्रात मंगळसूत्र ठेवण्याचा उल्लेख नाही. एक प्रथा म्हणून हे केले जाते. हे सोने सामाजिक संस्थांस दिल्यास मोठे काम होईल. पण ही परंपरेने चालत आलेली रूढी प्रथम कोण मोडणार? दुर्दैवाने त्यांच्या पत्नीस देवाज्ञा झाली. तेव्हा धाडसाने त्यांनी ते सोने कल्याण ब्राह्मण सभेला दिले. त्यानंतर कल्याणात अनेकांनी असे सोने दान दिले. क्रियाकर्म उघड्यावर करावयास लागू नये म्हणून दोन खोल्या शेनाळया तळयाच्या पाळीवर बांधून सोय केली. ठाण्याला त्यांचे मामेभाऊ श्री.छबूनाना जोशी यांनी असाच उपक्रम करून शाळेला हजारो रुपये देणगी मिळवून दिली. पुण्यात देखील मंगळसूत्राचे पंधरावीस हजार रुपये वनवासी कल्याण आश्रमास मिळाले आहेत.
आपले आराध्यदैवत स्वा.सावरकर यांच्या जीवनावर २५० पानी महाकाव्य लिहिले. ते १९५७ साली प्रसिद्ध केले व स्वत: सावरकरांच्या घरी जाऊन त्यांना अर्पण केले. सावरकरांनी चार ओळींची अभिप्राय देऊन शाबासकी दिली. या पुस्तकाच्या विक्रीतून आलेल्या पैशांपैकी एकही पैसा (नोकरी सुटलेली असतानासुद्धा) स्वत:ला न घेता स्वत:चे नावसुद्धा न देता `स्वातंत्र्यसमर शताब्दी' या नावाने शाळांमध्ये शिष्यवृत्त्या ठेवल्या आहेत.
ते सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते. कल्याणला झालेल्या मिठाच्या सत्त्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता. हिंदु महासभेत काम करत होते. ते अध्यक्ष असताना स्वा.सावरकरांचा  कम्युनिस्टांसह सर्व पक्षीय सत्कार झाला. सावरकरांनी याचा गौरवपूर्ण उल्लेख करून आपल्या गळयातील हार ती.दादांच्या गळयात घातला होता. हा त्यांच्या आयुष्यातील सुवर्णक्षण होता. त्यांनी उतार वयात गोव्याच्या सत्त्याग्रहात भाग घेतला होता. सत्त्याग्रहात त्यांना जबरदस्त मारहाण झाली. अपमान करण्यासाठी संगिनीने शेंडी कापली. जखमेमुळे त्यांना मानसिक व शारिरीक त्रास अनेक दिवस होत होता. संयुक्त महाराष्ट्नच्या सत्त्याग्रहातसुद्धा त्यांनी भाग घेतला होता. त्यांनी ज्योतिषाचा अभ्यास केला होता, त्यांचे प्रभुत्व होते. परंतु त्यांनी कोणाकडूनही एकही पैसा घेतला नाही.

भ्रष्टाचार, सार्वत्रिक अनाचार, सामाजिक दुरवस्था नाहीशी करायची असेल तर त्यासाठी घटनादुरुस्ती, पटपडताळणी, जनलोकपाल, निवडणूक सुधारणा इत्यादि उपाय कितीसे प्रभावी ठरतील याबद्दल कुणालाही पूर्ण विश्वास नसतो म्हणूनच त्यासंबंधी वाद चालू असतात. मूलभूत समस्येवर मूलभूत उत्तर आहे ते गं.दि.घारपुरे यांचेच!
संदर्भासाठी गं.दि.घारपुरे यांचे पुत्र
य. गं. घारपुरे ,२०३, जानकीदास शेल्टर्स, घोडेखोत आळी,भारताचार्य वैद्य चौक, कल्याण (जि.ठाणे) ४२१३०१
(फोन : २२०८२४०)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...