Skip to main content

Sampadkiya in 24 OCT.2011


गेल्या पन्नास शंभर वर्षांतील भारताची प्रतिमा गरीब देश म्हणून आहे. याच काळात युरोप-अमेरिकेतील श्रीमंती कुणाच्याही नजरेत भरणारी होती. कैक वर्षांमागे भारतभूमीत सोन्याचा धूर निघत होता म्हणतात, त्या काळी तिकडील वस्ती आदिम अवस्थेच्या वल्कलांत वावरत होती. काळाचा फेर चक्रमेनिक्रमेण वरखाली होत असेल तर येता काळ पुन्हा भारताचा असू शकेल कारण अमेरिका-युरोपात शब्दश: यादवीला आणि आर्थिक वर्गसंघर्षाला प्रारंभ झाल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. अर्थात् त्याचा प्रत्यक्ष परिणाम लगेचच तिथे दिसू लागेल असे नव्हे आणि भारताला केवळ कालगतीनेच संपन्नता येईल असाही भ्रम नाही. `अर्थस्य पुरुषो दास:' याचा चिरंतन प्रत्यय येत असला तरी निव्वळ स्वत:च्या बुडाखाली संपत्ती साठवत नेण्याचा अढळ परिणाम पुन्हा कफल्लक होण्यातच असतो हेही वारंवार अधोरेखित होत आलेले आहे. संपत्तीची देवता लक्ष्मी ही चंचल असते म्हणतात, ते त्याच अर्थाने असावे. म्हणूनच लक्ष्मीपूजनाच्या सणाला दीपज्योतींचा सन्मान करण्याला महत्त्व आहे. पूर्वपरंपरेने पिढीजात चालत आलेला चांदीचा खणखणीत रुपाया देवघरात ठेवून, त्याचे पूजन होते. तो त्या दिवशीचा मान नोटांच्या थप्प्यांना मिळत नाही किंवा शेअर-सर्टिफिकेटांसही नाही.

अमेरिकेतल्या आर्थिक मंदीमुळे गेल्या दोन-तीन वर्षात तेथील जनता हवालदिल झाली आहे. युरोपीय देशांनी समान चलनांतून युरो व्यवहार सुरू केल्यामुळे परस्पर सहकार्याची शक्ती वाढण्याऐवजी ग्रीसचे दिवाळे वाजण्यातून जर्मनीच्या दौडीला भलतेच लोढणे झाले आहे. शे दोनशे वर्षांपूर्वी पश्चिमेच्या प्रतिकूल निसर्गामुळे विरळ असणारी मनुष्यवस्ती औद्योगिक क्रांती, तेलसाम्राज्य आणि दळणवळणातील वेग यांमुळे श्रीमंत झाली, तशीच ती पिपासू बनली. ती पिपासा केवळ परदेशांना लुटण्यातच थांबली नाही, तर स्वकीय समूहालासुद्धा ओरबडतच राहिली. त्यातूनच जर्मनीमध्ये ग्रीसचे लोढणे फेकून देण्यासाठी सामायिक युरो चलनास होणारा विरोध; अथवा अमेरिकेतील वॉलस्ट्नीटवर होणारी `ऑक्युपाय वॉल स्ट्नीट'(वॉलस्ट्नीट बळकावून घ्या) अशी आंदोलने पेटत आहेत. मुंबईतील फोर्ट किंवा दलाल स्ट्नीटवर जशी कंपन्यांची कॉर्पोरेट कार्यालये आहेत तशीच न्यूयॉर्कच्या वॉल स्ट्नीटची मिरास आहे. त्यावरच आता तेथील जनता `हल्ला बोल' म्हणते आहे.

हे आंदोलन कॉर्पोरेट हावरटपणा आणि आर्थिक विषमतेतून आलेला सामाजिक संघर्ष यांचा परिणाम आहे. आंदोलकांची स्पष्ट घोषणा आहे की, `आम्ही ९९ टक्के आहोत, की जे १ टक्क्यांची हाव सहन करणार नाही!' अमेरिकेतील मोठ्या वित्तसंस्था आणि कंपन्यांच्या सट्टेबाजीतून अरिष्ट आले. त्यांच्या कोलमडण्याने गोंधळ वाढेल म्हणून अब्जावधींची गाठोडी (पॅकेज) त्यांच्याच खड्ड्यात टाकणाऱ्या सरकारच्या धोरणांविरुद्ध हे आंदोलन आहे. या आंदोलनांतून अमेरिकेत काय घडले हे आजच सांगता येत नाही; पण २०१० सालच्या आकडेवारीनुसार २० टक्के लोकांकडे ४९ टक्के राष्ट्नीय उत्पन्नाचा वाटा आहे, त्यातील केवळ १ टक्क्याकडे २४% वाटा आहे. यात वांशिक व वर्णभेदाचाही पैलू स्पष्ट आहे. याविरुद्ध होणारी आंदोलने आताच तीव्र होण्याचे कारण म्हणजे चटके सामान्य स्थितीच्या बहुतांश लोकांना बसू लागले आहेत.

सर्वे भद्राणि पश्यन्तु...
मानवी समूहातही एक सजीवलक्षणी पशुत्त्व नांदत असते; त्यामुळे `इतरांपेक्षा मी मोठ्ठा' होण्याची ईर्षा प्रत्येकात असते. ही ईर्षा संपून इतरांपेक्षा मोठेपण प्राप्त झाले तरीही माणूस थांबत नाही, तो त्याहून मोठा होऊ पाहतो. हे व्यक्तीचे समूहांतर्गत वागणे,  समूहाचे देशांतर्गत बाबतीत असते आणि देशाचे जगाच्या बाबतीत असते. त्यामुळे आर्थिक संपन्नता मिळाल्यावर अमेरिकेची दादागिरीच वाढली. एकेकाळी ती इंग्लंडची होती. परंतु अमेरिकेतही सर्वच नागरिकांत समानत्त्व नाही, तिथेही सार्वत्रिक श्रीमंतीपेक्षा अतिअतिश्रीमंतांचा वेगळा थर आहे, त्यांची दादागिरी आहेच. त्यामुळे या लुटारू वा दिवाळखोरांच्या खेळात त्यांची श्रीमंतीच वाढते. मुक्त अर्थव्यवस्था किंवा उदारीकरणाचा स्पष्ट धोका दिसतच होता की श्रीमंत अधिक श्रीमंत, आणि गरीब अधिक गरीब होणार!

याच एका तोलावर सरकार नावाच्या नियंत्रण व्यवस्थेचे कर्तव्य अधोरेखित होत असते. त्या नियंत्रणातून, संपत्तीची अनिर्बंधता आटोक्यात राहावी आणि तरीही निर्मितीला चालना रहावी हे अपेक्षित असते. समृद्धीची मिजास न वाढता तिचा उत्सव व्हावा हा सुसंस्कृत मानवी मनांचा संस्कार सर्वत्र प्रगट व्हायला हवा. उद्वेगातून, असूयेतून, अभावचिंतेतून होणारी आंदोलने ही श्रीमंतीच्या कर्कश्श कैफाची दुसरी बाजू आहे. युरोचलन वापरणाऱ्या देशसमूहातील ग्रीसमध्ये दिवाळे वाजले म्हणून त्यावर काटकसरीच्या अटी लादल्या तरीही त्याविरुद्ध उग्र निदर्शने होत आहेत, आणि ग्रीसचे लोढणे फेकून द्यावे म्हणून फ्रान्स-स्पेन-जर्मनी येथेही निदर्शने होत आहेत.

या सर्व घडामोडीत आपल्या देशातील स्थिती पाहता निव्वळ शोकांतिका दिसते. गेल्या वर्षभरातील घटनांतून काही बोध घ्यावा असे कुणालाच वाटत नाही. दिवाळीच्या आणि बकरी ईदच्या देशवासियांना शुभेच्छा देण्यापुरते काम राष्ट्न्प्रमुखांना उरले असावे. बरेचसे नरकासुर तिहार तुरुंगात गेले आहेत हीसुद्धा बाब अंधार कमी करणाऱ्या एका ज्योतीचा भास करून देते.

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. तो बेताल अरेरावी झगमगाटाचा उत्सव नव्हे. छोट्या पणत्या घरोघरी पेटविण्याने सगळीकडचा अंधार नाहीसा होत नाही हे खरे आहे; परंतु विश्वातील अंधार एकत्र झाला तरी तो एका ज्योतीचा पराभव करू शकत नाही हेही खरे! अशा ज्योतींची सुमंगल मालिका तयार करून त्या ज्योतींमधल्या एकसमान मांगल्याचा संकल्प या पर्वकाळात आपण करूया.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...