Skip to main content

Lekh of Shri. Anil Kakodkar in 19 Sept.2011



शिकागो येथे बृहन्महाराष्ट्न् मंडळाचे पंधरावे अधिवेशन जुलै २०११ मध्ये झाले.
त्यानिमित्त श्री.अनिल काकोडकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण संक्षेपाने...

शिक्षण, कौशल्य व अनुभव यांचा मेळ हवा...

   आजचे आपल्यापुढील चित्र वेगाने घडणाऱ्या स्थित्यंतरांचे आहे. एका बाजूला तंत्रज्ञानात विलक्षण वेगाने होणारे बदल व त्याचा समाजावर प्रभाव, तर दुसऱ्या बाजूला नैसर्गिक साधनसामग्रीचा सतत वाढणारा वापर व त्यामुळे मानवाचा व निसर्गाचा समतोल ढळण्याच्या चिंतादायक परिस्थितीकडे वाटचाल. विशेषत: तरुण पिढीला या परिस्थितीतून पुढे जायचे आहे.
भारतात आज प्रचंड युवासंख्या व आर्थिक उदारीकरण या दुहेरी कारणास्तव चांगलीच आर्थिक वाढ आपण अनुभवतो आहोत. शिक्षित, कार्यक्षम व कुशल युवा मंडळींस आज अनेक संधी देशात व देशाबाहेरही उपलब्ध होत आहेत. माहिती मिळण्याची व संपर्काची साधने व त्यांचा सततचा वाढत जाणारा वापर यामुळे तरुण मंडळींच्या आकांक्षा व अपेक्षा उंचावल्या आहेत. नवीन संधींशी गुणात्मक, तसेच संख्यात्मक अपेक्षांचा मेळ बसवणे हे मोठे आव्हान आहे.
भारत मानवी संसाधनाबाबत जरी समृद्ध असला, तरी नैसर्गिक साधनसामग्रीबाबत परिस्थिती म्हणावी तितकी समाधानकारक नाही. आज भारताच्या जनसंख्येच्या तुलनेत उपलब्ध साधनसामग्री आवश्यकतेपेक्षा कितीतरी कमी असल्याचे जाणवते. भारताचा कच्चा माल सरळ जागतिक बाजारपेठेत नेण्यापेक्षा त्यावर अधिकाधिक मूल्यवृद्धी भारतातच करून बाजारपेठेत नेणे अधिक महत्त्वाचे आहे. यासाठी कल्पकता, उद्योजकता व नवीन तंत्रज्ञान प्रोत्साहित करणारे पोषक वातावरण भारतात निर्माण करणे ही आपली सर्वांची प्राथमिकता बनली पाहिजे. नवीन तंत्रज्ञान, नवीन कल्पक साधने व प्रक्रिया निर्माण करण्याबाबत अग्रेसर राहणे ह्याशिवाय तरणोपाय उरणार नाही.
भारताचे अर्थकारण अमेरिका, चीन व जपान पाठोपाठ चौथ्या क्रमांकावर आहे. सध्याचा आर्थिक वाढीचा दर लक्षात घेता लवकरच आपण तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू. जगात सर्वात जास्त युवासंख्या असलेल्या भारतापुढे वैभवशाली व संपन्न असे राष्ट्न् म्हणून पुढे येण्याची संधी चालून आलेली आहे. हे सर्व घडण्यासाठी भारताच्या प्रचंड युवाशक्तीचे त्यांच्या आकांक्षापूर्तीद्वारे सकारात्मक शक्तीत रूपांतर होणे आवश्यक आहे. हे न झाल्यास या प्रचंड शक्तीचा भस्मासूर पुढे येण्याची शक्यता लक्षात घेता या बाबतीत लवकरात लवकर निर्णायक पावले उचलणे अनिवार्य आहे.
अमेरिका हा प्रचंड प्रमाणावर संधी उपलब्ध असलेला व करून देणारा असा देश आहे. आर्थिक सुबत्ता, नैसर्गिक साधने आणि प्रतिभावंत गुणी मंडळींना सतत आपल्यात सामावून घेण्याची वृत्ती ही अमेरिकेची प्रमुख बलस्थाने. आज भारतीयांचा अमेरिकेतील दबदबा भारतीयांचे ज्ञान, कौशल्य व कार्यकुशलतेमुळे निर्माण झाला आहे. यापैकी बऱ्याच गोष्टी भारताच्या विशेषत: गरीब, ग्रामीण व मागासलेल्या भागासाठी खूप उपयोगी ठरू शकतील. उदाहरणेच द्यायची तर सौरउर्जेची निर्मिती व सौरउर्जेवर आधारलेली विकेंद्रित उपयोगासाठीची साधने, स्वच्छ व सुरक्षित पाण्याची दुर्गम व दुष्काळी भागातील उपलब्धी, शेतीमालावर मूल्यवृद्धीची ग्रामीण भागातच व्यवस्था आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञानाच्या आधारे ग्रामीण भागात चांगल्या शिक्षणाची सर्वांना परवडेल अशी व्यवस्था. येथील व भारतातील समविचारी मंडळी आपसातील एकत्रित सहकार्याने बरेच काही साध्य करू शकतो. भारतातील तळागाळाच्या युवक मंडळींना पुढे आणून त्यांच्याद्वारे भारताचे अर्थकारण व समाजकारण बळकट करणे म्हणजे संपन्न आणि समृद्ध भारताचा पाया भक्कम करणे होय.
आज भारतात सर्वच क्षेत्रांत वर्णाश्रम सदृश परिस्थिती बोकाळली आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील शिक्षक मंडळी संशोधन किंवा तंत्रज्ञान विकासाकडे लक्ष देण्यास फारशी राजी नसलेली, प्रयोगशाळांतील वैज्ञानिक मंडळी शिक्षकाची भूमिका बजावण्यास उत्सुक नाहीत. तंत्रज्ञानाचा विकास बहुतांशी इतर देशांत झालेल्या गोष्टींच्या पुनरावृत्तीच्या स्वरूपात दिसतो. भारतातील उद्योग, संशोधन व विकास या क्षेत्रांत अजून फारशी गुंतवणूक करताना दिसत नाहीत.
भारताला त्याच्या आकांक्षा साध्य करावयाच्या असतील तर शिक्षण, संशोधन व तंत्रज्ञान विकास, नवीन ज्ञान व तंत्रज्ञानाचे व्यावसायिक किंवा सामाजिक मूल्यनिर्मितीत रूपांतर ह्या साऱ्या गोष्टी एकत्रित स्वरूपात पुढे नेता आल्या पाहिजेत. आज भारतात एकूण पंधरा आयआयटी आहेत. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्या भारतातील अग्रगण्य शिक्षणसंस्था होत. तंत्रज्ञानविषयक संशोधनाच्या बाबतीत बोलायचे झाले तर आज भारतात अमेरिका किंवा चीन या देशांच्या तुलनेत एक दशांश पीएच.डी. निर्माण होतात. म्हणूनच आयआयटीसारख्या संस्थांत पीएच.डी.चे कार्यक्रम दसपट वाढविण्याची शिफारस आहे. संशोधनासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने सरकारी खाती व उद्योगधंदे यांचा पुढाकार, पाठबळ व सहभाग असावयास हवा. संशोधन व तंत्रज्ञानावर आधारलेली कल्पकता व उद्योजकता तरुण मंडळींत रुजण्याच्या दृष्टीने ते अत्यंत आवश्यकही आहे.
राज्यस्तरावरील उच्च व तंत्रशिक्षणाबाबत बोलावयाचे तर आव्हाने अधिकच मोठी झालेली दिसतात. शिक्षण अत्यंत चाकोरीबद्ध व समाज व उद्योगांच्या गरजा या दृष्टीने थोडे मागे पडले आहे. मग शिक्षित बेरोजगार व वैफल्यग्रस्त तरुणांचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. हे सर्व पालटण्यासाठी शिक्षणानुरूप कौशल्य व त्याचा प्रत्यक्ष उपयोग करण्याचा अनुभव यांची जोड द्यावयास हवी. शिक्षण विद्यार्थ्योन्मुख व त्यांच्या आवश्यकतेनुसार विविध पर्याय उपलब्ध करून देणारे आवश्यक आहे. महाविद्यालयांना त्यांच्या पात्रतेनुसार स्वायत्तता देण्याची गरज आहे.  मूलत: शिक्षणाची आव्हाने दोन आहेत. एक दर्जा उंचावण्याचे व दुसरे, शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना शिक्षणाचा दर्जा खालावू न देता सामावून घेण्याचे. कुठल्याही शिक्षणक्रमात शिक्षकाचा विद्यार्थ्यांबरोबर मोकळा संवाद, सहवास व शिक्षकाची `मेन्टॉर' म्हणून असलेली भूमिका या बाबींना अनन्यसाधारण महत्त्व असते. तंत्रज्ञान हे या गोष्टींना कितपत पर्याय ठरू शकते हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आजचा जमाना ए-थ्री (एनीवन, एनीटाईम, एनीव्हेअर) कनेक्टेड सोसायटीचा आहे. वेगवेगळया ठिकाणी असलेल्या मंडळींचा सहभाग एखाद्या कार्यात साध्य करणे आता शक्य आहे. अशा तंत्रज्ञानाचा विकास आणि त्याचे प्रत्यक्ष कार्यान्वयन यांमध्ये येथील व भारतातील तज्ज्ञ व कार्यकर्ते एकत्रितपणे बरेच काही करू शकतील.
शिक्षणाप्रमाणेच इतर अन्य क्षेत्रांतही अमेरिकेतील व महाराष्ट्नतील तज्ज्ञ मंडळी यांना करता येण्यासारखे बरेच आहे. आज भारतात दरडोई सरासरी ६५० ते ७०० युनिटस् इतकी वीज वापरली जाते. हे प्रमाण इथल्यापेक्षा एक तीसांश (३%) असावे. भारतीयांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने विजेचा वापर वाढवणे आवश्यक आहे. भारतामध्ये विजेचा वापर माफक ५००० युनिटस्पर्यंत वाढवायचे ठरवले, तर आजच्यापेक्षा जवळपास दसपट अधिक वीज भारतात निर्माण करणे अपरिहार्य आहे. `क्लायमेट चेंज'सारखी मोठी समस्या असताना ही अधिक वीज निर्माण करण्यासाठी नॉन फॉसिल इंधनांचा अधिकाधिक उपयोग करणे ही आजची गरज आहे. अणुऊर्जा व सौरऊर्जा हे दोनच महत्त्वाचे ऊर्जास्रोत एवढी मोठी गरज भागविण्यास समर्थ आहेत. या दोन्ही माध्यमांचा प्राथमिकतेने विकास करणे ही आज काळाची गरज आहे.
अणूउर्जा केंद्रे ही खूप मोठ्या क्षमतेची असतात व साहजिकच त्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज असते. सौरऊर्जेची निर्मिती व वापर त्या मानाने छोट्याछोट्या उपकरणांचा वापर करून विकेंद्रित स्वरूपात करता येतो. व्यक्तिगत स्तरावर सहकार्याच्या संधी सौरऊर्जा राबविण्याच्या दृष्टीने शोधणे अधिक सुलभ आहे व त्या दृष्टीने खूप काही करता येईल. सौरऊर्जेचा वीज आणि प्रकाश यांसाठी उपयोग करण्याबरोबरच इतर ऊर्जेशी निगडित तंत्रज्ञानांचा विकास आवश्यक आहे. पाण्याचे विघटन करून हायड्नेजन निर्मिती, हायड्नेजन व बायोमास यांचा वापर करून दळणवळणाच्या आजच्या साधनांसाठी उपयुक्त अशा इंधनाची निर्मिती, कार्बन डायऑक्साईड प्रमाण कमी करणे असे उपक्रम अग्रक्रमाने हाती घेण आवश्यक आहे.
भारतात आज युरेनियमवर आधारित वीस अणुकेंद्रे कार्यरत आहेत. त्यातील बहुतेक भारताने स्वयंपूर्णतेने स्वबळावर उभारली आहेत. भारतात आज ऊर्जेची समस्या गंभीर झालेली आहे; पण भारतात हवे तितके युरेनियम मात्र उपलब्ध नाही. ऊर्जेची आजची गरज भरून काढण्यासाठी इंधन युरेनियमच्या स्वरूपात आयात केले तर अधिक ऊर्जा निर्माण करून भविष्याची तरतूदपण करता येते. भारतात विकसित अणुभट्ट्या व अणुऊर्जा तंत्रज्ञान केवळ भारतातच नव्हे, तर परदेशांतही वापरणे आता शक्य आहे. भारतात विकसित अॅडव्हान्सड् हेवी वॉटर रिअॅक्टर हे एक भविष्यातील गरजा लक्षात घेऊन तयार केलेले डिझाइन आहे. त्याद्वारे अणुशक्ती अधिक सुरक्षित करणे शक्य आहे. केव्हातरी भारतीय अणुभट्ट्या भारताबाहेर उभारल्या जातील असे स्वप्न मी बाळगून आहे.
- डॉ.अनिल काकोडकर
अध्यक्ष, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग,महाराष्ट्न् राज्य
(`मराठी विज्ञान परिषद पत्रिके'वरून)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन