Skip to main content

Maza Column in 14 NOV.2011


फराळाचा शिल्लक चुरा
दसरा किंवा पाडव्याला श्रीखंड करायची रीत होती, तशी पंचमी-होळीला पुरणपोळी असायची. आताही ती असते परंतु दोन दिवस आधीपासून त्याची तयारी करावी लागत नाही. दूध साठवून ते तीनतीनदा तापवायचं, विरजून दही लावायचं, पातळ फडक्यात ते ओतून त्याचं चुमडं बांधून खुंटीला चार-सहा तास टांगायचं, पाणी पूर्ण निथळलं की तो मऊशार चक्का फेसून घेत साखर मुरवायची.... इतकं काही आता करावं लागत नाही. परवा आमचा एक मित्र जेवायला आला. पंगत सुरू झाल्यावर श्रीखंड चाखत म्हणाला, ``वा! श्रीखंड मस्तच झालंय...!! कसं किलो मिळालं?'' कुठलाही पदार्थ कुणाही घरी आयता तयार विकत आणलेला असणार हे आता लपविण्याइतकं नवीन राहिलं नाही. पुरणपोळी, कुरड्या-पापड, लोणची-मसाले, पिठं-भाजण्या-पिठी-रवा-मेतकूट.... वाट्टेल ते. घरी कुठं करता!
आता तर हे जिन्नस विकत आणून घरी पाहुणचार करणं हेसुद्धा जिकीरीचं आहे. कुणी घरी यायचं म्हणजे नाही म्हटलं तरी आवरासावर करावी लागते. फुलदाणीतले गेंद प्लॅस्टिकचेच असले तरी ते स्वच्छ करावे लागतात. पलंगपोस बदलावे लागतात, बेसीन धुवावे लागते. शिवाय नंतर खरकट्या भांड्यांचा ढीग पडतो, अन्न उरून बसतं! - अनेक व्याप. त्यापेक्षा परस्पर कुठंतरी जेवणाची सोय करता येते, चार पैसे देऊन मोकळं! आपण आपल्या घरी परत, अन् पाहुणे त्यांच्या घरी. बाकी गप्पागोष्टी अघळपघळ करता येतात. कपड्याची इस्त्री किंवा डोक्याचा कलप विसकटत नाही.
किराणावाल्यांची दुकानं हल्ली पार बदलली. पूर्वीची उघडी धान्य पोती व गोड्या तेलाचे ओघळ कधीच पुसले. पुढच्या पिढीनं दुकानात स्वयंसेवा आणली. कॉम्प्यूटर व क्रॅमेरे बसवले. त्याचा एक मालक सांगत होता, `पूर्वी दसरा उलटला की दिवाळीचा बाजार सुरू व्हायचा. धान्य, शेंगा, मिरच्या, तेलाचे घाणे यांची धूम उठायची. नंतर काही काळानं तयार तिखट, शेंगदाणे, जिरं-मिऱ्याचं चूर्ण, दळलेले मीठ असा जमाना आला. मधल्या काळात तयार भाजणी, तयार पिठं, तयार सारण अशा वस्तू आल्या. अलिकडं चकली-चिवडा-लाडू सगळं तयारच मिळतं. प्लॅस्टिक पिशवीचं तोंड फोडलं की तोंडात. आजच्या दिवाळीत चार दिवस आधी घरोघरीची ऑर्डर येते; त्याप्रमाणं खोकं भरून त्याला चिठ्ठ्या चिकटतात. ऐनवेळी यायचं, कूपन दाखवायचं अन् आपला खोका उचलायचा.'
फराळाचं तरी नाविन्य ते काय? वर्षभर हे जिन्नस एसटी स्टँडवरसुद्धा मिळतात. दिवाळीत काही वेगळं खावं असं अप्रूप कुणाला उरलं नसावं. आमच्या घरचा नमुना, तुमच्याकडून आलेला चिवडा-लाडू असं देण्याचं-घेण्याचं वास्तविक कारण नाही. कारण ते तर कुणाच्याच `हातचं' नसतं. पण या मिसळपिशव्या देण्या-घेण्याची प्रथा मात्र टिकून आहे.  कदाचित आमच्याकडील `दांडेकर', तुमच्याकडचा `चितळे', त्यांच्याकडे आलेला `जोशी' यांचे नमुने नमुन्याला देत असतील. ते येणारे जिन्नस प्रत्येक घरी चवीनं खाल्ले जातात असं तरी कुठाय? आलेल्याच `गाठोड्या'तून दोन लाडू इकडं अन् चार करंज्या तिकडं!! पहिल्या दोन दिवसात आलेल्या लाडूवर एखादा बेदाणा-काजू दिसतो; पण दिवाळी उलटून गेल्यावर परस्परांत ते पुडके फिरतात, त्यात अनेक चिवड्यांची भेळ, चकल्यांचे अनेकरंगी तुकडे, करंजीचा चुरा असा चिल्लरखुर्दा झालेला असतो.
माणसांचं तसंच झालंय. एकमेकाची घसट वाढलेली नाही, पण उगीच दळणवळण वाढलंय. फोन, मोबाईल, ईमेल एसेमेस या सगळयांतून `हॅप्पी दिवाळी'चा मारा होतो. पण त्यातून शिल्लकीतल्या सद्भावना पाहू गेल्यास तळाच्या तिखटमिठाचा कुट्टा राहिलेला असतो. सद्भावना-सदीच्छासुद्धा श्रीखंडासारख्या तयार व्हायला हव्यात. त्यातलं पाणी निथळून काढल्यावर मागे उरणारी मलई आपल्या अंगी साखर मुरवून घेते तो अनुभव मोलाचा होता. त्यात भावनांचा स्पर्श होता. माणसं विखुरली, ती वेगळया स्थळी गेली, मनानं आपापल्या जगात रमली. खायचं ते खातात, त्याची चव जिभेसारखी मिळते, पण त्यातली चव मनाला भिडावी. दिवाळीचा फराळ काय अन् होळीची पोळी काय; पैशाला पासरी मिळतेच! माणसाची मनं आस्वादता आली तर त्या सणांचा आनंद. तो पुरणात वा चक्क्यात नसतो, परस्परांच्या मनांत उरला तर तृप्ती, नाहीतर निव्वळ एक उपचार.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन