Skip to main content

Sampadkiya in 26 Sept.2011


नवे सीमोल्लंघन हवे...

हवामान खात्याकडून अधिकृत घोषणा झालेली नसली तरी पावसाळा संपल्याची लक्षणे दिसत आहेत. महाराष्ट्नतील दोन-तीन जिल्हे वगळले तर कोकण आणि विदर्भात भरपूर पाऊस पडला. तरीही एकंदरीत चित्र नियमित पावसाचे नाही. जिथे पडला तो महाप्रचंड पडला आणि मानवी जीवनात त्याने खूप गोंधळ निर्माण केला. तर काही जिल्ह्यात हवा कोरडी नसली तरी रोगट होती. पण पुरेसा पाऊस नाही. या सगळयाचा अर्थ एकच होतो की पाऊसकाळ नियमित झालेला नाही. शास्त्रीय आकडेवारी सांगण्यासाठी त्याने सरासरी गाठली असे म्हणता येईल. आठवड्याभराचे अन्न एकाच दिवशी खाल्ल्यासारखा तो प्रकार झाला आहे.

तरीसुद्धा महागाई आणि चलनवाढीचे आकडे सांगताना पावसाचे निमित्त पुरेसे ठरण्यासारखे आहे. पाऊसकाळ चांगला झाला किंवा वाईट झाला ते माणसाच्या कर्तबगारीवरही ठरते. दुष्काळ पडला हे निमित्त सरकारने वास्तविक कधीच सांगू नये. तर दुष्काळ निवारणासाठी जे प्रयत्न आवश्यक असतात ते तडफदारीने केले पाहिजेत. अचानक कोसळणारी दरड वाहतुकीत व्यत्यय आणते हे खरे आहे. परंतु त्याचे निवारण कसे होते हे सरकारच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आणि त्याही पुढे जाऊन पुन्हा अशी आपत्ती आल्यास वेगळे काय घडते हे पाहणे जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. दरवर्षी रस्त्यांची कामे होतात आणि दरवर्षी तितकेच खड्डे पडतात. असे वर्षानुवर्षे चालत असेल तर कधीतरी पावसावरती ठपका ठेऊन मोकळे होणे कोणत्याही प्रशासनाला शोभादायक नाही. एखादा रस्ता चांगला केला किंवा पूल बांधला म्हणून टोलनाक्याची खंडणी वसूल होत राहते. पण गाड्यांची मात्र दुर्दशा होते. याला चांगला कारभार म्हणत नाहीत आणि हा दोष पावसाचा नाही. त्याचप्रमाणे धान्य उत्पादन, त्याची साठवणूक आणि वितरण या गोष्टी सरकारच्या कर्तबगारीवर अवलंबून असतात. धान्याची किंवा फळांची आयात-निर्यात याविषयी कोणतेही धोरण आपल्याकडे नाही. ऊसाचा दर ठरत नाही. कुठेतरी मालेगावात आंदोलने आणि रास्ता रोको सुरू झाली की केंद्र सरकारची आयात-निर्यातीची धोरणे बदलतात. अण्णा हजारेंच्या मागे लाखो लोक चमकोगिरी करणारे भेटले आणि त्यापुढे झुकून संसद चालली. हे जसे चित्र लोकशाहीचे नव्हे तसेच पाऊस आणि शेती उत्पादन याविषयीचे धोरण अभ्यासातून ठरले आणि दीर्घकाळासाठी ते राबविले असे घडत नाही. तरीही आपण शेतीप्रधान म्हणवून घेतो. याइतकी संवेदना उद्योग, शिक्षण अथवा इतर क्षेत्रांमध्ये अनुभवाला येत नाही. म्हणूनच केवळ संख्याबळाच्या आधाराने आपण शेतीप्रधान आहोत. अभ्यास, संशोधन, धोरण आणि अंमलबजावणी हे टप्पे शेतीला पूर्णत: अपरिचित झाले आहेत. आपल्याकडे शिक्षणमंत्री असलाच पाहिजे असे नाही. तसेच शेतीमंत्रीही पूर्णवेळासाठी असला पाहिजे असे शेतकऱ्यांचा म्हणविणाऱ्या पक्षालाही वाटत नाही. शेतीमंत्र्याने क्रिकेट संघटना लढविल्या तरीही चालते. कारण शेती खात्यात तितकेसे काम कदाचित रहात नसावे. वर्षानुवर्षे केवळ सोसायट्या व पंचायती करणारी माणसे स्वत:ला शेतकरी म्हणवून घेतात.

पावसाळयानंतर स्वाभाविकच नवरात्र आणि त्यापुढच्या उत्सवाचे दिवस येतात. पाऊसकाळ चांगला झाला आणि शेतीभाती चांगली पिकली तर या देशाची अधिकांश जनता उत्साही मनाने उत्सवात रमू शकते. घटस्थापनेला देवाचे अधिष्ठान प्रस्थापित करून दसऱ्याला नव्या सीमोल्लंघनाला बाहेर पडण्याची प्रथा आहे. आजच्या काळात हे सीमोल्लंघन केवळ मुलुखगिरीचे असणार नाही. तशी गरजही नाही. परंतु इतर अनेक क्षेत्रे सीमोल्लंघनासाठी आसुसलेली आहेत. नव्या पिढीच्या मर्दांनी थोडेसे घराबाहेर पडून त्याही क्षेत्रांमध्ये मुलुखगिरी करण्याची आवश्यकता आहे. हवामान खात्यात किंवा शेती खात्यात खूप सुधारणा व्हायला हव्यात. धान्य पेरायचे आणि मळणीलाच शेतात जायचे अशी कधीकाळची शेती आपले चांगले दिवस संपवून गेली आहे. विज्ञानाने माणसाच्या हातात जी साधने दिली त्यांचा उपयोग या मूलभूत क्षेत्रांसाठी करण्याचे आव्हान आहे. ते पेलणारे सीमोल्लंघन आवश्यक आहे. शेतकऱ्याची पोरेही मोबाईल आणि इंटरनेट वापरतात याचे कौतुक जरूर आहे. परंतु तो वापर केवळ फिल्मी गाणी ऐकण्यासाठी किंवा भांडणासाठी होत असेल तर ते करंटेपण नाहीसे करण्यासाठी घटस्थापनेला परमेश्वरी अधिष्ठान प्रस्थापित केलेच पाहिजे. शेतीमाल, कीडनियंत्रण, औषधयोजना, उत्पादन, कस - माणसांचा आणि जमिनींचा - या सर्वांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे.

आपल्याकडचे समाजजीवन सध्या अनिष्ट समस्यांनी ग्रस्त झालेले आहे. प्रत्येकाच्या जीवनात समस्याच जास्त आहेत असा सर्वांचाच समज होऊन बसला आहे. आपण सामान्य आहोत आणि सामान्य माणसाच्या समस्या बिकट होत चालल्या आहेत असा एक आत्मकेंद्री भ्रम कवटाळून बसण्याला प्रत्येकाला आवडते. या वातावरणात बदल करायचा असेल तर तोही सामान्य माणसेच करू शकतात. त्यासाठी पहिली गरज ही हतबलता मनातून नष्ट करण्याची आहे. त्यासाठी आता निवळलेले अभ्र हेही समाजमनाचे प्रतिक ठरावे.

माणसाचा विकास शेतीवर आणि निसर्गावर अवलंबून आहे. तो केवळ भौतिक विकास नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक विकासही आपल्या संस्कृतीने गृहीत धरला आहे. त्यासाठी प्रत्येक दिवशी देवाच्या दारी माळ बांधण्याची प्रथा आहे. नवरात्रातील नऊ विषय आपापल्या डोळयांसमोर ठेवून नऊ संकल्प अवश्य करावेत आणि त्याची माळ बांधावी. शेवटी ही प्रतिके असतात. केवळ श्रद्धेतून अशा माळा गुंफून दहाव्या दिवशी त्या निर्माल्य करण्यामुळे अधोगती अटळ आहे. त्याऐवजी त्या माळांमधून नवोन्मेषी प्रेरणा लाभली पाहिजे. त्यासाठी नवरात्राचा जागर आणि दसऱ्याचे सुवर्णवाटप यांची प्रतीक्षा आहे.
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन